'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'

संकल्पना

'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'

- हेमंत गोविंद जोगळेकर

कशालाही पवित्र न मानता विडंबन करण्याची मराठी कवितेत मोठी परंपरा आहे. आज 'झेंडूची फुले' काही जाणत्या रसिकांना माहीत असतात, पण नंतरच्या, म्हणजे खरं तर आपल्या अधिक नजीकच्या काळात 'सत्यकथे'पासून अनियतकालिकांपर्यंत गाजलेले आणि रसिकां-समीक्षकांनी गौरवलेले विडंबनकार हेमंत गोविंद जोगळेकर आज काहीसे विस्मृतीत गेले आहेत. त्यांनी केलेली काही खुमासदार विडंबनं त्या वेळच्या साहित्यिक संदर्भासहित आणि शिवाय सोबत त्यांची टिप्पणी (म्हणजे एक प्रकारे खुद्द घोड्याच्या मुखातून असं म्हणता येईल) लोकांसमोर आणून तो काळ जागा करण्याचा हा एक प्रयत्न. जोगळेकरांच्याच शब्दांत सांगायचं तर : 'मी मूळ कवितेवर प्रेम करतो. तिच्या इतके जवळ जातो की तिच्याशी खेळू शकतो! तिला वेडावून दाखवू शकतो!' ह्याचा प्रत्यय त्यात येईल. आणि कदाचित नव्या विडंबनकारांना मार्गदर्शनही मिळेल.

माझा 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' हा विडंबनकवितासंग्रह मे १९८४मध्ये प्रकाशित झाला. त्याला पस्तीस वर्षे होतील. हा संग्रह प्रकाशित होणे, ही मराठी काव्यविश्‍वातील एक ऐतिहासिक घटना होती, असे जाणकार म्हणतात. तिला पस्तीस वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्या घटनेचा मागोवा घ्यावा आणि त्या अनुषंगाने एकूणच विडंबनकवितेकडे 'पुन्हा एकदा चष्मा काढून' पाहावे, म्हणून हा लेखनप्रपंच! तेव्हा 'अवधारिजो जी'

त्या घटनेचे ऐतिहासिकत्व तपासायचे झाले तर प्रथम माझाच इतिहास तपासायला हवा! मी शाळकरी वयातच काहीबाही लिहू लागलो होतो, ते शाळेत प्रसिद्धही होऊ लागले होते. पण त्यातले सगळ्यात विद्यार्थीप्रिय झाले ते मी शाळेत घडणार्‍या घडामोडी विडंबित करून लिहिलेले बातमीपत्र 'हालचाल'. पुढे आय.आय.टी.त गेल्यावर, वसतिगृहात राहताना तिथेही मी असे पत्र लिहू लागलो. इतकेच काय, नोकरीच्या ठिकाणीही सुरुवातीच्या काळात तिथले विडंबनपत्र लिहिण्याचे धाडस मी करू धजलो! त्याबरोबरच साहित्याची कुठलीही पूर्वपीठिका किंवा उच्चशिक्षण नसताना स्फुट गद्य, कथा, कविता लिहू लागलो. १९७५च्या डिसेंबरमध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'कविता तुमची, निवड पाडगावकरांची' अशी, मुख्यत: तेव्हाच्या नवोदित कवींसाठी, स्पर्धा ठेवलेली होती. तिच्यासाठी मी आधीच लिहिलेली 'होड्या' कविता पाठवली. मंगेश पाडगावकरांनी स्पर्धेसाठी आलेल्या ५००० कवितांतून या कवितेची पहिल्या क्रमांकाने निवड केली आणि तिचे भरभरून कौतुक केले. त्यामुळे आपण लिहितो ते जाणकार कविता म्हणून स्वीकारतात, असा एक दिलासा मला मिळाला. महाराष्ट्र टाइम्सने त्यांचा कवितास्पर्धेचा उपक्रम पुढे वर्षभर राबवला. त्यातल्या निवडक विजेत्या कवींचे एक संमेलन दूरदर्शनने आयोजित केले. तिथे पाडगावकरांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी माझ्याकडे माझ्या आणखी कविता वाचायला मागितल्या. मीही होत्या नव्हत्या त्या सगळ्या कविता उत्साहाने त्यांना दिल्या. त्या वाचून झाल्यावर पाडगावकरांनी मला परखडपणे सांगितले, "‘होड्या’ कवितेत जी ताकद दिसते, ती इतर बर्‍याचशा कवितांत नाही. तुम्ही आधीच्या कवींच्या कविता वाचल्या आहेत की नाहीत? त्या आधी वाचा. विकत घेऊन!" त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी अनेक कवितासंग्रह, नियतकालिके वाचून काढली आणि एक विलक्षण गोष्ट घडली! मला त्यातल्या अनेक नामवंत कवींच्या कवितांची विडंबने स्फुरू लागली. एक-दोन वर्षाच्या काळात अशा ३५-३६ विडंबनकविता मी लिहिल्या. त्या प्रसिद्ध कशा करणार? मग मी या कविता समाविष्ट करणारे काही लेख लिहिले. ते लेख 'मोहिनी', 'राजस', 'अभिरुची'सारख्या मासिकांच्या दिवाळी अंकांतून १९७८ साली प्रसिद्ध झाले.

दरम्यान माझे स्वतंत्र कवितालेखनही सुरू होते आणि या कविता विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत होत्या. या कविता आणि लेखांमुळे माझी ओळख काही दिग्गज संपादकांशी झाली. त्यात होते 'अभिरुची'चे पु. आ. तथा बाबुरावजी चित्रे, 'राजस'चे विजय हरी वाडेकर आणि 'हंस-नवल-मोहिनी'चे आनंद अंतरकर. बाबुरावजी चित्रे माझ्या लेखनाच्या प्रेमातच पडले. त्यात त्यांना अभिरुचीचे पूर्वी गाजलेले लेखकत्रय पुरुषराज अळुरपांडे (म्हणजेच पु. ल. देशपांडे, मं. वि. राजाध्यक्ष आणि अलुरकर) यांच्या लेखनातली चमक दिसली आणि बाबुरावांनी मला 'अभिरुची'च्या प्रत्येक अंकात साहित्यिक घडामोडींचे विडंबन करणारे 'ठणठणपाळ'सारखे सदर लिहिण्यास फर्माविले. मीही 'बाळ गोविंद' या टोपणनावाने 'खडा मारायचा झाला तर' हे सदर लिहू लागलो. आनंद अंतरकरांनी माझे विडंबनात्मक लेख 'मोहिनी'त आणि स्वतंत्र कविता 'हंस'मध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली. 'राजस'च्या विजय हरी वाडेकरांनी ते चालवीत असलेल्या, म्हणजेच ज्ञानेश्‍वर आगाशे यांच्या 'श्री प्रकाशना'तर्फे; तेव्हा महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’मार्फत (मरासासंमं) नव्याने सुरू केलेल्या नवलेखक उत्तेजन (नलेउ) अनुदानाअंतर्गत, माझा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची तयारी दर्शविली. मी त्यांच्यासमोर माझ्या स्वतंत्र कविता आणि विडंबनकविता अशा दोन्ही प्रकारच्या कविता ठेवल्या. त्या वाचून वाडेकरांना असे वाटले, की आचार्य अत्र्यांनंतर प्रथमच कुणी वाङ्मयीन विडंबनकविता समर्थपणे लिहितो आहे आणि अनुदानासाठी येणार्‍या अनेकांच्या कवितांमध्ये माझ्या या विडंबनकविता त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतील, आणि त्यांना सहज अनुदान मिळेल! माझ्या सर्व विडंबनकवितांना गद्य मजकुराची जोड देऊन मी या संग्रहाची संहिता तयार केली. गद्य मजकुरात मला मूळ कवितेचा संदर्भ देता आला आणि जाता-जाता, कवितेच्या होणार्‍या जडजंबाल समीक्षेचेही विडंबन करता आले. या संग्रहात समाविष्ट झालेल्या अरुण कोलटकरांच्या 'बेहद्द नाममात्र घोडा' या कवितेच्या विडंबनावरून अशा संग्रहासाठी एक समर्पक नावही सुचले - 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' आणि या 'मापबेनाघो'ची संहिता मी रीतसर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे दाखल केली.

याच सुमारास ग्रंथालीने 'कविता दशकाची' हा प्रकल्प हाती घेतला. १९७० ते १९८० च्या दशकात नव्याने कविता लिहू लागलेल्या आणि ज्यांचा अद्याप एकही संग्रह प्रकाशित झालेला नाही, अशा कवींकडून त्यांनी प्रत्येकी सहा कविता मागवल्या होत्या. मीही माझ्या सहा कविता ग्रंथालीकडे पाठविल्या. या प्रकल्पाचे संपादक होते - मंगेश पाडगावकर, रमेश तेंडुलकर, दया पवार, विजया राजाध्यक्ष आणि शिरीष पै. संपादकमंडळाने माझ्याकडून आणखी कविता मागवल्या. येत्या दशकात जे प्रभावी होतील, असे संपादकमंडळाला वाटले अशा दहा कवींची त्यांनी 'दशकाचे कवी' म्हणून निवड केली. माझ्यासह अशा दहा कवींच्या, प्रत्येकी दहा कवितांचा संग्रह संपादकांच्या साक्षेपी प्रस्तावनेसह ग्रंथालीने 'कविता दशकाची' या नावाने प्रसिद्ध केला.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक उत्तेजन योजनेच्या कविताविभागाच्या परीक्षकांनी मात्र माझ्या 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' या संग्रहाला अनुदानपात्र ठरवले नाही. वाडेकरांनी आतल्या गोटातली बातमी म्हणून सांगितले की, नवलेखक उत्तेजनच्या कविताविभागाच्या परीक्षकांना विडंबनकवितांना कविता म्हणून मान्यता देणे, मान्य झाले नाही. ते ऐकून मला धक्काच बसला. त्याआधी ५०-६० वर्षांपूर्वीच आचार्य अत्र्यांनी मराठीत विडंबनकविता हा कवितेचा एक उच्च प्रकार म्हणून सुस्थापित केलेला असताना कुणी या मुद्द्यावरून विडंबनकविता नाकाराव्यात, हे न समजण्यासारखे होते. त्यावेळी प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक आनंद यादव हे पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. दूरदर्शनवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रमातील नवोदितांच्या कविसंमेलनात माझ्याबरोबर सहभागी झाल्याने, मित्र झालेल्या कवी निरंजन उजगरे याने मला आनंद यादवांना भेटण्याचा सल्ला दिला. यादवांनी आधी माझ्याकडे माझ्या कविता मागितल्या. मी माझ्या ‘माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ची संहिता आणि स्वतंत्र कविताही त्यांच्या सुपूर्द केल्या. यादवांनी या आस्थापूर्वक वाचल्या आणि मला भेटायला बोलावले. ते म्हणाले, "तुम्ही इतक्या कसदार स्वतंत्र कविता लिहीत असताना, तुमचा पहिला संग्रह विडंबनकवितांचा येऊन तुमच्यावर विडंबनकार असा शिक्का बसायला नको. आधी स्वतंत्र कवी म्हणून साहित्यक्षेत्रात तुम्ही पाऊल टाकायला हवे." मी त्यांचे मत वाडेकरांना सांगितल्यावर त्यांनाही ते पटले. मी माझ्या स्वतंत्र कवितासंग्रहाची संहिता, 'होड्या', तयार केली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे नवलेखक उत्तेजन अनुदानासाठी सादर केली. त्या वर्षी तिला अनुदानही मंजूर झाले. 'कविता दशकाची'च्या संपादिका म्हणून परिचित झालेल्या विजया राजाध्यक्षांनी 'होड्या'साठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेत त्यांनी माझ्या कवितेत बालकवींची कोवळी निरागसता, मर्ढेकरांची आधुनिक संवेदनशीलता आणि पु. शि. रेग्यांची चित्रात्मकता आहे असा गौरव केला. श्री प्रकाशनाने 'होड्या' प्रकाशित केले. 'मौज'ने वितरणासाठी घेतले. पुस्तकाचे प्रकाशन अनुराधा पोतदार यांच्या उपस्थितीत आणि त्यावेळी पुण्यात असलेल्या बा. भ. बोरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवीच्या हस्ते झाले. बोरकरांनी माझ्या कवितेला 'मोजक्या शब्दांत चित्र साकार करणारी अस्सल भावकविता' म्हटले. या कार्यक्रमासाठी विद्याधर पुंडलिक, ह. मो. मराठे, स. शि. भावे, गं. ना. जोगळेकर, सरिता पदकी आदी मान्यवर आवर्जून आले आणि मराठी कविताक्षेत्रात मी स्वतंत्र कवी म्हणून पदार्पण केले.

त्यानंतर मी पुन्हा 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' प्रकाशित करण्याचा विचार करू लागलो. तोपर्यंत वाडेकरांचे 'राजस' मासिक आणि 'श्री प्रकाशन' बंद झाल्याने मी नव्या प्रकाशकाच्या शोधात होतो. 'अभिरुची'चे बाबुरावजी चित्रे यांना माझ्या विडंबनकविता बेहद्द आवडल्या होत्या. या विडंबनकविता त्यांच्या मूळ कवितांसह पुस्तकरूपात यायला हव्यात असे त्यांना पोडतिडीकीने वाटत होते. शक्य असते तर त्यांनी स्वत:च असे पुस्तक प्रकाशित केले असते. पण ते शक्य नसल्याने त्यांनी इतर प्रकाशकांचा विचार केला. मॅजेस्टिक हे पुस्तक प्रकाशित करू शकेल असे वाटल्याने ते स्वत: मला केशवराव कोठावळ्यांच्या निकट वर्तुळात असलेल्या जयवंत दळवींकडे घेऊन गेले. दळवींनी माझ्याजवळ केशवरावांकडे या पुस्तकाची शिफारस करणारे पत्र दिले. ते पत्र घेऊन मी पुण्यात केशवरावांना भेटलो. पण त्यांनी 'आम्ही कवितांची पुस्तके प्रकाशित करीत नाही' असे सांगून ते पुस्तक नाकारले. दळवींच्या भेटीचे फलित एवढेच झाले की ठणठणपाळांनी त्यांच्या पुढच्या लेखात, माझ्यावर आणि त्या संदर्भात माझ्या 'होड्या' संग्रहाला प्रस्तावना लिहिणार्‍या विजया राजाध्यक्षांवर लिहिले. एव्हाना साहित्यिकांत उठबस सुरू झाल्याने, मी मुंबईला गेल्यावर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अतिथिगृहात उतरू लागलो होतो. एकदा तिथे कवी पुरुषोत्तम पाटील (पुपाजी) भेटले. अभिरुचीतील 'खडा मारायचा झाला तर' हे सदर मीच लिहितो, हे कळल्यावर पुपाजींनी माझे कौतुक केले. माझ्याजवळ असलेली 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ची संहिता तिथेच वाचून काढली. हे पुस्तक प्रसिद्ध झालेच पाहिजे आणि तेही वसंत सरवट्यांच्या चित्रांसह असा त्यांनी आग्रह धरला. तोपर्यंत माझे विडंबनात्मक लेख 'मोहिनी'त आणि स्वतंत्र कविता 'हंस'मध्ये प्रसिद्ध होऊ लागल्याने आनंद अंतरकर परिचित झाले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानेही नवलेखक उत्तेजन अनुदानाची कक्षा वाढवून नवलेखकाच्या दुसर्‍या पुस्तकालाही ५०% अनुदान देऊ केले होते. अंतरकरांनी या योजनेअंतर्गत 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' प्रकाशित करण्याची तयारी दर्शविली. या अनुदानासाठी मी 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ची संहिता पुन्हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या हवाली केली. या वेळेस मात्र महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ला ५०% अनुदान मंजूर केले आणि मी अंतरकरांच्या 'विश्‍वमोहिनी'तर्फे हे पुस्तक सिद्ध करून घेण्यासाठी हालचाल सुरू केली. अशा पुस्तकाला विडंबनाचे मर्म निर्देशित करणारी प्रस्तावना हवी म्हणून मी उत्कृष्ट गद्य विडंबने लिहिणार्‍या बाळ गाडगीळांना प्रस्तावनेसाठी विचारले. गाडगीळांनी माझे सगळेच लिखाण आधी मागून घेतले. ते वाचून गाडगीळ प्रस्तावना लिहून द्यायला सहर्ष तयार झाले. पण गाडगीळांनी आणखी एक गोष्ट केली. माझा 'होड्या' हा कवितासंग्रह आणि 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ची संहिता त्यांनी आग्रहाने पु.ल.देशपांडे यांना वाचायला दिली. हे संग्रह वाचल्यावर लगेचच पु.लं.नी मला पत्र लिहून 'होड्या' संग्रहाचे दिलखुलास कौतुक केले. 'घोडा'ही त्यांना आवडला पण त्याची खरी खुमारी ज्यांनी मूळ कविता वाचल्या आहेत त्या जाणकार वाचकांनाच उमजेल असा इशाराही त्यांनी दिला. मग बाळ गाडगीळांनीही आपल्या प्रस्तावनेत काही मूळ कविता उद्धृत करून विडंबनाची लज्जत आस्वाद्य करून दाखवली. पुपाजींच्या सूचनेप्रमाणे या संग्रहासाठी चित्रे काढून देण्यासाठी मी वसंत सरवटे यांना विचारले. सरवट्यांची आणि माझीही तेव्हा ओळख नव्हती. पण विडंबनकविता हे एका तर्‍हेने मूळ कवितेचे व्यंगचित्रच असते. त्यामुळे विडंबनकवितांसाठी व्यंगचित्रे चितारण्याचे आव्हान सरवट्यांसारख्या जातिवंत व्यंगचित्रकाराने स्वीकारले. त्यासाठी त्यांनी प्रस्तावनेसह संपूर्ण संहिता आणि मूळ कविताही अभ्यासल्या. केवळ या संग्रहातील विडंबनकवितांचा आशय चित्रांकित करण्यापेक्षा या एकूणच संग्रहाकडे एका व्यंगचित्रकाराच्या नजरेतून पाहिले. हा 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' एखाद्या ट्रोजन हॉर्ससारखा पोकळ आहे आणि त्याच्या पोटात माझ्यासारखा विडंबनकार आपली लेखणी परजत लपून बसून आलेला आहे, अशी नामी कल्पना त्यांनी लढवली. याखेरीजही काही विडंबनांचे स्वतंत्र इंटरप्रिटेशन करणारी चित्रे त्यांनी काढून दिली. माझा बेहद्द नाममात्र घोडा असा बाळ गाडगीळांच्या प्रस्तावनेने आणि वसंत सरवट्यांच्या चित्रांनी नटून थटून तयार झाल्यावर आनंद अंतरकरांनी तो मे १९८४मध्ये मुद्रित करून दिला. या आगळ्यावेगळ्या घोड्याचे मराठी कवितेच्या क्षेत्रातले पदार्पण साजरे व्हावे म्हणून पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाई जेरबाई वाडिया ग्रंथालयात एक प्रकाशसमारंभ आयोजित करण्यात आला. प्रस्तावनाकार बाळ गाडगीळांखेरीज कवितांवर अधिकारवाणीने बोलतील असे विद्याधर पुंडलिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आनंदाने आले. श्रोत्यांमध्येही प्रा. गं. ना. जोगळेकर, ह. मो. मराठे, त्यावेळी पुण्यात आलेले प्रसिद्ध हिंदी कवी श्याम विमल हे जाणकार उपस्थित होते. बाळ गाडगीळांनी 'आचार्य अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांनंतर खर्‍या अर्थाने मराठी विडंबनकवितांच्या क्षेत्रात आपला टापा टाकणारा जोगळेकरांचा बेहद्द नाममात्र घोडाच आहे' असे उद्गार काढले. तर विद्याधर पुंडलिक यांनी 'विडंबनकार हा मूळ कवितेला एक सर्जक पर्याय देतो' अशी सैद्धांतिक भूमिका मांडली आणि ही विडंबने मूळ कवितेतील इथॉस कसा नेमका पकडतात ते विषद केले. अशा रीतीने 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा', मराठी कवितेच्या दरबारात दाखल झाला.

आता या घटनेचे ऐतिहासिकत्व तपासण्यासाठी करायला हवी असलेली दुसरी गोष्ट म्हणजे त्याआधीच्या मराठी विडंबनकवितांच्या इतिहासाकडे नजर टाकायला हवी. अर्वाचीन मराठी कवितेचा इतिहास उण्यापुर्‍या दीडशे वर्षांचाच आहे. त्यातही सुरुवातीपासून विडंबनकविता लिहिल्या गेल्याचे दिसते. किर्लोस्करांच्या सौभद्र नाटकातील 'पांडु नृपति जनक जया' या पदाचे तेलंग यांनी केलेले 'खंडु नापित जनक जया' हे विडंबन सापडते. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या संगीत नाटकांची विडंबने त्यातील पदांसह झालेली आहेत. पण अनेक कवींच्या अनेक कवितांचे एकत्रित विडंबन केले ते आचार्य अत्र्यांनीच - केशवकुमार या नावाने - १९२१च्या आसपास, आणि ते प्रसिद्ध झाले १९२५ साली 'झेंडूची फुले' या नावाने पुस्तकरूपात. त्या काळात रविकिरण मंडळातील कवी माधव ज्युलियन, गिरीश, यशवंत, वि. द. घाटे, श्री. बा. रानडे यांची रोमँटिक कविता ऐन भरात होती. ती छापली जात होती आणि कवींकडून गायलीही जात होती. तेव्हा कविता प्रसिद्ध करणार्‍या नियतकालिकांची, कवींची आणि वाचकांचीही संख्या थोडी होती. रविकिरण मंडळाच्या कवींच्या कविता लोकप्रिय होत्या आणि त्यांच्या काव्यलेखनातील लकबी वाचकांना सुपरिचित होत्या. केशवकुमारांनी मुख्यतः या कवींच्या कवितांचे विडंबन केले. केशवकुमारांनी केलेल्या विडंबनात होणारे त्या लकबीचे विडंबन वाचकांना लगेच मूळ कवीची आठवण करून देत असे आणि हास्यस्फोटक होऊन जात असे. झेंडूच्या फुलांत केशवकुमारांनी अनेक कवींच्या कवितांच्या विषयाची, आशयाची, कल्पनांची, शब्दकळेची, भाषाशैलीची, उपमांची मनमुराद चेष्टा तर केली आहेच पण कवितांच्या संदर्भांचे, तळटीपांचे, संग्रहाच्या प्रस्तावनांचे, अर्पणपत्रिकांचे, इतकेच काय क्रमिक पुस्तकातील प्रश्‍नांचेही विडंबन केले आहे. कधी कधी त्यात कवींचे वैयक्तिक तपशीलही डोकावले आहेत. कवी चाफेकरांना असलेल्या प्रत्येक शब्दाला सत् किंवा सु जोडण्याच्या खोडीचे विडंबन करताना, केशवकुमार जेव्हा -

सदंगि माझ्या सत्कोट
सत्पगडीचा वरि थाट

असे लिहायचे तेव्हा तो पेहराव करणारा कवीही डोळ्यासमोर येत असे. केशवकुमारांची 'प्रेमाचे अद्वैत' नावाची विडंबनकविता आहे, त्यातला निवेदक, जनानी सायकल चालवणार्‍या आपल्या प्रियेच्या मागे डबलसीट बसून चाललेला आहे. त्यांच्या गाडीला तेव्हा आवश्यक असलेला दिवाही नाही आहे. पोलिसाने अडवल्यावर हा प्रेमवीर 'आम्ही दोन दिसत असलो तरी अन्तरी एकच आहोत आणि आमच्या अन्तरी 'प्रीतीचा स्थण्डिल' पेटलेला असल्याने आम्हाला गाडीला वेगळा कन्दिल लावायची गरजच नाही' असा बचाव करतो. ही सर्व रचनाच एक स्वतंत्र विनोदी कविता होऊन जाते. पण केशवकुमार ती वि. द. घाटे यांच्या 'प्रेमाचे अद्वैत' नावाच्या सॉनेटच्या विडंबनाच्या रूपात मांडून बहार आणतात. जरी ही घाटे यांच्या कवितेचे विडंबन असली तरी केशवकुमार त्यात माधव ज्युलियन यांच्या कवितेत येणाऱ्या पुढाकार घेणार्‍या प्रियेचे, त्यांच्या विक्षिप्त प्रेमविषयक कल्पनांचे, फारसी आणि संस्कृत शब्दांच्या अतिरेकी वापराचे, अनुस्वाराऐवजी ङ्, ञ, ण्, न्, म् वापरण्याचे, शब्दकळेचे - सर्वांचे मूळ कवितेच्या आकृतिबंधात स्वतंत्र विनोदी कविता रचून विडंबन करतात आणि वाङ्मयीन विडंबनाचा एक वस्तुपाठच देतात. रोमँटिक कवींच्या कवितांचे विडंबन करताना आचार्य अत्र्यांनी (मी विडंबनकार कसा झालो) जाहीरपणे घेतलेली भूमिका अशी होती की 'केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांसारख्या अभिजात कवींनी विणलेल्या मराठी कवितेच्या भरजरी वस्त्राला हे कवी आपल्या सुमार कवितेचे ठिगळ जोडू पहात आहेत. त्याचे खंडन करण्यासाठी मी हे विडंबनाचे शस्त्र हाती घेतले आहे'. एकदा अशी योद्ध्याची भूमिका घेतल्यावर या विडंबनांत, आपल्या शैलीत ते अति-अतिशयोक्तीही बिनदिक्कत करतात. पण झेंडूच्या फुलांच्या पहिल्या आवृत्तीनंतर केशवकुमारांनीही त्या तोलामोलाची वाङ्मयीन विडंबने लिहिली नाहीत. त्यानंतरच्या काळात ज. के. उपाध्ये यांनी 'चालचलाऊ भगवद्‌गीता' लिहिली. माधव ज्यूलियन यांच्या 'बेगमेचे विरहगीत' या कवितेत बेगमेने शिवाजी महाराजांना लिहिलेल्या प्रेमपत्रास, अनंत काणेकरांनी दुसरी कविता रचून शिवाजी महाराजांच्या वतीने उत्तर दिले. दत्तू बांदेकरांनी विनोदी कविता लिहिल्या. भाऊसाहेब पाटणकरांनी विनोदी शेरोशायरी केली. मंगेश पाडगावकरांनी वात्रटिका लिहिल्यावर तशा स्फुट कवितांची लाटच आली. सोपानदेव चौधरी, राजा बढे, यशवंत देव यांनी काही विडंबनात्मक कविता लिहिल्या. पण झेंडूच्या फुलांनतंतर वाङ्मयीन विडंबनांचा एकत्रित संग्रह जवळजवळ साठ वर्षांनी निघाला. तो होता माझा 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'!

'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'चे ऐतिहासिकत्व तपासण्यासाठी पाहायला हवी असलेली तिसरी गोष्ट म्हणजे तत्कालीन मराठी कवितेची स्थिती. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'मधील विडंबनकविता जेव्हा लिहिल्या त्या काळातील म्हणजे १९७६ ते १९७९पर्यंतच्या काळातील मराठी कवितेची स्थिती-आता विचार केला तर -विलक्षण होती असे म्हटले पाहिजे. रविकिरण मंडळाच्या रोमँटिसिझम मध्ये गुंगून गेलेल्या मराठी कवितेला मर्ढेकर नावाचे वादळ हलवून गेले होते. मर्ढेकरांना अनुसरणारी 'नवकविता' आता स्थिरावली होती. कवितेचा आशय कसा हवा याचे संकेत जसे तिने झुगारून दिले होते, तसेच वृत्तयमकांचे बंधन तोडून मुक्तछंद रूढ झाला होता. पण तरीही तेव्हा बा. भ. बोरकर यांच्यासारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी आपली रोमँटिक छंदोबद्ध कविता अजूनही जोमाने लिहित होते. रविकिरण मंडळाच्या कवींपैकी श्री. बा. रानडे विज्ञानकवितेकडे वळले होते. कुसुमाग्रज, अनिल, पु. शि. रेगे हे मर्ढेकरांच्या आधीचे कवी आता जुन्या आणि नव्या शैलीत पण अभिजात कविता लिहित होते. ग. दि. माडगूळकर यांच्यासारखे सिद्धहस्त गीतकार आपणही मुक्तछंदात कविता लिहू शकतो हे दाखवत होते. मर्ढेकरांचा वारसा पुढे नेणारे पाडगावकर-बापट-करंदीकर हे कवित्रय छंदोबद्ध तसेच मुक्त कविता विविध प्रकारांत लिहीत होते. त्यात गीते होती, बालगीते होती, लावण्या होत्या, गझला होत्या आणि विविध तर्‍हेच्या भावकविता होत्या. त्यातही पाडगावकरांनी वात्रटिका, बापटांनी मालिका कविता आणि करंदीकरांनी विरूपिका हे वेगळे प्रयोग सुरू केले. शंकर वैद्यही अशाच वाटांवरून चालत होते. पण या कवींपेक्षा वेगळी कविता लिहिणारे डहाके, धुरी, सदानंद रेगे उदयास येत होते. र. कृ. जोशी मूर्त कवितेला मूर्त करीत होते. कवयित्रींपैकी संजीवनी मराठे जुन्या रोमँटिक गीतांच्या जमान्यात होत्या. पण पद्मा गोळे, इंदिरा संत, शांता शेळके, शिरीष पै यांनी नव्या जाणिवा कवितेत आणल्या होत्या. अनेक नव्या कवयित्री आपापली वाट चोखाळत होत्या. शिरीष पैंना हायकूंचा नाद जडला होता. आरती प्रभू यांसारखा मनस्वी कवी आपली वेगळी कविता आणि गीते लिहीत होता. रुबायांसारखा काव्यप्रकार रॉय किणीकर, सुभाष प्रभू यांसारखे कवी हाताळत होते. शहरी कवींनी लिहिलेल्या रोमँटिक ग्रामीण कवितांच्या जागी आता ना. धों. महानोरांसारखे कवी आपली रसरशीत निसर्ग आणि शृंगारकविता घेऊन आले होते. आणि याचवेळी तीन वेगळे पंथ उदयाला येत होते. जुन्या कवितांसारख्या गझलांच्या जागी एकेका शेराची स्वायत्तता मानणारे सुरेश भटांसारखे गझलकार, नादाचे आणि गूढ प्रतिमांचे गारूड करणारे ग्रेस आणि वंचितांचा जोरदार आवाज उठवणारे नारायण सुर्वे आणि या तीनही कवींचा पंथ अनुसरणार्‍या कवींचे ताफे. दलित कवितेची पताका नामदेव ढसाळ, दया पवार घेऊन आले होते. नवकवितेचे तोलून मापून निकष काढणार्‍या सत्यकथेच्या मक्तेदारीला आव्हान देणारे लघुअनियतकालिकांतून पुढे येणारे कवी होते. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर आणि भालचंद्र नेमाडे हे बिढारी. याच वेळी पॉप्युलरच्या 'नवे कवी-नव्या कविता' मालिकेतून महाराष्ट्र टाईम्सच्या स्पर्धांतून, ग्रंथालीच्या 'कविता दशकाची' संग्रहातून आणि नलेउ अनुदानांतर्गत निघणाऱ्या संग्रहांतून अनेक कवी प्रकाशात येत होते. कवितांवर कवितांहूनही दुर्बोध अशा समीक्षा लिहिल्या जात होत्या. आणि हे सर्व वाचून त्यांची विडंबने करायला सरसावले होते-अस्मादिक-हेमंत गोविंद जोगळेकर!

अर्थात मी या विडंबनकविता लिहिल्या तेव्हा या वेगवेगळ्या कवींच्या वेगवेगळ्या काव्यप्रकारांचे एकत्रित विडंबन करण्याचा प्रकल्प हाती घ्यावा असे काही माझ्या मनात नव्हते. मी कविता वाचत होतो. त्या माझ्या मनात मुरत होत्या. अशा कवितांमध्ये विडंबन करण्याजोगे काही सुचले तर मी ते करू लागलो. अशी बरीच विडंबने लिहून झाल्यावर ती प्रसिद्ध करण्यासाठी मी ती लेखांमध्ये गुंफली. माझ्याबरोबर दूरदर्शनवरील नवोदितांच्या कविसंमेलनात सहभागी झालेल्या कवींच्या कवितांचे, संमेलनाचे संयोजन करणार्‍या पाडगावकरांच्या टिप्पणींचे आणि एकूणच दूरदर्शनवरील अशा कविसंमेलनांचे विडंबन करणारा लेख झाला. 'नवोदित कवींचे दुर्दर्शन.' त्या मूळ संमेलनात मीही असल्याने माझ्याही त्यात समाविष्ट कवितेचे विडंबन मला सुचले. १९७७ सालच्या दिवाळी अंकातील काही कवितांचे विडंबन, त्या सालातील दिवाळी अंकांतील कवितांची समीक्षा करण्याचा आव आणून लिहिलेल्या लेखात आले. बाबुरावजी चित्र्यांच्या 'अभिरुची'मध्ये त्यांना हवे होते त्याप्रमाणे मूळ कविता आणि त्यांची विडंबने 'कवितेपलिकडील कविता' या शीर्षकाने समोरासमोर ठेवता आली. मर्ढेकर-बापट-करंदीकर-पाडगावकर आणि इतरही कवींच्या कवितांची विडंबने मी केलेली होती. बापट-करंदीकर-पाडगावकर ही कवित्रयी प्राचीन ते अर्वाचीन मराठी कवितांच्या अभिवाचनाचा 'ज्ञानेश्‍वर ते मर्ढेकर' असा कार्यक्रम करीत असत. त्या धर्तीवर मर्ढेकरांपासून माझ्यापर्यंतच्या कवींच्या कवितांची विडंबने एकत्रित सादर करणारा 'मर्ढेकर ते जोगळेकर एक अतिजलद काव्यप्रवास' हा लेख मी लिहिला. त्या लेखात मी माझ्या कवितांचे बाड घेऊन एका विख्यात मासिकाच्या प्रख्यात कार्यकारी संपादकाकडे जातो, हा संपादक मला आधी सर्व पूर्वसुरींच्या कविता वाचा आणि तुमची काव्यप्रतिभा संस्कारित झाल्यावरच तुमची कविता लिहा असा सल्ला देतो. त्याप्रमाणे मी अशा पूर्वसुरींच्या सर्व कविता जमवून माझ्या बाडावर ठेवतो आणि त्यातील एकेक कविता वाचल्यावर माझ्या अंत:प्रेरणेला नवी कविता सुचते आणि ही विडंबने तयार होतात अशी कल्पना लढवली होती. या लेखाच्या स्वरूपामुळे मला त्यातील गद्य निवेदनात मूळ कवितांचा संदर्भ देता आला आणि त्या कवितांच्या समीक्षेचेही विडंबन करता आले. सर्वच विडंबनकवितांचा एकत्रित संग्रह तयार करायचे ठरवल्यावर या लेखाच्या कल्पनेत मी ती सर्व विडंबने बसवली. या संहितेत विविध प्रकारच्या कवितांच्या विडंबनांनी आपापली जागा पटकावली. सुरुवात मर्ढेकरांच्या 'असे काहीतरी व्हावे' या चिंतनपर कवितेपासून झाली. मग त्यात पाडगावकरांची नाजूक भावकविता आली, बालगीत आले आणि 'सलाम' सारखी दीर्घ भाष्यकविताही आली. बापटांची 'एका कुमाराची कहाणी' सारखी व्यक्तिचित्रात्मक कविता आली आणि 'मानसी' साररखी मालिकाकविताही आली. करंदीकरांची चिंतनात्मक कविता आणि विरूपिकाही आली. पु. शि. रेग्यांच्या आशयगर्भ कविता आल्या. आरती प्रभूंची गीते आणि ग्रेसची गूढ गुंजन कविता आली. अनिलांची दशपदी आली. ग. दि. माडगूळकरांची विवाद्य ठरलेली राजकीय कविता आली. महानोरांची निसर्गकविता आली. दया पवारांची दलितकविता आली. र. कृ. जोशांची मूर्तकविता आली. सुभाष प्रभूंची रुबाई आली. नितीन दादरावालांची कथात्म कविता आली. अ‍ॅग्नेसचे अभंग आले. शंकर वैद्यांची चिन्हांकित कविता आली आणि तरल भावकविताही आल्या. दिलीप पुरुषोत्तम चित्रे-अरूण कोलटकर यांच्या अस्तित्ववादी कविता आल्या आणि ही सर्व विडंबने अनायास आली. अरुण कोलटकरांच्या 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' या कवितेच्या विडंबनात मी 'असा घोडा हा कवीच्या प्रतिभेचा घोडा आहे' अशी कल्पना लढवली आणि या संहितेत माझ्याच प्रतिभेचा घोडा अवतरला. विडंबनांचा हा माझा घोडा पण बेहद्द आणि नाममात्र असल्याने या संग्रहाला 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' हे नाव समर्पक होईल असे मला वाटले आणि संग्रहाला नावही मिळाले!

चित्रकार वसंत सरवटे यांनीही हा घोडा 'नाममात्र' असल्याचे जाणले. 'माझ्या अंत:प्रेरणेवर वेगवेगळ्या कवींच्या कवितांचे संस्कार होऊन ती नवीन कविता रचते आहे', ही वरपांगी घेतलेली भूमिका आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी ट्रोजन हॉर्सचे मिथक वापरले. ट्रॉयची अभेद्य तटबंदी आपल्याला भेदता येत नाही आहे हे पाहिल्यावर ट्रॉय जिंकण्यासाठी आलेल्या ग्रीक सैनिकांनी एक पोकळ घोडा तयार करून ट्रॉयला भेट म्हणून तटबंदीबाहेर ठेवला आणि ते दूर निघून गेले. हा आपला विजय आहे असे समजून ट्रॉयच्या सैन्याने हा घोडा आत घेतला आणि विजयोत्सव साजरा केला. या पोकळ घोड्याच्या आत ग्रीक सैनिक लपलेले होते. रात्री ते बाहेर आले आणि तटबंदी उघडून त्यांनी ग्रीक सैनिकांना प्रवेश दिला आणि ग्रीक सैन्याने ट्रॉयवर विजय मिळवला. याप्रमाणेच मी माझ्या अंत:प्रेरणेच्या घोड्याला पुढे करीत असलो तरी या घोड्याच्या पोटात लेखणीचे शस्त्र हाती घेतलेला विडंबनकार मी दडलेला आहे अशी नामी कल्पना सरवट्यांनी आपल्या चित्रमालिकेतून चितारली. उपोद्घातात मी अंतःप्रेरणेची गोष्ट सांगत असताना त्याखाली क्रमशः मला चालता चालता अर्धा पोकळ घोडा दिसतो, पुढे गेल्यावर त्याचा उर्वरित अर्धा भाग दिसतो, मग मी हे दोन्ही भाग एकत्र आणून त्याच्या पोटात लेखणी घेऊन बसतो अशी चित्रे आली आणि इशारा देताच दौडत जाणारा हा घोडा पुन्हा शेवटी कोलटकरांच्या 'बेहद्द नाममात्र घोडा' या कवितेच्या विडंबनापाशी अवतीर्ण होतो. बाळ गाडगीळ यांच्या प्रस्तावनेलाही त्यांनी अशा घोड्याला चाके लावून गाडगीळ त्याला (उगीचच) ओढत नेत आहेत असे चित्र दिले.

सरवट्यांची इतर चित्रेही मार्मिक आहेत. 'घननीळ ध्यास' या विडंबनात गॅस सिलिंडर येण्याच्या प्रतिक्षेत उदास बसलेली गृहिणी आहे. तर सरवट्यांच्या चित्रात धाडकन् गॅस सिलिंडर घेऊन आलेला गडी दारात अवतरलेला आहे. त्याच्या डोक्यामागे तेजोमंडळ काढून सरवट्यांनी त्याला देव बनवले आहे! सरवट्यांच्या अनेक चित्रांत मूळ कवीची छबी दिसते. 'सलाम' कवितेत पाडगावकरांनी पुन्हा पुन्हा केलेल्या सलामांचे विडंबन करण्यासाठी सरवट्यांनी पाडगावकरांच्या दोन हातात दुसरे खोटे दोन हात दिले आहेत- जे कपाळावर टेकवून पाडगावकर सलाम करीत आहेत. पु. शि. रेगे यांच्या 'दुसरा पक्षी' या सूचक कवितेत पक्षी, गाणे आणि झाड (म्हणजेच कलाकार, कलाकृती आणि कलाविषय) यांची एकमेकांत असलेली गुंतागुंत आहे. त्याचेच विडंबन माझ्या 'दुसरा धक्का' या विडंबनात धक्का (दिलेला), अंग (देणार्‍याचे की घेणार्‍याचे?) आणि धक्का (घेतलेला) यांच्या गुंतागुंती दाखवून केलेले आहे. त्यासाठी काढलेल्या चित्रात सरवट्यांनी योगासने करताना हातपाय गुंतवून घेतलेला माणूस आकाशात उडत चाललेला दाखवला आहे, रेग्यांचा (दुसरा?) पक्षी त्या माणसाच्या कानात आपले गाणे गाताना आणि खाली जमिनीवर झाडाखाली कुणी (रेगे?) या सगळ्याकडे गमतीने पाहताना दाखवून गंमत आणली आहे! संग्रहाच्या शेवटी आलेल्या, मी केलेल्या माझ्याच कवितेच्या विडंबनातील 'तो', मी दाढी करत असताना आरशातून मला डाव्या हाताने रेझर चालवून दाखवतो. तर याच्या सरवटेकृत विडंबनचित्रात दाढी करणार्‍या मला माझे आरशातले प्रतिबिंब वेडावून दाखवत आहे. विडंबन हे असे मूलकृतीला वेडावून दाखवत असते हे तत्त्वच सरवटे स्पष्ट करतात! सरवट्यांचे एकच चित्र अत्यंत गमतीदार असले तरी औचित्यभंग करील की काय असे उगाचच वाटून गेले. सुरेश भटांच्या 'अद्याप या सुर्‍याला माझा सराव नाही' या गझलेचे मी केलेले विडंबन आहे. 'अद्याप या सुरेला माझा सराव नाही!' मूळ गझलेतील शेवटचा शेर होता.

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

याचे विडंबन मी असे केले आहे :

ओठी तुझ्या न गेला अद्याप एक घोट
अन् नाक दाबण्याचा माझा स्वभाव नाही

'नाक दाबले की तोंड उघडते' या म्हणीचा आधार घेत माझा शायर आपल्या प्रियेला, माझ्या प्रीतीची सुरा तू प्यावीस यासाठी मी जबरदस्ती करणार नाही, असे सांगतो. पण सरवट्यांच्या चित्रात सुरापानाने तर्र होऊन पडलेल्या शायराच्या तोंडाला येणार्‍या वासामुळे नाक दाबणारी प्रिया दाखवलेली आहे. त्याच ओळींचे वेगळे इंटरप्रिटेशन करून सरवटे मजा आणतात. पण अशा चित्राने आपण उगाचच कुणाला दुखावणार तर नाही ना असे मला वाटले. तरीही व्यंगचित्रकाराचे स्वातंत्र्य त्यांना देणे माझे कर्तव्यच होते.

एकूणच या संग्रहातली सरवट्यांची मुखपृष्ठासह २७ चित्रे लाजवाब आहेत. विद्याधर पुंडलिकांनी त्यांना पट्टीच्या गायकाला मिळालेली त्याच तोलामोलाचीच साथ म्हटले.

या संग्रहातील काही विडंबनांना तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक संदर्भही होते. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी १९७७ साली संपली आणि जयप्रकाश नारायण पुरस्कृत जनता पक्षाची राजवट आली. आणि इंदिरा गांधी, संजय गांधी राजकीय विजनवासात गेले. १९७७च्या नोव्हेंबरात पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनात मंगेश पाडगावकरांनी त्यांची 'सलाम' कविता वाचली. आणीबाणीत अनुभवलेल्या भयग्रस्ततेची आठवण करून देणार्‍या या कवितेने (लांबलचक असली तरी) दाद मिळवली. हे साहित्यसंमेलन अनेक वादविवादांनी रंगले. या संमेलनात राजकीय व्यक्तीला उद्घाटक म्हणून बोलावले याचा पूर्वाध्यक्षा दुर्गा भागवतांनी निषेध केला. त्या फक्त नव्या अध्यक्षांना सूत्रे सुपुर्द करण्यापुरत्या व्यासपीठावर आल्या आणि आपल्या भाषणात त्यांनी व्यासपीठावर एक पूर्वाध्यक्ष म्हणून बसलेल्या आणि आधुनिक वाल्मिकी म्हणवल्या जाणार्‍या ग. दि. माडगूळकरांचा, त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या 'नागडी नातवंडे' या कवितेत जयप्रकाशजींचा अवमान केला आहे म्हणून निषेध केला. संमेलनाच्या समारोपापर्यंत एकमेकांचे निषेध चालूच राहिले आणि समारोप सत्रात आलेल्या निषेध मोर्चाने संमेलनच उधळले गेले. या सर्व महाभागांना सलाम करणारी माझी कविता पाडगावकरांच्या 'सलाम' कवितेच्या विडंबन स्वरूपात आली. 'माडगूळकरांवर वाल्मिकीचे संस्कार झाले म्हणून त्यांनी गीतरामायण लिहिले. जर वाल्मिकींवर गदिमांचे संस्कार झाले असते तर त्यांनी आपल्या नातवंडांवर म्हणजे मानसपुत्र रामाच्या लव-कुश या मुलांवर कशी कविता लिहिली असती ते पहा', असे म्हणत मी 'नागडी नातवंडे' या गदिमांच्या कवितेचे विडंबन केले. त्यात वाल्मिकी ॠषी आपल्या आश्रमात सीता आणि लव-कुशांचा (येथे इंदिरा गांधी आणि राजीव - संजय गांधी अभिप्रेत आहेत) सांभाळ करीत आहेत असे दाखवले होते. आणि लवकरच राजा रामाने चालवलेल्या अश्‍वमेध यज्ञाचा रथ लव-कुश प्रचंड पराक्रम करून रोखणार आहेत, अशी भविष्यवाणी त्यांच्या तोंडून वर्तविली होती. आणि काय माझा द्रष्टेपणा पहा, खरोखरच १९८०मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या! आणीबाणीत इंदिरा गांधीच्या 'वीस कलमी' विकास कार्यक्रमाचा प्रचंड उदोउदो सरकारी माध्यमांतून चालला होता. त्यावर भाष्य म्हणून र. कृ. जोशींनी विसाचा पाढाच कविता म्हणून सत्यकथेत छापला होता. त्याचे विडंबन म्हणून माझी १९७७ ही कविता ७७ हा आकडा एकाखाली एक बारा वेळा बारा महिन्यांसारखा देते! त्यावर 'या कवितेतील ओळी कुठल्याही क्रमाने वाचल्या तरी सारख्याच कल्पबंधाची प्रचिती देतात' ही केलेली मल्लीनाथी आनंद यादवांच्या समीक्षेचे विडंबन करणारी होती.

अनिलांच्या 'दशपदी' संग्रहाच्या प्रस्तावनेत आणि प्रस्तावनापर मुलाखतीत त्यांनी दशपदीत दहा ओळींच्या आकृतीबंधामुळेच या कवितांना त्यांचा आशयबंध प्राप्त होतो' अशी (अजब) भूमिका घेतली होती. त्यांच्या 'मी थोड्याच कविता लिहिल्या म्हणून काय थोडे झाले' या दशपदीचे विडंबन म्हणून मी

'दहाच ओळींच्या कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले
दहा म्हणजे दहाच असतात हेच काय थोडे झाले...'

अशी मुख्यत: दशपदीशी निगडित संकल्पनांचे विडंबन करणारी दशपदी लिहिली. वसंत सरवट्यांनीही त्यासाठी काढलेल्या चित्रात सहसा प्रवासात कविता लिहिणारे कवी अनिल दहा नंबरच्या बर्थवर झोपून कविता लिहीत आहेत आणि तिकिटचेकर त्यांना नम्रपणे, "सर, दहा नंबरची बर्थ मिळाली ना आपल्याला नेहमीप्रमाणे?", असे विचारत आहे असे दाखवले!

वसंत बापटांची 'मानसी' ही सुट्या सुट्या प्रेमकवितांची मालिका होती. तिच्या प्रस्तावनेत बापटांनी या सर्व कवितांचे स्फुरण 'अविच्छिन्न आणि एकबीज' असल्याचे सांगितले होते. मी केलेल्या या कवितांच्या विडंबनात बायकोला घाबरून जन्म कंठणार्‍या नवर्‍याच्या आठवणी होत्या आणि प्रास्ताविकात या सर्व आठवणी 'अविच्छिन्न आणि एकबीज' असल्याची ग्वाही दिली होती!

कोणत्याही काळात साहित्यिकांत कंपूशाही असतेच. त्या काळात सत्यकथेत लिहिणार्‍या प्रस्थापित लेखकांच्या विरोधात नेमाडे-कोलटकर-चित्रे यांचा कंपू होता. या कंपूशाहीचा संदर्भ दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्या 'प्रेषिताच्या डोळ्यात असतो' या कवितेच्या मी केलेल्या 'बिढार्‍यांच्या डोक्यात असतो' या विडंबनात होता.

बिढार्‍यांना मिळतात आंतरराष्ट्रीय पारितोषिके आणि
मोठाल्या मिशा
वाढवल्या तरी त्यांची चेष्टा करतात दाढीवाले
संपादकांच्या कचेरीत बसून!

'त्या' संपादकांच्या कचेरीतल्या आणि कचेरीबाहेरच्या तेव्हांच्या सर्वच ठळक कवींच्या कवितांची विडंबने 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'त आलेली आहेत. या संग्रहात ज्यांच्या कवितांची विडंबने आली आहेत त्यातील जवळजवळ सर्वच कवी आज श्रेष्ठ कवी म्हणून मान्यता पावलेले आहेत. मर्ढेकरांसारखा कवी तेव्हाही युगप्रवर्तक गणला गेला होता. त्यानंतर विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झाले. अनिल, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, ग्रेस हे कवी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले गेले. सुरेश भटांना अनुसरणार्‍या गझलकारांचा संप्रदाय निर्माण झाला. चित्रे, कोलटकर हे जागतिक स्तरावर मान्यता पावले. भावकविता, गीते, बालकविता, मालिकाकविता, गझल, रुबाई, मूर्त कविता, दशपदी, हायकू, विरूपिका, अभंग, व्यक्तिचित्रात्मक कविता, भाष्यकविता, निसर्गकविता, शृंगारकविता, दलितकविता या सर्व प्रकारांच्या आणि प्रेम, सामाजिक, राजकीय, चिंतनपर अशा सर्व आशयांच्या कवितांचे विडंबन या संग्रहात आले. त्यामुळेच 'प्रस्तुत बंच म्हणजे आधुनिक मराठी कवींच्या संस्कारांचा आढावा घेण्याचे ऐतिहासिक कार्य आहे' ही उपोद्घातात मारलेली फुशारकी आता सार्थ ठरली आहे असे नक्कीच म्हणता येईल!

या संग्रहाचे ऐतिहासिकत्व तपासण्यासाठी करायला हवी असलेली चौथी गोष्ट म्हणजे ही विडंबने कशी अवतरली आहेत ते मूळ कवितांच्या संदर्भात काही उदाहरणे घेऊन पाहाणे. माझी विडंबन करण्यामागची दृष्टी आणि या विडंबनाचे वेगळेपणही त्यायोगे स्पष्ट होऊ शकेल.

शंकर वैद्य यांची 'उत्तररंग' ही कविता हा सुट्यासुट्या तरल भावकवितांना एकत्र गुंफणारा गुच्छ आहे. त्यातील एक कविता अशी आहे:

आपले दोघांचे काही तरी बिनसले होते
तशात तू मोगर्‍याच्या कळ्या आणल्या आणि माझ्यापुढे ठेवल्या
मी रागाच्या भरात त्या भिरकावल्या केराच्या कोपर्‍यात
तू हिरमुसून निघून गेलीस
आता संध्याकाळ झाली आहे आणि केराच्या
कोपर्‍यात त्या कळ्या उमलल्या आहेत!

प्रियकर-प्रेयसीचे भावविभ्रम दाखवणारी ही एक तरल भावकविता आहे. काही तरी क्षुल्लक कारणाने तो तिच्यावर रागावलेला असताना तिने पुढ्यात आणून ठेवलेल्या मोगर्‍याच्या कळ्याही तो केराच्या कोपर्‍यात भिरकावतो आणि ती हिरमुसून निघून जाते. त्यापुढे निवेदक एवढेच सांगतो की आता संध्याकाळ झाली आहे आणि केराच्या कोपर्‍यात त्या कळ्या उमलल्या आहेत. त्यांच्या मनातल्या रागाची जागा आता तिच्याबद्दलच्या प्रेमाने घेतली आहे हे विलक्षण सूचकतेने कवी दाखवतो. वाचता क्षणीच ही कविता मला अतिशय आवडली. तिला दाद द्यावीशी वाटली. मनात घोळत राहिली. निवेदकाच्या मनातल्या बदलत गेलेल्या भावना सूचित करण्यासाठी कवीने मोगर्‍याच्या कळ्यांचा किती सुंदर 'उपयोग' केला आहे असे वाटले, पण हेही मनात आले की हेही 'उपयोजन' आहे. मोगरीच्या कळ्यांच्या जागी जर दुसरी कुठली गोष्ट असती तर? मग मला त्यातून हास्यनिर्मितीच्या शक्यता दिसू लागल्या. आणि मला असे विडंबन सुचले :

आपल्या दोघांचे काहीतरी बिनसले होते
तशात तू फणसाचे गरे आणून माझ्यापुढे ठेवलेस
मी रागाच्या भरात ते भिरकावले खिडकीच्या बाहेर
तू रागावून निघून गेलीस.
आता संध्याकाळ झाली आहे आणि खिडकी बाहेर
फणसाच्या झाडाला फणस लटकले आहेत!

मूळ कवितेतील नाजूक कळ्यांच्या जागी येथे बटबटीत फणसाचे गरे आले आहेत. आणि कवितेत शेवटी खिडकी बाहेर फणसाच्या राकट झाडाला अवजड काटेरी फणस लटकतात. निवेदकाने फेकलेले गरे जमिनीत रुजून, फणसाचे झाड येवून त्याला फणस लटकायला आयुष्याचीच संध्याकाळ झाली असली पाहिजे! पुन्हा फणसही किती सूचक! वर काटे आणि आत गोड गरे असलेले - त्यांच्या भांडण आणि प्रेमासारखेच! ही ताणलेली कल्पनाच आपल्याला हसू आणते. मूळ कवितेत असलेली तरल सूचकता हा तिचा दोष नाही, गुणच आहे. पण सूचकता ताणली तर कशी हास्यास्पद होईल ही गोष्ट हे विडंबन दाखवते. विडंबन करण्यामागची केशवकुमारांची भूमिका आक्रमकपणे दोषनिर्दालन करण्याची होती. माझा भूमिका तरल कवितेचे विडंबन करण्यासाठी तितकीच तरल कविता लिहिण्याची आहे. माझ्या कविप्रकृतीनुसार अनाक्रमक आहे. पण विसंगत गोष्टीसाठी योजलेली तरलता तिला अधिकच मार्मिक आणि हास्योत्पादक करते.

ग्रेसची एक कविता आहे, 'जिवाची वैष्णवी' बंगालमध्ये बाऊलपंथी साधक नाचून गाऊन भक्ती करत असतात. त्यांची भक्ती शाक्तपंथी असते. ती गूढ आणि विलक्षण गोष्टींनी भरलेली असते. ही कविताही आहे:

जिवाची वैष्णवी

मी पुरुष असतांनाही
तू केस उदविले माझे
गंगेच्या पाण्यावरती
तू दिले केवढे ओझे!

बडबडती अवघ्या बाया
त्यांच्यातील चौघी वेड्या
मंत्रांनी भारून त्यांनी
ओच्यांत लपविल्या बेड्या.

मेलेली नागिण बुडवून
डोहाचे भरले पाणी
सुसरीच्या पाठीवरती
चिरगुटे टाकली कोणी!

नागवी तुला करताना
वर्तुळे तुझ्या भवताली
त्या नाचत होत्या सगळ्या
झाडांच्या खाऊन साली.

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल.

तू वैष्णवि बाउलपंथी
देहाचा धरिशी ठेका
या कळ्या-फुलांना तुडवून
तुज वारा देई झोका.

हे गोंदणटिंब कुणाचे
या माझ्या छातीवरती
नाकात मोरणी पाहुन
हसतात सारख्या सवती.

सूर्याची नजर तशातही
खुडणार तुझी ना काया
तो टपून बसला आहे
गर्भास तुझ्या जाळाया.

हलकेच ओढुनी बाई
अंगावर घे तू माती
जळतात सतीची गावे
भरदिवसा रस्त्यावरती.

मी पुरुष असतांनाही
तू बिल्वर मजला भरले
करुणेच्या सर्व कळांचे
लागले मला डोहाळे.

कातडी तुझी सोलाया
शस्त्रास लावतो धार
हा असा पुरुषही वेडे
देवाचा असतो यार.

ग्रेसच्या या कवितेने मला गुंगवून टाकले आणि तिच्यातील प्रतिमांनी चक्रावून सोडले. या प्रतिमा वास्तवातील कुणा स्त्रीला लागू पडणार्‍या नाहीत. पण अशा रोजच्या जीवनातल्या सर्वसामान्य स्त्रीला त्या लावल्या तर? या कवितेतील 'जिवाची वैष्णवी' कवितेच्या निवेदकाला 'तो पुरुष असतानाही' स्त्रीसारखे साजशृंगार करते. वास्तवातील कोणती स्त्री, कोणत्या कारणाने असे करेल याचा विचार करू जाता, मला नव्याने ब्यूटी पार्लर सुरू करणारी ब्यूटीशिअन आपला हात बसण्यासाठी आपल्या नवर्‍यावर आपले सौंदर्योपचार करून पहाते आहे अशी कल्पना सुचली. त्या स्त्रीसाठी तशा प्रतिमा योजल्या आणि अशी विडंबनकविता तयार झाली:

ब्यूटीपार्लरवाली

मी पुरुष असतानाही
शांपुलेस माझे केस
ओंजळीत बेसिन धरते
तो अवघडलेला फेस.

नाचती शिकाऊ भवती
बायांतिल दोघ्या वेड्या
सांडुनी मोर जरतारी
लपविती गळ्यांतिल बेड्या.

नि:शेष मला करताना
बाटल्या तुझ्या हाताशी
त्या फासत होत्या सगळ्या
लोशने मला कसलीशी.

नागिणिचे उघडुन तोंड
पांढरे डोह भरलेले
त्या वळलेल्या नांग्यांनी
उचलून वस्त्र धरलेले.

मी पुरुष असतांनाही
घालिसि मज कंठस्नान
कोंडली वाफ कोसळते
रक्ताचे ठेऊन भान.

भिंतीवर लटके चित्र
चित्रात चर्चच्या घंटा
ज्या नादाविण किणकिणल्या
फिरता माने वर 'वंटा.

मज खुडून घेती आत
आरसे चहुकडे मोठे
जो गालावरुन उडाला
तो तीळ लपविला कोठे?

मी पुरुष असतानाही
सजविल्या नखांच्या ओळी
रात्रिच्या उकलता गाठी
ती हसू लपविते चोळी.

मी पुरुष असतानाही
कोरल्या भुवईच्या रेषा
चिमटीत तुझ्या चिमट्याच्या
केसांच्या भिजल्या भाषा.

हलकेच बांधुनी बाई
भोवती गळ्याच्या वस्त्र
षोडषोपचार कराया
तू हाती घेई शस्त्र.

तू ब्यूटीपार्लरवाली
माझ्यावर करिशि प्रयोग
हे सरावण्या तव हात
या कायेला उपयोग.

कायेवर फिरुनी माझ्या
आयुधे प्राषिती धार
हे असे पुरुषही थोडे
फॅशनचे उघडिति दार.

मी अमूर्त तो पाषाण
लेण्यांत उतरला खाली
छिनलेल्या मम केसांची
वेगाने कमळे झाली!

मूळ कवितेतील निवेदक पुरुष साक्षात शिव असावा ज्याचे केस उदवल्याचे ओझे (त्याच्या जटेतील) गंगेला पेलावे लागावे; तर विडंबनातील पुरुषाच्या केसांना शांपू केल्यावर झालेला फेस बिचार्‍या बेसिनला ओंजळीत धरून अवघडून उभे रहावे लागते! मूळ कवितेतील वैष्णवीच्या भोवती आणखी चारचौघी नाचत आहेत, झाडांच्या साली खाताहेत वेड्यासारख्या आणि त्यांच्या ओच्यात मंत्रभारित बेड्या लपवल्या आहेत. ब्यूटीपार्लरवालीच्या भोवती आणखीही शिकाऊ ब्यूटीशियन्स आहेत. जरतारी मोर (पदर?) सांडून आपल्याच गळ्यातल्या बेड्या लपवत आहेत, त्याला नि:शेष(!) करण्यासाठी तिच्या हाताशी असलेल्या बाटल्यातील लोशने फासत आहेत! मूळ कवितेत मेलेली नागीण बुडवून डोहाचे पाणी भरले जाते, सुसरीच्या पाठीवर चिरगुटे टाकली जातात; त्याच्या विडंबनात नागिणीसारख्या नळाच्या तोंडाने बाथटबचे पांढरे डोह भरले जातात; वळलेल्या नांग्यांसारख्या सुटांवर कपडे टांगले जातात! त्याला कंठस्नान (सॉना?) घालणारी वाफही रक्ताचे भान ठेवीत कोसळते! ग्रेसच्या चर्चबेल्सची आठवण करून देणार्‍या (लटक्या?) घंटा चित्रातून नादाविण किणकिणतात! मूळ कवितेतील वैष्णवीची काया सूर्य नजरेने खुडू पाहतो तर विडंबनातील पुरुषाला चहुकडे असलेले आरसे आपल्या आत खुडून घेतात! त्याच्या गालावरचा तीळ उडून जातो! त्याच्या भुवईचे केस उपटणार्‍या चिमट्यात केसांच्या भाषा भिजून जातात! मूळ कवितेतील पुरुषाच्या नाकात घातलेली मोरणी पाहून सवती हसतात, तर विडंबनात मजेशीर गोष्ट घडते. त्याची रंगवलेली नखे रात्री तिच्या चोळीच्या गाठी उकलायला गेल्यावर अशी नखे पाहून चोळीला हसू फुटते आणि चोळीने जे लपवायला पाहिजे ते सोडून चोळीला आपलेच हसू लपवावे लागते! मूळ कवितेतील पुरुष, वैष्णवीला अंगावर हलकेच माती ओढून घ्यायला सांगतो, तर विडंबनातील पुरुष आपल्या ब्यूटीपार्लरवालीला हलकेच गळ्याभोवती वस्त्र बांधायला आणि हातात शस्त्र घेऊन त्याच्यावर सौंदर्यप्रसाधनाचे षोडषोपचार करायला फर्मावतो! मूळ कवितेतील पुरुष आपल्या पाजळलेल्या शस्त्रांनी तिची कातडी सोलून त्यायोगे तिला परमेश्‍वरप्राप्ती घडवणार्‍या प्रेषिताच्या भूमिकेत शिरतो तर विडंबनातील पुरुष ब्यूटीपार्लरवालीला आपली काया तिचे फॅशन्सचे प्रयोग करून पाहण्यासाठी देऊ करून नवनवीन फॅशन्सचे दारच उघडून देणारा अनन्यसाधारण पुरुष ठरतो! ग्रेस आपल्या कवितेत आपण दु:खाचा महाकवी असल्याची आणि प्राचीन खोल नदीप्रमाणे आपल्या हातात दगडाचीही वेगाने फुले करण्याची क्षमता असल्याची सार्थ गवोक्ती करतात. तर या विडंबनातील पुरुषाला तो, ज्यातून मूर्ती घडवायची आहे असा लेण्यातला पाषाण आहे आणि तिच्या छिन्नीने वेगाने छिनल्या जाणार्‍या त्याच्या केसांची कमळे होत आहेत असे वाटते! हे वाचताना वाचकांच्या डोळ्यासमोर केशकर्तनालयात चादर पांघरून बसलेला डोंगरासारखा पुरुष आणि वेगाने चादरीवर पडणारे फुलाफुलांसारखे त्याचे केस येऊन त्यांनाही हसू फुटू शकते! अशी दृश्य साकार करण्याची क्षमता या विडंबनात सर्वत्र आहे- मग ते ओंजळीत फेस धरून अवघडून उभे असलेले बेसिन असेल किंवा चोळीच्या गाठी उकलणारी रंगवलेली (पुरुषी) नखे असतील - आणि त्यांचा गंमतशीरपणा वाचकांना लगेच 'दिसतो'! या विडंबन कविततेतील ब्यूटीपार्लरवालीचे पहिलेवहिले प्रयोग स्वत:वर करवून घेणार्‍या नवर्‍याचे चित्र स्वतंत्रपणे गंमतीशीर आहेच पण मूळ कवितेच्या संदर्भात ते खुमासदार होते. मूळ कवितेचा निवेदक उद्दामपणे स्वत:चा मोठेपणा सांगतो- त्याचे केस उदवल्याचे ओझे गंगेला वाहावे लागते, तो स्वत:ला दु:खाचा महाकवी, वैष्णवीची कातडी सोलणारा देवाचा यार म्हणवतो. विडंबनातील निवेदक नम्रपणे आपली काया ब्यूटीपार्लरवालीला तिच्या प्रयोगांसाठी अर्पण करतो, फॅशनचे दार उघडून देतो. दोन्ही निवेदक आपापल्या सहचरीकडून स्त्रीसारखे साजशृंगार करून घेतात पण दोघांतला हा विरोध विडंबनाला खुलवतो. विडंबनकवितादेखील मूळ कवितेच्या छंदात अवतरते, ग्रेससारखीच ओजस्वी शब्दकळा वापरते, ग्रेससारख्याच प्रतिमा योजते. पण ग्रेसच्या प्रतिमा कवितेला अधिकाधिक गूढ करत नेतात. तर विडंबनकवितेतील तशाच प्रतिमा तिला धाडकन थिल्लरतेच्या पातळीवर आणून हास्यास्पद होतात. गूढ प्रतिमा हे ग्रेसच्या कवितेचे बलस्थान आहे. अशा प्रतिमा म्हणजेच श्रेष्ठ कविता असे ग्रेसचे अनुकरण करू पाहणार्‍या अनेक कवींना वाटते. कदाचित असा ग्रह करून देण्यास ग्रेसच्या कवितेहूनही गूढ अशी काही समीक्षकांची समीक्षा कारणीभूत होत असावी. पण अशा प्रतिमाही विपर्यस्त केल्या तर कशा हास्यास्पद होऊ शकतात याचा वस्तुपाठ विडंबन देते.

हे विडंबन जेव्हा लिहिले तेव्हा ग्रेस आणि महानोर दोघेही नव्याने उदयाला येणारे तारे होते. दोघांचेही पहिले संग्रह तेव्हांच पॉप्युलरच्या 'नवे कवी नव्या कविता' मालिकेतून प्रसिद्ध होत होते. गझलकार सुरेश भटांचा 'रंग माझा वेगळा' दिसू लागला होता. दिलीप चित्रे, अरूण कोलटकर यांचेही एक-एकच संग्रह आलेले होते. तीच गोष्ट शंकर वैद्य, दया पवार यांची. पण या सर्वांची दखल माझ्या विडंबनांनी घेतली म्हणजे मी तेव्हांच त्यांचे पाळण्यातले पाय पाहिले होते असे म्हटले पाहिजे. पाडगावकर-बापट-करंदीकर, पु. शि. रेगे, आरती प्रभू, ग. दि. माडगूळकर या सर्व तेव्हा शीर्षस्थानी पोचलेल्या कवींच्या कवितांची विडंबने मी केली. आणि हयात नसले तरी नवकवितेचे युग आणणारे म्हणून कायम चर्चेत असलेल्या मर्ढेकरांच्या कवितेचेही.

मर्ढेकरांची एक चिंतनपर कविता आहे :

असें काही तरी व्हावें
अशी दाट होती इच्छा;
असें कांही तरी झालें
पुरवितें तेंच पिच्छा.

पैलथडी पिके आंबा
ऐलथडी हे शहारे;
कुण्या भाग्यवंतासाठीं
मध्यें वाकतात वारे.

ओल्या वाळूंतून वर
येई रसाळ सुवास;
आणि मनांतील बिया
देती हळूच आळस.

असें कांहींसे होईल
अशी फार होती आशा;
असें कांहींसे झालेले
पाहताच थिजे भाषा!

संवेदनशील कलावंताच्या भाग्याची परमावधी वर्णन करणारी ही कविता आहे. दूर कुठे पिकत असलेल्या आंब्याचा वार्‍यावरून वास आला तरी इथे त्याच्या चित्तवृत्ती उचंबळून येतात, त्याच्याही मनातील नवनिर्मितीच्या बीजांना अंकुर फुटतात! त्या कलावंताच्या आणि त्या कवीच्याही भाग्याचा हेवा करावा अशी ही कविता! पण ती माझ्या मनात रुजल्यावर माझ्यातल्या विडंबनकाराच्या कल्पनेला कोंब फुटले. मला वाटले, येथे संवेदनशील कलावंताच्या जागी व्यवहारी व्यापारी ठेवला तर? आणि मी लिहिले:

असें कांही तरी व्हावें
अशी दाट होती इच्छा;
असें कांही तरी झालें
पुरविते तेंच पिच्छा.

ऐलथडी पिके आंबा
पैलथडीला दुकान;
कुण्या डॉलरवंतासाठीं
मध्ये वाकतें विमान.

हवाबंद शीतपेटी
वर येई ना सुवास;
तरी खिशांतील नोटा
देती आळस, सुहास.

असें कांहींसे होईल
अशी फार होती आशा;
असें कांहींसें होतांच
गुंडाळावा का हो गाशा?

मूळ कवितेचा आकृतिबंध विरामचिन्हांसह या विडंबनात जसाच्या तसा वापरला आहे. इतकेच काय विडंबनातले दोन तृतीयांश शब्द मूळ कवितेतलेच आहेत! फक्त एक तृतीयांश शब्द फिरवून मूळ उदात्त आशयाच्या जागी तद्दन व्यावहारिक आशय सुचवला आहे. कवितेत काव्यमय शब्दांखेरीज ओबडधोबड वाक्प्रचार मर्ढेकरांनी आणले, या विडंबनात त्यांचा पिच्छा तर पुरवला आहेच पण 'गाशाही गुंडाळला' आहे! ध्वन्यर्थासाठी मर्ढेकर क्रियापदे वाकवतात. या कवितेत त्यांचे वारे 'वाकतात', बिया 'आळस देतात.' विडंबनात हीच क्रियापदे मुख्यार्थासाठी येतात. इकडून तिकडे जाणारे विमान आपल्याला वाकताना दिसते किंवा खिशातून बाहेर येणार्‍या नोटा आळस देत असल्याचे भासू शकते. अशी या क्रियापदांनाही दृश्यात्मकता येते. शिवाय नोटांनी दिलेल्या आळसापुढे 'सुहास' हे मर्ढेकरांचे लाडके संबोधनही येते! पण मुख्य म्हणजे मर्ढेकरांच्या मूळ कवितेत पैलथडी पिकून ऐलथडीच्या कुण्या भाग्यवंताला शहारे आणणारे आंबे दृष्टान्त म्हणून येतात. तर विडंबनात ते प्रत्यक्षात शीतपेटीत भरून ऐलथडीहून पैलथडीच्या कुण्या डॉलरवंताकडे निर्यात केले जातात. आणि मूळ दृष्टान्ताचे विडंबन साधते. मर्ढेकरांच्या मूळ कवितेतील उदात्त आशयाचा उपहास न करता, मर्ढेकरांच्या अनेक लकबींचे विडंबन करीत त्या उदात्त आशयाच्या जागी रोजच्या जगण्यातला व्यावहारिक आशय ठेवला आहे. 'रोजचे जगणे' कवितेत आणण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते त्या मर्ढेकरांच्याच कवितेचे असे विडंबन हा 'काव्यगत न्याय'च म्हटला पाहिजे! मर्ढेकरांच्या कवितेतील निवेदक कलावंताला निर्मितीचे आव्हान पेलताना भाषा थिजल्याचा प्रत्यय येतो, विडंबनकाराच्या भाषेला मात्र धुमारे फुटले आहेत! अर्थात मर्ढेकरांच्या कवितेचे विडंबन केले म्हणून मर्ढेकरांचे माहात्म्य कमी होत नाही. ते अबाधितच आहे. पण अशा कवींच्या कवितेतील काही विशेष विपर्यस्त केले तर कसे हास्यास्पद होऊ शकतात हे विडंबन दाखवीत असते. असे करताना देव्हार्‍यात बसवलेल्या कवितेला विडंबनकार तुमच्या आमच्यात आणत असतो. मर्ढेकरांच्या मोठेपणाने दडपून गेलेल्या अभ्यासकांची भीती दूर करत असतो, त्यांना एक सुखद धक्का देत असतो. मला स्वत:ला असे वाटते की मी मूळ कवितेवर प्रेम करतो. तिच्या इतके जवळ जातो की तिच्याशी खेळू शकतो! तिला वेडावून दाखवू शकतो! हे काहीसे भक्ताने देवाला 'असा कसा देवाचा देव बाई ठकडा' म्हणावे तसे आहे. आणि हे देवाचे ठकडेपण मला कौतुकाने इतर वाचकांना दाखवावेसे वाटते. त्यांनाही या खेळात सहभागी करून घ्यावेसे वाटते.

अशा अनेक देवांची भक्ती 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'मध्ये आहे. २२ कवींच्या ३३ कवितांची विडंबने यात आहेत आणि यातील जवळजवळ सर्वच कवी आज श्रेष्ठ कवी म्हणून मान्यता पावलेले आहेत. माझे हे विडंबनकाव्य हे काहीसे धाडसच आहे असे 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' चे प्रस्तावनाकार बाळ गाडगीळ यांनी म्हटले होते. त्यांच्या मते, मी ज्यांचा वारसा चालवला आहे त्या आचार्य अत्र्यांचे काम तुलनेने सोपे होते कारण त्यांनी ज्यांची मुख्यत: विडंबने केली त्या कवींत एकच रवी आणि बाकीची सगळी किरणे होती, दमदार कवींच्या कवितांची विडंबने ही करामत एकंदरीत अवघडच! पण मी हे काम न अवघडता करू धजलो कारण माझे त्यांच्या आणि एकूणच कवितेवर प्रेम आहे. म्हणूनच मी त्या कवितांकडे कवितांच्या समीक्षेकडे आणि गटातटांकडेही मिष्किलपणे पाहू शकलो. अशा दृष्टीने केलेले विडंबन कवितेचे एक निकोप वातावरण निर्माण करू शकेल असे मला वाटते.

विडंबनकविता लिहिताना, माझ्या मनात विडंबन करण्याइतकीच स्वतंत्र कविता लिहिण्याची उर्मी असते. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'तील प्रत्येक विडंबनकविता, एक स्वतंत्र कविताच आहे. मूळ कवितेला एक सर्जक पर्याय आहे. प्रत्येक विडंबनात मूळ कवितेतील मुख्यत: एखाददुसर्‍याच पण मूळ कवीची ओळख सांगणार्‍या विशेषाचे विडंबन आहे. त्यासाठी कधी मूळ कवितेतील गंभीर आशयाच्या जागी-त्याच गांभीर्याचा आव आणत थिल्लर आशय आणून बसवला आहे. कधी मूळ कवितेतल्यासारखी सूचकता भलतीच गोष्ट सूचित करण्यासाठी योजलेली आहे. कधी अनपेक्षित असा क्लायमॅक्स आणला आहे. कधी मूळ कवितेच्या काव्यप्रकाराशी निगडित संकेतांचे विडंबन केले आहे. कधी मूळ कवितेशी संबंधित सहित्यव्यवहार, समीक्षा यांचा विपर्यास केला आहे. कधी मूळ कवितेच्या खास आकृतिबंधात नवीन विनोदी कविता बांधली आहे.पण यातले कुठलेच विडंबन मूळ कवीची व्यक्तिगत टिंगल करणारे नाही. मी स्वत:च्याच कवितेचेही विडंबन करू शकलो यावरूनही ते सिद्ध व्हावे!

चांगले विडंबन लिहिण्यासाठी विडंबनकार जसा चांगला कवी असावा लागतो तसा चांगला वाचकही असावा लागतो. मूळ कविता त्याच्या मनात मुरलेली असावी लागते. तिने त्याला इतके पछाडलेले असावे लागते की तो आपला वेळ आणि कल्पनाशक्ती आपली स्वतंत्र कविता लिहिण्यासाठी न वापरता मूळ कवितेचे विडंबन करण्यासाठी वापरतो. असे करताना तो मूळ कवितेला अधिक प्रसिद्धी देत असतो, तिचे विशेष अधोरेखित करत असतो, ती वाचकांपर्यंत पोचवत असतो. असे असले तरी अनेकदा आपल्या कवितेचे विडंबन केले गेलेले पाहून मूळ कवी रागावतात. कारण त्यांचे आपल्या कवितेवर आंधळे प्रेम असते. आपल्या कवितेचे विडंबन वाचून किंवा ऐकून रसिक हसत आहेत हे पाहिल्यावर ते रसिक आपल्या प्रिय कवितेलाच हसत आहेत असे मूळ कवींना वाटू शकते आणि कोणी आपल्याला हसते आहे याहून अधिक अपमानास्पद काहीही नसते. अशा मूळ कवींना कठोर समीक्षा सहन होते पण विडंबन नाही. खरे तर विडंबन ही अगदी वेगळ्या प्रकारची समीक्षाच असते. काही कवी विशुद्ध कवितावादी असतात, त्यांना विडंबन रुचत नाही. जसे शास्त्रीय संगीतात अत्युच्च पदी पोचलेल्या भीमसेनजींनी, त्यांच्या गायकीच्या लकबींची वसंतराव देशपांड्यांनी नक्कल करून दाखवल्यावर व्यथित व्हावे तसे! काही समीक्षकही विडंबनकवितेकडे साशंकतेने पाहतात. काहींना विडंबने लिहिणार्‍या कवीची स्वतंत्र कविता त्यामुळे बिघडेल असे वाटते. विडंबनकवितांना उत्तेजन देऊ नये असे वाटते. माझ्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या चारही स्वतंत्र कवितांच्या संग्रहांना कुठला ना कुठला मानाचा पुरस्कार मिळाला. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ला मात्र एकही पुरस्कार मिळाला नाही किंवा या संग्रहाचे सविस्तर परीक्षणही कुठे आले नाही याचे कदाचित हेच कारण असावे.

काहीकाही कवींनी मात्र मी केलेल्या त्यांच्या कवितांच्या विडंबनाला मनापासून दाद दिलेली आहे. शंकर वैद्य माझ्या अपरोक्षही मी त्यांच्या कवितांच्या केलेल्या विडंबनाचे दाखल द्यायचे हे मी इतरांकडून ऐकले आहे. दि. पु. चित्र्यांना 'कराड पुरस्कार' मिळाल्यानंतर झालेल्या कविसंमेलनात, मी 'त्यांच्या कवितेचे विडंबन सादर करतो', असे म्हटल्यावर, चित्र्यांनी अत्यंत खिलाडूपणे आधी त्यांची मूळ कविता वाचून दाखवून माझ्या विडंबनाची आस्वाद्यता वाढवली होती. तिथल्या काही चित्रे-भक्तांना मात्र हा माझा अगोचरपणा वाटला होता! माझ्या समकालीन कविमित्रांनी त्यांच्या कवितांचे मी विडंबन करणे हा त्यांना त्यांच्या कवितेचा गौरव वाटत असल्याचे सांगितले आहे. अनेकांनी मला 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' अनन्यसाधारण असल्याचे सांगितले आहे. त्यात सलील वाघांसारखे आजचे कवी आहेत, जयंत गाडगीळांसारखे समीक्षक आहेत, पुरुषोत्तम पाटील यांसारखे संपादक आहेत आणि मुकुंद टाकसाळेंसारखे विनोदी लेखक आहेत. पण सर्वांत हृद्य आठवण आहे ती प्रसिद्ध लेखिका पद्मजा फाटक यांची. त्यांनी एकदा फोन करून माझ्याकडे 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ची प्रत मागितली आणि वर हेही सांगितले,"माझे मित्र मला सांगतात की हे पुस्तक वाचल्याखेरीज मरता येणार नाही इतके ते अनिवार्य आहे. आणि माझा तर एक पाय केव्हाचा मरणाच्या दारात आहे!" 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' केव्हाच आउट ऑफ प्रिंट झाले होते. माझ्याजवळ असलेल्या एकुलत्या एक प्रतींची छायाप्रत मी त्यांना देण्यासाठी तयार ठेवली. त्या मला भेटीसाठी वेळ देणार होत्या. पण ती वेळ येण्यापूर्वीच त्यांचा दुसरा पायही इहलोकातून उचलला गेला. त्या गोष्टीची चुटपुट मला कायमची लागून राहिली आहे.

'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'चे ऐतिहासिकत्व तपासण्यासाठी करायला हवी असलेली पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे हा संग्रह प्रकाशित झाल्यानंतर आलेल्या मराठी विडंबनकवितांवर एक दृष्टिक्षेप टाकणे. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'नंतर आलेला एकत्रित विडंबनकवितांचा संग्रह म्हणजे विश्‍वास वसेकरांचा 'बांडगुळे'. यात काही चांगली वाङ्मयीन विडंबने आहेत. विडंबने लिहिण्यामागची वसेकरांची भूमिकाही केशवकुमारांप्रमाणेच वाईट कवितांचे निर्दालन करण्याची आहे, आक्रमक आहे. त्या आवेशात कविता म्हणून विडंबन बिघडले तरी बेहत्तर अशी त्यांची वृत्ती आहे. 'बांडगुळे'तील विडंबनकविता, त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या विडंबनकविता आणि परिशिष्टे यांसह त्यांनी 'कलमी कविता' नावाचा संग्रह प्रसिद्ध केला आहे. महेश केळुसकरांनी चंद्रशेखर गोखल्यांचा चारोळीसंग्रह 'मी माझा' मधील चारोळ्यांची विडंबने असलेला 'मी (आणि) माझा बेंडबाजा' हा संग्रह प्रकाशित केला आहे. त्याचा आकारही 'मी माझा'सारखाच आहे. केळुसकरांची आणखी काही विडंबने, इतर विनोदी कवितांसह 'मस्करिका' या संग्रहात आहेत. घनश्याम धेंडे, बंडा जोशी यांनीही विडंबने लिहिली आहेत पण त्यांचे स्वरूप मूलत: मूळ कवितेच्या आकृतिबंधात रचलेली वेगळी विनोदी कविता असे आहे. सुट्यासुट्या विडंबनकविता इतर अनेक कवींनीही लिहिल्या आहेत. मी स्वत: 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'नंतर मोजकीच विडंबने लिहिली आहेत. त्यात विशिष्ट गझलेचे नव्हे पण गझल या कविताप्रकाराशी निगडित संकेतांचे विडंबन करणार्‍या गझला आहेत. ग्रेसच्या गाजलेल्या दोन कवितांची विडंबने आहेत. वसंत सावंत, प्रल्हाद चेंदवणकर यांच्या कवितांची विडंबने आहेत. दि. पु. चित्र्यांच्या 'यापुढचं महाराष्ट्रगीत'चे विडंबन आहे. आणि अशोक नायगावकरांच्या गाजलेल्या 'टिळक' कवितेचे विडंबन 'नायगावकर' ही आहे.

मी लिहिलेल्या या नव्या विडंबनकवितांसह जर 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ची नवी आवृत्ती काढली तर ती १९५० ते २००० या अर्धशतकातील मराठीतील सर्व महत्त्वाच्या कवींच्या सर्व प्रकारच्या कवितांकडे आणि त्यावरील समीक्षेकडे विडंबनकाराच्या दृष्टिकोनातून पाहणारी महत्त्वाची साहित्यकृती ठरेल. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' हे ऐतिहासिकत्व असलेले पुस्तक त्याच्या अनुपलब्धतेमुळे इतिहासजमा होऊ नये म्हणून हे पुस्तक निघणे नितान्त आवश्यक आहे असे प्रसिद्ध कवी, विडंबनकार आणि कवितेचे अभ्यासक डॉ. महेश केळुसकरांना वाटते. त्या पुस्तकाला विवेचक प्रस्तावनेची जोड देण्यासही ते सहर्ष तयार आहेत. अशी प्रस्तावना आणि सर्व मूळ कवितांचे परिशिष्ट जोडले तर मराठी कविताप्रेमींसाठी तो एक संदर्भमूल्य असलेला दस्तऐवज ठरेल. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' असा पस्तीस वर्षांनंतर आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज होत आहे. या घोड्याला फक्त कसबी प्रकाशकाने टाच मारण्याचीच खोटी आहे. माझ्याच एका शेराचे विडंबन करून मी या घोड्याच्या पोटातून इतकेच म्हणतो :

थांबलेला उधळण्याला मी कधीचा
टाच तू मारावयाची फक्त खोटी!

हेमंत गोविंद जोगळेकर

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

'माझा(पण) - ३८ वेळा
मी - ६३ वेळा
इ.इ.

सारांश -
माझं एक पुस्तक औट ऑफ प्रिंट आहे ते कुणीतरी प्रकाशित करा.
पुरावे - पॅरेग्राफ १ ते १००.

इतक्या सगळ्या ओळीनंतर लेखक मुद्द्यावर येतो-

मी लिहिलेल्या या नव्या विडंबनकवितांसह जर 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ची नवी आवृत्ती काढली तर ती १९५० ते २००० या अर्धशतकातील मराठीतील सर्व महत्त्वाच्या कवींच्या सर्व प्रकारच्या कवितांकडे आणि त्यावरील समीक्षेकडे विडंबनकाराच्या दृष्टिकोनातून पाहणारी महत्त्वाची साहित्यकृती ठरेल. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' हे ऐतिहासिकत्व असलेले पुस्तक त्याच्या अनुपलब्धतेमुळे इतिहासजमा होऊ नये म्हणून हे पुस्तक निघणे नितान्त आवश्यक आहे असे प्रसिद्ध कवी, विडंबनकार आणि कवितेचे अभ्यासक डॉ. महेश केळुसकरांना वाटते. त्या पुस्तकाला विवेचन प्रस्तावनेची जोड देण्यासही ते सहर्ष तयार आहेत. सर्व मूळ कवितांचे परिशिष्ट जोडले तर मराठी कविताप्रेमींसाठी तो एक संदर्भमूल्य असलेला दस्तऐवज ठरेल. 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' असा आपल्या इनिंगसाठी सज्ज होत आहे. या घोड्याला फक्त सुयोग्य प्रकाशकाने टाच मारण्याची खोटी आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदा. केशवकुमार, पाडगावकर, कोलटकर वगैरे Statistically improbable phrase कडे दुर्लक्ष केल्याबद्दल आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण लेखाची मांडणी जाहिरात टाईप वाटली.
ही मूळ कविता आणि हे त्याचं विडंबन - आणि त्यावर टिपण्णी - असा लेखाचा सूर नाही.
.
हा कवितासंग्रह महत्त्वाचा का आहे त्याची ५ कारणं - ह्यातलं एक कारण ह्या निमित्ताने वर उल्लेखित मंडळी येतात.
ती ४ आण्याची कोंबडी उरलेल्या १२ आण्याच्या मसाल्यात गायब आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे. 'बेहद्द स्वस्तुती आणि नाममात्र इतिहास' असं शीर्षक अधिक समर्पक ठरेल या लेखाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्मस्तुतीच्या चिखलातुन उगवलेले विडंबनाचे कमळ !
उत्कृष्ठ विंडबने आणि मुळ कविता सुद्धा !
एकाच वेळी मुळ अप्रतिम कवितांनी केलीली भावविभोर जड अवस्था आणि त्याचवेळी विडंबनाने हलका केलेला ताण
लेखाने माझ्या कोवळ्या मनाला दोन विरोधी बाजुंनी ताणल्याने गलितगात्र झालो
शिवाय नॉस्टेल्जियाचा तडका बोनस
लेख फार आवडला

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

लेख भयानक विनोदी आहे - विनोद विशेषांकात शोभून दिसणारा!

पुलं, ग्रेस, अत्रे, मंगेश राजाध्यक्ष यांसारख्या दिग्गजांशी स्वत:ची तुलना हस्ते-परहस्ते करवून घेऊन, लेखाच्या अखेरीस जोगळेकरांनी पुनर्प्रकाशनाचा जोगवा मागितला आहे. (कृपया यावरून 'मराठी साहित्यातील दस्तऐवजीकरणाबद्दल अनास्था' याबद्दल गळेकाढूपणा नको. आंतरजालावरची कित्येक विडंबने ह्या शांपू करणाऱ्या शिवप्रतिमेपेक्षा बरीच बरी आहेत.)

साहित्यिक वर्तुळात ऊठबस असली (संपूर्ण लेखात, हे प्रामाणिक वाक्य अनवधानाने आल्यासारखं वाटतंय!) की त्या बळावर मर्यादित वकुबाची विडंबनं प्रकाशित करून "साहित्तिक" म्हणून मिरवता येतं; हे तसं मराठी साहित्याच्या उंबरातले कीडेमकोडे परिचित असणाऱ्यांना नवलाचं नाही - पण त्याची पुन्हा एकदा प्रचीती आली.

बाकी तुफान विनोदी लेखासाठी आभार. विशेषत: खालील वाक्यं वाचून तर गडाबडा लोळलो!

हा संग्रह प्रकाशित होणे, ही मराठी काव्यविश्‍वातील एक ऐतिहासिक घटना होती, असे जाणकार म्हणतात.

बाबुरावजी चित्रे माझ्या लेखनाच्या प्रेमातच पडले. त्यात त्यांना अभिरुचीचे पूर्वी गाजलेले लेखकत्रय पुरुषराज अळुरपांडे (म्हणजेच पु. ल. देशपांडे, मं. वि. राजाध्यक्ष आणि अलुरकर) यांच्या लेखनातली चमक दिसली

'ज्ञानेश्‍वर ते मर्ढेकर' असा कार्यक्रम करीत असत. त्या धर्तीवर मर्ढेकरांपासून माझ्यापर्यंतच्या कवींच्या कवितांची विडंबने एकत्रित सादर करणारा 'मर्ढेकर ते जोगळेकर एक अतिजलद काव्यप्रवास' हा लेख मी लिहिला

माझे हे विडंबनकाव्य हे काहीसे धाडसच आहे असे 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' चे प्रस्तावनाकार बाळ गाडगीळ यांनी म्हटले होते. त्यांच्या मते, मी ज्यांचा वारसा चालवला आहे त्या आचार्य अत्र्यांचे काम तुलनेने सोपे होते

विडंबनकवितादेखील मूळ कवितेच्या छंदात अवतरते, ग्रेससारखीच ओजस्वी शब्दकला वापरते, ग्रेससारख्याच प्रतिमा योजते.

'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'ला मात्र एकही पुरस्कार मिळाला नाही किंवा या संग्रहाचे सविस्तर परीक्षणही कुठे आले नाही याचे कदाचित हेच कारण असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0