पेड्डामानिषी
रोज ऑफीसमधून आल्यानंतर झोपेपर्यंत माझ्या तेलुगु मैत्रिणी(रूममेट) बरोबर खूप मनमोकळ्या गप्पा होतात. शुक्रवार आणि शनिवारी तर गप्पांचा फड फारच रंगतो. कारण दुसर्या दिवशी सुट्टी असते. या गप्पांना कोणताही साचा, बंधन, सीमा नसतात. अगदी मनमोकळ्या गप्पा होतात. अशाच एका रात्री - मुलगी वयात येऊन तिचा मासिक धर्म सुरु होणे या विषयावर आमच्या गप्पा रंगल्या. मग एकमेकींचे अनुभव, संलग्न रुढी सारे काही चर्चीले गेले.
या गप्पांमध्ये मला काही गोष्टी कळल्या माझ्या मैत्रिणींकडून कळल्या त्या अशा - मुलगी वयात आली की तेलुगु समाजामध्ये बराच मोठा सोहळा/ कार्यक्रम करतात. १३ दिवस हा कार्यक्रम चालतो. यामध्ये नातेवाईक, शेजारीपाजारी सर्वा स्त्रियांना आमंत्रण जाते. मुलीचे हळद-तेलाचे हात भींतीवर उमटतात. मुलीला एका लहानशा खोलीमध्ये रहावयास देतात. भेटायला येणारीप्रत्येक पाहुणी स्त्री मुलीला स्पर्श न करता कुंकू प्रदान करते. ते कुंकू मुलगी एका विशिष्ठ हस्तमुद्रेमध्ये स्वीकारते. खूप कपडे, भेटी तिला दिल्या जातात.या दिवसात तिला तिखट काही दिले जात नाही फक्त गोडाधोडाचे जेवण दिले जाते. येणारी प्रत्येक पाहुणी तीळ्-खोबरे-गूळ तिच्या हातावर ठेवते आणि तिला खायला लावते. घरात इतके खोबरे होते की नंतर काही दिवस फक्त करंज्या सदृश तेलुगु प्रकार खावा लागतो. मुलगी या काही दिवसात जे काही कपडे घालते ते सर्व धोब्याला दान केले जातात. या प्रथेस पेड्डा मानिषी किंवा पुष्पवती म्हटले जाते.
आपल्या महाराष्ट्रात अशी काही प्रथा आहे का माहीत नाही परंतु २२ जून १८९७ या सिनेमामध्ये या घटनेशी निगडीत एक सुंदर गाणे पाहील्याचे स्मरते. खूप पूर्वी ज्योतीषाच्या एका पुस्तकात वाचले होते की - या दिवसाच्या नक्षत्रादि ग्रहयोगांवरून मुलीचे वैवाहीक आयुष्य कसे जाईल याचा अंदाज ज्योतीषी वर्तवतात.
प्रतिक्रिया
प्रतिसाद
आमच्या एका तेलुगु परिचितांनी त्यांच्या मुलीच्या "हाफ सारी" सोहोळ्याला आमंत्रण केल्याचे आठवते. काही कारणामुळे आम्ही तेथे उपस्थित राहू शकलो नाही.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
"हाफ सारी" - शब्द 'रोचक' आहे.
"हाफ सारी" - शब्द 'रोचक' आहे.
पुष्पवती
एका तुळू मित्राकडून या प्रथेची [जरी काहीशी त्रोटक असली तरी] मिळाली होती. तेलुगु कुटुंबिय खर्चही बराचसा करतात या प्रसंगी असे त्याचे म्हणणे.
"२२ जून" चित्रपटातील तो प्रसंग मनावर चरका उमटवितो तो त्या गाण्याच्या प्रसंगी मागे कोपर्यात भींतीला टेकून उदास बसलेली एक बालविधवा. इतक्या स्त्री कलाकार त्या चित्रपटात असूनही एकीच्याही मुखी एका ओळीचाही संवाद न देऊन पटवर्धन दांपत्यांने त्या काळातील स्त्रीचे घरातील स्थान किती दुय्यम होते त्या काळी, हेच अधोरेखीत केले होते.
(असो, काहीसे अवांतर झाल्याबद्दल क्षमस्व).
"अवांतर"
इतक्या स्त्री कलाकार त्या चित्रपटात असूनही एकीच्याही मुखी एका ओळीचाही संवाद न देऊन पटवर्धन दांपत्यांने त्या काळातील स्त्रीचे घरातील स्थान किती दुय्यम होते त्या काळी, हेच अधोरेखीत केले होते.
मार्मिक निरीक्षण.
अशा स्वरूपाची आणखी अवांतरे आली तर आनंद होईल.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
नहाण
इथे बघा.
व्यक्तिशः मला नापसंत
असे समारंभ मला व्यक्तिशः नापसंत आहेत. हळदी कुंकवाच्या समारंभाचेही असेच. जेथे लग्न न झालेल्या प्रौढ स्त्रियांना किंवा विधवांना वगळले जाते.
अर्थातच, काही ठिकाणी या समारंभाचे स्वरूप बदलले आहे. तेथे मी जाते परंतु असे समारंभ करणे मला आवडणार नाही.
बाकी, या समारंभाची माहिती आहे. माझ्यामते अन्य दाक्षिणात्य राज्यांतही हे चालते.
बग बग बगः उद्दृते दिसत नाहीत.
ह्म्म! प्रौढ आणि अविवाहीत
ह्म्म! प्रौढ आणि अविवाहीत स्त्रिया किंवा विधवा स्त्रिया यांचे वगळले जाण्याचे दु:ख मी समजू शकते पण त्याकरता उत्सवप्रियता टाळणे हे मला पटत नाही. प्रौढ आणि अविवाहीत स्त्रिया किंवा विधवा स्त्रिया यांना सामावून घेणारी सामाजिक रचना जसे सपोर्ट ग्रुप्स तयार व्हावेतच व्हावेत. पण बाल्यावस्थेतून तारुण्याच्या उंबरठ्यावर टाकलेल्या या पावलांचेही अप्रूप वाटावे या मताची मी आहे. मला वर उल्लेख केलेली उत्सवप्रियता व्यक्तीशः आवडते.
उत्सवप्रियता
उत्सवप्रियता टाळू नयेच पण सद्य परिस्थितीनुसार उत्सवाचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे. त्या मुलीला कोणी स्पर्श करू नये, तिला वेगळी खोली देणे वगैरे गोष्टी मला पटत नाहीत. अशाप्रकारे मला किंवा माझ्या मुलीला उत्सवाच्या नावाखाली वेगळे काढणे मला तरी आवडणार नाही.
उत्सवप्रियता
वर उल्लेख केलेल्या सोहळ्यात उत्सवप्रियता वगैरे गोष्टी मला तरी दिसत नाही. हे असे कार्यक्रम म्हणजे मुलगी वयात आल्याची जाहिरात केल्यासारखे वाटतात. त्याप्रसंगी कदाचित त्या मुलीची आई आणि नात्यातील इतर स्त्रिया आपली मुलगी 'आई बनायला सक्षम' आहे या विचाराने आनंदीत असतीलही परंतु 'उत्सवमूर्ती' असलेल्या त्या मुलीची काय मनस्थिती असेल याचा कोणी विचार करत असेल का? जेमतेम १२ ते १४ वर्ष वय असलेल्या मुलीला काय कळत असेल आणि काय वाटत असेल!
बर्याचश्या मुलींना तर पहिल्या वेळी या शारिरीक बदलाबद्दल जास्त माहितीही नसते. (आजकाल शाळांमधून माहिती देतात असं ऐकलंय) त्यावेळी तिच्या अत्यंत खाजगी बाबीची अशी जाहिरात बघून तिच्या मनावर त्याचा नक्कीच परिणाम होत असावा.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
+१
सहमत.
हाच मुद्दा खालील काही प्रतिसादांमधे मी मांडलेला आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मनस्थिती
मला उलट वाटलं. म्हणजे आपल्याला काहीतरी भयंकर झालंय असं वाटून त्याचा बाऊ करायच्याऐवजी असा सोहळा केल्यामुळे ही काहीतरी चांगली गोष्ट आहे (किंवा किमान चारचौघांसारखी तरी) असं वाटून त्याविषयी मोकळेपणा येत असेल असं वाटलं. असो. असले समारंभ प्रत्यक्षात कधी पाहिले नाहीत त्यामुळे हा निव्वळ अंदाज आहे.
(जाताजाता: मला इतके दिवस फक्त गोडधोड खाणं मात्र आवडलं नसतं) - अभक्ष्यभक्षणप्रिय जंतू
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लहान खोली आणि अंगाला हात न लावणे
लहान खोलीत ठेवणे (म्हणजेच चार दिवस बाजूला बस ना!) आणि इतरांनी अंगाला हात न लावणे यांत मोकळेपणा कसला आलाय? अशावेळी हात लागल्यावर नेमके काय करतात इतर लोक ते पाहून किंवा "छे! छे! हात नको लावूस हो." असे म्हटल्याने ती मुलगी खट्टूही होत असावी.
खरं आहे इतके दिवस गोड खाणे हा
खरं आहे इतके दिवस गोड खाणे हा अत्याचारच याच्याशी सहमत. किंबहुना आता तर मुलीने नियमित कॅल्सिअम, लोह घेणे हे तर आता अधिक ठळकपणे अधोरेखीत करावयास हवे तर उलटेच बिंबवले जात आहे असे वाटते. अर्थात गूळात लोह असते. पण मुद्दा हा आहे की त्यात लोह असते म्हणून त्या मुलीला गूळ दिला जात नाहीये तर एक समारंभ म्हणून दिला जातो आहे. त्यामुळे इट इज नॉट सर्व्हींग द पर्पझ.
+१
अशा स्वरूपाच्या समारंभाच्या निमित्ताने लिंगसापेक्ष चर्चा कदाचित करता येईल.
मुलगा आठ वर्षांचा होऊन गेल्यानंतर उपनयन सोहोळा केला जातो आणि मुलगी वयात आल्यावर प्रस्तुत धाग्यात वर्णिलेला सोहळा काही भाषक लोकांमधे करतात असं दिसतं. उपनयनाचा अधिकार काही जातींपुरतच मर्यादित असताना दिसतो आणि या न्यायाने त्याला काही तरी वर्णव्यवस्थासापेक्ष पार्श्वभूमी आहे. "हाफ सारी" सोहोळ्यामधे जातिनिहाय लायकी आहे असं दिसत नाही; मात्र हा सोहोळा अर्थातच काही ठराविक प्रांतांपुरता मर्यादित आहे असं दिसतं. या दोन्ही मधे काहीतरी धार्मिक कारणं असणार हे उघड आहे. उपनयन विधीमधे ज्या मुलावर हा संस्कार होतो त्याला "सोशल स्टिग्मा" सहन करावा लागतो असं दिसत नाही. असलाच तर तो केलेल्या टक्कलाशी निगडित आहे. (इतर मुलांनी चेष्टा उडवणे , टपल्या मारणे इत्यादि. ) . "हाफ सारी" सोहोळ्यात ज्या मुलीवर हा संस्कार जाहीर रीत्या केला जातो तिची मनःस्थिती काय असेल हे नक्की सांगू शकत नाही. जे कुटुंब हा सोहोळा आयोजित करतं त्याच्याकरता कदाचित "सोशल स्टिग्मा" पेक्षा "सोशल अॅक्सेप्टन्स"चा भागच यात अधिक असावा. मात्र ज्या अल्पवयीन मुलीला हा संस्कार स्वीकारायचा असेल तिला - विशेषतः काही समवस्कांच्या संदर्भात - विचित्र मनःस्थितीला सामोरे जावे लागत असेल असा माझा अंदाज आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
सोशल अॅक्सेप्टन्स
मला वाटतं की काहीच वेगळं नाही हे दाखवण्याकरता कसलेही "समारंभ" करण्याची गरज नाही (पुन्हा, समारंभ करण्यास माझी ना नाही. काही वेगळे करण्याची गरज नाही असे माझे मत.) जेव्हा समारंभ केले जातात तेव्हा काही वेगळं आहे असे दाखवले जाते.
पूर्वीच्या काळी असे समारंभ गरजेचे असावेत कारण लग्न ८-९ वयांत होत. काही ठिकाणी मुली माहेरीच राहत किंवा काही ठिकाणी त्यांना वयात येईपर्यंत नवर्याशी संबंध ठेवण्यास उद्युक्त केले जात नसे. उत्तर भारतात गौना हा विधी मुलगी समागमास तयार आहे हे सांगण्यास केला जातो असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
असे समारंभ करण्यापेक्षा माझ्या आप्तस्वकीयांकडून भेटी उकळणे आणि बाहेर जेवायला, सिनेमा पाहायला जाणे वगैरे मी महत्त्वाचे समजेन. मासिक धर्म ही काही आवडीची गोष्ट नाही. ती जेव्हा मुलींना सुरू होते तेव्हा बहुतेक करून त्यांची मनःस्थिती खालावलेली असते. लोकांना बोलवून हीला काहीतरी वेगळं होतंय किंवा होत नाही हे दाखवण्यात आताच्या जमान्यात काय इंटरेष्ट असावा?
सगळे काही "गरज" या चष्म्यातून
सगळे काही "गरज" या चष्म्यातून पहाता येते का? मुलगी मातृत्वासारखी नितांत सुंदर अनुभव घेण्यास निसर्गरीत्या सक्षम व्हावी ही पर्वणी साजरी करण्यासारखी आहेच. This occassion definately calls for a celebration.
मातृत्व
सोहळ्याला निमित्त लागत नाही. त्यामुळे सोहळ्याशी मला प्रत्यवाय नाही परंतु सोहळ्याच्या स्वरूपाशी आहे. मुलगी मातृत्वाचा नितांत अनुभव घेण्यास १३-१४ व्या वर्षी अजिबात सक्षम नसते. मनानेही आणि शरीरानेही.
मला इतक्या लहान वयात
मला इतक्या लहान वयात मातृत्वाचा अनुभव घेणे याविषयी सक्षम म्हणजे "सुरुवात होते" इतकेच म्हणायचे आहे. बाकी शारीरीक आणि मानसीक दृष्ट्या नसते हे मलाही मान्य आहे. असो.
चांगले आहे
आपल्याकडे लैंगिक शिक्षणाबाबत उदासिनता असल्याने ही पद्धत चांगली आहे. कमीतकमी मुलीला आपल्याला जे होत आहे ते काही वेगळे नाही हे तरी कळते.
काही शक्यता
ज्या वर्गांत/समूहामधे लैंगिक शिक्षणाबाबत उदासीनता आहे तिथे कदाचित वर उल्लेखलेल्या प्रमाणे "सेन्स ऑफ बिलाँगिंग" करता असे सोहोळे उपयोगी ठरणे शक्य आहे. ज्या वर्गांत लैंगिक शिक्षणाबद्दल संपूर्ण जागरुकता , योग्य वेळी क्रमाक्रमाने दिले गेलेली माहिती इत्यादि गोष्टी असतील तिथे अशा स्वरूपाचे सोहोळे बहुदा होत नसावेत असा अंदाज आहे. मात्र जी कुटुंबे अनेक अर्थांनी संक्रमणशील असतात त्यांना बहुदा "कुटुंबप्रमुख/पालकांना अशा स्वरूपाचा सोहोळा सामाजिक कारणांकरता आवश्यक वाटत आहे आणि त्याच वेळी लैंगिक शिक्षणादि बाबतीत शाळांसारख्या सामाजिक ठिकाणी प्रागतिक वातावरणात वावरणार्या त्या अल्पवयीन मुलीला मात्र अशा सोहळ्याच्या संदर्भात कानकोंडले होत आहे" अशा स्वरूपाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असावे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
लैंगिक शिक्षण - भारतीय समाज
हा सोहळा मु़ख्यत्वे पारंपरिक विचार सरणीच्या कुटुंबात होत असावा असा माझा कयास आहे. भारतात अजुनतरी ह्या विषयावर खुलेपणाने चर्चा होत नाही हे वास्तव आहेच. शाळांमध्ये लैंगिकशिक्षण ही केवळ एक औपचारिकता आहे (मी शाळेत असे पर्यंत म्हणजे २००० पर्यंत तरी आमच्या कन्या शाळेत तरी असा विषय लांब लांबपर्यंत दॄष्टीपथात नव्हता). इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ही काही वेगळी परिस्थिती नव्हती आणि सध्याही नाही.
त्यामुळे मुलीला एकदम ट्रॉमा वाटण्यापेक्षा , ती जरा (मानसिकदृष्ट्या) येणार्या परिस्थितीसाठी तयार होऊ शकेल.
जे होतंय ते नैसर्गिक मानून सोहळा न करणं ही आदर्श स्थिती असं म्हणेन पण टीपीकल भारतीय समाजात, खुलेपणा नसताना जर अश्या सोहळ्यामुळे मुलगी जर बदलाला सामोरं जाऊ शकत असेल तर सोहळा चालू शकेल इतकंच मी म्हणेन
उत्सवप्रियता
प्रियालीताईंनी "उत्सवप्रियते" वर घेतलेला आक्षेप काही प्रमाणात (सद्यस्थितीत....या अतिवेगवान युगात) मान्य करावा लागला तरी ज्या काळात या प्रथा (विशेषतः ब्राह्मण कुटुंबियांत) अस्तित्वात होत्या....आजही असतीलच... त्याचा मागोवा घेतल्यास, त्याचा उद्देश्य मुलीला तिच्या 'स्त्रित्वा'ची जाणीव करून देण्याच्या उद्देशातून ती प्रथा अस्तित्वात आली असावी. मुलगी रज:स्वला होणे ही खरे तर एक नैसर्गिक प्रक्रिया जी मानव कोणत्याही मार्गाने थोपवू शकत नाही. त्या चक्राला मुलगी जेव्हा बांधली जाईल तो प्रसंग एवढ्यासाठीच 'साजरा' केला जात असणार की, त्या अनुषंगाने तिच्यावर येणार्या [स्त्रीत्व जपण्याच्या] जबाबदार्यांचीही एकप्रकारे जाणीव करून द्यावी असाही एक प्रघात असेल.
बालविवाह तर होत होतेच या शतकापूर्वी. पण नवरी मुलगी अजूनी मुलगीच असल्याने त्यावेळेच्या प्रथेनुसार ती आईवडिलांकडेच असे. मग तिला ज्यावेळी "नहाण" प्राप्त होई, त्यावेळी साहजिकच तिची सासरी पाठवणी करण्याची तयारी सुरू होत असणार. मग ही पाठवणी करण्याच्या प्रसंगाला "उत्सवा"चे रूप येणे क्रमप्राप्तच मानावे लागेल. तुळू कुटुंबातील तो रोख त्या प्रथेचाच परिपाक असावा.
इथे हेही सांगणे जरूरीचे आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील 'मराठा' समाजातील घरातून अशा प्रसंगी कोणताही 'उत्सव' म्हणण्याजोगा कार्यक्रम अजिबात होत नाही म्हटले तरी चालेल. मराठ्याची मुलगी वयात आली ही गोष्ट आईआजीला योग्य वेळी कळते आणि त्याचे पुरुष वर्गाला काहीही देणेघेणे नसते. [हां....त्या दिवशी तिला खास आंघोळ, वेणीफणी आणि नवी साडी मात्र....त्यातही हिरव्या रंगाची....कारण माहीत नाही...नेसवली जाते. मुलगीही खुश दिसत्येच.]. घरातील नित्याच्या जेवणातही काही विशेष असा बदल केला जात नाही.
करेक्शन
उत्सवप्रियतेवर आक्षेप नाही हो. माणसाने रोज कसले ना कसले रोज उत्सव साजरे करावे परंतु ते करताना त्याचे स्वरूप लक्षात घ्यावे. अन्यथा, काही स्तरांना वगळून, बँड बाजे वराती काढून, गणेशोत्सवाला लाउडस्पीकर लावून उत्सव साजरे करावे की त्यांचे स्वरूप बदलावे यात लक्ष देणे मला महत्त्वाचे वाटते.
प्रतिसाद
प्रतिसाद आवडला. चाचणी केली. श्रेणीही दिली.
हाफ सारी
म्हणजे घागरा आणि त्यावर ओढणी. तोहफा वगैरेच्या जमान्यातले श्रीदेवीचे कपडे आठवताहेत का? नसल्यास हे पहा.(ती श्रीदेवी नाही)
ही साडी सहसा लग्न न झालेल्या मुली घालतात. आताशाच चर्चेत आलेले पद्मनाभन मंदिर आणि तत्सम ठिकाणी डेरवणसारखेच कुणाला कोणत्या कपड्यांत मंदिरात जाण्याची मुभा असावी याचे नियम आहेत. त्यात नियमांत 'हाफ सारी' घालून आलेल्या मुलीस परवानगी आहे असं लिहिलं होतं. (अर्थात थोड्याच वेळात आम्हाला दर डोकं ५० रूपये घेऊन घातलेल्या कपड्यांवरूनच एक लुंगी गुंडाळली आणि आत जाऊ दिलं. आता इतके दूरवर आलोच आहोत तर ५० रूपयांकडे कशाला पहा म्हणून आम्हीही ते पैसे दिले.)
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
चांदोबा
चांदोबातल्या चित्रांतील बायका असे कपडे घालत.
ही कोण?
अनुष्का का?
माहित नाही गं. गुगलल्यावर
माहित नाही गं. गुगलल्यावर रँडमली जे चित्र मिळालं ते डकवलं. बादवे, मी आणि अनुष्का, दोघीही एकमेकींना ओळखत नाही.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
सुहासी गोरडिया धामी
त्या हाफ सारीच्या छायाचित्रातील महिलेचं नाव सुहासी गोरडिया धामी असं आहे. हवं असेल तर तुम्ही Suhasi Goradia Dhami हे शब्द टाकून प्रतिमा शोध घेऊन खात्री करू शकता.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
परिपक्वता
आजही जी गोष्ट उघडपणे चर्चा करायला आपल्या एकंदरच समाजामध्ये संकोचाची भावना असते, तिथे या घटनेचा सोहळा साजरा होत असणे, पूर्वापार, हे जे लोक असा सोहळा करतात, करत असत, त्यांच्या परिपक्व मानसिकतेचे लक्षण आहे असे मी समजतो.
संकोच भावना
"पूर्वापार, हे जे लोक असा सोहळा करतात,"
~ पण, मला वाटते 'लोक' या व्याख्येत फक्त स्त्री वर्गच असणार. अशा सोहळ्यामध्ये पुरुषाला, अर्थातच, प्रवेश निषिद्ध असणार. ज्या तुळू मित्राचे मी उदाहरण घेतले होते, तोही घरी त्या दिवशी'तसला' कार्यक्रम होता म्हणून आमच्या रूमवर आला होता आणि जवळपास दिवसभर तिथेच कॅरम, पत्ते, कॅसेट तत्सम बाबीत मन रमवित राहिला.
बाकी 'समाज-संकोच' भावनेच्या मताशी सहमत आहे. हा संकोचपणा तर अगदी आपल्या शिल्पकार आणि चित्रकारांच्या अंगीही भिनला होताच त्यामुळे ग्रीक न्यूडतेची भव्यता आणि मोकळेपणा आपल्या शिल्पात कधीच उतरलेला दिसणार नाही. प्रत्येक मूर्ती दागदागिन्यांनी मढवून टाकण्याचा हट्ट हे त्या संकोचपणाचेच फळ होय.
संकोच?
नीटसे समजले नाही. लैंगिक उद्दीपन ज्यांमुळे होते असे स्त्री-पुरुषांचे पुष्ट अवयव अनेक भारतीय शिल्पांत अगदी उघड दिसतात. ते चवीचवीने पाहण्यासाठी अनेक देशांतून पर्यटकदेखील येतात. त्याशिवाय लज्जागौरी आणि शिवलिंगाची पूजा वगैरे प्रकार होतेच. मग हा तुम्हाला अभिप्रेत संकोच कसला ते नक्की कळले नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सामान्यीकरण
संकोचाच्या भावनेच्या संदर्भात, तसेच नग्न शिल्पे इत्यादिंच्या संदर्भात थोडे सामान्यीकरण होते आहे असे वाटते. संकोचाची भावना एकंदर भारतीय समाजात आहे असे आपण म्हणतो ते एक प्रकारे सामान्यीकरणच आहे, काही अपवाद असतीलही, पण या विषयावर उघड चर्चा होत नाहीत हे वास्तव आहे. कमीतकमी महाराष्ट्रात तरी होत नाहीत असे म्हणू शकतो.
पाटीलसाहेब शिल्पांच्या बाबत जे बोलले आहेत, त्यातही तथ्य आहेच. पुष्ट अवयव दाखवणार्या देव-देवतांच्या मूर्ती दागदागिन्यांनी झाकण्याचा सोस हा या संकोचातून आलेला आहे असे त्यांना म्हणायचे आहे असे वाटते.
बाकी ग्रीक न्यूड शिल्पकला आणि खजुराहोवरची न्यूड शिल्पकला यात बरेच अंतर आहे. ग्रीक न्यूड शिल्पकलेत एक मोकळेपणा दिसतो. शरीराकडे तटस्थपणे पाहण्याची भूमीका दिसते. तसे काही खजुराहोत दिसत नाही. ती मैथुनाची उद्दीपक शिल्पे आहेत. त्यात मोकळेपणाच्या पलीकडचे काहीतरी आहे. एक प्रकारचा विरोधाभास आहे. ज्या काळात ही शिल्पे निर्मीली गेली, त्याच्या लगतच्याच काळात बुरखा पद्धतीने भारतात मूळ धरलेले दिसते. ज्या आध्यात्मिकतेची साधना करण्यासाठी ब्रह्मचर्य आवश्यक समजले जाते, त्याच आध्यात्मिकतेच्या मंदिरांवर लैंगिक उद्दीपना देणारी ही शिल्पे दिसतात. त्यामुळे ग्रीक न्यूड शिल्पांमधला मोकळेपणा आपल्या शिल्पांमध्ये उतरलेला दिसत नाही असे पाटील म्हणतात ते योग्य वाटते.
भारतीय नग्नशिल्पं
काहींच्या मते अध्यात्मात उद्दीपक प्रतिमा आणणे हा एक प्रकारचा मोकळेपणा आहे. याखेरीज उद्दीपन न करणारी नग्नशिल्पंदेखील परंपरेनं भारतात बनतात. उदा: बाहुबलीची प्रतिमा. नग्न शरीराकडे तटस्थतेनं पाहाणं यात अभिप्रेत असावं. असो. या धाग्यात हे फार अवांतर होतंय.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रोचक माहिती. मागे काही दक्षिण
रोचक माहिती. मागे काही दक्षिण भारतिय लोकांच्या संपर्कात असताना असा काही सोहळा असतो हे ऐकले होते. इत्थंभूत माहिती आज कळली.
**
काही महिन्यांपूर्वी एका चॅनेलवर एका डॉक्युमेंटरीमधे आफ्रिकेतील काही जमातींमधे मुले (रादर मुलगे) विशिष्ट वयात येताना केले जाणारे समारंभ यांच्याबद्दल माहिती कळली. या प्रकाराला कमिंग ऑफ एज सेरेमनी असे म्हणतात. पूर्वीही असे काही बाही ऐकले होते. पण या कार्यक्रमानंतर मात्र कुतूहल चाळवले गेले. आणि त्याविषयी माहिती गोळा करू लागलो होतो. एखादा लेख लिहायचा प्ल्यान आहे.
असे सोहळे व्हावेत की न व्हावेत हा वादाचा मुद्दा आहे. मात्र आदिम अवस्थेपासून मानवाला लहान मुलांचे मोठ्या माणसात परिवर्तन होणे हे केवळ आणि केवळ, त्या मुलाच्या लैंगिक अवस्थेशीच निगडीत ठेवावे वाटत आले आहे. ते एक शारिरीक परिवर्तन आहे. इतर सगळी परिवर्तनं मानसिक अथवा बौद्धिक असतात त्यामुळे डिफाईन / डिमार्केट तितकीशी सोपी नाहीत. मात्र लैंगिक परिवर्तन अगदीच दृश्य प्रकारचे असते आणि त्यामुळे त्याचे डेफिनिशन सोपे असते. असा मोठा झालेला / झालेली मग त्या समूहाचा एक पूर्ण अधिकार असलेली व्यक्ती बनते. साहजिकच त्या व्यक्तीच्या आयष्यात हे एक अतिशय आतुरतेने वाट बघावे असा एक प्रसंग असतो. म्हणून मग त्यायोगे येणारे सगळे सोहळे / आचार आणि कर्मकांडं.
मानव विकसित होत गेला पण काही आदिम गोष्टी बरोबर घेत चालला. त्यांचे स्वरूप बदलले, प्रसंगी निकषही बदलले पण बहुतांशी समाजात ही प्रथा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चालू राहिली. मग ते 'सीताबाई चाफेकरणी'ला येणारे न्हाण असो किंवा एखाद्या गोंयकार किरिस्तावाच्या मुलाचे अथवा मुलीचे 'कन्फर्मेशन' असो. आपलं पोर 'मोठं झालं' हे जगाला सांगायचा सोस आईबापालाही असतो आणि त्या पोरांनाही एक भयचकित उत्सुकता असते. सुरूवातीला मानव समूहात लैगिकतेबद्दल फारशा विचित्र कल्पना नव्हत्या तेव्हा हे सगळे अगदी मॅटर ऑफ फॅक्ट असायचे. नागर संस्कृत्या विकसित होत गेल्या तसतश्या काही कल्पना रूजत गेल्या आणि भारतिय संस्कृतीत तरी लैंगिकता हा एक न बोलण्याचा विषय होऊन गेला. त्याच्याशी बरेच समज आणि गंड जोडले गेले. आणि म्हणूनच वर उल्लेख झाल्याप्रमाणे अशा सोहळ्यांच्यावेळी त्या मुलीला काय प्रसंगातून जावे लागत असेल असा प्रश्न उद्भवत असेल. लैंगिकतेला आपण आपल्या पुरते का होईना, मॅटर ऑफ फॅक्ट केले तर मुलींना असे लाजिरवाणे वगैरे वाटणे टळू शकेल. आजही बरेचसे डॉक्टर्स आणि समुपदेशक मुलांमुलींना लैंगिकतेबद्दल सजग करण्याचा पुरस्कार करतातच.
बिपिन कार्यकर्ते
शंका
मुलीपेक्षा पोटेन्शियल वरांना मुलगी लग्नाची झाली आहे हे कळण्यासाठी आणि त्याची सर्व नातलग-संबंधितात माहिती होण्यासाठी तर हा समारंभ पुर्वी सुरू झाला नसेल ना अशी शंका मनात येते. गोडसे भटजींचे 'माझा प्रवास' वाचल्यानंतर तत्कालीन पुरूषांच्या डेस्परेशनची थोडीफार कल्पना येते.
कदाचित
कदाचित मुलगी वयात आली आहे, आता तिच्यासाठी योग्य वर शोधायला हरकत नाही वगैरे असा संदेश देण्यासाठी ही पद्धत असू शकेल. सध्याच्या काळात त्याला काही औचित्य नाही.
पण कदाचित अशा समारंभामुळे आपल्याला जे होतंय ते जगावेगळं किंवा घाणेरडं नाही असं तरी त्या मुलीला वाटू शकेल. खूप सिक्रेसी बाळगणार्या समाजापेक्षा हा सोहळा मला पटेल!
खुलासा
लैंगिक शिक्षणाची वाणवा असल्याने या समारंभास काही सामाजिक उपयुक्तता आहेच. मी आधीच्या प्रतिसादात तसे म्हटलेच आहे.
नुकतेच गोडसे भटजींचे 'माझा प्रवास' वाचल्याने तत्कालीन पुरुषांचा उतावीळपणा मनात आला आणि या वरवर चांगल्या वाटणार्या समारंभामागे काही सिनिस्टर पुरूषी प्लॉट असेल असा कॉन्स्पिरसही मनात आला.
संकोच भावना आणि काही उदाहरणे
श्री.चिं.जं. यांच्या प्रतिसादाला श्री.आ.रा. यानी दिलेले उत्तर त्यांचे [चिं.जं.यांचे] काही प्रमाणात समाधान करू शकेल असे वाटत असतानाच श्री.आ.रा.यांचाच त्या बाबतीतील मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. [धाग्यात अवांतर होत आहे हे चिंजंचे मत ग्राह्य आहेच, पण तरीही हा मुद्दा इथे असावा असेही आता वाटत आहे.]
ग्रीक तसेच रोमन काळातील कलाजीवनाच्या भरभराटीवर खरे तर नवीन धागा काढणे जरूरीचे आहे, पण तरीही थोडक्यात इथे या निमित्ताने इतकेच म्हणता येईल की तेथील संपन्न अशा राजाश्रयतेचा प्रभाव शिल्पकार आणि चित्रकार यांच्यावर अशा रितीने पडला होता की मग त्या संस्कृतीमध्ये मानल्या गेलेल्या देवतांच्या प्रतिमा तसेच मानवी सौंदर्यपूजनासाठी त्या कलाकारांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा मुक्त वापर केला. "इमोशनल रेसिस्टन्स टु अ थॉट" हा अडथळा त्या कलाकारांच्या करणीत कधीच मग जाणवला नसल्याचे त्या काळातील कलाकृती [दोन्ही : शिल्प आणि चित्रकला] निखळ आनंदाचे प्रतिक मानल्या गेल्या आणि त्याची परंपरा सार्या युरोपीअन कल्चरवर पसरल्याचे जाणवते. सेक्स अपीलची सूचकता तिथे दुय्यम, नव्हे नगण्यच, म्हणावी लागेल. खजुराहो शिल्पाच्या विविध विषयातील जिथे विषय 'मैथुन' आहे तिथे कामुक भावना उद्दीपित करणारे प्रसंग शिल्पकारांने कोरणे हे त्याच्याकडून अपेक्षित होतेच, पण तिथेही 'संस्कृती' चा पडदा आणणे भाग पडल्याने [हे का करावे लागले त्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता नाही] थेट कामसूत्राच्या पायर्या दर्शवितानाही त्या मूळच्या नैसर्गिक उघड्या देहावर दागिन्यांचे आवरण टाकून मूळ विषय भरकटू दिल्याचे दिसते. हे तसे करणे त्या शिल्पकाराच्या मनीही नसेल, पण प्राप्त परिस्थितीत सम्राटाच्या आदेशाची ते पायमल्ली करू शकत नव्हते.
मी वानगीदाखल दोनतीन चित्रे इथे देतो, ज्यावरून मला (तसेच श्री.आ.रा. यानाही) या विषयाच्या खोलीबाबत नेमके काय म्हणायचे आहे ते शब्दाविनाही समजेल.
पहिले आहे ~ एक ग्रीक न्यूड. चित्रावरून कल्पना येईलच की, शिल्पकाराला स्त्रीचा देह अशारितीने समोर आणायचा आहे की त्या नग्नतेमुळी मनी कामुकता जागी होणार नाही. त्या तरूणीची ती सहजता इतकी नैसर्गिक वाटते की तिला कल्पनाही नाही की कुणीतरी तिचा देह रेखाटत आहे.
दुसरे आहे ~ एक खुल्या वातावरणातील चित्रकलेचे. इथेही नग्नता प्रामुख्याने रेखाटली असली तरी ती मुद्दाम करण्याच्या प्रयोजन दिसत नाही. मोकळेपणा स्पष्टच आहे.
तिसरे आहे ~ आपल्या खजुराहोमधील. दोन नायिका आणि एक नायक यांच्या भेटीचे आणि त्या भेटीत नायिकांची शारीरसौंदर्याची खर्या अर्थाने परिमाणे आहेत ती जडजवाहिरांच्या माध्यमाने झाकून टाकण्याचा शिल्पकाराचा यत्न शिल्पकलेला मारक ठरतो. विशेषतः सुंदरीचे वक्ष झाकणारी ती मौक्तिकमाला त्या जागी सहज आल्याचे जाणवत नाही.

"संकोच-भावने"मधील आविष्कराची आत्यंतिकता चित्राला मारक ठरते ती अशी. आता देशोदेशीचे पर्यटक खजुराहो येथील शिल्पकला पाहण्यास येतात हा भाग वेगळा. मग तसे ते सारा युरोप तेच करीत फिरत असतात. प्रश्न आहे इथे चर्चेचा तो कला आणि संकोच एकमेकाला पूरक ठरतात की मारक याबाबत.
अशोक पाटील
(फोटो आल्याचे दिसत नाही. रितसर फोटोबकेटद्वारे तीन चित्रे योग्यरितीने इथे दिली आहेत. यापूर्वीही अन्यत्र असे फोटो यशस्वीरित्या दिले गेले आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास संपादक मंडळाने साहाय्य करावे.)
हेच ते तीन फोटो का?
हेच ते तीन फोटो का?



---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फोटो
थॅन्क्स अदिती.....हेच ते फोटो. फक्त क्रमवारी बदलली गेली आहे. पहिला दुसर्या व दुसरा पहिल्या ठिकाणी असे मजकुराच्यादृष्टीने अभिप्रेत आहे. पण आता राहू दे.
मार्गदर्शनाबद्दलही आभार.
सर्वात पहिले सारीका, एक
सर्वात पहिले सारीका, एक महत्त्वाचा आणि 'हॉट' विषय काढण्याबद्दल आभार.
आहाराबाबत म्हणाल तर या वयात मुलींच्या आहारात पुरेशी प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ असावेत. त्या संदर्भात तीळ, खोबरं आणि गूळ (सारिकाने लोहाचा उल्लेख केला आहे) खाणं तार्किक वाटतं. पण एवढ्या प्रमाणात कोणत्याही गोष्टीचा भडीमार झालेला वाईटच. मला सलग दोन जेवणांत एकच भाजी खाववत नाही तर १३ दिवस (१३ असलं म्हणून काय झालं!) तिखटाचे पदार्थ नाहीत म्हणजे त्रासच जास्त. त्यातून आलेल्या प्रत्येक बाईच्या हातून हे खायचं तर शरीराला त्या १३ दिवसांत फायबर्स किती कमी मिळतील...!
मुख्य चर्चाविषयासंदर्भातः
काहीही बदल होत असल्यास त्याला विरोध करण्याचा साधारण मानवी स्वभाव असतो. ज्या बदलास आपण विरोध करू शकत नाही, त्याला काही करून दुष्ट, वाईट किंवा संकट असंही ठरवण्याचा पॅटर्न दिसतो. हजारो वर्ष बघितली गेलेली चटकन उदाहरणं सुचत आहेत ती आकाशातली; ग्रहणे, धूमकेतू दिसणे, ग्रहांची वक्री गती, इ. विविध संस्कृतींमधे या गोष्टी वाईट समजल्या गेल्या आहेत. मुलींच्या वयात येण्याचं एक चिह्न म्हणजे पाळी सुरू होणं. मुलीच्या शरीरात होणार्या बदलाचा स्वीकारही फार आनंदाने केला जातो असं नाही. एकूणच या रक्तस्त्रावाकडे फार चांगलं म्हणून बघितल्याची नोंद सापडणं कठीण आहे. अजूनही "त्या चार" दिवसांमधे कोणतीही "पवित्र" गोष्ट करण्याकडे स्त्रियांचा कल नसतो.
अशा पार्श्वभूमीवर या उत्सवाकडे कोणत्या नजरेतून पहावं या बाबतीत मी थोडी साशंक आहे. क्रेमरची कन्स्पिरसी थिअरी खरी असू शकेल अशी थोडी शंका येते. आणखी एक, स्त्रियांवर बंधनं असण्याच्या मनूच्या नंतरच्या काळात हा सोहोळा करण्याची पद्धत सुरू झाली असेल तर "चला, आणखी एक कारण मिळालं मैत्रिणी, बहिणी, नातेवाईक स्त्रियांना भेटण्यासाठी!" असाही उद्देश असू शकतो. प्रत्येक पाळीमागे एक ओव्हम फुकट गेलं असा काही विचार, जो ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांमधे होतो/व्हायचा, भारतात व्हायचा का नाही याबद्दल मला कल्पना नाही. पण तसं असल्यास "यापुढे पाळी जाईपर्यंत मुलीवर मनुष्यवधाचा आरोप आहे" असा काहीसा विचारही असू शकतो. किंवा आता तुझं बालपण संपलं आणि मानेवर कायमचं जू आलं अशा काही विचारांतून उत्सव असू शकतो. मुलीला बाजूला बसवणे, कोणीही स्पर्श न करणे आणि सुतकात पाळली जाणारी बंधनं (जी मला नीटशी/अजिबात माहित नाहीत) त्याची तुलना होऊ शकते काय?
या समारंभांतून नक्की काय साध्य होत असेल या बाबतीतही शंका आहे. त्या मुलीला यातून नक्की काय संदेश मिळत असेल? पाळी सुरू होणे ही चांगली गोष्ट आहे असा? का जबाबदारीची जाणीव (बरं मग ही जबाबदारी मुलग्यांवर नाही का?) का मुक्तसुनीत म्हणतात तसं त्या मुलीला कानकोंडं होत असेल? माझ्या बरोबरीच्या, शहरी वातावरणातल्या अनेक मुलींना पाळी आली त्या वयात कानकोंडं वाटायचं, अगदी आजूबाजूला मुलीच असल्या तरीही. आजही अनेक मुलींना या अडनिड्या वयात काही विचित्र वाटतं असं लक्षात येतं. पण तरीही जर अशा प्रकारच्या संस्कारांमधून (सोहळा हाच एक संस्कार या अर्थी) मुलीला पाळीची लाज वाटणं कमी/बंद होत असेल तर त्याचं स्वागतच आहे.
हा असा सोहळा माझ्या बाबतीत झालेला मला आवडला असता का? नाही. कारण एखाद्या वेगळ्या गोष्टीचा सोहळा होणं ठीक वाटतं. जी गोष्ट जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या बाबतीत होते त्याचा कसला सोहळा करायचा? किंबहुना हे होणं नॉर्मलच आहे असंच काही त्या वयात आईने मला शिकवल्यामुळे हे काही वेगळं होत आहे असं मला कधीच वाटलं नाही; वेगळं म्हणजे ना चांगलं ना वाईट. उत्सव, सोहोळा साजरा करायचा असेल तर मुहूर्ताची वाट बघण्यापेक्षा सुटी-सवडीचा विचार महत्त्वाचा असं मला वाटतं; उदा मंगळागौर कालबाह्य वाटते, पण त्याच गोष्टी शुक्रवार किंवा शनिवारी करायच्या ठरवल्या तर मी त्यात सहभागी होईनही. माझ्या पालकांची आणि माझीही साधारण मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू कौटुंबिक पार्श्वभूमी याचा या विचारांत हातभार असावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
थोडा असहमत
प्रतिसाद थोडा भरकटल्यासारखा वाटला.
जी गोष्ट जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या बाबतीत होते त्याचा कसला सोहळा करायचा?
जी गोष्ट जवळपास सगळ्या लोकसंख्येच्या बाबतीत होते अशा अनेक गोष्टींचा जगभर सोहळा केला जातो. उदाहरणार्थ (स्वतःचा) जन्म, नामकरण, लग्न, अपत्यजन्म. वयात येणं या बाबतीत मुलींसाठी एक बोट ठेवता येण्यासारखी घटना असते. एक सुस्पष्ट फेज ट्रांझिशन पॉइंट असतो. मुलांसाठी असा एक क्षण नसतो, एक दिवस नसतो. मिसरूड फुटते, वडिलांच्या चपला कधीतरी मुलाच्या पायाला यायला लागतात हे जाणवतं. त्यामुळे जर प्रस्थापित व्यवस्थेत सोहळा करण्याची पद्धत असली तर तीमधून अनुभवी आप्त स्त्रिया, मैत्रिणींशी भेटी होतात. त्या दिवसात त्या विशिष्ट विषयावर चर्चा होण्याची संधी होते. हे जे आहे ते काही विशेष नाही, काळजी करण्यासारखं नाही हे बिंबवण्याची सोय होते.
प्रत्येक पाळीमागे एक ओव्हम फुकट गेलं असा काही विचार, जो ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांमधे होतो/व्हायचा, भारतात व्हायचा का नाही याबद्दल मला कल्पना नाही. पण तसं असल्यास "यापुढे पाळी जाईपर्यंत मुलीवर मनुष्यवधाचा आरोप आहे" असा काहीसा विचारही असू शकतो.
असा विचार होत असावा, निदान काही समाजांमध्ये तरी. भैरप्पांच्या 'पर्व' कादंबरीतली पात्रं असे उल्लेख करतात. (भैरप्पांनी समाजशास्त्रीय अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं म्हणून मी हे मानतो आहे. चुभूद्याघ्या.) तरीही मनुष्यवधाचा आरोप वगैरे ताणल्यासारखं वाटतं. स्त्री हे क्षेत्र असल्याने त्यात बीजारोपण व्हावं याची संपूर्ण जबाबदारी प्रथम पित्याची लग्न लावून देण्याची, व लग्नानंतर पतीची असायची. मनुष्यवधाचा आरोप केला तर स्त्रीला त्याबाबतचं स्वातंत्र्य असल्याची कबुली नाही का दिली जाणार?
मूळ लेख आवडला. जीव थोडा लहान झाला आहे हे खरं आहे. पण निदान त्या निमित्ताने जरा व्यापक चर्चा तरी झाली.
प्रतिसाद भरकटल्याचा आरोप
प्रतिसाद भरकटल्याचा आरोप मान्य आहे.
या गोष्टींत (जन्म, नामकरण, लग्न) आणि पाळी येणे (+मृत्यु) या दोन गोष्टींमधे फरक आहे. जन्म देण, नामकरण आणि लग्न या गोष्टींना पर्याय आहे, निदान हो किंवा नाही एवढातरी आहेच आहे. स्वतःच्या जन्माचा पर्याय नसला तरीही जन्माला आल्या-आल्या सोहोळा आपण स्वतः करत नाही. वाढदिवस हा किंचित अपवाद आहे. स्त्रियांच्या बाबतीत पाळी येणे (आणि नंतर ती जाणे) आणि सर्व सजीवांच्या बाबतीत मृत्यु या दोन गोष्टींना पर्याय नाही, या गोष्टी होणारच. त्यामुळे ही तुलना पटत नाही.
घरातून असा विचार देणं शक्य नसेल तर हा पर्याय मला मान्य आहे. लैंगिकतेच्या बाबतीत, मुलग्यांचे वीर्यपतन या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं जात नाही. काळजी न घेतल्यास मुली, स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट उघडपणे दिसते आणि त्याला संबंधित एक सोशल स्टिग्मा आहे म्हणूनही "यात काही फार वेगळं होत नाही" हा विचार मुलीला, विशेषतः त्या वयात मिळावा असं मला वाटतं.
काही भयंकर होत आहे यापेक्षा काही चांगलं होत आहे असा विचार देणं जास्त श्रेयस्कर आहे हे मान्यच.
हे फार वर्षांपूर्वी रसलच्या कोणत्यातरी पुस्तकात वाचलेलं आहे, माझा विचार नाही हे निश्चित. तो संदर्भ एकूण स्त्रियांचं स्थान खालचं का अशा प्रकारच्या विवेचनाचा होता.*
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जन्म देण, नामकरण आणि लग्न या
जन्म देण, नामकरण आणि लग्न या गोष्टींना पर्याय आहे, निदान हो किंवा नाही एवढातरी आहेच आहे.
पर्याय असण्याचा संबंध कळला नाही. लग्न न करण्याचा पर्याय असतोच, पण लग्न करण्याचा पर्याय स्वीकारतात त्यांच्याविषयीच बोलणं मर्यादित आहे. तेच जन्म देण्याविषयी. आपल्या मुलाचं नामकरण याला पर्याय आहे असं मलातरी वाटत नाही. तसंच इतर अनेक पर्याय नसलेल्या गोष्टींचेही आपण सोहळे करतो. सुगीनंतर मोठा सण असणं हे अनेक संस्कृतींमधून दिसून येतं. आणि सोहळा हा शब्द व्यापक करून कर्मकांडं किंवा रिच्युअल असे शब्द वापरले तर घरात घडलेला मृत्यू अनेक संस्कृतींत आपापली कर्मकांडं घेऊन येतो. या समाजमान्य रीतींचा उद्देश थोड्याफार प्रमाणात त्या त्या प्रसंगाचं गांभीर्य पाळण्यासाठीच असतो.
घरातून असा विचार देणं शक्य नसेल तर हा पर्याय मला मान्य आहे.
घरातून विचार देणं म्हणजे काय? प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला ज्ञान देण्याची प्रथा (समाजाने काहीशी लादलेली) असणं किंवा प्रत्येक पालक तितपत सुजाण असणं. जर सुजाण पालकत्व ही गृहित धरण्याइतकी सहज उपलब्ध गोष्ट नसेल तर ती प्रथाच बनवायला हवी. म्हणजे मुलांना चालायला पालक शिकवतील हे गृहितक रास्त आहे. पण लिहा वाचायला शिकवण्यासाठी समाजाला शाळा बनवाव्या लागतात व शाळांमध्ये मुलांना (व मुलींना) घालण्याची सक्ती करावी लागते. तशीच काहीशी सक्ती या सामाजिक प्रथेमधून होते. हेच घरातून विचार मिळण्याची समाजातर्फे खात्री करणं.
मनुष्यवधाचा आरोप ही कविकल्पना वाटते. वध करण्याचा आरोप करता येण्यासाठी वध टाळण्याची क्षमता देणं भाग असतं. आणि तो अधिकार पुरुषप्रधान संस्कृती कधीच देत नाही.
अनुभव
मुलगी 'मोठी' होणे (पेद्दा म्हणजे मोठा/ठी/ठे) हा 'समारंभ' साजरा होताना मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला कसेसेच झाले होते.
घरासमोरील रस्त्यावर मांडव आणि स्टेज घालून, लाऊडस्पिकर लावून एखादे लग्न असावे तसा हा कार्यक्रम चालला होता. स्टेजवर दांपत्य बसलेले असावे असे
वाटून मी पाहिले तर एक लहानशी मुलगी स्टेजवरच्या 'सिंहासनावर' बसली होती. (तीच हाफ सारी वगैरे...)
त्यावेळी असा काही प्रकार उघडणे साजरा केला जातो याची काहीच कल्पना नव्हती. आमच्या वामांगाने आम्हाला ती माहिती पुरवली.
पुढे असे लक्षात आले की जातींच्या उतरंडीप्रमाणे गाजावाजा करून ही रूढी पाळली जाते. जात जितकी वर तितका बोभाटा कमी. पण तरीही अनेक सुशिक्षित, उच्चवर्गीय
घरांमध्ये हा 'समारंभ' केला जातो. तो प्रकार शेजार्यांकडे झाला आणि मग आमच्याच एका कानडी-तेलुगु नातेवाईकांकडे झाला तेव्हा मात्र मी थक्क झालो.
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात हा समारंभ केला जातो. आपली मुलगी वयात आली - तिचे लग्नाचे वय झाले - ती आई होण्याच्या क्षमतेची आहे
या सार्या विचारांचा त्यात समावेश असावा. पूर्वी महाराष्ट्रात हे होत असे. ‘सीताबाई चाफेकळीला नहाण आलं’ हा मखरातला प्रकार तर वर दिलेलाच आहे.
पण जे होत आहे ते काही विचित्र नाही - नैसर्गिकच आहे (कदाचित आनंदाचं/अभिमानाचं आहे) असं त्या मुलीला वाटावं असाही विचार त्यात असेल.
विचारशुचितेच्या महाराष्ट्रीय पद्धतीमुळे मुलींना हे नहाण येणं विचित्र-भितीदायक वाटण्याचा संभव असावा.
थोडक्यात, हे तेलुगु संकेतस्थळ असते तर या विषयावर काही चर्चाच झाली नसती इतके ते इथे नित्यनैमित्त्यिक आहे.
उत्सवाचं स्वरूप
या चर्चेत मी अनेक प्रतिसाद दिले आहेत परंतु प्रत्येक प्रतिसादात मला उत्सवाचे स्वरूप मान्य नसल्याचे सांगितले आहे. या उत्सवातून मुलीला दिलासा मिळू शकतो असे अनेकांनी म्हटले आहे पण अगदी तसेच होत असेल का? होत असेलही किंवा नसेलही. कदाचित यावेळी तिला घरातील मोठ्या बायका तिने या दिवसांत कसे इतरांना शिवू नये, लांब रहावे, वेगळे बसावे, देवाधर्माच्या कार्यात भाग घेऊ नये किंवा अशा दिवसांत तिची मासिक पाळी आल्यास देवाधर्माचा नियम चुकून त्याचं खापर तिच्या माथी फोडलं जाऊ शकेल अशी सुचवणीही करत असतील. अशा उत्सवांना धार्मिक स्वरूप असेल तर आपण सर्व धार्मिक विधी पाळण्यात कसर करत नाही हे दाखवण्यात बायकांचे प्रमाण मोठे असावे.
अशा प्रसंगांचे स्वरूप बदलायला हवे असे मला आवर्जून वाटते. १३-१४ वर्षांच्या मुली अगदीच लहान नसतात. त्यांच्यापेक्षा लहान वयांच्या मुलांना त्यांच्या वाढदिवशी कोणाला बोलवायचे हे विचारले जाते तर मग अशावेळी मुलींना विचारून त्यांना हा दिवस कसा साजरा करायचा ते का विचारू नये? या दिवशी काही वेगळे घडत नाही हे सांगताना या मुलींना -
- त्यांच्या घरातील थोड्या मोठ्या मुलींना, बहिणींना किंवा मैत्रिणींना बोलवून दिवस साजरा करणे. उत्सवाचे निमित्त माहित असल्याने मुली आपले अनुभव शेअर करतील. हे करताना मुलीला आवडणार्या किंवा कम्फर्टेबल वाटेल अशा घरातील मोठ्या बायांनाही बोलावता येईल. जसे, आजी, आत्या, मामी, काकी.
- त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवावा. यात चित्रपट, पार्टी, जेवण इ. करता येईल
- मुलींना घेऊन आवर्जून देवळात जावे. (हे नास्तिकांना लागू होईल असे नाही परंतु विवेकी आस्तिकांनी तरी करावे.) मुलीच्या हातून तिच्या आयुष्यात झालेल्या महत्त्वाच्या या वाढीमुळे जर देवाला फुल वाहण्याची, पूजा करण्याची इच्छा असेल तर ते करू द्यावे.
या खेरीजही इतर गोष्टींनी त्यांना कम्फर्टेबल करता येईल. त्यासाठी हाफ सारी, सिंहासने आणि गर्दीची गरज असेलच असे नाही.
महाराष्ट्रीय विचार
सांस्कृतिक संक्रमणाच्या काळात महाराष्ट्रीय (आणि बंगाली) लोकांनी पाश्चात्य विद्यार्जनाबरोबरच स्वकीय समाजसुधारणेवर भर दिला. पण महाराष्ट्राच्या दक्षिणेस असलेल्या भागामध्ये बहुतांश उच्चवर्गीयांनी आपला रोख विद्याग्रहणावरच केंद्रित केला. त्यामुळे समाज सुधारणा फारशी रुजली नाही.
महाराष्ट्रीय लोकांना (माझ्यासकट) या उत्सवाचे स्वरूप (पक्षी असला काही समारंभच) मान्य नाही हे स्वाभाविकच आहे. परंतु दक्षिणेकडील भागात तशी वेळ येण्यास अजून बराच कालावधी जावा लागेल.त्या समारंभासकट धार्मिक रूढींचे कठोर पालन अजूनही येथे होताना दिसते आणि इथले लोक त्यात धन्यता मानतात.
(खोडसाळ -१: 'विवेकी अस्तिक'(?!!) ;))
अशा चालीरीती आपल्याकडेदेखील
अशा चालीरीती आपल्याकडेदेखील होत्या
२२ जून चित्रपटात अशा प्रसंगा बद्दलेक गाणे देखील आहे
सीता बाईला चाफेकळीला नहाण आलं
पहिले नहाणं आले सासू वाटीते बत्तासे.
सीताबाईला चाफेकळीला....
अशा चालीरीती आपल्याकडेदेखील होत्या
सगळीकडेच आहेत..
Débutante हा शब्द व त्याची माहिती इथे बघा..
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
देब्युताँत आणि ग्रँड टुअर
देब्युताँत पद्धतीचा उल्लेख आडकित्ता ह्यांनी केलाच आहे. माझ्या समजुतीप्रमाणे ही पद्धत अमेरिकेत न्यूयॉर्कसारख्या शहरातील गर्भश्रीमंतांच्या चालींपैकी आहे. इंग्लंडमध्ये ह्यालाच being presented at Court म्हणत असत. सध्या ही पद्धत कितपत वापरात आहे ते सांगता येत नाही पण १९२०-३० पर्यंत ती चांगलीच जिवंत होती. खास भरवलेल्या दरबारात प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रिया आपल्या भाच्या-पुतण्या अशा उपवर मुलींना राजाराणीसमोरे formally present करीत असत आणि त्यानंतर ती मुलगी दुसर्या स्त्री chaperone शिवाय समाजातील मेजवान्या-नृत्य ह्यांची निमन्त्रणे स्वीकारू शके. 'डाउनटन अॅबी' ह्या खानदानी ब्रिटिश समाजाचे चित्रण दाखविणार्या मालिकेत असा एक दरबार दाखविला आहे.
तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुणतरुणींना Grand Tour वर पाठविण्याचाहि अशा कुटुंबातून प्रघात होता. Grand Tour म्हणजे फ्रान्स, इटली अशा समृद्ध संस्कृति असलेल्या देशांमधून काही काळ प्रवास. आवश्यक ती 'सांस्कृतिक झिलई' अशा तरुणतरुणींना मिळावी हा त्यामागे हेतु असे. अमेरिकेत पैसा मुबलक पण सांस्कृतिक बाबीत आपण जरा कमी पडतो अशी जाणीव. त्याचा परिणाम म्हणजे साबणाच्या, टूथपेस्टच्या किंवा तसल्याच कसल्या साम्राज्याचे मालक असलेले श्रीमंत बाप भरपूर allowance देऊन आपल्या अपत्यांना अशा Grand Tour वर पाठवीत असत.
The Talented Mr. Ripley ह्या चित्रपटाची कथा अशा Grand Tour भोवती गुंफलेली आहे.
Grand Tour ची अधिक माहिती येथे पहा.
थ्यांक्स
युरोट्रिप नामक सिनेमात काही बाबींची थट्ता केली गेली होती हे जाणवत होतं संवादातून.
नेमकं काय आहे हे ठौक नव्हतं.
आत्ता पत्ता. लागला. काही दृश्ये त्यातली पुन्हा पाहिली.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars