काकूंच्या क्लिनरची करामत

काकूंच्या क्लिनरची करामत
---------------------------------------------------------------------------------------

एकेक दिवस काय बोअर असतो ना !....
आज रविवार होता. सुट्टीच्या दिवशी सकाळी काय करावं कळतच नाही. मला पोहे खायचे नव्हते. त्यासाठी आईची बोलणी मात्र खाल्ली होती. मला अभ्यास करायचा नव्हता. कार्टून्स बघायची नव्हती. अंगणात नुसतं उभं तरी किती वेळ राहायचं ?
खरं म्हणजे- मिनी अजून बाहेर आली नव्हती. घरात बसून काय करत असते, कोणास ठाऊक. वेडी कुठली !
तिची वाट बघून कंटाळा आला. शेवटी मीच गेले तिच्याकडे.
काका अंगणात बागेचं काम करत होते. म्हणजे गवतच उपटत होते नुसतं .त्यांचा सोनू कुत्रा आसपास दिसत नव्हता. रंग काळा पण नाव सोनू हां त्याचं .
मी मिनीच्या हॉलमध्ये गेले.माझ्या दोन वेण्या हातांनी गोल गोल फिरवीत .
मिनी एका खुर्चीवर बसली होती. नवा गुलाबी रंगाचा फ्रॉक घालून , आखडून ! कापलेल्या केसांशी चाळा करत .
काकू म्हणाल्या,' टिने, आलीसच का तू ? मस्ती न करता शांत बस गं बाई. मला काम करू दे.'
त्या स्मार्ट आहेत ;पण आहेत त्यापेक्षा जास्तच समजतात . सारख्या डीपी बदलत असतात , वेगवेगळ्या पोझ मध्ये , कपड्यामध्ये , हेअर स्टाईलमध्ये .
काकूंनी फरशी धुवायला काढली होती. मोट्ठी निळी बादली भरून साबणाचं पाणी केलेलं होतं.त्यांनी थोडं पाणी ओतलं व खराट्याने खराखरा फरशी घासायची सुरवात केली. काकूंना असली कामे फार आवडतात . त्या म्हणतात , याने आपण ' स्लिम ' राहतो . खास करून हे वाक्य , त्या माझ्या आईला ऐकवतात . हं .. त्यांचाही खरं आहे म्हणा !
शी ! कित्ती बोअर ! आणि आम्ही तर अडकलोच !
मीही शेजारच्या खुर्चीवर बसले. मग मी डोकं चालवलं.
'ए मिने, समज हे साबणाचं पाणी म्हणजे नदी आहे. या आपल्या खुर्च्या म्हणजे बोटी. त्या आपण चालवू या, मज्जा येईल .'
मी त्या केशरी रंगाच्या खुर्चीवर उभं राहून नाव वल्हवू लागले. माझं पाहून मिनीसुद्धा. त्या नदीतून असा सुवास येत होता . वा ! कुठल्या तरी फुलांचा .
मी माझी नाव जोरात चालवली. मिनीच्या पुढे जाण्यासाठी. ते पाहून मिनी उभी राहिली. तिनेही नाव जोरजोरात वल्हवली. जणू तिने मला हरवलं. मग तिने निशाण फडकावल्यासारखा हात हलवला.
आणि धडाम !.....
निशाण अख्खं नदीत पडलं. म्हणजे मिनी पडली साबणाच्या पाण्यात. तिच्या चेहऱ्यावरून साबणाचा फेस ओघळू लागला. वेडी कुठली ! तिचे कापलेले केस भिजून चप्प बसले तोंडाला . कार्टून !
मी तिला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. पचाक !.....
साबणाचं पाणी मिनीवर व काकुंवर उडालं . कारण मीही मिनिशेजारी सपशेल आडवी झाले होते.
बापरे ! काकू म्हणाल्या व आम्हाला उचलायला भर्रकन पुढे झाल्या. धडाम ! त्याही आडव्या. त्या पडताना ' आई ' म्हणून ओरडल्या. नशीब आमचं ! त्या आमच्या अंगावर पडल्या नाहीत. नाहीतर आम्हा छोट्या बोटींची मोठ्या जहाजामुळे वाटच लागली असती. पडताना त्यांचा हात बादलीला लागला. ती कलंडली. उरलेलं पाणी लोंढ्यासारखं त्यांच्या तोंडावर आलं. त्या ' थू थू ' करू लागल्या.
काकूंची किंचाळी ऐकून काका बाहेरून पळत आले. त्यांना काकूंची फार काळजी असते हां . त्यांना काकूंची करामत माहिती नव्हती.ते आले व घसरले. घसरत घसरत ते समोरच्या भिंतीवर जाऊन आदळले. त्यांचं टाळकं शेकलं. ते ' आ ' करून ओरडले व पाण्यात पडले. जणू एखादा बनियन घातलेला डोंगरकडा ! काका कसले आहेत , तुम्हाला माहित नाहीत .
त्यांच्या मातीच्या हाताचे शिक्के समोरच्या भिंतीवर उमटले. पडल्यावर, फरशीवरही माती झाली. आणि त्यांच्या पांढऱ्या बनियन वरही . काकूंच्या स्वच्छतेची पार वाट लागली.
मला हसू यायला लागलं आणि मिनीलाही.
काकांच्या आवाजाने किचनमधून पोळ्या करणाऱ्या रखमाबाई बाहेर आल्या. त्यांना काका दिसलेच नाहीत. हो ना ! एवढा मोठा माणूस फरशीवर कशाला पोहत बसेल ? ...
त्यांचा पाय काकांच्या पाठीवर पडला. ते ' आं ' करून ओरडले. मालकांच्या पाठीवर पाय दिल्याने रखमाबाई दचकल्या , घाबरल्या व घसरल्या . धडाम ! त्याही आडव्या. त्या इतक्या वाळक्या आहेत ना , की त्या तशाही कधीही पडू शकतात .
आम्ही दोघी उठून बसलो. आता मात्र हसू आवरेनासं झालं होतं.
काकू रागावल्या. त्या उठून बसल्या. त्यांना मिनीला रागवायचं होतं. पण रागात त्या म्हणाल्या, ' सोने ...'.
ही तर काकूंची हाक होती . तीही लाडाची . मग काय ?
त्या हाकेसरशी बाहेरून सोनू कुत्रा पळत आला . वेगात ! तोही साबणाच्या पाण्यावरून घसरला. घसरत , घसरत तो उठण्याचा प्रयत्न करणाऱ्या काकांच्या अंगावर आदळला . त्यामुळे काका पुन्हा भिंतीवर. त्यांचं टाळकं पुन्हा शेकलं.
ते पाहून हसू थांबेचना. गाल जाम दुखायला लागले.
काका रागवले. सोनूला ओरडले. तो घसरत काकूंच्या जवळ गेला. त्याने त्याच अंग थराथरा झटकलं. साबणाचं पाणी काकूंच्या तोंडावर उडालं. त्या पुन्हा ' थू थू ' करू लागल्या.
मग मी डोकं चालवलं . मी खुर्चीला धरून उभी राहिले. मग मिनी. आम्ही खुर्ची धरून, ती सरकवत बाहेर आलो. अंगणात उभं राहून, आतमध्ये पाहून, आम्हाला राहून राहून हसू येत होतं.
काका उठले. त्यांनी सोनूला रट्टा दिला. तो बाहेर पळाला. मग ते काकूंकडे वळाले. ' काय गं , किती क्लिनर ओतून ठेवलंयस ! ' असं म्हणत ते काकूंना उचलायला खाली वाकले. आणि धडाम !
काकूंनी नवीन फ्लोअर क्लीनर आणलं होतं. त्याचं पाणी बनवताना त्यांचा अंदाज चुकला होता. सगळी फरशी बुळबुळीत झाली होती.
काका खाली पडले. पण एकटेच नाहीत. त्यांच्या धक्क्याने उठून पाण्यात बसलेल्या काकू आणि रखमाबाई दोघी पुन्हा आडव्या झाल्या.
पडल्या-पडल्या त्यांनाही हसू यायला लागलं.
मग आम्हाला किती हसू आलं असेल ?...
हसून हसून पोटच दुखायला लागलं. मी तर वेण्या गोल गोल फिरवायचही विसरले .
पण-
एकेक दिवस काय धम्माल असतो ना !.....
---------------------------------------------------------------------------------------

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कहानी किस्मत की...
किस्सा कुर्सी का...
केकता क्कपूर...

(मथळा वाचून अगोदर वाटले, की काकू ट्रकड्रायव्हर असून त्यांच्या क्लीनरने काही करामत केली असेल, म्हणून. पण आत काही भलतेच निघाले. असो चालायचेच. आमचे नशीब, दुसरे काय?)

(अवांतर: खरडफळ्यावरचा हत्ती चावला काय? की प्रस्तुत कहाणीलेखकच खरडफळ्यावरचा हत्ती आहे?)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तळटीपा:

हा/ही१अ नक्की का असतो/ते?

१अ काकू जर ट्रकड्रायव्हर असू शकतात, तर त्यांच्या क्लीनरनेच बाई का असू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हो, सांगायचे राहूनच गेले. गोष्ट फॉरअचेंज अगदीच वाईट नाही. बरी आहे. सगळेजण घसरून पडतात. मज्जाच मज्जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच मजा आहे. आम्ही पाचवीत चांदोबा वाचायचो. मग ठकठक. किशोर कंटाळवाणे वाटायचे. कुणाकडे दादरला गेलेलो. तो मुलगा म्हणाला ठकठकचे काका बाजुच्या बिल्डिंगमध्ये राहतात. महिन्याचे पुस्तक विकायला बाहेर येण्याअगोदरच देतात. काय धमाल. घसरून पडणे वगैरे नसलेले विनोद हे विनोदच नसतात. फार मजेदार लिहिलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरुत्वाकर्षणाचा नियम फुल्ल फॉर्मात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालकथा म्हणुन मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदरीत असं झालं तर .. बरय

पण मलाही वाटल की काकुंचा ट्रक असावा, आणि त्यांच्या क्लीनरची काही कमाल असावी. जरा वेगळेच वाटले. काकु आणि ट्रक ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

काकु आणि ट्रक ?

१८-चाकी, अगडबंब.

आमच्या इथे अतितुरळक का होईना, पण काकवा ट्रक चालवताना आढळतात खऱ्या. (मात्र, क्लीनरची प्रथा आहे किंवा कसे, कल्पना नाही/ऐकलेले नाही. तसेही, क्लीनरचे नेमके प्रयोजन काय असते, हे अद्याप कळलेले नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचकांचा आभारी आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0