⭐️⭐️वारसा प्रेमाचा - आजोबा-नातवाचं हृद्य नातं! ⭐️⭐️

Warasa Premacha Book Cover

‘गंगेमध्ये गगन वितळले’ ह्या अंबरीश मिश्र ह्यांच्या पुस्तकामुळे ‘म. गांधी - व्यक्ती, माणूस’ असं कुतूहल पहिल्यांदाच निर्माण झालं. त्यानंतर आता हे दुसरं पुस्तक, ज्यामुळे त्यांचा अधिक जवळून, थेट परिचय घडला...

वारसा प्रेमाचा - अरुण गांधी - अनुवाद: सोनाली नवांगुळ - साधना प्रकाशन - पहिली आवृत्ती: ५ जानेवारी २०१९ - पृष्ठे: १२० - किंमत: रु. १२५/-

⭐️⭐️वारसा प्रेमाचा - आजोबा-नातवाचं हृद्य नातं! ⭐️⭐️

महात्मा गांधींसारख्या जगप्रसिध्द व्यक्तींची ओळख होते ती त्यांच्या आत्मचरित्रातून आणि चरित्रांतून. चरित्र लेखकांना भेटलेल्या त्या-त्या वेळच्या त्या व्यक्तीचे त्यांच्या नजरेतून झालेले दर्शन विविधांगी असते. महात्मा गांधींच्या बाबतीत मात्र हे दर्शन पुरेसं ठरत नाही. त्यांच्या विचारांची ओळख घडल्याशिवाय त्याला परिपूर्णता येत नाही. ते समजून घ्यायचे असतील तर काही काळ त्यांच्या निगराणीखाली असलेल्या त्यांच्या नातवाशिवाय दुसरी सुयोग्य व्यक्ती कोण असू शकते? ह्या पुस्तकात वैयक्तिक, कौटुंबिक अनुभव आहेत. तसेच महात्मा गांधींना आत्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण वाटणारे विषय जसे की, जाणतेपण आणि महिला, धार्मिक श्रध्दा आणि मुक्ती, वंशवाद आणि सूड, मानवता, भौतिकवाद आणि नैतिकता, अहिंसाविषयक नोंदी ह्यांचाही समावेश आहे.
आजचं राजकीय वातावरण पाहताना, त्यावरच्या चर्चा ऐकताना जाणवते की गांधीवादातला समंजसपणा आणि अहिंसकपणा, आजचे राजकारणी आणि त्यांचा अभिमानाने वारसा सांगणारे आपण, सगळेच विसरून गेलो आहोत की काय! विशेषतः या संदर्भातही हे पुस्तक विशेष अर्थपूर्ण ठरते.

मणिलाल आणि सुशीला, महात्मा गांधींचे द्वितीय पुत्र आणि स्नुषा, ह्यांचे चिरंजीव म्हणजे अरुण गांधी जे आज ८५ वर्षांचे आहेत. आपल्या उमलत्या वयात लाभलेल्या आजोबांच्या सहवासाविषयी अरूण गांधींना ‘त्यांचा नातू’ म्हणून लिहावे की नाही हा संभ्रम पडला होता. ह्या नात्याचं भांडवल त्यांच्या अपरोक्ष केलं गेल्याने नातेवाईकांकडून अनुभवाला आलेला रोष त्याला कारणीभूत ठरला. मात्र एका टप्प्यावर त्यांना आईचे बोल आठवले आणि पूर्ण विचारांती त्यांनी आपल्या आजोबांकडून घेतलेले जगण्याचे धडे इतरांसोबत वाटून घेण्याचं ठरवलं. ‘लिगसी ऑफ लव्ह’ हे इंग्रजी पुस्तक २००३ साली प्रकाशित झालं. सोनाली नवांगुळ यांनी गांधीजींची विचारसरणी सखोल समजून घेत केलेल्या उत्तम अनुवादाने हे पुस्तक मूळ मराठीतच लिहिलं गेलंय असं वाटतं.

१८९३ मध्ये महात्मा गांधींनी पहिल्यांदा द. अफ्रिकेत प्रवेश केला तेव्हा अनुभवलेल्या वर्णद्वेषाच्या घटनेने पुस्तकाची सुरूवात होते. त्यानंतरही तिथल्या मुक्कामात गैरसमजातून त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. पण त्या प्रत्येकवेळी ‘जशास तसे’ न वागता ह्या सगळ्या प्रसंगांमधून महात्मा गांधींनी अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची भूमिका निश्चित केली. माणसाच्या मनातील राग-संताप ह्या भावनेचा उपयोग विध्वंसक मार्गाने न करता एक रचनात्मक ताकद म्हणून करता येऊ शकतो हे आपल्या वागण्यातून सिद्ध केलं. ते वाचल्यानंतर `कुरापती आणि संघर्ष वाढवण्यापेक्षा मनाच्या जखमा कायमच्या बऱ्या होतील असे पर्याय आपण नक्की शोधू शकतो' हा विश्वास लेखकाप्रमाणे आपल्याही मनात निर्माण होतो.

द. अफ्रिकेतल्या वर्णद्वेषाची झळ लेखकाला वयाच्या दहाव्या वर्षी बसली. दोन प्रसंगांत केवळ काळ्या वर्णाचा म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली, तीही काही किशोरवयीन गोर्‍या मुलांकडून आणि दर्बनमधल्या काळ्या अफ्रिकन तरुणांच्या टोळीकडून. ह्या कटु आठवणी त्यांच्या मनाला कायम वेदना देत राहिल्या. त्याचा परिणाम म्हणजे पुढच्या आयुष्यात इतरांना येणार्‍या अशा अनुभवांबाबत लेखक अधिक संवेदनशील बनले.
लहान वयात मात्र `झालेल्या अपमानाचा सूड घ्यायचा' ह्या भावनेने त्यांना घेरलं. त्यांच्यातील संताप आणि तिरस्कार ह्याला आवर घालण्यासाठी लेखकाच्या आई-वडिलांनी त्यांना आजोबांकडे भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात वयाच्या बाराव्या वर्षी लेखकाने तिथे पहिल्यांदाच आपली धाकटी बहिण इलासोबत प्रवेश केला. ते दोघं आजोबांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले. लेखक म्हणतात, `आजोबांनी मात्र चरणस्पर्श करू देण्याऐवजी आम्हां दोघांना छातीशी कवटाळलं आणि आमचे प्रेमभराने पापे घेतले.' जगासाठी महात्मा असलेली व्यक्ती आपल्या नातवंडांच्या बाबतीत सुकोमल होती तशीच कठोरही होती ह्याचे किस्से वाचताना कधी हसू फुटतं तर कधी डोळे पाणावतात.

सेवाग्राममधील पहिला आठवडा ह्या दोघा भावंडांसाठी अत्यंत त्रासदायक ठरला. दररोज सकाळ-संध्याकाळ भाकरी आणि तिखट-मीठ-मसाला न घातलेले उकडलेले दुधी भोपळ्याचे तुकडे खाऊन कंटाळलेली पाच वर्षांची इला थेट आजोबांसमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, ‘बापूजी आम्ही आल्यापासून इथल्या आश्रमाची सेवा पाहिलीच नाही, पण रोज कोला (दुधी भोपळा) खातोय. म्हणून तुम्ही सेवाग्रामऐवजी कोलाग्राम असं आश्रमाचं नाव ठेवायला पाहिजे.’
हे ऐकल्यावर गांधींजींनी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि तिच्या ह्या म्हणण्याचं कारण समजून घेतलं. चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्या शेतात दुधी भोपळ्याचीच लागवड केली गेली आहे. दुसर्‍या दिवशी आश्रमाच्या बैलगाड्यांतून सगळे भोपळे शेजारच्या खेड्यांतील बाजारात नेऊन त्यांच्या बदली दुसर्‍या भाज्या घेतल्या गेल्या.
लेखकाच्या मनात खदखदत असलेल्या संतापाची कल्पना गांधींजींना होती. त्याचा वापर शहाणपणानं कसा करायचा याचे धडे निरनिराळ्या गोष्टी सांगून दिले. ते म्हणाले, ‘आपण एखाद्या गोष्टीकडे जसं बघतो, त्याच्यापेक्षा इतरांचे त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे असू शकतात. ते कधी बरोबर असतात, तर कधी चूक! कोणतीही गोष्ट समोर आल्यावर शांत राहून तिचं मूल्यमापन करण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित करायला हवी. हे करता आलं तर आपण आक्रमक होत नाही.’
आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातला एक तास बापूजी नातवासाठी, त्याच्याबरोबर संवाद करण्यासाठी देत असत. लेखक म्हणतात, ‘मला जीवनाचे धडे देण्यासाठी वेळ देणं ही बापूजींसाठी अग्रक्रमाची बाब होती.’ बापूजींकडून स्वयंशिस्त, आत्मसंयमन ह्यांचे धडे नातवाला निरनिराळ्या प्रसंगांतून कसे मिळत गेले हे सोदाहरण वाचणं वाचकांसाठीदेखील आदर्श वस्तुपाठ ठरतं.

मुलं जेव्हा चुकीची वागतात तेव्हा त्याची जबाबदारी पालकांनी स्वीकारून त्याचं प्रायश्चित्त घेणं म्हणजे मुलांना सकारात्मक पध्दतीने वाढवणं असं गांधीजी मानत.
पुण्याच्या एका मुक्कामात एकदा पं. जवाहरलाल नेहरू आलेले होते व त्यांच्यासोबत सकाळची न्याहारी करण्याचा प्रसंग आला. लेखकाने निरागसपणाने ऐटीत त्यांना सांगितलं की तुम्ही जे खाल तेच मीही खाईन. नेहरूंनी त्यांना आपण अंड्याचं आम्लेट खाणार आहोत आणि तुलाही ते खायचं असेल तर आजोबांची परवानगी घेऊन ये असं सांगितलं. त्यावेळी बापूजी आणि सरदार वल्लभभाई पटेल काही महत्त्वाच्या चर्चेत गुंतले होते. म्हणून गांधीजींनी विचारलं की यापूर्वी अंडं खाल्लं आहे का तर त्यावर लेखकाने होय असं उत्तर दिलं. काही महिन्यांनंतर आई-वडिलांनी आपण मुलाला कधीही अंडं न दिल्याचं गांधीजींना सांगितल्यावर पेच निर्माण झाला की खरं काय आहे. लेखकाने आयत्यावेळी अत्यंत हुशारीने दिलेल्या उत्तराने आजोबांच्या दंतविहीन चेहर्‍यावर हसू आलं. हा प्रसंग वाचताना आपल्यालाही आधी खुदकन हसायला येतं आणि पुढच्याच क्षणाला धक्काही बसतो. कारण, जर का आजोबांशी खोटं बोलल्याचं सिध्द झालं तर प्रायश्चित्त म्हणून आजोबाच उपोषणाला बसतील की काय अशी धास्ती लेखकाच्या आई-वडिलांच्या मनात निर्माण झाली होती.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील फोटोतला छोटा मुलगा म्हणजे लेखक अरुण गांधी आहेत. फोटो निरखून बघताना लक्षात येतं की बापूजींचा डावा हात आपल्या ह्या अल्लड-खोडकर वयातल्या नातवाच्या गालावर आहे. इतर आश्रमवासीयदेखील कौतुकाने ह्या जोडीकडे बघताहेत. आजोबा-नातवाच्या नात्यातील प्रेमळ बंध छान व्यक्त करणारं समर्पक मुखपृष्ठ गिरीश सहस्त्रबुध्दे यांनी कल्पकतेने योजलं आहे.

आज माणसाच्या रोजच्या जगण्यातील कितीतरी गोष्टी आमूलाग्र बदलल्या आहेत. कमालीचे व्यक्तीस्वातंत्र्य, बदलते-तुटक नातेसंबंध, टोकाचा आत्मसन्मान इ. ह्या सगळ्यासह तो कसा जगतोय? तंत्रज्ञानाच्या किमयेने एका क्लिकसरशी दिसणाऱ्या जगाच्या पसार्‍यात हरवलेला आणि ‘असून नसल्याच्या’ जाणीवेने भेदरलेला! ‘माझं जे बाह्यरुप बाळगतोय तसाच मी आतूनही आहे का? माझ्या मनातले संताप जर जसेच्या तसे बाहेर आले तर संघर्ष वाढेल, चिघळेल. हे टाळण्यासाठी मी गप्प राहतो परंतु आतल्या आत धुमसतो.’ अशा सजगतेनेही निर्माण होणार्‍या तणावपूर्ण मन:स्थितीत स्वत:ला सांभाळता येण्याची वाट प्रेम, आदर, समंजसपणा, स्वीकार आणि चांगुलपणाला दिलखुलास दाद ह्या महात्मा गांधींनी आधारभूत मानलेल्या अहिंसेच्या पाच मूलतत्त्वांच्या सखोल अभ्यासातून जाते हेच ह्या पुस्तकाने दाखवून दिले आहे.

चित्रा राजेंद्र जोशी
पूर्वप्रकाशित: अक्षरधारा - जून २०१९

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम परीक्षण/ओळख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'दृद्य' बोले तो? हा शब्द मला नवीन आहे. मोल्सवर्थातही सापडत नाही.

'दर्द'शी काही संबंध आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

‘हृ’ ऐवजी ‘दृ’ चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आवश्यक बदल केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0