वाडी आणी बरेच काही ..!!

मी बघत राहिले दूर दूर जाणाऱ्या आकृत्यांकडे . आकृत्या.... पुढे त्यांच्या लांब लांब सावल्या उरलेल्या . नंतर जणू त्या सावल्याही लांब लांब जात दिसेनाशा होत गेल्या .सावल्यांच्या मागे धावणे , आकृती रेखाटणे , आणि त्या निरखत बसणे त्यावर कल्पनाविलास रचणे हा तर जीवाला जन्मापासून लागलेला छंद जणू . त्याच आकृती अनेक प्रकारच्या लांब रुंद त्रिकोणी चौकोनी आणि अनेक पदरांच्या आणि म्हणूनच त्यांच्या सावल्याही तशाच बहुरंगी बहुढंगी.कधी थेट पायाखाली लपून बसणार्या कधी तिरप्या तिरप्या होत अलगद नजरेच्या कक्षेपलीकडे लपून बसणाऱ्या तर कधी असता असता न दिसणाऱ्या आणि दिसताना गायब होणार्या . सावल्यांचेही जणू झोके होतात , पहाट ते सकाळ , सकाळ ते दुपार , दुपार ते तिन्ही सांजा आणि पुढे तर गर्द भरत जाणारे निशेचे कवडसे आणि त्या त्या कलाने तशाच बदलत जाणाऱ्या सावल्या आणि त्यांचे हिंदोळे .कधी उत्तुंग आकाशाला भिडणारे तर कधी मोरपिसागत सलगी करणारे , कधी सहज कवेत येणारे तर कधी येता येता निसटणारे झोके ...सावल्या ...आकृत्या ...सगळीच सरमिसळ ..!! *****

सावल्या फिरायच्या , तसतसे आम्हीही फिरायचो .सकाळी कोवळी उन्हं खात बसायचो आणि पुढे त्याच उन्हाशी लपंडाव खेळत बसायचो.दुपारचा वाडीतला मुक्काम म्हणजे आमच्यासाठी एक सोहळाच असे , आनंद सोहळा . सकाळची शिपणं झालेली असायची तो मातीचा गाभारी वास आसमंतात भरून राहायचा. आमच्या आंघोळी आणि न्याहारीचा कार्यक्रम झाला कि दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही वाडीत स्वच्छंद भटकत राहायचो . दूरवर रहाटाचा आवाज वातावरण नादमय करून टाकत असे, मधेच गाई गुरांचे हम्बरणे , भरून राहिलेला चुलाण्याचा खमंग वास आणि माई अण्णा आणि इतर मोठ्यांचे सकाळचे उद्योग चालू असयचे . सुपारीची एखादी गारेगार अळी शोधून आम्ही त्यात नारळाचं किंवा सुपारीच पसरट होडक्यासारखं आसन टाकून बसायचो , कधी एखादे छानसे पुस्तक , कधी चक्क अभ्यासाचे साहित्य आणि बरेचदा गप्पा आणि फक्त गप्पा. मन नुसते थुई थुई नाचत राहायचे पाखरासारखे. उन्हे सरकत जात ,तसे आम्ही ही आमची स्थिती बदलत राहायचो , आणि त्या उन्हांसोबत आमच्या सावल्याही लहान मोठ्या होत सरकत राहायच्या , हाच तो सावल्या निरखण्याचा वेडाबागडा खेळ ,जो पुढे आयुष्यभराचा सखासोबती होऊन राहिला . ******

कसल्या कसल्या गप्पा गोष्टी केल्या असतील आम्ही या वाडीत , मनातील केवढी गुपितं खुली केली होती मैत्रिणींकडे. छोटी छोटी सुख दुख्ख , अगदी बालिश गमतीजमती , त्या वयात खूप अप्रूपाच्या वाटलेल्या खूप आपल्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी अगदी आपुलकीने आणि विश्वासाने एकमेकांना सांगितल्या होत्या इथेच या वाडीत . आम्हा मैत्रिणीमधले किती बंध बांधले होते याच वाडीने. स्वप्नाळलेल्या डोळ्यांची किती झाकोळ स्वप्ने एकमेकींच्या डोळ्यांनी पाहिली होती, दाखवली होती . म्हंटलं तर प्रत्येकीचं जगणं वेगळं होतं तरीही प्रत्येकीचं सारखं जग ही कुठेतरी याच जगण्यात होतं .वय वेडं होतं .मन कातर करणारं , हुरहूर उठवणारं ते भाबडं वय एक होतं म्हणूनच आम्ही एकमेकींना सांगितलेल्या इवल्या इवल्या गोष्टीही खूप काही सामावून होत्या स्वतःमध्ये , काही खूप तरल , हळवं खूप खास . आपल्याला आणि फक्त आपल्याला काही अवर्णनीय दिसलंय , मिळालंय असं वाटण्याचं ते वय होतं . ******

बरेचदा तर काहीच न बोलताही आम्ही एकमेकींशी संवादत राहायचो . हातात हात गुंफून , निर्हेतुक इथे तिथे भटकत राहायचो कधी देवळाच्या पारावर ..कधी वेळूच्या बनात .....कधी आकाश निरखत ...कधी शेताच्या रेषांमधून ..तर कधी मोकळ्या मैदानात ....कधी बकुळी खाली तासंतास बसून राहायचो , तर कधी शांतपणे समुद्राची गाज कानात साठवत राहायचो ...अगदी निर्हेतुक , निःशब्द ...तरीही खूप काही संवादत..!!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)