रिकाम्या जागा अन एक अनुभव

काल दुचाकीवरून जात होते. नेहमीचा रस्ता दुरुस्तीसाठी बंद होता म्हणून थोड्या लांबच्या रस्त्याने जावे लागले. नुकताच विकसित होऊ लागलेला भाग. दोन्ही बाजूला नजर टाकली तर तुरळक बंगले अन बरेचसे रिकामे प्लॉटस. मधल्या रिकाम्या जागांमधून नजर बरीचशी लांबवर पोचत होती. नेहमी रस्त्याच्या दुतर्फा भरगच्च कॉन्क्रीटचे जंगल पहायची अन त्या मर्यादित परिघातच फिरण्याची सवय असलेली नजर अडखळली. ‘लाजते, पुढे सरते, फिरते..’ अशी तिची अवस्था झाली. हल्ली घरे, बंगले, दुकाने, अपार्टमेंटस यांनी शहरांचा, रस्त्यांच्या बाजूंचा इंच अन इंच व्यापलेला. फार दूर पाहायची डोळ्यांची सवय मोडली आहे.
कधीपासून बरं हे सगळं असं झालं आहे ? परवा परवा पर्यंत तर घरांच्या अधे मध्ये जमिनीचे पट्टे व्यापून राहिलेल्या रिकाम्या जागांच्या शॉर्टकट मधून पोरेसोरे, कुत्री, शेळ्या पलीकडच्या रस्त्यांवर जा- ये करीत होत्या. चुकार झुडुपे पावसाळ्यात डोके वर काढीत होती. वारा त्यांच्यामधून पिंगा घालत होता. निरुंद पाउलवाटा गवतफुलांच्या नक्षिदार किनारीसहित त्यातून वळणे घेत होत्या. असंख्य निरुपयोगी, फेकलेल्या वस्तूंनी मध्ये मध्ये ठाण मांडलेले. क्वचित एखादे करडू सावध नजर इकडे तिकडे टाकीत उगीच जराशा उंच वाढलेल्या बाभळीच्या झाडाशी झोंबत असलेले. मधूनच एखादे उंच वारूळ वर तोंड काढून बसलेले. रस्त्यावरून जाता जाता या रिकाम्या तुकड्यावर अंमळ नजर थबकायची. थोडी रेंगाळत विसावायची. जराशी निवांत होऊन मग पावलांबरोबर पुढे चालू लागायची.
अशा, शहरात असूनही काहीशा अलिप्त, आजूबाजूच्या धावत्या जगाची फिकीर नसलेल्या, आपल्याच मस्तीत रमलेल्या रिकाम्या जागांबद्दल मला लहानपणापासून का कोण जाणे, एक वेगळंच आकर्षण आहे. अशाच एका रिकाम्या जागेचा अनुभव मात्र लहानपणी एक वेगळाच ठसा ठेवून गेला.
आमच्या लहानपणी अशा पडीक जागा गावामध्ये बऱ्याच असत. हल्ली दिसतात तसे तिथे कचऱ्याचे ढीग लागलेले नसत. बऱ्यापैकी स्वच्छ असत. आमचे खेळाचे अड्डे तिथे सुट्टी दिवशी अन एरवी शाळा सुटल्यावर लागत असत. कचरा नसला तरी बऱ्याच निरुपयोगी वस्तू तिथे टाकलेल्या असत. त्या म्हणजे आमचे स्पोर्ट्स किट असे. त्यातूनच लगोरी, डबा ऐसपैस, काचा कवड्या अशा खेळांचा श्रीगणेशा होई. ‘कचऱ्यातून कला’ तिथेच साकार होत असे. काचेचे रंगीबेरंगी तुकडे, मणी, रंगीत रीबिनींचे तुकडे, कसल्या कसल्या झाडांच्या बिया, शेंगा, गर्द लाल मखमली गालावर काळाभोर ठिपका ल्यालेल्या गुंजा, वेगेवेगळ्या आकाराचे अन रंगांच्या छटा मिरवणारे लहान मोठे दगड यांचं केवढं तरी कलेक्शन आम्हा मुलींकडे असायचं. काही वेळा पावसाळ्याच्या सरत्या दिवसात रात्री हिरव्या प्रकाशाने चमचमणारे काजवे किडेही सापडत. ते काचेच्या बरणीत भरून रात्री त्यांच्या हिरव्या प्रकाश शलाका न्याहाळण्यात वेळ कसा जाई समजत नसे.
तेव्हा मी दहाएक वर्षाची असेन. वडिलांची बदली एका खेड्यात झालेली. गाव इतका लहान की या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जायला १० मिनिटेसुद्धा लागत नसत. शेवटचे घर ओलांडल्यावर मोठे थोरले रिकामे खडकाळ मैदान किंवा माळरान अन मग नदीचा उतार सुरु होई.. मैदानाच्या मध्यभागी शिवकाळातील एक स्मारक स्तंभ होता. म्हणजे १२ चौ. फुटांचा एक चौथरा अन त्याच्या मधोमध १५ फुट उंचीचा एक स्तंभ. दगडी की धातूचा ते आता आठवत नाही. माळरानाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी भर पावसाळ्यात सुद्धा त्यावर गवताचे पातेदेखील उगवत नसे. मैदानाचा विस्तार संपला होतं तिथून एक खडकाळ रस्ता नदीकडे गेला होता.
मैदानाची ख्याती फारशी बरी नव्हती. मोकळी जागा म्हणून आम्हाला खेळासाठी कुणी तिथे जाऊ देत नसे. अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी कधी नदीला जायचा प्रसंग आला तर तिथे गुलाल माखलेले लिंबू, भाताची टोपली असे काहीबाही पडलेले दिसायचे. सांज करून सहसा कुणी नदीवर जायचे टाळत असत.
उन्हाळ्यात नदीचे पाणी बेताचेच असे. जेमतेम ४ फुट खोल. त्यात मस्ती करायला मजा येई. पण फक्त मुले मुले नदीकडे जायला मोठ्या माणसांची सहसा परवानगी मिळत नसे. सुट्टीच्या दिवशी मात्र सकाळी आवरून मोठया कुणाची तरी पाठ धरून आम्ही मुले नदीकडे पळत असू.
एकदा आम्ही ४-५ मुली अन २-३ मुले असेच नदीवर खेळ अन मस्तीमधे गुंगलो होत. सूर्य डोक्यावर आला तरी आम्हाला भान नव्हते . मग कधीतरी पोटातल्या कावळ्यांनी साद घातल्यावर भान आले अन आमची फौज मैदानाकडची चढण चढू लागली. उन्हात हाशहुश करत चढण चढून आलो अन पाय भेंडाळले. ५ मिनिटे बसावेसे वाटू लागले. पण बसायचे म्हटले तर मैदानातच पाय पसरावे लागणार. त्यापेक्षा चौथऱ्यावर बसलो तर ? मी लगेच ही आयडीया सर्वांना सांगितली. दोघा चौघांनी आढेवेढे घेतले. पण दम तर सर्वांनाच लागलेला. अन घामही निथळत असलेला. त्यातून आता तर भर दुपार. २ मिनिटे बसल्याने काय होणारेय ? असा विचार झाला अन आम्ही पळत पळत येऊन चौथऱ्यावर टेकलो. उंच जागी असल्यामुळे की काय भर दुपारीसुद्धा वाऱ्याचा सांय सांय आवाज येत होता. २-५ म्हणता म्हणता गप्पा मारत चांगली १० मिनिटे झाली. वाऱ्याचा आवाज एकाएकी वाढू लागला. चला रे म्हणत आम्ही उठलो. चौथऱ्यावरून खाली येईतो वारा सुई S करून कानात घुसू लागला. एकाएकी वावटळ उठल्यासारखी झाली. गावाकडचा रस्ता कुठला तेच दिसेना. आम्ही एकमेकांचे हात धरून उभे राहिलो. आता वाऱ्याबरोबर इतरही काही काही आवाज कानात घुसू लागले. रडल्यासारखे, विव्हळल्यासारखे. मधेच कुणीतरी किंचाळल्यासारखे. एकमेकांचे चेहेरे पाहून खात्री झाली की आवाज सर्वांनाच ऐकू येताहेत. भयचकित नजरांनी आम्ही आजूबाजूला पाहू लागलो. रिकामे मैदान. कुणीच नाही. फक्त उन्हात जमिनीतून येत असलेल्या वाफा अन धूळ. वाऱ्यावर उडत असलेल्या धुळीच्या सावल्या माळरानावर पळत होत्या. त्याच जणू आवाज करत असलेल्या. वाऱ्याची लहर अन दिशा बदलेल तसतशी आवाजांची तीव्रताही कमीजास्त होई. एकदा तो कानाशीच आल्यासारखा वाटे तर दुसऱ्या क्षणी दूरवरून येत असल्यासारखा. पळण्याची इच्छा होती पण पायात जड बेड्या घातल्यासारखे पाय जड झालेले. चारी बाजूंनी कुणीतरी आवळून धरले आहे असा भास होत होता. एकमेकांशी बोलण्याचीही भीती वाटू लागली.
असा किती वेळ गेला, ५ मिनिटे की १० काही कळले नाही. एक क्षणभर वारा जरासा पडला. कोलाहल एकदम दूर गेल्यासारखे वाटले. धुळीच्या सावल्या क्षणभर नाहीशा झाल्या. दूर गावाकडे जाणारी पायवाट दिसू लागली. त्यासरशी भीतीची भावना एकदम वर उफाळून आली अन पायात सगळे बळ एकवटून एकमेकांचा हात धरून आम्ही वाटेकडे धूम पळत सुटलो. मैदानाच्या कडेवर पोचलो न पोचलो तोच पुन्हा वाऱ्याचा झोत मैदानात घुसला अन आवाजांचा धिंगाणा सुरु झाला. पण तो आमच्या कानात शिरायच्या आत आम्ही गावकुसात पाउल टाकले होते.
ऐकलेल्या आवाजांबाबत एकमेकांशी बोलून खातरजमा केल्यानंतर असे ठरले की याबाबत मोठया माणसांना न सांगितलेले बरे. नाहीतर नदीवर जायला कायमची बंदी येण्याची शक्यता होती. पण आडून चौकशा करून मैदानात काय प्रकार आहे ते समजून घ्यायचे.
दुसरे दिवशी एकत्र जमल्यावर अर्थात कालचाच विषय. चौकशा करणाऱ्या बहुतेकांच्या तोंडाला दटावणीची पाने पुसली गेलेली. पण एकदोघांना मात्र काही काही समजलेले. त्या मैदानात म्हणे पूर्वी म्हणजे तीनचारशे वर्षांपूर्वी एक लढाई झाली होती. किती एक मेले अन जखमी झाले. जखमींची वास्तपुस्त करायला कुणी शिल्लक राहिले नाही. मेलेल्या सैनिकांना कोल्ह्याकुत्र्यांनी ओढून नेले. तो स्मारक स्तंभ त्या लढाईत मरण पावलेल्यांची स्मृती म्हणून नंतर कुणीतरी उभारला. अन त्या जागेवर ‘वाईट’ असं शिक्का बसला. यापेक्षा जास्त आम्हा मुलांना काही कळू शकले नाही.
त्यानंतर दोनेक महिने आम्ही नदीकडे फिरकलोच नाही. मग शाळा सुरु व्हायच्या बेताला वडिलांच्या केव्हापासून चाललेल्या खटपटीला यश येऊन त्यांची बदली पुन्हा मोठया शहरात झाली अन तो प्रसंग विस्मरणात ढकलला गेला.
पण आता इतक्या वर्षांनी सुद्धा अशी एखादी रिकामी जागा पहिली की तो प्रसंग, तो अनुभव डोळ्यासमोर लख्खपणे उभा राहतो. नेमकं काय झालं असेल तेव्हा त्या रिकाम्या मैदानावर ? चिटपाखरुही आसपास नसताना ते आवाज कुठून ऐकू आले ? भर दुपारी समुद्राला भरती यावी तसे, कोणत्यातरी विशिष्ट पातळीवर आमच्या जाणीवा, आमचे विचार एकत्रितपणे फोकस झाले का ? अन एक वेगळी मिती आमच्या कानांना खुली झाली ? की थोडेसे श्रांत, निवांत अन गाफील असल्याने संवेदनांची पातळी खाली येऊन एरवी न जाणवलेले वाऱ्याचे घुमणे एकदम मनाच्या मोकळ्या भांड्यात पाणी भरावे तसे घुसले ? काही असो. तेव्हा लहानपणी तर, झालेल्या प्रकाराचे विश्लेषण करण्यास आमची बालमने असमर्थच होती. पण एकाचवेळी आम्हा ७-८ जणांना झालेल्या त्या एकसारख्या संवेदना म्हणजे भास असेल असे म्हणायला आता मोठेपणीही , जीभ उचलत नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक प्रसंग आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एखादा अनुभव पूर्णतः नवा असतो तेव्हा एकतर आपल्या मनात कुतूहल निर्माण होते किंवा भीती निर्माण होते. लहान वयात या भावना एका अर्थी संसर्गजन्य असतात असे म्हणता येईल. म्हणजे मूल म्हणून आपण फारसा वेगळा विचार करत नाही - म्हणूनच मूल थोडे वेगळे बोलायला लागले/लागली की 'शिंग फुटायला लागलीत' अशी संभावना केली जाते. तुम्हा सर्व मुलांना एकच अनुभव आला याचे कदाचित हे स्पष्टीकरण असू शकेल (कितपत वैज्ञानिक आहे मला माहिती नाही).
तुम्ही अनुभव फार प्रभावीपणे मांडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या शाळेच्या मैदानावर देखील लहान प्रमाणात वावट्ळ उठलेली पाहीली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला असा अनुभव रेल्वेत आलेला आहे. विद्याविहार ते ठाणे संध्याकाळची ६ ची पीक अवर गर्दी. इतकी अफाट चेंगराचेंगरी की शंका येऊ लागली - आज आपण वाचू का, हा दिवस शेवटचा ठरेल का? ख-र-च!
मी दाराशीच ऊभी होते. दोन्ही हातांनी लोखंडी खांब धरुन व काखेत पर्स गच्च दाबून. आतून बाहेर ढकलू शकणारा प्रचंड रेटा होता. माझे तोंड बाहेरच्या दिशेला म्हणजे वार्‍याकडे होते. व मागे अनेक स्त्रियांचा जबरदस्त रेटा. पैकी हळूहळू कोणीतरी डोक्यावरुन हात फिरवु लागले. वर्तुळाकार-उजव्या दिशेने. तेल टाळूत जिरवतात अगदी तसे. हात लहान होता, स्त्रीचा होता. मी मागे वळूच शकत नव्हते आणि मी एक हात वर नेला की फटकन तो हात निघून जाई. मागच्या बाईकडे वळून पहात मी खेकसले "मेरे सर पे हाथ मत घुमाओ" , ती बाई म्हणाली "अरे बेहेन मै नही घुमा रही हूं" हे असे ५ मिनीटे तरी चालले. मी दुसरा हात सोडायला तयार नव्हते कारण मला भीती होती रेट्याने किंवा त्याच व्यक्तीने धक्का दिल्याने मी बाहेर फेकले जाइन.
मुलुंडला उतरले मागे वळून पाहीलं ती बाई कशीतरीच होती. पेल डोळे, गोरी व कृष, साडी नेसलेली. आणि कशीतरीच. डोळ्यात जनावराची सावधता.
.
फक्त एक स्पष्टीकरण आहे - पर्स चोरण्याकरता, लक्ष दुसरीकडे वेधण्याचे केलेले चाळे. पण मग हे चाळे अन्य बायकांच्या लक्षात आले नाहीत का टोळी होती व बर्‍याच चोरट्या बायकांचा गराडा होता?
_______________
अजुन एक लहानपणी मला सर्वाधिक त्रास झाला ते घर स्मशानभूमीवर चक्क उभारलेले होते/आहे. अमेरीकेत जिथे त्रास झाला तिथे लॅन्स्डेल्/पेन्सिल्व्हेनिया ला अपार्त्मेन्ट स्मशान्भूमीवरच होते. २ पावलांवर २र्‍या महायुद्धातील सैनिकांची ७० एक थडगी होती. एकदा त्या घरात नवरा आणि मी कॉम्युटरचा स्क्रीन पहात होतो तेव्हा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपोआप अक्षरेच्या अक्षरे झरझर लिहून येऊ लागली. रँडम होती. काय लिहीले हे कळत नव्हते. अशा रीतीने काँप्युटर हॅक होऊ शकतो का? आम्हाला हॅकिंगचा संशय आल्याने, लॅपटॉप बंद करुन टाकला.
हे सर्व मूर्खासारखे लिहीले आहे असे वाटेल पण हे अनुभव म्हणुन लिहीती आहे. मला माहीत आहे काहीतरी तर्कशुद्ध, मानवी मनोव्यापारांचे, रॅशनल स्पष्टीकरण आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपोआप अक्षरेच्या अक्षरे झरझर लिहून येऊ लागली.

हा हा हा!!!!!

डेमी मूरच्या 'घोस्ट' ह्या चित्रपटातील एका प्रसंगाची आठवण आली!

असो, बहुधा कळफलकातील एखादी कळ अडकली असावी, असे वाटते.

बाकी आता धागा वर काढलाच आहे तर असे बरेच प्रसंग वाचायला मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच नाही हो बरीच वेगवेगळी अक्षरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही कमनशिबीच असले काही दिसण्याबाबत.तरी प्रसंग मजेदारच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0