बेझॉस, गोयल आणि महंमदाचे पामतेल

पैसे आणता म्हणजे काही उपकार नाही करत!

आपल्या रेल्वे आणि वाणिज्य मंत्र्यांच्या अशा विधानाने नुकतीच बरीच खळबळ माजली. जगातील अतिश्रीमंतांपैकी एक असलेले, अमेझॉन कंपनीचे चालक-मालक, जेफ बेझॉस नुकतेच भारताचा दौरा करुन गेले. मोदी जॅकेट (नेहरु जॅकेट म्हणा हवं तर) घालून, आपल्या प्रेयसीच्या हातात हात अडकवत, कधी पतंग उडवीत तर कधी शाहरुख खान बरोबर शेकोटीशी गप्पा (fireside chat) मारत, कधी दिल्लीच्या स्टेडियममध्ये भरवलेल्या मोठ्या जत्रेत अमेझॉनवर विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांना भरघोस धन्यवाद देता देता बेझॉस असेही म्हणून गेले की त्यांची कंपनी येत्या काही वर्षात भारतात १०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करायचे बेत आखत आहे. आता तुम्ही म्हणाल ही तर चांगली बातमी आहे. जगभरची सरकारे त्यांच्या त्यांच्या देशात विदेशी गुंतवणूक यावी म्हणून आकाश पाताळ एक करत असताना पियुष गोयल यांनी असे कुत्सित विधान का बरे करावे?

तर याचे कारण हे आहे की भारतात लोकशाही आहे. आणि कुणी काहीही म्हणो, पण आश्चर्यकारक रीत्या ती, भल्या बुऱ्या प्रकारे काम बजावत आहे. भारतात सारख्या कुठे ना कुठे तरी निवडणुका होत असतात. लवकरच दिल्ली राज्यात त्या होणार आहेत. छोटे छोटे दुकानदार (म्हणजे कोपऱ्यावरच्या मळकट किराणा मालाच्या व्यापाऱ्यापासून ते टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज वगैरे विकणाऱ्या जरा झगमगीत शो रुम पर्यंत दुकाने चालवणारे) पियुष गोयल यांच्या पक्षाचे पारंपरिक मतदार व देणगीदार मानले जातात. अशा दुकानदारांना अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे ऑनलाईन दुकाने अजिबात पसंत नाहीत. साहजिकच आहे ते. आपल्या पोटावर पाय देणारे लोक कोणाला आवडतात? तर ह्या मंडळींना बेझॉस यांचे नव्याने भारतात पैसे ओतणे ही बातमी नक्कीच आनंददायी नाही.

बेझॉस यांच्या चमकदार भारत दौऱ्याला मिळालेली प्रसिद्धी बघता आपण भरभरुन मते देऊन पुन्हा निवडलेले मोदी सरकार अमेझॉनला काहीच कसा पायबंद घालत नाही अशी शंका ह्या मंडळींच्या मनात यायला नको म्हणून गोयल यांनी तसे वक्तव्य दिले असण्याची दाट शक्यता आहे. यावर अर्थातच आर्थिक विचारवंत, वित्तीय विषयांवरची वृत्तपत्रे, मोदी सरकारला विरोध दर्शविणारी काही मीडियावाली मंडळी यांनी लगेच टिकेची झोड उठवली. पण तुमच्या लक्षात आणखी एक गोष्ट आली का? विरोधक राजकीय नेतेमंडळी मात्र ह्या बाबतीत मूग गिळून गप्प बसली आहेत. भारतात विदेशी कंपन्यांची कड घेण्याची रिस्क मुरब्बी राजकारणी कधीच घेत नाहीत. कारण त्याने मते मिळत नाहीत, त्या कंपन्यांनी कितीही पैसे आणले तरी.

आता खरं तर त्यांचा आणखी पैसा येणे फार गरजेचे आहे. इथला रोजगार छोटे दुकानदार वाढवून वाढवून किती वाढवणार? गोयल यांना काय ते ठाऊक नाही? अर्थात याचा अर्थ असाही नाही की अमेझॉन, वॉलमार्टला इथे मोकळे रान द्यावे. काही नियम हे घालावे लागतात. शेवटी स्वत:च्या फायद्यावर नजर ठेऊन असलेल्या आपमतलबी धनाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आपल्या देशाला आणि अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल ते बघणेही सरकारचे कर्तव्य असते. आणि असे कुत्सित वक्तव्य वाणिज्य मंत्र्याने केले म्हणून काही कोणी भारतात पैसे ओतणे थांबवत नाही. कारण मुळात त्यांना आपल्यावर उपकार करण्यासाठी गुंतवणूक करायचीच नसते. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच सर्व खटाटोप असतो. स्वार्थात वाईट काहीच नाही. परस्पर स्वार्थाने दोन्ही बाजूंचे हित होत असेल तरच तो बिझनेस असतो. राजकारणी आणि धंदेवाईक लोकांना ते चांगले ठाऊक असते. आपण सामान्य मंडळी मात्र उगीचच भावनेच्या आणि मीडियाच्या आहारी जाऊन कधी अमेझॉनने एतद्देशीयांचे उद्योग बंद पाडले / आपल्या माणसांची दुकाने वाचवा अशी हाकाटी तरी करतो नाहीतर मोदी सरकारला बिझनेस कळत नाही आणि ते परदेशी भांडवल पळवून लावत आहे म्हणून अस्वस्थ होतो. खरी गोष्ट काय आहे ती गोयल आणि बेझॉस दोघांना मात्र पक्की ठाऊक असते. "मी मारल्यासारखं करतो आणि तू लागल्यासारखं कर!" किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात खुलेपणाने परदेशी भांडवल आणून काही मतदारांची नाराजी ओढवून घेणे कुठल्याच सरकारला परवडत नाही. पण ते भांडवल येणेही फार आवश्यक असल्याचे सरकारला मनोमन माहित आहे. मग काय करायचे? नियमांचे दार थोडे किलकिले ठेवायचे. दारापाशी एक रखवालदार ठेवायचा. निवडणुका जवळ आल्या की तो हवेतच दोन चार वेळा आपली लाठी फिरवतो आणि बाहेरुन येणाऱ्या मंडळींना ताकीद देतो. बघ्यांचे समाधान झाले की पुन्हा झोपी जातो. लोकशाहीत करावे लागणारे आवश्यक असे हे नाटक आहे. पण दोष गोयल किंवा बेझॉस यांचा नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या भावनाप्रधान, बिझनेस न समजणाऱ्या सरळसोट साध्या भोळ्या मतदारांचा आहे.

मलेशियन पाम तेलावर संक्रान्त

राजकारण आणि अर्थकारण एकमेकांत किती गुंतलेले असतात ह्याचे आणखी एक उदाहरण गेल्या महिन्यात बघायला मिळाले. मलेशियाचे ९५ वर्षीय पंतप्रधान महाथीर महंमद (ह्यांचे आजोबा केरळीय मुसलमान होते बरं का!) यांनी भारतीय संसदेने पारित केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या बदलाबद्दल नापसंती व्यक्त केली. भारताचे जम्मू काश्मीर विषयक धोरणसुद्धा अन्याय्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आधीच झाकीर नाईक ह्या, भारतातून परागंदा झालेल्या आणि कट्टर इस्लामची शिकवण देणाऱ्या, इथे वॉन्टेड असलेल्या माणसाला आश्रय देऊन मलेशियाने भारताशी फटकून वागायचे ठरवले होते. त्यावर आता संसदेत रीतसर पास झालेल्या कायद्यावर टिका तिकडच्या पंतप्रधानांनी केली तेव्हा आपल्या केंद्र सरकारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या नसत्या तरच नवल. मोदी सरकारने प्रत्युत्तर म्हणून आपल्याकडचे आर्थिक हत्यार वापरले आहे. मलेशियाकडून आपल्याकडे येणाऱ्या रिफाईंड पाम तेलाच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. भारत पाम तेलाच्या बाबतीत मलेशियाचा सर्वात मोठा कस्टमर आहे. इतकेच नव्हे तर भारत जगातला पाम तेलाचा सर्वात मोठ्ठा आयातदार आणि उपभोक्ता आहे. ज्येष्ठ वाचकांनी डालडा वनस्पतीचा डबा डोळ्यासमोर आणावा. तरुण वाचकांच्या तर कित्येक गोष्टी डोळ्यासमोर येतील. झटपट नूडल्स, गोठवलेली मिष्टांन्ने (frozen desserts), फुगवलेल्या पिशवीतून मिळणारे जवळजवळ सर्व खाद्य पदार्थ, म्हणजे, चिप्स, शेव, फरसाण, भुजिया, जे जे काही तळण प्रक्रिया वापरुन बनवलेले असते ते ते सहसा पाम तेलात केलेले असते. त्याशिवाय चॉकलेट, बिस्कीटे, केक्स, इतर बेकरीजन्य खाऊत सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे तेल वापरले जाते. रस्त्यावरच्या भजी, समोसे, जिलब्या विकणाऱ्या मंडळींचेही ते आवडते तेल आहे कारण ते इतर तेलांच्या मानाने स्वस्त पडते. आरोग्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना एक दिवस हे फार महाग पडणार आहे, पण तो आजचा विषय नाही. तसेच अनिर्बंध पाम लागवडीपोटी जगात कित्येक ठिकाणी आणि, विशेषतः मलेशियात पर्यावरणाचा खूपच ऱ्हास होतो आहे. स्वत:च्या आरोग्याचे नुकसान आणि पृथ्वीची हानी असे दोन पक्षी एकाच दगडात मारण्याच्या कितीतरी कला मानवाने अवगत करुन घेतल्या आहेत.

तर भारत सरकारच्या ह्या कृतीमुळे मलेशियात रिफाईंड पामतेलाचे भाव गडगडले आहेत. इतके की तिथल्या पामतेल उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मलेशिया हा मुस्लिम देश आहे. तिथल्या कर्मठ मतदारांना आपले धार्मिक नाणे कसे खणखणीत आहे ते वाजवून दाखवायची राजकीय निकड महाथीर यांना कदाचित भासली असावी. म्हणजे गोयल यांचे वक्तव्य कसे होते, तसेच काहीसे हे प्रकरण आहे. पण त्याचे गंभीर आर्थिक परिणाम त्यांच्या देशाला भोगावे लागतील अशी चिह्ने आहेत.

गंमत म्हणजे मलेशियाच्या शेजारचा इंडोनेशिया हा जो देश आहे तो ही मुस्लिम आहे आणि तोही पाम तेल बनवतो. पण त्यांचे तेल अशुद्ध असते. तरी मलेशियावर कोसळलेले हे संकट ही इंडोनेशियासाठी पर्वणी आहे. कारण अशुद्ध इंडोनेशियन खाद्य तेल आयात करुन आपल्याकडचे कारखाने ते रिफाईंड करायची प्रक्रिया इथेच करु शकतात. भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' मोहीमेलाही त्यामुळे अनायसे बळ मिळेल. त्यात पुन्हा गंमत अशी की सत्ताधारी पक्षाचे विशेष मित्र मानले गेलेले काही उद्योजक म्हणजे अदाणी, पतंजलिचे बाबा रामदेव यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्यांची ह्या प्रकरणात मस्त चांदी होणार असे दिसते आहे. कारण ह्या कंपन्यांकडे असलेली बरीच खाद्य तेल शुद्धीकरण यंत्र सामुग्री आता वापरात आणता येईल. स्वस्त मलेशियन पाम तेल आयात करता येत होते तेव्हा ती धूळ खात पडली होती.

पाम तेलात दणका दिल्यावर अजून कुठे कुठे मलेशियाची कोंडी करता येईल ह्याची चाचपणी चालू आहे. बहुदा पुढचा घाव मलेशियाई तांबे आणि अल्युमिनियमच्या तारा, मायक्रोप्रोसेसर, संगणक आणि त्याचे भाग, दूरसंपर्काची उपकरणे ह्यांवर पडेल असे वाटते. मलेशियाने समेटासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भारतातून जास्त मोठ्या प्रमाणावर साखर आयात करायची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे आपल्या साखर उत्पादकांना गोड दिवस पहायला मिळायची शक्यता आहे.

देशांमधील खुल्या, बिन अडथळ्यांच्या व्यापारामुळे परस्पर समृद्धी वाढते असा एक अर्थशास्त्रीय विचारप्रवाह आहे. हे जे घडतंय ते अगदी त्या विचाराच्या विपरीत आहे. पण आहे ते असं आहे. कोणाला आवडो वा न आवडो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तं लिहीलंय. आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण इंडोनेशियाने पाम तेल देतो पण आम्हाला म्हशीचे मांस पाठवा सांगितले ते खरं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला माहित नाही उत्तर याचे. पण म्हणजे चांगलं आहे की. तेवढेच एक्स्पोर्टला उत्तेजन.
म्हशीचे मांस (बीफ) बरीच वर्षे भारतातून बऱ्याच देशांना एक्स्पोर्ट होते.
पूर्वी एकदा कोरेगाव(भीमा नाही , सातारा) इथला बीफचा mafco चा कत्तलखाना मी आतून बघितला होता. सगळा माल एक्स्पोर्ट होई तेथून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. सोप्या भाषेत, शब्दांत लिहिलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख मस्तच आहे. साध्या व सोप्या भाषेतील लेख आवडतात.

शिवाय टंग इन चीक / सरकॅझम/ कुत्सितपणा नसेल तर जास्त कारण आमच्या सारख्या मंद लोकांना ते प्रकार कळत नाहीत, पण काहीतरी कूटार्थ आहे अशी नुसतीच शंका येउन रहाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

उत्कृष्ट लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0