मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक व्यक्तिचित्रे...

मित्रांनो,

मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भात वर्णन करताना काही व्यक्तिमत्वे कारणपरत्वे समोर येतात.

त्यांचा गोषवारा सादर केला तर धागा वाचकांना पुढील मागील संदर्भ समजायला सोपे पडेल असे वाटून खालील व्यक्तींचा विश्वकोशातील परिचय सादर करत आहे. लढाईचे धागे जसे पुढे पुढे जात राहतील, तेव्हा आणखी काही व्यक्तींची त्यात भर पडेल असे असे वाटते.

बाजीराव, दुसरा

(७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली; पण ती अयशस्वी होऊन बाजीरावास पेशवेपदावर बसविणे त्यास क्रमप्राप्त झाले. बाजीराव व नाना फडणीस यांचे कधी जमले नाही. अखेर अंतर्गत कारस्थानात बाजीराव यशस्वी झाला. नाना फडणीस प्रथम कैदेत पडले व पुढे लवकरच मरण पावले (१८॰॰). बाजीरावावर शिंदे-होळकरांचे प्रथमपासून वर्चस्व होते. त्यातून सुटण्यासाठी त्याने इंग्रजांबरोबर मानहानीकारक तह केला (डिसेंबर १८॰२). त्यामुळे तो प्राय: परतंत्र झाला. त्याने तैनाती फौजेची अट मान्य केली. त्याला इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतरांशी संबंध ठेवण्यास सक्त मनाई होती, शिवाय मराठी सरदारांचे संघटन करून त्यांस एकत्र आणणेही अशक्य झाले. या तहाची व इंग्रजांच्या धोरणाची जाण बाजीरावाला होती, असे दितस नाही. इंग्रजांच्या साहाय्याने पटवर्धन, रास्ते या आपल्या बलाढ्य सरदारांचा पाडाव करण्याचा व्यूह त्याने रचला; पण इंग्रज वकील एल्फिन्स्टन याने १८१२ च्या पंढरपूरच्या तहाने तो हाणून पाडला. पेशवा जळफळला आणि इंग्रजांविरुद्ध कटास सुरुवात झाली. बाजीरावाने साताऱ्याला छत्रपतींचा व त्या पदाचा उघड उघड अपमान करून त्या वेळचे छत्रपती प्रतापसिंह यांस प्राय: कैदेत टाकले. या परिस्थितीचा फायदा घेऊन एल्फिन्स्टनने पेशव्यांशी लढाई करताना छत्रपतिपदाची अवलेहलना करणाऱ्या पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे आहे, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मंडळावर योग्य तो परिणाम होऊन दुसरा बाजीराव एकाकी पडला आणि अष्टीच्या लढाईत त्याचा पराभव झाला (१८१८). बापू गोखले प्राणपणाने लढला व धारातीर्थी पडला. पुढे इंग्रजांनी बाजीरावास अटक करून ब्रह्मावर्त येथे नेऊन ठेवले. तेथेच तो पुढे मरण पावला (१८५१).दुसऱ्या बाजीरावामध्ये युद्धकौशल्य व धडाडी नव्हती. सुरुवातीपासून तो कारस्थानी व विषयलंपट होता. त्याने पुण्यास असताना सहा लग्ने व पुढे ब्रह्मावर्तास पाच अशी एकूण अकरा लग्ने केली. त्याला तीन मुली व एक मुलगा झाला; पण मुलगा लहानपणीच वारला. पेशवाई बुडाल्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने धार्मिक कृत्यांत व्यतीत केले.

गोखले, बापू

गोखले बापू (? १७७७ — १९ फेब्रुवारी १८१८). मराठी राज्याचा हा शेवटचा सेनापती. पूर्ण नाव नरहर गणेश गोखले. याचे मूळ गाव कोकणातील तळेखाजण. नंतर तो पिरंदवणे ता. विजयदुर्ग येथे राहत होता. त्याचे चुलते धोंडोपंत गोखले नाना फडणीसांकडे लष्करात नोकरीस होते. त्यांनी स्वतंत्र पथक उभे करून अनेक स्वाऱ्यांत भाग घेतला. दक्षिणेत धोंड्या वाघाने फार वाघाने फार उच्छेद मांडला. तेव्हा गोखले आणि पटवर्धन यांनी धोंड्या वाघावर स्वारी केली. कित्तूर व हल्ल्याळ यांच्या दरम्यान वाघाने धोंडोपंत गोखले व त्यांचा पुतण्या महादेव यास मारले. बापू हाही या स्वारीत हजर होता. तो कसाबसा वाचला. धोंडोपंतांच्या मृत्यूनंतर त्यांची सरदारकी यास मिळाली.

शेवटी त्याने इंग्रजांच्या मदतीने वाघास मारले. पटवर्धनांचा पाडाव करण्यात त्याने दुसरा बाजीराव पेशवे याची बाजू घेतली. त्याचप्रमाणे प्रतिनिधी आणि ताई तेलीण ह्यांचा पाडाव बापूने केला. चतुरसिंगाने पेशव्यांविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बापूने हाणून पाडला. रास्ते, पटवर्धन, पानसे या सरदारांविषयी बाजीरावाच्या मनात अढी होती. त्याने १८१२ मध्ये बापूस सरंजाम देऊन सेनापतिपद दिले. त्याचप्रमाणे खर्चासाठी प्रतिनिधींचा जप्त केलेला मुलूख दिला.

बाजीराव आणि एल्‌फिन्स्टन यांच्यात वितुष्ट आले, तेव्हा फक्त बापूनेच इंग्रजांशी युद्ध करावे, असा बाजीरावाने सल्ला दिला. इंग्रजांविरुद्ध झालेल्या खडकीच्या लढाईत (५ नोव्हेंबर १८१७) बापूचा घोडा ठार झाला, तेव्हा तो पायउतारा होऊन लढला. त्याचप्रमाणे येरवड्याच्या व गणेशखिंडीच्या लढाईत तो निकराने लढला. परंतु बाजीराव पळून गेल्यामुळे त्यास पराजय पतकरावा लागला. बाजीराव पर्वतीवरून पुरंदराकडे पळाला, तेव्हा त्याचा पाठलाग इंग्रजी फौजा करू लागल्या.

बापू गोखले पाठीमागे राहिला आणि त्याने इंग्रजांना हैराण केले. पुढे घोड नदीहून इंग्रजी फौज पुण्यास येताना बाजीरावाची आणि तिची गाठ पडली. त्यावेळी बापूने इंग्रजांचा पराभव केला. पुढे १९ फेब्रुवारी १८१८ रोजी बाजीरावाचा मुक्काम अष्टीवर असताना इंग्रज पाठलाग करीत आले. एकट्या बापूने इंग्रजांवर चाल करून मोठा पराक्रम केला पण याच लढाईत तो धारातीर्थी पडला.

बापूस दोन बायका होत्या. त्यांपैकी हयात यमुनाबाई बापूच्या मृत्यूनंतर साताऱ्यास जाऊन राहिली. तिला संतती नव्हती. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ अष्टीच्या लढाईत मारला गेला. बापूने थोड्या अवधीत अनेक पराक्रम केले. त्यामुळे त्याचे नाव एक शूर सेनापती म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

एल्फिन्स्टन मौंट स्ट्यूअर्ट

(६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो डंबार्टनशर (स्कॉटलंड) येथे एका उमराव घराण्यात जन्मला. ईस्ट इंडिया कंपनीत त्याचे काका संचालक होते. त्याने वयाच्या सतराव्या वर्षी भारतातील मुल्की सेवेत कलकत्ता येथे नोकरी धरली (१७९६). पुढे त्याची नेमणूक दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या पुणे दरबारात १८०१ मध्ये रेसिडेंट बॅरी क्लोजचा साहाय्यक म्हणून झाली. पुण्यात आल्यानंतर एक वर्षातच दुसरे इंग्रज-मराठे युद्ध सुरू झाले. यात त्याने जनरल वेलस्लीचा परिसहायक म्हणून काम केले. याशिवाय त्याला मराठी, फार्सी इ. भाषा येत असल्यामुळे त्याने दुभाषाचेही काम केले. हे काम त्याने इतके चोखपणे बजावले की, त्याला लवकरच बढती मिळाली. वयाच्या चोविसाव्या वर्षी एल्फिन्स्टनची नागपूर येथे भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली (१८०४-१८०७). दरबारातील बारीकसारीक गोष्टींची माहिती काढण्याचे काम त्याच्याकडे होते.

१८०७ मध्ये त्याला कंपनीचा प्रतिनिधी म्हणून शिंद्यांच्या दरबारात जावे लागले. १८०८ मध्ये लॉर्ड मिंटोच्या आज्ञेप्रमाणे एल्फिन्स्टन वायव्य सरहद्दीचा राज्यकर्ता शाहशुजाबरोबर बंदोबस्तासाठी काबूलकडे गेला. ह्यावेळी नेपोलियनची स्वारी होईल, अशी इंग्रजांना धास्ती वाटत होती, म्हणून एल्फिन्स्टनतर्फे त्यांनी शाहसुजाशी मैत्रीचा तह केला. हा तह मोडताच तो परत कलकत्ता येथे आला. १८११ मध्ये त्याची पुण्याला पेशव्यांकडे रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी दुसरा बाजीरावच गादीवर होता. बाजीरावावर नजर ठेवून त्याने इंग्रजांविरुद्ध केलेल्या कारवायांना एल्फिन्स्टनने प्रतिशह दिला.

पुण्यात असताना पेशवे आणि जहागीरदार यांच्यातील संघर्षात त्याने जहागीरदारांची बाजू घेऊन मध्यस्थी केली. ह्यावेळी त्याने गुप्तचर शाखा उघडल्यामुळे त्याला सर्व गुप्त बातम्या समजत असत. त्याने बाजीरावाने चालू केलेल्या कारवायांच्या माहितीचा योग्य वेळी उपयोग करून घेतला. त्रिंबकजी डेंगळे याच्यावर बडोद्याच्या गंगाधर शास्त्री पटवर्धनाच्या खूनाचा आरोप ठेवून एल्फिन्स्टनने त्याला स्वाधीन करण्यासाठी बाजीरावाकडे प्रथम मागणी केली व नंतर फौज धाडली आणि पेशव्यास मानहानीकारक तह करण्यास भाग पाडले. यातून उद्‍भवलेल्या इंग्रज-मराठ्यांच्या तिसऱ्या युद्धात एल्फिन्स्टनने मराठ्यांचा खडकी व कोरेगाव या ठिकाणच्या लढायांत पराभव केला. या युद्धामुळे मराठेशाहीचा शेवट झाला. इंग्रजांनी जिंकलेल्या मराठी मुलखावर एल्फिन्स्टनची प्रथम दक्षिणेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पुढे त्याचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्यास १८१९ मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर नेमण्यात आले. पुढे त्यास गव्हर्नर जनरल हे पद ब्रिटिश पार्लमेंटने दोनदा देऊ केले, पण त्याने ते स्वीकारले नाही.

या सुमारे आठ वर्षांच्या (१८१९ - २७) कारकीर्दीत एल्फिन्स्टनने मुंबई प्रांतातील एकूण सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश राज्यात मुंबई प्रांतास एक पुढारलेला प्रांत म्हणून लवकरच नावलौकिक प्राप्त झाला. प्रथम एल्फिन्स्टनने साताऱ्याच्या गादीवर प्रतापसिंहास बसविले व ते इंग्रजांचे मांडलिक संस्थान केले.

हिंदी लोकांना उच्च पदाच्या जागा द्याव्यात, ते सुशिक्षित होऊन आपणास आपले बस्तान आवरावे लागले, तरी हरकत नाही; अशा मताचा एल्फिन्स्टन हा एक होता. त्याने येथील शिक्षणपद्धतीतील दोष पाहून अनेक टिपणे लिहून ठेवली. मातृभाषा आणि इंग्रजी भाषा यांच्या शिक्षणपद्धतीचा त्याला संस्थापक मानण्यात येते. या पद्धतीचा अवलंब मुंबई प्रांतात त्याने प्रथम केला. त्यामुळे इतर प्रांतापेक्षा मुंबई इलाख्याला शिक्षणाच्या क्षेत्रात जास्त महत्त्व प्राप्त झाले. त्याने स्थानिक लोकांच्या शिक्षणासाठी प्रयत्‍न केले. त्यासाठी लहानलहान पुस्तके छापण्याची कल्पना काढली. पेशवे काळात विद्वान ब्राह्मणांना दक्षणा वाटण्याची पद्धत प्रचलित होती, ती त्याने बंद केली. त्याऐवजी दक्षिणाफंड काढून व त्या फंडातून शिक्षणाला प्रोत्साहन देऊन इतर काही सुधारणा केल्या. मुंबई इलाख्यातील एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट किंवा हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेज या संस्था त्याच्या स्मरणार्थ काढण्यात आल्या.

पेशव्यांच्याकडून जिंकून घेतलेल्या प्रदेशासंबंधीचा विस्तृत अहवाल त्याने प्रकाशित केला. तो रिपोर्ट ऑन द टेरिटोरीज काँकर्ड फ्रॉम द पेशवाज या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याने भारताचा हिस्टरी ऑफ इंडिया हा दोन खंडांत (१८४१) इतिहास लिहिला. समकालीन ऐतिहासिक वाङ्‍मयात त्याचा हा ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो. ह्याशिवाय राईज ऑफ ब्रिटिश पावर इन द ईस्ट (१८८७) व अकौंट ऑफ द किंगडम ऑफ काबूल (१८१५) हे त्याचे दोन ग्रंथही ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

एल्फिन्स्टन सरे (इंग्‍लंड) येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी मरण पावला. आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार ही उपाधी एल्फिन्स्टनला लावली, तर अतिशयोक्ती होणार नाही. नोकरीत प्रवेश केल्यानंतर त्याने सतत वाचनाने व अभ्यासाने आपली बौद्धिक पातळी उंचावली आणि ग्रीक, रोमन, फार्सी आदी भाषांची ज्ञानोपासना केली. काही ग्रंथांचे समीक्षणही त्याने आपल्या खासगी रोजनिशीमध्ये करून ठेवले आहे. दुर्दैवाने त्याची बरीच कागदपत्रे आणि पुस्तके १८१७ साली पुणे येथील संगम रेसिडेन्सी बंगल्याला लागलेल्या आगीत नष्ट झाली. एक श्रेष्ठ प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार म्हणून भारतीय इतिहासात त्यास एक विशेष स्थान आहे.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्याने पुण्यास असताना सहा लग्ने व पुढे ब्रह्मावर्तास पाच अशी एकूण अकरा लग्ने केली. त्याला तीन मुली व एक मुलगा झाला

म्हणजे इथेही कर्तुत्वात कमीच पडले म्हणायचे की !
लेख आवडला. पुढील भाग जरा लवकर येऊद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************