समीक्षा? नव्हे.... पुस्तकपरिचय... किमया - माधव आचवल

"किमया".... माझ्या आवडत्या पुस्तकाचा परिचय इथे देत आहे. काही मित्र-मैत्रीणींनी ह्यापूर्वी हा लेख वाचलेला आहे. नवीन मित्र-परिवारासाठी इथे द्यावासा वाटला.

घाई-गडबडीने, कामांचा उरका पाडत जगत असताना, आपल्या आत दडलेल्या कलाकाराला अधून-मधून भेटण्यासाठी पुस्तकांची मदत होते. त्या काही पुस्तकांपैकी हे एक....

‘किमया’ ही एक वाटचाल आहे, दैनंदिन जीवनांतील रूक्ष व्यवहारी भूमिकेकडून, सौंदर्याने ‘फुली फुलून’ आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणीवेकडचा हा प्रवास आहे.
लेखक माधव आचवल हे व्यवसायाने आर्किटेक्ट. कलात्मक दृष्टी लाभलेलं, मनात निर्माण होणार्‍या भावनांना तितक्याच अलवारपणे शब्दरुप देणारं संपन्न व्यक्तिमत्त्व! रेती-माती-दगड-विटांमध्ये वावरत असताना त्यातील सौंदर्यामध्ये रमणारा हा लेखक.
पृथ्वी-आप-तेज-आकाश-वायु-आकार-रेषा-घर-शिल्प ह्यांविषयीच्या प्रत्येक ललितलेखातून लेखकाची सौंदर्यपूर्ण नजर सतत जाणवत रहाते. ह्या प्रत्येक घटकाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ते कसं आहे आणि ते तसं का आहे ह्याचा मूलभूत विचार मांडत घेतलेला हा वेध आहे. भूमितीचा अभ्यास करताना शिकलेल्या ह्या संकल्पनांचं लेखकाच्या नजरेतून आपल्याला होत जाणारं आकलन थक्क करणारं आहे.
निसर्ग-सान्निध्यात फिरताना, ताजमहालाचं सौंदर्य न्याहाळताना, रंगमंचावरील नृत्याविष्कार बघताना, रिकाम्या रस्त्यावरून चालताना, आजूबाजूच्या घरांचे अनोखेपण टिपताना लेखकाच्या संवेदनशील मनात किती तर्‍हांचे तरंग उमटत असतात!

लेखकाचं बरचसं वास्तव्य, शहरी राहणीमानापासून दूर, बडोद्यासारख्या निवांत आणि घरांची विविधता असलेल्या ठिकाणी झालं.
आपणा सर्वसामान्यांच्या दृष्टीने घर म्हणजे जिथे राहतो ते आपलं घर!
लेखक मात्र म्हणतात, ‘माणसाला अवकाशाच्या प्रचंडतेची भिती वाटत असावी. नाहीतर त्याने घरे का बांधली? ह्या अथांग विस्तीर्णतेत आपल्या स्वत:ला अनुरूप असा अवकाशाचा आकार घडवण्याची इच्छाही त्याच्या मनात असली पाहिजे.’
‘वास्तूने आकारलेले अवकाश ही एक स्वतंत्र, स्वत:चे जीवन असलेली वस्तू आहे याची जाणीव झाली की मग घर बांधणे म्हणजे संडासाच्या फरशा आणि न गळणारी स्लॅब एवढेच नसून एक फार मौजेची आणि मन व्यापून उरणारी गोष्ट आहे असा अनुभव येतो.’
‘घरावर, घरातील वस्तूंवर प्रेम करण्याचं जर आपण सोडून दिलं तर ते त्याचा सूड आपल्यावर उगवतात. आपलं घर आणि आपल्या घरातील वस्तू जर आपण स्वच्छ, जागच्या जागी नीटनेटक्या आवरून ठेवल्या नाहीत तर त्या आपली सौंदर्यदृष्टी मारून टाकतात.’
हे वाचताना वाटलं, शहरवासीयांची आजच्या एकाच छापाच्या गृहसंकुलातील, एकासारखी एक असलेली, जणू कारखान्यातील साच्यांतून तयार झालेली घरे त्यांनी बघितली असती तर?

प्रत्येक लेखातील काही-काही ओळी वाचता-वाचता अचानक थबकायला होतं.
‘त्या तिथे...पलिकडे’ ह्या लेखात एका टेकडीची ओळख करून देताना आचवल लिहितात, ‘एक लहानशी टेकडी. धरणीला माता म्हणतात, पण प्रथम ती स्त्री असते ह्याची जाणीव देणारी, मृदू, हळूवार. द्यायला आणि घ्यायला उत्सुक, स्वत:चे मूड्स असणारी टेकडी!’
‘प्रकाशाचे संगीत’ सांगते, ‘प्रेमाला प्रकाश हवा पणतीचा. सौम्य, मंद. खोलीच्या काही भागात काळोखाचे गूढ कोनाडे निर्माण करणारा. प्रियतमेच्या चेहर्‍यावर पूर्वी कधी न जाणवलेले सुप्त सौंदर्य प्रकट करणारा. प्रेमाला प्रकाश हवा कुजबुजीइतका हलका. दोन जिवांतले नाजूक धागे करपून जाणार नाहीत असा...’
‘रूप पाहता लोचनी:३-वास्तु’ मध्ये आचवल म्हणतात, ‘कलाकृती ही जत्रेच्या कोलाहलात बघण्याची वस्तु नाही. ती बाहेरच्या (आणि आतल्याहि) शांततेच एकट्याने, क्वचित दोघांची अनुभवायची असते.’
‘कलाकृतीसमोर उभे असताना, ती कलाकृति एवढेच सत्य असते. ताजमहाल ही एक वास्तु आहे आणि वास्तुकलेचा अनुभव हा आपल्या स्पर्श-रूप-नाद-गंधादि संवेदनांनी घ्यायचा आहे. त्या जेव्हा इतर सारी अवधाने दूर सारून समोरच्या कलाकृतीला सामावून घेण्यास आतुर आणि सज्ज होतील तेव्हाच खरा संवाद साधण्याची शक्यता आहे. कलाकृतींचे सौंदर्य प्रथमत: संवेदनांना सहजपणे जाणवावे लागते. बुध्दि मग ह्या जाणिवेचा पाठपुरावा करील. म्हणून समजावून घेण्याच्या अशा प्रयत्नांतून जे शोधायला जावे तेच निसटते.’

मनातले भाव आणि ते व्यक्त करणारे शब्द ह्यांचा वापर इतका अचूक आहे की आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीदेखील नव्या भासतात. ते दृश्य जसंच्या तसं आपल्यासमोर उभं रहातं.
ताजमहालाचं पाण्यात ‘डुचमळणारं’ सौंदर्य, आगगाडी अंधार्‍या बोगद्यात शिरून उजेडात बाहेर पडणं...
आपणही बोगद्यांतून अनेकवेळा प्रवास केलेला असतो. मग तो बोगदा मुंबई-पुण्याच्या वाटेवरचा असो किंवा जम्मू-श्रीनगर वाटेवरील लांबलचक जवाहर बोगदा असो! लेखकाने केलेल्या वर्णनांतून हे अनुभव नवेच भासू लागतात.

‘किमया’सारख्या पुस्तकांच्या एका वाचनाने कधीच समाधान होत नाही. ती अधून-मधून, पुन:पुन्हा वाचावीशी वाटतात. आपलं रोजचं जगणं अर्थपूण बनवण्यासाठी ते फार आवश्यक असतं.

जी. ए. कुलकर्णींनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात त्यांना आवडलेल्या किंवा न आवडलेल्यादेखील अनेक देशी-विदेशी लेखकांविषयी, त्यांच्या पुस्तकांविषयी मोकळेपणाने लिहिले आहे. त्याअनुषंगाने त्यांना (जी.एं.ना) कशा प्रकारचे पुस्तक आपल्या नावावर हवे असे वाटत असे त्याविषयी लिहिले आहे. ‘असे पुस्तक.... जे उंच देठावर उमलून राहणारे, शालीन तालेवारपणे जगणारे असेल!’ त्यातील एक पुस्तक म्हणजे ‘किमया....’

(किमया - माधव आचवल - मौज प्रकाशन - पहिली आवृत्ती: १९६१ - चौथी आवृत्ती: २००७)

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ऐसी अक्षरेवर स्वागत! Smile
'किमया'ची किमया अफाट आहेच! एकदा का ती किमया घडली की घरांकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो हे स्वतः अनुभवले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुन्हा पुन्हा वाचत राहावं अशा या पुस्तकाची ओळख छान झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रा,

तुला येथे पण पाहून आनंद झाला.
माधव आचवलांच्या 'किमया'बद्दल तू खरंच खूप छान लिहिले आहेस. आचवलांची दोन्ही उत्कृष्ट पुस्तके 'किमया' आणि 'जास्वंद' माझ्याकडे आहेत.

किमया सुंदर आहेच, पण मला जास्वंद जास्त आवडले. खरे तर २ ललित साहित्य कृतींमध्ये तुलना नसावी. पण एकाच लेखकाच्या असल्यामुळे आपसूकच होते. Smile
आचवलांच्या किमयाची किमया आणि जास्वंदाचा स्वाद दोन्ही मुक्तपणे अनुभवावेत असेच आहेत.

वाचकांनी आचवलांची ही दोन्ही पुस्तके अवश्य वाचावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी माणसाच्या सौंदर्यदृष्टीचं सध्या जे काही झालेलं आहे ते पाहता 'किमया'ची पारायणं प्रत्येकानं करायला हवीत असं वाटतं. एका सुरेख पुस्तकाच्या परिचयाबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आणि सुनीताबाईंनी आहे मनोहर तरी मध्ये माधव आचवलांबद्दल, त्यांच्या सौंदर्यदृष्टीबद्दल अपार आदराने आणि आपुलकीने लिहिलेले आहे. ते वाचल्यापासून आचवलांबद्दल माझ्या मनात कुतूहल दाटले होते. आचवलांचा अकाली मृत्यू या जोडप्याच्या फारच जिव्हारी लागला होता. चारेक वर्षापूर्वी किमया वाचले आणि तो आदर, ते प्रेम का निर्माण झाले होते ते कळले. किमया वाचणे हा केवळ अनुभव आहे. किमया वाचल्यावर प्रत्येक वेळी आपण आजपर्यंत आंधळेच होतो की काय आणि आपल्याला आता काहीतरी दिव्य दृष्टी लाभली आहे असे वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे पहिली आवृत्ती १९६२ ची आहे. या विषयावरचे बहुधा मराठीमधले हे पहिलेच लेखन असावे. वास्तुसौंदर्य कसे टिपावे हे किमयातून प्रथमच जाणवते. माझी प्रतिक्रिया जरा जास्तच वाटेल, पण आहे ते आहेच. असो. आचवलांना प्रणाम. मनांत घर करून राहिलेल्या एका असामान्य पुस्तकाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. कांदळकर,
तुमची प्रतिक्रिया उत्स्फूर्त आहे. आणि उत्स्फूर्तता ही कधीच 'जास्त' असत नाही. तो आवेग इतका जोरदार असतो की त्याला भरभरून लिहिणे हा एकमेव पर्याय असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0