रॅन्डम व्यवसाय (१)

"अरे, किती वर्षांनी भेट झाली. आणि खरं सांगू का, या स्कूल रियुनियनला भेट झाली नसती तर तुला ओळखलंच नसतं!"

"स्वाभाविक आहे रे. वीस वर्षांनंतर भेटतोय आपण. दहावीच्या रिझल्टनंतर पहिल्यांदाच. तू अमेरिकेतच होतास ना एवढी वर्षं!"

"अरे तेवढंच नाही. तू रापलायस केवढातरी. आणि तुझी हेअरस्टाईल? अगदी रास्ताफारियन झालास लेका!"

"आमच्या ड्रेस कोडचा भाग आहे रे."

"ड्रेस कोड? तू नेमकं काय करतोस?"

"पोतराज आठवताहेत? कडकलक्ष्मीची पूजा करणारे आणि स्वत:वर आसूड ओढून घेणारे?"

"म्हणजे??? तू तसं करतोस की काय?"

"नाही रे. त्यांना आसूड विकतो - सेल्स अँड मार्केटिंग डायरेक्टर आहे मी. त्यांना आपल्यातला वाटावा म्हणून असे केस वाढवलेत. पण कपडे त्यांच्यासारखे नाही घालत. चांगला टाय-जॅकेट घालून फिरतो. कंपनीची कार आहे. चांगलं चाललंय."

"पण पोतराजांना आसूड विकून कमाई होते पुरेशी? म्हणजे भारतात असे कितीसे पोतराज असणार?"

"अरे तो आमचा फक्त एक मार्केट सेगमेंट आहे. बाकी बैलगाडी-चालकांचा "ढवळ्या-पवळ्या" ब्रँड, जॉकी लोकांसाठी "डर्बी" ब्रँड, सेडिस्ट आणि मासोकिस्ट लोकांसाठी "द फिफ्टीएथ शेड" ब्रँड असे निरनिराळे मार्केट सेगमेंट आहेत आमचे. बाकी सेगमेंटच्या कस्टमर्सना भेटताना आधी केस गुंडाळून ठेवतो; मग कस्टमर्सना गुंडाळून ठेवतो."

"डिमांड कसा आहे रे? आणि कॉम्पिटिशन वगैरे?"

"अरे गेल्या वर्षी आमची रेव्हेन्यू ग्रोथ बावीस टक्के झाली; आणि इबिटडा पस्तीस टक्क्यांनी वाढला. आमचा मार्केट शेअर साधारण सत्तर टक्के आहे. कॉम्पिटिशन कमिशनचं भय असतं रे नेहमी."

"कधी काही अडचणी आल्या का रे?"

"मनेका गांधी मंत्री व्हायच्या आधी रिंगमास्टर्ससाठीच्या "धोत्रे-देवल" ब्रॅण्डचा रेव्हेन्यू शेअर आठ टक्के होता, पण आता तो तीन टक्क्यांवर आलाय. ते तीन टक्केसुद्धा फक्त एक्स्पोर्ट मार्केटमधून."

"इंटरेस्टिंग. एक्स्चेंजवर लिस्टिंगचे काही प्लॅन आहेत का?"

"सॉरी. कॉन्फिडेन्शिअल माहिती सांगू शकत नाही मी."

"ओके, नो प्रॉब्लेम. आय अंडरस्टॅंड. जाऊदे. बरं, डेझर्ट घेऊया?"

"हो ऑफ कोर्स. मला चॉकलेट मूस विथ व्हिप्ड क्रीम"

field_vote: 
0
No votes yet