सत्यमेवा जयते

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

सत्यमेवा जयते

- झंपुराव तंबुवाले

तेजस्वी चेन्नईच्या मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या आपल्या खोलीत प्रबंधलेखनाचं काम करत होता. त्याच्या प्रबंधाचा विषय होता भारताच्या जुन्या साहित्यातलं गणित. भास्कराचार्यांची लीलावती, पिंगळचं छंदशास्त्र ते थेट कात्यायनाच्या शुल्बसूत्रांपर्यंत. प्रत्यक्ष काम करण्याइतकी मजा त्याला लेखनात येत नव्हती. त्यामुळे लेखन रखडत होतं. आताही एखादी कॉफी घ्यावी किंवा समुद्रावर चक्कर मारावी का, असा तो विचार करत होता. मैलभरावरच असलेल्या समुद्रावरील भटकंतीमध्ये अनेक विचार त्याला सुचत. तितक्यात टेबलावरील फोनची घंटा वाजली.

'तेजा स्पीकिंग', आपल्या लांब बोटांनी केस विंचरत तेजस्वी म्हणाला. त्याचे मित्र त्याला तेजा म्हणत, त्यानंही तेच स्वीकारलं होतं.
'कॅन यू कम हिअर तेजस्वी? इमेजेटली', पलीकडून प्रोफेसर रमणांचा आवाज आला.
'येस सर', म्हणत तेजस्वी लगेच निघाला. काय काम आहे, हेदेखील त्याने विचारलं नाही. प्रोफेसर रमणा म्हणजे इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आणि त्याचे गाईड. तसंच काही कारण असल्याशिवाय ते बोलावणार नाहीत हे त्याला माहीत होतं.

खोलीत शिरताच तेजस्वीला प्रोफेसर रमणांच्या समोर एक व्यक्ती पाठमोरी बसलेली दिसली. त्या व्यक्तीच्या डोक्यावरची शेंडी मात्र दिसत होती. ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं, कारण इन्स्टिट्यूटमध्ये क्वचितच असं कोणी दिसायचं. मात्र आत जाताच त्याने यादवअय्यांना ओळखलं. श्रीरंगमच्या रंगनाथस्वामी मंदिरातील ते प्रमुख महंत. पुढे जाऊन त्याने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला.
प्रोफेसर रमणा म्हणाले, 'हे तुला श्रीरंगमला न्यायला आले आहेत. तुझं प्रबंधलेखन इतकं भरात असताना मला खरं तर परवानगी द्यायची नव्हती, पण त्यांनी मला तुझ्या श्रीरंगमला जाण्याचं महत्त्व पटवलं आहे. ते जाताजाता तुला माहिती देतील. काही दिवसांत तुला परत येता यावं'.
'लगेच निघायचं आहे?', तेजस्वी आपलं आश्चर्य लपवू शकला नाही.
'हो बेटा, कामच तसं आहे', यादवअय्या म्हणाले.
अर्ध्या तासात लॅपटॉप, प्रबंधासंबंधित कागद आणि काही कपडे एका बॅगेत भरून तेजस्वी निघाला.

रस्त्यात त्याला कळलं की मंदिराजवळील उत्खननात एक मोठं घबाड मिळालं होते. दोन मोठ्या खोल्या; एकीत बरंच सोनं, नाणी, तर एकीमध्ये अनेक ग्रंथ. ते सर्व सरकारच्या सुपूर्द करायचे होते. पण त्याआधी काही ग्रंथांचे फोटो काढायची परवानगी यादवअय्यांनी मिळवली होती. तेजस्वीचं काम असणार होतं, त्यातले कोणते ग्रंथ जास्त महत्त्वाचे वाटतात ते पाहून निदान त्यांचे फोटो काढायचे. बाकी प्रत्यक्ष ग्रंथ पाहिल्यावरच बोलू, असं यादवअय्या म्हणाले. हे साफ दिसत होतं की प्रोफेसर रमणांना कामाचं महत्त्व पटवून द्यायलाच ते स्वतः चेन्नईला आले होते. कोळीदम नदीवरचा त्याच नावाचा पूल ओलांडून कोळीदम आणि कावेरी नद्यांनी बनविलेल्या श्रीरंगम द्वीपावर शिरेपर्यंत तेजस्वी विचार करत होता की कोणते ग्रंथ असतील, त्यात काय असेल आणि त्याला का बोलावलं जात होतं.

मंदिरात नेहमीप्रमाणेच गर्दी होती. विष्णुसहस्रनामाचा गजर लाऊडस्पीकरवरून ऐकू येत होता. हे भारतातलं सर्वांत प्रचंड मंदिर. जवळजवळ एक चौरस किलोमीटरचा भाग व्यापणारं. तेजस्वी याच आवारात वाढला होता. एका बाजूला पिवळ्या फितीने बराचसा भाग बंद केलेला दिसत होता. तिथेच उत्खनन झालं असणार हे तेजस्वीने ताडलं. यादवअय्या त्याला थेट तिथेच घेऊन गेले.

जुन्या लिपींमधील अनेक ग्रंथ तिथे होते. यादवअय्यांनी एक ग्रंथ बाजूला काढून तेजस्वीच्या हातात दिला. तो ग्रंथ पाहताच त्याचे अनेक प्रश्न दूर झाले. त्यात अनेक रेखाटने होती. काही सूत्रंही दिसत होती. विष्णूच्या अनेक आकृत्या होत्या. प्रत्येक आकृतीत आयुधांनी जागा बदलल्या होत्या. ही सर्व रूपं तशी प्रसिद्ध आहेत : केशव, नारायण, माधव, उपेंद्र, हरि, कृष्ण अशी नावं असलेल्या या सर्व २४ योजना अनेक मंदिरांवर कोरलेल्या दिसतात. या ग्रंथांमध्ये मात्र त्या पलीकडे जाऊन काही होतं. नंदक तलवार आणि शिवधनुष्य शारंग हेपण विष्णूच्या हातात काही आकृत्यांमध्ये होते. त्याचप्रमाणे नारायणास्त्रदेखील होतं. त्या आकृत्यांची क्रमवारी पण विचित्र होती. काही आकृत्यांमध्ये विष्णूच्या दोन हातांमध्ये शंख होते. अर्थात आकृत्या केवळ चोवीस नसून हजारो होत्या आणि कोष्टकांद्वारे त्यांची माहिती दिली होती. फोटो काढता काढता तेजस्वीची विचारचक्रं फिरत होती.

दुसऱ्या दिवशी त्याला तिथल्याच एका उपमंदिरात राहणारा त्याचा मित्र प्रकाश भेटला. ते वडिलोपार्जित मंदिर थोडं जुनं होतं आणि त्याचा त्याला अभिमान होता. त्याचे वडील त्या मंदिराचे पुजारी होते. दोघे जुन्या सवयीप्रमाणे कावेरी नदीवर फिरायला गेले. ग्रंथ सापडल्याचं त्याला माहीत होतं, पण त्यात काय आहे हे मात्र माहीत नव्हतं. तेजस्वीने त्याला ते सांगितल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत गेले आणि त्याने तेजस्वीला संध्याकाळी घरी येऊन त्याच्या वडिलांना भेटायला सांगितलं.

#

दारावरची घंटा वाजली आणि थ्रीडी चेसच्या डावात व्यत्यय आल्यामुळे किंचित रोषानेच युवराज दरवाजा उघडायला उठला. दारात इन्स्पेक्‍टर समरना पाहून मात्र त्याचा चेहरा खुलला.
'या, या, इन्स्पेक्टर. बरेच दिवसांनी?', युवराजने विचारलं.
'तुमच्यालायक केस आली आहे', आत शिरता शिरता इन्स्पेक्टर समर थेट मुद्द्यावर येत म्हणाले.
'अरे वा. कसली केस आहे?', अमरेंद्रने विचारलं.
युवराजने दिलेलं पाणी पीत इन्स्पेक्टर समर म्हणाले, 'गेल्या महिन्याभरात, वयाची साठी उलटलेल्या सहा बायकांचे मृत्यू थोड्या चमत्कारिक परिस्थितीत झाले आहेत'.
'चमत्कारिक? म्हणजे?', अमरेंद्रने विचारलं.
'त्या सर्व 'सत्यमेवा' लावल्या असताना मेल्या'.
'सत्यमेवा? म्हणजे ते फलानीचं व्हर्चुअल रियालिटी डिव्हाइस? ते लावलं असताना म्हणजे 'सत्यमेवा' पाहता-पाहता? असं होतं तरी काय त्या 'सत्यमेवा' ॲपमध्ये?', युवराजने कोपऱ्यातल्या स्टॅंडवरील आपलं 'सत्यमेवा' उचलत विचारलं.

सुरुवातीला आयात केलेले 'ऑक्युलस क्वेस्ट'सारखे व्हर्चुअल रियालिटी डिव्हाइसेस बरेच महाग असत. पण फलानींनी भारतातच 'सत्यमेवा' नावाखाली अशा डिव्हायसेसचे उत्पादन सुरू केल्यानंतर अनेक घरांमध्ये व्हर्च्युअल रियालिटी पोहोचली होती. व्हर्चुअल रियालिटी म्हणजे सत्य आणि माया. सत्य, माया आणि सत्यम एव अर्थात सत्यमेव याचं कॉम्बिनेशन करून ते 'सत्यमेवा' बनलं आणि ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये कोणाला तरी रुचल्यामुळे ते तसंच रूढ झालं.

'त्याचं थोडं गूढ आहे. या सर्व केसेस भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या. पहिल्यांदा तिथे पोचलेले पोलीस किंवा आजूबाजूचे लोक वेगवेगळे असल्यामुळे 'सत्यमेवा' डिव्हाइसचा काही संबंध असेल, असं त्यांना न जाणवलं नाही. त्यामुळे त्यांनी ते वेळेवर तपासलं नाही. नंतर जेव्हा चेक केलं तेव्हा 'सत्यमेवा'ची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली होती. त्यांच्या 'सत्यमेवा' डिव्हाइसमध्ये कोणकोणते 3D प्रोग्राम होते याची यादी आहे, पण त्या बायका नेमके कोणते प्रोग्राम पाहत असताना मेल्या ते मात्र सांगता येणं कठीण आहे. खरं तर त्या डिव्हाइसचा संबंध असेलच असंही नाही', इन्स्पेक्टर समर म्हणाले.

'व्हर्टिगोचा त्रास होता का त्यांना? व्हर्च्युअल रियालिटीमुळे व्हर्टिगो उद्दीपित होऊ शकतो', अमरेंद्रने विचारलं.
'व्हर्टिगोची हिस्ट्री नव्हती. त्याची तपासणी झाली आहे'.
'भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे नेमकं कुठे?'
'मुंबई, लखनऊ, कलकत्ता, रामेश्वरम, मैसूर आणि तंजावूर', इन्स्पेक्टर समर एका दमात म्हणाले.
'म्हणजे खरंच सगळीकडे आहेत. तरी किंचित दक्षिणेकडचा कल आहे. आणि फक्त म्हाताऱ्या बायका?'
'हो, पण जर मृत्यूमागचं कारण समान असेल तर हा संसर्ग कसा कुठे होऊ शकेल हे शोधणं महत्त्वाचं आहे. यातले दुवे एकमेकांशी कसे बांधलेले आहेत हे लवकरात लवकर समजणं महत्त्वाचं आहे'.
'पण ही केस तुमच्याकडे कशी आली?' अमरेंद्रने विचारलं.
'आणि तुम्ही आमच्याकडे कसे आलात?', इन्स्पेक्टर समरला बोलू देण्याआधीच युवराजने विचारलं.
'ही केस आमच्याकडे खुद्द फलानी घेऊन आले. तुमच्या 'व्हाईट एलिफंट डिटेक्टिव्ह एजन्सी'ची ख्याती ऐकून तुमची शिफारसपण त्यांनीच केली. त्यांना भीती आहे की या मृत्यूंची सांगड 'सत्यमेवा'शी लावली गेली तर 'सत्यमेवा'ची विक्री मंदावेल आणि त्यांचं अतोनात नुकसान होईल. त्याचप्रमाणे सत्यमेवावरील 3D प्रोग्राम्स वापरून इतक्यातच शिक्षण क्षेत्रातही हातभार लागतो आहे त्याच्यावरही विपरीत परिणाम होईल. या सर्व प्रकाराचा शोध लागल्यास ते एक तगडी रक्कम द्यायला तयार आहेत, हे सांगणे न लगे'.
'रियली?' अमरेंद्र म्हणाला.
'तुमच्यापासून काय लपवायचं? आधी चारच मृत्यू झाले असताना ते आमच्याकडे आले. त्यांना ते प्रकरण दाबून टाकायचं होतं; पण त्याचा सुरुवातीचा तपास सुरू असतानाच आणखी दोन मृत्यू झाले तेव्हा त्यांचं धाबं दणाणलं', इन्स्पेक्टर समर म्हणाले.
'इंटरेस्टिंग', अमरेंद्र म्हणाला. 'आम्हांला कशा प्रकारची माहिती लागते हे तुम्ही जाणताच आणि तुम्ही आधी त्यातली बरीचशी गोळा केली असेल याची मला खात्री आहे'.

खिशातून एक यूएसबी स्टिक काढत इन्स्पेक्टर समर म्हणाले, 'अर्थातच. यावर त्या बायकांची माहिती, त्यांच्या मृत्यूचे तपशील, त्यांच्या नातेवाईकांच्या इन्टरव्ह्यूचे ट्रांस्क्रिप्ट, त्यांच्या सत्यमेवांवरील ॲप्सच्या याद्या, कॉन्टॅक्ट नंबर्स आणि तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्या पोलिस अधिकाऱ्यांना आधीच सांगितलं आहे की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट कराल. ते तुम्हाला हवं ते सहकार्य देतील. सध्या या बातम्या बाहेर न पडू देण्याची दक्षता आम्ही घेतली आहे. तुम्हीही तसंच कराल हे माहीत आहे, पण कर्तव्य म्हणून मी नमूद करून ठेवतो'.
'धन्यवाद, इन्स्पेक्टर. तुम्हाला आमच्या कार्यपद्धतीची कल्पना असल्यामुळे तुम्ही हे जे आधी करता त्यामुळे आम्हांला बरीच मदत होते. या केसमध्ये मात्र कदाचित आणखी काही करावं लागेल'.
'आणखीन? काय?'
'या विविध ठिकाणच्या पोलिसांना आम्ही जे करायला सांगू ते नीट करता येईलच असं नाही. त्यामुळे कदाचित तुम्हाला स्वतःला तिथे जावं लागू शकतं'.
'हं. असं होऊ शकेल याचीपण मला कल्पना होतीच', किंचित त्रासिक आवाजात इन्स्पेक्टर समर म्हणाले.
अमरेंद्र आणि इन्स्पेक्टर समरचं बोलणं सुरू असतानाच युवराजने यूएसबीवरील माहिती संगणकावर डाउनलोड केली. आता संगणकावर एक नकाशा दिसत होता आणि त्यात सहाही शहरे. ती शहरे त्याने एका पॅटर्नने कनेक्ट केली होती.
नकाशाकडे बघत युवराज म्हणाला, 'इन्स्पेक्टर, तुम्ही आधी लखनऊला जा, मग कलकत्त्याला, मग रामेश्वरम, मग तंजावूर, मग मैसूर आणि मुंबई.
'आणि हे कसं ठरवलं'?
'अर्थात 'ट्रॅव्हलिंग सेल्समन अल्गोरिदम' चालवून. जर वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर ते कोणत्या क्रमाने गेल्यास सर्वात कमी वेळ लागेल आणि कमी त्रास होईल, हे यावरून शोधता येतं. अर्थात सहाऐवजी सहाशे शहरं असतील तर ते खूपच क्लिष्ट असू शकतं. हा एक महत्कठीण प्रश्न आहे', असं म्हणत युवराजने एक प्रिंटाऊट इन्स्पेक्टर समरच्या हातात दिला.
'सहाशे? सहाच्या पुढे या केसेस जाण्याआधीच तुम्ही या प्रकाराचा छडा लावाल अशी आशा करू या', पन्ह्याचा ग्लास खाली ठेवत इन्स्पेक्टर समर म्हणाले.

#

अमरेंद्र-युवराजची कीर्ती अवाजवी नव्हती. युवराजची डेटा गोळा करण्यातली आणि त्या डेटाचं सोनं करण्याची हातोटी जगजाहीर होती; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींचे एकमेकांशी संबंध जोडणं यात अमरेंद्रचा हात कोणी धरू शकलं नसतं. शक्‍यतोवर दोघंही आर्मचेअर डिटेक्टिव्ह होते. गरज पडली तरच स्वतः बाहेर पडायचे.

इन्स्पेक्टर समर गेल्यानंतर तासभर युवराज त्यांनी दिलेल्या डेटाचं पृथक्करण करण्यात गुंतला होता. त्या अनुषंगाने त्याने आणखीही बरीच माहिती गोळा केली. त्या बायकांचे स्वभाव, त्यांची मेडिकल हिस्ट्री, त्या अनेकदा जात त्या जागांची माहिती, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांच्या घरच्यांचे स्वभाव वगैरे. आणि त्या सर्वांमधली कोरिलेशन्स. अपेक्षेप्रमाणे त्या सर्वांच्या सत्यमेवावर साधारणपणे सगळ्यांकडेच असतात तसे काही कॉमन प्रोग्राम होते: व्यायामाचे; टेनिस, क्रिकेट सारख्या खेळांचे; काही सिनेमे वगैरे. प्रत्येक घरात साधारण एखादेच सत्यमेवा डिव्हाइस असायचं आणि घरचे अनेक सदस्य ते वापरत, त्यामुळे त्यावरचे प्रोग्राम्स हे एकाच व्यक्तीने गोळा केलेले असणार याची काहीच शक्यता नव्हती. युवराजने ही सर्व माहिती अमरेंद्रला दिली.

'युवराज, त्या बायका नेमके कोणत्या ॲप्स वापरायच्या हे आपल्याला कसं कळेल? भारतातल्या साठीच्या बायका व्यायामाची ॲप्स वापरत नसतीलच असं नाही, पण त्या सगळ्याच ते वापरत असतील असंही नाही. त्या किती काळ सत्यमेवा वापरायच्या याची कल्पना आहे का?', अमरेंद्र म्हणाला.
'त्या घरांमधले कोण किती वेळ सत्यमेवा वापरायचे याची माहिती माझ्या डेटाबेसमध्ये आहे. त्यांच्या परिसरातील त्यांच्या वयाचे लोक कोणते ॲप्स वापरतात त्याचीपण माहिती मी गोळा करतो आहे. अनेकदा पियर प्रेशरमुळेच बरेच ॲप्स वापरले जातात. या सहा मृत बायकांबाबत बोलायचं झालं तर असं दिसत आहे की त्या ठरावीक वेळी सत्यमेवा वापरायच्या'.
'ठरावीक वेळी म्हणजे ते कोणत्यातरी रुटीनप्रमाणे असावं. त्या बायकांचा एकमेकींशी संबंध होता काही?'
'अं, नाही'.
'त्या सत्यमेवा उभ्या राहून वापरायच्या की बसून हे शोधता येईल का? त्यावरून देखील कळू शकेल कोणत्या प्रकारचे ॲप्स त्या वापरायच्या ते'.
'हं. नक्कीच शोधता येईल. एक मिनिट. मी घरच्यांच्या इंटरव्यूजवर नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग रन करतो आहे. एक मिनिट... ...खरंच की. असं दिसत आहे की त्या देवासमोर बसून सत्यमेवा वापरायच्या. म्हणजे धार्मिक ॲप की काय?'
'प्रार्थनेसारखं काही? चांगला अँगल आहे'.
'त्याप्रकारचे कॉमन एकच ॲप दिसतं आहे. करुप्पु थेनकलाई नावाचं.'
'थेनकलाई?', अमरेंद्रने विचारलं.
'गुगलच्या म्हणण्याप्रमाणे हा वैष्णवांचा तमिळवर आधारित एक सेक्ट आहे.'
'हं. आणखी माहिती मिळव. इतर किती लोकांकडे ते ॲप आहे हे पण. मी भांडारकरच्या प्रोफेसर सावंतांना कॉन्टॅक्ट करतो. आणि हो, ते ॲप डाऊनलोड कर आपल्या सत्यमेवावर. पण वापरताना काळजी घे. आपल्याला सातवा मृत्यू इथे व्हायला नको आहे'.
'तू तर ठरवूनच टाकलेलं दिसतं आहे की सत्यमेवामुळेच त्या बायका मृत्यू पावल्या'.
'मृत्यू पावणे किती गोड वाक्प्रचार आहे ना? धर्मामुळे मृत्यू प्राप्त झाला तर त्यापेक्षा पावन काय? नाही, सत्यमेवामुळेच त्या मेल्या असं मी ठरवलेलं नाही. पण ती कॉमनालिटी डावलूनपण चालणार नाही'.

#

दोन तासांनी जेवायला दोघं किचनमध्ये भेटले तेव्हा दोघांजवळही सांगण्यासारखं बरंच काही होतं.
'अमरेंद्र, ते ॲप डायरेक्टली डाउनलोड करता येत नाही. मार्केटप्लेसवरती उपलब्ध नाही. मग मी इन्स्पेक्टर समरला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सुरुवात मुंबईमधून करायची ठरवली. मुंबईमधल्या मृत देशपांडे बाईंच्या सत्यमेवावरून ते ॲप त्यांनी डिजिटली ट्रान्सफर केलं आहे. जेवण झाल्यावर मी तुला ते दाखवतो. त्यातल्या इमेजेस …'
'थांब युवराज. पुढे बोलू नकोस. आधी मी काय सांगतो ते ऐक. त्यामुळे दोन्ही अँगल्स एकत्र येतात का ते आपण पाहू शकतो.'
'ठीक, बोल'.
'प्रोफेसर सावंतांनी मला सांगितलं की वैष्णवांचे दोन प्रमुख सेक्ट असतात - थेनकलाई आणि वडकलाई. पण हे तुझ्या डेटाबेसमध्ये आतापर्यंत आलंच असणार. या दोहोंमध्ये अर्थातच अनेक उपशाखा आहेत. थेनकलाई हे तमिळवर आधारित तर वडकलाई हे संस्कृतशी जास्त संबंध असलेलं. मृत्यूविषयी या दोन सेक्ट्सच्या कल्पनांबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की थेनकलाईचा वेदांशी तसा संबंध नाही, पण त्यांच्या एका उपशाखेत कृष्ण-यजुर्वेदासारखंच काही आहे. करुप्पु थेनकलाईमधल्या करुप्पुचा अर्थ काळा असा आहे'.
'म्हणजे तांत्रिक?'
'एक्झॅक्टली. प्रोफेसर सावंतांच्या म्हणण्याप्रमाणे साधारण दोन वर्षांपूर्वी थेनकलाईची मूळ जागा, श्रीरंगमजवळ अनेक ग्रंथ सापडले. या ग्रंथांबद्दल मात्र त्यांना आणखी माहिती नव्हती. ए. एस. आय.च्या डॉक्टर मलिकांचा नंबर त्यांनी दिला'.

जेवता जेवता युवराजचं नोट्स घेणं सुरूच होतं. तो म्हणाला, 'पुढे बोल'.
डॉक्टर मलिक म्हणाले की श्रीरंगमला जे ग्रंथ सापडले त्यात आधी क्वचितच दिसलेल्या विष्णूच्या अनेक आकृत्या होत्या, आणि जर माझा कयास बरोबर असेल तर तुझं ॲपदेखील विष्णू-संबंधित असावं'
'तुझ्या क्लूजवरून तू ते ओळखलंस यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही. ॲप्समधली चित्रं बरीच विचित्र आहेत. खरं तर मी विचित्र म्हणणार नाही, वेगळी केवळ. एका चित्रात तर विष्णूच्या एका हातात सुदर्शनचक्र, एका हातात नारायणास्त्र, एका हातात शारंग धनुष्य, आणि एका हातात नंदक तलवार. विष्णू जणू शिवाचा अवतार घेऊन कुणा दानवाच्या संहाराला निघाला असावा'.
'सगळं ॲप पालथं घालून झालं तुझं? तसं तू करायचं नाही आपलं ठरलं होतं ना?'
'सगळं कुठलं होतं आहे. एखाद्या भूलभुलैयाप्रमाणे त्या चित्रांच्या अनेक सिरीज आहेत. पुन्हा पाहून पाहून त्यानंच खरं तर भोवळ येणार. कदाचित असं होऊ नये म्हणून आणखी ही देवांची काही चित्रं अधूनमधून आहेत. वेबसर्चेसवरून असं दिसून आलं की ती सर्व चित्रे श्रीरंगमच्या रंगनाथ स्वामी मंदिरातील आहेत. म्हणजे श्रीरंगमचा धागा पण जुळतोय.'
'पण ॲपने असं होणार तरी काय? आपण अगदी चुकीच्या मार्गावर तर नाही? त्या सगळ्या बायका वैष्णव होत्या?'
'हिंदू होत्या पण वैष्णव नसाव्या. मुंबईच्या देशपांडे, तर कलकत्त्याच्या बॅनर्जी'.
'हं. तू तुझं ॲनालिसिस चालू ठेव'.
'थोडं आधीच झालं आहे', युवराज हसत म्हणाला.
'अरे, सांग की मग!'
'तुलाच तर आणखी क्लूजशिवाय सगळं शोधायचं होतं.'
'ठीक आहे, बोल तू.'
'विष्णूच्या आयुधांचे सिक्वेन्सेस परमुटेशन्सप्रमाणे आहेत. सर्व आयुधं येतात पण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. चारपेक्षा जास्त आयुधं असल्यामुळे पॅटर्न जास्त आहेत. पाहा, चारचा फॅक्टोरियल २४ त्याचप्रमाणे साताचा फॅक्टोरियल ५०४०. पण ॲपमधल्या चित्रांची संख्या त्यापेक्षाही किती तरी जास्त आहे. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की वेगवेगळ्या आयुधांची संख्या सात नसून दहा आहे. आणि दहाचा फॅक्टोरियल आहे ३६ लाखापेक्षा जास्त. ॲपमधल्या चित्रांचे पॅटर्न शोधू पाहणारे प्रोग्राम्स संगणकावर चाललेले आहेत. ॲपच्या क्रेडिट्समध्ये कोणतीच नावं नाहीत'.
'क्युरिअसर ऍंड क्युरिअसर. मी बोलतो पुन्हा डॉक्टर मलिकांशी.'

#

दुसऱ्या दिवशी लंचच्या वेळी अमरेंद्रने विचारलं, 'युवराज, गणपतीचं चित्र आहे का तुझ्या सिक्वेन्सेसमध्ये?'
'नाही', युवराज म्हणाला.
'गणपतीच्या दर्शनानेच सगळ्याची सुरुवात होते आणि तरीही गणपती नाही. हेही जुळतंय'.
'कशाशी? पण थांब आज आधी मी तुला सांगतो मला काय सापडलं ते. सिक्वेन्समध्ये केवळ परमुटेशन्स नाहीत तर सुपरपरम्युटेशन्स आहेत - म्हणजेच परमुटेशन्सचे सगळे कॉम्बिनेशन तेही अशा प्रकारे केलेले की कमीतकमी चित्रं लागतील'.
'सुपरपरम्युटेशन्सचा अल्गोरिदम? म्हणजे नक्कीच एखाद्या गणितज्ञाचा यात हात असणार. The Melancholy of Haruhi Suzumiya मालिकेशी संबंधित एका कोड्यामुळे तो प्रकार इतक्यातच प्रकाशात आला होता'.
'आठवतंय खरं काही तरी त्या संबंधीचं. तुला काय सापडलं?'
'डॉक्टर मलिकांच्या म्हणण्याप्रमाणे एक थोडी विचित्र कल्पना थेनकलाईच्या एका सबसेक्टमध्ये आहे. तुला 'नाईन बिलियन नेम्स ऑफ गॉड' आठवतंय?'
'आर्थर सी क्लार्कची गोष्ट? ती कशी विसरणार? काय भन्नाट कल्पना आहे - देवाची सगळी नावं लिहून झाली की विश्वाचा अंत होणार'.
'अशा गोष्टी मानणारे लोक खरंच असतात. या सेक्टच्या आख्यायिकांनुसार विष्णूची सगळी आयुधं असलेली सगळी रूपं पाहून झाली की तुमचा अंत होणार - सॉरी, तुम्हाला वैकुंठ प्राप्त होणार'.
'काऽय?', युवराज म्हणाला.
'हो ना. माझी ही पहिली रिॲक्शन तशीच होती. पण आता या सुपरपरम्युटेशन्सबद्दल ऐकून तसा विश्वास असणारे लोक खरंच असावेत असं वाटतंय'.

अमरेंद्रचं बोलणं सुरू असतानाच युवराजने कंप्युटेशन सुरू केलं होतं.
'दहा चित्रांची परम्युटेशन्स साडेतीन लाख. प्रत्येक आयुध साडेतीन लाख वेळा म्हणजे ३६ लाख. प्रत्येक चित्रात चार आयुधं म्हणजे नऊ लाख चित्रं. एका सेकंदाला एक चित्र या हिशोबाने जवळजवळ शंभर दिवस लागतील हे पाहायला... २४ तास जर तेच केलं तर.'
'आणि सुपरपरम्युटेशन्सचा अल्गोरिदम वापरल्यास हे दहा आयुधांबाबत साधारण नऊ पटीने कमी होणार. नऊ लाख चित्रं न पाहाता लाखभरच चित्रांमध्ये मोक्षप्राप्ती होणार. नऊ लाख चित्रं पहावी लागली असती तर डोकं फिरलं असतं. त्याआधी मोक्ष ही कल्पना काही वाईट नाही.'
'अरे, ते भलेही मानतील की असा मोक्ष मिळेल म्हणून, पण तुझ्या बोलण्यावरून असं वाटतं आहे की तुलाही ते पटतं आहे', युवराज म्हणाला.
अमरेंद्र हसला आणि म्हणाला, 'अर्थातच माझा विश्वास नाही. पण अनेकदा कुणाचा जर विश्वास असेल आणि ती गोष्ट झाली तर त्यामुळे जे फळ मिळेल असं सांगितलं असतं, त्याकरता कदाचित ते इतके तयार असतात की त्यामुळे मृत्यूपण होऊ शकेल. आपण मात्र आपलं कार्य करायचं. शोधून काढू या हे प्रोग्रामर-गणितज्ञ कोण असतील ते. पुढचं काय करायचं ते पोलीस ठरवतील.'

#

आधीच्याच वेगाने नंतरच्या घटना घडल्या. युवराजने त्याच्या डेटा मंजींगच्या कौशल्याने यादवअय्या आणि तेजस्वी यांचा संबंध शोधून काढला. त्यांच्या उलटतपासण्या झाल्या, तेजस्वीने प्रकाशच्या मदतीने त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून ते ॲप बनवल्याचं कबूल केलं.

सहाही मृतांच्या डॉक्टरांशी बोलून झालं. मृत्यू ॲपमुळे झाला हे सिद्ध करणं अशक्य आहे हे दिसत होतं. मृत्यूच्या कारणाची नोंद वय आणि व्हर्टिगोच्या कॉम्बिनेशनमुळे अशी झाली. मात्र ते ॲप ब्लॅंक ऑटो अपडेटने फोन्सवरून काढून घेतलं गेलं. यादवअय्यांना त्यांच्या मंदिराच्या परिसरात या प्रकाराचे मूळ असल्यामुळे तंबी मिळाली, इन्स्पेक्टर समरला केसचं क्रेडिट. तेजस्वीला फलानींनी त्यांच्या कंपनीत ठेवून घेतलं. अमरेंद्र युवराजला त्यांचा तगडा चेक तर मिळालाच, पण करुप्पु थेनकलाईची एकमेव डिजिटल कॉपीपण आता केवळ त्यांच्या संग्रही होती.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचतो आहे.
वाचली .छान आहे. काहीतरी नवीन वाचायला मिळाले.
थांबू नका. अजून लिवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट वाचताना नवलचा दिवाळी अंक वाचत आहोत असं वाटलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाईन बिलियन नेम्स ऑफ गॉड'

हेच डोक्यात येईपर्यंत युवराजचं वाक्य आलंच. रेझोनन्स.

मस्त आहे कथा - (अजून वाढवता आली असती अशी रूखरूख वाटली).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0