परीक्षा

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

परीक्षा

- म्रिन

बरोबर साडेसहाला शर्मिष्ठा चालायला बाहेर पडली. एवढा पाऊण तास ती कटाक्षाने मोबाइल दूर ठेवायची. गाणीही नको असायची तेव्हा. सकाळी चालता चालता स्वत:शी होणाऱ्या गप्पा तिला फार आवडायच्या. पाच मजले उतरून ती खाली आली आणि चालू लागली.

डोक्यात दिवसभराचे विचार घोळू लागले. ऑफिसनंतर संध्याकाळी डिनरला जायचं होतं, जर्मनीहून बाॅसेस आले होते त्यांच्या सोबत. वर्ष संपायला काही दिवस असतानाच त्यांचं टारगेट टप्प्यात आलं होतं, तेच साजरं करायला डिनर होतं. बीकेसीतल्या सोफिटेलमध्ये. तिथे फूड फेस्टिवल सुरू होता, जर्मन बाॅसला खास मराठी फूड खिलवायचा विचार होता तिचा. साडी नेसायची हे नक्की होतं, एरवीही ती बऱ्याचदा साडी नेसत असे.

'शम्स! hey babe...'
शम्स?

किती वर्षांनी ही हाक कानावर आली तिच्या. दिल्लीतल्या तिच्या काॅलेजमधल्या अगदी जवळच्या ग्रूपमधलं हे तिचं लाडाचं नाव. शर्मिष्ठा नाव उच्चारायला तिच्या कॅथलिक, पारसी मित्रमैत्रिणींना जड जायचं. त्यामुळे तिची झाली शम्स. त्या ग्रूपशी काॅलेज संपल्यानंतर संपर्कच उरला नव्हता. मास्टर्सनंतर ती आयआयएम अहमदाबादला गेली, कोणी दिल्लीतच राहिलं तर कोणी परदेशात. आयआयएममधून बाहेर पडताना तिलाही यूकेला जायची संधी मिळाली होती, पण तिला मुंबईत राहायचं होतं काही वर्षं तरी. म्हणून जरा कमी पॅकेज असूनही तिने बायरची नोकरी स्वीकारली होती. चार वर्षांनंतर आता फायनान्स खात्यात ती पश्चिम भारत विभागातली दुसऱ्या क्रमांकाची बाॅस होती. आईवडील तिच्या धाकट्या बहिणीजवळ राहात होते, इंदूरला, तिला जुळ्या मुली होत्या, त्यांना सांभाळायला मदत म्हणून. त्यामुळे दिल्लीवारी बंदच होती सध्या.

रस्त्याच्या पलिकडे एक लंबूटांग तरुण उभा होता. तोच तिला हाक मारत होता.
ओह, नौशीर.
चक्क नौशीर?
इथे, मुंबईत?
ती धावतच पलिकडच्या बाजूला गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. तोही ट्रॅकसूटमध्ये होता, म्हणजे इथेच जवळपास राहात असावा. मग इतक्या दिवसांत कधीच का नाही भेटला आपल्याला? दिसलाही नाही. काय करतोय काय तो इथे? वगैरे वगैरे प्रश्न तात्पुरते मनात ठेवून ती मिनिटभर त्याच्या मिठीत उभी राहिली.

'यार, तू यहाँ कैसे? मी इथेच राहते, मागच्या काॅलनीत. तू इथे काय करतोयस, कधी आलास, मला काहीच कसं ठाऊक नाही?'
'Hey hey, chill. एका वेळेस एक प्रश्न प्लीज. मी अजून तसाच आहे पूर्वीसारखा, क्या कहती थी तुम? हं, बुडबक.'
ती इतक्या जोरात हसायला लागली की, बाजूने धावणारा शाॅकिंग ग्रीन शूज घातलेला तरुण थांबलाच एकदम. त्याला साॅरी साॅरी असा हात करत म्हणाली, 'ओके, सांग मला.'
'अगं, मी मागच्याच आठवड्यात इथे राहायला आलोय, त्या टाॅवरमध्ये.'
त्याने लांब हायवेजवळच्या एका टाॅवरकडे बोट दाखवलं.
'आज सकाळीच फिरायला जायला सुरुवात केली आणि समोर साक्षात तू.'
'ग्रेट. जाॅब इकडे आहे? कुठे?'
'मिलेनियम पार्क, रामादा इन.'
'वाॅव, नवी मुंबई!'
'माझा नंबर घे,' त्याच्या हातात मोबाइल पाहून म्हणाली. 'मिस्ड काॅल देऊन ठेव, माझ्याकडे फोन नाहीये आत्ता.'
'अजूनही तीच सवय आहे वाटतं?'
ती हसली.

मग दोघं सोबत चालू लागले. तिला वेगात चालायची सवय होती. नौशीरच्या लांबसडक टांगा तिच्या साथीने पडू लागल्या. दोघं मागच्या काही वर्षांत काय काय केलं, कोण भेटतं, कुठे आहे, याबद्दल बोलत राहिले. तिच्या काॅलनीच्या गेटपर्यंत ते पोचल्यावर लंचनंतर फोन करते, असं सांगून तिनं त्याला जवळ घेतलं आणि बाय केलं.

तिच्या डोक्यातलं घड्याळ म्हणत होतं, आज अर्ध्या तासाच्या ऐवजी किमान एक तास झालेला आहे, घरी जाऊन पटापट आवरायला हवंय. तरीही ती रोजच्यासारखी पाच मजले चढूनच वर गेली, दारातले पेपर काढले नि आत गेली.

कालचं दूध होतं फ्रिजमध्ये ते काढून ठेवलं आणि ती आंघोळीला निघाली. अचानक तिला आठवलं की, साडीबद्दल विसरलोच आपण. आता ते ठरवण्यात आणखी वेळ जाणार.

साड्यांचं कपाट उघडलं. तिच्या साड्या नीट लावलेल्या होत्या, मऊ पंचात किंवा जुन्या सुती ओढण्यांमध्ये बांधून ठेवलेल्या. सुती साड्या वेगळ्या, फाॅर्मल फंक्शनच्या वेगळ्या, लग्नसमारंभांना नेसायच्या वेगळ्या आणि ऑफिसच्या वेगळ्या. काही साड्या तिच्या आईच्याही होत्या त्यात. आईची कांजीवरम नेसायची ठरवली होती तिने, काढलीही होती बाहेर. पण ती आत ठेवली आणि एक साधी पण उठून दिसेल अशी जामदानी निवडली. त्याच्यावर बिनबाह्यांचा ब्लाउज आणि मोठे चांदीचे कानातले. तयारी करून ती बाथरोब घेऊन आंघोळीला गेली. जाताना घड्याळ पाहिलं तर नेहमीपेक्षा २० मिनिटं पुढे होता काटा.

अंघोळीहून येऊन ब्लाउज, पेटिकोट चढवून ती स्वयंपाकघरात गेली. दूध जरा रूम टेम्परेचरला आलं होतं. कपात नेस्कॅफे घातली, अर्धा चमचा साखर. चमचाभर पाणी घालून खूप ढवळलं, वरून दूध घालून मायक्रोमध्ये अर्धं मिनिट गरम केलं. काॅफीच्या वासाने ती सुखावली. आणि तिला आईच्या हातच्या काॅफीची आठवण आली अचानक. आईच्याच हातची काॅफी लागायची तिला कायम. एक सुस्कारा सोडून तिने कप हातात घेऊन एक्स्प्रेसवर फक्त नजर फिरवली, आज वाचायला वेळ नव्हता. कॅल्विन अँड हाॅब्स मात्र चुकवलं नाही, त्याशिवाय तिचा दिवस सुरूच होऊ शकत नव्हता. मिंट पर्समध्ये टाकला आणि काॅफीची चव घेत घेत तिने फोन हातात घेतला. मेसेजेस पाहिले, संध्याकाळच्या डिनरचं रिमाइंडर होतं, त्या मेसेजला 'येस, शुअर' रिप्लाय टाकला. फ्रिजमधनं सफरचंद आणि स्ट्राॅबेरीज डब्यात घेतल्या. पाण्याची छोटी बाटली भरली. सगळं डब्याच्या पिशवीत ठेवलं. आज डबा करायला वेळ नव्हता.

मग आरशासमोर उभं राहून केस विंचरलेन हळुवार आणि साडी नेसायला घेतली. साडी तिची आवडती, एकदाच नेसलेली. एका मैफलीला जाताना, अर्थात नौशीरबरोबर.

घड्याळ पाहिलं तर रोजच्यापेक्षा दहा मिनिटं पुढे. ट्रेन कशी प्रवासात पिकअप करते वेळ, तसा आपण करतोय असं वाटून खुदकन हसली.

ओठांवरून लिपस्टिक फिरवली. मनगटाच्या आतल्या बाजूवर हलका अत्तराचा थेंब चोळला. सँडल्स चढवले. गाडीची, घराची किल्ली घेतली आणि निघाली.

आता मात्र ती लिफ्टने खाली उतरली. पार्किंगमध्ये जाऊन गाडीचं दार उघडलं, पर्स, डब्याची पिशवी साइडच्या सीटवर ठेवली. काचेवरनं फडकं फिरवलं आणि गाडीत बसली. फोनची काॅर्ड लावली, रशीद खानांचा भटियार लावला, खूप दिवसांनी. तरपत बीती सगरी रैना...

तिची वाइन रंगाची सियाझ बाहेर पडताना वाॅचमन काकांनी नेहमीप्रमाणे हात केला, त्यांना एक स्माइल देऊन ती निघाली.

दिवसभराच्या मीटिंग्स, संध्याकाळची पार्टी, आणि नौशीर. माँला सांगायला हवं, नौशीर भेटल्याचं. तिलाही आवडायचा तो. तिलाही? म्हणजे आपल्यालाही आवडायचा तो?

हो, आवडायचा की, त्यात काय गुपित आहे? चांगलीच गट्टी होती आपली. ती काय आवडल्याशिवाय होते?
पण पुढे काय झालं मॅडम?
पुढे काय व्हायचं असतं, एकत्र होतो तोवर होतो, मग मी इकडे आले, तो तिकडे गेला. त्यात काय?
इतकं सोपं होतं का ते? श्रेयांसचं काय आणि?
ए गप ना बये, शर्मिष्ठाने स्वत:लाच हटकलं आणि ऑफिसला पोचल्यावर माँला फोन करू असं ठरवलं. तोवर ती हायवेला लागली होती. श्रेयांसचा विचार मात्र तिच्या मनात रेंगाळत राहिलाच. त्या आठवणींनी ती काहीशी वैतागलीच. फारसा ट्रॅफिक नव्हता तरी तिला तो नकोस वाटायला लागला. कधी एकदा ऑफिसला पोचतोय आणि कामात बुडतोय असं होऊन गेलं.

ती दिल्लीहून अहमदाबादला आयआयएमला गेली त्याच सुमारास नौशीर कॅनडाला निघून गेला. त्याची मावशी होती तिथे. तिथे नक्की काय केलंन तिला माहीत नव्हतं. सुरुवातीला ईमेलवर संपर्कात होते दोघं, पण वर्ष दोन वर्षांत ते कमी होत होत बंद पडलं.

वडील लष्करातून निवृत्त झालेले होते त्याचे, पुण्यात राहायचे. त्यांची अतिरेकी शिस्त म्हणा की काय ठाऊक, पण तो दिल्लीतच जास्त रमायचा. एक छानसं घर भाड्याने घेऊन राहायचा, एकटाच. स्वयंपाकाची त्याला प्रचंड आवड होती. नेटवर रेसिपी शोधून तशा भाज्याबिज्या आणून ते बनवायचा प्रचंड शौक त्याला. त्यातलं काही फारच मस्त झालं तर तो शर्मिष्ठाकडे घेऊन यायचा. तिची माँ, त्याची दीपाआंटी, त्याचं कौतुक करायची तोंडभरून. आवडीने त्याने केलेला पदार्थ चाखायची आणि मग तिच्या हातचं काही त्याला खाऊ घालायची. "एकटा राहतो गं पोर!' त्यालाही त्याचं फार अप्रूप.

त्यांच्या ग्रूपमध्ये खूप मोकळेपणा होता. प्रोजेक्ट, सबमिशन, आयव्ही, फेस्ट, स्पर्धा सगळ्यासाठी ते एकत्र असायचे. नौशीर एकटाच राहात असल्यानं प्रोजेक्ट बऱ्याचदा त्याच्या घरी राहून केले जात. त्यात तो हौशीने खायला घालणारा. सैन्य पोटावर चालतं, तसे विद्यार्थीही. शम्स, नौशीर, रेनी, सुहानी आणि माइक असे हे पाचजण होते. शम्स आणि नौशीर अशी जोडी होती, अंहं, रोमँटिक नाही. म्हणजे इतरांसाठी ते कपल होते कदाचित, पण त्यांनी तसं कधी वाटून घेतलं नव्हतं स्वतःबद्दल.

शम्स आणि नौशीर यांचं जमण्याचं आणखी एक कारण होतं संगीत. तो गिटार वाजवायचा. गँग जमली की त्याचं गिटार असायचंच बॅकग्राउंडला. आणि माइकचा माउथ आर्गन. तशीच दोघांनाही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड. दिल्लीत अनेक कार्यक्रम नेहमी होत असतात, जमेल त्याला हे हजेरी लावत. उस्ताद रशीद खान त्यांचे एकदम आवडते. चारपाच वेळा तरी त्यांनी त्यांची मैफल ऐकली होती. एका मैफलीत त्यांनी त्यांचा मारवा ऐकला होता. कार्यक्रमानंतर दोघं एका नशेतच घरी आले होते. कित्येक दिवस त्या सुरांच्या धुंदीत होते ते.

आज म्हणूनच आपल्याला रशीद खान ऐकावेसे वाटले की काय?
Oh woman, will you shut up now?

पंधरावीस मिनिटांत ती पोचली. केबिनमध्ये आली. पँट्रीला फोन लावून सँडविच मागवलं, आणि काॅफी.

मॅक ऑन केला, लाॅगइन केलं आणि ऑफिसचा मेलबाॅक्स उघडला. तिचा नियम होता की, अगदीच आकाश कोसळणार असेल तरच कामाच्या वेळाच्या नंतर ती ऑफिसचं मेल पाहायची. तिच्या जर्मनीतल्या वरिष्ठांनाही ते ठाऊक होतं, आणि ते तिचा मान राखायचे. खरं तर त्यांचा दिवस शर्मिष्ठापेक्षा तीन साडेतीन तास उशिराच सुरू व्हायचा, तरीही त्यांना तिचं वेळेबाबत काटेकोर असणं मान्य होतं. तिचे सहकारी त्रागा करायचे अर्थात, कारण उशिरापर्यंत बसणं म्हणजे जास्त काम करणं या गैरसमजातून ते बाहेर आलेले नव्हते. ती अगदी पहिल्या दिवसापासून याबाबतीत ठाम होती. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहा या वेळात ती ऑफिसची असायची. नंतरचा वेळ तिचा असायचा, त्यात ऑफिस अजिबात नाही.

तिने मेलला उत्तरं दिली. पाचसात मिनिटांत तिचं सँडविचही आलं. ते खाऊन काॅफी हातात घेऊन तिने माँला फोन केला.
'माँ, कशी आहेस? ब्रेकफास्टला काय केलंयस, आज मला वेळच झाला नाही काही करायला. मग आता ऑफिसात येऊन सँडविच खातेय.'
'का गं, का नाही वेळ झाला?'
'अरे, तेच तर सांगायला फोन केला. गेस मला आज कोण भेटलं असेल?'
'कोण गं?'
'दिल्लीतलं एक माणूस.'
'नौशीर?'
'ए, तुला कसं कळलं?'
'इतका आनंदाने तू फोन केलायस शर्मिष्ठा सकाळी सकाळी, नेहमीची तुझी ऑफिसातनं निघायच्या पूर्वीची वेळ टाळून, म्हणजे काेणीतरी स्पेेशलच असणार ना. दिल्लीत नौशीरशिवाय कोण होतं एवढं लाडकं?'
'काय गं माँ, जा मी ठेवते फोन, पुन्हा सुरू नको करू तुझी टेप.'
'अरेच्चा, फोन कोणी केलाय, आनंदात कोण आहे?'
'हं...'
'बरं ते सोड, काय म्हणतोय, कसा भेटला तुला?'
शर्मिष्ठाने थोडक्यात सांगितलं तिच्या माँला. आता तुम्ही या इकडे किंवा मी येते क्रिसमसच्या सुटीत, असं म्हणत तिने गप्पा संपवल्या.

नाताळला काहीच दिवस उरले होते. तिने दोनतीन वर्षांपूर्वीपासून मुंबईआसपासच्या एखाद्या संस्थेला कंपनीची सीएसआर ॲक्टिव्हिटी म्हणून काही मदत करायची प्रथा पाडली होती. नुसते पैसे देऊन थांबायचं नाही, तर कंपनीतल्या ज्यांना संस्थेला प्रत्यक्ष भेट द्यायची इच्छा असेल त्यांना घेऊन ती स्वत: एका शनिवारी ती तिथे जायची. यंदा त्यांनी नवी मुंबईतल्या एका महिलांच्या संस्थेला मदत द्यायचं ठरवलं होतं. तिने त्या संस्थेत फोन लावला, येत्या शनिवारी आम्ही येतोय असं सांगितलं. तशी एक ईमेल सगळ्या सहकाऱ्यांना केली.

नवी मुंबई म्हटल्यावर तिला नौशीरची आठवण आली. तोही घणसोलीलाच तर जातो कामाला. त्यालाही सांगू या याच्याबद्दल असा विचार तिच्या डोक्यात आला.

दुपारी साडेबाराची एक व्हीसी होती तिची, दिल्लीतल्या दोन सहकाऱ्यांसोबत. ती व्हीसी रूमला गेली, तिचा बाॅसही पोचलाच तेवढ्यात. दिल्लीतली मंडळी आली, हाय हलो झालं नि त्यांनी कामाचं बोलायला सुरुवात केली. पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग करत होते ते. टारगेट वगैरे नेहमीचं.

एरवी सगळ्या संवादात लक्षपूर्वक सहभागी असणारी शर्मिष्ठा आज काहीशी हरवलेली वाटतेय, असं दिल्लीतल्या एकीच्या लक्षात आलं. पण तिने चर्चा संपेपर्यंत विषय काढला नाही. महत्त्वाचं बोलणं झाल्यावर ती म्हणाली, 'क्यों जी, आज तबियत ठीक नहीं लगती शर्मिष्ठा आप की?'
'No no, I am fine,' म्हणत ती हसली गोडसं आणि मीटिंग संपवली.

आज डबा नव्हता, त्यामुळे तिने पास्ता ऑर्डर केला जवळच्या इटालियन रेस्तराँमधनं आणि नौशीरला फोन केला.
'Hey, what's up? At work?'
'Nope, on the way. 2-10 shift.'
'Oh oh. Had lunch?'
'Yes, have found a nice Maharashtrian food joint. So ate dal chaval n sabji roti. What about you?'
'साले, तेरे साथ बातें करते करते इतनी देर हुई सुबह की कुछ पकाने का टाइमही नहीं बचा. अब पास्ता ऑर्डर किया है, आता ही होगा.'
'अरे यार, मेरे होते हुए तुम बाहर का पास्ता खा रही हो, बहुत नाइन्साफी है.'
'ताे पकाओ जल्दी से, आती हूँ.'
'अच्छा सॅटर्डे करते है प्लान.'
'सॅटर्डे मुश्किल है. सुनो, मैं सॅटर्डे आ रही हूँ नवी मुंबई, हमारी व्हिजिट है एक विमेन्स ऑर्गनायजेशन में. तुम भी आ जाओ ना हमारे साथ.'
'नहीं यार, छुट्टी है, तुमही अपनी व्हिजिट निपटाके घर आ जाना, कुछ पकाता हूँ तुम्हारे लिए, बरसों बाद. खाएंगे, पिएंगे और ढेर सारी बातें करेंगे. क्या?'
'ठीक है, बाय देन.'
'बाय, एंजाॅय द पास्ता.'

तिने पास्ता खायला सुरुवात केली. तिला आवडतात तसे भरपूर ऑलिव्ह्ज, हालापेनो, मशरूम्स होते त्यात. खाता खाता पुन्हा श्रेयांस डोकावलाच विचारात.

तो तिला भेटला आयआयएममध्ये. मार्केटिंग शिकत होता, ती फायनान्स. बंगाली, जमशेदपूरचा होता त्यामुळे थोडी इतर भाषा, संस्कृती यांची ओळख तरी होती त्याला. दिसायला देखणा नव्हता फार पण त्याचे डोळे विलक्षण बोलके होते. आणि विनोदबुद्धी जबरदस्त. हुशार होताच. त्यांना प्रेमात पडायला वेळ नाही लागला. दिवसातला बराच काळ एकत्र घालवू लागले ते मग. आईवडलांनाही तिने थोडी कल्पना दिली होती त्याच्याबद्दल.

एका सुटीत ती त्याला घेऊन दिल्लीला गेली. तो आठवडाभर राहणार होता. मग त्यांनी फतेहपूर सिक्री आणि भरतपूर पक्षी अभयारण्य अशी २ दिवसांची ट्रिप करायचं ठरवलं. फतेहपूरला ती ३-४ वेळा जाऊन आली होती पण ती जागा तिची प्रचंड आवडती होती. तिथे श्रेयांसबरोबर जायचं ही कल्पनाच तिला सुखावून गेली. भरतपूरला जायचं अनेकदा ठरवून जमलं नव्हतं. त्याला तिथे नव्हतं जायचं फार मनातून. 'ताज महाल पाहिलाय ना, तिथे आणखी काय वेगळं असणार?' हो ना करता तो तयार झाला.

मग एके सकाळी ते निघाले, मुद्दाम विकांत टाळून, आणि फतेहपूरला पोचले. तिथे बांधलेले रंगीत धागे पाहायला तिला आवडायचं, काय काय कहाणी असेल प्रत्येक धाग्यामागे असा विचार ती करायची. तो फक्त फोटो काढत फिरत होता, काही तिचे, काही वास्तूचे, इतरांचे. अंधार पडायच्या सुमारास ते भरतपूरला पोचले. एका छानशा airbnb मध्ये बुकिंग केलं होतं त्यांनी. थंडी पडायला लागली होती दिल्लीतही, इथे तर अधिकच होती. गेल्या गेल्या गरमागरम चहा घेतला त्यांनी आणि त्या छानशा घराच्या हिरवळीवर बसून ते गप्पा मारत बसले. ८.३०लाच जेवायला या, असं बोलावणं आलं. गरम फुलके, आलू गोभी रस्सा, ताजा मुळा गाजर काकडी, लोणचं आणि साधी तडकेवाली दाल. 'भात हवा होता नाही,' श्रेयांस म्हणालाच. ती आठवडेच्या आठवडे भाताशिवाय राहू शकत असे, याला मात्र लागेच रोज एकदा तरी भात. अखेर जे समोर होतं ते भरपेट जेवून खोलीवर आले. तिने दुसऱ्या दिवशीची सगळी तयारी करून ठेवली. त्याने मात्र तशीच ताणून दिली. 'उद्या आवरू की, त्यात किती वेळ जाणारेय?'

दुसऱ्या दिवशी उजाडताच अभयारण्यात पोचायचं होतं. चहा पिऊन निघाले. '९ वाजता नाश्ता आणि १.३० वाजता जेवण घेऊन माणूस येईल, अमुक एक ठिकाणी येऊन थांबा,' अशा सूचना मिळाल्या. ही कल्पना तिला भारी आवडली. दोघांनी सायकली घेतल्या भाड्याने, तिथल्या पद्धतीनुसार आणि जंगलात घुसले. सोबत वाटाड्या होताच कारण तो नसेल तर निम्म्याहून अधिक पक्षी, प्राणी सामान्य माणसांना दिसणारच नाहीत तिथे. तेथे पाहिजे जातीचे, हेच खरं. श्रेयांसला मात्र ती कल्पना पटलेली नव्हती, आपण दोघंच जाऊ की, त्यात काय, नाही दिसले २-५ पक्षी तर काय बिघडलं, असा त्याचा सवाल. त्याला तर सायकल चालवायलाही जिवावर आलं होतं, पण दुसरा पर्याय एक दो एक दो हाच आहे हे कळल्यावर सायकल घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं. सारस क्रेन तिला पाहायचाच होता, इतकी वर्णनं वाचली होती तिने त्यांची. दुपारच्या जेवणासाठी एका छोट्या उद्यानात जायचं होतं, त्या वाटेवर त्यांना अखेर एक जोडी दिसली क्रेनची. रस्ता सोडून थोडं आत गेली ती. त्यांचं बाकदार शरीर, लांब मान, लाल डोकं... पाडस कादंबरीतला करकोच्यांच्या नृत्याचा प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. ती हरखून गेली. किती वेळ तशी उभी होती तिलाही कळलं नाही. श्रेयांसला ते सांगायला वळली तर तो दिसेना तिला शेजारी. ती आत गेली तेव्हा तोही आलाय असं वाटलं होतं तिला, मग गेला कुठे? घाबरून ती रस्त्यापाशी आली तर साहेब रस्त्यात पहुडलेल्या अजगराचे फोटो काढण्यात मग्न होते! कठीण आहे हा प्राणी, तिच्या मनात आलं.

जेवून, आणखी थोडा वेळ फिरून ते घरी परत आले आणि सामान आवरू लागले. तिचं ५ मिनिटात झालं सामान लावून, त्याचं मात्र अर्धा तास झाला संपेचना. शेवटी सगळं बॅगेत कोंबून बाहेर पडले ते. दोन दिवसांच्या सामानाची ही गत, मग मोठ्या ट्रिपला काय होईल, असं तिच्या मनात आल्यावाचून राहिलं नाही. अहमदाबादेत असताना ते कधी एक दिवसाच्या अनेक सहलींना गेले होते, कधी दोघेच, पण अनेकदा मित्रमंडळ असे सोबत. त्यामुळे हा अनुभव जरा तिला धक्का देऊन गेला. घरी परतल्यावर आईशी गप्पा मारताना हे उल्लेख करायचे तिने टाळले.

इतक्यात फोन वाजला आणि ती वास्तवात आली. शनिवारी भेट ठरली होती त्या संस्थेतून फोन होता, किती जण येतंय ते विचारायला.

मग ती शनिवारचा विचार करू लागली. त्या संस्थेबद्दल तिला एका वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीतून कळलं होतं. ती स्वत: एकदा तिथे जाऊनही आली होती. स्वच्छ परिसर, हसतमुख आनंदी स्त्रिया, आणि प्रत्येक जण कामात. परिसरातल्या दोनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना रोज सकाळचं नि संध्याकाळचं जेवण या महिला करून पोचवायच्या. त्यांचं घर त्यावर चालायचं, पण शर्मिष्ठाच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांची होणारी सोयही तितकीच महत्त्वाची होती. तिकडच्या मॅनेजर होत्या वसुधाताई. प्रेमळ परंतु शिस्तीच्या. स्वच्छतेवर कटाक्ष, जो स्वयंपाकघरात आवश्यकच असतो. शर्मिष्ठाचं गोत्र त्यामुळे कदाचित त्यांच्याशी चांगलंच जुळलं. ती त्यांना पुन्हा भेटायला उत्सुक होती.

आज तिला ऑफिसनंतर थोडा वेळ असणार होता. डिनर सातला होतं, सोफिटेल ऑफिसपासून फार लांब नव्हतं. मग तिने धारावीला तिच्या नेहमीच्या बॅगवाल्याकडे जायचं ठरवलं. नाताळला तिच्याच विभागातल्या एका ज्युनिअरसाठी ती सीक्रेट सँटा असणार होती. तिच्यासाठी छानशी पर्स घ्यायचं तिने ठरवलं. ओएनजीसीच्या ऑफिसशेजारी ते छोटंसं दुकान होतं, चक्क पार्किंगला जागा होती आज. ती दुकानात गेली, पटापट दोनतीन बॅग्ज घेतल्या.

नौशीरसाठीही काही घ्यावं का, तिच्या मनात आलं.

आणि पुन्हा श्रेयांस तडमडलाच.

त्याच्यासाठी घेतलेल्या पांढऱ्या शुभ्र कुडत्याला त्याने हातही लावला नव्हता कधी, तिने खास दुर्गा पूजेसाठी घेतला होता, तिच्या लाल पाड साडीला मॅचिंग. 'सफेद कपडे नहीं अच्छे लगते मुझे यार, समझा करो,' म्हणाला होता. एक सुस्कारा सोडून नौशीरसाठीही काही घ्यायचा विचार तिने तूर्तास मागे ढकलला. जरा पुन्हा एकदा भेटू या, मग ठरवू काय करायचं त्याचं ते. पुन्हा एकदा त्याच्यासोबतच्या दिवसांत तिला जायचं नव्हतं. ती पुढे निघून आली होती बरीच. तोही बदलला असेलच ना इतक्या वर्षांत. किंवा नसेलही. पण भेटल्याशिवाय काय ते कळणार नाही.

पावणेसात झाले, तशी ती दुकानातनं बाहेर पडली आणि गाडी पुन्हा बीकेसीकडे घेतली. सोफिटेलच्या दारात वॅलेच्या हातात गाडीची किल्ली दिली आणि ती रेस्तराँमध्ये शिरली. फूड फेस्टिवलच्या निमित्ताने खूप सजावट केली होती. एका बाजूला मराठी तर एका बाजूला दाक्षिणात्य जेवणाची सोय होती. बाॅस अजून आलेला नव्हता, सात वाजतच होते. मग ती वाॅशरूमला गेली, केस नीट केले. लिपस्टिक फिरवली पुन्हा एकदा ओठांवरनं. पर्समधनं अत्तर काढून एक थेंब लावला. साडी नीट केली आणि येऊन बसली. बाकीचे तिघे आलेच पाच मिनिटांत.

गावरान जेवणाची तिला एकदम भूल पडली, भरल्या वांग्याचे वासाने तिची भूक चाळवली. दुपारी फक्त पास्ता खाल्लाय याची जाणीव झाली तिला. तिने ब्रीझर घेतली, बाकीच्यांनी स्काॅच. ती अगदी जवळचं मित्रमंडळ सोबत असेल तरच हार्ड लिकर घेई. पिता पिता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. वर्ष किती पटापट संपलं, क्रिसमससोबतच आपला फायनान्शिअल इअर एंडही आला, सुटीत काय बेत वगैरे. तिचा जर्मन बाॅस अर्थात क्रिसमसला घरी जाणार होता. बाकीचे सहकारी क्रिसमसचा लाँग वीकेंड आल्याने जवळपास सटकायच्या बेतात होते.

शर्मिष्ठाने मात्र काहीच ठरवलं नव्हतं. इंदूरला जाईन कदाचित आईबाबांना भेटायला असं सांगून तिने वेळ मारून नेली. तेच सर्वांना पटण्याजोगं होतं.

मग त्यांनी जेवणाकडे लक्ष वळवलं. भरली वांगी, शेंगा चटणी, भाकरी, तुरीच्या दाण्यांची आमटी, दही, मिरच्यांचा ठेचा असा टिपिकल मेन्यू होता. बाॅससाठी तिने कमी तिखट मेथीची भाजी, भाकरी आणि दही सुचवलं. इतर दोघांना मात्र मलबारी जेवणात रस होता. तिला काही ते फारसं आवडत नव्हतं. आणि भरली वांगी समोर असताना इतर काही अशक्य होतं.

निघेस्तो साडेनऊ झाले होते. दहापर्यंत घरी पोचू असा तिने विचार केला आणि गाडी सुरू केली.

तिने मारवा लावला, रशीद खान यांच्या धीरगंभीर सुरांनी ती कसनुशी होऊन गेली एकदम. गाडी थांबवून रडून घ्यावंसं वाटायला लागलं तिला. का ऐकतोय हे आपण?

पण तिने सावरलं स्वत:ला आणि घरी आली. जड जड वाटत होतं तिला. नौशीर, श्रेयांस, काम, डिनर, सगळंच अंगावर आलं होतं. आज आंघोळही नकोशी वाटली तिला. तिने चेहरा धुतला, दात घासले, पाणी प्यालं माठातलं भरपूर आणि मुराकामीचं नवं पुस्तक घेऊन वेताच्या झुलत्या खुर्चीत बसली. झोप येईपर्यंत काहीतरी हवं होतं डोळ्यांसमोर. कथा संपत आली तेवढ्यात फोन वाजला. थोडीफार अपेक्षा होती तसा नौशीरच होता पलिकडे.
'काय करतेयस, लगेच झोपणारेस का?'
ती सरळ त्याला ये म्हणाली. तिलाही त्याच्याशी खूप काही बोलल्याशिवाय चैन पडणार नव्हतंच नाही तरी.

काॅलनीच्या गेटवर तिने फोन करून सांगितलं, तो येणार आहे असं.

'ये, किती बोलायचंय तुझ्याशी. इतके दिवस कुठे होतास सांग आधी. कॅनडाहून कधी आलास परत, का आलास, तिथे काय करत होतास...'
'काॅफी कर ना शम्स, जाम थकलोय.'
'ओके, आज मीही घेते तुझ्यासोबत. हल्ली रात्री उशिरा घेत नाही मी उत्तेजक पेयं,' डोळे मारत ती म्हणाली.
'ओहो, उत्तेजक पेयाची गरजच काय गं तुला, तू असतेस अशी सदा टवटवीत.'

शर्मिष्ठाने काॅफी आणेपर्यंत नौशीर तिच्या खुर्चीत जाऊन बसला होता. त्याला त्यातून खेचून उठवावंसं तिला वाटलं, पण ती थांबली आणि सोफ्यावर पाय वर घेऊन बसली.
'कॅनडात मावशीकडे गेलो. थोडे दिवस भटकलो इकडेतिकडे. मग कुकिंग पुन्हा सुरू करावंसं वाटलं, थोड्या मोठ्या स्केलवर. एक पारसी फूड ट्रक सुरू केला. पैसे थोडे माझे, थोडे आंटीने दिले.'
'काय होता मेन्यू?'
'धनसाकचं कनेडियन लोकांना रुचेल असं थोडं माइल्ड व्हर्जन, पात्रानी मच्छी आणि प्राॅन्स पुलाव. थोडेच पदार्थ पण रुचकर आणि पौष्टिक. वर्षभर ट्रक छान चालत होता. फार फायदा नव्हता होता पण तोटाही नव्हता.'
'मग?'
'अचानक एक दिवस नेबरहुडमधल्या कोणीतरी ट्रकची तक्रार केली आणि ट्रक बंद करावा लागला.'
'Oh no!'
'मग थोडे दिवस परत भटकलो. खूप नातेवाईक होते तिथे, त्यांना भेटलो. यूएसमध्ये फिरून आलो. परत काहीतरी करावंसं वाटलं आणि इंडियन फूड जाॅइंट सुरू केला. तोही छान चालत होता, पण एकट्याला मला ते झेपेना आणि तेही बंद केलं.'
'हे भगवान!'
'I know. मग मी चक्क सहा महिन्यांचा कुकिंग कोर्स केला आणि स्वयंपाकाचं नीट तंत्र शिकून घेतलं. तिथून दुबईला गेलो. एका हाॅटेलमध्ये नोकरी केली दोनेक वर्षं. पैैसाही कमावला आणि अनुभवही. So here I am.'
'What about girlfriends? How can a hot guy like you remain single for so long?'
'गर्लफ्रेंड होत्या गं. But not wife material.'
'And may I know what is that according to monsieur Nausheer?'
'You know, जिच्याशी मी तासनतास गप्पा मारू शकेन, गाणं ऐकू शकेन, साठीचा खडूस म्हातारा झाल्यावरही जिचं ऐकून घेईन, अशी. Actually if I get married now, the Parsi Panchayat will be so happy.'
'Then why don't you?'
'तेच तर. Waiting for the right girl. होती एक छानशी गर्लफ्रेंड. एकदा तिच्या बरोबर एका मॉटेलवर गेलो वीकेंडसाठी. तर तिने तिथे माझा 'दिल चाहता है'मधला समीर करून टाकला!'
'WTF!'
'हो ना, मग मी जरा घाबरलोच. आणि मुलींकडे पाहायचंच सोडून दिलं.'
'मग मुलांकडे पाहायला लागलास का?'
'Sadly no, not my cup of tea! ते सोड, तू का नाही केलंस लग्न अजून? इतकी शिकलीस, कमावतेयस, घर आहे मस्त.'
'म्हणूनच नाही केलं, आहे की सगळं.'
'कमाॅन, खरं सांग. कोणीच नाही आवडलं तुला आतापर्यंत? म्हणजे मी सोडून?'
'होता एक. श्रेयांस. IIM ला होता बरोबर. अल्मोस्ट साखरपुडाही झाला होता आमचा, पण काहीतरी गडबड झाली खरी. नाही गेलो पुढे आम्ही.'
'काय झालं म्हणजे नक्की?'
'माहीत नाही. चांगला होता. माझ्या घरी तितकासा नव्हता आवडला कोणाला, पण विरोध करावा असं काही नव्हतं त्याच्यात. लग्नाची बोलणी वगैरे नव्हती केली. त्याच्या आईवडिलांनाही नव्हते भेटले मी. प्रेमात तर पडले होतेच त्याच्या मी. पण लग्नाचं ठरवताना पाय मागेच खेचला गेला बघ.'
'का?'
'एक तर तो गेला बंगलोरला नोकरीसाठी. माझं ऑफिस मुंबईत. २-३ वेळा आम्ही वीकएंडला भेटलो वगैरे, पण मला ते लॉन्ग डिस्टन्स काही झेपलं नाही खरं सांगायचं तर. मग सरळ बाय बाय केलं एकमेकांना. त्यानंतर साधा मेसेजही नसेल केला आम्ही एकमेकाला.'
'ओह! I can imagine. पण मला एक कळत नाहीये की मी आवडत असताना तू त्याच्याकडे पाहूच कशी शकलीस? आवडायचाे ना मी तुला?'
'तुला काय माहीत आवडायचास मला ते? बोलला का नाहीस कधीच, विचारलं का नाहीस काहीच? दुबईत गेल्यावर तरी फोन करायचास, आले असते ना भेटायला तुला.'
'नाही केला खरंच फोन. ईमेल बंद झाले आपले ग्रॅजुअली. मग इथल्या कुणाशीच संपर्क नाही उरला. ममा तर मी कॅनडात असतानाच गेली, डॅड गेल्या वर्षी गेले, त्यामुळे त्यांच्याकडूनही काही खबरबात मिळायची शक्यता उरली नाही. अनेकदा वाटायचं, बोलावं तुझ्याशी. कॅनडात एकदा रशीद खानची मैफल होती, नाही गेलो पण. तुझी फारच आठवण आली असती आणि ते एकटा सहन नसतो करू शकलो. किती वेळा फोन हातात घेतला असेल तुझ्याशी बोलायला, पण मग भीती वाटायची. तू लग्न वगैरे केलेलं कळलं असतं तर मला वाईट वाटलंच असतं. दिल्लीत असताना मीच इतका अनस्टेबल होतो, माझं काहीच ठरलेलं नव्हतं, ग्रॅज्युएशननंतर काय करायचं, कुठे राहायचं. त्यात ममा नि डॅडही कधी मागे लागले नाहीत फार, उन को भी तो पता था ना मैं किस लेवल का च्यु... हूँ. और क्या पूछता था मैं? पूछता और तुम हाँ करती तो! इट वुड हॅव बीन अ डिझास्टर. आय वुंट नो हाउ टू रिअक्ट.'
'हं, कळतात बरं असली बोलणी. आणि मी काही प्रेमात बिमात नव्हते पडले तुझ्या. बरा होतास तसा, इतर दिल्लीवाल्या पोरांपेक्षा सेन्सिटिव्ह, त्यात इतका चविष्ट स्वयंपाक करणारा. अंधों में काना राजा...'

आता मात्र नौशीरने तिच्याजवळ येऊन तिला धपाटाच घातला आणि दोघं पूर्वीसारखे भांडू लागले, उशा फेकून वगैरे. तीनचार मिनिटांनी त्यांना प्रचंड हसू येऊ लागलं नि मारामारी थांबवली त्यांनी.
'अबे जरा घडी तो देख, एक बज चुका है रात का. चलो भागो घर.'
'ओहो, कितना थक गया हूँ. अब तुम मिली हो तो अकेले रहने का जी नहीं करता मेरा. रुक जाऊँ यहीं पे?'
'नो वे, चालता हो. मला खूप काम आहे उद्या...'
'दुष्ट.'
'आहेच मुळी तशी मी.'

...

शनिवारी सकाळी शर्मिष्ठा जरा आरामात उठली, फिरून आली. मस्त पोहे केले. भांडी आवरली, आठवडाभराचे कपडे मशीनला लावले. आंघोळ करून साधीशी साडी नेसून तयार झाली आणि संस्थेत पोचली. अकरापर्यंत सगळे सहकारी आले. त्यांनी सजावटीचं साहित्य आणलं होतं, संस्थेचं आवार रंगबिरंगी करून टाकलं. धनादेश तर दिलाच वसुधाताईंच्या हातात, पण खाऊही आणला होता सगळ्या बायकांसाठी आणि साड्या, नव्याकोऱ्या. त्याही दिल्या. वसुधाताईंनीही या गँगसाठी मेथीचे पराठे, चटणी, कोथिंबीरवडी आणि वर आलं घातलेला चहा असा साधाच पण चविष्ट बेत केला होता. बायकांशी गप्पा मारत मारत सगळ्यांनी यावर ताव मारला. दीडच्या सुमारास शर्मिष्ठाने आवरतं घेतलं. पुन्हा ऑफिसच्या वतीने नाही, पण आपल्याकडून वसुधाताईंना काहीतरी द्यायचं, त्यांच्याशी संपर्क ठेवायचा तिने नक्की केलं.

घरी येऊन ती सरळ झोपून गेली. संध्याकाळी नौशीरकडे जायचं होतं, स्वयंपाक नव्हता करायचा. पुढच्या आठवड्याची भाजी, फळं वगैरे आणायला उद्याचा दिवस होताच.

संध्याकाळी रॅपअराउंड स्कर्ट, त्यावर हाॅल्टर नेक टाॅप, लांब मोठ्या मण्यांची माळ अशी ती तयार झाली. नौशीरचं घर तसं जवळच होतं, गाडी काढायचा तिने कंटाळा केला. आरामात चालत साडेसातला त्याच्याकडे पोचली.

दारात उभी होती तेव्हाच खमंग ब्रेडचा दरवळ आला. काय केलं असेल त्याने ब्रेडसोबत, या विचारात बेल वाजवली.

लालभडक टीशर्ट, काळी शाॅर्टस, त्यावर निळा एप्रन अशा वेशातल्या नौशीरने दार उघडलं. त्याला पाहून ती दिल्लीतल्या त्याच्या बॅचलर पॅडवर पोचली होती एका क्षणात. काही फरक नाहीये या साल्यात, पारशांना वरदान असतं चिरतारुण्याचं ते याच्यावरून पाहून घ्यावं कोणी.
'काय करतोयस, ब्रेडच्या वासाने जाम भूक लागलीय हं मला.'
'हुमुस आणि ब्रेड. सोबत व्हाइट वाइन. आणि सलाड. Hope that makes madam, who is looking extremely pretty today, happy?'
'Oh wow, कित्ती दिवस झाले हुमुस खाऊन. मला नाही छान करता येत ते. Thank you so much dear.'
'My pleasure Ma'am.'

अव्हनचा अलार्म वाजला म्हणून नौशीर आत गेला, ती घरभर हिंडू लागली. एकटाच राहात होता तरी घर मात्र छान लावलं होतं त्याने. पसारा, धूळ तर नव्हतीच कुठे. पण फर्निचर, पडदे, भिंतींचा रंग, सगळं कसं परफेक्ट होतं. फर्निचर तर खूपसं अँटीक, त्याच्या पुण्याच्या घरनं आणलं होतं की काय. एक भलंमोठं पुस्तकांचं रॅक. त्याला दारं नाहीत, उघडंच. आणि एका बाजूला त्याचं गिटार. आयला, अजून वाजवतो हा. भारीच.
भिंतीवर आर. के. लक्ष्मणची दोन व्यंगचित्रं. सुतळीने विणलेला एक मोठा गणपती. या पारशांना गणपतीचं काय वेड असतं इतकं न कळे, आलंच तिच्या मनात.

तिचं निरीक्षण सुरू असताना नौशीर तिच्या शेजारी येऊन उभा राहिला.
'काय, ठीक लावलंय ना घर, पास झालोय ना मी?'
'ए, पास काय रे, एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट, जुन्या सिनेमात असायचं तसं.'
'आवडलं तुला?'
'अर्थात, किती छान लावलंयस. एकटा राहतोयस असं वाटणारही नाही कोणाला.'
'मेर्सी.'
'आलाय मोठा मेर्सीवाला. झालं का तुझं हुमुस? कावळे ओरडतायत पोटात.'
'चल, ग्लास काढ, वाइन ओत. तोवर मी खायला घेऊन येतो.'
'Cheers to "lost in the मेला and met on the streets' friends. Long live friendship.'
'Cheers.'

हुमुसमध्ये बुडवून तिने ब्रेडचा पहिला घास तोंडात टाकला नि त्या चवीने विरघळलीच जणू. भूक तर होतीच, पण नौशीरने जीव ओतून ते केलं होतं हे थेट पोचत होतं खाताना.

दोघांनी भरपूर खाल्लं, वाइनची बाटली संपवली. दोघांनी मिळून भांडी घासली, स्वयंपाकघर साफ केलं. आणि सोफ्यावर येऊन बसले.
'चाॅकलेट खाणार?'
'कुठलंय?'
'इतका माज?'
'डेअरी मिल्क नकोय मला म्हणून म्हटलं.'
'डार्क चाॅकलेट आहे, दुबईहून आणलेलं.'
'Oh Lovely.'
दोघं चाॅकलेट खात बसले. काही बोलावंसं वाटत नव्हतं त्यांना. इतक्या दिवसांनी ते भेटले होते पण दिल्लीबद्दल नव्हते बोलले फार. तिला आश्चर्य वाटायला लागलं होतं, आपण नाॅस्टॅल्जियाच्या प्रांतात घुसलोच नाही अजिबात. कसं काय बुवा?

आपण तर बोलत होतो आजबद्दल, उद्याबद्दल. काम, घर, शेजारी, दुष्काळ, पॅरिस, नमो, ट्रम्प, वगैरे वगैरे. त्याने एकदा श्रेयांसबद्दल विचारलं पण फार खोदून नाही, त्यामुळे तिला हायसं वाटलं.

दिल्ली वजा करूनही नौशीरमध्ये असं काही आहे, जे आपल्याला आवडतंय. इतक्या मोठ्या गॅपनंतर कोणी भेटलं, तर अनेकदा असं व्हायचं की, तासाभरानंतर विषय संपून जायचे गप्पांचे. पण आता असं नव्हतं झालं. ती पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीबद्दल असा विचार करत होती. तटस्थ नव्हे, पण वेगळ्या अंगांनी. श्रेयांसनंतर लग्नाचा विचार तिने केलाच नाही.

तिचे आईबाबाही फार मागे लागणारे नव्हते, तिला तिचं काम फार आवडत होतं. काॅलनीही छान होती तिची, माणसं एकमेकांना विचारून होती. आणि या मुंबईत वेळ घालवायचा कसा, हा प्रश्न पडणंच अशक्य होतं, इतकं काय काय घडत असायचं सारखं. तिची संध्याकाळ तर मोकळीच असायची, त्यामुळे गाण्याच्या मैफिली, दक्षिण मुंबईतल्या आर्ट गॅलऱ्या, क्वचित एखाद्या छान रेस्तराँमध्ये एकटीने जेवण, कधी नाटक, सिनेमा, मैत्रिणी... तिला कंटाळवाणं वाटायचंच नाही फार कधी. आणि वाटलंच तरी ती तो कंटाळा सहन करायची, त्याचा बाऊ करायची नाही.

मग नौशीरबद्दल असा विचार का आला मनात आज? खरंच आपल्याला हा आवडतोय की काय पूर्वीसारखा पुन्हा? दिल्लीतले त्याच्या सोबत घालवलेले दिवस, अभ्यास करतानाच्या रात्री, लाँग ड्राइव्ह, मेट्रोतला प्रवास, रस्त्यावर खाल्लेली मॅगी, प्रगती मैदान, दिल्ली हाट असं काहीबाही आठवू लागलं होतं. श्रेयांस त्यानंतर येऊनही त्याने तिच्या मनाचे कोपरे अडवून नव्हते ठेवले असे.

बापरे. किती ती तुलना सारखी सारखी.

तिच्या एकदम लक्षात आलं की, नौशीर तिच्याकडेच पाहात होता टक लावून.
'A penny for your thoughts.'
'तुझ्याकडेच ठेव तुझी पेनी.'
'सांग की गं.'
'इतक्या दिवसांत आपण का नाही एकमेकांशी काहीच संपर्क ठेवला? I mean, there is so much to talk about, we enjoy each other's company even after the big gap. It's almost as if मागील पानावरून पुढे चालू.'
'मी तर सांगितलं माझं कारण. तू सांग आता.'
'सांगितला की श्रेयांस चॅप्टर. नंतर नाही भेटलं तसं कोणी. आणि मी फार मजेत आहे सध्या.'
'एकटी होतीस तरीही तू मला फोन नाही केलास, ईमेल तर करूच शकली असतीस.'
'तूही नाही केलास, मग मला वाटलं उतना ही था साथ अपना. We had had our share of togetherness.'
'आणि आता?'
'आता काय?'
'आता काय वाटतंय?'
'खरं सांगू?'
'छे छे, खरं बोललेलं मला अजिबात आवडत नाही.'
'Grrrrr. नाही सांगत जा.'
'हा हा, बताओ ना, प्लीज.'
'तू भेटलास त्यानंतर मी किती तरी वेळा तुझाच विचार करताना स्वत:लाच पकडलंय. इतक्या वर्षांनंतरही असं का होतंय, तेव्हाच काही का नाही बोललो आपण, असं वाटतंय मला.'
'I get you. Totally. पण आता इतक्या जवळ राहतोय, तर भेटतच राहू ना नेहमी.'
'तसं नाही रे...'
'आता पुढची दोन वर्षं तरी मी मुंबईतच आहे. इतक्या वर्षांत बदललो असूच ना. असं मागील पानावरून पुढे चालू, फक्त पुस्तकात असतंय. तुझं माहीत नाही, पण मी मात्र जरा मॅच्युअरही झालोय या काळात,' त्याने डोळा मारला.
'तुला पण असंच वाटतंय माझ्यासारखं?'
'Yes and no?'
'हम से आया न गया, तुम से बुलाया न गया, असं होईल की काय आपलं?'
'Oh Shams.'
'I so love hearing that name. I kinda missed it after Delhi. You know, people in IIM are talented, so they didn't have a problem with my exquisite name. दिल्लीवालों जैसे नहीं थे वो, थँक गाॅड फाॅर दॅट!'
'अबे ओ, चूप कर. इतने घंटों से एक दिल्लीवाले के साथ हो, you have been thinking of him for last few days और अब देखो. Get lost...'
'ऐसा नहीं करना यार, प्लीज. एक गलती माफ...'
'Kiss and make up?'
'Why not? वो भी तो ट्राय करके ही देखना पडेगा ना, एक दूसरे की स्टाइल सूट करती है कि नहीं?'
'वापस एक्झाम लेने लगी तुम?'

यावर उत्तर द्यायच्या फंदात ती पडली नाही. त्याला जवळ घेऊन तिने त्याला खाऊन टाकायला सुरुवात केली. चाॅकलेट, हुमुस, वाइन, आफ्टरशेव्ह, थोडासा घाम यांचं असं काही मखमली मिश्रण झालं होतं नौशीरच्या ओठांवर की ती थांबलीच नाही काही मिनिटं. नौशीर या हल्ल्याने काहीसा बावरला, पण सावरून त्यानेही तिला तितकाच उत्कट प्रतिसाद दिला. दिल्लीतल्या त्याच्या पॅडवर त्यांनी एकमेकांचं चुंबन तर अनेकदा घेतलं होतं, पण ते वरवरचं होतं, त्या त्या वेळेची मागणी होती ती. आजची बात काही वेगळीच वाटत राहिली त्याला. मुरलेली चव होती त्याला. डोळे प्रयासाने उघडे ठेवून तो तिच्याकडे पाहात राहिला. ती मात्र बंद डोळ्यांनीच त्याला आजमावत होती.

फोन वाजला अचानक तशी ती भानावर आली. दहा वाजले होते, म्हणजे पांचा फोन. गुड नाइट म्हणायला केलेला.

'हाय पा, कसे आहात?'
'मी मस्त आहे शमी. कुठे आहेस? घरीच की भटकतेयस कुठे?'
'अं, नौशीरकडे आहे. माँने सांगितलं असेल ना तुम्हाला तो आलाय मुंबईत ते.'
'हो, हो. मग काय पकवलंन त्याने तुझ्यासाठी स्पेशल?'
'तुम्हाला कसं ठाऊक त्याने पकवलं असेल?'
'मग काय त्याच्या घरी जाऊन तू काय करणारेस? मी ओळखतो तुला पक्कं बेटा.'
'Oh Pa. He cooked amazing hummus and bread. With wine.'
'That's fantastic. घरी जाणारेस की तिथेच राहणारेस?'
'माहीत नाही, अजून गप्पा मारतोय आम्ही. आणि उद्या सुटी तर आहे.'
'I know. Whatever you are fine with. Good night then. Say hello to the young man.'
'Yes, I will. Good night Pa, love you.'
'Love you too शमी.'

'So, someone is open to the idea of spending a night here? Interesting...'
'ए, मारीन हं आता तुला.'
'It's just an observation after a conversation between a loving dad and his pampered daughter.'
'मोठा आला observation करणारा.'
'खरंच राहातेयस का?'
'अं, नाइटड्रेस नाहीये, टूथब्रश नाहीये, माझं नाइट क्रीम...'
'Oh god, women!'
'आता काय करू, मला नाही झोप येणार अशी. तुला माहितीये ना मी किती particular आहे ते?'
'ओह, तुला झोपायचंय? मला वाटलं...'
'At some point, I am surely planning to sleep. What say?'
'चल, काय काय आणायचंय, घेऊन येऊ या तुझ्या घरी जाऊन. बाइक काढू?'
'येस प्लीज.'

...

तापाने फणफणलेली शर्मिष्ठा काॅलेजला जाऊ शकली नव्हती तीनचार दिवस. मोबाइलही आईने काढून घेतला होता, आराम व्हावा म्हणून. त्यामुळे लँडलाइनवर फोन करून गँगने चौकशी केलीच होती तिची. अभ्यास वगैरे सांभाळून घेऊ, तू बरी हो, असं सांगायला सगळे चौथ्या दिवशी संध्याकाळी घरीच धडकले. अर्थात, दीपाआंटीची परवानगी घेऊनच. शर्मिष्ठा नाइट ड्रेसमध्येच कशीबशी सोफ्यावर येऊन बसली होती. अस्ताव्यस्त झालेले, गुंतलेले केस आणि निस्तेज चेहरा. नौशीर सगळ्यांच्या आधी येऊन पोचला होता. आईने दार उघडलं आणि त्याला आवडतो तसा चहा टाकायला आत गेली. नाैशीर तिच्या शेजारी बसला आणि तिला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकले. तिला रडू फुटणार याची त्याला कल्पना येऊन तिला घट्ट जवळ घेतलं फक्त मिनिटभर. तो काही बोलणार इतक्यात गँगचे बाकीचे मेंबर आत आले. सगळ्यांनी त्यांच्या लाडक्या शम्सला मिठ्या मारल्या नि थोड्याच वेळात खोली हास्यकल्लोळाने भरून गेली. चहा, भजी, सँडविचेसवर ताव मारता मारता झालेल्या गप्पांमुळे शर्मिष्ठाचाही मूड छान झाला आणि आपण लवकरच बरं होऊन काॅलेजला जायला लागू यावर विश्वास बसला तिचा. आजारी पडायची तिला फार सवय नव्हती, त्यामुळे ती जेव्हा आजारी पडायची तेव्हा मनानेच कच खायची आधी. अशा स्थितीवर तिची गँग हाच उत्तम उपाय होता.

दोनेक तासांनी तिला थकल्यासारखं वाटायला लागलं. नौशीरच्या ते लक्षात आलं आणि त्याने सगळ्यांना निघू या आता, असं खुणावलं. बायबाय, लव्ह यू, टेक केअर बेबी असं प्रत्येकाने एकमेकाला बजावलं आणि ते बाहेर पडले. नौशीर अर्थातच मागे रेंगाळला. शम्सला पुन्हा एका जवळ घेऊन मगच तो निघाला. दीपाआंटी खोलीत आहे, आणि ती आपल्याकडे पाहतेय, याकडे त्याचं लक्षही नव्हतं.

काही वेळ शर्मिष्ठा तिथेच सोफ्यावर पाय जवळ घेऊन पडून राह्यली. आवरून आई आली आणि तिच्याजवळ बसली. तिच्या केसांवरनं हात फिरवत म्हणाली,
'बरं वाटतंय ना आता, सगळे येऊन गेले म्हणून!'
'हं. They are so sweet.'
'नौशीर काय म्हणत होता?'
'काही नाही गं. का?'
'शमी, तुला कळत होतं ना तो काय सांगायचा प्रयत्न करत होता ते?'
'माँ, काहीही सांगत नव्हता तो, उगीच आपलं तुझं काहीतरी!'
'ठीक आहे, तू म्हणतेस तर तसं,' असं म्हणून आई आत गेली आणि टीव्ही पाहू लागली.

आईला उडवून लावलं असलं तरी शमीच्या डोक्यात भुंगा भुणभुणू लागला होताच. नक्की काय म्हणत होता तो?

...

येताना झोपायचा जामानिमा होताच, शिवाय तिने दुसऱ्या दिवसासाठीही कपडे घेतले बॅगेत. पुन्हा फक्त कपडे घ्यायला घरी यायला जिवावर आलं असतं तिच्या. आणि त्याचे कपडे घालायचे म्हटले तर फक्त टीशर्ट पुरला असता तसा. पण नकोच ते.

कपडे बदलले, दात घासले, चेहरा धुऊन नाइट क्रीम लावलं नि ती त्याच्या बेडमध्ये घुसली. तोही आवरून आला. इतक्या रात्रीही छान ताजातवाना दिसत होता.
'रशीद खान लावू?'
'नको, शांत पड माझ्या शेजारी. काहीही न करता.'
'काहीही न करता?'
'Yes, काहीही न करता.'
'पण माझ्याकडे हा एकच बेड आहे, नाहीतर बाहेर सोफ्यावर झोपू का?'
'ओहो, किती बोलशील. गप्प बस की जरा. मला ठकठक ऐकू दे तुझ्या हृदयाची, तोच स्पीड आहे की वाढलाय इतक्या वर्षांत, ते पाहायचंय.'
'तू अशी सुंदर निवांत एकांतात शेजारी असताना either ते बंद पडेल किंवा जोरजोरात धावेलच ना? हाय मेरा दिल!'
यावर ती काहीच बोलली नाही. फक्त कुशीवर वळली नि त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत पडून राहिली. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. पहाटे थंडी वाजायला लागली म्हणून तिला जाग आली तेव्हा तिला आठवेच ना की झोप कधी लागली तिला.

शेजारी पाहिलं तर नौशीर डाव्या कुशीवर निजला होता. डावा हात डोक्याखाली, उजवा अंगासरशी. तिने उठून पांघरूण त्याच्या अंगावर घातलं नि स्वत:ही त्यात शिरली. तिच्या चाहुलीने तो जागा झाला, तिला जवळ घेतलं. 'लव्ह यू,' पुटपुटला. नि पुन्हा झोपी गेला. ती मात्र टक्क जागी झाली होती. अशी दुसऱ्या कोणाच्या शेजारी तिला गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच जाग येत होती. नौशीर अनेक वर्षांपूर्वी काय सांगायचा प्रयत्न करत होता, हे अचानक उमगलं तिला.

'शर्मिष्ठे, आता आणखी परीक्षा नको घेऊस,' असं तिने मनाला बजावलंन. आणि कुठे ओठ टेकवून त्याला जागं करावं याचा विचार करू लागली.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आवडली. कॉलेजच्या दिवसात अस्पष्ट आणि अस्फुट , अव्यक्त असलेले प्रेम, किंचीत प्रौढ वयात, बरेच पावसाळे पाहील्यानंतर, हळूहळू स्पष्ट होत जातानाचा प्रवास मस्त रंगवला आहे.

आजारी पडायची तिला फार सवय नव्हती, त्यामुळे ती जेव्हा आजारी पडायची तेव्हा मनानेच कच खायची आधी

करेक्ट या वाक्याबरोबर, एकदम आयडेंटिफाय करता आले.

परीक्षा

शीर्षकही चपखल आहे. ओव्हरॲनॅलिसीस आणि त्यातून येणारी जजमेंटल वृत्ती. परीक्षा! बरोब्बर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

आवडली, पण त्यातली लाईफस्टाईल वाचल्यावर असं वाटलं की,
च्यायला, आपण नेमके कुठल्या इंडियात राहिलो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा. लाईफष्टायलने मलाही न्यूनगंड दिला. म्हटलं बरोबर अशा लाईफष्टायल वाले वडीलांना पा च म्हणत असणार णाइ त्यांचे बॉयफ्रेन्डही त्यांना साजेसे असणार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

कथा काव्यात्म वाटली. मजा आली. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

राबा, धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!