रघुनाथजी आंग्रे – म्हैसूर राज्याचा मराठा नौसेनापती

संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

रघुनाथजी आंग्रे – म्हैसूर राज्याचा मराठा नौसेनापती

- प्रतिश खेडेकर

सुरुवातीचे जीवन

भारताच्या पश्चिम समुद्रावर इंग्रजांची सत्ता येण्याआधी इथे मराठ्यांची सत्ता होती. तिचा पाया शिवछत्रपतींनी रचला आणि त्यावरची भव्य इमारत सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधली. शंभू छत्रपतींच्या हत्येनंतर राजाराम छत्रपतींच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कान्होजींनी पश्चिम किनाऱ्याचे रक्षण करून राज्य वाढवले. १७२९ साली त्यांचा मृत्यू झाला व त्यांच्यानंतर त्यांच्या तीन मुलांनी एकापाठोपाठ सरखेलपदाचा भार सांभाळला - सेखोजी, संभाजी व तुळाजी.

त्यातही तुळाजीचे विशेष महत्त्व आहे. १७४२मध्ये सरखेलपदावर आलेल्या तुळाजीने इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्दी अशा नाना शत्रूंना तोंड देत मराठ्यांचा डंका समुद्रावर गाजवला. आपल्या विजयदुर्ग येथील राजधानीतून तुळाजीने अगदी केरळपर्यंत स्वाऱ्या केल्या होत्या. समुद्रावरील शत्रूंवर तुळाजीचा अंकुश होता. दुर्दैवाने तुळाजीचे मराठा सत्तेशी सारखे वाद होत. बऱ्याचदा प्रकरण विकोपालाही गेले. अशातच इंग्रजांनी पेशव्यांशी संगनमत करून त्यावर चढाई करण्याचे ठरवले. लंडनहून रॉयल नेव्ही, मुंबईहून इस्ट इंडिया कंपनीचे नौदल, व पेशव्यांचे वसईचे आरमार अशी तीन नौदले एकत्र आली. २३ फेब्रुवारी १७५६ रोजी ॲडमिरल वॉटसन आणि कर्नल क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली त्यांनी विजयदुर्ग जिंकला.

तुळाजीचं चित्र
इंग्रजांनी काढलेले तुळाजी आंग्रेचे समकालीन चित्र

या वेळी तुळाजीच्या दोन बायका, त्याची दोन मुले - रघुनाथजी व संभाजी, व त्याचा मेहुणा किल्ल्यात होते. त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले. या वेळी दोन्ही भावांना व त्यांच्या आईला देवी झाल्याचे इंग्रजांचा सर्जन डॉ. आइव्ज याने लिहून ठेवले आहे.

याच सुमारास वॉटसनने आंग्रे कुटुंबाला मुंबईस नेऊन त्यांची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. आंग्रे कुटुंबाला यात रस असल्याचे दिसते पण, त्यांनी विजयदुर्गातच राहण्याचे ठरवले.

पहिली कैद

काही दिवसांनी आंग्रे कुटुंबाला मराठ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. इंग्रज नौदलसुद्धा १७ मार्च रोजी मुंबईस परतले.

१७६१ साली नानासाहेब पेशवा निवर्तला व तुळाजीने पुण्यातल्या कैदेतून इब्राहीमखान गारद्याच्या पुतण्याला लाच देऊ करून सत्तापालट करण्याचा धाडसी कट रचला. गारदी इमानी असल्यामुळे पैशाच्या अमिषाला बळी न पडता राघोबादादाला याची माहिती दिली. यामुळे तुळाजीची कैद अजून कडक करून त्याला व त्याच्या मुलांना कधी एका स्थळी ठेवले गेले नाही. १७६४ साली दोन्ही भावांना विसापूरच्या किल्ल्यात तुळाजीजवळ पाठवले गेले. पण लगेचच तुळाजीची अहमदनगर येथे रवानगी झाली.

पलायन

अंदाजे १७६५च्या सुरुवातीस दोघे भाऊ विसापूरहून पळून मुंबईस गेले. त्यांना मदत करणाऱ्या बाबाजी कृष्ण बेडेकरच्या परिवाराला कैदेत टाकण्यात आले, तर त्यांच्या भटजींच्या पायात बेड्या घालून शिवनेरीवर ठेवण्यात आले.

मुंबईत आश्रय घेतल्यामुळे मराठे-इंग्रज संबंधात तणाव आला. इंग्रजांचा वकील मोस्तीन नेमका या वेळी पुण्यात एका वेगळ्या करारासाठी आलेला होता. कराराच्या एका बैठकीत त्याला मराठ्यांच्या प्रतिनिधीने आंग्रे बंधूंना मुंबईत आश्रय मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. पण मोस्तीनने मराठ्यांनाच दोष देत म्हटले, "इंग्रजांनी तुळाजीच्या परिवाराला पेशव्यांकडे सोपवताना अशी आशा बाळगली होती की यांच्या सोबत दुजाभाव होणार नाही. उलट यांना कैदेत टाकून यांच्यावर अन्याय झाला. हे दोघे इंग्रजी मुलखात आले हे पेशव्यांसाठी चांगलेच झाले. जर का हे दोघे इतर कोणत्याही राज्यात गेले असते तर पेशव्यांना त्याचा अधिक त्रास झाला असता."

एकीकडे मोस्तीनने आपल्या हजरजबाबीपणाने इंग्रजांवरचा आरोप परतवून लावला, तर दुसरीकडे मुंबईकरांना आदेश दिले, "काहीही करून या दोन्ही भावांना दुसर्‍या देशी जाण्यास प्रवृत्त करा. हवे तर त्यासाठी त्यांना आर्थिक मदत करावी."

मुंबईत हे दोघे भाऊ कुठे राहत होते हे कळण्यास मार्ग नाही. पण यांनी उरणवर धाडी मारल्याचे समजते. यांची काही माणसे अशाच एका धाडीत पकडले गेल्याचे समजते. या नंतरची काही वर्षे दोन्ही भावांची माहिती मिळत नाही.

१७७१ साली रघुनाथजी, हैदर अलीच्या नौसेनेत रुजू झाला. हे कसे व कोणाच्या मध्यस्थीने झाले, हे कळत नाही. संभाजी त्या वेळी रघुनाथासोबत होता का नव्हता, हेही समजत नाही. कारण, १७७६ साली संभाजी सोलापूरच्या किल्ल्यात कैदेत होता.

रघुनाथजी हैदरचा नौसेनापती झाल्याची बातमी पुण्यास लगोलग पोहोचली. ६ डिसेंबर १७७१च्या पत्रात माधवरावाने विजयदुर्गच्या आरमारी सुभेदाराला – जानोजी धुळपांना, रघुनाथजीबद्दल सतर्क राहण्यास सांगितले. रघुनाथजीच्या आरमारात पाल जातीची मोठी दोन जहाजे व गुराब जातीची मध्यम आकाराची नऊ जहाजे होती. या वेळी रघुनाथजी सदाशिवगड (कारवार) येथे असून कदाचित त्याचा विजयदुर्गकडेच रोख असावा. पण तसे काही घडलेले दिसत नाही.

१९ फेब्रुवारी १७७५ रोजी रघुनाथजीच्या तुकडीची रॉयल नेव्हीच्या एका जहाजाशी चकमक उडाली. 'सीहॉर्स' या २४-तोफांच्या फ्रिगेटने रघुनाथजीच्या दोन जहाजांवर मारा केला. त्या वेळी पहिले आंग्ल-मराठा युद्ध नुकतेच पेटले होते. कॅप्टन फार्मरने गैरसमजातून रघुनाथजीवर हल्ला केला, पण आपली चूक समजताच त्याने माघार घेतली. सीहॉर्सवरील एका १७ वर्षीय मिडशिपमनच्या आयुष्यातील ही पहिली लढाई होती. पुढे हा तरुण इंग्लंडचा सर्वोत्तम नौसेनापती म्हणून ओळखला गेला- व्हाईस ॲडमिरल होरेशियो, लॉर्ड नेल्सन. योगायोगाने भविष्यात इंग्रजांचा सर्वोत्तम सेनापती ड्युक ऑफ वेलिंग्टन हासुद्धा पहिल्यांदा म्हैसूर व मराठ्यांविरुद्ध लढला.

यानंतर पुढच्याच वर्षी पुन्हा एका न भूतो न भविष्यति घटनेत रघुनाथजीचा सहभाग झाला.

भारतात आलेले स्पेनचे एकमात्र शिष्टमंडळ

हिंद महासागरात नाना देशांची जहाजे पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून आग्नेय आशियापर्यंत संचार व व्यापार करत. भारतात बंदरोबंदरी नाना निशाणांची जहाजे नांगरत. पण यांत एका देशाचे निशाण कधीच नव्हते– स्पेन.

पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात झालेल्या करारानुसार, ब्राझील ते आग्नेय आशिया हा प्रांत पोर्तुगालसाठी राखीव होता, तर ब्राझीलच्या पश्चिमेपासून जे जिंकता येईल ते स्पेनचे. दोघे एकमेकांच्या अधिकारकक्षांत लुडबूड करत नसत. याच कारणामुळे आज आपण बहुतांश दक्षिण व मध्य अमेरिका स्पॅनिश भाषिक पाहतो.

धाकट्या फ्रेडरिकच्या नेतृत्वाखाली युरोपातील अव्वल राज्यांच्या श्रेणीत प्रशिया आला होता. यामागे त्यांच्या शिस्तबद्ध फौजेचा मोठा वाटा होता. हैदरचे फ्रेंचांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्याला त्यांच्याकडून युरोपातील महत्त्वाच्या बातम्या मिळत असत. साहजिकच त्याला प्रशियाच्या कवायती फौजेबद्दल कुतूहल होते आणि अशीच फौज आपल्या पदरीसुद्धा असावी असे त्याला वाटे.

१७७०नंतर कधीतरी, हैदर अलीने युरोपात प्रशियाच्या राजाकडे एका ज्यू माणसाला सैन्य प्रशिक्षणासाठी करार घडवून आणण्यासाठी पाठवले. पण यात त्याला यश आले नाही. तेथूनच त्याने स्पेनचा रस्ता गाठला आणि माद्रिद येथे आला. इथेसुद्धा त्याला यश आले नाही. पण एक व्यापारी करार करण्यात तो यशस्वी झाला.

या कराराची बातमी स्पॅनिश सरकारने त्यांच्या मनिला, फिलीपीन्स, येथील गव्हर्नर जनरलला कळवली, व तेथून एक युद्धनौका युद्धसामग्रीने सज्ज करून मंगळूरला पाठवण्याची सोय केली.

'नुएस्त्रा सेन्योरा देल कार्मेन' आणि 'ला देसियदा' नावाची फ्रिगेट व त्यावर कॅप्टन रामोन इस्साई, व त्याच्या हाताखाली मिगेल अंतोनियो गोमेज या अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली. पुढील हकीकत याच गोमेजच्या प्रवासवर्णनातून घेतलेली आहे.

२५ जानेवारी १७७६ रोजी फ्रिगेट मनिलाहून निघाले, व ७ एप्रिलला मंगळूरला पोहोचले. ९ ते १४ एप्रिल दरम्यान जहाजावरील सामग्री उतरवण्यात आले. येथे इंग्रजांच्या स्थानिक प्रतिनिधीच्या प्रोत्साहनाने इंग्रजी नौदल हे स्पॅनिश जहाज जप्त करू पाहत होते. इंग्रजांचा कॅप्टन मूर किनाऱ्यावर येऊन स्पॅनिश मंडळींसोबत बाचाबाची करू लागला. पण मंगळूरचा सुभेदार शेख अली व नौसेनापती रघुनाथजी आंग्रे वेळेत आल्याने आरडाओरडा करण्यापलीकडे तो काही करू शकला नाही.

गोमेजनं चितारलेला दरबार
मिगेल गोमेजने काढलेले रघुनाथजींच्या दरबाराचे चित्र

१८ एप्रिल रोजी रघुनाथजीने या स्पॅनिश पाहुण्यांसाठी विशेष दरबार भरवला. तोफांची सलामी, फुलांच्या माळा व अत्तरांच्या वर्षावाने त्यांचे स्वागत करण्यात आले. भारतीय पद्धतीप्रमाणे खाली बसण्याची यांना सवय नसल्याने यांच्यासाठी खास खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. खुद्द रघुनाथजी गादीवर तर त्यांचे अधिकारी गालिच्यावर बसले होते. गोमेजने या दरबाराचे चित्र काढलेले असून त्यात रघुनाथजीच्या डोक्यावरील पगडी मराठेशाही व पिळदार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओठांवर मिश्या व दाढी ठेवलेली नाही. पायात पायजमा, कंबरेस कमरबंद व अंगावर फक्त शेला आहे. योगायोगाने ही शेवटची नोंद त्यांच्या वडिलांच्या, तुळाजींच्या, एका दुर्मिळ चित्राशी तंतोतंत जुळते.

८ मे रोजी कॅप्टन रामोन इस्साई श्रीरंगपट्टणमला हैदरच्या भेटीस निघाला व गोमेजला हंगामी कॅप्टन बनवून गेला.

या काळातील गोमेजच्या नोंदी वाचनीय आहेत. मे-जून महिन्यातील मॉन्सूनचा तडाखा, गौरी-गणपतीचा उत्सव, मंगळूरचे वर्णन, इत्यादी, त्याने लिहून ठेवले आहे.

दुसरी कैद

इथे अचानक रघुनाथजीचे ग्रह बदलले. २७ नोव्हेंबर रोजी त्याला तडकाफडकी कैद करण्यात आले. याची चौकशी केल्यावर शेख अलीने गोमेजला सांगितले की, इंग्रजांनी तुळाजी आंग्रेची सुटका करून त्याला परत सत्तेत आणले आहे, आणि यामुळे रघुनाथजी फुटण्याची शक्यता आहे. पण प्रत्यक्षात असे काहीही झालेले नव्हते. रघुनाथजीच्या जागी बाबुराव नावाच्या इसमाची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.

शेवटी गोमेज २५ मार्च १७७७ रोजी मंगळूरचा निरोप घेऊन मनिलासाठी निघाला. त्याचा निरोप घेत नवनियुक्त नौसेनापती बाबुरावने त्याला पुढच्या वेळी येताना जास्तीत जास्त बंदुका, तोफा व कुशल कारागीर आणण्याविषयी सूचना केली.

अशा प्रकारे भारतात आलेल्या एकमात्र स्पॅनिश शिष्टमंडळाने निरोप घेतला. पण रघुनाथजीचे काय झाले?

गोमेझच्या हस्तलिखिताचं पान
मिगेल गोमेजच्या हस्तलिखित वृत्तांतातील एक पान

सुटकेनंतर

रघुनाथजीची सुटका कधी झाली हे ज्ञात नाही. पण, १० फेब्रुवारी १७८१ रोजी हैदरची एक नाविक तुकडी गोव्यापाशी आली. चौकशी केल्यावर समजले की या तुकडीचा सरदार रघुनाथजी आहे. हैदरच्या मुलुखात मराठ्यांच्या पाच गलबतांनी हैदोस घातला होता. त्यांच्या मागावर असणाऱ्या रघुनाथजीने गोव्याच्या व्हाईसरॉयला ही गलबते त्याच्या हवाली करण्यासाठी पत्र पाठवले. पण गोवेकरांना पुणे दरबाराशी उघड शत्रुत्व नको असल्याने त्यांनीच ही पाच गलबते जप्त केली, त्यावरील ५ सरदार व १८३ खलाशी नजरकैदेत टाकले, आणि तात्पुरते रघुनाथजीचे समाधान केले.

यानंतर रघुनाथजीने पोर्तुगीजांना प्रस्ताव पाठवला की दोघांच्या नौदलांनी एक होऊन पेशव्यांच्या मुलखावर स्वारी करावी. पण नुकताच पोर्तुगीजांना मुत्सद्देगिरी करून नगर-हवेलीचा प्रांत पेशव्यांकडून मिळालेला होता. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावाला फारसे महत्त्व दिले नाही.

यानंतर काही काळातच हैदर वारला व त्याचा मुलगा फतेह अली खान 'टिपू सुलतान' तख्तावर बसला. याने सुरुवातीला नौदलाकडे दुर्लक्ष केले. आणि १७९०नंतर जेव्हा गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली तोपर्यंत फार उशीर झालेला होता. १७९९मध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईत तो मारला गेला.

त्याच्या कार्यकाळातील काही नौदल अधिकाऱ्यांचे फक्त पुसटसे उल्लेख मिळतात. पण रघुनाथजी १७९९पर्यंत टिपूच्या पदरी असावा. कारण त्याचे ३ ऑगस्ट १८०० रोजी इंग्रजांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे, ज्यात तो मुंबईत राहण्याची परवानगी मागत आहे. तसेच पुढेमागे पेशव्यांशी युद्ध झाल्यास इंग्रजांच्या वतीने लढण्याची तयारीही दर्शवली आहे.

दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात (१८०३-१८०५) रघुनाथजीचा काही सहभाग असल्याचे दिसत नाही. पण, १८२१ साली हा मुंबईत राहत असल्याचा उल्लेख सापडतो. या वेळी रघुनाथजी जवळपास पंचाहत्तर वर्षांचा असावा. त्याचा यानंतरचा जीवनक्रम अंधारात आहे. १८४०मध्ये चौकशीदरम्यान समजले की तो आता हयात नाही. एका पराक्रमी पुरुषाच्या पराक्रमी पुत्राचा शत्रूच्या आश्रयात व अज्ञातवासात अंत झाला.

१८व्या शतकातील सामाजिक व राजकीय परिस्थितीच्या गुंतागुंतीचे दर्शन रघुनाथजीच्या जीवनक्रमातून दिसून येते. रघुनाथजीच्या नियुक्तीमागे त्याच्या घराण्याची दर्यावर्दी कीर्ती होतीच. पण लष्करी पेशा किंवा 'मिलिटरी लेबर'साठी तत्कालीन राज्यांमध्ये धर्म-जात अडथळा ठरत नसे हेही दिसते. मराठे व इतर एतदेशीय सत्तांनी तेवढी लवचीकता बाळगली होती.

मिगेल गोमेजच्या वृत्तांताने भारत – फिलिपीन्सच्या राजनैतिक संबंधाची सुरुवात थेट १८व्या शतकात नेऊन ठेवलीच, पण यात एका मराठमोळ्या माणसाचे महत्त्वाचे योगदान होते हेही अधोरेखित केले.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेखमाला होऊ शकते का? काही संदर्भ ग्रंथ/ पुस्तके?

भारतीय राजांना नौदलात स्वारस्य होते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0