कुल्कर्ण्यांचा सिनेमा

संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

कुल्कर्ण्यांचा सिनेमा

- प्रविण अक्कानवरू

जगभरातल्या यशस्वी लेखक-दिग्दर्शकांच्या अनेक जोड्या सांगता येतील. उदाहरणादाखल पॉल श्रेडर-मार्टिन स्कॉर्सेसी, नोलान बंधू ते हिंदीमधील आज कार्यरत असणारे अभिजात जोशी-राजकुमार हिरानी, जुही चतुर्वेदी-शुजीत सरकार ही काही नावं. मराठीत तेंडुलकर-जब्बार पटेल या जोडीने महत्त्वाचं काम केलेलं आहे. परंतु त्यानंतर लेखन-दिग्दर्शकाची अशी सातत्याने आशय-विषयाच्या दृष्टीने सकस चित्रपट देणाऱ्या भागीदारीची मराठीत उणीव दिसून येते. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टी मध्यंतरी एकाच पठडीतले विनोदपट, तसेच एकसुरी कौटुंबिक नात्यांवर कशीबशी तग धरून होती. २००४ साली आलेला 'श्वास' हा या सुस्तावलेल्या आणि सुमारपणात स्वतःची खरी ओळख हरवलेल्या इंडस्ट्रीस नवसंजीवनी देणारा प्रयत्न ठरला असं मानलं जातं. एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून 'श्वास'चं मोठेपण मान्य करूनही मला वाटतं, की 'वळू' हा खऱ्या अर्थाने या संदर्भात वॉटरशेड मोमेन्ट ठरला. या वर्षीच्या (२०२०) जानेवारीमध्ये 'वळू'ला बारा वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी गिरीश कुलकर्णी-उमेश कुलकर्णी ही लेखक-दिग्दर्शकद्वयी उपरोल्लेखित महान उदाहरणांत एव्हाना मानाने विराजमान झाली आहे याबद्दल माझ्या मनात किंतु नाही. आपण सोयीसाठी या दोघांच्या चित्रपटांना 'कुल्कर्ण्यांचा सिनेमा' असंच संबोधू.

'वळू'ला वॉटरशेड मोमेन्ट म्हणण्यामागे काही कारणं आहेत. पूर्वसुरींनी काढून दिलेल्या पायवाटेवरून जाण्याचं नाकारून स्वतःची स्वतंत्र चित्रभाषा पडद्यावर मांडण्याचं कसब आणि धाडस त्यांनी दाखवलं. तांत्रिकदृष्ट्या 'वळू' हा त्याआधीच्या कोणत्याही मराठी चित्रपटांपेक्षा उजवा आहे. भावे-सुकथनकर जोडगोळीच्या मुशीत उमेदीच्या काळात घडल्यामुळे उमेशची आशयाची, संहितेची जाण आणि बैठकही पक्की आहे. तंत्र आणि आशय यांचा सुवर्णमध्य साध्य करणं हे आव्हान त्यांनी 'वळू'सह त्यापुढल्या सर्वच चित्रपटांत यशस्वीरीत्या पेललं आहे. पटकथा, संवाद, अभिनय, छायाचित्रण, ध्वनिसंयोजन, पार्श्वसंगीत, संकलन, कलादिग्दर्शन इत्यादी सर्वच तांत्रिक आघाड्यांवर 'वळू' सरस ठरतो.

ग्रामीण पार्श्वभूमीवरचा चित्रपट हा मराठीतला अतिवापराने मळलेला धोपटमार्ग आहे. तीच ती घिसीपिटी मूल्यव्यवस्था, तेच ते विनोद, ओढूनताणून शहरातल्या लोकांच्या कल्पनेतून अवतरलीलेली 'ग्रामीण' बोली आणि संवाद, टिपिकल, ठरावीक राजकारण, अनावश्यक गाणी, बावळट पात्रं अशा असंख्य क्लिशेंनी भरलेले असंख्य चित्रपट आपण सहन केलेत. 'वळू' ह्या सगळ्याला फाट्यावर मारतो. 'वळू'मध्ये ग्रामीण पार्श्वभूमी आहे, प्रासंगिक विनोद आहे, बोलीभाषा आहे, राजकारण आहे. परंतु या सगळ्यांची जातकुळी आधुनिक आहे. ऑथेंटिक, वास्तवाशी जवळीक साधणारी आहे. या सगळ्या गोष्टींची आधी न पाहिलेली अशी अभूतपूर्व हाताळणी आहे.

वळू
'वळू'चं पोस्टर, विकिपीडियावरून

कुठलाही लेखक/दिग्दर्शक आपल्या चित्रपटातून एखाददुसऱ्या पात्राच्या तोंडून स्वतःला काय म्हणायचंय हे सांगत असतोच. असा विवेकी आवाज चित्रपटाला एक नैतिक अधिष्ठान मिळवून देतो. तो कथेत जितक्या बेमालूमपणे येईल तितकी त्याची परिणामकारकता वाढते. चंद्रकांत गोखलेंनी साकारलेला आज्या आणि ज्योती सुभाषने नेहमीच्या सहजपणे वठवलेली म्हातारी ही याची 'वळू'मधली उदाहरणं. 'विहीर'मध्ये शाहीर विठ्ठल उमप आणि 'देऊळ'मध्ये दिलीप प्रभावळकर अशीच दिशादर्शकाची भूमिका निभावतात. 'वळू'मध्ये म्हातारा आज्या जेव्हा कथितरीत्या डुरक्याने ढोसरल्याने जिवास मुकतो तेव्हा त्याच्या जळणाऱ्या चितेसमोर कथेतली जवळपास सगळी महत्त्वाची पात्रं प्रासंगिक राग व्यक्त करत तावातावाने डुरक्याच्या बंदोबस्ताची मागणी करतात; परंतु त्याआडून स्वतःचा स्वार्थ साधेल असेच उपाय सुचवतात. एकंदरीत, हा प्रसंग या चित्रपटाचा गाळीव अर्क आहे.

चित्रपट माध्यमात प्रतीकात्मकता, रूपकांचा वापर बरेच जण प्रसंगानुरूप करतात. त्यायोगे चित्रपटातल्या दृश्यांना, प्रसंगांना खोली प्राप्त होऊन एकंदर चित्रपटाचे कलामूल्य वृद्धिंगत होते. कुल्कर्ण्यांनी मात्र अख्खा चित्रपट 'वळू' या रूपकाभोवती रचला. माणसामाणसांत लपलेला वांडपणा दर्शविण्यासाठी. हा अत्यंत धाडसी प्रयोग होता. कुसवडे गावात एका देवाला सोडलेल्या उपद्रवी बैलाचा बंदोबस्त करण्यासाठी एक वनाधिकारी गावात येतो आणि त्या दोन दिवसांत गावातल्या अनेक अतरंगी, इरसाल लोकांकडून माहिती मिळवून त्या बैलाला जेरबंद करून घेऊन जातो, अशी सोपी, सरळसोट कथा असलेला हा चित्रपट. परंतु त्याची पडद्यावरची मांडणी मात्र खिळवून ठेवणारी आहे. अनेक फ्लॅशबॅकांनी युक्त अशी अरेषीय (नॉन-लिनिअर) मांडणी, आबा रेणूसेच्या स्वप्नांवर अक्षरशः मुतणाऱ्या लहानग्या संपतरावांपासून आपली सद्दी संपते की काय या दडपणात वावरणाऱ्या बेरकी राजकारणी अण्णांपर्यंत कुशलतेने उभी केलेली आणि नव्या-जुन्या कलाकारांनी समर्थपणे साकारलेली पात्रं, अतिशय समर्पक पार्श्वसंगीत आणि ग्रामीण महाराष्ट्राचं याआधी पडद्यावर न पाहिलेलं छायाचित्रण तुम्हांला एक समृद्ध चित्रानुभव निश्चितपणे देऊन जातो. माणसातलं सुप्त पशुत्व इतक्या खेळकरपणे क्वचितच कुणी दाखवलं असेल. 'वळू'चं सर्वांत मोठं यश म्हणजे, जरी त्यातली प्रतीकात्मकता, उपरोध आणि रूपक एखाद्याला खो देऊन गेलं, तरी त्याच्या मनोरंजनमूल्यात काडीचाही फरक पडत नाही. ही तारेवरची कसरत लीलया साधल्याबद्दल कुल्कर्ण्यांचे विशेष कौतुक.

'वळू' औपरोधिक असला, तरी तो उपरोध बोचणारा नाही. पात्रं सुष्ट-दुष्ट गुणांनी युक्त असली, तरी खोडकर वाटतात; वाईट नाही. 'वळू'चा एकंदर टोन एक पट्टी वर आहे. उत्साही आहे. त्यामुळे त्यात अंतर्हित असलेली दुःखं, अडचणी जाणवल्या, तरी अंगावर येत नाहीत. स्वतःतल्या अंतर्विरोधांची केवळ जाणीव व्हावी इतपतच तो तुम्हांला खिजवतो. वेठीस धरून जाब विचारत नाही. चित्रपटाचा हा सूर जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक प्रस्थापित केला गेला असावा. घर सोडून प्रियकरासोबत पळून जाणारी संगी घरच्या म्हशीलाही भावुक होऊन निरोप देऊन नंतर माळावर शिवाची वाट पाहत असताना तिचा डोळा लागतो आणि झोपेतच अतिशय निरागस हसू तिच्या चेहऱ्यावर उमटतं. ही निरागसता 'वळू'चा स्थायीभाव आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना कुल्कर्ण्यांनी आपल्याला आरसा दाखवूनही आपल्या चेहऱ्यावर असंच निरागस हसू उमटलेलं असतं.

*

काही चित्रपटांबाबत तुम्ही फार पझेसिव्ह असता. तो मला कळलाय तसा इतर कुणालाच कळला नाही असा एक वृथा अहंगंड तुमच्यात निर्माण होतो. माझ्यासाठी 'विहीर' हा तो चित्रपट आहे. अगदी पुलंच्या शैलीत बोलायचं झालं, तर 'विहीर'वर विहीरभर लिहिता येईल.

नव्वदच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण, निमशहरी पोरापोरींचं त्रांगडं निराळंच आहे. आमचा एक पाय दोन हजार सालाआधीच्या संथ, सुस्त जागरहाटीत, घरगुती बैठे खेळ ते दिवस-दिवस क्रिकेटच्या स्पर्धा असा आवाका असलेल्या क्रीडासंस्कृतीत, नदीम-श्रवण, कुमार सानूच्या स्वप्नाळू सुमारपणात आणि माध्यमांच्या (सुदैवी) कमतरतेमुळे बऱ्याचशा शांततेत अडकला आहे, तर दुसरीकडे सद्यस्थितीत महानगरातल्या अपरिहार्य जीवनशैलीमुळे वेग हा वर्तमानाचा अपरिहार्य स्थायीभाव बनत चालला आहे. अविरत केकाटणारी दृक्श्राव्यमाध्यमं, व्यसन बनत चाललेली समाजमाध्यमं, जवळपास फुकटात म्हणावी अशी सर्वदूर पोचलेली डेटाक्रांती आणि यातून उद्भवणारा माहितीस्फोट यांनी आपला बऱ्यापैकी ताबा घेतलाय. नव्या सहस्रकात जन्मलेल्यांचं तरीही ठीक आहे. जन्मापासून या गोष्टींना ते सरावलेले असतील. पण अजूनही दोन प्रवाहांत पाय असलेल्यांची कोंडी होतेच. प्रचंड मूलभूत फरक असलेल्या या दोन जीवनपद्धतीनी आमचं सॅन्डविच केलंय हे मात्र नाकारता येणारच नाही.

'विहीर' हा त्या काळाचा तुकडा असल्याने आपसूकच काळजाचा तुकडा बनलाय. सुट्ट्यांत आजोळी जाणं हा अलिखित नियम असलेला हा काळ. मोठ्यांच्या व्यवहारी जगाचा, त्याउपर लग्न नामक प्रसंगी अघोरी व्यवहाराचा वरवर संबंध नसलेलं समवयस्क भावंडांचं निरागस, निस्वार्थी जग. पण त्यापासून पूर्णतः अलिप्तताही नाही. आजूबाजूला वाहणारं दुःख झिरपत जातंच. शब्दांत आकळत नसलं, तरी जाणीव होत राहतेच.

'विहीर'चं पोस्टर
'विहीर'चं पोस्टर

प्रत्येकाच्या आयुष्यात वाढत्या वयात एक नच्यादादा असतोच. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. तो म्हणेल ते सत्य. त्याचा शब्द प्रमाण. तो बोलणार आणि आपण ऐकायचं. कितीही अगम्य असलं तरीही. बुद्धीला ताण देऊन समजून घ्यायचा प्रयत्न करायचं. त्याच्याबद्दल विलक्षण आदर असतो. त्याला आपल्यापेक्षा अधिकचं काहीतरी कळलंय हे जाणवून तो आदर दिवसागणिक दुणावत असतो. नचिकेतला चिरंतनाचा शोध घ्यायचाय. या व्यवहारी जगात तो स्वतःला विजोड समजतो. अदृश्य होऊन साक्षीभावाने या जगाकडे बघायचंय त्याला. ती निरपेक्षता त्याला इथे राहून लाभणार नाही, कारण नात्यांनी त्याला जखडून ठेवलंय. 'रक्ताची नाती बांधून टाकतात,' या वाक्याने कितीतरी दिवस माझी झोप उडवली होती.

भौतिक अपुरेपण जीवनाच्या इतर साऱ्याच अंगांवर परिणाम करतं. गरिबीच्या झळा आणि त्यायोगे जगाकडून आपल्या माणूसपणाची होणारी अवहेलना. मूळच्याच संवेदनशील नचिकेतला ही परिस्थिती आणखीनच पोक्त करते. कोवळ्या वयात काळजावर उमटलेले हे चरे आयुष्यभर बुजत नाहीत. नुसत्या आठवणीनेसुद्धा भळभळत वाहायला लागतात. आपल्या क्षमतेबाहेरची परिमाणं नियंत्रित न करता आल्याने अपरिहार्य विफलतेचा सामना करावा लागतो. त्यातून स्वतःच्या आत खोलखोल डुंबत राहण्याची सवय लागत असावी. पण उत्तरांऐवजी प्रश्नच अधिक हाती लागतात. एखाद्या विहिरीत कितीही खोल गेलं, तरी तळ गाठता न आल्याची विमनस्क भावावस्था. नचिकेतला हे सरधोपट वर्तमान सतावतंय. जगणं म्हणजे यापलीकडेही खूप काही आहे आणि नात्यांच्या जडबंबाळ साखळ्यांनी आणि परिस्थितीने आपण पुरते जखडले गेलो आहोत ही घुसमट त्याच्या वाक्यावाक्यातून जाणवते. चिंतनातून काहीतरी हाताला लागल्यासारखं वाटतं परंतु त्याचं पूर्णांशाने आकलन झाल्याची खात्री वाटत नाही. मग नचिकेत बोलत राहतो. कवितेसारखं. तो सगळ्यांशीच असं बोलत नाही. सम्या हा नचिकेतचा कम्फर्ट झोन आहे. सम्याला फारसं कळत नाही. नच्याला तरी पूर्णपणे कुठे कळलेलं असतं. तोही त्यामागचं सत्यच धुंडाळतोय. एखाद्या गूढ कवितेचं गारुड निर्माण व्हावं तसं नचिकेतचं गुदमरलेपण हळूहळू आपल्यातही उतरत जातं.

मृत्यूचं आकलन पूर्णांशाने करता न येणं ही मानवी मर्यादा आहे. मृत्यूबद्दल कुतूहलही तितकंच वाटतं. एकदा मी शाळेतून घरी पोचलो, तर घरात रडारड सुरू होती. पाच मिनिटांआधीच आजोबांनी शेवटचा श्वास घेतलेला. त्या नेमक्या क्षणी माझ्या मनात 'थोडं लवकर पोचलो असतो, तर माणूस मरतो कसा हे पाहायला मिळालं असतं' हा विचार तरळून गेलेला. आणि नंतर 'हा विचार का यावा' म्हणून स्वतःचा प्रचंड राग आलेला. सम्याही नुकतंच मिसरूड फुटलेलं पोर आहे. मृत्यूला समजून घेताना त्याच्या जिवाची होणारी घालमेल यथार्थपणे दाखवण्यात दोन्ही कुलकर्णी कमालीचे यशस्वी झाले आहेत. नच्यादादाच्या मृत्यूनंतर सगळं आधीसारखं कसं असू शकतं? मोठी माणसं काहीच न झाल्यासारखं कशी वागू शकतात? अशा अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांसाठी सम्याचा वैयक्तिक प्रवास होणं आवश्यक होतं. नचिकेतला नेमकं काय हवं होतं हे धुंडाळताना सम्याला स्वतःचा शोध लागत जातो. काळजाचे डोळे करून बघण्याची दृष्टी लाभते.

काही चित्रपट पाहणाऱ्याला खोल जीवनदृष्टी प्रदान करतात. सरावाच्या दृक-श्राव्य अनुभवापलीकडचं काहीतरी अमूर्त देऊ करतात. अशा वेळी त्या कलाकृतीला साहित्यमूल्य प्राप्त होतं. 'विहीर' हा निःसंशय त्यांपैकी एक आहे. चित्रपट सुरू होताना जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर आणि दि. बा. मोकाशी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त का केली गेली आहे त्याचं कारण चित्रपट संपल्यावर लक्षात येतं.

*

देवादिकांवर आजवर बरेच चित्रपट बनले. मुख्य विषय नसला, तरी देवांचे, त्यांच्या चमत्कारांचे, निर्वाणीच्या प्रसंगी कुठलाही मार्ग दिसत नसल्याने ईश्वरचरणी शरण जाणाऱ्या नायकनायिकांचे असंख्य संदर्भ असंख्य चित्रपटात आपण पाहिलेत. दैववादी, प्रारब्धवादी आणि धर्मशरण सामाजिक वास्तवाचं प्रतिबिंबच आहे म्हणा हे. परंतु ईश्वराच्या अस्तित्वाला थेट प्रश्न करण्याचं धाडस मात्र क्वचितच दिसलंय. तसं पहिलं, तर भारतासारख्या देशात प्रत्येक जीव हा जन्मतःच आस्तिक असतो. या जगात प्रवेश केल्यापासून विविध विधींचा, कर्मकांडाचा आणि धार्मिक संस्कारांचा मारा सुरू होतो. तर्कावर घासत नाही बसलं, तर आयुष्यभर या धार्मिक दैववादी आवरणाखाली सुरक्षितपणा अनुभवत तो आयुष्य कंठतो. यात एखादा त्याच्या आयुष्यात आलेल्या काही विशिष्ट अनुभवांमुळे म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट विज्ञानवादी दृष्टीकोनातून पाहण्याच्या सवयीमुळे म्हणा, 'देव' या संकल्पनेपासून फारकत घ्यायला लागतो. म्हणजेच आपल्या देशात एखाद्या नास्तिकाने एक विशिष्ट प्रवास केलेला असतो. अनुभवांच्या किंवा तर्काच्या शिदोरीवर तो नास्तिकत्वाच्या निष्कर्षापर्यंत पोचलेला असतो. परंतु भारतीय चित्रपटांना मात्र एखाद्या नास्तिकाला परत एकदा आस्तिक बनवण्यात कमालीचा रस आहे. मग तो 'आज बहुत खुश तो होंगे तुम' म्हणत शेवटी देवाला रोकडा सवाल करणारा परंतु प्रत्यक्षात आईसाठी त्याला शरण गेलेला, एरवी अत्यंत स्पष्ट विचार असणारा 'दीवार'मधला विजय असो किंवा 'देऊळ बंद'मधील अनेक बाळबोध प्रसंगातून स्वामींचा साक्षात्कार झालेला 'नासा'मधला शास्त्रज्ञ असो. लोकांना देवाच्या अस्तित्वाची प्रचिती ऐकायला, बघायला आवडते. त्यांच्या श्रद्धेला ती पूरक असते. त्यामुळे अशा 'साक्षात्कारी' चित्रपटांची आपल्याकडे रेलचेल असते.

मात्र या दशकामध्ये मुख्य धारेतल्या तीन चित्रपटांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं धाडस दाखवलंय. परेश रावलांचा 'ओह माय गॉड' (OMG), राजकुमार हिराणींचा 'PK' आणि कुल्कर्ण्यांचा 'देऊळ'. या तिन्हीत 'OMG' च्या पाहिल्या अर्ध्या भागात देव या कल्पनेवर केलेला प्रहार अधिक बोचरा, अधिक थेट आणि परिणामकारक आहे. 'देवांच्या मूर्ती विकणारा नास्तिक' हा उपरोध टोकदार आहे. परंतु या चित्रपटाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धाचा सपशेल पराभव करतो. यात देव प्रत्यक्षात मानवी रूपात येतो नास्तिकाची मदत करायला. विवेकी प्रश्न विचारणारा परेश जेव्हा शेवटी कृष्णरूपात अवतीर्ण झालेल्या अक्षय कुमारला 'इसका मतलब तुम हो' अशी कबुली देतो तिथे चित्रपटभर उभं राहिलेलं मानवी प्रयत्नांचं आणि कर्तृत्वाचं दर्शन क्षणार्धात मातीमोल होतं आणि 'ही तर सगळी परमेश्वराची लीला' हा संदेश घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो.

'PK' त्या दृष्टीने पुढचं पाऊल होता. परंतु देवाच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी हिराणींनी भक्त आणि देव यांच्यातल्या मध्यस्थांना लक्ष्य केले. 'PK'चं परग्रहवासी असणं ही सुरक्षित आणि चतुर खेळी होती. कारण त्यामुळे त्याला कुठली धार्मिक, क्षेत्रीय आयडेंटिटी चिकटवता येत नव्हती. तसंच, सर्व गोष्टींकडे बघण्याची त्याची निरपेक्ष दृष्टी समर्थनीय ठरू शकत होती. 'ठप्पा कहाँ' म्हणत PK देवाधर्माच्या ठेकेदारांना समाजात फूट न पाडण्याविषयी सुनावतो. हिराणींच्या एकंदर प्रकृतिधर्मानुसार फार वादंग न होऊ देता महत्त्वाचा विषय हलक्याफुलक्या आणि प्रभावी पद्धतीने त्यांनी यातही मांडलाय. शेवटी वाद झालेच ही गोष्ट अलाहिदा.

'देऊळ'ची जातकुळी 'OMG'पेक्षा 'PK'शी अधिक मिळतीजुळती आहे. या तीन चित्रपटांत 'देऊळ' हा अधिक मानवी आहे. मातीतला आहे. खरं तर देऊळ हा आव्हानात्मक विषय होता. कारण चित्रपट पाहण्याआधीच 'देवाचा साक्षात्कार-प्रसार-मंदिर उभारणी-बाजारीकरण' हा कथेचा प्रवास अपेक्षित आणि अपरिहार्य होताच. असं असतानाही प्रेक्षकांना कथेत खिळवून ठेवण्याचं शिवधनुष्य कुल्कर्ण्यांनी लीलया पेललंय. केश्याचं निरागस पात्र पहिल्या फ्रेमपासून आपला ठाव घेतं आणि फार आढेवेढे न घेता अवघ्या पाचव्या मिनिटाला विषयाला हात घातला जातो. कथेचे टप्पे उमगूनही आपण त्यात गुंतत जातो. श्रद्धेचं बाजारीकरण त्यात अंतर्भूत सर्व अंगप्रत्यंगांना स्पर्श करत आपल्यासमोर उभं राहतं. सत्ता आणि धर्म यांचं कालातीत साटंलोटं, स्वार्थ या मूल्याचं अतिरेकामुळे होणार अवमूल्यन आणि संस्कृती-संस्कृती म्हणत आपण कुरवाळत वाढीस लावत असलेली विकृती हे सगळं केश्या टिपत राहतो. परंतु तो देवाबद्दल कडवट बनत नाही किंवा त्याचा नास्तिकतेकडे प्रवास सुरू होत नाही. चित्रपटाचा तो हेतूही नाही. त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे यात विवेकाचा आवाज प्रभावळकरांचं अण्णा हे पात्र. 'ज्याला देव हवा आहे त्याने तो शोधावा; ज्याला नकोय त्याने शोधू नये,' असं अण्णा म्हणतात तेव्हा हा इतका सहजसोपा, सकारात्मक मध्यममार्ग लेखक-दिग्दर्शकांना अपेक्षित असल्याचं आपल्या लक्षात येतं.

गिरीश कुलकर्णीचे संवाद हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. त्याच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच 'देऊळ'मध्येही त्याने कमाल केली आहे. संवादांसोबतच महत्त्वाच्या पात्रांना विशिष्ट लकबी अथवा कॅचलाइन देणे, उदाहरणार्थ : नानाचं 'शून्य मिनिटांत येतो' म्हणणं असो किंवा अप्पाचं कुठल्याही शब्दाआधी 'अ‍ॅज ए' चं पालुपद जोडणं. अशा बारीकसारीक गोष्टी पात्रांना अधिक उठावदार आणि खरी बनवतात. 'दत्त ही आमची फ्रॅन्चायजी आहे' किंवा 'पल्याड ते अल्याड आम्ही मध्ये भक्तांची रांग' अशा नेमक्या वाक्यांतून होऊ घातलेले सांस्कृतिक परिवर्तन त्याने अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केले आहे.

कुल्कर्ण्यांच्या या तिन्ही चित्रपटांत क्लायमॅक्सला असलेला निरोपाचा क्षण हा अजून एक समान धागा आहे. 'वळू'मध्ये काही न सुचल्यामुळे जिवन्या फॉरेश्टच्या पाया पडतो तेव्हा अतुल-गिरीशचा गहिवरून एकमेकांकडे पाहत असलेला क्षण, 'विहीर'मध्ये सम्या धनगरबाबाला प्रत्यक्ष, तर गावी विहिरीवर बसून नचिकेतला अप्रत्यक्षपणे निरोप देऊन एक प्रकारचं क्लोजर मिळवतो तो क्षण, आणि 'देऊळ'मधला केश्याचा दत्तगुरूला सीनेच्या पाण्यात सोडतानाचा क्षण.. काळजात जपून ठेवावेत असे प्रसंग आहेत हे. पाण्यात हेलकावे खात जाणारी मूर्ती पाहून आपल्याही आत काहीतरी तुटतं. त्या तुटण्यात या चित्रपटाचं यश आहे. त्या प्रसंगानंतर नवीन मूर्ती वाजतगाजत देवळाकडे घेऊन जात असतात. ते सगळं बीभत्स वाटायला लागतं. तसं वाटण्यात या चित्रपटाची सार्थकता आहे.

*

उमेशचा दिग्दर्शकीय पिंड सर्वस्वी वेगळा आणि स्वतंत्र आहे. त्याच्या कॅमेऱ्याला अजिबातच घाई नाही. एखादी अनवट कविता हळुवारपणे उलगडत जावी, तसा तो आपल्याला कथेच्या गाभ्याकडे नेतो. त्याला तुम्हांला ओढूनताणून प्रभावित करायचं नसतं. संकलनाच्या करामती दाखवायच्या नसतात. एका सेकंदात चार कट्स पाहण्याची सवय लागलेल्या नजरेला हा सिनेमा संथ वाटू शकतो. परंतु इथे तुम्हांला अनुभव हवा असेल, तर तो दाखवत असलेल्या जगाची सैर त्याचे बोट धरून, मांड ठोकून, त्याच्या पद्धतीनेच करावी लागेल. चित्रपट या कलेकडे पाहण्याची प्रामाणिक आणि प्रांजळ नजर लाभल्यामुळे, तसंच चित्रपटनिर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचित, परंतु उत्कृष्ट निर्मितिमूल्य हा कुल्कर्ण्यांच्या सिनेमाचा सातत्याने यूएसपी राहिलेला आहे.

उमेशचे रंग, प्रकाश आणि ध्वनीचे चकित करणारे आकलन पदोपदी प्रत्ययास येत राहते. 'वळू' चित्रपटाचं नुसतं नाव जरी निघालं, तरी नजरेसमोर पिवळसर रंग तरळतो. बारव भिंतीचं प्रतिबिंब मिसळून पाण्याला आलेला बेमालूम करडा रंग हा 'विहीर'ची ओळख वाटतो. चित्रपट पुढे सरकत असताना त्याचा कॅमेरा वेगवेगळे पोत दाखवत राहतो. ते कधी दगडमातींचे असतात तर कधी माणसांचे. त्याला असलेलं झरोक्यांचं, खिडक्यांचं, चौकटींचं, त्यातून येणाऱ्या प्रकाशाचं आकर्षण लपत नाही. उघडी बोडकी माळरानं त्याला मोहवतात. त्या विस्तीर्ण, विदीर्ण अवकाशात तो त्याच्या पात्रांना चितारतो. मोकळ्या आभाळाखाली, झाडांचा मागमूस नसलेल्या त्या भव्य पटावर त्या पात्रांना जणू निसर्गाच्या तुलनेतलं आपलं खुजेपण जाणवतं. मग ती पात्रं आपल्या मनातलं अगदी खरंखुरं बोलायला लागतात; 'वळू'मधल्या संगीसारखी किंवा 'विहीर'मधल्या नचिकेतसारखी. नाही तर अगदीच गप्प होतात. केश्यासारखी.

पार्श्वसंगीताकडे त्याच्याइतकं बारकेपणाने लक्ष देणारे विरळच आहेत. 'वळू'ची थीम आठवा. ज्यांनी चित्रपट पाहिला नाही त्यांच्या डोळ्यासमोरही ते संगीत ऐकल्यानंतर ऐटबाज खोंड उभा राहील असं मला खात्रीनं वाटतं. मंगेश धाकडे या गुणी संगीतकाराने तिन्ही चित्रपटांत अत्यंत भावगर्भ संगीत दिलं आहे. 'विहीर'च्या अगदी सुरुवातीच्या प्रसंगात वाजणारा सरोदचा तुकडा त्या चित्रपटात पुढे येऊ घातलेल्या सुप्त भावनिक कोलाहलाची एक प्रकारे अतिशय समर्पक नांदीच ठरतो. बाकी 'विहीर' केवळ त्यातल्या ध्वनिसंयोजनासाठी पाहिला तरी चालेल इतके बारकावे त्यात तुम्हांला सापडतील. काळ पुढे ढकलण्यासाठी खुबीने वापर केलेलं 'देऊळ'मधलं 'वेलकम हो राया..' हे गाणं रूढार्थाने आयटम सॉंग म्हणावं असं असलं, तरी त्यातले शब्द कथेला पूरक असलेलं तत्त्वज्ञानच मांडतात. मानवी स्वभाववैशिष्ट्यं, लकबी यांच्याकडे फार बारकाईने बघण्याची निरीक्षणशक्ती या दोघांना लाभली आहे. एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी मित्राच्या घरी टीव्हीवर 'वळू' लागलेला. एका क्षणी मित्राची आजी तोंडाला पदर लावून मनापासून खुदुखुदु हसू लागली. आणि काही क्षणांनंतर तिने डोळे टिपले. त्या वेळी टीव्हीवर मोहन आगाशे डुलतडुलत धोतर नेसत असल्याचा प्रसंग सुरू होता. तो पाहून आजीला तसंच धोतर नेसणाऱ्या तिच्या दिवंगत पतीची आठवण आलेली. अशा 'मानवी' दृश्यांची कुल्कर्ण्यांच्या चित्रपटात रेलचेल असते.

बारा वर्षांपूर्वी जेव्हा 'वळू' प्रदर्शित झाला तेव्हा त्याबद्दल आम्ही तासन्‌तास गप्पा मारायचो, 'ऑर्कुट'वर लिहायचो. पारायणं इतक्यांदा झालेली, की त्यातल्या छुप्या, पटकन लक्षात येणार नाहीत अशा गोष्टींवर क्विझेस बनवायचो. तेच 'विहीर', 'देऊळ' यांसंदर्भातही झालेलं. आजही 'फेसबुक'सारख्या समाजमाध्यमांवर या तिन्ही चित्रपटांवर बऱ्याचदा लिहिलं जातं. सद्य:स्थितीत, 'देऊळ' हा त्यातले प्रसंग, संवाद वापरून सर्वाधिक मीम्स बनवला जाणारा मराठी चित्रपट असावा. कितीतरी कट्ट्यांवर या चित्रपटांचे संवाद हा जणु जगण्याचा भाग झाल्यागत वापरले जातात. हे चित्रपट आवडतात या मुद्द्यावर एकमेकांचे मित्र झाल्याची उदाहरणंही अनेक आहेत. या तिन्ही चित्रपटांना कल्ट स्टेटस लाभलंय असं म्हणणं ही अतिशयोक्ती अजिबातच ठरणार नाही.

या चित्रपटांव्यतिरिक्त कुल्कर्ण्यांनी 'हायवे' हा 'हट के' चित्रपट बनवलाय. त्यासोबतच 'मसाला', 'पुणे 52', 'जाऊ द्या ना बाळासाहेब' अशा उत्तम सिनेमांची निर्मितीही केली आहे. उमेशचे लघुपट चित्रअभ्यासक. तसेच या क्षेत्रात काहीतरी करू पाहणाऱ्या होतकरू तरुण-तरुणींसाठी अत्यंत मोलाचं दिशादर्शन करू शकणारे असे आहेत. या सगळ्या गोष्टींबद्दलही भरभरून बोलण्यासारखं आहेच. आज 'वळू', 'विहीर' आणि 'देऊळ' यांबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे यांच्या संदर्भात पुनर्भेटीचा वारंवार आलेला योग आणि पॉप्युलर कल्चरमध्ये उठून दिसणारं, आणि पुनःप्रत्ययास येणारं मराठी आणि एकंदर भारतीय चित्रपट यांतलं त्यांचं स्थान. तिन्हींतही ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे तोही एक सामायिक धागा असावा. या तिन्हींतून लेखक-दिग्दर्शकांचा विस्तारत गेलेलं अवकाशही प्रत्ययास येतं. 'वळू'मधून हलकाफुलका उपहास साधल्यानंतर 'विहीर'मधली धीरगंभीर अंतर्मुखता चकित करते. 'देऊळ'मध्ये त्यापुढे दोन पावलं टाकून सामाजिक-सांस्कृतिक दोष अधोरेखित करणारं टोकदार राजकीय भाष्य करण्यात आलेलं आहे. त्यांचं पुढचं काम काय असेल याची त्यांच्या सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. ती कलाकृती नेहमीप्रमाणेच 'अरभाट' असणार याबद्दल मात्र मनात कुठलीही शंका नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

म्हणजे आता हे चित्रपट बघणे आले म्हणा की...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धैर्यधरून अर्धा तास तरी काढला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण फारच आवडले.
फार पूर्वी मी 'देवराई' चे वर्णन करताना 'हा दोन कुलकर्ण्यांचा (अतुल व सोनाली) सिनेमा आहे' असे लिहिले होते, ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

१ नंबर आहे हा लेख.
---
विहीरबद्दल लिहिलेलं एकदम मनापासून आवडलं. असा कवितेसारखा चित्रपट पहिल्यांदाच पाहिला होता मी, आणि त्यातली सहजता + जीएमय मांडणी प्रचंड आवडून गेली. (विहीरचा ट्रेलर माझ्यामते आजवरच्या सगळ्यात भारी ट्रेलरपैकी एक आहे. नक्कीच.)

लिखाण अतिशय आवडलं Smile

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. वळु हा चित्रपट मी पाहिला आहे. त्याबद्दल वर जे लिहिले आहे ते उत्तमच आहे. पण चित्रपट पाहिल्यावर सारखे एकच मनांत येत होते की , चित्रपटांत वर्णन केल्याप्रमाणे त्यातला वळु हा कधी आक्रमक माजलेला खोंड वाटलाच नाही. जेंव्हा जेंव्हा त्याचे पडद्यावर दर्शन झाले तेंव्हा तो शांतच वाटत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख:
वळू छानच पण देऊळ प्रचंड आवडता.
वेलकम हो राया तर आवडतंच पण "दत्त दत्त दत्ताची गाय..." मॅड ब्रिलीयंट गाणं आहे.
विहीर ऑनलाईन कुठे मिळेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वळू आणि विहीर पहिले नाहीयेत, देऊळ एकदम भारी आहे.
जाऊ द्या ना बाळासाहेब' थेटरात बघायचा होता व राहिलाच.
"बरं जाऊ दे का ह्या ठिपक्याला :)" हा देऊळ मधला एकदम आवडता डायलॉग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पिंकी पडली" सुद्धा Smile
----------
पण "देऊळ" मधला सगळ्यात भारी प्रकार म्हणजे केश्या मूर्ती घेउन जातो तो. नाणेघाटातला सीन आहे बहुधा.
"असा एकदम फ्री रहा ना तू!" असं तो जेव्हा गप्पा मारता मारता म्हणून जातो तेव्हा एकदम शिटी माराविशी वाटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाच गुळाची चव नसेल कदाचित, पण 'वळू' मला अशक्य बोअर वाटला. पिंडे पिंडे मतिर्भिन्न:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

'मराठी सिनेमाकडून किती अपेक्षा ठेवायची, तरी लोक बोलताहेत म्हणून बघू' म्हणत मी बघितला होता. आणि अचाट हसले होते. अजूनही डोळ्यांवर गॉगल लावून कधीमधी घरात घुसून 'अंधार का आहे' छाप बडबड करते ... (विशेषतः मास्क घ्यायला धावतधावत परत येते, आणि मास्क घरातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात असतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.