कोव्हीड-१९ आणि एक सुखशोधक भिरभिरे फुलपाखरू

मी हे लिहितो आहे तेव्हा रात्रीचे ११ वाजत आले आहेत. माझ्या घराजवळ हळदीचा किंवा कोणतातरी कार्यक्रम चालू आहे जिथे चालू असलेल्या गाण्या-बजावण्याचा आवाज मला बंद खिडक्यांतून स्पष्ट ऐकू येतो आहे. लग्नसराईच्या मौसमात दरवर्षी येतो.

मला मार्च-एप्रिल महिन्यांत कोव्हीड-१९ नंतरचे जग कसे बदललेले असेल असे काही बोलणाऱ्या लोकांची, त्यांच्या लेखांची आठवण येते आहे. त्यांनी आपापले स्वप्नरंजन आपापल्या योग्य ठिकाणी सांभाळून ठेवावे असे म्हणायची अनावर इच्छा होते आहे! पॉज आणि बदल ह्यातला फरक न कळणारे लोक मला ह्या निमित्ताने ओळखता आले. ह्यातले काही फेमस प्रकार इथे यादीत आणण्याचा मोह आवरत नाही.

  1. कोव्हीड-१९ नंतर लोक आरोग्यावर अधिक खर्च करू लागतील कारण ते आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग होतील. तुम्ही मास्क लावण्याच्या बाबतीत लोकांचे गांभीर्य पाहिले तरी ह्या क्लेममधील बालिशपणा लक्षात येऊ शकतो. काहीजण नक्कीच अधिक घाबरट होतील. इंग्रजीत अत्यंत व्याकूळ एस्से लिहिणाऱ्या एक बाई त्यांच्या Twitterवर शंका प्रकट करत असतात. आजच त्यांनी विचारले आहे की स्विमिंगपूलमध्ये जायला काही हरकत आहे का. त्यांना मुंबई-पुण्याजवळील विकेंड स्पॉट दाखवावेत का?
  2. अनेक नोकऱ्या वर्क फ्रॉम होम होतील. मोठ्या शहरांचे महत्त्व उरणार नाही वगैरे वगैरे. जश्या जश्या केसेस कमी होत आहेत आपल्यातल्या बहुतेकांचा ऑफिसला जायचा दिवस जवळ येत आहे. आणि केवळ employerना नाही तर employeeनाही ऑफिसला जायचे आहे. प्रौढ स्त्री पुरुषांना आपापले व्यक्तिगत आयुष्य जगता यावे ही मोठी बाब ऑफिसेस आणि शाळा साध्य करतात. अनेक पालक पाल्यांना शाळेत पाठवायला उत्सुक आहेत आणि अनेक कर्मचारी ऑफिसेसला जायला, अर्थात कम्युट परवडत असेल तरच! मोठ्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीने वागण्याची खात्री नाही आणि अनेकजण एकाचवेळी आजारी पडले तर त्यांचेच नुकसान आहे ह्यापायी त्यांनी ऑफिसेस अजून सुरू केलेली नाहीत. जशी लस ही भीती घालवेल ऑफिसेस परत सुरू होतील. डिसेंबर २०२१ला आपण वर्क फ्रॉम होमच्या सुरम्य आठवणीत रमलेले असू आणि गेले ते दिवस (आणि हजारो कोव्हीड-१९ रुग्ण) असे सुस्कारे टाकत असू अशीच शक्यता आहे.
  3. गावाकडे परतलेले लोक धास्तीने परत शहरांत येणार नाहीत. असे परतलेले स्थलांतरित हे रिसोर्स ठरतील आणि त्यांना वापरून आपापल्या राज्यांचा विकास करू अशा योजनाही कुठे कुठे बनल्या होत्या.

मला स्वतःला कोव्हीड-१९ हा आपली जगण्याची पद्धती बदलून टाकणारा प्रकार ठरणार आहे असं कधीच वाटलं नाही. जेव्हा आपल्याला एखादा अनुभव अंतहीन वाटतो तेव्हा आपण त्या अनुभवाशी जुळवून स्वतःत बदल करतो. एखादा अनुभव हा मर्यादित काळासाठी आहे ह्याची जाणीव आपल्याला असते तेव्हा आपण फारसे बदलत नाही. कोव्हीड-१९ च्या साथीच्या सुरुवातीपासूनच ह्या संकटाचा एक शेवट आहे हे आपण सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं. लस हा तो शेवट असेल असं बहुतेकांचं म्हणणं आहे. पावसामुळे क्रिकेट सामन्यात व्यत्यय यावा, पण काही वेळाने तेवढ्याच ओव्हर्सचा सामना खेळवला जावा तसं.

आपण किती दुःखी होऊ शकतो हे आपण overestimate करतो. आपण खरे सुखशोधक भिरभिरे फुलपाखरू आहोत. अगदी आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यूसुद्धा आपल्याला बदलत नाही, आपल्यावर कायम राहणारे व्रण पाडत नाही. मृत्यूपेक्षा त्या मृत्यूपूर्वीची प्रोसेस जर लांबलचक आणि अंतहीन (म्हणजे नेमकी केव्हा संपणार हे न कळणारी असेल) तर आपल्यावर आपल्या नकळत घाव साचत जात असावेत. पण तेही मिटू शकतात, जर आपण त्यांना नंतर गिरवत बसलो नाहीतर.

आपण ह्या पृथ्वीतलावर आहोत ते आपल्या पुढची पिढी पृथ्वीतलावर असेल हे आपल्या प्रजननातून नक्की करायला. हे प्रजनन आपल्या सुखाच्या शोधातून घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे सुखाच्या शोधाची अनिर्वचनीय तहान आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्या आजुबाजूच्यांचे मरण किंवा वेदना ह्यांपासून आवश्यक निब्बर असण्याची क्षमताही आपल्यातील बहुतेकांना दिलेली आहे. आणि ह्यात काही सिनिसिझम नाही. आपण जर दुसऱ्याच्या वेदनांनी कोलमडत असतो तर आपण त्याला मदतही करू शकलो नसतो. आपण दुसऱ्याला मदत करण्याकडेही एक काम म्हणून बारकाईने पाहू शकतो, पाहण्याचे शिकू शकतो ते ह्या निसर्गदत्त अलिप्त जाणीवेनेच.

कोव्हीड-१९ हा आपल्या जगण्याच्या पद्धतीत, आपल्या सुखशोधांच्या प्रवासात फारसे बदल घडवणार नाही असं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे ह्या आधीच्या भयानक रोगसाथींचे कोणते परिणाम आपल्याला आजवर आपल्यावर दिसतात असं विचारल्यावर दिसणारा अभाव. १९व्या शतकाच्या शेवटच्या दशकात अनेकजण मुंबई सोडून आपापल्या गावी परत गेले होते, प्लेगच्या साथीमुळे. पुढच्या वर्षी परत आले. परत फ्ल्यूच्या साथीत गेले असतील, परत आले. ह्यावेळचा मृत्यूदर आणि दळणवळण तर ह्या साथींच्या काळाहून चांगले आहे.

मला स्वतःला वाटतं की माणसांच्या वर्तनात मूलभूत बदल झालेलेच नाहीत. बदल वाटतो तो संधीचा अभाव आहे. जश्या संधी आल्या आहेत तसे आपण आपल्या सुखलोलुपतेकडे परत गेलो आहोत. किंवा बदल असेल तर एकच आहे. आपल्यातील काही जण, जे एक क्रिटिकल गट आहेत, ते मानवी समूहाच्या साऱ्या समस्यांकडे एक कोडे म्हणून बघतात आणि त्याच्या उकलीच्या पाठी लागतात. ही जाणीव सुरुवातीपासून नसावी असं वाटतं. आपण आपल्या समस्येकडे उकल असलेले पण शोधावी लागणारे कोडे म्हणून पाहू लागलो की आपली वर्तन बदलाची शक्यता अजून कमी होते. आपण केवळ पॉज म्हणून काही बदल करतो, जे सोडायला आपण कायम अधीर असतो.

कोव्हीड-१९मुळे आपल्यांत काहीही मूलभूत बदल झालेला नाही असं वाटायचं अजून एक कारण म्हणजे कोव्हीड-१९मुळे जे बदल होतील असं काहीजण म्हणत होते त्यातल्या अनेक गोष्टी कोव्हीड-१९ पूर्वीही शक्य होत्या, जसे वर्क फ्रॉम होम. जर वर्क फ्रॉम होम ऑफिसमध्ये काम करण्याहून किफायतशीर असेल तर कंपन्या ते अगोदरच करत्या. त्यांना कोव्हीड-१९साठी थांबण्याची गरज नाही. आणि त्या करत नव्हत्या ह्याचा अर्थ असे करणे ही बेस्ट निवड नाही.

--

मी बदलणार नाही, बदलणार नाही असं जे म्हणतो आहे त्याचा अर्थ मानवी वर्तन बदलतच नाही असे नाही. मानवी वर्तन बदलायची एक स्वाभाविक दिशा आहे, जीवन अधिक सुखी होण्याकडे, सोपे होण्याकडे आपण येतो. धोतराकडून pantकडे आलो ती दिशा, पत्र टाकण्यापासून स्मार्टफोनपर्यंत आलो ती दिशा. कोव्हीड-१९च्या साथीत अशा बदलांचे काही पोटेन्शियल होते असे मला वाटत नाही.

अर्थात बौद्धिकदृष्ट्या जे म्हटलं जातं ते टोकाचं असतं, approximation असतं. प्रत्यक्षात छोटा पण पक्का अपवाद दिसून येते, जो तथ्याला अधोरेखित करतो.

कोव्हीड-१९मुळे मानवाच्या आयुष्याच्या दोन टोकांवर मोठा परिणाम झाला असं मला वाटतं, एक म्हणजे लहान मुले आणि दुसरे म्हणजे वृद्ध. हे परिणाम लगेच दिसत असतील असे नाही. पण हे परिणाम झाले असावेत.

अनेक लहान मुलांचे घराबाहेरील खेळणे-बागडणे सुमारे ६-७ महिने बंद होते, काही जणांचे आजही बंद असेल. मला असं वाटतं की अजून काही वर्षांनी, म्हणजे अजून १४-२० वर्षांनी आपल्याला अधिक एकारलेल्या प्रौढ व्यक्ती मिळतील का? आणि भारतात आज उभरती असलेली आक्रमक धार्मिक राष्ट्रवादाची कमान उतरती होण्याची किंवा अजून तीव्र होण्याची सुरुवात ह्या कोव्हीड-१९च्या काळातल्या एकारल्या प्रौढांनी होईल का?

वृद्धांच्या बाबतीत घरातील त्यांची घटलेली स्पेस (३ वा २ पिढ्या असणाऱ्या घरातील वर्क फ्रॉम होम अवस्था) किंवा त्यांचे अधिक अधोरेखित एकटेपण (एकटी राहणरी वृद्ध जोडपी किंवा व्यक्ती) ह्या गोष्टी त्यांच्या जीवनेच्छेवर किंवा त्यांच्या स्वतःच्या उतारवयातील अपेक्षांवर परिणाम करतील का? एरवीही मला स्वतःला वृद्धत्व ही फारच कोड्यात टाकणारी बाब वाटते. एकतर बहुतेकांसाठी आयुष्याची ही वर्षे म्हणजे समुद्रातून भरावाने जमीन बनवावी असा कृत्रिमच प्रकार असतो. एक समाज म्हणून आपण समाजाच्या वृद्धत्वाची मोठी किंमत मोजतो. त्यांत भारतासारख्या देशांत, जिथे वृद्ध त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र व्यवस्थांमध्ये राहण्याची शक्यता फारच कमी असते तिथे वृद्ध हे विषमतेचे वाहक बनतात. ज्या कुटुंबाना स्वस्थ वृद्ध सदस्य मिळतात त्यांची बालसंगोपन आणि शिक्षण ह्यांची अवस्था सुधारू शकते. बाकी कुटुंबाना हा फायदा मिळत नाही.

मी कायम एक चमत्कारिक विचार करतो. समजा भारतातून ६५ वर्षावरील वृद्ध नष्ट झाले तर उरलेल्या भारतीयांवर त्याचा काय परिणाम होईल? एक गोष्ट निर्विवाद आहे की उरलेल्या समाजाची भौतिक समृद्धी जास्त असेल. मला तर असंही वाटतं की आपली आयुर्मर्यादा घटली तर आपण अधिक जबाबदार होऊ. आपलं लांबलचक आयुष्य हे आपल्याला ‘आहे रे अजून वेळ’ अशीही जाणीव देतं आणि नंतर सुस्कारे टाकून आंबट द्राक्षांशी खेळायलाही खूप वेळ देतं.

माझं स्ट्रेंज भाकीत असं आहे की कदाचित ७०च्या आसपासच्या वयोगटातील मृत्यूदर कोव्हीड-१९नंतरही जास्त असेल आणि त्याचं कारण मानसिक असेल. किंवा भारतातील वृद्ध अधिक एकारलेली जीवनशैली अंगिकारतील.

--

लॉकडाऊननंतर जेव्हा बार परत सुरू झाले तेव्हा उत्सुकता म्हणून मी खायचे पार्सल आणायला एका बारमध्ये गेलो. (मला स्वतःला अजून बाहेर जाऊन गटात काही खाण्या-पिण्याचे धाडस झालेले नाही.) आणि तो बार शिगोशिग भरलेला होता. मद्यधुंद लोकांचे उंचावलेल्या स्वरातील बोलणे, ग्लास आणि प्लेट्सचे आवाज हे तसेच होते जसे लॉकडाऊनच्या आधी. टेबलांवर एकमेकांच्या जवळबसून, मास्क गळ्याशी उतरवून किंवा अजिबातच लांब ठेवून लोक गप्पा मारत होते, खात होते, दारू पीत होते. लोक कसे निर्णय घेतात ह्याची एक चांगली झलक मला मिळाली.

कदाचित आपण आपल्या सुखाच्या शोधासाठी अधिक कमिटेडच होऊन जाऊ. आणि अधिक एकारलेले, अधिक अलिप्त. कदाचित आपण नाही, पण आपली अपत्ये तशी होतील. आपण एकमेकांच्या खूपच जवळ आल्याने आता परत आपापल्याकडे परत जावे अशीच अनेकांची अवस्था झाली आहे का? व्यक्ती म्हणून आपली जाणीव टोकदार होत जाण्याचा जो प्रवास अखंड चालू आहे तो अधिक वेगवान होईल का? मला स्वतःला तरी स्वतःबद्दल असं वाटतं. पण कदाचित ही एक केवळ निसटती जाणीव असावी.

कारण लॉकडाऊनचा काळ, त्यातील कमी वर्दळीची अवस्था, शांत रात्री, सारेच जण घरात अडकून असल्याने आणि एकाच प्रश्नाकडे पाहत असल्याने निवलेली तौलनिक जेलसी, शमलेली चुरस हे सारे आता निसटून चालले आहे.

माझे वृद्ध आई-वडील सुमारे ६ महिने घराबाहेर पडले नव्हते. मला त्यांना आता थांबवून ठेवता येत नाही. असं वाटतं की होऊन होऊन काय होईल? काहीही होण्याच्या साऱ्या शक्यतांकडे मी थोड्या शांततेने पाहू शकतो.

Dadar Diwali shopping

मे-जून महिन्यांत मास्कशिवाय कसे काय लोक वावरतात ह्या जाणिवेने मला सिरीयल आणि सिनेमेही पाहता येत नव्हते. आता तसं वाटत नाही. नाकाखाली घसरलेला मास्क लावून चालणारी, वाट पाहणारी, एकमेकांशी बोलणारी माणसे मला मानवी अस्तित्वाची सरासरी वाहक वाटतात. ‘नाश के दुख से कभी मिटता नही निर्माण का सुख’ ह्या रोमांचक वाटणाऱ्या ओळी ह्या अशा नाकाखाली, हनुवटीखाली मास्क घेऊन वावरणाऱ्या लोकांसाठी आहेत असं वाटतं.

--

माझ्या आसपासच्या रस्त्यावर पुस्तकांचे दुकान असलेले, अनेकांचे परिचित असे एक काका होते. ते कोव्हीड-१९ने गेले. परवा रस्त्यात चालता चालता अचानक ते दिसल्याचा, हसल्याचा मला भास झाला. कोव्हीड-१९ नसता तर कदाचित मी त्यांना अजून वृद्ध होताना पाहू शकलो असतो, जाता-येता त्यांना हात करू शकलो असतो, काही बोलू शकलो असतो.

Daniel Kahneman च्या TED talkमध्ये तो म्हणतो की आपल्यात दोन स्व असतात: एक अनुभवणारा आणि एक ते अनुभव आठवणारा. मला तो मनुष्य दिसला असे वाटणारा मी तिथेच उभा आहे, आपले काही आनंददायी आपल्या नकळत हरपल्याची टोकदार वेदना घेऊन. आणि हे आठवणारा मी पुढे जाऊन कांदे-बटाटे विकत घेतो, घरी येऊन ऐकू येणाऱ्या गोंगाटाने चिडून, थोडा निवून लिहितो. लिहिणं पूर्ण झाल्यावर येणाऱ्या रिक्त जाणीवेत कोव्हीड-१९ची सावली हळूहळू माझ्याकडे सरकते असं मला दिसतं.

कोरोना व्हायरस कदाचित माझ्या शरीरातून एखादा प्रवास करून गेला असेल, पण तो हळूहळू माझ्या जवळजवळ येतो आहे अशी जाणीव मला कधीकधी होते. काम्यूच्या The Plagueमध्ये मंदावत जाणाऱ्या प्लेगच्या शेवटच्या लाटेत Tarrou अचानक सापडतो, किंवा कोसळत्या Balrog च्या शेवटच्या तडाख्याने Gandalf पडावा तसे आपले होईल का असं मला वाटतं. मग सांख्यिकी मला धीर देते, कोव्हीडची सावली अगदी फिकट करून सोडते.

दिवसभर प्रवास करून एखाद्या नव्या शहराकडे जाताना उशिरा रात्री, त्या नव्या शहरातील निर्मनुष्य रस्त्यांवर पत्ता सापडू नये असं तर होणार नाही ना आपलं?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

निरीक्षणांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मे-जून महिन्यांत मास्कशिवाय कसे काय लोक वावरतात ह्या जाणिवेने मला सिरीयल आणि सिनेमेही पाहता येत नव्हते.

गेले काही महिने मी 'सुपरस्टोअर' नावाची विनोदी, अमेरिकी मालिका बघत आहे. त्याचा नवीनतम भाग अगदी महिन्यापूर्वी आला. त्यात लोक मास्क घालून दिसायला लागले; करोना-कोव्हिडबद्दल चर्चा सुरू झाल्या. 'मालिकांमधलं सगळं थोडंसं ताणलेलंच असतं', ह्याची मला एवढी सवय झालेली आहे की हे सगळं मास्क वगैरे भूतकाळात घडून गेलेलं आहे आणि आता बाहेर सगळं छानछान आहे असं मला मालिका बघताना वाटत राहिलं.

समांतर/अवांतर - करोनाचा उच्छाद चीनबाहेर सुरू होण्यापूर्वी, जानेवारी २०२०च्या न्यूयॉर्करमध्ये हा लेख आला होता. वाचला नसेल तर पाहा - A World Without Pain सिनिसिझमच्या मुद्द्यावरून आठवलं. सुरुवातीला भारतातल्या मजुरांच्या दुर्दशेच्या बातम्या वाचून मला फार त्रास होत होता, तेव्हा हा लेख पुन्हा वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विचारमंथन आवडले.
आजकाल सगळं सुपरलेटिव्ह आहे. "इंटरनेट मोडण्याएवढं भारी" वगैरे जाहिरातदारी भाषा बोकाळल्यामुळे सगळं काही एकदम टोकाचं असतं.
तसाच कोव्हिडमुळे झालेला बदल क्रांतिकारी आणि कायमस्वरूपी असणार आहे अशी समजूत बहुतेक ठिकाळी ठळक दिसते.

"हा प्रकार कधीतरी संपणार आहे आणि आपण पुन्हा पूर्ववत जगणार आहोत" हे आज थोडं अशक्य वाटत असलं तरी २०२५ मधे आपण २०२० च्या स्थितीकडे बघून हेच म्हणणार आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0