अज्ञात ज्ञात पंढरपूर १ चंद्रभागा मंदिर

चंद्रभागा मंदिर
पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर.
मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार?
मोठ्या जोत्यावर ४ सुरूदार दगडी खांब त्यावर ३ कमानी प्रत्येक कमानीला उठावाची २ कमळे कोरलेली त्या खांबामागे लहानसा दगडी मंडप आत गाभारा ज्यात सिंहासनावर अडीच फूट अशी माता चंद्रभागेची सुबक देखणी काळ्या पाषाणातली द्विभूज मूर्ती असलेले असे हे या मंदिराचे स्वरूप. मंदिरात दिवे ठेवण्यासाठी ४ लहान कोनाडेही आहेत. याचे विटाचे शिखरावर ब्रह्मा विष्णु महेश याच्या सह अनेक रेखिव मुर्ती असून मंदिराचे दक्षिणेकडे २ लहान महादेव मंदिरही आहेत. हे महादेव मंदिरे चंद्रभागा मंदिराच्या आधीची आहेत.
वाई, कराड आदि ठिकाणी जशी कृष्णा नदिचे काठी कृष्णामाईची मंदिरे आहेत तद्वत हे चंद्रभागा मातेचे मंदिर. "चंद्रभागे स्नान" या संतोक्तीमुळे जी चंद्रभागा समस्त वारकऱ्यांचा प्राण आहे. तिचे वाळवंटी "बाराही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंती" म्हणत खेळिया करण्यात आनंद आहे तसे खेळताना "तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे" चे यौवन प्रप्त होते. हि चंद्रभागा गावकऱ्याचे जीवन आहे. कारण तिचेच जलपानाने पंढरीकरांचा पिंड पोसला जातोय. शिवाय तिचे वाळवंटी खेळण्यात पंढरपूरकरांची आयुष्ये नव्हे पिढ्यान् पिड्या गेल्यात. त्यामुळेच तिचे प्रति भक्तिभाव, प्रेम, कृतज्ञता म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नदि तटाचे बांधकाम करताना खानदेशातील विठ्ठलभक्ती परंपरा असणारे हभप गोविंदबुवा चोपडकर महाराज यांनी मोठ्या यत्नांनी मोठा खर्च करून हा घाट आणि चंद्रभागा मंदिर बांधले. देवाचे पुजा अर्चेची व्यवस्था केली. त्यामुळेच या घाटाला चंद्रभागा घाट म्हणतात. चोपडेकरांची भक्तिपरंपरा, घाट, मंदिर, त्या पुढील दगडी चौरस सप याचा विचार करता इथे काही उत्सव समारंभ व्हावा असा विचार त्यांचा असावा. अशा समारंभाबाबत इतिहासातले ज्ञात नाही पण आजकाल सगळा उल्हास दिसतोय. आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याच्या नादात या मंदिराकडे कुणाचेच लक्ष नाही. ना गावकऱ्याचे. ना वारकऱ्याचे. ना शासनाचे. ना नगरपरिषदेचे. मध्यंतरी भुमिअंतर्गत गटारीचे कामी नगरपरिषदेने देवळापुढचा दगडी सपच फोडला विचारणा करता गटारीचे काम होताच परत बांधु म्हणाले. पण १५ ते २० वर्षे होवूनही अजून काही नाही. नंतर सरकारनेच लोखंडी कठडे बसविण्याचे नावाने घाटाची फोडाफोड केली. मंदिर समितीने दर्शन रांगेसाठी इथेच लोखंडी जिना करून मंदिराचे आणि घाटाचे सौंदर्य बिघडविले आहे. अपवाद आहे ते केवळ नरेंद्र कवडे अण्णांचा. ते गेल्या काही वर्षांपासून प्रतिवर्षी चंद्रभागा मातेची साग्र संगित पुजा करतात. भजनादी कार्यक्रमही घडवितात ज्याला आमचे पिताश्री अनिलकाका बडवे, मा. सुधाकरपंत परिचारक, हभप शिऊरकर महाराज, आणि अन्य तुरळक जनांची उपस्थिती असते. अनेक मान्यवरांना आमंत्रित करूनही प्रतिथयश लोक येत नाहीत.
आपल्या वैभवशाली सांस्कृतिक वारश्याकडे जतन करण्याच्या चांगल्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन तयार होइल तो खरा सुदिन. नाहि तर आपली संस्कृति काय आहे? आणि ती कशी रक्षावी? हे सांगण्याला युरोपियनांना यावे लागेल.
© अधिवक्ता आशुतोष अनिलराव बडवे पाटील. पंढरपूर

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet