वन फूट ऑन द ग्राउंड

One foot on the ground

मेघना (भुस्कुटे) आणि मी एकदा इंग्रजी पुस्तकांबद्दल गप्पा मारत होतो. बोलता बोलता ती म्हणाली, "मला नं, शांता गोखलेंसारखं इंग्रजी करायचंय."
इंग्रजी भाषेबद्दलचं प्रेरणास्थान गोखले आडनावाचे असावे याचे मला आश्चर्य वाटले. त्या आश्चर्याच्या भरात मी गूगलवर शांता गोखले हे नाव न शोधताच तिला, "कोण शांता गोखले?" असा निरागस आणि निर्लज्ज प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, की माझ्यासमोर विचारलास ते ठीक आहे, पण बाहेर कुठे हा प्रश्न विचारू नकोस आणि तातडीने शांता गोखले वाचायला घे. या बाबतीत मी थोडी गटणे असल्याने मी ताबडतोब शांता गोखलेंची मिळतील ती पुस्तकं मागवली. मला दोन मिळाली आणि त्यातलं एक लॉकडाऊनमुळे अडकलं.

वन फूट ऑन द ग्राउंड - अ लाईफ टोल्ड थ्रू द बॉडी, हे शांता गोखलेंचं आत्मचरित्र मी अडीच दिवसात वाचून संपवलं. गेल्या अनेक वर्षांत, घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत चालता चालताही वाचन करावं असं काही मिळालं नव्हतं, ते मला या पुस्तकानं दिलं. शांता गोखलेंनी शरीर हा केंद्रबिंदू ठेऊन, त्याच्या आजूबाजूने त्यांच्या आयुष्यातल्या अनेक कटू-गोड आठवणी वाचकांसमोर मांडल्या आहेत. ही अशी मांडणी केल्यामुळे ही गोष्ट फक्त त्यांची नसून आपलीही आहे असं सतत वाटत राहतं आणि त्यामुळेच हे पुस्तक सोडवत नाही. स्त्रीच्या शरीराला बालपण, तरुणपण, म्हातारपण असे कालखंड असले, तरी ते शरीर एका स्त्रीचं आहे ही ओळख मात्र अगदी लहानपणीपासून त्याला चिकटलेली असते. आणि बालपणीची अगदी चार-पाच वर्षं सोडल्यास, स्त्रीला तिच्या देहाची सतत जाणीव ठेवावी लागते. त्यामुळे शरीर ही मध्यवर्ती कल्पना बोलकी आहे.

मेघनाला त्यांचं इंग्रजी इतकं का आवडलं याचंही कारण लगेच समजलं. त्यांच्या भाषेत कुठल्याच टोकाचा अभिनिवेश नाही. भारतीय लोक इंग्रजीत लिहितात, तेव्हा एकतर ते अतिशय 'सोपं' म्हणून त्याची वाहवा होते, किंवा अगदीच उच्चभ्रू, अवघड असं काहीतरी म्हणून तरी. पण या पुस्तकातली भाषा वाचकाला बरोबर घेऊन जाणारी आहे. यात आवर्जून सांगावीत, अशी काही उदाहरणं म्हणजे, शांताबाईंनी इंग्रजीमध्ये केलेलं बिरड्यांच्या उसळीचं वर्णन. जेमतेम दोन वाक्यांत, पण त्या उसळीचे सगळे बारकावे सांगणारं ते वर्णन वाचून, हे आपल्याला कुणी लिहायला सांगितलं असतं तर आपण किती बटबटीत लिहिलं असतं असं वाटून गेलं. तसंच, महाराष्ट्रातले, मराठीतले अनेक संदर्भ, मग ते शब्द असोत किंवा वाङ्मय असो, वाचकांपुढे ठेवताना त्यासाठी इंग्रजीचे छोटे-छोटे पूल बांधायची त्यांची शैली वेगळी आहे. एके ठिकाणी तुकारामाच्या अभंगाचं संपूर्ण इंग्रजी भाषांतर आहे तर एके ठिकाणी चाळीशीनंतर लागणाऱ्या चष्म्याला मराठीत "चाळीशीच" कसं म्हणतात याचं अगदी सोपं स्पष्टीकरण आहे. त्यांची शैली विनोदाकडे झुकणारी आणि खेळकर असली तरी त्यांच्या स्वभावातला सडेतोडपणा, खरेपणाही त्यांच्या लेखनातून दिसतो.

शांता गोखलेंचा जन्म १९३९ सालचा. आणि त्यांनी हे पुस्तक २०१९ साली लिहिलं. जवळपास ऐंशी वर्षाचं, अनेक चढ-उतार असलेलं आयुष्य उलगडून सांगताना, स्वतःकडे आणि स्वतःच्या आयुष्यातल्या दुःखांकडेदेखील विनोद्बुध्दीने बघायचं कसब त्यांच्याकडे आहे, हे पुस्तक वाचताना स्पष्टपणे जाणवतं. त्या काळी स्वतःचे पैसे गुंतवून मुलीला उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला पाठवणारे आई-वडील त्यांना मिळाले. परदेशी शिकत असताना आपल्या आजूबाजूला एक भारतीय कुंपण घालून त्यातच वावरण्याचा अट्टहास त्यांनी केला नाही. पण तरीही भारतात परत येऊन, इथेच काम करण्याचा ठाम निर्णयही त्यांनी घेतला होता. भारतात परत आल्यानंतर त्यांची बरीच मानसिक ऊर्जा लग्न, संसार, मुलांचं संगोपन यांत गेली. एका लग्नातून बाहेर येऊन दुसरंही करून बघितलं. पण सहजीवनाचे दोन्ही अनुभव समृद्ध न करता, मागे खेचणारेच होते. या सगळ्या दगदगीच्या वर्षांत त्यांनी अनेक वेगवेळी कामं केली. 'फेमिना'सारख्या मासिकाचं उप-संपादकीय काम ते थेट ग्लॅक्सोसारख्या भांडवलशाही कंपनीमध्ये नोकरी. हे सगळं करत असताना त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या गोष्टीही या पुस्तकात आहेत. लेखनाच्या ओघात अनेक पुस्तकांचे संदर्भही येतात. अगदी शेक्सपियरपासून ते जर्मेन ग्रीअरच्या 'द फिमेल युनक'पर्यंत अनेक पुस्तकांचे संदर्भ येतात, त्यामुळे हे पुस्तक संदर्भांची खाण आहे.

या पुस्तकातल्या साध्या-सरळ वाक्यांच्या पाठीमागचा आशय विचार करायला लावणारा आहे. दुसरं लग्न मोडल्यावर जेव्हा नवरा घरातून निघून गेला, तेव्हा त्या घराची, पलंगाची संपूर्ण मालकी मिळाल्याबद्दल वाटणाऱ्या आनंदाबद्दल त्या लिहितात. आपल्या पलंगावर हवं तसं, वेडंवाकडं झोपता येण्याच्या स्वातंत्र्याबद्दल लिहिताना, अनेकींना हे लाभत नाही ही आठवणही त्यांना आवर्जून होते. आयुष्यातल्या दुःखाच्या प्रसंगातही त्यांना त्यांच्या प्रिव्हिलेजची जाणीव आहे, हे मला फारच भावलं. तसंच, आपलं लग्न मोडकळीला आलं असलं, तरी त्याच माणसाबरोबर मनात अढी न ठेवता व्यावसायिक काम करत राहणं त्यांना जमलं किंवा त्यांनी ते जमवलं. कॅन्सरशी लढतानाही त्याकडे त्या विनोदबुद्धीनं पाहू शकल्या. आणि अशा प्रसंगातून जाताना अपरिहार्यपणे येणाऱ्या मरणाच्या विचारांचं त्या विनोदबुद्धीनं विश्लेषण करू शकल्या.

गेल्या महिन्याभरात वयाची ऐंशी वर्षं पार केलेल्या, तीक्ष्ण विनोदबुद्धी असलेल्या एकूण दोन स्त्रिया मला भेटल्या. आधी मी फ्रॅन लिबोविट्झची 'प्रिटेंड इट्स ए सिटी' ही मालिका बघितली. आणि नंतर हे पुस्तक वाचलं. दोघींच्या आठवणी ऐकून/वाचून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे, माझ्या पिढीत यांतल्या अनेक गोष्टींचे आयाम बदलून गेले आहेत. चांगलं लेखन करण्यासाठी अंगभूत गुण असणं महत्त्वाचं असलं तरी, आजूबाजूचं वातावरण कसं आहे आणि त्याच्याशी लेखकाचा संवाद होतोय का हेही महत्त्वाचं आहे. शांता गोखलेंच्या १९७०-८०मधल्या कारकिर्दीतला स्त्रीवाद हा आजच्या स्त्रीवादापेक्षा वेगळा आणि कदाचित जास्त पुढारलेला होता असं राहून राहून वाटतं. त्या काळी शांताबाईंसारख्या परदेशी शिकायला जाणाऱ्या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्या होत्या. आज ते प्रमाण जास्त असूनही, आजचा स्त्रीवाद भरकटल्यासारखा वाटतो, त्याची उद्दिष्टं डळमळीत वाटतात, आणि त्याच दर्जाचं शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या अनेक स्त्रिया परंपरावादी झाल्यासारख्या वाटतात.

संगीत, नृत्य, चित्रकला, रंगभूमी यांचा समाज घडवण्यात काही हातभार असायचा तो आता हरवल्यासारखा वाटतो. आंतरजालामुळे हे सगळं आपल्या घरात आलं असलं, तरी आपण या सगळ्या माध्यमांमध्ये असूनही एकटेच आहोत अशी हुरहूर सतत लागून असते. आता या सगळ्याची जागादिखाऊ चकचकीतपणा आणि प्रसिद्धीचा हव्यास यांनी घेतली आहे आणि आपण कुणाशीही संवाद न साधता समोर आलेली करमणूक भोगत चाललो आहोत. याचे परिणाम काय होतील हे नक्की सांगता येत नाही. हे पुस्तक वाचताना मात्र आंतरजालाआधीच्या विश्वातील आठवणी वाचून थोडा हेवा वाटला हे नक्की.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुस्तक परिचय आवडला. शांता गोखले म्हणजे रेणुका शहाणे ची आई आणि लेखिका एवढीच जुजबी माहिती होती. लेखात सुरुवातीला सांगितल्याप्रमणे गुगलून पाहिले. एक जुना लेख वाचला. आता पुस्तक घेऊन वाचायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

समीक्षा आवडली. शांता गोखल्यांनी जसे बिरड्यांच्या उसळीचं दोन वाक्यांत नेमकं वर्णन केलं आहे, तसाच तुमच्या लेखाने त्यांच्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. जाताजाता, दिखाऊ चकचकीतपणावर शेवटच्या परिच्छेदातील भाष्य आणि शांताबाईंचं 'फेमिना' सारख्या मासिकाच्या उपसंपादक असणं, हे डोळ्यांसमोर सर्रकन चमकून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शांता गोखलेंच्या मराठीतल्या दोन कादंबऱ्या आवडल्या आहेत, 'त्या वर्षी' आणि 'रीटा वेलिणकर'. पण त्यांचं इंग्लिश लेखन कधी वाचलेलं नाही. हे पुस्तक वाचलं पाहिजे.

शैलीचं हे वर्णन वाचून मला लॉरा किपनीसचं 'The Female Thing: Dirt, envy, sex, vulnerability' नावाचं पुस्तक आठवलं. अर्थाअर्थी मजकूर फारच निराळा असणार, याची कल्पना आहे. पण ती शैली अशीच वाटते, खेळकर आणि सडेतोड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विंग्रजी साहित्य झेपत नाय! मराठी साहित्य सुद्धा जेमतेम झेपत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>>>>जाताजाता, दिखाऊ चकचकीतपणावर शेवटच्या परिच्छेदातील भाष्य आणि शांताबाईंचं 'फेमिना' सारख्या मासिकाच्या उपसंपादक असणं, हे डोळ्यांसमोर सर्रकन चमकून गेलं.

फेमिना, कॉस्मो आणि त्यांच्यासारखी इतर अनेक नियतकालिके आज लोकांना उथळ/दिखाऊ वगैरे वाटत असली तरी १९७०-८० मध्ये त्यांचा स्त्रियांच्या प्रश्र्नांमधील सहभाग महत्त्वाचा होता. आणि मी तर म्हणेन अजूनही आहे. त्यावेळी एखाद्या भारतीय स्त्रीने ब्युटी क्वीन असणं आणि आज असणं यातही फरक आहे.
सॉरी आता मी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे.
Even today, fashion magazines are the first to face flak when a radical social change happens. When women protest against body shaming, lack of diversity in fashion, unreachable beauty standards, the changes are first seen in these magazines before they trickle down (or not) into everyday life. These magazines are not as frivolous as they are percieved. They have been agents of change through the years, even though sometimes, they have done so reluctantly.
What I mean in the last paragraph is that there is no critique or discussion about entertainment and art which used to happen before fast entertainment took over.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या काळी शांताबाईंसारख्या परदेशी शिकायला जाणाऱ्या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्या होत्या. आज ते प्रमाण जास्त असूनही, आजचा स्त्रीवाद भरकटल्यासारखा वाटतो, त्याची उद्दिष्टं डळमळीत वाटतात, आणि त्याच दर्जाचं शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या अनेक स्त्रिया परंपरावादी झाल्यासारख्या वाटतात.

परंपरावाद स्वीकारण्याचं किंवा नाकारण्याचं दडपण नसणं (किंवा निदान कमी प्रमाणात असणं) हे काहींच्या मते स्त्रीवादाचं यश आहे.

बाकी पुस्तकपरिचय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

या काळी शांताबाईंसारख्या परदेशी शिकायला जाणाऱ्या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्या होत्या. आज ते प्रमाण जास्त असूनही, आजचा स्त्रीवाद भरकटल्यासारखा वाटतो...

...कंटेंपररी स्त्रीवाद हा नेहमीच भरकटल्यासारखा वाटत असावा काय? कदाचित शांताबाईंचा स्त्रीवाद (आज वाटला नाही, तरी) शांताबाईंच्या काळात भरकटल्यासारखा वाटला असावा काय?

हे भरकटल्यासारखे वाटणे वगैरे नक्की कोण ठरवितो?

आणि, भरकटल्यासारखा वाटत नाही, अशा स्त्रीवादाचा उपयोग काय? म्हणजे मग काय कंप्लायंट स्त्रीवाद पाहिजे आहे काय? ('सरकारमान्य स्त्रीवाद'? किंवा मग 'लायसन्स्ड स्त्रीवाद'?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>कंटेंपररी स्त्रीवाद हा नेहमीच भरकटल्यासारखा वाटत असावा काय? कदाचित शांताबाईंचा स्त्रीवाद (आज वाटला नाही, तरी) शांताबाईंच्या काळात भरकटल्यासारखा वाटला असावा काय?

हे भरकटल्यासारखे वाटणे वगैरे नक्की कोण ठरवितो?

या लेखात मी ठरवते आहे. मला तो भरकटल्यासारखा वाटतो.
माझं या बाबतीतलं एक ठळक निरीक्षण म्हणजे ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही अशा लोकांचें घेटो आज जास्त प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे स्त्रीवाद आणि त्याबद्दलची चर्चा सधन, उच्चवर्णीय स्त्रियांपूर्तीच मर्यादित राहिली आहे. तिचे स्वरूप स्त्री - पुरुष असेही झालेले नाही. जे एव्हाना व्हायला हवे होते.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्थेत अजूनही स्त्रीवाद रुजला नाही. एखाद्या हेटरो कुटुंबात अजूनही घरकामाचा बराच भार घरातल्या बाईवर पडतो. वर दिलेल्या सधन कुटुंबांमध्ये ही परिस्थिती फक्त कामाचे आऊटसोर्सिंग करून बदलली जाते. काम कमी करायची ही external साधनं घालवली तर कामाचा भार बाईवर येतो. मझ्या मते निदान शांता गोखले समाजाच्या ज्या स्तरातून येतात त्या स्तरात १९८० पासून जरी पकडलं तरी चाळीस वर्षात एवढा बदल होणे अपेक्षित होते.
स्त्रीवादी उद्दिष्ट साध्य करण्यात पुरुषांचा सहभाग असणे ही १९८०-९० च्या दशकानंतरची एक नैसर्गिक पायरी असायला हवी होती. पण ती तशी मोठ्या प्रमाणात झाली नाही.

कुटुंबव्यवस्था अजूनही पितृसत्ताक आहे याचं अजून एक उदाहरण म्हणजे स्त्रियांना माहेरच्या मालमत्तेचा वाटा मागण्या पासून विविध मार्गांनी परावृत्त करणे. हेदेखील अनेक उच्चशिक्षित कुटुंबांमध्ये आजही घडताना दिसते. खरंतर वडलोपर्जित मालमत्तेची समान वाटणी, ज्यात मुलगा मुलगी असा भेद होत नाही, निदान सुशिक्षित मध्यवर्गीय कुटुंबात आता तरी सवयीची गोष्ट असायला हवी. पण ती तशी नाही. आणि यासाठी संघर्ष होताना दिसत नाही.
असो. असे आणि काही मुद्दे आहेत. आता कंटाळा आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम विश्लेषण. नबांनी जो प्रश्न विचारला तो मलाही पडला होता की हे स्त्रीवाद भरकटणे वगैरे कोण ठरवते? तुमचे उत्तर पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>परंपरावाद स्वीकारण्याचं किंवा नाकारण्याचं दडपण नसणं (किंवा निदान कमी प्रमाणात असणं) हे काहींच्या मते स्त्रीवादाचं यश आहे.

अर्थात! स्त्रीला तिचं आयुष्य तिच्या निवडी प्रमाणे जगता येणे हे स्त्री वादाचे यश आहे. पण ती निवड स्त्रियांचे दमन करणाऱ्या धार्मिक परंपरांची असावी याचा (मला) खेद वाटतो. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला जे परंपरावादी वाटतं ते इतर कुणाला तसे वाटणार नाही. किंवा माझ्या आचरणात जे परंपरावादी नाही असं मला वाटतं तेही relative आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ती निवड स्त्रियांचे दमन करणाऱ्या धार्मिक परंपरांची असावी

करेक्ट तुम्ही म्हणता तसे हळदी-कुंकू पद्धत डावलणे, मंगळसूत्र न घालणे, आता स्त्रियाही पूजा सांगतात् वगैरे ..... हे झाले धार्मिक.
पण पाश्चात्य देशात तर अजुनी वाईट परिस्थिती आहे - इथे तर गर्भपाताचे देखील पर्यायस्वातंत्र्य उपलब्ध नाही. शरीरावर पुरुषप्रधान वव्यवस्थेची सत्ता आहे. जॉयेसे मेयर्स आदि लेखिकांची पुस्तके वाचाल तर सीतेला लाज वाटेल अशी 'आदर्श ख्रिश्चिअन वाइफ़' बद्दल पुस्तके च्या पुस्तके बेस्ट सेलर्स आहेत. स्त्री पुरुष वेतन तफावत अगदी रँपंट आहे.
बरेचदा वाटतं पाश्चात्य संस्कृती पूर्णच बेगडी आणि स्वार्थी आहे. इथे स्वत: गाड्या उडवणारआणि विकसनशील देशांना 'पर्यावरणाचे धडे' शिकवणार, त्यांच्या कडुन अपेक्षा ठेवणार.
एक मस्त पुस्तक वाचलेले होते जीमध्ये पृथ्वीवरी निसर्गसंपत्तीचा जो ऱ्हास होतो आहे, त्याची आणि स्त्रीवादाची सांगड घातलेली होती. पृथ्वी ही स्त्री आहे कल्पुन आणि इंडस्ट्रिअलायझेशन म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीचे, दमनाचे प्रतिक वगैरे बराच उहापोह होता. अनवट पुस्तक होतं.

पाब्लो नेरुडा यांच्या कवितेत कधीकधी पृथ्वी आणि स्त्रीदेह साम्य आढळते. - उदाहरणार्थ ही कविता

एक औरत का जिस्म (पाब्लो नेरुदा की कविता 'बॉडी ऑफ अ वुमन' का अनुवाद)

सफेद पर्वतों की सी रानें
तुम एक पूरी दुनिया नजर आती हो
जो लेटी है समर्पण की मुद्रा में
मेरी ठेठ किसान देह धंसती है तुममें
और धरती की गहराइयों से सूर्य उदित होता है
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूल होइपर्यंत सर्वसाधारणपणे बरं असतं. हनीमून पिरीअड ऑफ लाईफ!
- नंतर मात्र, मूल झाल्याच्या पश्चात अनेक स्त्रिया नोकरी सोडतात (स्वत:च्या चॉइसने किंवा कुटुंबाच्या) आणि मग गॅप पश्चात नोकरी लागणे कठीण होउन बसते. मग पुरेसा जोर लावला नाही, पुरेशी क्रिएटिव्हिटी दाखवली नाही उदा - नवीन काही शिकणे तर मग आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होणे कठीण होउन बसते मग पर्याय उरतो ती कुटुंबातील घटक म्हणुन स्वत:ची प्रॉडक्टिव्हिटी, फक्त घरकामातून दाखवत रहाणे, जे की सर्वांच्या पथ्यावर पडते.
- नवरा कमावता असल्याने तो घरकामाचा भार उचलत नाही ज्याचे समर्थन हे असते की - बायको कमावत नाही म्हणजे तिनेच सर्व केले पाहीजे.
- या आर्थिक स्वातंत्र्या अभावी, मुलींना माहेरी आई वडीलांच्या म्हातारपणी, त्यांना पैसे पाठवता येत नाहीत, की त्यांची जबाबदारी उचलता येत नाही. त्यातून मग मुलाला इस्टेटीचा जास्त वाटा जाणे अशा भानगडी निर्माण होतात.

एव्ह्रीथिंग बॉइल्स डाऊन टु आर्थिक स्वातंत्र्य. हां आर्थिक स्वातंत्र्य मिळूनही, कच खाणारा गट आहे - त्यांची वेगळी कहाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओळख आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0