जॉर्ज ऑरवेल - मी का लिहितो?

जॉर्ज ऑरवेलच्या ‘१९८४’, ‘अ‍ॅनिमल फार्म’सारख्या कादंबऱ्या अनेकांना परिचित असतील. १९४६ साली प्रकाशित झालेल्या ‘व्हाय आय राईट’ या निबंधात लिखाणामागच्या आपल्या प्रेरणा त्यानं समजावून सांगितल्या आहेत. कोणत्याही लेखकाला/वाचकाला रोचक वाटाव्या अशा त्या आहेत. म्हणून त्यांचा सारांशरूपी परिचय इथे दिला आहे. या निमित्तानं काही साधकबाधक चर्चा व्हावी अशी आशा/अपेक्षा आहे.

(श्रेयअव्हेर: ‘अक्षर’ दिवाळी अंकात लेखक नंदा खरे यांची मुलाखत प्रकाशित झाली आहे. त्यात त्यांच्या लेखनप्रेरणेविषयीच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते ऑरवेलच्या या निबंधाचा हवाला देतात. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा तो वाचून त्याचं सार द्यावंसं वाटलं. )

लहानपणचा काहीसा एकलकोंडा स्वभाव, कुणाला आपली फारशी कदर नसल्याची भावना आणि आपल्याविरुद्ध उभं ठाकल्याचं भासणाऱ्या जगाचे उट्टे काढण्याचा (शब्दांद्वारे व्यक्त होताना) मिळणारा आनंद अशा गोष्टींचं वर्णन करून ऑरवेल हेही सांगतो, की त्या काळात (दहा-बारा वर्षांपर्यंत) त्याच्या हातून गांभीर्यानं लिहिलं गेलेलं लिखाण फार वाईट होतं. त्याशिवाय शाळेत साहित्यिक नियतकालिक चालवणं, गरजेनुसार चटकदार लिखाण करणं अशा गोष्टीही त्याला हळूहळू जमू लागल्या. बारकावे टिपणाऱ्या निवेदनांचा सराव (डायरीसदृश, पण न लिहिता; नुसताच मनातल्या मनात) त्यानं या काळात नकळत केला. शब्दांची जादू त्याला हळूहळू (सोळाव्या वर्षापासून) उमगू लागली.

या आठवणी सांगताना त्यांतलं एक द्वैत ऑरवेल उलगडून सांगतो आणि ते माझ्या मते कोणत्याही लेखकासाठी कळीचं आहे: जडणघडणीच्या काळात लेखकाच्या भावनिकतेचे पैलूही घडत असतात आणि त्यांतून त्याची पूर्णपणे सुटका कधीही होऊ शकत नाही. आपल्या स्वभावाला वेसण घालणं आणि जडणघडणीच्या एखाद्या अप्रगल्भ टप्प्यावर अडकून न राहण्यासाठी झगडणं हे लेखकाचं कर्तव्य आहे हे ऑरवेल मान्य करतो, पण पुढे तो असंही म्हणतो की या मूळ प्रभावांतून जो पूर्णपणे बाहेर पडतो असा माणूस बऱ्याचदा आपल्यातली लेखनप्रेरणासुद्धा गमावून बसतो.

उदरनिर्वाह हे कारण वगळता लिखाणामागे इतर कोणती कारणं असतात ते ऑरवेल मग सांगतो. हा लेखाचा गाभा म्हणता येईल.

कारण १: निखळ अहंभाव (Sheer egoism) – वयाची तिशी गाठल्यानंतर मानवजातीतले बहुसंख्य लोक आपल्याला काही व्यक्तिमत्व आहे हेच हळूहळू विसरून जातात आणि इतरांसाठी (कुटुंब, मुलंबाळं, समाज वगैरे) जगू लागतात किंवा जगण्याच्या कंटाळवाण्या ओझ्याखाली पिचून जातात. वैज्ञानिक, कलाकार, राजकारणी, उद्योजक अशांना मात्र इतरांपेक्षा आपण हुशार आहोत हे दाखवण्यात किंवा स्वत:ला अजरामर करण्यात रस असतो. लेखकही त्याला अपवाद नाहीत.

कारण २: सौंदर्यनिर्मितीची प्रेरणा (Aesthetic enthusiasm) – रेल्वे टाईमटेबल सोडलं तर कोणतंही पुस्तक सौंदर्यनिर्मितीच्या प्रेरणेपासून मुक्त नसतं. कुणाला शब्द आणि त्यांचे नाद मोहवून टाकतात तर कुणाला एखादा अनुभव/विचार इतरांबरोबर वाटून घेण्याइतका छान वाटतो.

कारण ३: इतिहास सांगण्याची प्रेरणा (Historical impulse) – आपलं जग कसं आहे; त्यात सत्य काय आहे हे नंतर येणाऱ्या किंवा इतर लोकांसाठी लिहून ठेवणं ही लेखनामागची एक प्रेरणा असते. (नंदा खरे याला 'ग्रॅंड नॅरेटिव्ह'ची प्रेरणा म्हणतात).

कारण ४: राजकीय प्रेरणा (Political purpose) – इथे राजकीय हा शब्द अत्यंत व्यापक अर्थानं आलेला आहे. आपलं जग बदलण्याची आस, जग कसं असावं याविषयीचे इतर लोकांचे विचार बदलण्याची आस अशा प्रेरणा यात अंतर्भूत आहेत. शिवाय, 'कला ही राजकारणविरहित असावी' असा विचारसुद्धा राजकीय आहे असं ऑरवेल म्हणतो. (नंदा खरे याला ‘राजकीय’पेक्षा ‘दार्शनिक’ प्रेरणा असं संबोधणं अधिक योग्य वाटतं, असं म्हणतात.)

ही चार कारणं सांगून मग स्पेनच्या यादवी युद्धाचा आपल्यावर झालेला परिणाम तो सांगतो आणि आपलं त्यानंतरचं लिखाण हे प्रामुख्यानं निरंकुश सत्तेच्या विरोधात आणि लोकशाहीवादी समाजवादाचा पुरस्कार करणारं होतं असं ऑरवेल कबूल करतो. आपल्या कलात्म आणि बौद्धिक जाणिवांशी प्रतारणा न करता ‘राजकीय’ प्रेरणेतून लिखाण करता यावं यासाठी आपल्या बांधीलकीविषयी अधिकाधिक जागरूक असण्याचा प्रयत्न लेखकानं करावा असंही तो म्हणतो. ‘मला कलानिर्मिती करायची आहे’ या प्रेरणेतून लिहिण्यापेक्षा कोणत्यातरी असत्याचा पर्दाफाश करायचा आहे किंवा एखाद्या तथ्याकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे यासाठी मी लिखाण करतो; आणि तरीही त्यात कोणताही कलात्मक अनुभव नसता तर मला अगदी एखाद्या नियतकालिकासाठी एखादा साधा लेखसुद्धा लिहिता आला नसता, असंही तो म्हणतो. लिखाणाच्या शैलीपासून ते आपण ज्यावर राहतो ती धरणी अशा अनेकविध, किंवा अगदी निरुपयोगी वाटणाऱ्या अशा अनेक क्षुल्लक गोष्टींमध्येसुद्धा मला जो आनंद मिळतो तो मी मरेपर्यंत टिकून राहील आणि अगदी प्रचारकी वाटणाऱ्या माझ्या लिखाणातूनही तो दिसत राहील. माझ्या व्यक्तिमत्वाच्या या बाजूकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा ती बाजू आणि माझे लेखनविषय यांची सांगड कशी घालता येईल या दृष्टीनं मी प्रयत्न करत राहतो असं ऑरवेल सांगतो. (मला हे महत्त्वाचं वाटतं.)

आपल्या लिखाणाच्या सामाजिक-राजकीय प्रेरणेविषयी बोलून झाल्यावर तो हेदेखील सांगतो की तरीही मी अहंभावापासून मुक्त नाही, कारण मुळात लिखाण हाच एक अतिशय कष्टप्रद लढा आहे. ते एखाद्या दीर्घ आणि त्रासदायक आजारासारखं आहे. लहान मुलाला रडून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायची जशी गरज वाटते तसंच काहीसं लेखकाला वाटत असतं. म्हणूनच एखाद्या अनाकलनीय भुतानं पछाडल्यासारखं लिखाण केलं जातं; आणि तरीही ते वाचनीय व्हावं यासाठी लेखकाला आपलं व्यक्तिमत्व त्यातून पुसून टाकावं लागतं. चांगलं गद्य हे खिडकीच्या तावदानासारखं असायला हवं. माझ्यातल्या कोणत्या लेखनप्रेरणा अधिक तीव्र आहेत हे मी सांगू शकत नाही, पण कोणत्या अनुकरणीय आहेत हे सांगू शकतो, असं ऑरवेल म्हणतो. (किंबहुना तेच या निबंधाचं सार आहे असं म्हणता येईल.)

संपूर्ण निबंध इथे वाचता येईल.

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

वर काढत आहे. 'पेनात विश्व सामावता येतं, म्हणून लिहा' अशा अर्थाचे जपानी वाक्य आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं ऑरवेल 'प्रेरणा' म्हणतात ती प्रेरणा नसून चॉइस आहे. या वातावरणानुसार ठरतात.

'पेनात विश्व सामावता येतं, म्हणून लिहा' अशा अर्थाचे जपानी वाक्य आठवले. यात खोडसाळपणा काय आहे रे भाऊ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आपला पहीला प्रतिसाद आवडला. मलादेखील त्यात काही खोडसाळ्पणा दिसला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटी मी कोणीतरी आहे, आणि मला हे जग माझ्या पद्धतीने बदलायचं आहे ही ऊर्मी सर्वांच्याच मनात असते. आगरकर, फुल्यांसारखे समाजसुधारक, भगतसिंगासारखे क्रांतीकारक आपल्या पद्धतीने जग बदलण्याचा परयत्न करतात. ऑरवेलसारखे लेखक आपल्या परीने.

आपल्या कलात्म आणि बौद्धिक जाणिवांशी प्रतारणा न करता ‘राजकीय’ प्रेरणेतून लिखाण करता यावं यासाठी आपल्या बांधीलकीविषयी अधिकाधिक जागरूक असण्याचा प्रयत्न लेखकानं करावा असंही तो म्हणतो.

हे थोडं आपल्या आवडीनिवडी इतरांवर लादण्यासारखं वाटलं. प्रत्येकाने आपापल्या आवडीचं लिखाण
मुळात लिखाण हाच एक अतिशय कष्टप्रद लढा आहे. ते एखाद्या दीर्घ आणि त्रासदायक आजारासारखं आहे. ...म्हणूनच एखाद्या अनाकलनीय भुतानं पछाडल्यासारखं लिखाण केलं जातं; आणि तरीही ते वाचनीय व्हावं यासाठी लेखकाला आपलं व्यक्तिमत्व त्यातून पुसून टाकावं लागतं.

या भावनेने करावं हे पटू शकतं.

लहान मुलाला रडून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायची जशी गरज वाटते तसंच काहीसं लेखकाला वाटत असतं.

हा हा... लहान मुलाच्या रडण्याच्या पलिकडे न गेलेलं लेखनही दुर्दैवाने दिसतं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचार करायला लावणारा.

वयाची तिशी गाठल्यानंतर मानवजातीतले बहुसंख्य लोक आपल्याला काही व्यक्तिमत्व आहे हेच हळूहळू विसरून जातात आणि इतरांसाठी (कुटुंब, मुलंबाळं, समाज वगैरे) जगू लागतात किंवा जगण्याच्या कंटाळवाण्या ओझ्याखाली पिचून जातात.

वाक्याचा पूर्वार्ध जरी चालवून घेतला तरी उत्तरार्ध पटत नाही. 'जगण्याच्या कंटाळवाण्या ओझ्याखाली पिचून जातात' नंदन, चिंज, गणपा ही मंडळी ठकळ उदाहरणे आहेत, जे आपापले रोजचे व्याप सांभाळूनही साहीत्य, कला यांचा अमर्याद आनंद उपभोगणे व इतर लोकांबरोबर तो वाटायचे कार्य अविरत करत आहेत. कुठे पिचल्याचे वाटत नाहीत. आता या सगळ्यांच्यातला लेखक बाहेर यायलाच हवा Smile आम्ही बाकी सामान्य मंडळी देखील ज्या काय चौसष्ठ कला, विद्या व अनंत पालथे धंदे आहेत त्यात लुफ्त लुटत असतोच की. ओरवेल इतका 'मेलो'ड्रामॅटीक का होतोय? Smile बरेच लोक उपजीविका सांभाळत आपापल्या परीने जीविका समृद्ध करत आहेतच की.

मग हा लेखक बाहेर येण्यासाठी - धनंजय, घासकडवी यांनी त्यांची स्वतंत्र ओरीजीनल प्रतिभा बरेचदा कवितांच्या माध्यमातुन व्यक्त केली आहे. धनंजय यांच्या काही लेख (स्वतंत्र निबंध) देखील त्याच्यातील प्रगल्भ वैचारिक लेखक आपण सर्वांनी पाहीला आहे. चिंज व घासु यांनी काही दिवस अन्य साहीत्यावर समिक्षात्मक लेख लिहण्यापेक्षा त्यांना आवडेल ते लिहलेले स्वतंत्र लेखन वाचायला आवडेल. दोघांचे रसग्रहणात्मक लेखन आवडते त्यात वादच नाही, चिंजं यांचे लेख तर मेजवानीच असते. कुठली गोष्ट समजली नाही की ह्या दोन गुर्जींची आठवण बरेच लोक काढतात. पण तरी दोघांनी पुढचे काही दिवस केवळ 'ओरिगिनल' काहीतरी लिहावे त्यांना हवा तो विषय घेउन प्रचारकी वाटेल त्याची पर्वा न करता मुळ लेखातील चारही कारणांचा वापर करुन लिहावे. विशेषता त्यांच्या व्यक्तिमत्वावर/ जडणघडणीवर मोठा प्रभाव पडलेल्या घटना, त्यांना अतिशय महत्वाचे वाटणारे (सनातन, नवे) प्रश्न यावर भाष्य करणारे लेखन वाचायला आवडेल.

आणि हो, ऑरवेलवरुन आठवले धनंजय, चिंजं किंवा अन्य जाणकार कोणाला स्लाव्होस झिझेक या फिलोसॉफर बद्दल माहीती असल्यास जरुर सांगावी विशेषता सिव्हील सोसायटी, माओवाद्-लोकशाही-खा-उ-जा (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणांवर भाष्य करणारे काहीसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकिवर ओ'निल यांचे झिझेक यांच्याविषयीचे खालचे वाक्य पटले.
"a dizzying array of wildly entertaining and often quite maddening rhetorical strategies are deployed in order to beguile, browbeat, dumbfound, dazzle, confuse, mislead, overwhelm, and generally subdue the reader into acceptance."

जाणाकार महिती देतिलच. मधल्या काळात इतरांच्या सोयेसाठी खालचा विडो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या कलात्म आणि बौद्धिक जाणिवांशी प्रतारणा न करता ‘राजकीय’ प्रेरणेतून लिखाण करता यावं यासाठी आपल्या बांधीलकीविषयी अधिकाधिक जागरूक असण्याचा प्रयत्न लेखकानं करावा असंही तो म्हणतो.

>>हे थोडं आपल्या आवडीनिवडी इतरांवर लादण्यासारखं वाटलं.

मला वाटतं की त्यात असं काहीसं अभिप्रेत आहे - आपल्या राजकीय प्रेरणांचा प्रसार/प्रचार करायचा असेल तरीही त्यासाठी आपल्या कलात्म आणि बौद्धिक जाणिवांशी प्रतारणा करू नये (अन्यथा ते लिखाण कमअस्सल होईल). लिखाणामागचा आपला राजकीय हेतू आणि कलात्म/बौद्धिक जाणिवा यांची चांगल्या प्रकारे सांगड घालता येण्यासाठी आपण आपल्या बांधीलकीविषयी अधिक विचार करावा असं तो म्हणत असावा असं वाटतं. उदाहरणार्थ '१९८४' ही कादंबरी या लेखानंतर प्रकाशित झाली (१९४९). मला वाटतं की या कादंबरीत ही सांगड ऑरवेलला चांगल्या तर्‍हेनं जमली आहे. म्हणजे एकाधिकारशाहीच्या विरोधात असूनही कादंबरी निव्वळ प्रचारकी न राहता कलात्म होते असं वाटतं.

>>चिंज व घासु यांनी काही दिवस अन्य साहीत्यावर समिक्षात्मक लेख लिहण्यापेक्षा त्यांना आवडेल ते लिहलेले स्वतंत्र लेखन वाचायला आवडेल. [...] दोघांनी पुढचे काही दिवस केवळ 'ओरिगिनल' काहीतरी लिहावे त्यांना हवा तो विषय घेउन

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मात्र मी परपुष्ट आहे आणि 'ओरिजिनल' लिहिण्याची प्रतिभा माझ्यात नाही हे मी उघड कबूल करतो. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून तरी परपुष्ट लिखाण वाचण्याखेरीज अन्य पर्याय नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>>>आपल्या कलात्म आणि बौद्धिक जाणिवांशी प्रतारणा न करता ‘राजकीय’ प्रेरणेतून लिखाण करता यावं यासाठी आपल्या बांधीलकीविषयी अधिकाधिक जागरूक असण्याचा प्रयत्न लेखकानं करावा असंही तो म्हणतो.
>>हे थोडं आपल्या आवडीनिवडी इतरांवर लादण्यासारखं वाटलं. मला वाटतं की त्यात असं काहीसं अभिप्रेत आहे - आपल्या राजकीय प्रेरणांचा प्रसार/प्रचार करायचा असेल तरीही त्यासाठी आपल्या कलात्म आणि बौद्धिक जाणिवांशी प्रतारणा करू नये (अन्यथा ते लिखाण कमअस्सल होईल). लिखाणामागचा आपला राजकीय हेतू आणि कलात्म/बौद्धिक जाणिवा यांची चांगल्या प्रकारे सांगड घालता येण्यासाठी आपण आपल्या बांधीलकीविषयी अधिक विचार करावा असं तो म्हणत असावा असं वाटतं. उदाहरणार्थ '१९८४' ही कादंबरी या लेखानंतर प्रकाशित झाली (१९४९). मला वाटतं की या कादंबरीत ही सांगड ऑरवेलला चांगल्या तर्‍हेनं जमली आहे. म्हणजे एकाधिकारशाहीच्या विरोधात असूनही कादंबरी निव्वळ प्रचारकी न राहता कलात्म होते असं वाटतं.

अगदी बरोबर. पटले.

ऑरवेलने स्वत: किती वेगळे लेखनप्रकार केले - रोड टू विगन पियर सारकी वृत्तांतिका, होमेज टु कॅटलोनिया सारखे स्मृतीवजा इतिहास, अ‍ॅनिमल फार्म आणि १९८४ चे "डिस्टोपिया" आणि बर्मीज डेज, इ. उपरोल्लिखित सांगड तो निराळ्या साहित्यप्रकारात सतत शोधत होता असे वाटते. यापैकी बर्मीज डेज ही एकच कादंबरी (मी याच तीन वाचल्या आहेत - अ‍ॅस्पिडिस्ट्रा आणि क्लर्जीमन्स दॉटर नाही) जरा संदेशदेऊ वाटते. त्याची सर्वात पहिलीच कादंबरी होती म्हणून असेल कदाचित. १९८४ पर्यंत त्याला हवी ती नेमकी शब्दकळा सापडली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>(मी याच तीन वाचल्या आहेत - अ‍ॅस्पिडिस्ट्रा आणि क्लर्जीमन्स दॉटर नाही)

हे धाग्यात अवांतर होतंय, पण अ‍ॅस्पिडिस्ट्रा जरूर वाचा अशी शिफारस करेन. शांता गोखल्यांच्या 'त्या वर्षी'प्रमाणे इथेही सामाजिक-राजकीय आशय आहे आणि त्याचा सर्जनशीलतेशीही संबंध आहे. त्यातलं लंडनच्या साहित्यविश्वाचं वर्णन मनोज्ञ आहे. प्रमुख पात्राच्या कलंदर स्ट्रगलर कलाकार वृत्ती आणि त्यातून ओढवून घेतलेल्या हलाखीच्या स्थितीविषयी अजिबात रोमँटिक हळवेपणा नाही. आणि तरीही यातून जी मध्यमवर्गीय 'मध्य लटपटीतली' ओढाताण होते ती गलबलून टाकते. आजही वेगळं काही करू पाहाणार्‍या पण म्हणजे नक्की काय, आणि ते का किंवा कसं असे प्रश्न पडलेल्या अनेक मराठी तरुण-तरुणींनी वाचावी अशी ही कादंबरी आहे. सरळसोट कथानक असूनही चांगलं व्यक्तिचित्रण आणि प्रसंगांची घडण करून कादंबरी प्रगल्भ कशी करता येते यासाठी अनेक मराठी कादंबरीकारांनी तिचा अभ्यास करावा असंही मला वाटतं.

१ - Keep the Aspidistra Flying (१९३६)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वैचारिक कंपूबाजी या कारण नं ४ मधून आली असावी काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ऑरवेल यांचा लेख वाचनीय आहे. धन्यवाद. लेखनामागे अहंभाव असतोच असतो हा प्रांजळपणा कौतुकास्पद आहे. आजकाल जालावर अनेक लोक लिहू लागले आहेत. ब्लॉग वगैरेंच्या माध्यमातून अनेक पत्रकार, कलाकार यांना वाचकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे. या संवादप्रक्रियेतील सुलभतेमुळे लिहिण्यामागच्या प्रेरणा बदलत आहेत का हा एक रोचक प्रश्न आहे.

या विषयावरील आणखी लेखन: व्हाय डोरायटर्स राइट?, व्हाय वुइ राइट?

'मी का लिहितो' अशी मालिका ऐसिअक्षरेवर राबवली जावी का? असा विचारही मनात आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख , त्याचा सारांश , त्या सारांशाची मराठी शैली हे सारं आवडलं.

लेखात "उपजीविकेकरता लिखाण" या मुद्द्याला डावललेलं दिसतं. अनेक नामवंतांनी आपल्या लिखाणाच्या बाबतीत ही प्रेरणा होती हे म्हण्टलेलं आहे. तेंडुलकर यांच्या सारख्या उदाहरणांवरून तर डेडलाईनवर करून दिलेलं लिखाणसुद्धा प्रसंगी उल्लेखनीय, चिरस्मरणीय झाल्याचं दिसतं. कर्जबाजारी आणि जुगारी प्रेरणा असलेल्या दस्त्येव्हस्कीचं , देणेदारांची नड भागवण्याकरता लिहिलेल्या कादंबर्‍यांचं उदाहरणही सर्वश्रुत आहेच.

असो. लेखनाची प्रेरणा हा विषय गहन खरा. मागे दिलेला "क्लासिक्स म्हणजे नेमकं काय" हा इटालो कॅल्विनोचा लेख आणि प्रस्तुत लेख यातून लेखनप्रकाराचं काहीसं सम्यक् आकलन व्हायला मदत होते असं म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"मी का लिहितो" या मधेच बहुदा या लेखाचं सार आहे. हा लेख केवळ "मी" का लिहितो इतपतच आहे. "लेखन करण्याची कारणे" वगैरे प्रकारचा हा लेख नाही.
लेखकागणिकच नव्हे तर त्याच्या लेखनागणिक लेखनाची कारणे वेगळी असणार. जॉर्जसाहेबांची काहि कारणे बहुतांश लेखकांना लागु असतील तरी यादी सिमीत नाही हे नक्कीच

मला जॉर्जसाहेबांचा लेख ठिक वाटला. 'प्रांजळ' आत्मपरिक्षणात्मक लेखन अपेक्षित होते तसे न वाटता, वाचकाला "मी का लेखन करतो" याचे कोणते उत्तर आवडेल ते अक्शाप्रकारे लिहिलेले आवडेल अवगैरे विचार करून लिहिलेला लेख वाटला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऑरवेलच्या लेखाचा सारांश आवडला. लेख संपूर्ण वाचावा लागणार. क्रेमर यांचेही दुवे वाचावे लागणार.. क्रेमर यांच्या सुचवणीत थोडासा बदल करून, 'मी का लिहतो/लिहावे' अशी मालिका राबवावी... करण्यासाठी पन्नास गोष्टी समोर उभ्या असताना 'का लिहावे' या मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले तर हवे आहे. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>लेखात "उपजीविकेकरता लिखाण" या मुद्द्याला डावललेलं दिसतं.

अनेकांसाठी हे कारण असणार हे उघड आहे, पण त्याविषयी काही टिप्पणी करावी इतकं ते विशेष नाही असं ऑरवेलला वाटत असावं. माझ्या लेखातलं हे वाक्य त्याचं निर्देशक म्हणता येईल -

उदरनिर्वाह हे कारण वगळता लिखाणामागे इतर कोणती कारणं असतात ते ऑरवेल मग सांगतो.

लिहिण्यामागच्या इतर प्रेरणांविषयी...

>>करण्यासाठी पन्नास गोष्टी समोर उभ्या असताना 'का लिहावे' या मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले तर हवे आहे.

>>लेखकागणिकच नव्हे तर त्याच्या लेखनागणिक लेखनाची कारणे वेगळी असणार. जॉर्जसाहेबांची काहि कारणे बहुतांश लेखकांना लागु असतील तरी यादी सिमीत नाही हे नक्कीच

ऑरवेलला जाणवलेल्या प्रेरणांहून वेगळ्या प्रेरणा असणं शक्य आहे. लिहिण्यामागच्या यापेक्षा वेगळ्या प्रेरणा (असल्या तर) जाणून घ्यायला आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिभाशाली व्यक्ती अमुक एक (कायमच)उद्देश ठेऊन चांगले लेखन करत असतील असे वाटत नाही, सर्वसामान्यपणे कठीण वाटणारा एखादा तिढा (गणित, प्रश्न, गुंता) सोडवणारा तो सोडवायचा ह्या उद्देशाने सोडवू देखील शकेल पण असामान्य म्हणून नंतर गणल्या जाणाऱ्या गोष्टी घडतात तेंव्हा उत्स्फूर्त आणि विना-उद्देश असतात असे वाटते (अर्थात नेहमीच तसे असेल असे नाही).

पण कोणतीही विलक्षण निर्मिती हि उत्स्फुर्ततेतून घडते असे वाटते, जाणीवपूर्वक विलक्षण(असाधारण)निर्मिती असाध्य वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी का लिहितो/ते? हा प्रश्न प्रत्येक लेखकाला पडण्यासारखा आहे. माझ्यामते, डोक्यात विचार मावेनासे होतात तेव्हा मी ते उतरवून काढते. मूळ निबंधाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. अवश्य वाचेन आणि वाचायला देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ लेख आणि सारांश, दोन्ही आवडले.

क्रेमर यांनी दिलेले दुवे वर्चेवर चाळले. काही लेख गमतीदार आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी का लिहितो हा प्रश्न दुसर्‍या कोणी अजून(तरी) मला विचारलेला नाही म्हणून मी लिहितो. (ह.घ्या)
बाकी मूळ निबंध आणि लेख आवडला. पण या चार प्रेरणांबरोबरच व्यक्त होण्याची गरज आणि वर प्रियाली यांनी म्हटल्याप्रमाणे डोक्यात खूप विचार झाले किंवा चमकदार कल्पना सुचली की लिहावसं वाटतं हे खरं. शिवाय ते कोणी वाचलंच आणि आवडलंच तर काहीतरी दुसर्‍यावर परिणामकारक निर्माण केल्याचं समाधान मिळतं मग भलेही तो विद्वान समीक्षक नसून माझ्यासारखाच सामान्य वाचक का असेना. कदाचित हे अहंभावाखाली येत असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.hindisamay.com/content/1090/1/लेखक-सआदत-हसन-मंटो-की-आत्मकथा-मैं-क्यों-लिखता-हूँ.cspx

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे आणि इतर काही लेखन (ओरवेलचं) मी कधीतरी '७२-'७३ मध्ये वाचलेलं. ब्रि कॉ लायब्रीच्या सभासदत्वामुळे.
१) मी काही लेखक नाही असं वाटून उगाच लेखन न करण्याचा चंग बांधणे चुकीचं आहे. प्रत्येकाने काही नं काही लिहिलं पाहिजे. पुढे तीस चाळीस वर्षांनी इतरांना नाही तरी पुढच्या पिढ्यांसाठी तो ऐवज असतो.
२)कधी मूळ उद्देश बाजूला राहून काही वेगळ्याच कारणासाठी लेखनाला महत्व येते. राजवाडे यांनी कुणी लिहिलेल्या जमाखर्चांच्या वह्यांतल्या नोंदींतून मराठ्यांचा इतिहास लिहिला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0