बाब्या

सर्वप्रथम काही सूचना. तुम्ही जर पुरुष असाल आणि हा लेख वाचत असाल, तर पुरुषी अहंकार दुखावला जाईल. तुम्ही जर वंशोचो दिवो 'लाभलेली' मम्मी असाल, तर मग राहूच द्या.. म्हणून आधीच सांगते - वाचावे परि डोळे उघडून स्वीकारावे अथवा ‘Read at your own risk.’ कारण माझे हे मत पूर्णपणं वैयक्तिक आहे.
हो, तर काय म्हणत होते मी - बाब्या, अगं बाब्याची आई, तू वाचतेयस ना? चक्क ३२ वर्षांचा घोडा झालायं, शरीरयष्टी धड धाकट. नंतर भरवत बस की त्याला. तो कुठं पळून जातोय? त्याची जागा नेहमी तुझ्या पदरापाठी. हो, तू शोध सून त्याच्यासाठी. पण त्याच्यासाठी सून शोधताना तो आयुष्यभर तुझा पदर धरून असेल, अशी तर अपेक्षा बाळगत नाहीस ना? म्हणे, ‘मुलं खंबीर असतात’, मग का नाही राहू शकत ते त्यांच्या आईवडिलांशिवाय? मुलीदेखील तुमच्या बाब्याप्रमाणं आईवडिलांच्या मायेनं मोठ्या होतात. मग ह्या नियमापाठी काय तर्क आहे? उपहासात्मक प्रश्न नव्हे हा. खरंच उत्सुकता आहे ह्या प्रश्नाविषयी. हा. हेदेखील मान्य करतेय की काही मुलं आणि त्यांच्या कुटुंबाविषयी आदर निर्माण होईल असेदेखील अनुभव आहेत.
आता एक अनुभव बघा - मुलगा लग्नासाठी उभा. म्हणजे, मुलगी शोधतोय. पण आई जिथं बोट देखवेल तिथं हा ढेरपोट्या वळला. आई बोली उठ, त्याच्या शरीराचं ओझं सांभाळत तो उठला; आईनं डोळे वटारले, ह्याचं तोंडावर बोट, दुसऱ्या हाताची घडी घातली जातेय. पण आईला मात्र त्याचं खूप अप्रूप वाटतं, ती तसं म्हणूनही दाखवते. त्याच्या आईला कोण समजावणार की त्यानं मुलीला आपल्या खाजगी जीवनाविषयी सगळ्या लाजिरवाण्या गोष्टी आधीच ओकून टाकल्यात. हसूच येतं, कसं दाबू ह्या विचारात असताना, आई मुलाच्या कोड कौतुकात इतकी गुंतली जातेय की आपण जास्त फेकंफेक तर करत नाही ना, ह्याचं भानदेखील राहत नाही तिला. असो.
खंत एकाच गोष्टीची जाणवतेय सारखी. आजपर्यंत एका चुकीची समजूत बाळगून आपण आपल्याला फसवत राहिलोत. मुलं-मुली सम-समान ह्या कल्पनेविषयी. हो. ही कल्पनाच राहिलीये. मुलाची माणसं जेव्हा स्थळं पाहतात तेव्हा त्यांना मुलीच्या अपेक्षेविषयी काही घेवदेव नसते. त्यांना त्याच्यासाठी जोडीदार नव्हे तर घरासाठी 'लक्ष्मी' हवी असते. मुलीचं काय म्हणणंय, तिच्या काय अपेक्षा असतील ह्याविषयी त्यांनी विचारही केला नसतो. घरात येणारी 'लक्ष्मी' त्यांच्या बाब्याला कसं खायला घालेल, त्याच्या संरक्षणासाठी किती उपासतापास करेल, त्याच्या पैशाची अडचण कशी दूर करेल, ह्या आशेनंच येतात. त्यांना त्यांच्या 'बाब्या'विषयी 'अप्रूप' वाटतं. मग का नाही विश्वास त्यांना त्याच्या कुवतीवर? इतर देशातील आईवडिलांप्रमाणे का नाही ते त्यांना त्यांच्या जिवावर सोडत? आयुष्याचे अनुभव स्वतःलाच घेऊ का नाही देत ते? गृहिणी हा शब्द मराठी संस्कृतीत खूप वर्षांपासून रूढ झालायं, नवऱ्यासाठी अजूनही 'कर्तापुरुष' हाच शब्द रुजलाय.

field_vote: 
0
No votes yet