शेजारच्या काकूंनी फेसबुक ग्रूप्स सोडायचं ठरवलं.

मँचेस्टरटनव्हिल, १९ सप्टेंबर.

अनेक अडचणी आणि कठीण परिस्थितीतून वर आलेल्या शेजारच्या काकूंनी आत्यंतिक सुख, समाधान आणि शांतीच्या शिखरावर पोहोचल्यावर फेसबुक ग्रूप्स सोडायचं ठरवलं आहे.

काकूंना आयुष्यात खूपच अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचा जन्म मुंबईत, लांबच्या उपनगरांमध्ये झाला. चांगल्या घरच्या असूनही त्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं लागलं. फॅशनचं पद्धतशीर शिक्षण घेऊनही त्यांना परिस्थितीपोटी आयटीत काम करावं लागलं. त्यात त्यांचा नवराही जातीतला नाही. त्यांच्याकडच्या रूढी-परंपरा खूप निराळ्या असतात आणि परदेशात काकूंना एकटीलाच त्या सगळ्या शिकाव्या लागल्या. काकूंनी त्याला पुस्ती जोडली, "तुम्हांला तर माहीतच असेल, कुळाचार पाळायचे तर पुरुषांचा मेला काही उपयोग नसतो. मी नाही कुळाचार पाळले तर कोण पाळणार! आणि तुम्हाला म्हणून सांगते, ऑफिसातही मला लोकांची खूप भांडणं सोडवावी लागतात. कुणी धड काम करत नाहीत माझ्यासमोर."

या सगळ्यावर मनःशांती मिळावी म्हणून काकूंनी मोठ्या धैर्यानं फेसबुकवर तीन ग्रूप्स सुरू केले. तिथेही लोकांनी त्यांना खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला. ग्रूप प्रायव्हेट केला तर कुणी तक्रार करायचे की ग्रूप पब्लिक करा. म्हणून ग्रूप पब्लिक करू का, असं विचारल्यावर लोक त्याविरोधातही तक्रार करायचे. झाडांचा ग्रूप सुरू केला तर तिथे लोक टिचभर झाड एवढं महाग का, म्हणत काकूंना सार्वजनिक लाज आणायचा प्रयत्न करायचे. कधी महिनाभर एकदम सरकारविरोधी लिंका देऊन चर्चा करायचे, की त्यामुळे काकूंना खूप धास्ती वाटावी. काकू आता अमेरिकेत राहत असल्या तरी त्यांचे नातेवाईक भारतातच आहेत, काकू मनानं भारतीयच आहेत. सरकारशी पंगे घेणाऱ्या लोकांनी दुसरीकडे जाऊन काय ते करावं आणि काकूंनी कष्टानं सुरू केलेले, वाढवलेले ग्रूप नासू नये असं काकूंना मनापासून वाटत होतं.

काकूंच्या घरीही काही बरी परिस्थिती नव्हती. एवढ्या सोन्यासारख्या घरात काकूंना दोन गोजिरवाणी मुलं असूनही काही मदत नव्हती. नवरा कायमच त्याच्या कामात असायचा. आणि तो कायमच मुलांची बाजू घ्यायचा. काकू डोळे टिपत म्हणाल्या, "मला वाटायचं, आमचं कसं आंतरभारतीय, पुरोगामी कुटुंब आहे. आम्ही दोघे दोन भाषा बोलतो. माझी मुलंसुद्धा शाळेत इंग्लिशबरोबर फ्रेंच आणि स्पॅनिश शिकली. मोठा मुलगा खूप हुशार आहे, तो आता शिकून आयटीत जाणार आहे. आणि धाकटी मुलगी. ती मुलगी असूनही खूप त्रास देते. ती आता कॉलेजला गेली. गेल्या वर्षी मुलंही घरी आली, करोनामुळे. आता करोना असूनही मुलांनी घरी यायचं नाही असं ठरवलं."

काकूंनी फेसबुक सोडलं

तेव्हा मात्र काकू हडबडून जाग्या झाल्या त्यांनी आता फक्त स्वतःकडेच लक्ष द्यायचं ठरवलं आहे. मुलं शाळेत असताना काकूंचं वजन खूप वाढलं होतं. ते कमी करण्यासाठी काकू योगा स्टुडिओला जातात. तिथे आठवड्याचे दोन दिवस खूप हॉट योगा करतात; तिथे खूप गरम असतं, म्हणून खूप घाम येतो. काकूंच्या मैत्रिणींनी हमी दिली आहे की आता काकू व्यवस्थित बारीक होतील पुन्हा!

आणि आता योगा स्टुडिओत सांगतात त्यानुसार काकूंनी सगळ्या टॉक्सिक गोष्टी सोडायचं ठरवलं आहे. फेसबुक ग्रूप्सही त्यातलेच! "मीच तिथे ॲडमिन होते, पण मराठी लोक खूप टॉक्सिक असतात. सगळे माझ्यावर जळायचे. पण आता मला त्यांचा काही त्रास होत नाही. आता मी फक्त एक सिक्रेट ग्रूप ठेवला आहे. तिथे आम्ही सगळ्या योगाक्लासच्या बायका आहोत. आम्ही कुणी, कुणाची उणीदुणी काढत नाहीत. तिथल्या बायका मराठी नाहीत. आमच्यांत काही गोऱ्या बायकासुद्धा आहेत", असं काकूंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

#शेजारचे_काका_काकू

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

ही मालिका फार आवडु लागलेली आहे. कारण तिचा फ्लेव्हर लक्षात येउ लागला आहे. ॲक्वायर्ड टेस्ट आहे.
सोमी वरची विसंगती छान टिपते आहेस. आपले प्रिव्हिलेजेस उपभोगताना सुद्धा अटेन्शन सीकिंग करत व्हिक्टिम कार्ड प्ले करायचे, रडायचे.

या सर्व लेखांना एक हॅश टॅग दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तिथे पोहोचलेले सभासद कमी असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खि खि खि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

why not Wink