शेजारच्या काकूंनी पहिल्यांदा व्यक्तिगत प्रश्नांसाठी गूगल वापरलं.

एडिसन, अमेरिका, ८ सप्टेंबर.

शेजारच्या काकू लहानपणापासून शास्त्रीय संगीत शिकत होत्या. पण शिक्षण, नोकरी, लग्न, मग लहान मुलं यांत काकूंचं गायनाचं शिक्षण मागे पडत होतं. करोनाकाळात काकूंना घरबसल्या शास्त्रीय संगीत शिकण्याची संधी पुन्हा मिळाली. त्या भारतातल्या गुरूंकडून संगीत शिकायला लागल्या.

काकूंचा क्लास संध्याकाळी होता, आणि त्याआधी होमवर्क करून तो काकूंना व्हॉट्सॅप करायचा होता. मात्र त्यांचा होमवर्क व्हॉट्सॅप होईना तेव्हा काकूंचं धाबं दणाणलं. काकूंनी आजपर्यंत एकदाही, अगदी नववीत आणि अकरावीतही होमवर्क बुडवला नव्हता. एकदा तर शाळेत असताना, बाई गणित शिकवत असताना काकू शेजारच्या मुलीशी गप्पा मारायला लागल्या, याचा पश्चात्ताप होऊन काकूंनी आपण होऊन गणिताचा होमवर्क दोनदा केला होता. आज टेक्नॉलॉजीमुळे आपल्यावर होमवर्क न केल्याचं बालंट येईल, आपला रेकॉर्ड कलंकित होईल म्हणून काकूंचा जीव अर्धाअर्धा झाला.

व्हॉट्सॅप सहा तास बंद

काकूंनी आधी आपल्या मैत्रिणीला फोन करायचा प्रयत्न केला, पण तिनं फोन उचलला नाही. मग काकूंनी शेजारच्या घरातल्या लोकांना विचारण्यासाठी त्यांची बेल वाजवली, पण कुणीच दार उघडलं नाही. मग काकूंनी आपल्या भारतातल्या नातेवाईकांना विचारण्यासाठी मेसेज पाठवला, पण व्हॉट्सॅप बंद असल्यामुळे तोही पोहोचला नाही. मग काकूंच्या जिवाची एवढी उलघाल व्हायला लागली की काकूंनी घरात इलेक्ट्रॉनिक तंबोरा आपल्या सराऊंड साऊंडवर लावून दिला.

तंबोऱ्याच्या स्वरांनी काकू थोड्या शांत झाल्या, आणि त्यांना कल्पना सुचली. आपलं इंटरनेट किंवा मोडेम बिघडला असेल, आणि ते रिस्टार्ट करून बघावं असं त्यांनी ठरवलं. पण ते रिस्टार्ट कसं करायचं? काकूंनी आणखी थोडा विचार केला. पण आणखी अस्वस्थ वाटलं. काकूंनी घड्याळ बघितलं. क्लासला आणखी सहा तास होते. म्हणजे आता दुपारचा पहिला प्रहर होता. काकूंनी वृंदावनी सारंग गायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची चलबिचल कमी झाली, आणि मग त्यांना सुचलं की आपण हे गूगल करून बघावं. काकूंनी आयुष्यात कधीही आपल्या व्यक्तिगत प्रश्नांसाठी गूगल वापरलं नव्हतं.

गूगलवर बघून त्यांनी मोडेम रिस्टार्ट केला. त्यात त्यांना डीएनएस हा नवा शब्द समजला, त्यांनी तोही गूगल केला. मोडेम रिस्टार्ट करूनही काकूंचा होमवर्क त्यांच्या गुरूंपर्यंत पोहोचत नव्हता. मग काकूंना आणखी ताण आला. ताण आल्यावर गाण्याचे राग, हेही काकूंनी गूगल केलं. आणि मग 'बजे सरगम हर तरफ से गुंज बनकर देस राग' आळवायला सुरुवात केली. काकूंनी आणखी गूगल केलं, आणि त्या किती वेळ गूगल करत बसल्या असत्या हे सांगता येत नाही. पण त्यांच्या गुरूंचा व्हॉट्सॅपवर मेसेज आला - आज क्लासला यायचं नाही का?

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

किती एपिसोड असणारेत?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0