ईश्वराची करणी अगाध!

p2(मागच्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्रातील विपरीत सामाजिक परिस्थितीतही स्वेच्छेने निवडलेले समाजकार्य शेवटपर्यंत एकाकी अवस्थेत नेणाऱ्या काही मूठभर व्यक्तींत 'समाजस्वास्थ्य' हे मासिक चालविणारे र. धों. कर्वे यांचे नाव सर्वात वरचे असेल. 26 वर्षे चाललेल्या या मासिकातील काही निवडक लेखांचा संग्रह पद्मगंधा प्रकाशनानी प्रसिद्ध केला आहे.

रधोंची वैचारिक बैठक, समाजसुधारणेविषयीची कळकळ, त्यांच्या तल्लख बुद्धीचा आवाका, बहुश्रुतता, हजरजबाबीपणा इत्यादी गुणवैशिष्ट्ये निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत. पुस्तकाच्या संपादकांनी ईश्वरवादाविषयी निवडलेल्या लेखातील काही भाग 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांचे वैचारिक खाद्य (कडू वा गोड) होऊ शकेल! त्यांनी त्या काळी मांडलेले विचार वेगळ्या स्वरूपात अजूनही मांडावे लागतात यावरूनच आपला समाज कितपत ' विवेकी ' झाला आहे याचा नक्कीच अंदाज येईल! )

दयाळू आणि सर्वशक्तिमान असा एकच परमेश्वर मानल्याने अनेक अडचणी उत्पन्न होतात. ईश्वराच्या अंगी सर्व उत्तम गुण असले पाहिजेत आणि त्याची शक्तीही प्रचंड असली पाहिजे, अशा दोन वेगवेगळ्या कल्पना मनात आल्या; पण त्या एकत्र करताना, त्यांचा मेळ बसत नाही हे कोणी पाहिले नाही आणि तो न बसल्यामुळेच ईश्वराची करणी अगाध झाली!

मेळ बसत नाही या गोष्टीकडे एकदा डोळेझाक केली, की मनुष्य ईश्वरासंबंधी पाहिजे ते बकण्यास मोकळा होतो आणि धार्मिक लोकांना तर मान तुकवणे भागच पडते. उदाहरणार्थ 'चित्रमय जगत' मध्ये 'ईश्वर आहे काय?' या विषयावर एका लेखकाने पुढील विधाने केलेली आहेत:

• ईश्वर आहे.
• ईश्वर व आत्मा एकच आहेत.
• ईश्वर आनंदस्वरूपी असून विश्वव्यापी आहे.
• ईश्वर स्वर्गादिक कोणत्याही विशिष्ट स्थळी राहत नाही.
• प्रत्येक भूतमात्र ईश्वराचा अवतार आहे. ह्या अर्थाखेरीज कोणत्याही अर्थाने ईश्वर अवतार घेत नाही.
• ईश्वर प्राणीमात्राच्या पाप-पुण्याचा झाडा घेत नाही. कर्मतत्वाने ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ त्यास आपोआप मिळत असते.
• ईश्वराची भक्ती करता येत नाही; परंतु त्याच्या साक्षात्काराचा आनंद अनुभविता येतो.
• मंदबुद्धीच्या लोकांनी अव्यक्त ईश्वराच्या साक्षात्काराकडे जाण्याकरता म्हणून काल्पनिक सगुण ईश्वराची उपासना केल्यास चुकीचे नाही, परंतु तो एक केवळ टप्पा आहे हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
• अपरोक्ष अनुभवाखेरीज ईश्वराचे अस्तित्व कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही.
• अपरोक्ष अनुभव येईपर्यंत तर्कशुद्ध श्रद्धेने साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.

..........(पत्रलेखक - स.वि. बर्वे, एम.ए., मुंबई)

या बकण्याचा काही अर्थ होतो, असे आम्हास वाटत नाही.

• ईश्वर व आत्मा दोन्हीही काल्पनिक आहेत; पण हे दोन्ही एकच याचा अर्थ काय?
• ईश्वर आनंदस्वरूपी आहे याचा अर्थ काय? आनंद हे जर ईश्वराचे स्वरूप असेल, तर आनंद विश्वव्यापी कसा असू शकतो? दु:खी मनुष्यदेखील आनंदीच असतो काय? ही दु:खी मनुष्याची चेष्टा आहे. भुकेलेल्याला सांगावे 'अरे, तुला भूक लागलेली नाही, तुझे पोट भरलेलेच आहे', तसे हे आहे.
• कर्मतत्त्वाने कर्माचे फळ मिळत असते, याचा अर्थ इतकाच होतो की ईश्वर कोणत्याही गोष्टीत ढवळाढवळ करीत नाही. मग ईश्वर मानायचा का?
• साक्षात्कार म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणे किंवा कोणत्याही इंद्रियाचे द्वारा अनुभव मिळणे, केवळ मनात कल्पना येणे याला साक्षात्कार म्हणता येणार नाही. मग तो अनुभव कसा मिळतो? तो मिळतो याला प्रमाण काय? की कोणीही साक्षात्कार झाला असे म्हटले की तो खरे मानावे? कोणीतरी म्हणतो हे प्रमाण पुरेसे नाही, मग तो मनुष्य कितीही विश्वासास पात्र असो; कारण तो भ्रम असण्याचा संभव असतो.
• ईश्वर निर्गुण असतो असेच या लेखकाचे म्हणणे आहे; परंतु सगुण ईश्वराची उपासना करणे चूक नाही असे ते सांगतात. ईश्वराला जर गुण नाहीत, तर ते कल्पिणे ही चूकच आहे, नाही कशी? चुकीची कल्पना टप्पा कसा काय होऊ शकतो? दक्षिणेकडे जाताना काही अंतर उत्तरेकडे जाणे हा कधीही टप्पा होणार नाही. त्याने खरी कल्पना येणे कठिणच होईल.
• पुरावा कशाला म्हणतात, याची या गृहस्थांना कल्पनाच नाही. म्हणूनच ते अपरोक्ष अनुभव येईपर्यंत साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवण्यास सांगतात. निदान ठेवण्यास हरकत नाही असे सांगतात. श्रद्धा कधीही तर्कशुद्ध असू शकत नाही. काही बाबतीत श्रद्धा ठेवणे कदाचित सोयीचे होईल, पण ते शास्त्रीय प्रमाण नव्हे. आणि हे साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्ये ओळखले कसे? ते फसवीत नाहीत किंवा त्यांना भ्रम झाला नाही कशावरून? अमेरिका खंड पाहिले नसले तरी ते आहे असा आपण विश्वास ठेवतो; कारण ते नसताना आहे असे सांगण्यात कोणाचाही फायदा नसतो आणि अमेरिकेच्या अस्तित्वाची पाहिजे तितकी प्रमाणे व्यवहार दृष्ट्या मिळतात म्हणून आपण जरूर तर तशी श्रद्धा ठेवून वागतो. पण ईश्वरावर श्रद्धा ठेवा म्हणणारे लोक श्रद्धा असल्याप्रमाणे कधीच वागत नाहीत. ते फक्त श्रद्धा ठेवा असे सांगतात आणि ईश्वर आहे या थापेवर आज कितितरी लोकांचे - भट, हरिदास, पुजारी, फसवे साधू, धार्मिक व्याख्याने देऊन झोळी फिरवणारे वगैरे लोकांचे - पोट भरते. तेव्हा त्यांचे म्हणणे खरे कसे मानावे? मनुष्य कितीही प्रामाणिक असला तरी त्याला भ्रम होणे शक्य असते आणि भ्रम याचा अर्थच हा, की तो भ्रम आहे हे त्याचे त्याला ओळखत नाही. तेव्हा हे साक्षात्कारवाले लोक प्रामाणिक असले तरीही या बाबतीत त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि वरील लेखकच म्हणतात, की याशिवाय त्याला दुसरा पुरावा नाही. एक स्वत:ला साक्षात्कार झाला पाहिजे किंवा दुसर्या वर विश्वास ठेवला पाहिजे!
• शास्त्रीय पद्धतीच्या विचारात एकट्याच्या मतावर कोणतीही गोष्ट खरी मानीत नाहीत. ती अनेकांनी प्रयोग करून खरी ठरावी लागते. साक्षात्कारवाल्या लोकांत एकमत कधीच होत नाही. प्रत्येकाचा साक्षात्कार वेगळा. तेव्हा शास्त्रीय मन:प्रवृत्तीच्या मनुष्याला त्यावर कधीही विश्वास ठेवता य़ेणार नाही. ज्याला साक्षात्कार झाला असे वाटेल, तो कदाचित ते खरे मानील आणि त्याला त्याबद्दल दोषही देता येणार नाही. वेड्याच्या इस्पितळातल्या एखाद्या मनुष्याला आपण अखिलब्रह्मांडनायक आहोत असे वाटले तर त्याला दोष देण्यात अर्थ नाही. एखादा उपासनीमहाराजही आपणाला अखिलब्रह्मांडनायक म्हणवून घेतो आणि बावळट लोक त्याचे नादीही लागतात; पण समंजस लोकांनी तसे करण्याचे कारण नाही. भ्रमिष्टांच्या बडबडीला किंवा आपमतलबी साधूच्या वटवटीला जर कोणी पुरावा समजू लागला, तर तो वेडाच्या सीमेवरच आहे. अशा लोकांना नेहमी वेड लागतेच असे नाही. कधीकधी ते जन्मभर तसेच अर्धवट राहतात, पण ती वेडाची पायरी आहे.

संदर्भः समाजस्वास्थ्य, नोव्हेंबर 1938

(साभार: 'समाजस्वास्थ्य' मधील निवडक लेख
संपादक:अनंत देशमुख
पद्मगंधा प्रकाशन
पा. क्र. 256-257)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

र. धों. कर्वे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आणि त्यांच्या समाजसुधारणांचा अतिशय आदर ठेवत ही उत्तर लिहीत आहे. रधों यांची पत्रकर्त्यांवरची टीका ही आधुनिक विचारांची वेदांतावरील (त्यातही अद्वैत वेदांतावर) प्रातिनिधिक टीका असा अर्थ घेऊन त्याला या लेखाद्वारे सुयोग्य उत्तर दिलं तर एक चांगली चर्चा होवू शकते हा या लेखामागचा माझा विचार आहे. भारतीय वेदांत परांपरेमध्ये अद्वैत, विशिष्टअद्वैत, द्वैत आणि पुढे विविध मतप्रवाह आहेत म्हणून सुरुवातीला हा खुलासा गरजेचा आहे की पत्रकर्त्याने जी भूमिका मांडलेली आहे ती अद्वैत वेदान्त मतानुसार आहे.

भारतीय विचार परंपरेत जीव-जगत-ईश्वर या तीन entities चा विचार विविध प्रकारे केला जातो. यातूनच षडदर्शने, बौद्ध, जैन व चार्वाक परंपरांचा उगम झाला व या परंपरांचा विकास अजूनही होत आहे. या विवध परंपरा केवळ तात्विक चर्चा म्हणून निर्माण झाल्या नाहीत. त्या-त्या काळी असलेल्या समाजाची परिस्थिती, त्यावेळचे आर्थिक, सामजीक व आध्यात्मिक प्रश्न आणि त्यात त्याकाळच्या पारंपरिक विचारांच्या त्या समाजाला जाणवणाऱ्या त्रुटी यातून मार्ग काढले गेले आणि या परंपरांचा उगम झाला, विकास होत राहिला. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. हिंदू समाजाचा सहिष्णुपणा यातूनच सतत वाढत राहिला आहे. ईश्वर ही संकल्पना आणि तिचे सगुण-निर्गुण असे जे फरक आहेत ते या विविध मत आणि परांपरांमध्ये अतिशय सुस्पष्ट रीतीने मांडलेले आहेत. या संकल्पनांचा व्यूह समजला नाही तर चुकीचे अर्थ निघतात. अर्थात हे उत्तर अद्वैतवेदांताच्या चौकटीत दिली आहे. इतर वेदांत मतानुसार अथवा सांख्य, योग, वैषेशिक, न्याय, मीमांसा, बौद्ध, जैन व चार्वाक मतानुसार या उत्तरामध्ये साहजिकच फरक पडेल.

आता आपण मूळ विषयाकडे वळू. प्रथम अद्वैतमतानुसार विविध शब्दांच्या तांत्रिक (टेक्निकल) व्याख्या व संकल्पना पाहू.

आत्मा – सृष्टीच्या निर्मितीच्या मुळाशी व सृष्टीमध्ये जे अद्वितीय असे चैतन्य आहे तोच आत्मा. आत्मा या शब्दाचा अजून एक अर्थ सूक्ष्म शरीर असा आहे. काही ठिकाणी आत्मा म्हणजे स्व असाही अर्थ आहे. कोणत्या संदर्भात आत्मा शब्द वापरला आहे हे समजणे आवश्यक आहे. गीतेतल्या प्रसिद्ध ‘वासांसि जीर्णानि’ श्लोकात (गीता २.२२) ‘मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे घेतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो’ अशी शिकवण आहे. इथे आत्मा या शब्दाचा संदर्भ सूक्ष्म शरीर असा आहे. त्यांच्या पुढचाच श्लोक ‘नैनं छिन्दन्ति’ (गीता २.२३) – ‘आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही’, त्यात आत्मा याचा अर्थ ब्रह्म या अर्थी आहे. आत्मा, ब्रह्म याअर्थी अद्वितीय आहे आणि सूक्ष्म शरीर याअर्थी जितके जीव तितकी सूक्ष्म शरीरे – बहु – याअर्थी आहे.

ब्रह्म – तैतरिय उपनिषद ब्रह्म शब्दाची व्याख्या ‘सत्यम् ज्ञानम् अनंतम् ब्रह्म’ अशी करते. ‘सतचिदानंद’ अशीही ब्रह्म ची दुसरी व्याख्या प्रचलित आहे. ब्रह्म शब्द आत्मा म्हणजे ‘सृष्टीच्या निर्मितीच्या मुळाशी व सृष्टीमध्ये जे अद्वितीय असे चैतन्य आहे’ या अर्थी आहे. उपनिषदांनुसार ब्रह्म सर्वत्र, निर्गुण, अविनाशी, निराकार आणि अचिंत्य असे आहे. स्थल-कालाची उत्पती यातून झाली आणि स्थल-कालाचा लय ब्रह्मामध्ये होतो व ही प्रक्रिया पुन:पुन्हा होत राहते.

ईश्वर – ब्रह्म यालाच समानार्थी शब्द परंतु कोणत्या संदर्भात ब्रह्म ईश्वर होते आणि कोणत्या संदर्भात आत्मा होते ही समजणे महत्वाचे आहे. ब्रह्म जेंव्हा नाम-रुपामध्ये व्यक्त होते त्या नाम-रूपाला जगत् (सृष्टी) म्हणतात. सर्व सजीव-निर्जीव वस्तूंनी सृष्टीची रचना होते. या सृष्टीच्या मुळाशी आणि सृष्टीच्या प्रत्येक नाम-रूपात जे ब्रह्म आहे तोच ईश्वर. नाम-रूपात्मक सृष्टीची निर्मिती करण्याची जी सृजनात्मक शक्ति तिला ‘माया’ म्हणतात. इथे माया, ईश्वर आणि ब्रह्म यांचा संबंध महत्वाचा आहे. ब्रह्म मूळ आहे. चांदोगया उपनिषदात ‘बहू स्याम् प्रजायेय इति’ – ‘बहु (many, नानात्व) व्हावे’ अशी त्या ‘तत्वाला’ (ब्रह्म) कामना झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली अशी श्रुती आहे. या कामनेला – सृजनात्मक शक्तीला – माया हे नाव दिले आहे. ईश्वराने (ब्रह्म) सृजनात्मकतेने (मायेने) सृष्टी उत्पन करताना प्रथम त्रिविध गुणांची (सत्व, रज, तम) निर्मिती केली त्यामुळे सृष्टी गुणयुक्त आहे. अशा ईश्वराला सगुण ईश्वर असे नाव आहे. ईश्वर सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी निराकार, अविनाशी, सनातन असे असणारे ब्रह्म असल्यामुळे तोच ईश्वर निर्गुणही आहे. विशिष्टअद्वैत मतानुसार ईश्वर निर्गुण असूच शकत नाही, त्यामुळे ब्रह्म ही सविशेषच असते आणि सगुण ईश्वर हा ‘हरी’ (विष्णू) होय. काही संप्रदाय शंकराला सगुण ईश्वर मानतात तर काही देवीला! उपासना पद्धती मध्ये यांचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

अब्राहमीक धर्मांमध्ये असलेला दयाळू, सर्वसत्ताधीश आणि सर्वशक्तिमान असलेल्या ईश्वर (गॉड, अल्लाह) या संकल्पनेत आणि उपनिषदांनी दर्शवलेल्या ईश्वर संकल्पनेत काही मूलभूत फरक आहेत. औपनिषदिक ईश्वर हा सृष्टी सोडून स्वर्ग नावाच्या जागी रहात नाही. किंबहुना, स्वर्ग हा सुद्धा जगताचा भाग आहे आणि ही सर्व सृष्टी ईश्वरामध्येच आहे. अब्राहमीक ईश्वराची कल्पना दयाळू आणि त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होवून भक्ताला जे हवे आहे ते प्रदान करतो आणि भक्त जर ईश्वराने सांगितलेल्या मार्गाने गेला नाही तर कोपतो आणि भक्ताला शिक्षा करतो.

सत्य आणि मिथ्या – या संकल्पना समजणे अतिशय महत्वाचे आहे.

सत्यवस्तू ची व्याख्या – सत्य म्हणजे ती वस्तु जी ३ कसोट्यांची पूर्तता करू शकते
(१) जी वस्तु भूत-वर्तमान-भविष्य काळात नेहमी अस्तित्वात असते,
(२) जिच्यात कोणताही बदल घडत नाही,
(३) तिचे अस्तित्व स्वतंत्रपणे असते, ती वस्तु इतर कोणत्याही वस्तूवर अवलंबून असत नाही.
या ३ कसोट्या लावून तार्किकदृष्ट्या विचार केला असता हे लक्षात येते की सृष्टीतील सर्व जड-तरल, सजीव-निर्जीव वस्तु या तिन्ही कसोट्या पार करू शकत नाहीत. आता याच ३ कसोट्या ‘ब्रह्म’ या संकल्पनेला लावल्या तर ब्रह्म सत्य वस्तु म्हणून सिद्ध होते.
मिथ्या – बोलीभाषेत मिथ्या चा अर्थ असत्य, व्यर्थ किंवा भ्रम निर्माण करणारे असा आहे. अद्वैतमतानुसार मिथ्या वस्तूची व्याख्या सुस्पष्ट आहे. मिथ्या वस्तु ती जी
(१) स्थल-कालाला बाध्य आहे,
(२) जिच्यात काळानुसार बदल होतो,
(३) जी इतर काही वस्तूंची बनलेली असते.

सत्य-मिथ्या समजण्यासाठी काही पारंपारिक रुपकांचा वापर केला जातो. पाणी आणि लाट या रुपकात, लाट प्रत्यक्ष दिसते, लाट विशिष्ट स्थल-कालात निर्माण होते, तिची वाढ होते आणि एका क्षणी लाटेचा अंत होतो. मुळात लाट ही पाण्यावर अवलंबून असते. पाण्याशिवाय लाटेचे अस्तित्व शक्य नाही. या रुपकाच्या चौकटीत विचार करता पाणी स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे, लाटेवर पाणी अवलंबून नाही आणि लाट निर्माण होण्याआधी, लाट असताना आणि लाट फुटल्यानंतर (नष्ट झाल्यानंतर) पाण्याचे अस्तित्व तसेच राहते, त्यात कोणताही बदल घडत नाही. पाणी-लाट रुपकात पाणी सत्य आहे आणि लाट मिथ्या आहे. तसेच दुसरे रुपक सोने आणि दागिने ही आहे. अंगठी, चेन, बांगड्या ही सोन्याचीच नाम-रुपे आहेत. अंगठी वितळवून चेन आणि चेन वितळवून बांगडी केली तरी मुळाशी सोनेच असते. या रुपकाच्या चौकटीत दागिने मिथ्या आणि सोने सत्य. मिथ्या या शब्दाच्या तांत्रिक (टेक्निकल) व्याख्येनुसार मिथ्या म्हणजे भ्रम नव्हे. मिथ्या वस्तु अस्तित्वात असते पण मिथ्या वस्तूला स्थल-कालाचे बंधन असते आणि मिथ्या वस्तु सत्यावर अवलंबून असते. सत्य वस्तूचे नाम-रूप म्हणजे मिथ्या.

मिथ्या शब्दाचा गैरअर्थ कसा प्रचलित होतो यासाठीचे उदाहरण म्हणजे एक प्रसिद्ध श्लोक ‘ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या’! हा श्लोक आद्य शंकराचार्यलिखित ‘ब्रह्मज्ञानावलीमाला’ नावाच्या श्लोकसंग्रहातील असून ‘ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः| अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः||२०||’ असा आहे. अर्थात, ‘ब्रह्म हे सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि विविध वेदवाक्यांमधून याचाच उद्घोष होत आहे’. प्रचलित मराठीत मिथ्या चा अर्थ भ्रामक, खोटा असा आहे. अद्वैत वेदांताचा परिचय नसल्यामुळे ‘जग खोटं आणि भ्रामक आहे, एखाद्या मृगजळाप्रमाणे’ असा अर्थ लावून वेदांत हे दर्शन आपल्या वस्तुस्थिती पासून किती दूर आहे, किंवा जग आणि व्यवहार नांकारणारे आहे असे वाटू लागते. पण सत्य-मिथथ्या यात जग मिथ्या आहे म्हणजे खोटे आहे असा नाही ही आता समजावे. अर्थात हे आद्य शंकराचार्यांचे अद्वैत मत आहे.

विवेक – एकदा सत्य-मिथ्या यांच्या व्याख्या समजल्या की मग विवेक या शब्दाची व्याख्या करता येते. विवेक म्हणजे – नित्यानित्यवस्तु विवेक: - नित्य आणि अनित्य वस्तूंमध्ये फरक ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. नित्य वस्तु म्हणजे जी कायमच अस्तित्वात असते म्हणजेच सत्य म्हणजेच ब्रह्म! आणि अनित्य वस्तु म्हणजे जिच्यात स्थल-काळानुसार बदल होतो आणि जी नित्यवस्तूवर अवलंबून असते म्हणजे मिथ्या वस्तु. सर्व सृष्टी मिथ्या आणि ब्रह्म हे सत्य. विवेक म्हणजे मनाची क्षमता ज्याचा वापर करून मनुष्य रोजच्या व्यवहारात पुरुषार्थ साधतो. धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही चार पुरुषार्थ ज्या मानसिक क्षमतेने साध्य होतात त्याला ‘विवेक’ म्हणतात.

श्रद्धा - लौकिक अर्थानं ‘श्रद्धा’ या शब्दाचा अर्थ आपण faith किंवा belief असा घेतो. अब्राहमीक धर्मांमधून ‘श्रद्धा’ म्हणजे faith असा अर्थ प्रचलित झाला आहे. आपण त्याच अर्थाने भारतीय दर्शनांचा विचार करतो. पण वेदांतात ‘श्रद्धा’ या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. ‘श्रद्धा’ म्हणजे
(१)वेदवाक्यप्रमाण,
(२)गुरुवाक्यप्रमाण आणि
(३)स्वतःच्या बुद्धीने वेदवाक्य आणि गुरुवाक्य पडताळून स्वत:साठी प्रमाण निर्माण करणे (श्रद्धा - pending verification).
हे प्रमाण हिंदू धर्माला अपेक्षित असणारी ‘श्रद्धा’ आंधळी नाही. उपनिषदातलं महावाक्य ‘तत् त्वम असि’, हे याचं सर्वोच्च उदाहरण आहे. स्वतःची ओळख करून देणारे हे महावाक्य स्पष्टपणे म्हणतंय, ’ते तू (आधीच) आहेस’. इथं ‘ते’ म्हणजे ‘ब्रह्म’ - सत्य! आपल्याला लगेच प्रश्न पडतो की ‘जर मी ब्रह्म आहे तर मला माझ्या आयुष्यात अपूर्णता का जाणवते? दु:ख (suffering) का भोगावे लागते?’ योग्य गुरु या वेदप्रामाण्याची उकल करून देतो पण केवळ वेदपठण आणि योग्य गुरु यातून ज्ञानाची निर्मिती होत नाही. त्यासाठी हे महावाक्य आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे आणि त्या बुद्धीतून ज्ञाननिर्मिती झाली पाहिजे. नेमकी इथं बुद्धीला विवेकाची गरज भासते. सत्य व असत्य यातील भेद बुद्धीला उमजला की विचार करू शकणारं बुद्धिवादी मन, जे वेदवाक्य आणि गुरुवाक्य शिकताना स्वतः:शी वाद-प्रतिवाद करून स्वतः:साठी प्रमाण (evidence, proof) निर्माण करेल. याप्रकारे ‘श्रद्धा’ संकल्पनेचा विचार केला तर असं लक्षात येतं की इथे श्रद्धा faith किंवा belief याअर्थी नाही. वेदांताची ही संकल्पना समजली नाही तर अब्राहमीक धर्मांमध्ये ज्याला faith किंवा belief म्हणतात तसा अर्थ घेतला जातो आणि श्रद्धेवर विज्ञान की अंधश्रद्धा असा वाद निर्माण होतो.

प्रमाण आणि प्रमाणांची गरज
भारतीय दर्शनांचा मूळ प्रश्न ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ म्हणजे मोक्ष हा आहे. हा मोक्ष मनुष्याला जिवंतपणी कसा मिळू शकतो, त्यासाठी मनुष्याने स्वत:त योग्यता कशी निर्माण करावी याबद्दलची सगळी चर्चा आहे. वेदांत या चर्चेचा अंतिम चरण आहे आणि आपण ज्याला बुद्धिवाद म्हणतो, ज्यावर आपला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोण आधारित आहे त्या बुद्धिवादावर वेदांत पूर्णपणे खरा उतरतो. वैज्ञानिक प्रयोग करून निर्माण होणाऱ्या ज्ञानाला मान्यता मिळण्यासाठी लागणाऱ्या कसोट्या म्हणजे १) जे कोणी प्रयोग करू इच्छितात त्यांना प्रयोगाचे प्रमेय, सिद्धता आणि साध्य स्पष्टपणे माहीत असणे, व २) प्रयोगाच्या सिद्धता पद्धतीनुसार कोणीही प्रयोग केला तरी त्याचा निकाल एकसारखाच येणे. यालाच आपण प्रमाण निर्माण करणे असे म्हणू शकतो. भारतीय दर्शन शास्त्रांमध्ये प्रमाणांचा अतिशय बारकाईने विचार केला आहे. किंबहुना, भारतीय दर्शने जर केवळ faith किंवा belief असतील तर, प्रमाण निर्मितीची गरजच उरत नाही. पण भारतीय दर्शनांमध्ये वेदांताचा दावा – मोक्ष right now, right here (जीवनमुक्ती) – हा आहे त्यामुळे मानवी बुद्धीत प्रमाण निर्मिती करणे हा वेदांताचा प्रमुख विषय आहे. वैज्ञानिक प्रयोगातून निर्माण होणारे प्रमाण आणि वेदांतिक प्रमाण यांत महत्त्वाचा फरक एकच – वेदांतात प्रमाणाचा विषय, प्रमाण निर्माण करणारा आणि साध्य ही तिन्ही एकच आहेत – ते म्हणजे वेदांताचा अभ्यास करून प्रमाण निर्माण करू पाहणारा मनुष्य हा स्वत:च स्वत:चा सतचिदानंद आत्मा समजून घेतो. त्यामुळे हा प्रवास वैयक्तिक म्हणूनच सुरू होतो परंतु अद्वैताची जाणीव निर्माण झाल्यावर प्रमेय, सिद्धता आणि साध्य ही एकाच आहेत ही लक्षात येते. वैयक्तिक अनुभूती असल्यामुळे बऱ्याचदा वैयक्तिक अनुभव यासदराखाली पारलौकिक (occult) अनुभव यात घुसडले जातात आणि वेदांताला अवैज्ञानिक व गूढ (mystic) प्रकार म्हणून हेटाळले जाते. अर्थात यांत नुकसान जे परंपरेपासून तुटलेले सर्व सामान्य लोक असतात, त्यांचेच होते. भारतीय दर्शने सहा प्रकारची प्रमाणे मान्य करतात – प्रत्यक्ष (पाच ज्ञानेंद्रियांनी निर्माण होणारे ज्ञान), अनुमान (Inference), उपमान (Comparison), अर्थापत्ती (Postulation), अनुपलब्धी (Non-apprehension) आणि शब्द (Verbal testimony). यातील शब्द प्रमाण सोडले तर बाकीची प्रमाणे मानवी बुद्धी नेहमी स्वतंत्रपणे निर्माण करू शकते. यातूनच चार्वाक, जैन, बौद्ध, न्याय, वैषेशिक, सांख्य, योग (पतंजली) आणि मीमांसा या दर्शनांचा विकास झाला. ही सर्व दर्शने द्वैत-मत म्हणजे ‘एकच ब्रह्म-ईश्वर विश्वाच्या मुळाशी आहे’ ही नाकारणारी आहेत. अद्वैत हे एकमेव दर्शन असे आहे ज्यात सर्वव्यापी अशा निर्गुण ब्रह्माची आणि सगुण ईश्वराची मांडणी केली आहे. उपनिषदांत पुन:पुन्हा ज्याचे विवरण केले आहे त्यालाच अद्वैत दर्शन म्हणतात. शब्द प्रमाण ज्याला revelations म्हणजेच वेदांतिक ज्ञान म्हणतात ते उपनिषद लिहिणाऱ्या ऋषींना स्फुरले.

आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो आणि कर्मकांडांवर अंधश्रद्धा, अवैज्ञानिक, प्रतिगामी म्हणून जी टीका केली जाते, ते सहसा मीमांसा दर्शन असते. मीमांसा दर्शन म्हणजे वेदांचा पूर्व भाग. सूर्य, इंद्र, मरुत, सोम वगैरे देवता आणि त्यांचे आरध्य, यज्ञयाग विधी करुन स्वर्गप्राप्ती कशी करावी यावर वेदांच्या पूर्व भागाचा भर आहे. मीमांसा दर्शन याचा सैद्धांतिक पाया आहे. या कर्मकांडांवर पुरगोमी विचारातून जी टीका आधुनिक काळात (युरोपियन रेनेसान्स मुळे निर्माण झालेला गेल्या ३००-४०० वर्षांचा modernity चा काळ) होते तशी टीका होण्याचा हा काही पहिला काळ नव्हे. वेदांतातच म्हणजे उपनिषदांतच यावर जोरदार टीका केली आहे. मुंडक उपनिषदाच्या प्रथम मुंडकांच्या दुसऱ्या खंडात आलेले पहिले सात श्लोक मंत्रविधी व मंत्रविधीच्या कर्मातून असे कर्म करणाऱ्यास स्वर्गप्राप्ती कशी होते आणि असे कर्म न केल्यास अशा पुरुषाच्या सात पिढ्या कक्षा नरकात जातात यांचे वर्णन आहे. आठव्या श्लोकापासून अशा कर्मातून निर्माण होणारे फळ (स्वर्ग) कसे अस्थिर आहे, अविद्येचे द्योतक आहे व अशी स्वर्गप्राप्ती करून घेणारास ही कर्मफळ क्षीण झाल्यावर संसारात पुन:प्रवेश करावा लागतो अशी टीका आहे. पुढे बाराव्या श्लोकात अस्थिर कर्मफळांच्या (जी मुळात अस्थिर आहेत) मागे न लागता ब्रह्मविद्येत स्थिर झालेल्या गुरूस शरण जावून ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करावा अशी शिकवण आहे. अर्थात कर्मकांड पूर्णपणे टाकून द्या असे वेदांत कुठेच म्हणत नाही पण शाश्वत आनंदप्राप्ती कसा विचार करावा याची दृष्टी उपनिषदे देतात.

ईश्वराचे स्वरूप – तैतरिय उपनिषद ब्रह्मवल्ली खंडामध्ये म्हणते, ‘ब्रह्मविदाप्नोति परम् | सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म | यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन् | सोऽश्नुते सर्वान् कामान् सह । ब्रह्मणा विपश्चितेति |’ अर्थात, ‘ब्रह्म जाणणाऱ्यास परम सुखाची (आनंदाची) प्राप्ती होते. ब्रह्म हे सत्य, ज्ञान आणि अनंत आहे. ज्याच्या स्व:तच्या बुद्धीने ज्याने आपल्या मनात प्रमाण निर्माण करून ब्रह्म जाणले आहे, त्याला सर्व सुखांचा सर्वकाळ उपभोग घेता येतो.’ इथे सुख, उपभोग असे शब्द आल्यावर असा प्रश्न मनात येतो की हे साक्षात्कार वगैरे गूढ आणि वैयक्तिक अनुभवाबद्दल चर्चा सुरू आहे आणि आधुनिकतेच्या विचारातून पाहताना यांत थोतांड, भ्रम वाटू शकतो. आनंद या शब्दाचा अर्थ बोलीभाषेत अनुभवात्मक असल्यामुळे इथे गडबड होते. पण ब्रह्म अनंत आहे म्हणजे अपरिमित आणि सर्वव्यापी आहे व त्यामुळे तेच पूर्णत्व आहे. पूर्णत्व म्हणजे कशाचीही उणीव नाही आणि त्यामुळे दु:ख नाही व चिरंतन सुख (आनंद) आहे. अर्थात, याचा अर्थ जो भुकेला आहे, गरीब आहे त्याने आहे त्यातच आनंद मानावा असा नाही. भारतीय विचार धर्म आणि मोक्ष यांच्या चौकटीत अर्थ व काम असा चार पुरुषार्थांचा विचार करतो. त्यामुळे ब्रह्मप्राप्ती म्हणजे निष्क्रियता किंवा संन्यास असा प्रचलित अर्थ चुकीचा आहे.

भारतीय परंपरेची नाळ तुटल्यामुळे ईश्वर, आत्मा थोतांड आहे, हिंदू धर्म कालबाह्य आहे, अवैज्ञानिक आहे वगैरे विचार प्रचलित झाले आहेत.

शंभर वर्षांपूर्वीचा समाज आणि सध्याचा समाज यांची तुलना करता साहजिकच ही लक्षात येते की वैज्ञानिक दृष्टीची प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे, लौकिकार्थाने सुबत्ता वाढली आहे आणि अर्थातच काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजाला ‘शहाणं’ करण्यासाठी सुरू झालेल्या सुधारक चळवळींची शंभर वर्षांपूर्वीची उद्दिष्टे बरीचशी साध्य झाली आहेत. तथापि ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ हा प्रश्न जसा शेकडो वर्षे त्या-त्या पिढीसमोर होता तसाच तो सध्याही आहे आणि तो प्रश्न पुढच्या काळातही तसाच असणार आहे. आजच्या काळात सुसंगत विचार करून जीवनात अपेक्षित असलेले सुख प्राप्त करता यावे यासाठी हिंदू दर्शनांचा अभ्यास ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन (Scientific temperament) आहे, अशा सर्वांनी करावा व परंपरेने आलेली विवेकबुद्धी आचरणात आणावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी प्रतेक वनस्पती कडे ,वृक्ष कडे,नदीच्या प्रवाह कडे,प्रतेक प्रण्याकडे,प्रतेक कीटक का कडे खूप लक्ष देवून बघतो.तासनतास बघतो.
विविध वृक्ष ,विविध वनस्पती ,त्या निर्माण करत असणाऱ्या फळं,कड धान्य ह्यांची निर्मिती.
माती एकच पण पण त्या पासून किती विविध प्रकार ची फळं,फुल,कड धान्य निर्माण होते.
काय त्या फुलांची रचना अप्रतिम .रंग ,आकार अगदी आखीव रेखीव.
मला वेड लावते हे निसर्गाचे रूप.
चंद्रावर जण्यापर्यंत कुवत निर्माण करणारा मानवी मेंदू अप्रतिम ,मानवी डोळे अप्रतिम..
मानवी मेंदू ह्या क्षमते चा होण्यात मानवाचा काहीच सहभाग नाही.
गणिती पद्धती नी सरासरी काढली तरी ह्या विशाल ब्रह्मांड फक्त हे पृथ्वी वर च अस्तित्वात असणे शक्यच नाही.
इवलीसी मुंगी वारूळ बनवते.
खुप अवघड ,गहन प्रश्न..
मानवी मेंदू च्य खूप पलीकडले..ह्याची उत्तर मिळत नाहीत तो पर्यंत ईश्वर ही कल्पना कोणी नष्ट करू शकत नाही..
गरीब,श्रीमंत,वेडे,हुशार,स्त्री पुरुष ह्यांना मी खूप न्याहाळून बघतो.
कान,नाक,डोळे,केस ,पाय,हात काय सुंदर रचना आहे.
जगातील कोणीच ह्या अप्रतिम सुंदर रचनेचे विश्लेषण करू शकत नाही
फालतू genome, गुणसूत्र,dna ह्या असल्या फालतू गोष्टी पुढे केया जातील.
पण ह्या निर्माण कशा झाल्या,इथेच का झाल्या ह्या वर एक पण शब्द बोलण्याची त्यांची कुवत नसेल.
आताचे जे काही शोध आहेत.
ते त्या त्या पदार्थाचे गुणधर्म आहेत त्यांनी गुणधर्म बदलले तर ?????
सर्व उपकरण,शोध माती मोल होतील.
उदा .लोखंड कडक आहे ते लिक्वीड फॉर्म मध्ये आले तर ?
लोखंड लिक्वीड फॉर्म मध्ये येण्यासाठी उच्च तापमान हवं अशी अक्कलेचे तारे कोणी तरी तोडेल.
निसर्ग नियम हे निसर्गाचे आहेत माणसाचे नाहीत.
उद्या काही ही घडू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईश्वर ह्या विषयावर मत व्यक्त करण्याची माणसाची कुवत नाही.
.मग गौतम बुद्ध असतील,आचार्य व्यास असतील, येशू असतील किंवा आताचे बिनडोक संशोधक.
ह्यांच्या मनात जे काही विचार येतात ते फक्त मेंदू मुळे..
आणि मानवी मेंदू ही निसर्गाची देणगी आहे निसर्गाने मानवी मेंदू विचार करण्या लायक केला नसता तर माणूस आज पण जंगलात असता(मानवी मेंदू चा विकास करण्यात ईश्वरी शक्ती च सहभागी आहे)
मानवी मेंदू किती प्रगत झाला पाहिजे हे जर निसर्गाने ठरवले असेल तर मानवी मेंदू ला किती ब्र्रह्मांड ची माहिती झाली पाहिजे ह्याची सीमा रेषा पण निसर्ग च ठरवणार माणूस नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला जमिनीत उगवून फळं, फुल द्रणारी झाडे झुडपे जास्त विचलित करतात..तोड च नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या मधले लिखाण इस्लाम ला अमान्य आहेत.

स्वतः हजरत मोहम्मद PUBH यांनी सांगितले आहे कि अल्लाह सर्व शक्तिमान आहे. आणि दयाळू आहे अल्लाह व्यतिरिक्त कुणीही पूजनीय नाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु

मंदबुद्धीच्या लोकांनी अव्यक्त ईश्वराच्या साक्षात्काराकडे जाण्याकरता म्हणून काल्पनिक सगुण ईश्वराची उपासना केल्यास चुकीचे नाही, परंतु तो एक केवळ टप्पा आहे हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

हे काही पटले नाही. सर्व भक्त मंदबुद्धी नसतात.

तसेच, सर्व साक्षात्कारी हे खोटे, लबाड किंवा भ्रमिष्ट नसतात. साक्षात्कार होतो म्हणजे नक्की काय होते याचे मनोवैद्न्यानिक विश्लेषण करण्याचा काहींनी प्रयत्न केला आहे.
फार पूर्वी पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील नवाविष्णु मंदिरात नवरात्रीच्या काळात महिला घागरी फुंकत असत. आणि तसे करताना त्यांच्यामधे म्हणे देवीचा संचार होत असे. या महिला सर्वसामान्य, सभ्य घरामधील गृहीणी होत्या. त्यांना कुणालाच फसवायचे नसे. देवी अंगात येणे म्हणजे काय मला अजूनही कळले नाहीये, परंतु मला त्या स्त्रियांना लबाड किंवा भ्रमिष्ट म्हणवत नाही हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

परंतु मला त्या स्त्रियांना लबाड किंवा भ्रमिष्ट म्हणवत नाही हे नक्की.

बरोबर. पण त्या मनोविकाराच्या बळी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

काहींच्या बाबतीत हे कारण असू शकेल. पण अशाही काहीजणी आहेत की, ती एक विशिष्ट वेळ सोडून इतरवेळी त्या सर्वसामान्य आयुष्य जगत असतात.
त्यांच्यात मनोविकाराची कुठलीही लक्षणे अढळत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

वेगवेगळे प्र्योग मुद्दाम् करुन बघणाऱ्या एका सुशिक्षित ज्येष्ठ महिलेने घागर फुंकून काय होते ते अनुभवण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या मते, घागरीत सारखं फुंकून घागरीच्या आंतल्या हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. घागर फुंकणाऱ्या बाईचे नाक,तोंड त्या घागरीच्या मुखाच्या जवळच असल्याने ती अनावधानाने अशी हवा श्वासाद्वारे आंत घेत रहाते, त्यामुळे तिला ग्लानी/उन्मादावस्था प्राप्त होते. त्याचा परिणाम होऊन, मनोविकाराला बळी पडलेल्या स्त्रियांना आपल्या अंगात आले आहे असे वाटते.
यावर, चवताळून वा थंड डोक्याने जरुर प्रतिवाद करावा. म्हणजे ही संकल्पना बरोबर आहे की चुकीची, याचा निवाडा होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ्रम आणि निरास हे डॉ नरेंद्र दाभोलकरांचे पुस्तक 1988 च्या दरम्यानच प्रसिद्ध झाले त्यात या सर्व गोष्टींचा उहापोह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे कारण कदाचित बरोबर असेल ..
(ग्लानी आणि उन्माद या दोन परस्परविरोधी अवस्था आहेत.)

पण काहींना बसल्या जागी, बोलता बोलता देखिल देवी अंगात आली आहे असे वाटू लागते. अगदी सामान्य परिस्थितीत (कुठलाही धार्मिक कार्यक्रम नसताना) देखिल त्यांना अचानक असे होते, याचे कारण समजत नाही. ( घरातील सदस्य अशा महिलांबरोबर खूप जपुन, काळजीपूर्वक वागतात, बोलतात असे दिसून येते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

असले तर्कशून्य, निराशावादी आणि पराभूत मनोवृत्तीचे लेख वाचून एकेकाळी चीड यायची; आजकाल कीवही येत नाही.
खर तर प्रतिक्रियाही देण्याची इच्छा नव्हती पण मग असले लेखक सोकावून जात आहेत म्हणून एक निषेध म्हणून प्रतिक्रिया देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता र.धों. कर्वे सोकावून जाण्याची काही शक्यता नाही, त्यामुळे तुम्ही लेंडी टाकली नाही तरी चालेल, निश्चिन्त असा.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांची स्वतःची एक विचारधारा होती त्यांचे लेखन त्या प्रमाणेच असणार.
त्या मुळे नाव मोठे असले म्हणजे त्यांचे मत मत खरेच असते असे नाही ते फक्त त्यांच्या विचार धारेला प्राधान्य देत असतात.
आस्तिक,किंवा उजव्या विचाराची लोक त्यांच्या साहित्याच्या नादाला लागत नाहीत.
जसे डावे आस्तिक लोकांच्या साहित्याच्या नादाला लागत नाहीत.
सत्य दोघांस पण माहीत नसते.सर्व हवेत गोळीबार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0