मोटार फक्त पाहावी!
बऱ्या अर्ध्यानं नवी गाडी घ्यायची ठरवली. म्हणजे तसं मला सांगितलं. त्यानंतर दोनेक आठवड्यांतच गाडी घरी आली. त्याच्या हिशोबात एवढासा 'रीसर्च' पुरत नाही. यूट्यूबवर व्हिडिओ बघण्याला किंवा रेडिटवर चार तास घालवण्याला हल्ली रीसर्च म्हणतात. म्हणूनच मी तसले चाळे करत नाही. मी पीएचडीच काय, पोस्टडॉकही केलं एक. आता कशाला असले चाळे करू मी! मी सरळ नेटफ्लिक्स किंवा प्राईमवर 'बॉलिवुड वाईव्ज' वगैरे बघते. अभ्यासपूर्ण बोलायचं असेल तर थिसीस लिहावा… तो मी आधीच लिहून टाकला. शिवाय मी स्वतःला ज्ञानेश्वर वगैरे समजत नसल्यामुळे थिसीस लिहून झाल्यानंतर १३ वर्षं उलटून गेली तरी चिक्कार जिवंत आहे.
तर मुद्दा असा की बऱ्या अर्ध्यानं गाडी घ्यायची ठरवली. म्हणजे मला तसं सांगितलं. आणि शिवाय बरंच काही सांगितलं. त्यात torque, horsepower, ton असे शब्द आले होते. टन म्हणजे मेट्रिक टन असतं का आणखी काही? आणखी काही प्रकारचे टन असतात का, असे कुठलेही प्रश्न मी त्याला विचारले नाहीत. कुठल्याही प्रकारे मला त्या टॉर्काबिर्कात रस असेल, अशी शक्यताही मला निर्माण करायची नव्हती. मी अजूनही गाड्यांचे उल्लेख 'ती लाल गाडी', 'ती बससारखी मोठी गाडी' - म्हणजे लिमोझिन - असे करते. गाड्या चारचाकी, तीनचाकी असतात; हिरव्या, निळ्या, काळ्या, पांढऱ्या असतात; मोठ्या किंवा लहान असतात; ढकलायला लागतात किंवा बटणं दाबून चालवतात. फार तर गाड्या चालवणाऱ्यांवर ओरडतात, सीट बेल्ट लावा, चाकावर हात ठेवा, वगैरे.
(हे लिहितानाही मला ते लिमोझिन नाव आठवेना. मग मी big fancy car असं गूगललं. त्यात भलतंच कायतरी दाखवायला लागले. बेअक्कल गूगलला अजूनही माझी भाषा समजत नाही, म्हणून मी आता 'डकडकगो' वापरते. बरा अर्धा हल्ली मातृभाषा कमी बोलतो, आणि उत्तमार्धीभाषा जास्त बोलतो. मी त्याला विचारलं, "काय रे, मी कुठल्या लांबड्या गाडीला बस म्हणते?" लगेच आवाज आला, "अंऽऽऽ …. लिमोझिन." तर लिमोझिन!
(तो खरंच उत्तमार्धी भाषा जास्त बोलतो. परवा मी शब्द वापरला, विवक्षित. मी त्याला म्हणत होते, "तुला विवक्षित कुठलं चीज हवंय, का कुठलंही चीज चालेल?" तर मग त्यानं विवक्षित म्हणजे काय विचारलं. आणखी चार-सहा वेळेला विचारेल, "तो कुठला तो व-व शब्द?" आणखी महिन्याभरात त्याच्या तोंडात विवक्षित शब्द बसेल, पाहाच!))
त्याला हवी होती ती, तश्शीच गाडी ऑस्टिनात नव्हती. सॅन अँटोनियोत होती. साधारण दीड तासाचा ड्राईव्ह. मग आम्ही तिकडे जायचं ठरवलं. तिकडे पोहोचल्यावर समजलं, हे लोक पूर्ण रकमेचा पर्सनल चेक घेणार नाहीत. कॅशियर चेक द्या, किंवा कर्ज घ्या. कर्ज घेतलं तर ते पहिल्या महिन्यात परत करण्याची सोयही देत होते. पण नाही! बँका तोवर बंद झाल्या होत्या. मग आम्ही सॅन अँटोनियोला जाऊन तिथे दुकानात दिलेलं, प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी प्यायलं, आणि परत आलो.
शेजरची डेबी म्हणे, "रोड ट्रिप झाली तुमची!" तिला मी 'हो-हो' केलं. पण मला ते पटलं नाही. डेबीचं म्हणणं काय पटवून घ्यायचं! तशी वेळ येऊ नये म्हणून, रस्त्यात मध्येच थांबून शू केली नाही तर तिला रोड ट्रिप म्हणायचं नाही, अशी व्याख्या आम्ही त्या दिवशी ठरवली. म्हणजे मी सुचवली आणि बऱ्या अर्ध्यानं मान्य केली. तो माझी भाषा बोलतो!
आणखी एक निरागस मित्र - याचं नाव विचारू नका; तो ऐसीवर कधीमधी येतो, पण निरागसाला जपण्यासाठी मी त्याचं नाव लिहिणार नाही - तो म्हणे, "... पण मला खरंच गरज असती तर मी तो कर्जाचा पर्याय मान्य केला असता." तो खरंच निरागस आहे. त्याला need आणि want यांतला फरक समजावून सांगावा लागला. किती समजला कोण जाणे! हा मित्र नाही माझी भाषा बोलत! तो त्याच्या उत्तमार्धीची भाषाही बोलत नाही; पण नवरा-बायकोत आपण का पडा!!
मग बऱ्या अर्ध्याला डॅलासात तसलीच गाडी सापडली. आमच्यांत डॅलसला डॅलसच म्हणतात. एरवी मी कितीही ममव बाईसारखी 'हिरवी गाडी', 'बुटकी गाडी' वगैरे म्हणाले तरी डॅलसच!!
ते सॅन अँटोनियोच्या बाटलीतलं पाणी पितापिता मी बऱ्या अर्ध्याला म्हणाले, "येत्या विकेण्डला मी सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे. त्याच्या पुढच्या विकेण्डला आपण जाऊ तिकडे. मी घेऊन जाईन तुला तिकडे!" तो अत्यंत समजूतदार इसम आहे. त्यानं विमानाचं तिकीट काढलं. माझ्या सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानाच्या अर्धा तास नंतरचं विमान शोधलं. "बशीसारखी विमानं आहेत, डॅलसला जायला. दर तासाला आहेत!" असं त्याचं मत. 'बशीसारखी' हाही माझाच शब्द.
विकेण्डचे दोन दिवस मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असताना मला व्हॉट्सॅपवर तिर्री मांजरीचे फोटो आले. तिनं नव्या गाडीकडे ढुंकूनही बघितलं नव्हतं. कुणावरही, कशावरही ॥तिर्री कृपा॥ एवढ्या सहज होत नाही. जुन्या गाड्यांनीही फार मेहनत केली तेव्हा तिर्रीची पावलं त्यांच्या काचेवर दिसायला लागली.
सॅन फ्रान्सिस्कोच्या ऑफिसात टायलर आहे. टायलरला जुन्या गाड्या स्वतः दुरुस्त करून त्यांच्या रेस लावायची हौस आहे. हौसेला मोल नसतं. एरवी सभ्य लोकांत, त्याची आणि माझी एरवी निराळीच शर्यत असते; मीटिंगला झूमकॉलवर कोण आधी येतं. बहुतेकदा मी जिंकते; आम्ही दोघंच असलो की "तुझा खोचकपणा चेहऱ्यावरून लपत नाहीये", असं पदकवाटप होतं. तर त्याच्यासमोर काही तरी विषय निघाला.
मी म्हणाले, "बरा अर्धा शनिवारी डॅलसला गेला होता. गाडी आणायला. माझदा एमेक्स-५."
टायलर म्हणाला, "मियाता घेतली त्यानं?"
"मियाता? हे काय असतं मला माहीत नाही. गूगलून खात्री करून पाहावं लागेल. पण या गाडीला इतर काही नावं का हवीत? सरळच 'मिडलाईफ क्रायसिस' म्हणून चालणार नाही का? उगाच कशाला लपवाछपवी करा. आहे ते दिसतंच की सरळ!"
आता आमचा मॅनेजरही त्या संवादात पडला, "का गं त्या बिचाऱ्याला नावं ठेवतेस? एक गाडी तर घेतोय ना!"
हे फारच झालं. "यात काय नावं ठेवली? तो आहे त्याच वयाचा. आणि गेल्या काही वर्षांपर्यंत तसा बरा होता. हल्लीच हे छानछोकीचे चाळे सुरू केले आहेत. याला काय म्हणणार? गद्धेपंचविशी? त्यातून मी थोडीच काही म्हणत्ये, गाडी घेऊ नकोस वगैरे? मी फक्त वर्णन केलं तर लगेच मुन्नी बदनाम का करतोस?"
तरीही त्यानं त्याची बाजू सोडली नाही. पुरुष पुरुषांचे शत्रू नसावेत कदाचित. टायलर पुन्हा गाड्या उडवत रेसला गेला की विचारलं पाहिजे. एकमेकांशी कसकसल्या रेस लावायच्या म्हणजे शत्रुत्व नाही का?
मग आम्ही सगळे 'हॅप्पी अवर'च्या नावाखाली दारू प्यायला, जेवायला एकत्र जाणार होतो. मी टायलरला विचारलं, "तू काही फॅन्सीमोबिल आणलं आहेस का गाडीसारखी गाडी आणल्येस?" जणू तो गाड्यांच्या रेस लावतो म्हणजे त्याच्या गाडीला दोन शिंगं वगैरे असणार होती. तो म्हणाला, "चल माझ्याबरोबर, आणि तूच ठरव फॅन्सीमोबिल आहे का गाडीसारखी गाडी आहे ते!" गाडीच्या नावाखाली केलेलं फ्लर्टिंग मी खपवून घेणं हा माझ्या नीरसपणाचा अपमान आहे; आणि माझा अपमान मी करणार नाही तर आणखी कोण करणार.
सॅन फ्रान्सिस्कोहून परत आल्यावर बरा अर्धा विमानतळावर आला होता. हीच ती 'मिलाक्रा' गाडी घेऊन. 'मिडलाईक क्रायसिस'. सगळ्यात पहिला चिवावा कुत्रा बघितल्यावर मला असंच काहीसं वाटलं होतं; हा खरा कुत्रा आहे! ह्या गाडीत माझं पूर्ण बूड-धूड सोडाच, लॅपटॉपची बॅग मावेल? तरी बरं, बरा अर्धा गाडीत बसलेला होता. तो माझ्यापेक्षा चार-सहा इंच उंच आहे.
आणि ही गाडी ह्याला चालवायला का आवडते? गुळगुळीत रस्त्यावर गाडी खडखडत होती. "मला भारताची आठवण आली की तुला गाडी चालवायला सांगायचं. एस्टीतून बसल्याचा अनुभव मिळेल. बसायला कमी जागा, पायांखाली सामान ठेवायची सोय आहे आणि ही गाडी किती खडखडत्ये!" बरा अर्धा नक्की नव्या गाडीमुळे खुश असणार. "बघ! तुला नेहमी पैसे किती खर्च होतात याची काळजी असते. वर जेट लॅगचा त्रास नाही. आता किती सहज, स्वस्तात तुला भारतात जाण्याचा अनुभव मिळेल पाहा … पाहा, मी किती मराठी शब्द वापरतोय!" बरा अर्धा उत्तमार्धी-भाषा वापरतो. तो खुश, मी खुश … हीच ती ॥तिर्री कृपा॥
आता बऱ्या अर्ध्याला बोलण्यापासून कुणी थांबवू शकत नव्हतं. "ह्या गाडीची स्पेशालिटी … म्हणजे…?"
"वैशिष्ट्य."
"हां, वैशिष्ट्य सरळ रेषेत जोरात पळते असं नाही. ह्या गाडीची टर्निंग रेडियस खूप कमी आहे. ही गाडी…"
"... टर्निंग रेडियससाठी मराठी शब्द नको का?"
"त्यामुळे ही गाडी सहज वळते, दाखवतोसच तुला!" मी मध्येमध्ये, त्याचं बोलणं तोडून भाषेबद्दल त्याला प्रश्न विचारला. पण त्याला काही फरक पडला नाही. आम्ही घराजवळ पोहोचलो होतो. आता बारक्या रस्त्यावर आत वळायचं होतं. बऱ्या अर्ध्यानं गाडी जोरदार वळवली. गाडीत बसायलाच जागा कमी असल्यामुळे मी फार हलले नाही. गाडीची सगळी रचना विचार करून बनवल्ये … बाईनं बनवली असेल का?
"तू बरा आहेस ना? एरवी अशा बेदरकारपणे गाडी चालवत नाहीस!"
"बेदरकारपणे … हं. पण हे बरोबर झालं नाही. आपण थोडं पुढे जाऊन येऊ." गाडी घरावरून आणखी पुढे नेली. "आता पाहा." गाडी वळली. "बुडात ठेवलेल्या वस्तू इकडून तिकडे जाऊन आपटल्या पाहिजेत. आता बॅग आपटली तशी!"
"अरे, ही गाडी आहे. बोटावर कीचेन फिरवल्यासारखी गाडी फिरवायची का? का सुदर्शनचक्र आहे हे!"
बऱ्या अर्ध्याला सुदर्शनचक्र आवडलंय. आता कधीही गाडी वळवताना बुडातल्या वस्तू इकडेतिकडे झाल्या की तो स्वतःच 'सुदर्शनचक्र' म्हणतो. उत्तमार्धी-भाषा!
नव्या गाडीवर आता ॥तिर्री कृपा॥ झालेली आहे.
मी ती भानगड शिकायचा प्रयत्न केला. आणि चौथ्या दिवशी सोडून दिलं. चार दिवस बाहेर बसणं पुरेसं असतं, बरोबर ना!
अमेरिकेत बहुतांश गाड्यांना क्लच-गियर वगैरे भानगड नसते. ॲक्सिलरेटर आणि ब्रेक. गाडी चालवणं फार सोपं असतं. बऱ्या अर्ध्यानं हौशीनं क्लच-गियरवाल्या गाड्या आणल्या आहेत. बाजारात मिक्सर, वॉशिंग मशीन, वगैरे वस्तू आल्या आणि बायकांनी लगेच पाटे-वरंवटे आणि धोपाटणी टाकून द्यायला सुरुवात केली. हातानं कपडे धुणाऱ्या कुणाही बाईला विचारा, परवडत असेल तर ती मशीन वापरेल. पुरुषांचं तसं नाही. दोन्ही गाड्यांचा ॲव्हरेज एकसारखा आहे, तरीही ह्या असल्या तापदायक गाड्या का चालवायच्या! पुरुषी डोकी!!
ती भानगड शिकायचं सोडून दिल्यानंतरही बऱ्या अर्ध्यानं एक दिवस मला थियरी शिकवायचा प्रयत्न केला. क्लच, ब्रेक, ॲक्सलरेटर सगळ्यामची चित्रं काढली. माझ्या पायाचंही काढलं. बरा अर्धा चांगला शिक्षक आहे. मी बऱ्याच संज्ञा ऐकल्या. एकेकाळी मला भावानं भ-ह वगैरे शब्दांचे अर्थ शिकवले होते. आता बरा अर्धा डा-अ वगैरे शब्द वापरत होता. माझी स्मरणशक्ती नेहमी माझा घात करते.
भर उन्हाळ्यात, जेव्हा बाहेर सगळं जळलेलं, करपलेलं दिसत असतं तेव्हाही अनपेक्षित पावसानं हवा चांगली होती, बाहेर हिरवा रंग होता. आम्ही गाडीतून उगाच फिरत होतो. चढावावर गाडी ढुरढुरल्याचा आवाज आला. मी बऱ्या अर्ध्याकडे न वळताच म्हणाले, "हे का ढुरढुरलंस ते मला समजलं. कायपण दिवस आलेत!" तो म्हणाला, "हो, डाऊनशिफ्टिंग केलं." मला आता तोंड दाखवायची चोरी वाटायला लागली. पण किती वेळ लाजणार, लाजतालाजता लाज हाताबाहेर गेली तर … मी लगेच म्हणाले, "हो, मला ते 'डाऊनशिफ्टिंग' म्हणजे काय तेही समजलं. अरेरे, काय झालं हे माझं!" माझं दुःख त्याला नीटसं समजलेलं नाही. तो बराच वेळ काही तरी बोलत होता, पुन्हा टॉर्क, हॉर्सपावर वगैरे शब्द कानांवर पडत होते; माझी शामतच नव्हती हे ऐकायची. मी बाहेरच बघत होते. त्याचं झाल्यावर समोरून एक गाडी आली. मी त्याच्याकडे डाव्या हाताची चार बोटं दाखवत म्हणाले, "चार चाकं."
प्रतिक्रिया
.
पोलिसाकर्षक रंग आहे. त्यात पुन्हा स्टिकशिफ्ट आहे म्हणताय, म्हणजे (हौशीने) चालविणाऱ्यास चाकामागे बसल्यावर खून चढतो.१
जरा सांभाळून, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
—————
१ जवळजवळ अकरा वर्षे बीन देअर, डन द्याट. त्यानंतर मग अटलांटाच्या स्टॉप-अँड-गो ट्राफिकमध्ये सदानकदा डाउनशिफ्ट-अपशिफ्ट करण्याचा, ट्राफिकमध्ये गाडी थांबलेली असताना क्लचवर पाय दाबून ठेवून राहण्याचा, नि अधूनमधून क्वचित्प्रसंगी भर ट्राफिकमध्ये गाडी स्टॉल करण्याचा कंटाळा आला. झालेच तर, सरासरी तीन वर्षांमागे एकदा, या दराने किमान दोनदा क्लच जाळले, नि त्याच्या रिप्लेसमेंटचे दर खेपेस किमान हजार डॉलर मोजले. मग वैतागून तो नाद सोडला. (तसे दरम्याच्या काळात एक लग्न होऊन एक पोरसुद्धा झाले म्हणा. माणसाने डोक्याला कितीकिती म्हणून व्याप लावून घ्यायचे?१अ) गेली अठराएक वर्षे स्टिकशिफ्टला हात लावलेला नाही.
१अ कोठल्याही नवऱ्याने एक तर बायकोला गाडी चालवायला स्वतः शिकवण्याचा प्रयत्न करू नये. (हमखास भांडणे होतात. त्यापेक्षा एखाद्या बऱ्यापैकी ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टरची फी परवडते.) आणि त्यातसुद्धा, स्टिकशिफ्टवर शिकवण्याचा प्रयत्न तर मुळीच करू नये. (उरलीसुरली सॅनिटी जर प्यारी असेल, तर अर्थात. अन्यथा, ज्याचीत्याची मर्जी.)
—————
त्याउपर, तुमचे बरे अर्धे (बहुवचन केवळ आदरार्थी!) यापुढे स्टिकशिफ्ट चालवणार म्हणताहेत, तर एक अनुभवाचा बोल सांगतो. मनुष्याला एकदा का स्टिकशिफ्टची सवय/चटक लागली, की त्याच्या हातात पुन्हा ऑटोमेटिक देताना जपून द्यावी. म्हणजे, ऑटोमेटिक ते स्टिकशिफ्ट ट्रान्झिशनमध्ये सुरुवातीचे हजारदा गाडी स्टॉल करण्याचे, झालेच तर शिफ्ट करताना खर्रकन आवाज करण्याचे आणि/किंवा गचके खाण्याचे पिटफॉल्स जरी जमेस धरले, तरीसुद्धा, ती लर्निंग कर्व तितकीही वाईट नसते. प्रयत्नाने, पर्सिस्टन्सने जमू शकते. स्टिकशिफ्ट ते ऑटोमेटिक उलट्या ट्रान्झिशनमधली अनलर्निंग कर्व मात्र (वरकरणी कितीही सोपी तथा निष्पाप वाटली, तरी) किंचित ट्रिकी नि क्वचित्प्रसंगी किंचित धोकादायक ठरू शकते. (Unless you are very very conscious of what you are doing.)
म्हणजे होते कसे, की दोन बाबतींत गोची होते. नेहमी स्टिकशिफ्ट चालविणाऱ्या माणसाला डाव्या पायाखाली क्लचची सवय असते. अचानक हातात ऑटोमेटिक आल्यास, डावा पाय मोकळा ठेवायचा असतो, हे ठाऊक असूनसुद्धा, निव्वळ सवयीने डावा पाय सर्वात डावीकडच्या पेडलवर ठेवला जातो. Which just happens to be the brake pedal. त्यामुळे मग उजवा पाय अॅक्सिलरेटरवर नि डावा पाय ब्रेक पेडलवर, असल्या चमत्कारिक नि अत्यंत अवघडलेल्या अवस्थेत मनुष्य (केवळ सवयीमुळे) गाडी चालवू लागतो. तेही तितके वाईट नाही. खरी गंमत त्यापुढे होते. ऑटोमेटिकमध्ये (सुरुवातीस रिवर्स किंवा ड्राइवमध्ये गाडी टाकणे वगळल्यास) गियर अधूनमधून बदलावे लागत नाहीत. स्टिकशिफ्ट चालविण्याची सवय असलेल्या माणसाचा मात्र, निव्वळ सवयीने, अधल्यामधल्या लॉजिकल पॉइंट्सना, गियरशिफ्ट हलविण्यासाठी उजवा हात नि क्लच पेडल दाबण्यासाठी डावा पाय, शिवशिवत असतो. आता, उजव्या हाताला जे गियरशिफ्टचे बोंडूक लागते, त्याचा वेगळा आकार हातास जाणवून त्याच्या बाबतीत मनुष्य वेळीच स्वतःस आवरतो. डाव्या पायाचे मात्र तसे होत नाही. सगळी पेडले पायास सारखीच लागतात. अशा रीतीने, सर्वात डावीकडील जे पेडल पायास लागते, ते मनुष्य दाबू पाहतो. Again, which happens to be the brake pedal. आणि अशा प्रकारे, कोणत्याही आग्यापिछ्याविना नि काहीही कारण नसताना, मनुष्य भर धावत्या ट्राफिकमध्ये कचाककन ब्रेक दाबून मोकळा होतो. Not realizing it until it is too late. (पुन्हा, बीन देअर, डन द्याट.)
—————
अतिअवांतर: सान फ्रान्सिस्कोचा ज़िक्र केलात. माझ्या अमेरिकन माहेरापासून दगडफेकीच्या अंतरावरचे गाव (तथा माझा अमेरिकेतील पहिलावहिला प्रवेशबिंदू) म्हणून अत्यंत जिव्हाळ्याचे. (जरी गेल्या २८ वर्षांत त्या बाजूच्या जवळपासही फिरकलेलो नसलो, तरीही. माहेर ते, आफ्टर ऑल, माहेर.) तर, तिथल्या त्या चमत्कारिक ग्रेडियंटवरच्या रस्त्यांना काटछेद देणारे रस्ते मात्र सपाट असतात, आणि आंतरछेदावर स्टॉपसाइन असते, ती मात्र ग्रेडियंटवाल्या रस्त्याला! तर अशा स्टॉपसाइनवर गाडी थांबवून पुन्हा चालवू लागताना, जर स्टिकशिफ्ट चालवीत असलात, तर तारे दिसतात. प्रथम हँडब्रेक लावून, मग (१) क्लच सोडणे + (२) अॅक्सिलरेटर दाबणे + (३) हँडब्रेक सोडणे हे सर्व एकसमयावच्छेदेकरून करणे, आणि, हे करीत असताना, (१) गाडी स्टॉल होऊ न देणे + (२) गाडी मागेमागे घरंगळत जाऊन मागच्या गाडीला जाऊन धडकणार नाही, याची काळजी घेणे, हे एक मोठे कसरतीचे काम असते.
बाकी, १९९३ सालात सान फ्रान्सिस्कोला अनेकदा उगाच काहीही कारण नसताना चकरा मारल्या. केवळ हाताशी गाडी होती (आणि एकटाच होतो, घरी कोणीही अडवायला नव्हते), म्हणून. मात्र, Lombard Streetला कधी जाणे झाले नाही. (पाहा गुगलून!) त्यावरून स्टिकशिफ्ट चालवीत जायला बहार येईल, असा अंदाज आहे.
—————
(डिस्क्लेमर: प्रतिसाद लंबाचौडा आहे, तथा ट्रोलात्मकसुद्धा आहे. तो अर्थात माझ्या लेखनपद्धतीचा अविभाज्य घटक आहे; त्यामुळे, त्याबद्दल मी काहीही करू शकत वा इच्छीत नाही. त्याउपर, तुमचा आयडी हा स्त्री-आयडी (whatever that may mean) असण्यानसण्यावर माझे काहीही नियंत्रण नाही, तथा असे कोणते नियंत्रण मी ठेवूही इच्छीत नाही. प्रस्तुत प्रतिसाद आहे-तसा-आहे तत्त्वावर दिलेला आहे. सूचना समाप्त.)
उड दामाजी...
अमेरिकेत मला गाडी चालवायला बऱ्या अर्ध्यानं शिकवलं. आम्हाला अजूनही एकत्र राहतो.
एकवेळ मी जरा अगोचरपणे गाडी चालवेन, पण बरा अर्धा नाही चालवणार. तो वाट बघेल पण नियम पाळेल.
बाकी सगळं बरोबर आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भारतात दोन प्रकारच्या गाड्या
@न बा :भारतात दोन प्रकारच्या गाड्या असतात. गियरवाली *आणि ऑटोमॅटिक. तुमच्या प्रतिसादामुळे अमेरिकेत गियरवाल्या गाडीला स्टिकशिफ्ट म्हणत असावेत असा बोध झाला आभार.
ऑटोमॅटिक चालवण्याची सवय झाल्यावर परत गियरवाली गाडी चालवायची वेळ आल्यास गोची होते असे तुम्हाला म्हणायचे असावे.
ते तसेच असल्यास सहमत आहे.
*ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाड्यांमध्येही गियरच असतात, फक्त चालकास ते ऑपरेट करावयास लागत नाहीत इतपत कल्पना असावी. त्यामुळे गियरवाली किंवा ऑटोमॅटिक अशी मांडणी चुकीची आहे हे मान्य आहे.
परंतु इथले लोक त्याला काय 'म्हणतात ' हे मी लिहिले आहे.
बव्हंशी बरोबर.
स्टिकशिफ्ट ही गियरवाल्या गाडीकरिता (पक्षी: मॅन्युअल ट्रान्समिशन) आमच्याइथली colloquial term म्हणता यावी. बरोबर. (याचेच colloquial लघुरूप केवळ ‘स्टिक’ असेही होऊ शकते.)
हेही बरोबर. त्यात हल्ली पुन्हा गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक ऑटोमेटिक ट्रान्समिशन आणि सीव्हीटी (कंटीन्युअसली व्हेरियेबल ट्रान्समिशन) असाही एक सूक्ष्मभेद निर्माण झालेला आहे. परंतु ते असो.
(बादवे, भारतात गेल्या बहुधा किमान दहाएक वर्षांपासून तरी ऑटोमेटिक ट्रान्समिशनवाल्या गाड्या मिळू लागल्या आहेत, याची थोडीफार कल्पना आहे. (माझ्या एका भारतात कायमच्या परत गेलेल्या मित्राने घेतली होती.) कितपत लोकप्रिय आहेत, याबद्दल मात्र कल्पना नाही. इथे उत्तर अमेरिकेत अर्थात हा प्रकार (किमानपक्षी, पारंपरिक ऑटोमेटिक ट्रान्समिशन तरी) बाबा आदमच्या जमान्यापासून उपलब्ध आहे, आणि त्यापेक्षासुद्धा, लोकप्रिय आहे; बहुसंख्यांकरिता प्रेफर्ड पर्याय आहे. (स्टिकशिफ्ट घेऊ इच्छिणारे दिवसेंदिवस कमी होत चाललेत, असे वाटते.) युरोपात याउलट परिस्थिती आहे, असे ऐकून आहे. बोले तो, तेथे ऑटोमेटिक मिळू शकतात, परंतु फारसे कोणी घेऊ इच्छीत नाही, असे ऐकलेले आहे. जगात इतरत्र काय परिस्थिती आहे, कल्पना नाही.)
हो आणि नाही. बोले तो, हाही भाग आहेच, परंतु, माझा मुख्य मुद्दा याच्या नेमका उलट आहे.
पक्षी, फक्त ऑटोमेटिक येत असताना (यानी कि पूर्वी कधीही स्टिक चालविलेली नसताना) जर स्टिक चालवायला घेतली, तर because there is one more thing to mind, सुरुवातीसुरुवातीस (जोवर अंदाज नाहीये आणि सवय झालेली नाहीये, तोवर) अर्थातच अवघड जाते. (अर्थात, पूर्वी कधीतरी जर स्टिक चालवायची सवय असली, आणि मग ती सोडून देऊन नंतर बराच काळ ऑटोची सवय झाली, आणि मग अचानक पुन्हा स्टिक चालवायला घेतली, तर स्टिकचे पुराणे जजमेंट परत यायला तितकासा त्रास होत नाही; पंधरावीस मिनिटे चालविल्यावर जजमेंट आपसूक परत येते, असा निदान माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. परंतु तो पूर्णपणे वेगळा मुद्दा.) तेव्हा, ऑटो ते स्टिक लर्निंग कर्व अर्थात कठीण आहे, हे उघड आहे. परंतु, माझा मुद्दा तो नाही.
माझे म्हणणे हे आहे, की स्टिक ते ऑटो हा उलटा प्रवास, because there is one less thing to mind, खरे तर सोपा असायला हवा. आणि, तत्त्वतः तो तसा आहेही. परंतु, स्टिकची सवय असलेला मनुष्य जर अचानक ऑटो चालवू लागला, तर केवळ स्टिक चालवितानाच्या जुन्या सवयी आयत्या वेळेस विसरता न आल्यामुळे वेळप्रसंगी काही चमत्कारिक (आणि, क्वचित्प्रसंगी बॉर्डरलाइन धोकादायक) प्रकार करू शकतो. म्हणून त्यास अनलर्निंग कर्व म्हटले.
(माझा स्वतःचा या बाबतीतला प्रवास काहीसा संमिश्र, ऑटो —> स्टिक —> पुन्हा ऑटो अशा स्वरूपाचा आहे. असो.)
(सवांतर)
मॅन्युअल ट्रान्समिशन/स्टिकशिफ्ट याकरिता ‘स्टॅंडर्ड ट्रान्समिशन’ अशीही एक संज्ञा (तुलनेने बऱ्याच कमी प्रमाणात, परंतु) ऐकलेली आहे.
@अदिती:
@अदिती:
माहितीपूर्ण लेख.
गाडीच्या फोटोवरून गाडी महागडी असावी असा समज होत आहे.
तुमच्या उत्तमअर्ध्याची वाटचाल उत्तम चालू दिसते. त्यांना अभिनंदन कळवा.
हायड्रोजन की हायब्रीड की सीएनजी की इलेक्ट्रिक इत्यादी प्रश्न विचारून त्रास देणार नाही.
गुड क्वेश्चन्स!
अमेरिकेत सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या मिळतात का नाही माहीत नाही. पण बऱ्या अर्ध्याला 'संशोधन' करायला सांगते. गाडी इलेक्ट्रिक नाही, इलेक्ट्रिक गाडीत क्लच-गियर वगैरे आचरट प्रकार येत नाहीत. त्यामुळे बऱ्या अर्ध्याचा इलेक्ट्रिक गाडी चालवायला विरोध आहे. पण मध्यंतरी मला 'टेस्ला' विकत घ्यायला सांगत होता. त्याला चालवून बघता यावी म्हणून. मी नाही म्हणाले, "स्त्रीद्वेष्ट्या कंपनीची गाडी नको मला," म्हणत.
मग आणखी कुठलीतरी गाडी सुचवली, व्होल्व्हो का व्हॉक्सवॅगन कंपनीची. मी विचारलं, "काय विशेष या गाडीबद्दल? हायब्रिड तरी आहे का?" तर अगम्य कायसंसं बोलायला लागला. मी दुर्लक्ष केलं.
ही गाडी फार महाग नाहीये. माझ्यावर आता नवी गाडी विकत घेण्याची वेळ आली, कारण मी ११ वर्षं जुनी गाडी चालवते, तर नवी गाडी साधारण इतपत किंमतीचीच असेल. मी त्याला त्याबद्दलही विचारलं होतं. तर म्हणे, "मला एवढीच परवडते!" मला आश्चर्यच वाटलं. काही वर्षांपर्यंत 'spare no expenses' हा मूलमंत्र होता त्याचा. मी कंजूष ती कंजूषच आहे.
ह्या लेखात ज्या निरागस ऐसीकराचा उल्लेख आलाय त्यांचा सुपुत्र आता गाडी चालवतो. आम्ही दोघं त्याच्याबद्दल बोलत होतो, तर म्हणे, "मी हवं तर तिकडे गाडी चालवत जातो. त्या मुलालाही 'स्टिक' वापरता आली पाहिजे! ही extinct होत चाललेली कला आहे... extinctला मराठीत काय म्हणतात?"
"लुप्त होत चाललेली ... पण हे जे काही आहे याला मराठीत कला म्हणत नाहीत." त्यानं सोयीसवडीनं फक्त लुप्त हा शब्द ऐकला.
तर हे असं आहे. बायडनमामा म्हणताहेत की २०३० का कधीपर्यंत सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक असायला पाहिजेत. म्हणजे दोन पिढ्यांनंतर अमेरिकेत कुणालाही 'स्टिक' वापरता येणार नाही अशी भीती त्याला वाटते.
हे सगळं लिहायला हरकत नव्हती, पण हे फार बोअर आहे!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
अमेरिकेत सीएनजीवर चालणारी सिटीबस हा प्रकार (म्हणजे, ज्या तुरळक ठिकाणीं सिटीबस हा प्रकार आहे, अशांपैकी काही ठिकाणीं) पाहिलेला आहे. पॅसेंजर कार्समध्ये मात्र हा पर्याय निदान माझ्या तरी ऐकण्यात वा पाहण्यात आलेला नाही.
बाकी, हायब्रिड, इलेक्ट्रिक वगैरे प्रकारांबद्दल तूर्तास मीही तितकासा उत्सुक नाही. मात्र, माझ्या उदासीनतेची कारणे तात्त्विक वगैरे नसून, (तूर्तास तरी आणि माझ्यापुरती तरी) व्यावहारिक स्वरूपाची आहेत.
संकल्पना म्हणून अर्थात दोन्ही चांगल्याच आहेत, आणि, पुढेमागे व्यवहार्य झाल्यासारख्या वाटल्यास (आणि त्या वेळेस मी मार्केटमध्ये असल्यास) विकत घेण्यास माझा तात्त्विक आक्षेप अर्थातच नसेल. परंतु तूर्तास तरी तशी परिस्थिती मला जाणवत नाही.
हायब्रिड हा प्रकार (जेव्हा मी माझ्यापुरता अॅनालाइझ केला, तेव्हा तरी) मला फारसा cost-effective वाटला नाही. म्हणजे, एक तर कॅमरीच्या किमतीत करोलाच्या साइझची गाडी घ्यायची. आणि एवढे करून, पेट्रोलच्या बचतीतून वाचलेले पैसे जरी जमेस धरले, तरी हिशेब जमल्यासारखा निदान मला तरी वाटला नाही. (Of course, I could be totally wrong, परंतु, मला तसे वाटले नाही.)
इलेक्ट्रिकचे म्हणाल, तर, उपलब्ध पर्याय काय आहेत? टेस्लाबद्दल, तेवढे पैसे गाडीत घालण्याची मला हौसही नाही, नि झेपणारही नाही. (आणि, to put it mildly, my financial priorities perhaps lay elsewhere.) नाहीतर मग दुसरी ती निस्सानची लीफ होती. (हल्ली दिसत नाही. बहुधा सरकारी financial incentives वगैरे बंद झाल्यावर लोकांचा इंटरेस्ट संपला असावा.) ही म्हणे एका चार्जमध्ये ८० मैलांच्या आसपास देत असे. ऑफिसच्या पार्किंगमध्ये सुविधा असल्यास तेथे चार्ज करायची, नाहीतर रात्री घरी चार्ज करायची. देशात चार्जिंग स्टेशन्सचे जाळे अद्याप (पेट्रोलपंपांच्या जाळ्याच्या तुलनेत) नगण्य आहे. शिवाय, पेट्रोलची टाकी जशी चटकन फुल्ल करता येते, तसे चार्जिंगचे होत नाही. आता, ही कोव्हिडची भानगड सुरू झाल्यापासून आजतागायत आमचे वर्क-फ्रॉक-होम असल्याकारणाने रोजचा कम्यूट नसतो, म्हणून तूर्तास ठीक आहे. परंतु, त्यापूर्वी माझा रोजचा वन-वे कम्यूट ३५ ते ४० मैलांचा असे. त्यात पुन्हा अटलांटाचे नेहमीचे यशस्वी बेभरवशाचे सदा-ग्रिडलॉक्ड ट्राफिक. म्हणजे, सकाळी घरून निघालेली गाडी एका चार्जमध्ये संध्याकाळी घरी परत पोहोचेलच, याची शाश्वती नाही. म्हणजे, माझ्या रोजच्या वापराकरिता मला कुचकामाची. अर्थात, वीकेंडला हिंडण्यासाठी किंवा संध्याकाळी घरापासून जवळच्या परिघात फिरायला अतिरिक्त गाडी म्हणून ठीकच आहे. परंतु मग, असले महागडे खेळणे हवेय कोणाला?
हं, उद्या जर का एका चार्जमध्ये २०० ते ३०० मैल देणारी बॅटरी निघाली, चार्जिंग स्टेशन्सचे जाळे पेट्रोलपंपांइतके विस्तीर्ण झाले, कदाचित चार्ज्ड बॅटरी विकत घेऊन ती गॅसच्या सिलिंडरप्रमाणे तेथल्या तेथे बदलण्याची काही सोय निर्माण झाली, आणि मुख्य म्हणजे, हे सगळे प्रकार किमान पेट्रोलच्या वाहनांच्या तुलनेत पुरेसे स्वस्त झाले (आणि त्या वेळेस जर मी बाजारात असलो), तर तेव्हा विचार करता येईलही कदाचित. तूर्तास तरी मला हा पर्याय (निदान माझ्यापुरता तरी) व्यवहार्य वाटत नाही.
नाही, पेट्रोलवर, पेट्रोलवाहनांवर माझे प्रेम वगैरे नाही. (आणि, पेट्रोल फार स्वस्त आहे, अशातलाही भाग नाही. किंबहुना, हे रशिया-यूक्रेन युद्ध भडकल्यापासून पेट्रोलही कैच्याकैच भडकले आहे.) मात्र, तूर्तास तरी मला त्याकरिता व्यवहार्य पर्याय दिसत नाही. पुढेमागे निर्माण झाला, आणि तेव्हा जर तो व्यवहार्य वाटला, आणि तेव्हा जर गरज भासली, तर तेव्हाचे तेव्हा पाहून घेऊ.
—————
(स्टिक हा प्रकार मी जो शिकलो, तो ही कला वगैरे लुप्त वगैरे होतेय, म्हणून वगैरे नव्हे, परंतु जवळपास तशाच कारणांतून. बोले तो, ही गोष्टदेखील आपल्याला जमली पाहिजे, अशा निव्वळ खाजेतून. आणि, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही (अर्थात, स्वतःची स्टिक असल्याखेरीज निदान अमेरिकेत तरी स्टिक शिकण्याची संधी सहजासहजी मिळत नाही), म्हणून रीतसर सेकंडहँड स्टिक विकत घेऊन. (म्हणजे, सुरुवातीस रीतसर ऑटोवर शिकलो, नि मग लायसन मिळाल्यावर नि त्यानंतर ऑटोवर काही काळ बऱ्यापैकी सराव झाल्यावर मग सेकंडहँड स्टिक विकत घेऊन ट्रायल-अँड-एरर पद्धतीने शिकलो.))
आता यापुढे मात्र स्टिक हा प्रकार पूर्णपणे लुप्त जरी झाला, तरी मला फारशी हळहळ वगैरे वाटणार नाही. (वय झाले! आणि, जी काही हौस होती, ती बऱ्यापैकी फिटून गेली.)
असो चालायचेच.
+०.५
मीही असाच विचार केला आणि चार दिवस ते चालवायचा प्रयत्न केला. ते काही जमेना. मग विचार केला, मी एवढी वर्षं भौतिकशास्त्र शिकले. आत्ता मला कुणी न्यूटनचे गतीचे नियम विचारले तर मी इंटरनेटवर शोधून ते सांगेन. मला ते समजलेले आहेत, वापरता येतात. नोकरीसाठी मुलाखती घेतानाही लोकांना सगळं पाठ असलं पाहिजे अशी अपेक्षा मी धरत नाही. मग गाडीसाठी जर ऑटोमॅटिकचा पर्याय असताना डोक्याला हा शॉट लावायचा कशासाठी!
त्यातून म्हणे अमेरिकेत फक्त २०% गाड्याच स्टिकशिफ्ट असतात. सगळ्या तऱ्हेच्या गाड्यांमध्ये ऑटोमॅटिकचा पर्याय येतोच. मग हा द्राविडी प्राणायाम कशाला? स्वतःला उगाच काय त्रास द्यायचा! सोडून दिलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
…
न्यूटनच्या नियमांचे एक वेळ ठीक आहे, परंतु इंटरनेटवरून वाचून स्टिकशिफ्ट शिकणे म्हणजे कॉरस्पाँडन्स कोर्स करून पोहण्यासारखे आहे.
इन एनी केस, तेव्हा माझे वय २७ वगैरे होते. आणि एकटा होतो, लग्नबिग्न झालेले नव्हते. तेव्हा जर खाज म्हणून शिकलो नसतो, तर… आजमितीस मी नक्कीच स्टिकशिफ्ट घेणारही नाही आणि शिकण्याचा प्रयत्नही केला नसता. (घ्यायची म्हटले असते, तरी बायकोने व्हेटोचा अधिकार वापरला असता, ही गोष्ट वेगळी. Which kind of makes sense… घरातली कोठलीही गाडी वेळप्रसंगी घरातल्या गाडी चालवू शकणाऱ्या कोणालाही चालविता आली पाहिजे. भले घरात कितीही गाड्या असल्या, आणि प्रत्येकजण आपापली एकच designated गाडी चालवीत असला/ली, तरीही. घरातला फक्त एखादाच चालवू शकतो, अश्या गाडीत पैसे अडकविण्यात काय हशील आहे? आणि तेही काही गरज नसताना? (मध्यंतरी चारएक वर्षांचा काळ असा होता, जेव्हा मी तिची गाडी चालवू शकत होतो, परंतु ती माझी चालवू शकत नव्हती. That was before I got rid of my old stick shift and got a new automatic vehicle. आणि मुद्दाम तेवढ्यासाठी तिने फाइट मारून स्टिकशिफ्ट शिकण्याचा प्रयत्न करण्याची गरज काय?))
शिवाय, अटलांटाच्या ट्राफिकमध्ये स्टिकशिफ्ट चालवणे हा तसाही अकाली केवळ केसच पिकवण्याचा नव्हे, तर शरीर आणि मेंदू झिजवण्याचाही प्रकार आहे. आमचे केस पिकवायला आम्हाला तसेही काही कारण लागले नव्हते, तर हे जास्तीचे का घ्या?
कधीचे स्टॅटिस्टिक आहे हे? (पंधरावीस वर्षांपूर्वी असतीलही. आजमितीस – मी याचा अभ्यास केलेला नाही, परंतु – तितक्याही सापडतील की नाही, याबद्दल मी साशंक आहे.)
हा!
बरा अर्धा इंटरनेटवरूनच स्टिकशिफ्ट चालवायला शिकला. त्यानं आधी नवीकोरी गाडी डॅलसमध्ये विकत घेतली आणि ती तीन तास चालवत घरी आणली.
पण माझा रोख त्याकडे नव्हताच. तोचतोचपणा असणारी कामं यंत्रं करत असतील, आणि ती यंत्रं मला परवडत असतील तर मी यंत्रं वापरेन. स्वतःला शिणवणार नाही. मग ते काम मेकॅनिकल असो वा रट्टे मारण्याचं!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कालमहिमा!
मी जेव्हा स्टिकशिफ्ट चालवायला शिकलो, तेव्हा इंटरनेट हा प्रकार (असलाच, तर) अत्यंत बाल्यावस्थेत होता. (अगदी अमेरिकेतसुद्धा) फारसा प्रचलित नव्हता. (युनिव्हर्सिटी कँपसेसवरच्या विद्यार्थ्यांना वगैरे युनिव्हर्सिट्यांतर्फे ॲक्सेस नि स्वत:ची ईमेलखाती वगैरे असत, परंतु युनिव्हर्सिट्यांबाहेरच्या अफाट विश्वात इंटरनेटचा प्रसार नगण्य होता. मी ज्या कंपनीत तेव्हा कामाला होतो, त्याच्या डायरेक्टरच्या खात्यावरून आम्ही ॲक्सेस करत असू. कधी युनिव्हर्सिट्यांत पडीक असलेल्या जुन्या मित्रांना ईमेली वगैरे पाठविल्या, तर त्या आमच्या डायरेक्टरच्या नावाने जात; मजकुरात स्पेसिफाय करावे लागे, की अबे साले मैं हूँ|) वेबसाइटी वगैरे विशेष नसाव्यात; ब्राउझर हा प्रकारदेखील फारसा प्रचलित नसावा. यूज़नेट नावाचा एक (आता बहुधा बाद झालेला) प्रकार असे. त्यावर विविध विषयांचे ग्रूप्स असत, त्यावर लोक पोष्ट करीत. (त्याकरिता एक वेगळे रीडर ॲप मिळे.) कनेक्शन डायलअप. काय स्पीड असत, परमेश्वराला ठाऊक. (त्यानंतर काही वर्षांनंतर वेबसाइटी, ब्राउझर्स, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू वगैरे प्रकार सर्रास नि लोकप्रिय झाल्यानंतरसुद्धा बरीच वर्षे डायलअपचीच सद्दी होती. सुरुवातीला २८.८, मग ३३.काहीतरी, नि मग ५६.काहीतरी केबीपीएस वगैरे स्पीड मिळाल्यास आभाळाला हात पोहोचले, अशी परिस्थिती होती. घरोघरी ब्रॉडबँड वगैरे प्रकार बऱ्याच नंतर आला.) गूगलसर्चही नव्हते.
तर अशा परिस्थितीत, यूज़नेटवर कोणीतरी कधीतरी कोठल्यातरी चर्चाधाग्यातून 'स्टिकशिफ्ट कशी चालवावी' याचे सखोल ज्ञान पाजळलेले असणे अशक्य जरी नसले, तरी (१) तशी शक्यता कमी होती, आणि (२) पाजळलेले असल्याससुद्धा, ते आम्हांस सापडण्याची शक्यता नगण्य होती.
त्यामुळे, आम्ही त्या संधीस मुकलो. नि मग 'अपना हाथ जगन्नाथ'वर भागवावे लागले. काळाची गरज, दुसरे काय!
ऑटोमॅटिक आणि स्टिकशिफ्ट
माझ्याकडे ऑटोमॅटिक आहे. पण मला काही अपरिहार्य कारणांने ऑटोमॅटिक आणि स्टिकशिफ्ट अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या अधूनमधून चालवाव्या लागतात. ते ट्रांझिशन ट्रिकी असलं, तरी फारतर ५ मिनिट लागतात सवय व्हायला. वर्षभर पूर्णपणे ऑटोमॅटिक वापरल्यानंतर मला एकदा अचानक पुणे - कोल्हापूर प्रवास स्टिकशिफ्ट वापरून करावा लागला होता. तेव्हाही मी व्यवस्थित स्पीडनं,एकदाही बंद न पडता आणि सगळ्या प्रवाशांना सुखरूप ठेवून ती चालवू शकले होते.
####
आता नबा लगेच "तुम्ही ४० किमी/तास वेगाने चालवत असाल" वगैरे म्हणतील. पण तसं नाही. हायवे ८० -१२०. कधी कधी मामा लोकांची प्रेमपत्र येतात नंतर. हल्ली भारतात पोलिसांकडे काहीतरी यंत्र असतं. त्यातून गाडीची प्लेट स्कॅन केली की आपण कुठे कुठे काय काय गुन्हे केले आहेत ते त्यांना दिसतं. एकदा मी माझ्या घराच्या जवळच्या सिग्नलवर थांबले होते. तेव्हा समोरून एक पोलिस आला आणि मला म्हणाला,
"मॅडम तुम्ही १९ नोव्हेंबरला धुळ्यात होतात का?" यावर मी त्याला
"अय्या! तुम्हाला कसं कळलं?" असं विचारलं होतं.
आपली मैत्री संपली!
तुला स्वयंपाक आवडतो, हौशीनं साड्या नेसतेस, आणि वर स्टिकशिफ्ट चालवू शकतेस. मला आठवड्यातून एकदा जुन्या नोकरीतल्या, आणि आवडणाऱ्या मित्र-मैत्रिणींबरोबर लंचला जाण्यासाठी ऑटोमॅटिक गाडी चालवायचा कंटाळा येतो.
आपली मैत्री खतम! काही बेसिसच नाही आपल्या मैत्रीला!!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
…
मुळीच नाही. उलट, उच्च वेगात, हायवेवर वगैरे, स्टॉल होण्याची शक्यता (अचानक कचाककन ब्रेक दाबून गाडी एकदम कमी स्पीडवर आणावी लागल्याखेरीज वगैरे, आणि तेव्हासुद्धा ब्रेकसोबत क्लचसुद्धा दाबायचे विसरल्यासच, वगैरे) तुलनेने फारच कमी. चौथ्यापाचव्या गियरमध्ये स्पीड मेंटेन करताना शक्य तोवर स्टॉल होऊ नये. स्टॉल होण्याची शक्यता उलट खालच्या गियरमध्ये (त्यातही बहुतकरून स्टॉप-अँड-गो सिटी ट्राफिकमध्ये) वगैरे अधिक असावी, नाही काय?
>>>अचानक कचाककन ब्रेक दाबून
>>>अचानक कचाककन ब्रेक दाबून गाडी एकदम कमी स्पीडवर आणावी लागल्याखेरीज वगैरे, आणि तेव्हासुद्धा ब्रेकसोबत क्लचसुद्धा दाबायचे विसरल्यासच, वगैरे
दुर्दैवानं असं भारतात, मुंबई-बंगलोर हायवेवर होतं अजूनही. विशेषतः साताऱ्याच्या आधीचा पट्टा. तिथे प्रचंड खड्डे आहेत आणि सर्व्हिस रोड आणि मूळ हायवे यांचा बेमालूम संगम होऊन कुणीही अचानक सामोर प्रकट होऊ शकतं.
वेगात क्रूज करत असताना सतत ही ऑटोमॅटिक नाही अशी स्वतःला आठवण करावी लागते. पण तुम्ही म्हणता तसा क्लच ब्रेकचा गोंधळ फार कमी वेळा झाला आहे. मला फक्त ही ऑटोमॅटिक नाही हे मी विसरून जाईन अशी काळजी वाटते सतत.
भारतात CVT आणि AMT अशा दोन प्रकारची transmission असलेल्या गाड्या मी चालवल्या आहेत. पैकी AMT फारच वाईट आहे. त्यापेक्षा स्टिकशिफ्ट चालवावी.
@अदिती
मी लायसन काढलं तेव्हा ऑटोमॅटिक गाड्या फार पॉप्युलर नव्हत्या. भारतात परत आल्यावरही मी घेतलेली पहिली गाडी मॅन्युअल होती. त्यामुळे स्टिकशिफ्ट येणं ही काळाची गरज होती.
CVT आणि AMT बाबत सहमत.
CVT आणि AMT बाबत सहमत.
घरात दोन्ही आहेत. AMT पेक्षा सरळ गियरवाली घ्यावी.
CVT आणि AMT बाबत मला मत
CVT आणि AMT बाबत मला मत व्यक्त करता येणार नाही. असे विषय निघाले की घरी ह्या चर्चा होतात ...
"मी चालवते त्या गाडीला काय आहे?"
"CVT."
"उद्या दुपारी मी जेवायला नाहीये. तुझ्यासाठी बाहेरून आणायचं का तुझं तू बघशील?"
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
AMT?
AMT हा नक्की काय प्रकार आहे?
विकीवर पाहिले, त्यावरून नीटसा बोध झाला नाही, परंतु, मॅन्युअल शिफ्टिंग मात्र क्लच नाही, असा काहीतरी अर्धवट प्रकार असावा, अशी धारणा झाली. (माझी समजूत बरोबर आहे काय?)
तसे असल्यास, असला काही प्रकार उत्तर अमेरिकेत निदान माझ्या तरी ऐकण्यापाहण्यात आलेला नाही.
मी जे पारंपरिक ऑटोमेटिक ट्रान्समिशन म्हणतोय, ते P-R-N-D-2-L (किंवा P-R-N-D-L, P-R-N-(D)-D-2-L, किंवा तत्सम) configuration असलेले. ज्याच्यात चालकाला सामान्यतः गाडी पार्क करताना P, रिवर्स घेताना R, फक्त tow करताना किंवा ढकलताना वगैरे N, आणि पुढे जाताना D (किंवा (D) = D with overdrive हा पर्याय उपलब्ध असल्यास तो) यांव्यतिरिक्त कोणत्याही पर्यायाचा विचार करावा लागत नाही, आणि चालविताना गियर स्वतः बदलावे लागत नाहीत. (ते ऑपॉप बदलले जातात.) जे अतिरिक्त पर्याय असतात (3, 2, L वगैरे), ते प्रत्यक्षात चालू गियरचे आकडे नसून, कोणत्या टॉपमोस्ट गियरपर्यंत गियर ऑपॉप बदलले जाऊ शकतात, त्यावर मर्यादा आणण्यासाठी असतात. सामान्यतः ते कधीही वापरावे लागत नाहीत; मात्र, अतिचढाच्या/अतिउताराच्या/वळणावळणांच्या रस्त्यांवर वगैरे क्वचित्प्रसंगी ते गाडीवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण राखण्याकरिता उपयुक्त ठरू शकतात.
(सीव्हीटीचेही बाह्य configuration याहून फारसे वेगळे नसते (आणि त्यामुळे, वापरणाऱ्याच्या दृष्टीने ‘पारंपरिक’ ऑटो ट्रान्समिशन आणि सीव्हीटी यांच्यात काहीही फरक पडू नये). मात्र, अंतर्गत यंत्रणेत सीव्हीटीमध्ये दुसरा गियर, तिसरा गियर असे ठराविक (fixed) टप्पे नसून, असंख्य वेगवेगळे gear ratios असतात, नि ते गरजेप्रमाणे वापरले जातात, नि त्यामुळे, सीव्हीटी हा प्रकार ‘पारंपरिक’ ऑटोमेटिकच्या तुलनेत अधिक कार्यक्षम असतो, अशी थियरी आहे.)
==========
(अवांतर: यावरून एक राजकीय विनोद आमच्या येथे प्रचलित आहे:
Voting is like Driving: To go Forward, choose D; To go Backward, choose R.)
AMT
मी याबद्दल काहीच वाचन केलेलं नाही. फक्त ड्रायव्हिंग केलं आहे. AMT आणि CVT मध्ये दर्शनी फरक म्हणजे AMT का एक "M" नावाचं ऑप्शन असतं स्टिकशिफ्टवर. ते काय असा अशा उत्सुकतेनं गाडी त्या मोडवर टाकल्यावर काही फरक पडला नाही. पण AMT जेव्हा ड्राईव्ह मोडवर असते तेव्हा वेग वाढेल तसे गियर बदलताना एका गियरमधून दुसऱ्या गियरमध्ये जाताना पिकप मार खातो. हेच जर क्लच वापरून manually केलं तर ड्रायव्हरच्या स्किलनुसार पिकप मार खातो किंवा खात नाही.
पण दोन गियरच्या मध्ये असं होणं, अगदी काही क्षणांसाठी का असेना, is a big buzzkill.
?
पुढेमागे जमल्यास फोटो डकविता येईल काय?
फोटो
https://www.cars24.com/blog/amt-gearbox-automated-manual-transmission/
फोटो आणि एएमटी नक्की काय आहे हे इंटरनेटवरच मिळालं.
एम + आणि एम - म्हणजे मॅन्युअल मोड आहे. + कडे गेलं की वरचा गियर आणि स्पीड घेता येतो आणि - मध्ये खालचा.
अज्ञानातला आनंद.
हेच, हेच ते अडाणीपण, ज्यामुळे मला वरचा प्रतिसाद अजिबात समजलेला नाही. त्यामुळे असले विनोद करता येतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?
वस्तुत:, हे तर अत्यंत सामान्य प्रतीचे ज्ञान आहे. अग्निबाणशास्त्र नव्हे, तथा खगोलशास्त्राच्या विद्यावाचस्पतीच्या पातळीचे तर नव्हेच नव्हे.
असो चालायचेच.
का पण?
हे असं काही खगोलशास्त्रात शिकावं लागत असेल असं तुम्हाला का वाटतं/वाटलं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असे कसे?
या गियरांच्याच संदर्भात काहीतरी प्लॅनेटरी गियरसेट की कायशीशी संज्ञा ऐकली होती खरी. (अर्थ, तपशील परमेश्वरास ठाऊक.)
मला वाटले, तुमच्या खगोलशास्त्रात असले काहीतरी शिकवत असतील, Applied Astronomy म्हणून. (आमचे एक वेळ सोडून द्या, परंतु, ख.शा.च्या एवढ्या वि.वा. असूनसुद्धा तुम्हाला एवढा शिंपल प्लॅनेटरी गियरसेट ठाऊक नाही?)
हॉय गे हॉय...
पण तू किती गुणी आहेस! आणि हे बघून मला लाजही वाटत नाही. कसं जमणार आपलं...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे पहा
असं कुणी गुणी बिणी म्हणू लागलं की ते ट्रोलिंग आहे हे मला लगेच समजतं. एवढीही मी हे नाही.
.
मी हे वाचलेलं नाही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त लेख
मस्त झालाय लेख"
गाडी घेणे" ह्या एका वाक्याचा विषयावर मस्त लिहले आहे.
आणि जे वाटतं स्वतःला तेच lihle आहे.त्या मुळे कृत्रिम पना नाही,उगाच सल्ले नाहीत.
Phd करणारी लोक म्हणजे कोणताही विनोदी विषय पण गंभीर शब्दात लीहणारे
गंभीर लोक असा समज होता.
पण ही phd ,doct करणारी लोक सुद्धा अशी मजेशीर पने आयुष्याकडे किंवा कोणत्या ही विषयाकडे बघतात असे समजायला हरकत नाही
गाडी चा रंग आणि गाडी च आकार ह्या वरून तुम्ही गाडी ची ओळख ठरवता.
तसा च एक ड्रायव्हर आमच्या कंपनीत आहे.
त्याला कुठे पाठवायचे असेल तर फक्त area सांगायचं.
आणि व्यक्ती चे नाव .
बिल्डिंग पर्यंत कसे पोचायचे हे वेगळ्या भाषेत सांगायला लागते.
पिवळ्या रंगाची बिल्डिंग दिसली की लेफ्ट घ्या समोर लाल रंगाचे कंपौंड असेल त्याच्या उजव्या बाजूला मोठ्या खिडक्या असलेला बंगला आहे त्याच्या पुढची तांबडा रंग दिलेली बिल्डिंग.
असा adress सांगितला तर च त्याला समजतो.
कालच्या गप्पा.
"तू नेहमी ज्याला पाणी द्यायला सांगतेस, काल तो स्वतःच व्हिस्की घेऊन आला होता."
याची पार्श्वभूमी अशी की बरा अर्धा ज्या यूट्यूब चॅनलवर 'रीसर्च' करतो, तो माणूस खूप बोलतो. कदाचित खूप बोलत नसेलही, पण बरा अर्धा त्याचे व्हिडिओ दीडपट वेगात लावून ऐकत असतो. मी एकीकडे टंकून टवाळक्या करत असते किंवा काही. तेव्हा मला तो व्हाईट नॉईज हवासा असतो. मला वाटतं की तो माणूस फार बोलतो. एकदा मी पाणी प्यायला उठले आणि बऱ्या अर्ध्यालाही बाटली दिली. त्याची तपश्चर्या भंग पावल्यामुळे तो वैतागला. मी म्हणाले, "तुला नाही रे, त्याला पाणी दे. तो खूप बोलतोय."
त्या माणसाचा आवाज ऐकला की मी न चुकता 'पाणी विचार त्याला' म्हणायला लागले. मग बरा अर्धाच म्हणायला लागला, "त्याला दिलंय पाणी. तू तुझं काम कर."
आता मला आणखी बोलणं भाग होतं. पुरुष इंजिनियर बोलण्यात माझ्या पुढे कसा जातो! मग मी सुगृहिणी व्हायचं ठरवलं. "तो एवढा ओळखीचा आहे. आता फक्त पाणी कसलं पाजतोस? चहा-कॉफी विचार त्याला!" ही मोठी चूक होती. "तुला हव्ये कॉफी? आपण कॉफी पिऊ या," असं उत्तर आलं.
आता तो जोक घासून गुळगुळीत झाला, आणि बंद झाला. काल आठवडी खरेदीला जाताना अचानक बरा अर्धा म्हणाला, "तो पाणी पिणारा यूट्यूबर आहे ना... त्याची आवडती गाडी सुबारूनं बंद केली. म्हणून तो काल त्याच्या आठवडी व्हिडिओत व्हिस्की घेऊन आला होता!"
बरा अर्धा आता माझ्या पुढे गेला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पाणिग्रहण
...असं उगाच का म्हणतात त्या संस्काराला?
:-D
चुकूनही निराशा करत नाहीस!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
...
(
स्वत:स मेनका भासविण्याचा हीन आणि हिडीस प्रयत्न, म्हणणार होतो, परंतु... जाऊ दे!)(रहमान मला एरवी आवडत नाही, परंतु, त्याचे 'उर्वशी, उर्वशी, टेक इट ईझी, उर्वशी' हे गाणे उगाच आठवून गेले.)
हम्मा
बऱ्या अर्ध्याला 'हम्मा' गाणं आवडतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमच्या
आमच्या नातेवाईकांत एक बाई होत्या. त्या कायम क्रिप्टिकच बोलायच्या. त्या हजरजबाबीही होत्या. त्यामुळे प्रत्येक संभाषणात त्यांच्या स्मार्टनेसची चुणुक दिसेल याची त्या विशेष काळजी घ्यायच्या. पुढे पुढे आम्हाला बऱ्याच जणांना याचा कंटाळा आला. पण मामींना सांगणार कोण ? कारण त्या मुलखाच्या फटकळही होत्या. एके दिवशी, एका समारंभात त्या, ' दमले गं बाई' म्हणत खुर्चीवर टेकल्या होत्या. मी जाऊन त्यांना विचारलं, का हो, सततचं असं बेअरिंग सांभाळण्याचं टेन्शन येत असेल नै तुम्हाला?' कधीतरी जरा आमच्यासारखा बाळबोध बावळटपणा करुन पहा की! किती रिलॅक्स्ड वाटतं बघा. त्यानंतर या बाई कुठल्याही समारंभात मला टाळायच्या.
असे कसे?
हे जग ही एक रंगभूमी आहे. आपण सर्व त्यातील पात्रे आहेत.
आता, प्रत्येक जण पात्र आहे (किंवा, पर्यायाने, पात्रच आहे), म्हटल्यावर, प्रत्येक पात्राला आपापले बेअरिंग आलेच, नाही काय? (तुम्हाला आहे, मला आहे, तसेच त्यांनाही आहे!) आणि, प्रत्येक पात्राने आपापले बेअरिंग सांभाळायलाच हवे, नाही काय? (न सांभाळून सांगता कोणाला?) मग त्याचे टेन्शन घेऊन कसे चालेल?
जो भूमिका लिहितो, तोच बेअरिंग सांभाळण्याचे धैर्यही देतो बघा.
आणि, जे जगात, तेच ‘ऐसी’वरही. (नाहीतरी, ‘ऐसी’ हीसुद्धा एक रंगभूमीच नव्हे काय? आणि आपण सर्व इथली लुटुपुटीची पात्रेच नव्हे काय?)
(ते राजेश१८८भाऊ पाहा. ते घेतात काय कधी टेन्शन, आपले बेअरिंग सांभाळण्याचे? तसे पाहिजे. In an odd way, I admire that character.)
(प्रेरणास्रोत: ब्रँडीचे (अद्याप) दोनतीन(च) घोट. In vino veritas!)
हे फक्त इथेच लिहू शकतो
हे फक्त इथेच लिहू शकतो कारण येथील सभासद
ते समजू शकतात त्यांची बौध्दिक कुवत आहे.
येथील सभासद लोकांना भावना आहेत.
वेळ पडली तर स्वतःची मत बाजूला ठेवून योग्य मताला पाठिंबा देणारी आहेत
माणसाने जसे हवं तसे राहावे.
कोणत्या ही विषयावर जास्त विचार करून मत व्यक्त करण्याची गरज नाही.
स्वतः जो विचार करत आहात तेच व्यक्त व्हा.
प्रतेक व्यक्ती मध्य
.
बालिश पना,मूर्ख पना,गैर समज, फक्त समज असतात ते सर्व सोडा आणि जे वाटतं ते व्यक्त व्हा खूप बरं वाटतं.
फक्त उदा.
येथील सभासद खूप समजदार आहेत ते अर्थ समजतील च.
मला हाताने मसाला डोसा खायला आवडतो .पण लोकांना बर वाटावे म्हणून चमचा वापरून मसाला डोसा खाण्याचा प्रयत्न करून .
हाताने मसाला डोसा खाण्याचा आनंद हरवायची माझी इच्छा नाही.
खूप सुख असते जसे आहात तसेच राहण्यात.
खरं म्हणजे पहायची तरी कशाला?
मी आजवर नेहमीच दुसऱ्या कुणी चालविलेल्या चारचाकीतूनच प्रवास केलेला आहे. सारथ्य करण्याची वेळ, प्रसंग, योग आजपर्यंत कधी आला नाहीये.
मी रंग, रूप पाहूनच ते वाहन चांगले अथवा वाईट आहे असे मत देते.
फोटोतील तुमची कार चांगली दिसते आहे.
(ती मांजर आत डोकावून काय बघते आहे?)
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
अप्राप्य
तिला काय! दिसली खिडकी की डोकावायचं. दिसलं भगदाड की आत घुसायचं. काही अप्राप्य आहे अशी शंका आलेली मांजरांना पुरते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ती लांबडी, बससारखी गाडी
ती लांबडी, बससारखी गाडी
हाहाहा होय लिमोझिन म्हणतात कसली शेपलेस असते ना!!! काय मेलं कौतुक तिचं. हां आणि
हिअर्सहीहर्स करतात तिची.मस्त जमलाय लेख.
काय गं तू सॅन अँटॉनिओत आलीस व मी नव्हते. आपण भेटलेलो आठवतं?
लेख आवडला. ते टॉर्क आणि मायलेज मलाही बोअर होतं. रंग हाच एकमेव निकष.
?
तुम्हाला बायेनीचॅन्स हर्स म्हणायचे आहे काय? (शवपेटिका वाहून नेणारी शकटिका?)
(नशीब हिअरसे नाही म्हणालात...)
होय होय हर्स!!
होय होय हर्स!!
:-)
तशी मला 'मिनी कूपर'सुद्धा आवडत नाही. डुक्कर आठवतं मला ती बघून. छोटी गाडी हवी, पण एस्टीसारखी खडखडणारी नको, आणि पेट्रोल पिणारी नको, विजेवर चालणारी मिळाली तरच खरी, वगैरे अपेक्षा असल्यामुळे सध्या आहे ती जुनीच गाडी वापरते मी. तशीही ती आठवड्यातून फार तर दोनदा वापरली जाते, फार तर १५ मैल चालते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
व्होल्ट घे. आमची गेली ८ वर्षे
व्होल्ट घे. आमची गेली ८ वर्षे आहे. छान चालते.
तीव्र मतभेद
I, personally, would not be seen dead in a ditch in a Chevy. माझ्या आयुष्यातली माझ्या पूर्ण मालकीची पहिलीवहिली सेकंडहँड स्टिकशिफ्ट गाडी जरी शेव्ही (१९८६ मॉडेल) असली (आणि, ती (तुलनेने) तशी ठीकठीक निघाली), तरीही.
त्यापेक्षा मी एक वेळ हंडाई किंवा कियामध्ये खड्ड्यात मरून पडलेला सापडणे पसंत करेन. (म्हणजे, तेही शक्य तोवर नाहीच, परंतु तरीही.)
जनरल मोटर्स… अऽघ! (केवळ पोलीस/रेंटल कंपन्या वगैरेंमध्ये fleet sales आणि मूठभर पांढऱ्या थेरड्यांच्या देशभक्तीसंबंधीच्या चुकीच्या कल्पना यांच्या आधारावर कशीबशी टिकून असलेली कंपनी.)
(माणसाने शक्य तोवर जपानी (त्यातही शक्य तोवर होंडा/टोयोटा/निस्सान१ या त्रयींपैकी) किंवा परवडत असतील तर युरोपियन गाड्या घ्याव्यात; दुसरे काहीच परवडत नसेल, तर केवळ मजबूरी का नाम म्हणून कोरियन गाड्या घ्याव्यात; अमेरिकन गाड्यांना शक्य तोवर हात लावू नये, परंतु, लावायचा झालाच, तर फोर्ड/क्राइसलर एक वेळ चालतील – क्वचित्प्रसंगी एखाददुसरे इन द शॉर्टर रन ठीकठीक मॉडेल देऊ शकतात – परंतु, जनरल मोटर्सची संगत नको रे बाप्पा!, हे माझे वैयक्तिक, अल्पस्वानुभवाधारित इंप्रेशन आहे. (एके काळी फिरतीच्या नोकरीत अल्पकाळाकरिता वेगवेगळ्या ब्राण्डच्या रेंटल गाड्या खूप उडविल्या.) असो.)
—————
१ अॅक्युरा, लेक्सस, आणि इन्फिनिटी या अनुक्रमे होंडा, टोयोटा, आणि निस्सान यांच्याच लक्झरी प्रॉडक्ट लाइनी असल्याकारणाने, त्यांचा वेगळा उल्लेख केला नाही. शिवाय, ती म्हणजे ‘परवडत असतील, तर खुशाल घ्या’-छापाची प्रकरणे! अपने बस की बात नहीं।
शीर्षक बदलून
कोणती गाडी घ्यावी असे शीर्षक द्यावे.
केवढं हे RPM
मी अंमळ स्वतःच्या ढपणाची, आणि बरा अर्धा आणि माझ्या एकदम निराळ्या हौशींबद्दल काय लिहिलं, लोक गाड्यांसारखे पेटले. गाडीचं RPM एकदम खूप वाढवलं, की त्याला मी "गाडी पेटवणं" म्हणते. गाडीचा खूप आवाज येतो, एवढंच मला समजतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?????
तुम्ही, तुमचा ढपणा, तुमचा बरा अर्धा, तुमची मांजर, आणि तुमची नवीजुनी गाडी, यांच्यात इथे नक्की कोणाला रस आहे अशी तुमची समजूत आहे, की लोकांनी विषयास धरून तोलूनमापून लिहावे? मग काय, चावी मिळालेली आहे, तर घ्या हापसून!
आय मीन, गळते आहे, म्हटल्यावर लोकांनीच काय म्हणून त्यात मुतून घेऊ नये?
जरूर! Go for it!!
खूप RPM झालं म्हणून माझी काही तक्रार नसते. त्यात तक्रार करण्यासारखं काही असलं तर ते मला माहीतही नाही. लिहा की हव्या त्या विषयावर, हवं तेवढं!
मला अपेक्षा नव्हती, एवढंच मी राजेश१८८ यांना सांगायचा प्रयत्न करत होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हात् साला!
तुम्ही परवानगी दिलीत, म्हटल्यावर मजा गेली.
आता कंटाळा आला. आता दुसरे लीकेज शोधू.
हा हा हा!
मलाही शेव्ही वापरण्याची फार इच्छा होत नाही. फार 'अमेरिका, अमेरिका' केलं की नकोच होतं उलट. त्यामुळे आणखी काय चावी मारावी हे मलाही समजत नाहीये!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.