ट्रेनर्स ट्रेनिंग स्कूल

"भेंजो ही जाहिरात बघ. टीचर ट्रेनिंग कोर्सची."

"पेपरातली? क्लासिफाईड ॲडस् वाचणारा माझ्या माहितीतला तू एकटा माणूस असशील."

"ते सोड. पण टीचर ट्रेनिंग म्हणजे काय?"

"शाळेत नायतर काॅलेजात कसं शिकवायचं हे टीचर्सना शिकवत असतील."

"ओके. पण टीचर ट्रेनिंग कोर्समधे कसं शिकवायचं हे कसं कळणार? त्याच्यासाठी टीचर-ट्रेनर्स ट्रेनिंग कोर्स असला पाहिजे."

"आणि तो कोर्स कसा शिकवायचा यासाठी टीचर-ट्रेनर-ट्रेनर्स ट्रेनिंग कोर्स, वगैरे वगैरे? काहीही बोलतोस भेंजो!"

"ते सोड; पण याच्यावरनं एक आयडीया सुचली."

"चहात संपेल एवढी आयडीया आहे, का मिसळ मागवू?"

"मिसळच मागव. एनीवे क्वान्टिटी कमी केलीय हल्ली."

"डन. बोल."

"चांगला विद्यार्थी चांगला टीचर असेल असं नाही. म्हणून तर टीचर ट्रेनिंग कोर्स असतो."

"भेंजो पाच मिनटांपूर्वी तू विचारत होतास टीचर ट्रेनिंग म्हणजे काय?"

"हो. आता कळलं. तर ऐक. मोटर ड्रायव्हिंग स्कूल असतात त्यात शिकवणाऱ्या लोकांचं काय? ते भले उत्तम ड्रायव्हर असतील; पण ड्रायव्हिंग शिकवायचं कसं याचं प्रशिक्षण त्यांना द्यायला हवं ना?"

"मग?"

"मग तशी - ड्रायव्हिंग ट्रेनर्स ट्रेनिंग स्कूल काढायची. तू आणि मी शिकाऊ ड्रायव्हिंग ट्रेनर्सना शिकवायचं आणि चांगली फी घ्यायची."

"अरे पण काय शिकवायचं? ड्रायव्हिंग तर त्यांना येतंच!"

"तू नीट ऐकत नाहीयेस. मिसळ खा; मग डोकं काम करू लागेल. हां, तर सिलॅबस असा असेल.

१. तांत्रिक ज्ञान - दोन क्लचब्रेक असलेल्या गाड्यांचं इंजिनिअरिंग
२. भौगोलिक ज्ञान - रस्त्यांचे चढउतार आणि इतर टोपोलाॅजी, नाईट ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळा, पावसाचे आडाखे
३. ग्राहकराजा किंवा ग्राहकराणी - विद्यार्थ्यांशी कसं बोलावं, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा
४. स्वची जाणीव - आपण शिक्षकाच्या भूमिकेत आहोत, आता तरी ट्रॅफिक रूल्स पाळले पाहिजेत याचा साक्षात्कार"

"नॉट बॅड! पण पावसाचे आडाखे कशाला?"

"भेंजो पाऊस नाही पडला तर वायपरचा वायपर - आपलं, वापर - कसा शिकवणार?"

"फेअर पाॅईंट. आणि ट्रेनर्स म्हणून आपण त्यांना नंतर येतील अशा प्रॅक्टिकल चॅलेंजेसचीपण सवय करून देऊ. म्हणजे गाडी अगदी जोरात न्यायची नायतर पंधराच्या वर न्यायची नाही. किंवा उगाच हाॅर्न वाजवायचे. किंवा गाडी सारखी बंद पाडायची. किंवा मी गाडी शिकतोय तर तू मागच्या सीटवरून सल्ले द्यायचे."

"परफेक्ट!"

field_vote: 
0
No votes yet