एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती (भाग १)
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
सुधीर भिडे
('एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती' - ही नवी साप्ताहिक लेखमाला सुरू करत आहोत. या पहिल्या भागात विषयाची तोंडओळख करून दिली आहे.)

इंग्रज-मराठा युद्ध
सन १८१८मध्ये पेशवाईचा अंत झाला आणि इंग्रजांनी भारताच्या मोठ्या भूभागावर आपली सत्ता प्रस्थापित केली. ज्या काही संस्थानिकांना इंग्रजांनी सिंहासनावर ठेवले होते त्यांच्या हातात नाममात्र सत्ता होती. पुढच्या शंभर वर्षांत भारताच्या समाजात बदलांची सुरुवात झाली. १९२० साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि एका युगाचा अंत झाला. त्या सुमारास आणखी एका महानायकाचा उदय झाला होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा पुढच्या २५ वर्षांत तीव्रतेने लढला गेला.
सन १८१८पासून लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपर्यंत, या शंभर वर्षांच्या काळाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या काळात राजकीय बदल झाले नाहीत. इंग्रजांनी सत्ता प्रस्थापित केली होती आणि ती पुढची शंभर वर्षे तशीच राहिली. १८५७मध्ये भारताच्या काही भागांत अशांतता राहिली. पण ती अस्थिरता सुमारे दीड वर्षे राहिली.
राष्ट्राचा जीवन प्रवाह हजारो वर्षे चालू असतो. त्यात एखादे शतक असे येऊन जाते की त्या शतकात घडलेल्या घटना प्रवाहाची दिशाच बदलून टाकतात. उदाहरणार्थ, इंग्लंडच्या इतिहासात तेच एकोणिसावे शतक महत्त्वपूर्ण ठरले. या काळात व्हिक्टोरिया इंग्लंडची राणी राहिली. या राणीनंतर राजघराण्याची ताकद संपली. राणीच्या कालखंडाच्या शेवटी सत्ता इंग्लंडच्या लोकसभेच्या हाती गेली. राजघराणे आपल्या राष्ट्रपतीप्रमाणे राष्ट्रप्रमुख राहिले. त्या शतकाला इंग्लंडच्या इतिहासात 'व्हिक्टोरियन एज' असे समजले जाते. याच शतकात इंग्लंड ही जगातली महासत्ता बनली.
आपल्या देशातही एकोणिसावे शतक फार महत्त्वाचे ठरले. तसे पाहिले तर १९२० ते २०२० ह्या शतकातही भारतात खूप बदल झालेले आपण पाहातो, अनुभवतो. पण जरा खोलवर विचार केला तर हे लक्षात येते की विसाव्या शतकातील बदलांचा पाया एकोणिसाव्या शतकात घातला गेला. समाजरचना, राजकीय आणि शासकीय संस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, उद्योग, कला या सर्वच क्षेत्रांतील बदलांना एकोणिसाव्या शतकात सुरुवात झाली. तरीही १८१८ ते १९२० या कालखंडात १८५७चा उठाव सोडून जास्त काही घडले असे आपणास वाटत नाही. आपण कोणास विचारले की १८१८ ते १९२० या कालखंडात काय घडले तर बहुतेकांस १८५७चा उठाव आठवेल. ज्यांना वाङ्मयात रस आहे त्यांना आठवेल की केशवसुत त्या काळात होऊन गेले. ज्यांना शिक्षणक्षेत्रात रुची आहे त्यांना आठवेल की फुले यांनी (आणि नंतर टिळकांनी) त्या काळात शाळा चालू केली. समाजसुधारणांचा जे अभ्यास करतात त्यांच्या आठवणीत जोतिबा फुले आणि आगरकर येतील. अशा प्रकारे समाजाच्या निरनिराळ्या पैलूंचा विचार केला तर असे ध्यानात येईल की या कालखंडात समाजाच्या सर्वच पैलूंत बदलांना सुरुवात झाली. या सुधारणा आणि बदलांमुळेच आपला समाज २०२० साली प्रगत आपण स्थितीत पाहतो.
फ्रेंच इतिहासतज्ज्ञ मिशेल फुको यांचे म्हणणे असे, की इतिहासाचा अभ्यास करताना जिथे सलग प्रवाह खंडित झालेला दिसतो, अशा जागा शोधून त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. माझ्या मताप्रमाणे भारताच्या इतिहासात १८१८ ते १९२० हा काल अशी जागा होती जिथे अखंड प्रवाह खंडित झाला आणि प्रवाहाला नवीन वळण मिळाले.
लेखमालेची व्याप्ती
प्रस्तुत लेखन हे महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकाचा इतिहास नव्हे. पण समाजाच्या निरनिराळ्या पैलूंत काय बदल झाले, याचा आपण विचार करणार आहोत. या बदलांची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला समाजाची अठराव्या शतकातील स्थिती काय होती ते पाहावे लागेल. कारण १८१८ साली असलेली स्थिती आधीच्या शतकातील घटनांमुळे निर्माण झाली. त्या काळात धर्माला समाजात फार महत्त्व होते. यासाठी त्यानंतर त्या काळातल्या धर्माचे स्वरूप कसे होते ते पाहू.
या पार्श्वभूमीनंतर १८१८ ते १९२० या शतकात समाजाची स्थिती कशी होती; समाजात स्त्रियांचे आणि अस्पृश्यांचे स्थान काय होते; यांचा आधी विचार करू. त्यानंतर या क्षेत्रात काय बदल होत गेले ते पाहू. कोणत्याही समाजात बदलासाठी शिक्षण आणि पत्रकारिता कारणीभूत होतात. आपल्या समाजात या काळात शिक्षण आणि पत्रकारितेत काय बदल झाले? आपण साहित्य आणि कलाक्षेत्रांत नजर टाकली तर ध्यानात येते की या क्षेत्रांतही बरेच बदल झाले. याशिवाय या काळात उद्योगधंद्यांची काय स्थिती होती? धंद्याच्या वाढीस कारणीभूत दळणवळण आणि दूरसंचार यात काय सुधारणा झाल्या? सर्वांत शेवटी राजकीय आणि शासकीय संस्थांत काय बदल झाले ते पाहू. राष्ट्र आणि राज्य या निरनिराळ्या संकल्पना आहेत. १८१८ साली आणि १९२० साली भारताची या बाबतीत काय स्थिती होती याचाही विचार केला आहे.
या लिखाणाचा उद्देश काय?
थॉमस फ्रीड्मन नावाचे एक लेखक आणि विचारवंत आहेत. त्यांनी ग्लोबलायझेशन या विषयावर एक पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात – एकदा हा विचार डोक्यात आल्यावर मला या विषयावर पुस्तक लिहावयाचे होते कारण पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेत मी ग्लोबलायझेशन प्रक्रिया समजू शकेन. काही अंशी माझी तशीच स्थिती झाली. एकदा माझ्या बंधूंशी गपा मारत असता मी बोललो की एकोणिसावे शतक भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. या शतकात अनेक बदलांची सुरुवात झाली. त्यांनी मत व्यक्त केले की हा विषय चांगला विस्तारित करता येईल. मग या विषयावरील पुस्तकांचे वाचन चालू झाले. मिळालेल्या माहितीवरून जे निष्कर्ष निघाले ते म्हणजे हे लिखाण.
या विषयावर लेखनाचे दुसरे एक कारण आहे. १८१८ साली आपल्या समाजाची स्थिती होती. या विशाल देशावर एका परकीय व्यापारी कंपनीने आपले राज्य स्थापन केले होते. समाज अनेक जातींत विभागाला गेला होता. सामाजिक विषमता टोकाला गेली होती. स्त्रिया आणि अस्पृश्यांची स्थिती भयंकर होती. आधुनिक शिक्षण पद्धती अस्तित्वात नव्हती. शास्त्रीय दृष्टीचा पूर्ण अभाव होता. पुरोहितांनी २००० वर्षापूर्वीचे कायदे समाजावर लादून समाजाच्या प्रगतीची वाट पूर्णपणे बंद केली होती.
याचा अर्थ समाजाची तशी अवस्था झाली तर समाजाचा ऱ्हास होतो. त्यानंतर पुढच्या शंभर वर्षांत समाजात बदल होत गेले. आधुनिक शिक्षणाला सुरुवात झाली. समाजसुधारक पुढे आले ज्यांनी समाजाच्या वाईट प्रथांच्या विरोधात आवाज उठविला. त्या बदलांमुळे समाजाच्या स्थितीत सुधारणा होऊ लागली. ज्या कारणांनी समाजाची अवस्था खराब झाली त्या कारणांपासून समाजाने दूर राहिले पाहिजे. ज्या बदलांमुळे समाजात सुधारणा होऊ लागली ते बदल आत्मसात करून त्या बदलांचा वेग वाढविला पाहिजे.
प्रेझेंटिजम आणि हिस्टोरिसिजम
आपल्या विषयाला सुरुवात करण्याआधी 'ऐतिहासिक व्यक्तींच्या कामाचे मूल्यमापन करताना आजच्या युगातील नैतिक मूल्ये लावणे योग्य आहे का' हा विचार करणे आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यासक ऐतिहासिक व्यक्तींकडे दोन प्रकारे पाहू शकतो. ऐतिहासिक व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांचा विचार करताना आजच्या काळातील मूल्ये लावून परीक्षण करणे यास प्रेझेंटिजम असे म्हणतात. सध्याच्या मूल्यांचा विचार न करता इतिहासातील घटना त्यांच्या संदर्भात पाहणे यास हिस्टोरिसिजम असे संबोधले जाते.
प्रेझेंटिजममध्ये ऐतिहासिक व्यक्तींच्या वागणुकीला आजच्या काळातील नैतिक मूल्ये लावून त्या व्यक्तीची वागणूक योग्य की अयोग्य हे ठरविले जाते. आपण असे मानतो की नैतिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या आपण मागच्या काळापेक्षा फार सुधारलेले आहोत. मग साहजिकच ऐतिहासिक व्यक्तींच्या आयुष्यात असे काही प्रसंग दिसतात की जे निर्णय आजच्या काळात अयोग्य वाटतील. परंतु त्या ऐतिहासिक काळात त्या वेळच्या परिस्थितीत आणि त्या वेळच्या समाजात ते निर्णय घेण्यात आले होते याचा विचार व्हायला हवा. तसे पाहिले तर आजपासून दोनशे वर्षांनी आजच्या नेत्यांनी घेतलेले पुष्कळ निर्णय अयोग्य ठरू शकतील.
खाली दिलेली काही माहिती पहा.
- कांट नावाचा एक मोठा तत्त्ववेत्ता अठराव्या शतकात होऊन गेला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे स्त्रियांना तर्कशुद्ध विचार करता येत नाही.
- जवळजवळ शंभर वर्षे ऑस्ट्रेलियातील सरकारने त्या देशातील मूळ रहिवाश्यांची मुले त्यांच्यापासून हिसकावून घेऊन निराळी वाढविली.
- जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन या दोन्ही अमेरिकेतील नेत्यांकडे स्वत:चे गुलाम होते.
- इंग्रज नौदल सेनानी नेल्सन यांचा गुलामगिरीला पाठिंबा होता.
- इंग्रज नेते चर्चिल हे वंशवादी होते; भारतीयांना स्वातंत्र्य देण्यास त्यांचा विरोध होता.
- अगदी जुने उदाहरण पहायचे तर इजिप्त आणि रोम येथे गुलामगिरीची प्रथा होती.
वरील उदाहरणांवरून हे लक्षात येते की इतिहासात राजवटी आणि नेते यांची वागणूक काही वेळा आजच्या मूल्यांनुसार नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटते.
प्रेझेंटिजम आणि हिस्टोरिसिजम – काय बरोबर?
B.B.C World Histories Magazineच्या जानेवारी २०१८च्या अंकात 'ऐतिहासिक व्यक्तींच्या कामाचे मूल्यमापन करताना आजच्या युगातील नैतिक मूल्ये लावणे योग्य आहे का?' या विषयावर एक परिसंवाद प्रसिद्ध झाला. या परिसंवादात निरनिराळ्या इतिहासतज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते पाहता या विषयावर एकमत दिसत नाही. काही तज्ज्ञांचे असे मत दिसते की इतिहासात घडलेल्या चुकांवरूनच आपण शिकून सध्याची नैतिक मूल्ये बनली आहेत. परंतु इतिहासातील काही व्यक्तींच्या हातून काही अयोग्य घडले असेल तर आपण त्यावरून शिकलो म्हणून त्याविरुद्ध बोलू नये हे काही पटत नाही. स्वपन दासगुप्ता यांनी या विषयावर काय मत व्यक्त केले आहे ते पाहू. 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या २३ जाने २०२२च्या अंकात ते लिहितात – Despite noble attempts to be ruthlessly objective, the past is invariably seen through the prism of the present. That is why histories are constantly rewritten. हा विचार प्रेजेंटिजमकडेच बोट दाखवितो.
प्रस्तुत लिखाणात प्रेझेंटिजमचा वापर
प्रस्तुत लिखाणात असे संदर्भ आले आहेत ज्यांमध्ये काही ऐतिहासिक व्यक्तींविषयी नकारात्मक विधाने आहेत. कोणत्याही व्यक्तीसमुदायावर किंवा काही ऐतिहासिक व्यक्तींवर टीका करण्याचा या लिखाणाचा निश्चितच उद्देश नाही. या लिखाणात तीन ऐतिहासिक व्यक्ती आणि व्यक्तीसमुदायांवर काही आक्षेप घेण्यात आले आहेत.
- अठराव्या शतकातील पुरोहित वर्ग
- १८५७च्या उठावावेळी नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिका
- लोकमान्य टिळकांनी समाजसुधारणेच्या मुद्द्यांबाबत व्यक्त केलेली मते
अठराव्या शतकातील पुरोहित वर्ग दोन हजार वर्षांपूर्वी मनुस्मृतीत लिहिलेले कायदे समाजाला लावत होता. याचा अर्थ असा की दोन हजार वर्षे आपला समाज निद्रिस्त होता. दोन हजार वर्षांपूर्वी बनविलेले कायदे समाजाला लावणे योग्य पण दोनशे वर्षांनंतरची मूल्ये अठराव्या शतकातील पुरोहितांना लावणे अयोग्य हे कितपत बरोबर आहे?

राणी लक्ष्मीबाई
नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरुद्धा लढा दिला. परंतु भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा लढा होता का, हा प्रश्न निर्माण होतो. नानासाहेब पेशव्यांना बाजीरावांचे उत्तराधिकारी म्हणून मानधन हवे होते. राणी लक्ष्मीबाई यांना दत्तक मान्य करून हवा होता. यासाठी दोघांनी इंग्रजांकडे एकामागून एक अर्ज पाठविले. हे अर्ज न देता हा लढा दिला गेला असता तर तो स्वातंत्र्यलढा समजला गेला असता. जेव्हा संघर्ष अटळ दिसू लागला तेव्हा राणी लक्ष्मीबाई यांनी अतुलनीय धैर्य दाखविले आणि इंग्रजांशी लढतलढत प्राण दिले. असे म्हणता येईल की पळून न जाता प्राण देणार्या त्या एकमेव नेत्या होत्या. तरीही हा प्रश्न राहतोच, की ही लढाई देशाच्या स्वातंत्र्यासाठी होती की वैयक्तिक हक्कांसाठी होती.
टिळकांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. पत्रकारिता, शिक्षण, तत्त्वज्ञान, ज्योतिष, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. परंतु समाजसुधारणेच्या बाबतीत त्यांची मते पटत नाहीत. अर्थात त्यांच्या समाजसुधारणेच्या बाबतीत काही मतांमुळे त्यांच्या मोठेपणाला काही आंच येत नाही.
बुद्धांचे स्त्रियांविषयीचे विचार अनुदार होते. बुद्धानेही मनूइतकीच, कित्येकदा मनूच्याही थोडे पुढे जाऊन स्त्रीजातीची निंदा केली. स्त्री पुरुषाला मोक्षापासून तर मागे खेचतेच पण स्वत: कधी मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही यासारखे स्त्रीच्या संदर्भात बुद्धाने वेळोवेळी मतप्रदर्शन केल आहे. बुद्ध याचा अर्थ उच्च कोटीची ज्ञान प्राप्ती झालेली अवस्था. अशा ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धाने स्त्री जातीची निर्भत्सना केली आहे.
('महापुरुषांच्या नजरेतून स्त्री', मंगला आठलेकर, राजहंस प्रकाशन २०१८, पृष्ठ ३३ ते ३५.)
स्त्रियांविषयी बुद्धाचे मत अनुदार होते यामुळे भगवान बुद्धांचे मोठेपण नाहीसे होत नाही.
कालिदासचे एक वचन आहे : प्रायेण सामग्र्यविधौ गुणानां, पराङ्गमुखी विश्वसृज: प्रवृत्ति:॥
ब्रह्मदेव सर्व गुण एकाच व्यक्तीला देण्यास राजी नसतो. कालिदास असे सुचवितो की महान व्यक्तीत काही उणिवा दिसतात. यावरून हे लक्षात घ्यावे की इतिहासातील महान व्यक्तींचा आदर करून त्यांच्या चुकांवरून आपण शिकावे.
प्रस्तुत लिखाणात साउदॅम्पटन युनिव्हर्सिटीच्या शारलोट रायली यांचे मत ग्राह्य धरून लिखाण केले आहे –
इतिहासकारांचे काम हे असते की मिळालेल्या माहितीवरून त्या काळात लोक कसे वागले आणि तसे का वागले हे सांगणे. इतिहासकार ऐतिहासिक व्यक्तींची दुष्कर्मे शोधण्यास जात नाही. परंतु बर्याच वेळा काही ऐतिहासिक व्यक्तींचे काही विचार आणि वर्तणूक आपल्याला आजच्या नैतिक मूल्यांच्या विरोधी वाटते. याविषयी लिहिणे मला योग्य वाटते.
लिखाणाचे स्वरूप
ही लेखमाला २२ भागांत सादर केली जाणार आहे. प्रस्तुतीकरणाचे चार विभाग आहेत -
- अठराव्या शतकातील घटना, ज्यामुळे १८१८ सालातील स्थिती तयार झाली.
- एकोणिसाव्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक बदल.
- १८५७चा उठाव.
- एकोणिसाव्या शतकातील सांस्कृतिक, आर्थिक आणि शासकीय बदल.
निरनिराळ्या स्रोतांमधून वरील विषयांवर जी माहिती मिळाली ती नोंदविली आहे. वरील सर्व विषयांची माहिती संदर्भग्रंथ आणि शोधनिबंध यांतून घेतली आहे. जेव्हा संदर्भग्रंथांतील माहिती शब्दश: उद्धृत केली आहे तेव्हा अशी माहिती तिरप्या अक्षरांत – इटलीक्स – लिहिली आहे. हे लिखाण करीत असताना कोणत्याही मूळ कागदपत्राचा (primary source document) आधार मिळालेला / घेतलेला नाही. ते मला शक्यही नव्हते. मी जेव्हा असे म्हणतो की राणी लक्ष्मीबाईने या साली इंग्रजांना असे पत्र लिहिले त्यावेळी मी दुसर्या कोणाच्या तरी लिखाणाचा आधार घेत असतो. जर दिलेल्या संदर्भात चूक असेल तर ती माझ्या लिखाणातही आली. आधुनिक इतिहासलेखनाचे शास्त्र सांगते की मिळालेल्या माहितीवरूनच निष्कर्ष काढावेत. जेव्हा विषयाचा अभ्यास चालू केला त्यावेळी जी माहिती मिळत गेली त्या माहितीच्या आधारे प्रत्येक क्षेत्रात ती स्थिती कशी निर्माण झाली, काय सुधारणा झाल्या याचे निष्कर्ष काढले आहेत. माझ्या मताप्रमाणे ते निष्कर्ष अपरिहार्य आहेत. अजून माहिती मिळाल्यास आणि त्यामुळे निष्कर्ष बदली करणे जरूर आहे असे वाटल्यास तसे बदल मी जरूर करीन. लेखमालेत काही फोटो आणि नकाशे आहेत. ते इंटरनेटवरून घेतले आहेत.
लेखनात १८१८ ते १९२० हे एकोणिसावे शतक किंवा ही शंभर वर्षे असा उल्लेख केला आहे. अगदी काटेकोरपणे विचार करायचा तर ही १०२ वर्षे होतात. सामान्यत: शतक म्हणजे १८०० ते १९०० किंवा १९०० ते २००० असे समजले जाते. आपल्या विषयाकरिता एकोणिसावे शतक म्हणजे १८१८ ते १९२० हा काल. विचारात घेतलेला कालखंड – १८१८ ते १९२० असा आहे. परंतु विषयाच्या पूर्ततेसाठी १९२० नंतरच्याही काही घटना विचारात घेतल्या आहेत.
सर्व विचार महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला आहे. पण देशाच्या इतर भागांतही थोड्याफार फरकाने असेच बदल झाले. विवेचन महाराष्ट्रकेंद्रित आहे पण काही महाराष्ट्राबाहेर घडलेल्या प्रमुख घटनांचा आणि व्यक्तींचा उल्लेख केला आहे; जसे की १८५७चा उठाव. ही घटना प्रामुख्याने महाराष्ट्राबाहेर घडली परंतु पूर्ण देशावर आणि महाराष्ट्रावर या घटनेचे दूरगामी परिणाम झाले. या काळाचा विचार करताना एक गोष्ट नेहमी चर्चिली जाते ती ही, की त्या काळातले बदल आणि सुधारणा इंग्रजांच्यामुळे झाल्या का? किंवा उलटा प्रश्न असा की इंग्रज येथे आले नसते तर हे बदल शंभर वर्षांत झाले असते का? आपल्या येथील तत्कालीन राजांच्या मनोवृत्तीचा विचार करता हे बदल इंग्रजांशिवाय शक्य झाले असते असे वाटत नाही.
सन १८५७पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. १८५८नंतर इंग्लंडमधील पार्लमेंटने सत्ता हातात घेतली. पण लिखाणात मी सरसकट इंग्रज असा उल्लेख केला आहे. ज्या वेळेला इंग्लंडमधील घटनांचा उल्लेख आहे त्या वेळी इंग्लंड किंवा इंग्लिश असा शब्दप्रयोग केला आहे. लिखाणात काही इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. बॉम्बे प्रेसिडेंसी आणि महाराष्ट्र राज्य या दोन निराळ्या कल्पना आहेत. त्या प्रमाणेच इंपीरियल सेंट्रल कौन्सिलचा अनुवाद लोकसभा असा होऊ शकत नाही.
प्रसिद्ध करण्यात येणारे बावीस भाग खालीलप्रमाणे आहेत -
- एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १
- अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी – भाग २
- अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती – भाग ३
- अठराव्या शतकातील शासन यंत्रणा – भाग ४
- धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म – भाग ५
- अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप – भाग ६
- धार्मिक सुधारणांचे प्रयत्न – भाग ७
- समाजसुधारणा – दलितांचे प्रश्न – भाग ८
- समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न – भाग ९ आणि १०
- समाजातील बदल – भाग ११ आणि १२
- १८५७चा उठाव – भाग १३ आणि १४
- शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात – भाग १५
- संस्कृतिक क्षेत्रातील बदल – भाग १६
- आर्थिक संस्था आणि उद्योग – भाग १७
- शेती आणि दळणवळण – भाग १८
- सैन्य, आरमार आणि शस्त्रास्त्रे – भाग १९
- शासकीय संस्था – भाग २०
- राष्ट्र आणि राज्य – भाग २१
- राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्व – भाग २२
वाचकहो
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. लिखाणात आपल्याला काही चुका आढळल्यास, पुराव्यासह त्या जरूर दाखवून द्याव्यात. त्याप्रमाणे सुधारणा करता येईल. काही माहिती जास्तीची लिखाणात येणे जरूर आहे असे वाटले तर तसेही कळवावे.
पत्रव्यवहार sudhir.bhide@gmail.com वर करावा.
ऋणनिर्देश
माझे बंधु मेजर जनरल संजय भिडे यांनी मला या लिखाणाची प्रेरणा दिली. त्याशिवाय लिखाणात त्यांनी बहुमूल्य सूचना केल्या. माझी पत्नी डॉक्टर सुहासिनी भिडे ही नेहमीच माझी पहिली वाचक राहिली आहे. तिनेही बदल सुचविले. माझे मित्र बालमोहन लिमये यांनी बहुमोल सूचना केल्या आणि लिखाण प्रसिद्ध करण्यास उद्युक्त केले. या तिघांचे आभार. 'पुणे नगर वाचन मंदिरा'च्या कर्वेंनगर शाखेच्या सीमा ढगे यांनी मूळ वाचनालयातून मला या विषयावरची पुष्कळ पुस्तके आणून दिली. मनुस्मृतीच्या निरनिराळ्या प्रकाशनाच्या प्रती सौ. आशा उमराणी यांनी उपलब्ध करून दिल्या. 'ऐसी अक्षरे'च्या संपादकांनी प्रकाशनात पुष्कळ मदत केली. या सर्वांचे आभार.
पुढच्या भागात – भाग दोनमध्ये अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी आणि १८१८ सालाची राजकीय स्थिती याचा विचार करू.
(पुढील भाग)
लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.
सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण
वाह वा! या अतिप्रचंड
वाह वा! या अतिप्रचंड व्याप्तीच्या विषयाला हात घातल्याबद्दल आभार!
१) लेखांचे विषय / भाग सुसूत्रतेच्या सोयीसाठी केले आहेत हे उघड आहे. पण काही वेळा दोन विविध लेखांत आलेल्या गोष्टी एकमेकींच्या कारक असू शकतात. (उदा० विस्तारत्या रेल्वे जाळ्याचं पर्यवसान सांस्कृतिक साधनं व्यापक पटावर पसरण्यात झालं.) तर सोयीसाठी पाडलेल्या या विषयकप्प्यांमुळे हे अंतर्गत धागेदोरे दुर्लक्षित होणार नाहीत अशी आशा करतो.
२) "महाराष्ट्र" ही संकल्पना निर्माण व्हायच्या आधी या भूभागाला काय म्हणावं असा कायम प्रश्न असतो. दख्खन, बॉम्बे प्रेसिडेन्सी या सगळ्या शब्दांना आपापल्या मर्यादा आहेत. यावर कदाचित "मराठी भाषक प्रदेश" असं संबोधणे हा उपाय असू शकतो.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
"महाराष्ट्र" (सवांतर)
महाराष्ट्र हे एक (काही ठळक सीमा असलेले, बेळगाव नॉटविथष्ट्याण्डिङ्ग) राज्य/राजकीय एंटिटी म्हणून १ मे १९६० साली निर्माण झाले खरे, परंतु, 'महाराष्ट्र' ही (निश्चित भौगिलिक सीमा नसलेली) संकल्पना म्हणून खूप आधीपासून ('दख्खन'च्या आधीपासून नसेलही कदाचित, तरी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी'च्या तरी पुष्कळच आधीपासून) अस्तित्वात असावी.
'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा' वगैरे म्हणणारे समर्थ रामदास साधारणत: कोणत्या काळातले असावेत? (तेव्हा 'दख्खन' ही संज्ञा (निदान काही गोटांत तरी) प्रचलित/कंटेंपररी असावी. मात्र, 'बाँबे प्रेसिडेन्सी'च्या मुळाशी असलेल्या मुंबई प्रांताची सुरुवात ही मुंबई हे (दुसऱ्या चार्ल्साला १६६१ साली आंदण मिळालेले) बेट प्रस्तुत दुसऱ्या चार्ल्साने १६६८ साली कंपनीस भाड्याने देण्यापासून झाली, हे लक्षात घेता, 'बाँबे प्रेसिडेन्सी' ही संकल्पना तेव्हा एक तर अस्तित्वात तरी नसावी, किंवा असलीच तर गर्भावस्थेत असावी.)
बाकी, महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे, तर 'दख्खन' ही संज्ञा अतिव्याप्ती या दोषाची बळी ठरते, तर 'बाँबे प्रेसिडेन्सी' ही संज्ञा एकसमयावच्छेदेकरून अव्याप्ती तथा अतिव्याप्ती या दोन्ही दोषांच्या धनी ठरते. ('हैदराबाद दख्खन' या 'दख्खन'च्या भागाची कल्पना 'महाराष्ट्रा'त मी कोणत्याही निकषाने करू शकत नाही. तसेच, ('बाँबे प्रेसिडेन्सी'त नसलेला) विदर्भ हा महाराष्ट्रापासून वेगळा मानण्यास कितीही सबळ कारणे दिली गेली, तरी निदान तूर्तास तरी मी त्या ठाम निष्कर्षाप्रत पोहोचलेलो नाही, तथा ('बाँबे प्रेसिडेन्सी'तील) कराची अथवा एडन यांना 'महाराष्ट्रा'चा भाग मानताना, आणि पर्यायाने श्री. लालकृष्ण अडवाणी यांना 'मराठी माणूस' मानताना, माझ्या अंगावर शहारे येतात. तसेही, क्विंटेसेन्शियल कंटेंपररी 'मराठी माणसा'चा विचार करतानासुद्धा माझ्या अंगावर जेथे शहारे येतात, तेथे त्यात अडवाणींची भर कशापायी?) असो चालायचेच.
('महाराष्ट्र' संकल्पनेच्या अभावी 'मराठीभाषक प्रदेशां'त बेळगावची गणना करण्यास तुमचा पाठिंबा कदाचित असेलही, अथवा नसेलही, परंतु) झाशी, ग्वाल्हेर, इंदूर, बडोदे, गोवा (सर्व नावे मराठीबरहुकूम) या सर्व भूभागांत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आणि (कदाचित) प्रस्थापित 'मराठीभाषक प्रदेश' असावेत. (चूभूद्याघ्या.) त्यांची काय वासलात?
खुप मोठा विषय आहे
खुप मोठा विषय एकाच लेखात देण्या पेक्षा तुकड्यात दिला असता तर चर्चा करणे सोप गेले असते.
शक्य असेल तर अनेक भागात लेख विभागला जावा.
???
ही संपादकीय टिप्पणी लेखाच्या सुरुवातीलाच आहे.
ब्रिटिश राजवट ह्याचा उल्लेख आला
ब्रिटिश राजवट हा विषय आला की १९ वें शतकातील घटना ह्याचा विचार करून मत व्यक्त करणे शक्य च नाही.
मुघल हे परकीय आक्रमक होते हे मान्य करावेच लागेल
भारतातील राजा नी स्वार्थ साठी .
परकीय लोकांची मदत घेतली.
त्या मध्ये मुघल पण होते.
ब्रिटिश लोकांविरुद्ध एकजूट होवून भारतीय लोक लढलीच नाहीत.
उलट त्यांची मदत घेवून स्व देशीय राजवटी नाच कमजोर केले.
आणि ह्या मध्ये कोणतीच स्व देशीय राजवट अपवाद नाही.
अगदी मराठी राजे पण.अपवाद नाहीत
लेखमालेविषयी उत्सुकता आहे.
"गन्स, जर्मस् आणि स्टील" संपायच्या मार्गावर आहे. सेपिअन नंतर वाचलेले एक प्रभावशाली पुस्तक आहे. सेपियन मधून सुटलेले काही आकलन या पुस्तकाने पूर्ण केले. तसे हे पुस्तक सेपियनच्या अगोदरचे, त्यामुळे सेपियनवर या पुस्तकाचा प्रभाव असण्याचीही शक्यता अधिक आहे.
"गन्स, जर्मस्.." मध्ये न्यू गिनी असो वा साउथ अमेरिका, काही समाज इतर प्रदेशांच्या तुलनेत (मुख्य म्हणजे युरेशियाच्या तुलनेत) पाठी का राहीला असावा याचा शास्त्रोक्त पद्धतीने (खास करून भूविज्ञान, मानवशास्त्र आणि जीवशास्त्र नजरेतून) लेखकाने धांडोळा घेतला आहे. पण पुस्तक वाचताना एक प्रश्न मनात आला, अगदी वीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतही आदिवासी समाज (मेळघाट इ. ) कैक वर्ष मागे का राहिला असावा? कदाचित तुलना गैरलागू असेलही आणि आदिवासींचे माझे आकलनही चूकीचे असू शकेल.
अशाच काहीशा प्रश्नाचे उत्तर शोधताना सदर लेखक म्हणतो की हे बदल केवळ तत्कालिन युरोपियनांमुळे नव्हे तर खुद्द युरेशिआत गेल्या १०,००० वर्षात झालेले बदल -सामाजिक, राजकीय, शेती, आर्थिक आणि उद्योगिक इ. क्षेत्रातले बदल- त्या त्या समाजाने स्विकारल्यामुळे झाले. युरोपियन लोकांमुळे या "बदलांच्या गरजे"ची जाणीव त्या त्या समाजाला झाली इतकेच. आणि हे बदल युरोपिअन लोकांत इतरांच्या तुलनेत अगोदर झाले, यामागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी भौगोलिक स्थान हे एक आहे, वांशिक श्रेष्टत्व नाही हा मुद्दा लेखकाला अधोरेखित करायचा आहे. (कारण तसा विचार करणारी मंडळी तेव्हा होती, आणि आजही आहेत).
लेखमालेविषयी उत्सुकता आहे.
१९ शतक
हे मानवी इतिहासात अत्यंत वेगळे शतक होते.
लाखो वर्ष माणूस पृथ्वी वर जन्म घेवून झाले होते.
पण ह्या लाखो वर्षात मानवी जीवनात विशेष काही फरक नव्हता....
कोणत्याही यंत्र चा वापर सुरू झाला नव्हता.
ह्या दोनशे वर्षात च साक्षात्कार झाल्या सारखा प्रचंड बदल मानवी आयुष्यात झाला.
विविध शोध,यंत्र ,उपकरणे ह्याच काळात निर्माण झाली.
लाखो वर्षात जे मानवी मेंदू ल जमले नाही ते ह्या दोनशे वर्षात च कसे जमले.
हा सर्वात मोठा प्रश्न मला तरी पडतो.
आणि त्याची थातुर मातुर उत्तर देण्याचा प्रयत्न लोक करतात ती मला तरी बिलकुल पटत नाहीत.
परिवर्तन हळू हळू होते
पण ह्या २०० वर्षात ते नैसर्गिक नियमाचा विरुद्ध खूप गती नी परिवर्तन झाले .
हा एक चमत्कार च आहे.
अभ्यासपूर्ण लेखन
असे लेखन होणे म्हणजे फार महत्त्वाचा ऐवज आहे. लिखाणाचा स्पेक्ट्रम मोठा आहे.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
गौतम बुध्द
एका खूप मोठ्या विषयाला हात घातला आहे आपण. पुढील भागांची उत्सुकता आहे. पहिला भाग चांगलाच झाला आहे.
बुध्दाच्या बाबतीत असे वाचनात आले होते कि आधी त्याचा स्रियांविषयीचा दृष्टीकोन आपण म्हणता तसा होता, पण नंतर बुध्दाच्या आईनेच त्याच्याकडे त्यााच्या मार्गावर चालून निर्वाणप्राप्तीची ईच्छा व्यक्त केली. त्यामुळे बुध्दाने आपल्या साधनेचे दार स्त्रियांसाठीही उघडले. त्याचाच परिणाम म्हणून थेरगाथा, ज्या बुध्दाच्या स्री अनुयायांनी निर्माण केल्या, त्या आस्तित्वात आल्या. त्यामुळे तात्कालिन परिस्थितीत बुध्दाने जरी स्त्रियांना निर्वाणमार्गावर चालण्यास विरोध केला असला, तरी नंतर त्यानेच त्यांना सामावून घेतले. तात्कालिन स्त्रियांना असलेल्या स्वातंत्र्याचा विचार केला, तर याही बाबतीत बुध्द प्रागतिक ठरतो. संदर्भासाठी अनेक आहेत, पण डॉ. आ. ह. साळुंखे यांचे ‘भूमीपुत्र गोतम’, गौतम नव्हे, हे पुस्तक सुचवावेसे वाटते.
पुढील लेखनाबाबत शुभेच्छा.