"ते" तुम्हीच आहात का?

प्रचंड मनोबलाने मुंबईचे आव्हान परतवीत
साठी गाठलेल्या सुहृदांनो, धारावीतून सुटलेल्या,
धारावीत अडकलेल्या मित्रांनो, भांडवलाच्या
आत्ममग्न नृत्याने भयचकित आत्म्यांनो, दोस्तांनो
पंचेचाळीस वर्षांपूर्वी बसमधून
असेच काचेला नाक लावून
तुमचा संघर्ष पहाताना माझा थरकाप
झाला होता. "ही सर्व संक्रमण शिबिरे आहेत"
समजूत एका सुहृदाने घातली होती, लवकरच हे लोक
पक्क्या शिमिटाच्या घरात जातील , सौख्य नांदेल:
बियरच्या घोटागणिक एक एक आशा "तो" सांगत होता,
मी डोळे विस्फारून ऐकत होतो, विश्वास ठेवण्याचा
आटोकाट प्रयत्न करत होतो.
असो. आज टॅक्सीच्या काचेला परत एकदा
माझे नाक आहे, सर्वत्र गगनचुंबी इमारती दिसत
आहेत. व्हिस्कीचे ग्लास हातात खेळवत
प्रशस्त काचांमधून
सूर्यास्ताची तंद्री लावून बसलेले
"ते" तुम्हीच आहात का?

field_vote: 
0
No votes yet