(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-५)

(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-५)
वाळूचा गणपती आणि चौपाटीवरील क्लृप्ती
आज मी तुम्हाला जी आठवण सांगणार आहे त्या वर्षी आम्ही आमच्या कल्याणच्या सार्वजनिक गणेशोत्सवात वाळूचा गणपती व तदनुषंगिक सजावट केली होती. सजावटीच्या पार्श्वभागी एका नयनरम्य समुद्रकिनाºयाच्या देखावा रंगविलेला होता. या समुद्रकिनाºयावरील वाळूमधूच श्रींची मूर्ती प्रकट झाल्याची संकल्पना घेऊन त्यानुसार मूर्ती केलेली होती. नृत्य करणाºया बालगणेशाची मूर्ती पारंपरिक पद्धतीने न रंगविता तिच्यावर पूर्णपणे समुद्रावरील पांढरट-पिवळट वाळू चिकटविण्यात आली होती. सजावटीच्या पार्श्वभागी असलेला अत्यंत देखणा व वास्तवदर्शी देखावा आमच्या परिचयाचे एक चित्रकार श्रीराम केळकर यांनी चितारला होता. तर वाळूची मूर्ती आमचे मित्र व मंडळाचे नेहमीचे मूर्तिकार विश्वनाथ परदेशी यांनी साकारली होती.
मूर्ती समुद्रकिनार्‍यावरील वाळूमधून प्रकट झाल्याचा आभासी साक्षात्कार घडविण्यासाठी मूर्तीवर चिकटविण्यासाठी व खालील जमिनीवर पसरविण्यासाठी एकाच प्रकारची व तीही सागरकिनारी असते तशी वाळू वापरणे गरजेचे होते. कल्याणमध्ये फार पूर्वीपासून रेती बंदर असले तरी तेथील वाळू काळ्या रंगाची असते. ती इमारतींच्या बांधकामांसाठी वापरली जाते. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली वाळू आमच्यासाठी निरुपयोगी असल्याने किमान आठ-दहा पोती समुद्रकिनार्‍यावरील वाळू आाणणे गरजेचे होते. सजावटीवरील समुद्रकिनाºयाच्या रंगसंगतीशी हुबेहूब जुळेल अशी वाळू आम्ही आणून देण्याच्या अटीवरच विश्वनाथने आम्हाला हवी तशी मूर्ती करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे आम्ही दादरच्या (मुंबई) समुद्रकिनार्‍यावरून ही वाळू आणण्याचे ठरविले. त्या काळी म्हणजे सुमारे ४५ वर्षांपूर्वी मुंबईचे समुद्रकिनारे आजच्यासारखे कचरापट्टी झालेले नव्हते.
मुंबईहून वाळूची पोती आणण्यासाठी आमच्याकडे कोणतेही वाहन नव्हते व वाहन भाडयाने घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे रेल्वेच्या लोकलमधून सामानाच्या डब्यातून वाळूची पोती घेऊन येण्याचे आम्ही ठरविले. एका व्यक्तीला साधारणपणे ३०-३५ किलो वाळूचे पोते खांद्यावरून उचलून आणता येईल, असा हिशेब करून ही कामगिरी १२ कार्यकर्त्यांवर सोपविली गेली. सकाळची गर्दी सरल्यावर हे कार्यकर्ते रिकामी पोती व फावडे-घमेलं घेऊन कामगिरीवर रवाना झाले. या चमूमध्ये मी व माझा धाकटा भाऊही होता. लोकलने दादर स्टेशनवर उतरून तेथून चालत आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास दादर चौपाटीवर पोहोचलो. फारशी वर्दळ नाही असे समुद्रकिनार्‍यावरील ठिकाण पाहून आम्ही तेथे पोत्यांमध्ये वाळू भरली. साधारण अर्धे भरलेले पोते खांद्यावर घेऊन सहजपणे चालता येईल की नाही, याचा अंदाज घेतला. एवढी सर्व तयारी झाली तरी संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ती पोती घेऊन दादरला लोकलमध्ये चढणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळे गर्दी ओसरेपर्यंत म्हणजे किमान रात्री १०-१०.३०पर्यंत थांबणे भाग होते.
वाळूने भरलेली पोती एका बाजूला रचून ठेवून आम्ही वेळ घालविण्यासाठी त्या समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारू लागलो. एके ठिकाणी लक्तरे नेसलेली एक बाई एका फडक्यावर तान्ह्या मुलाला ठेवून त्याच्या उपचारासाठी पैसे देण्याची याचना येणार्‍या-जाणार्‍यांकडे करत असल्याचे आम्ही पाहिले. ते मूल ठेवलेल्या फडक्यावर बरीच चिल्लर पडलेली होती. येणारे-जाणारे बहुतेक लोक त्या मुलापुढे पैसे टाकत होते. ते दृश्य पाहून कोणतीही शहानिशा न करता इतरांनी पैसे टाकल्याचे पाहून पैसे टाकण्याची लोकांची मानसिकता आमच्या लक्षात आली. हिच कल्पना वापरून ‘टाईम पास’ करत असताना आपणही जमल्यास थोडे पैसे मिळवू, असे आम्ही ठरविले. ती बाई बसली होती त्याच्यापासून पुढे थोड्या अंतरावर जाऊन आम्हीही वाळूवर एक मोठा रूमाल पसरला. स्वत:च्या खिशात होती तेवढी सर्व चिल्लर आम्ही त्या रूमालावर टाकली आणि चार कोपर्‍यावर दगड ठेवले. त्यानंतर आम्ही तेथून लांब जाऊन घोळका करून गप्पा मारत बसलो. सुमारे दोन तासांनी समुद्रकिनाºयावरील वर्दळ कमी झाल्यावर आम्ही पैसे टाकून ठेवलेल्या रूमालाकडे परतलो. रुमालावर आम्ही मुळात जेवढी टाकली होती त्याहून कितीतरी अधिक चिल्लर जमा झाली होती! दुपारी घरून निघाल्यापासून काही खाल्ले नसल्याने आम्हा सर्वांनाच सपाटून भूक लागली होती. रूमालावर जमलेले जास्तीचे पैसे मोजले व जास्तीच्या जमा झालेल्या पैशातून सर्वांनी भरपेट नाष्टा केला!!
रात्री ११ च्या सुमारास दादर चौपाटीपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत खांद्यावर पोती घेऊन येताना पुरती दमछाक झाली. पोती घेऊन लोकलच्या सामानाच्या डब्यात बसलो व मध्यरात्रीनंतर कल्याणला पोहोचलो. कल्याण रेल्वे स्टेशन ते आमचे गणपती मंडळ हे एक किमीचे अंतर पुन्हा खांद्यावर पोती घेऊन चालत आलो. त्या काळी रिक्षा नव्हत्या व मध्यरात्रीनंतर स्टेशनवरून गावात जाण्यासाठी एखाद-दुसराच टांगा असे, हे येथे नमूद करायला हवे. मंडळाच्या मंडपात पोती आणून टाकेपर्यंत अंगात त्राण उरले नव्हते. सर्वजण मंडपाच्या बाजूलाच असलेल्या भाजपाच्या कार्यालयात निद्रादेवीला शरण गेले. ती वाळू वापरून आम्हाला हवी तशी मूर्ती व सजावट काही दिवसांनी साकारली गेली तेव्हा त्यासाठी केलेली ढोरमेहनत सार्थकी लागल्याचे अवर्णनीय समाधान लाभले. आम्ही मंडळात सक्रिय होतो त्या काळातील अनेकांच्या आजही स्मरणात असलेल्या मूर्ती व सजावटींपैकी ही वाळूची किमयागारीही होती.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रेट! ह्या सगळ्या सजावटीचे, मूर्त्यांचे फोटो नाही काढले का कधी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही हेच वाटलं. त्या काळात कॅमेरे आणि फोटो काढणं आजच्या दशांशानंही स्वस्त असतं तर बरं झालं असतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही त्यावेळी मूर्ती व सजावटींचे फोटो काढले होते. परंतु त्याला ४०-४५ वर्षे झाल्याने ते पिवळे पडून डिजिटल स्वरूपात वापरता न येण्याच्या अवस्थेत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0