लहानपणीचे आनंदनिधान-२

नातवंडांचे वजन करणारे आजोबा!
याधीच्या ‘आजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ’ या पोस्टमध्ये मी माझी वडिलांकडील आजी आणि तिच्या भाटिया हॉस्पिटलमधील आजोळाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला होता. आजचे माझे हे लिखाण माझ्या दुसर्‍या म्हणजे आईकडील आजोळासंबंधी आहे. माझ्या या दोन आजोळांमध्ये कमालीचा विरोधाभास होता. मुंबईच्या आजीकडचे आजोळ संपूर्ण शहरी राहणीमानाचे व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असे होते. याउलट आईकडील आजोळ म्हणजे जेथे वीज नाही व नऊ मैल पायी जाण्याशिवाय पर्याय नाही, असे तळ कोकणातील एक दुर्गम परंतु नितांत सुंदर खेडेगाव. मात्र हा विरोधाभास केवळ भौतिक गोष्टींपुरताच मर्यादित होता. दोन्ही आजोळी ‘दुधावरच्या साई’ला म्हणजे आम्हा नातवंडांना तेवढेच नितांत, निखळ प्रेम मिळायचे. माझे हे दुसरे आजोळ तेथे पोहोचण्याच्या दृष्टीने कष्टप्रद होते. पण तेथे एकदा पोहोचल्यावर सुख-सौख्याला कोणतीच सीमा नव्हती.
पूर्वीच्या सावंतवाडी व आताच्या दोडामार्ग तालुक्यातील तळकट हे माझे आईकडील आजोळ.सावंतवाडीहून जुन्या दोडामार्ग रस्त्याने गोव्याला जाऊ लागले की बांद्यापासून चार मैलावर या गावाकडे जाणार्‍या रस्त्याचा तिठा लागतो. तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कुंब्रल अशा गावांची ही पंचक्रोशी. ह. मो. मराठे यांच्या ‘बालकांड’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात या गावाचा आणि त्यातील भाळ्याभटाचा म्हणजे माझ्या चुलत आजोबांचा उल्लेख आढळतो. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले व दाट जंगले आणि नारळ-सुपारीच्या हिरव्यागार बागांनी नटलेले असे हे गाव. या गावातील दुर्गाप्रसाद जोशी व अन्नपूर्णा जोशी हे माझे आईकडील आजी-आजोबा. माझी आई जयश्री (माहेरची शालिनी) ही या दाम्पत्याच्या हयात राहिलेल्या एकूण सात अपत्यांपैकी सर्वात मोठी कन्या म्हणजे अक्का. आता वयाची नव्वदी गाठलेली माझी आई तिच्या लग्नाला ७१ वर्षे झाली तरी अजूनही न चुकता माहेरी जाते व आता तथे असलेले माझे मामा व मामी तिचे तेवढ्याच उत्कटतेने व प्रेमाने माहेरी स्वागत करतात. माहेर एवढे लांब असल्याने आम्ही लहान असताना आई आम्हा तिन्ही भावंडांना घेऊन वर्षातून एकदाच मे महिन्यांत माहेरी जायची. मी एकटे जाण्याच्या वयापासून ते नोकरी लागून लग्न होईपर्यंत दरवर्षी या आजोळी जायचो. लहान असताना शाळेची मे महिन्याची सुट्टी संपेपर्यंत किमान दीड महिना व नंतर नोकरीला लागल्यावरही किमान एक महिना माझा तेथे मुक्काम असायचा.
कोकेण रेल्वे झाल्यापासून रेल्वेने सावंतवाडी रोडपर्यंत व पुढे बस किंवा रिक्षाने माझ्या आजोळी जाणे खूपच सुलभ झाले आहे. परंतू ४०-५० वर्षांपूर्वी तेथे जाणे म्हणजे खूप मोठे दिव्य असे. कोकणात बोटीने जाता येत असे, पण आमचे हे तळकट खालाटीला म्हणजे समुद्रकिनारी नसल्याने बोटीने जाणे हा द्राविडी प्राणायाम ठरायचा. बोट येणारे जवळचे मालवण किंवा वेंगुर्ला बंदर या गावापासून ४० मैलांवर. आताचा कशेडी घाटातून जाणारा रस्ता नव्हता तेव्हा माझ्या या आजोळी मुंबईहून रस्त्याने थेट जाण्याची काहीच सोय नव्हती. तेव्हा रेल्वेने पुणे-मिरज-लोंढा मार्गे आधी बेळगावला जायला लागायचे. तेथून खासगी ‘सर्व्हिस मोटार्री‘ने सावंतवाडी आणि बांदा. वयस्कर व्यक्ती, लहान मुले व सामानासाठी आजोबा बांद्याला बैलगाडी व गडी पाठवायचे. इतरांना चालत नऊ मैल जावे लागे. आजारी व्यक्ती व बाळंतीण माहेरवाशिणींसाठी बांद्याला डोली पाठविली जायची. माझ्या मोठ्या भावाचा जन्म १५ मे १९५३ चा. पहिले बाळंतपण असूनही जाणे बिकट म्हणून आमच्या वडिलांकडच्या आजीने आईला माहेरी पाठविले नाही. आजीने आईचे ते बाळंतपण भाटिया हॉस्पिटलमध्ये सुखरूपणे करून घेतले व पाचव्या दिवशी आजी व वडील आईला घेऊन तिच्या माहेरी गेले. तोपर्यंत कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे बांद्याहून पुढे आई बाळाला घेऊन डोलीतून व वडील आणि आजी नऊ मैल गुडघाभर चिखल तुडवत तळकटला पोहोचले होते. त्यावेळी आमची कोकणतील आजी म्हणजे आईची आईसुद्धा आमच्या सर्वात धाकट्या मामाच्या वेळेस बाळंतीण होती. त्यामुळे घरातील बाळंतीणीच्या खोलीत आई व मुलगी अशा दोन बाळंतिणी व एकाच पाळण्यात मामा-भाचा अशी दोन बाळे असे हल्ली अविश्वसनीय वाटेल असे चित्र होते.
कालांतराने माझ्या या आजोळी एसटीने जाण्याची सोय झाली. तरी सावंतवाडीला ‘रातराणी’ बस नसायची. मुंबई व परिसरातून सावंतवाडीला जाणारी एकच बस मुंबई सेंट्रलहून पहाटे चार वाजता सुटायची. त्या अडनेड्या वेळी कल्याणहून जाणे शक्य नसल्याने संध्याकाळी तेथे जवळच एका नातेवाईकाकडे जाऊन आम्ही पहाटेची ती बस पकडायचो. बसचे रिझर्व्हेशन प्रवासाच्या १४ दिवस आधी सुरु व्हायचे व एक तासाच्या आत संपायचे. ते मिळविण्यासाठी दुसºया दिवशी सकाळी १० वाजता उघडणाºया तिकिट खिडकीसमोर आदल्या दिवशी दुपारपासून लाईन लावायला लागायची. वडील त्यांच्या ‘नवशक्ती’मधील डयुटीच्या वेळेनुसार काही तास रांगेत उभे राहायचे. इतर वेळी ‘नवशक्ती’मधील त्यांचे सहकारी नंबर लावायला उभे राहायचे. आम्हाला चार तिकिटांचे रिझर्व्हेशन लागायचे. पण एका व्यक्तीला फक्त दोनच तिकिटे दिली जायची. त्यामुळे चार तिकिटांसाठी रांगेत दोन नंबर लावून १६-१८ तास उभे राहायला लागायचे. एवढा त्रास करून प्रवासाच्या दिवशी पहाटे सुटलेली बस त्या दिवशी रात्री काळोख पडल्यानंतर सावंतवाडीला पोहोचायची. पुढे जाण्याची काही सोय नसल्याने त्या रात्री भावे नावाच्या एका नातेवाईकांकडे मुक्काम करून दुसºया दिवशी सकाळी बांदा व तेथून पुढे चालत तळकटला जावे लागायचे. पूर्वी बेळळगावमार्गे रेल्वेने किंवा नंतर रस्ता मार्गाने एसटीने जाताना आम्ही कल्याणहून निघाल्यानंतर तिसर्‍या दिवशी आजोळी पोहोचायचो.
माझ्या या कोकणातील आजोळी माझे आजोबा व त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असलेले त्यांचे वडील बंधू भालचंद्र ऊर्फ भाळ्याभट यांचे एकत्र कुटुंब होते. या दोन्ही भावांची मिळून १२ अपत्ये एकाच घरात लहानाची मोठी झाली. शाळेची उन्हाळी सुट्टी सुरु होण्याच्या आधीच आजोबांचे ‘शारीला व मुलांना पाठवा’, असे पत्र प्रवासखर्चाच्या मनीऑर्डरसह यायचे. वार्षिक परीक्षा होण्याआधीच आम्हाला या कोकणातील आजोळी जाण्याचे वेध लागायचे.आम्ही मे महिन्यांत जायचो तेव्हा आईच्या १२ सख्ख्या व चुलत भावंडांचा आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचा सुमारे ४०-४५ जणांचा गोतावळा जमायचा. पुढच्या दारच्या अंगणात व्यापारानिमित्त एक मोठा तराजू कायम लावलेला असायचा. चपला काढून तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा करून घरात प्रवेश करण्याआधी आजोबा येणार्‍या प्रत्येक माहेरवाशिणीला आणि तिच्या पिल्लावळीला या तराजूत बसवून प्रत्येकाचे वजन करायचे आणि ते एका वहीत लिहून ठेवायचे. काट्यावर वजन करण्याचा हा कार्यक्रम सुट्टी संपून परत यायच्या दिवशीही व्हायचा. प्रत्येकाचे येतानाचे वजन जाताना किती वाढले याचा हिशेब कौतुकाने सांगून मगच प्रेमाने निरोप दिला जायचा!
या भाळ्याभटांना सर्वजण दादा म्हणायचे व माझ्या आजोबांना काका. घरात आजोबांची आई म्हणजे थोरली आई, भाळ्याभटाची पत्नी म्हणजे मधली आई व आमची आजी म्हणजे धाकटी आई अशा तीन ‘आया’ होत्या. माझ्या आईची दोन चुलत भावंडे तिच्याहून मोठी होती. ती दोघं त्यांच्या आईला ‘आई’ म्हणायची म्हणून आमची आई व तिच्या पाठचा भाऊ देखील त्यांच्या आईला ‘आई’ व स्वत:च्या आई-वडिलांना काका आणि काकी म्हणायचे!
हे भाळ्याभट जन्मापासून दोन्ही पायांनी पांगळे होते. पण त्यांची बुद्धी कुशाग्र व वृत्ती धाडसी होती. पुढच्या दारच्या पडवीत आरामखुर्चीत बसून ते कोल्हापूर, बेळगाव, मुंबईपासून ते पार मध्य प्रदेशातील इंदूर व सागरपर्यंत व्यापार करायचे. एकेकाळी घरासमोरच्या मोकळ्या माळरानावर व्यापाराच्या आलेल्या अथवा पाठवायच्या मालाच्या ४०-५० बैलगाड्या उभ्या असायच्या. व्यापाराव्यतिरिक्त या घराची १२०० पोफळी व १०० माडांची बागायती होती. घरची बागायती व व्यापार दादा पाहाताहेत हे पाहून आमच्या आजोबांनी गोपाळळराव कोपरकर व विश्वनाथ मुंगी या दोन भागिदारांसह बेळगावमध्ये ‘मे. एम. जी. दुर्गाप्रसाद अ‍ॅण्ड कं.’ ही व्यापारी पेढी सुरु केली. कालांतराने दादा वारल्यावर आमचे आजोबा त्या भागिदारीतून बाहेर पडून घरी परत आले व बागायती आणि थोडा-फार व्यापार पाहू लागले. बेळगावच्या टिळकवाडीतील ती व्यापारी पेढी आजही त्याच नावाने सुरु आहे.
आमच्या या आजोळचे घर शंभरहून अधिक वर्षांचे जुने आहे. पूर्णपणे मातीने व फणसाच्या लाकडाने बांधलेल्या या दुमजली घरात शंभर माणसे आरामात राहू शकतात. घराला पुढच्या दारी आणि मागच्या दारी प्रत्येकी दोन प्रशस्त अंगणे आहेत. सर्व घरातील जमीन व सर्व अंगणे आपल्या शहरी फ्लॅटमधील मोझॅक टाईल्सना लाजवतील एवढी गुळगुळित आहेत. घरातील जमीन व सर्व अंगणे दर आठवड्याला शेणाने सारवल्या जायच्या. जमिनीला काळसर, तजेलदार झांक यावी यासाठी सारवताना शेणात बॅटरीच्या संपलेल्या सेलमधील काजळी कुटून मिसळली जायची. अंगणांच्या चहूबाजूंना नानाविध फुलझाडे व पुरुषभर उंचीच्या डझनावारी तुळशी आहेत. मुख्य पुजेची तुळस पुढच्या दारच्या अंगणातील तुळशी वृंदावनात आहे. घरात वापरायच्या पिण्याच्या पाण्याची विहीर मागच्या दारची दोन अंगणे ओलांडून रस्त्याच्या कडेला म्हणजे घरापासून सुमारे शंभर पावलांवर आहे. विहिरीला अंगणाच्या बाजूने एक व रस्त्याच्या बाजूने दुसरा असे दोन कायमस्वरूपी रहाट आहेत. घरातील बायकांची विशेषत: पावसाळ्यात पाणी आणताना गैरसोय होत असूनही रस्त्यावरून जाणार्‍या पांथस्थांना व गुरा-वासरांना घरातून मागून न घेता परस्पर पाणी घेता यावे या परोपकारी भावनेने विहीर मुद्दाम त्या ठिकाणी खणण्यात आल्याचे स्पष्टिकरण आजोबांनी मी एकदा चौकशी केली असता दिले होते. घरातील बायाबापड्यांना रात्री-अपरात्री नैसर्गिक विधींसाठी उघड्यावर जावे लागू नये यासाठी मला आठवते तेव्हापासून घराच्या एका बाजूला सेप्टिक टँकचे दोन पक्के संडास बांधलेले आहेत. आजोबा वारल्यावर मामाने तर आता घरातच संडास व बाथरूम करून घेतली आहे. वीज आल्यापासून ते घर आता टेलिफोन, रेडियो, टीव्ही, पंखे, फ्रीज यासारख्या सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज आहे. घरात स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा मुबलक गॅस आहे. पूर्वी घरात वापरायचे पाणी विहिरीवरून किंवा खाली नारळी-पोफळीच्या बागेतून वाहणार्‍या पाटातून भरावे लागे. हल्ली बागेत स्वतंत्र विहीर खणून ते पाणी नळ योजनेने घरात व परिसरात सर्वत्र फिरविलेले आहे.
घरातील सर्वजण आरतीला बसू शकतील अशी स्वतंत्र व प्रशस्त देवाची खोली आहे. या खोलीत दीड पुरुष उंचीचा सिमेंटने बांधलेला अनेक टप्प्यांचा देव्हारा आहे. आम्ही लहान असताना आजोबांची याच देव्हाºयासमोर बसून तीन-तीन तास पूजा-अर्जा चालायची. आम्ही मुले अंगणातील व परसदारातील भरपूर फुले काढून आणायचो आणि त्याने संपूर्ण देव्हारा नेत्रसुखदपणे सजविला जायचा. त्यांत डझनभर रंगांची गुलबाची आणि जास्वंदीची शेकडो फुले असायची.दिवेलागणीला संपूर्ण घरात धुपारा केला जायचा व त्यानंतर आम्ही सर्वजण देवाच्या खोलीत बसून स्तोत्रे, आरत्या व देवाचे अन्य भक्तीपाठ म्हणायचो. तेव्हा वातावरण अगदी प्रसन्न व पवित्र वाटायचे. घराच्या वरच्या बाजूला असलेल्या परसात एक प्रशस्त पार बांधलेला पुरातन पिंपळ आहे. त्या पिंपळावर दंडाएवढया जाडीची मोगर्‍याची कित्येक वर्षांची जुनी वेल चढलेली आहे. संध्याकाळी त्या पारावर पडलेली मोगर्‍याची फुले व अंगणातील अबोलीची फुले काढून सर्व बायका-मुलींना जाडजूड व लांबसडक वळेसर (गजरे) करण्याचा कार्यक्रम चालायचा. संध्याकाळी याच मागच्या अंगणात सात-आठ फणस कापून घरातील सर्वजण मनसोक्त गरे खायचो. बाकी दिवसभर उनाडक्या करताना काजूची पिकलेली बोंडे, जांभळे, करवंदे, पेरू, पपई व कोणी घरी बोलावून दिल्यास शहाळी अशी खादाडी सुरुच असायची.
उन्हाळ्याच्या दिवसांत घरात उन्हाच्या हाळा लागू नयेत यासाठी घराला लागून असलेल्या मागच्या व पुढच्या प्रत्येकी एका अंगणात झावळ्यांचा मांडव घातलेला असायचा. सकाळचा नाष्टा व दोन्ही वेळच्या जेवणाच्या पंगती मागील दारच्या अंगणातील मांडवात बसायच्या. आजोबा रोज दुपारच्या जेवणात एकेक खास पदार्थ करण्याची फर्माईश आजीला, सुनांना व माहेरपणाला आलेल्या लेकींना करायचे. सुटीचे शेवटचे चार-आठ दिवस जावईमंडळी यायची. त्यांची विशेष बडदास्त ठेवली जायची. रात्री याच मागच्या दारच्या अंगणातील मांडवात पूर्वी पेट्रोमॅक्सच्या बत्त्या लावून व नंतर विजेचे दिवे लावून आम्हा मुलांचे पत्त्यांचे फड जमायचे. आई, माम्या आणि मावश्यांची गप्पाष्टके चालायची. आजी मात्र जावई आले असल्यास त्यांना बरोबर घेऊन सोंगट्यांचा ‘नाट’ नावाचा सारीपाटासारखा खेळ मध्यरात्री उलटेपर्यंत खेळायची. रात्रीचे जेवण झाल्यावर आजोबा पुढच्या दारच्या पडवीवरील लाकडी पलंगावर झोपायला गेले की मागच्या दारी चुकूनही फिरकायचे नाहीत. घरात राहणारा मधला मामा मागच्या दारच्या त्याच्या कॉटवर केव्हाच ढाराढूर झालेला असायचा. मध्यरात्रीनंतर याच मागच्या दारच्या अंगणातील मांडवात एक भलीमोठी ताडपत्री घालून त्यावर सर्वांना झोपायला अंथरुणे घातली जायची. वळवाचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर परिसरातील सर्व झाडे विद्युत रोषणाई केल्याप्रमाणे लुकलुकत्या काजव्यांनी फुलून जायची. दिवे बंद केल्यावर हे काजवे शेकडोच्या संख्येने अंगणातही यायचे. या काजव्यांना पांघरुणात पकडून त्यांना न्याहाळण्यात कधी डोळा लागायचा हे समजतही नसे. अंगणाच्या एका कोपर्‍यात पारिजातक आणि दुसर्‍या कोपर्‍यायात नागचाफा बहरलेला असायचा. त्यांचा मदधुंद करणारा संमित्र सुवास रात्रभर अंंगणात दरवळत असायचा. (याच नागचाफ्याचे पराग म्हणजे सुगंधी नागकेशर)
माझ्या या आजोळी गुरांचे दोन गोठे आहेत. सिमेंटचे पक्के बांधकाम केलेला पावसाळी गोठा मागील दारी आणि झावळ्यांच्या मांडवाचा हिवाळी व उन्हाळी गोठा पुढच्या दारी. आजोबा हयात असेपर्यंत या गोठ्यांमध्ये कित्येक वर्षे ३५-४० गायी असायच्या. नवीन झालेल्या वासरांना पहिले वर्षभर ठेवण्यासाठी घरातच एक खास वासरांची खोली होती. गाय व्यायली की तिचे फक्त दोन आजळांचे दूध काढायचे व दोन आचळांचे दूध वासरासाठी ठेवायचे, असा आजोबांचा दंडक होता. वासरू झाले की ते आयुष्यभर सांभाळले जायचे व पाडा दोन वर्षांचा झाला की कोणाला तरी असाच देऊन टाकला जायचा. बागायतीला भरपूर शेणखत मिळावे हा एवढ्या गायी पाळण्याचा मुख्य हेतू होता. त्यांचे दूधदुभते हे घरापुरते मिळणारे गौण उत्पन्न असायचे. या गुरांमध्ये कपिला गाय मानाची होती व तिला गोठ्यात दर्शनी भागात पहिल्या क्रमांकावर बांधले जायचे. गोठ्यापासून कित्येक शे फूट दूर असलेल्या स्वयंपाकघरात आजी पहाटे उठून भाकर्‍या भाजू लागली की हा कपिला हक्काची भाकरी मागण्यासाठी हंबरडा फोडायची. आजी पहिली भाकरी झाली की उठून ती आधी कपिलेच्या तोंडात घालून नंतरच बाकीच्या भाकर्‍या थापायची! दुपारी वैष्वोदेवाचा भात खाण्यासाठीही कावळे ठरालेल्या वेळी अंगणात ठराविक जागी जमून कावकाव करायचे.
गुरे जंगलात चरायला नेण्यासाठी एक धनगर गुराखी नेमलेला असे. त्याला चहा, नाष्टा, जेवण, वर्षाला वाहणांचे दोन जोड, एक कांबळी व शिवाय काही रोख पगार दिला जायचा. पाऊस सुरु झाल्यापासून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत गुरांना रानात भरपूर चरायला मिळे. नंतरचे चार-पाच महिने मात्र दिवसभर वणवण करून संध्याकाळी खपाटीला गेलेली पोटे घेऊनच गुरे घरी परतायची. हे चार महिने व एरवी रात्री गुरांना खाऊ घालण्यासाठी दरवर्षी कित्येक हजार रुपयांचे गवत विकत घ्यावे लागे. एकूण गुरांचा हा मामला आतबट्ट्याचाच होता. तरीही एवढी गुरे बाळगण्याचा अट्टाहास का?, असे मी एकदा आजोबांना विचारले.त्यावर त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या अपार श्रद्धेचे द्योतक होते. त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या पिढीत कोणीतरी एक गाय ब्राह्मण म्हणून दान दिली. तिची ही पिल्लावळ आहे. दावणीला असलेली गाय मरेपर्यंत सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांनी या श्रद्धेचे काहींना अतिरेकी वाटेल अशा पातळीपर्यंत निष्ठेने पालन केले. एकदा चरायला गेलेली एक गाय जंगलात पाय घसरून एका दुर्गम घळीत पडली. गाईला तेथून काढून आणणे शक्य नाही, असे सांगत गुराखी घरी आला. ते रणरणत्या उन्हाळ्याचे दिवस होते. आजोबांनी गाईला आहे त्याच ठिकाणी झाडपाल्याचा आडोसा करून सावली करण्यास गुराख्यास सांगितले. नंतर आजोबांनी आम्हा नातवंडांना त्या गाईला दररोज घरून कळशी नेऊन पाणी पाजण्याचे काम नेमून दिले. आम्ही भरलेली कळशी खांद्यावर घेऊन तापलेल्या धुळीत पाय पोळून घेत रोज अडीच-तीन मैल जाऊन त्या गाईला सहा दिवस पडल्याजागी पाणी दिले. तेथे जाईपर्यंत हिंदकळून भरलेली कळशी निम्मी रिकामी झालेली असे. सातव्या दिवशी गेलो तेव्हा गाय मेलेली होती. नेलेले पाणी तिच्या कलेवरावर ओतून आम्ही नेहमीहून जरा वेगळ्या वाटेने घरी परतू लागलो. काही पावले गेल्यावर तेथे एक ओढा वाहत असल्याचे आम्हाला दिसले. सात दिवस घरून पाणी आणण्याच्या मूर्खपणाची आम्हाला चीड आली. परंतु दावणीच्या जनावराचा मरेपर्यंत सांभाळ करण्याची आजोबांची श्रद्धा जपण्याखेरीज आम्हाला अन्य पर्यायही नव्हता. आजोबा वारल्यानंतर मामाने गायी सांभाळण्याचा हा आतबट्ट्याच्या व्यवहार बंद करून त्याऐवजी दोन म्हशी घेण्याचा सुटसुटीत पर्याय निवडला. पण तेव्हापासून माझ्या मनात आजोळच्या अपार ओढीस कारणीभूत असलेला एक कप्पा कायमचा बंद झाला. वात्सल्यमूर्ती असलेल्या गायीची सर बथ्थड म्हशीला कधीच येऊ शकणार नाही, असेच मला वाटते.
आजोबांचे असेच आपार श्रद्धायुक्त प्रेम झाडपेडांवरही होते. बागेत रोज दोनदा फेरफटका मारून आजोबा नारळी-पोफळीच्या प्रत्येक झाडाची ख्याली-खुशाली विचारायचे. १९६१च्या चक्रीवादळात बागेचे अपरिमितीत नुकसान झाले तेव्हा झाडांच्या व्यथेने सुन्न होऊन डबडबलेल्या डोळ्यांनी बागेतून परतलेले आजोबा आम्ही त्यावेळी अनेक दिवस पाहिले होते. आम्ही हातात कोयता घेऊन बागेत जायचो व सुपारीच्या लहान झाडांच्या कोवळ्या बुंध्यांवर कोयत्याच्या टोकाने आपापली नावे कोरायचो. एक दिवसानंतर कोरलेली ती नावे स्पष्ट दिसू लागत. आमचे हे ‘उद्योग’ आजोबांच्या लगेच नजरेस यायचे. ‘तुमच्या अंगावर सुरीने अशी नावे कोरली तर तुम्हाला कसे वाटेल?, असे विचारून ते आमची खरडपट्टी काढायचे. घराला अगदी लागूनच चार कोपरयात चार माड होते. उंच वाढल्यावर ते माड वाकून अगदी घराच्या छपरावर ओळंबले होते. पावसाळ्यात वार्‍याने नारळ व झावळ्या पडून घराची कौले फुटू नयेत म्हणून पावसाळयापूर्वी नारळ काढताना त्या माडांच्या नंतरच्या चार महिन्यांत पिकणार्‍या झावळ्या व तयार होऊ शकणारे नारळ सुंभाने घट्ट बांधून ठेवावे लागत. माडावर चढून सुंभ बांधण्याचे हे काम खूप जिकिरीचे असायचे व त्यासाठी गडी जास्त मजुरी घ्यायचे. अनेक वर्षे मी हा उपदव्याप पाहिला व ‘एवढा त्रास करण्यापेक्षा हे माड तोडून का टाकत नाही?, असे एकदा आजोबांना विचारले. आजोबांनी रागाने माझ्याकडे पाहिले व ‘पुन्हा हा प्रश्न कधीही विचारू नकोस’, असे बजावले. राग शांत झाल्यावर आजोबांनी मला त्या चार माडांचा इतिहास सांगितला. तो ऐकून त्या चार माडांबद्दल आजोबांना विशेष आत्मियता असण्याच्या कारणाचा उलगडा झाला आणि माझेही मन गलबलले. घर बांधले तेव्हा सुरुवातीस आजच्यासारखी भोवती प्रशस्त अंगणे नव्हती. तेव्हा घराला लागून चार कोपर्‍यात हे माड लावण्यात आले होते. ती रोपे अगदी लहान असताना आकाशातील सूर्यप्रकाशही रोखला जाईल एवढी घनदाट टोळधाड आली. पुढील चार दिवसांत त्या टोळधाडीने पंचक्रोशीतील सर्व झाडाृ-झुडपांचा फडशा पाडला. तशाही परिस्थितीत आजोबांच्या आईने म्हणजे ‘थोरल्या आई’ने ते चार माड वाचविले. टोळधाड येते आहे याची चाहूल लागताच तिने त्या चारही माडाच्या रोपांना सुंभ बांधले व त्याचे एक टोक स्वयंपाकघराच्या बंद खिडकीच्या फटीतून आत आणून ठेवले. नंतरचे चार दिवस स्वयंपाकघरात काम करताना थोरली आई सुभांची ती दोरी पाळणा ओढल्यासारखी एकसारखी ओढत राहिली. दोरी ओढल्याने माडीची रोपे खेचली जाऊन हिंदोळत व त्यांच्यावर बसलेले टोळ उडून जात. पुढे हेच माड मोठे झाले व त्यांचे नारळ बियाणे म्हणून वापरून पंचक्रोशीत शेकडो नव्या माडांची लागवड केली केली! टोळधाडीनंतर पंचक्रोशीत नारळांच्या बागा पुन्हा फुलविण्याचा आधार ठरलेल्या त्या चार वृद्ध माडांवर स्वत:हून कुर्‍हाड चालविणे आजोबांना न पटणारे असणे अगदी स्वाभाविक होते.
आजोबा प्रगतीशील आणि पुरोगामी विचारांचे होते.कोकणातही मसाल्याच्या पदार्थांची यशस्वी लागवड करण्याचे प्रयोग कोकण कृषि विद्यापीठाने केले. त्याच्या बातम्या बाचून आजोबांनी विद्यापीठाच्या विस्तार अधिकार्‍यांना पाचारण केले. त्यांनी आमच्या बागेत मृदापरीक्षण केले व तेथे अशी लागवड होऊ शकते, असा निर्वाळा दिला. आजोबांनी विद्यापीठातून दालचिनी, लवंग, वेलदोडा व जायफळाची रोपे आणली. त्यावेळी मी आजोळीच होतो. आजोबांचा माझ्यावर विशेष जीव असल्याने त्यांनी माझ्या हस्ते मसाल्याच्या पदार्थांच्या या रोपांची लागवड केली. यथावकाश ही रोपे मोठी झाली व त्यांना फलधारणा होऊ लागली. काही वर्षांनी टोपलीभर जायफळे, किलोभर जायपत्री, रोवळीभर लवंगा व किलो-दोन किलो वेलदोडे मिळू लागले. मिर्‍याची लागवड बागेत आधीपासूनच केलेली होती.परंतु या पदार्थांची सुसंघटित बाजारपेठ नसल्याने हा प्रयोग फारसा फलदायी झाला नाही. अशाच प्रकारे आजोबांनी माझ्या हस्ते दोन-तीन डझन जातीच्या गुलाबांच्या कलमांची लागवड करून ‘स्वामी स्वरूपानंद वाटिका’ तयार केली होती.घराच्या समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळया माळरानाला कुंपण घालून तेथे आंब्याच्या कलमांची लागवडही आजोबांनी माझ्याच हस्ते करून घेतली. मोठी झाल्यावर या कलमांना अनेक वर्षे प्रत्येकी अडीच-तीन हजार आंबे लागायचे. परंतु काही वर्षांनी या सर्व कलमांवर रोग पडला व त्यांचे बुंधे वाळवी लागल्यासारखे आतून पोखरले गेले. तरीही त्यांना आंबे लागायचे. पण ते अगदी पाऊस पडल्यावर जून व्हायचे व पिकल्यावर आतून सडलेले निघायचे. आमच्या या आजोळी काजू, आमसुले, केळी, पपई, अननस व विड्याची खायची पाने हीसुद्धा उत्पन्नाची पूरक साधने होती.
आमच्या या आजोळी देऊ नावाचा एक धनगर मुलगा कित्येक वर्षे गुराखी होता. हा देऊ जन्मापासून मूक-बधीर होता. गुरे घेऊन जंगलात जायचा तेव्हा एक मधमाशी दिसली तरी तिचा मागोवा घेत मधाचे पोळे शोधण्याची अनोखी लकब त्याच्याकडे होती. अनेक वेळा उन्हाळ््याच्या दिवसांत (वसंत ऋतू) संध्याकाळी गुरे घेऊन येताना देऊ पानांच्या द्रोणांमध्ये भरून मधाची पोळी घेऊन यायचा. चौकशी करता रानात खूप मधाची पोळी आहेत व आपण ती दोरीवरील कपडे काढल्यासारखी सहज काढू शकतो, असे देऊने सांगितले. त्याच्या या खुबीचा पद्धतशीर उपयोग करून घेण्याचे आम्ही ठरविले. रोज गुरे घेऊन जंगलात जाताना आम्ही देऊकडे पाच लिटरची किटली देऊ लागलो. संध्याकाळी येताना तो ती किटली मधाने भरून आणायचा. पहिल्या वर्षी त्याने अशा प्रकारे शंभरएक किलो मध आणला. पुढे हे प्रमाण पत्र्याचे १५ किलोचे २५-३० डबे एवढे वाढले. आम्ही देऊने गोळा केलेला हा मध कल्याणला आणून आमच्या आजीच्या दुकानात कित्येक वर्षे विकत असू. जोडीला कोकणातून शेकडो किलो फणसपोळी, आंबापोळी, काजू ब आमसुले आणून आम्ही तीही दुकानात व अन्यत्र विकायचो.
आमच्या कोकणातील आजीचे प्रेम ओठांवर नव्हे तर पोटात असे. तिने आम्हा नातवंडांना कधी प्रेमाने जवळ घेऊन आंजारले-गोंजारले नाही. पण तिचे वात्सल्य तिच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत असे. नातवंडांची संख्या डझनावारी असल्यावर त्या सर्वांवर व्यक्त स्वरूपात प्रेम करणे अर्थात तिला शक्यही होण्यासारखे नव्हते. आम्ही परत घरी यायला निघालो की आजीचे डोळे पाणावत. ‘येत राहा रे असेच नेहमी’ असे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले निरोपाचे शब्द तिच्या दाटलेल्या कंठातून उमटत असत. आजी हयात असेपर्यंत निदान मी तरी तिचा हा आग्रह पाळला.
माझ्या या कोकणातील आजोळाबद्दल अख्खे पुस्तक लिहिले तरी ते कमी पडेल. तेथील अविस्मरणीय वास्तव्य हा माझ्या जीवनाचा अमूल्य ठेवा आहे. तीन मावश्या व तीन मामांपैकी दोन मामा व एक मावशी आता हयात नाहीत. हयात असलेल्या दोन मावश्यांनी वयाची ८० वर्षे ओलांडली आहेत. आता घरी असणारा एकमेव मामा पंच्याहत्तरीचा व मामी सत्तरीची आहे. मामाच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. लहानपणापासून शिक्षणानिमित्त घराबाहेर राहिलेला त्यांचा एकमेव विवाहित मुलगा चरितार्थासाठी घराबाहेरच आहे. त्यामुळे तीन पिढ्यांवर मायेची पाखर घालणार्‍या माझ्या आजोळच्या घराचे काय होणार व मामा-मामीनंतर तेथील व्याप कोण सांभाळणार या चिंतेने मन कातर होते. परंतु ‘कालाय तस्मै नम:’ या शिवाय आपण तरी आणखी काय म्हणू शकणार?

field_vote: 
0
No votes yet