मिस्टर ब्रुईन आणि कोऽहमचे सवाल

#ललित #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

मिस्टर ब्रुईन आणि कोऽहमचे सवाल

- आदूबाळ

.एक

पहाटेचे चार वाजले होते. मुंबईच्या बोगनविलिया म्यूज भागात फारशी वर्दळ कधीच नसे. खूप उच्चपदावर नसलेल्या, पण अगदी कनिष्ठही नसलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची लहानशा बंगल्यांची वसाहत होती ती. बंगल्यातून एक धोतर नेसलेली आकृती बाहेर आली. बुटकं लाकडी फाटक उघडायच्या फंदात न पडता त्या व्यक्तीने एक हात फाटकाच्या खांबावर टेकून सफाईदारपणे उडी मारली. त्याच्या उडीमुळे झालेल्या धप्प आवाजाने सावध होऊन गल्लीच्या टोकावरून एक कुत्रं आत डोकावलं. भुंकायला सुरुवात करणार इतक्यात त्याच्या तीव्र नाकाने त्या व्यक्तीला ओळखलं, आणि पहाटेच्या शांततेला चिरून जाणारी ती भुंक अर्ध्यातच विरली. झपाझप पावलं टाकत ती आकृती कुत्र्यापर्यंत पोचली.

"शबाश, खंड्या!"

आपल्या धोतराच्या घोळात हात घालून त्या व्यक्तीने पावाचे काही तुकडे काढून कुत्र्याला दिले, आणि चालण्याची गती न मंदावता गल्लीच्या काटकोनात असलेल्या मोठ्या रस्त्याकडे ती वळली. रस्त्यावर आदल्या दिवशी लावलेल्या गॅसबत्तीचा प्रकाश होता. गॅस संपत आल्याने तो थोडा मंद झाला होता. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिव्याच्या खांबापाशी व्हिक्टोरिया1 उभी होती. पहाट असली तरी तिचे घोडे चांगलेच तजेलदार दिसत होते.

त्या व्यक्तीने व्हिक्टोरियाचा दरवाजा उघडून आत उडी टाकली.

"काय खबर, महादबा?"

"साहेब!" बसल्या जागी वळत व्हिक्टोरियाच्या चालकाने सलाम ठोकला.

"महादबा, आपण दोघेच असताना हरिभाऊ म्हटलं तरी चालेल. माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तुम्ही."

अक्कडबाज मिशांचा महादेव शिदोजी कॉन्स्टेबल फक्त हसला, आणि घोड्याला चलण्याची इशारत दिली.

"काय हालचाल, महादबा?"

"काही फारशी नाही साहेब… आपलं, हरिभाऊ. डोंगरी भागात दोन अड्डे चालू आहेत."

"काय खेळतात?"

"अद्धा2, साहेब."

"हं.. पुढची बोट कधी लागणार आहे?"

"उद्या. फ्रागट."

साहेब हसला. "एच. एम. एस. फॅरागुट. पहिलीच व्हॉयाज आहे तिची." मग एकदम जीभ चावून म्हणाला, "व्हॉयाजला काय म्हणतात मराठीत?"

"व्हो.. काय, साहेब?"

"अरे म्हणजे इंग्लंडहून ... विलायतेहून … मुंबईला पहिल्यांदाच येते आहे. फर्स्ट जर्नी."

"सफर?"

"दॅट्स इट. पहिला सफर? पहिली सफर! सफर्र. नॉट सफऽ. इंग्लिशमध्ये वेगळं, मराठीत वेगळं." तो स्वतःशी गुणगुणला.

मिनिटभराने महादबा म्हणाला, "साहेब - तुमचं एक भारी वाटतं. इंग्रज असून झक्क मराठी बोलता. शिकत राहता."

"मराठी मुलुखात जन्मलो, महादबा. इथेच मोठा झालो. शिकलो. वीस वर्षं इथेच नोकरी करतोय, पोलिसात. कपडेही आपले धोतर-कोपरी3, काय!" साहेब हसत म्हणाला. "अजून कोणत्या बोटी आहेत धक्क्याला?"

"एक वलंदेजी बिलंदर4 आहे. दोनतीन सलुपा5. आणि हो साहेब, एक पुर्तुगाळी6 येईल म्हणतायत दोन दिवसांत."

"त्या अड्ड्यांवर लक्ष ठेवा, महादबा."

व्हिक्टोरिया क्रॉफर्ड मार्केटच्या चौकीत पोचली होती. साहेब चपळाईने उतरला, आणि अंधाऱ्या चौकीतल्या एका अंधाऱ्या खोलीत सरावाने गेला.

खोलीवर अक्षरं होती 'Henry John Brewin, Dy. Superintendent of Police'.

***

.दोन

दुपारचे दोन वाजत आले होते. समुद्रावरून आलेला दमट गरम वारा क्रॉफर्ड मार्केट चौकीत खेळत होता. सकाळची कामं उरकून, जेवण करून सगळे सुस्तावले होते.

सकाळचा धोतर-कुडता टाकून ब्रुईन आता बॉम्बे प्रेसिडेन्सी7 पोलीस ऑफिसरच्या कडकडीत वेषात होता. दोन दिवसांनी त्याला एका केसमध्ये कोर्टात जबानी द्यायची होती. न्यायमूर्ती जेम्स हॉजेस तसे मऊ स्वभावाचे होते, पण ब्रुईन आपली जबानी नीट ठरवून, डोक्यात रंगीत तालीम करून जात असे. न्यायमूर्तींनी किंवा प्रतिपक्षाच्या वकिलाने काही आडवेतिडवे प्रश्न विचारले, तर उत्तरं आली पाहिजेत याकडे त्याचा कटाक्ष असे. त्यासाठी एक पद्धत त्याने बाणवली होती. एक कागद समोर ओढून तो सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेचे तपशील आठवणीतून लिहीत असे. नंतर आपली स्मृती तो अधिकृत केसफाईलशी ताडून बघे. ब्रुईनची स्मरणशक्ती आणि निरीक्षणशक्ती तल्लख होती. केसफाईलमध्ये असलेल्या किचकट तपशिलाने ब्रुईनच्या स्मरणात असलेल्या घटनांना आणखी धार चढत असे, आणि जबानीत तो जणू ही गोष्ट कालच घडली होती इतक्या प्रभावीपणे वर्णन करू शके.

शेवटच्या काही ओळी लिहून ब्रुईन टाक झटकत असतानाच दारावर टकटक झाली. त्यानं वर पाहिलं. दारात एक लहानशा चणीची वृद्ध स्त्री उभी होती. तिचा मूळचा युरोपीय गोरा वर्ण मुंबईत अनेक वर्षं राहिल्याने रापला होता. कपडे आंग्ल वळणाने शिवलेले होते, पण नव्या फॅशनशी सुसंगत नव्हते. ब्रुईनने तिला झटकन ओळखलं. त्याच्या आठवणीत अगदी अस्सेच कपडे होते. चेहऱ्यावरचा मृदू भाव लोपला नव्हता, आणि डोळ्यांतला करारीपणाही हरवला नव्हता. ब्रुईनच्या आठवणीत केस काळे होते, ते आता कापशी सफेद झाले होते.

"Miss Greensmith!" ब्रुईन उठून उभा राहिला. "Please come in, it's an honour to see you here!"

"I hope I am not disturbing you, Mr Superintendent." आज्जी लाघवी आवाजात म्हणाल्या.

"Still a 'deputy', unfortunately! But ma'am, you know I am still 'wee Harry' to you. There is absolutely no need for formalities." ब्रुईन ओशाळला. भायखळ्याच्या शाळेत मिस ग्रीनस्मिथ ब्रुईनच्या लाडक्या शिक्षिका होत्या. पहिल्या चार इयत्तांनंतर ब्रुईन मोठ्या शाळेत गेला, पण तो मिस ग्रीनस्मिथना विसरला नाही, ना त्या त्याला विसरल्या. वरच्या इयत्तांतही काही अडचण असेल तर ती सोडवून घ्यायला ब्रुईन अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. शाळा संपल्यानंतर, वयाच्या अठराव्या वर्षी ब्रुईन मुंबई पोलिसांत भरती झाला. तेव्हापासून त्याचा आणि मिस ग्रीनस्मिथचा संपर्क तुटल्यासारखा झाला होता.

आज त्यांना चक्क क्रॉफर्ड मार्केटच्या चौकीत पाहून ब्रुईनला आनंद झालाच, पण आश्चर्य वाटलं, आणि थोडीशी काळजीही. मिस ग्रीनस्मिथ निवृत्त झाल्या, आणि त्यांनी इंग्लंडला परत न जाता उर्वरित आयुष्य मुंबईत काढायचं ठरवलं होतं हे त्याच्या कानावर आलं होतं. अशा पेन्शनर वृद्धेला पोलीस चौकीची पायरी चढायची वेळ का यावी?

त्याने प्रथम त्यांना आत खुर्चीवर व्यवस्थित बसवलं. पाणी वगैरे दिलं.

"How may I assist you, Miss Greensmith? You could have sent a word and I would have come to your place. You needn't have taken the trouble to come all the way here."

"That is fine, Harry." ग्रीनस्मिथबाई हसल्या. "It is nothing, really. A minor nuisance at best. But I thought it prudent to consult with you before doing anything."

"What is it, if I may ask?" ब्रुईनची उत्सुकता ताणली गेली.

"Here." ग्रीनस्मिथबाईंनी आपल्या हातातल्या पिशवीतून एक लिफाफा काढून ब्रुईनसमोर ठेवला. कपाळाला आठ्या घालत ब्रुईनने तो उघडला. त्यातून एक कागद निघाला. त्यावर वळणदार इंग्रजीत हाताने लिहिलेलं एक आवाहन होतं.

कोणी फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ अहमदनगरला होता. त्याचं निधन झालं आणि त्याची बारा वर्षांची मुलगी अनाथ झाली. हा वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणे कर्जबाजारी होता आणि त्याच्या मुलीकडे फ्रान्सला परत जाण्यासाठीही पैसे नव्हते. सध्या श्रीरामपूरच्या मिशनरी चर्चने तिला आश्रय दिला होता; पण तिला लौकरात लौकर तिच्या मातृभूमीला परत पाठवण्यासाठी आर्थिक मदत पाहिजे होती. पुढे त्या मुलीचं नाव आणि इतर तपशील दिले होते. पत्राखाली हे आवाहन करणारीचेही तपशील होते - कोणी हेपझिबा चिनेरी (Hepzibah Chinnery), आणि खाली व्यवस्थित पत्ता होता - परेड ग्राउंड रोड, पुणे कॅन्टोन्मेंट. पण पत्रव्यवहार मुंबई जीपीओच्या एका पोस्टबॉक्समार्फत करायचा होता. या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे उभे झाले नाहीत, तर मिशन त्या मुलीला मद्रासच्या युरोपीय अनाथाश्रमात पाठवेल असाही उल्लेख पत्राच्या शेवटी होता.

ब्रुईनने पत्र खाली ठेवलं, आणि सुस्कारा सोडला. "I hope you didn't pay up?"

"I am confused. This might be a genuine call for help. The French are too proud to ask for help from us, that too, in a distant colony like India. You remember the Dubois twins in your class? Antoinette and Paulette? You remember how they would refuse to let you help them in Maths? I can fully see that poor Botanist getting caught up in the web of money sharks, dying, and leaving his poor child not provided for." मिस ग्रीनस्मिथ तळमळीने म्हणाल्या.

"So you did pay them, then." ब्रुईन म्हणाला.

"No. At least, not yet. I want to.., but I also feel there might be something fishy here. So I came here to ask for your professional opinion. Do you think this is genuine? Maybe you know someone in this Sreerampore Mission, or these Chinnerys from Poona?" मिस ग्रीनस्मिथ म्हणाल्या.

"I will make enquiries, Ma'am. But if I were a betting man, I would put my money on this being a fraud." ब्रुईन ओठ आवळत म्हणाला.

"Why so, Harry?"

"I can show you. We are aware of this person's previous attempts." ब्रुईन सांगू लागला. "First, see the story that has been created. An orphaned girl – that is enough to make anyone's heart bleed. Particularly - and forgive me for saying this, Ma'am - of a kind old lady like yourself. Plus, there is an imminent threat of her being sent to an orphanage far far away from home. And lastly, look who she is – a Frenchwoman, and a child of a Botanist. An intellectual. You, a schoolteacher, would be more likely to cough up the cash if you can empathise with the person you're about to help. The person asking for help is interesting too – her name comes straight from the Bible. Her surname is solid British. She lives in Poona Cantonment. You can almost picture her as someone like yourselves – an old lady trying to do some good in the world. I would say, Ma'am, this is a letter written especially for you. There is no French botanist. I doubt if there are any Chinnerys in Poona, and I am almost sure there isn't any missionary society in Srirampore. My wife was born in Ahmednagar – I can ask her tonight if she knows of it."

"So you're sure this is a hoax?" ग्रीनस्मिथबाई नि:श्वास सोडून म्हणाल्या.

"I am very sorry Miss Greensmith, but yes, such is my professional opinion." ब्रुईन निग्रहाने म्हणाला.

"Very well. I trust you, Harry. I won't be paying. But please will you contact me if you ever find this was a genuine thing? I am not a woman of means, not by any stretch of the imagination. But I like to help where I can."

"I understand, Ma'am."

"I won't take any more of your time, then. Thanks for humouring me, Mr Superintendent." ग्रीनस्मिथबाईंनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्याकडे स्मितपूर्वक पाहिलं.

"Deputy." ब्रुईनने चूक सुधारली.

"That won't be for long, I am sure." ग्रीनस्मिथबाई हसल्या. "May I have the letter back?"

"As a matter of fact, I would like to keep it, if you don't mind. Sending such letters is a crime. I want to find this person and stop this from happening again."

"Very well, then. But don't you have bigger crimes to worry about? What happened to murders and dacoities8?" ग्रीनस्मिथबाईंनी विचारलं.

"Small crimes breed bigger ones, Ma'am. This is like teaching a toddler not to lie to her parents. You tolerate the first one, and then before you know it the lies get bigger and more frequent."

ग्रीनस्मिथबाई निघून जाताच ब्रुईनने आपला मोर्चा परत पत्राकडे वळवला. आता मजकूर वाचायच्या भानगडीत न पडता त्याने कागद नाकाशी नेला.

"Vetiver. Interesting." तो स्वतःशीच म्हणाला.

पुढले दोन दिवस ब्रुईन वेगवेगळ्या इतर कामांत अडकला. म्हातारपाखाडी भागात एक आग लागली. आग विझवण्याचं काम पोलिसांचं नसलं, तरी आजूबाजूची रिकामटेकडी गर्दी आवरून अग्निरक्षकांना स्वतःचं काम करू देणे यात नाही म्हटलं तरी बराच वेळ गेला. तो तयारी करत होता ती कोर्टाची जबानी पार पडली. न्यायमूर्ती हॉजेस अचानक आजारी पडले, आणि त्याजागी नुकतेच विलायतेहून शिकून आलेले न्यायमूर्ती पारडीवाला काम पाहात होते. त्यांनी ब्रुईनची साक्ष बारीक नजरेने तपासली. त्यांच्या प्रश्नांची लेखी उत्तरं द्यायला एक संपूर्ण दिवस गेला. दोन दिवसांत ग्रीनस्मिथबाईंच्या पत्रावर कोणतंही काम करायला त्याला उसंत मिळाली नाही. तिसऱ्या दिवशीच्या पहाटे मात्र त्याने सलग दोन तास त्या पत्रावर खर्च केले. ब्रुईन रोज पहाटे चार वाजताच चौकीत येई. धोतरकुडत्याचा त्याचा आवडता वेष करून, पहाटेच्या शांततेत एखाद्या बौद्धिक कोड्यावर विचार करणं त्याला आवडे. या काळाला तो 'तपश्चर्या' म्हणत असे. अनेक चांगल्या कल्पना त्याला पहाटेच्या या काळात सुचल्या होत्या.

आजही त्याने एका कागदावर त्या पत्रासंबंधी टिपणं काढली. दिवसभरात तो त्यावर काम करणार होता. आपल्या कामाकडे समाधानाने पाहात त्याने खांदे ताणत केसांतून दोन्ही हात फिरवले. बाहेर फटफटलं होतं. थोड्याच वेळात धोतरकुडत्यातल्या नखशिखान्त भारतीय हॅरी ब्रुईन उर्फ 'हरीभाऊ'ला निरोप देऊन ब्रिटिश अधिकाऱ्याचा पोशाख केलेल्या डेप्युटी सुपरिंटेंडेन्ट ब्रुईनला बाहेर काढायची वेळ होत आली होती.

हरीभाऊ मराठी, हिंदुस्तानी, आणि गुजराती भाषा अस्खलित बोलत असे. भायखळ्याच्या शाळेत या भाषा बोलणारे त्याचे मित्र होते. त्यांच्या आयांच्या हातचे पातोळे, दालपुऱ्या, आणि पात्रानी मच्छी त्याने बोटं चाटत खाल्ली होती. कोणाच्या घरात जाताना बूट काढायचे, कोणाच्या कमरेभोवतीच्या कश्तीची चेष्टा करायची नाही, आणि कोणाला रोज्याच्या दिवशी खायचा आग्रह करायचा नाही हे त्याला माहीत होतं. राग आल्यावर या तिन्ही भाषेत तो मनमुराद शिव्या देऊ शके. उलट त्याच्या हॅरी ब्रुईन रूपावर अनेक बंधनांचे काच होते. 'प्रॉपह' उच्चारांची इंग्रजी तो त्याला सांभाळणाऱ्या युरोपीय नॅनीकडून शिकला होता, आणि पुढे शाळेत मिस ग्रीनस्मिथसारख्या शिक्षिकांकडून. या भाषेत शिव्या देण्याची कल्पनाही त्याला परकी वाटे. मुंबईतले ब्रिटिश ब्रुईन कुटुंबीयांच्या घरोब्याचे असले, तरी डॉर्सेटमधल्या त्यांच्या मूळ गावी कसं वागायचं हे त्याला कळलं नसतं. अर्थात तो अजून तिथे गेलाही नव्हता म्हणा.

ब्रुईनचा युनिफॉर्म आतल्या दालनात होता. त्या दिशेने तो जाणार इतक्यात महादबा दार ढकलून वाऱ्यासारखे आत आले. त्यांच्या मुद्रेवर उत्साह आणि उत्कंठा यांचं मिश्रण होतं. पोलीस कचेरीच्या रीतीरिवाजांत मुरलेले महादबा एखाद्या युरोपीय अधिकाऱ्याच्या दालनात असे दारही न ठोठावता घुसणं याला काही अर्थ होता. ब्रुईनला तो समजला.

"कुठे?" त्याने विचारलं.

"पेरू गल्ली, साहेब."

***

.तीन

मुंबई ही पूर्वी सात बेटांनी बनलेली होती. या बेटांच्या रचनेमुळे जहाजांना आसरा मिळे. त्यामुळे मुंबई बंदर निर्माण झालं. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत विभागाला मुंबई बंदराचं महत्त्व जाणवलं आणि त्यांनी १६५२ साली 'हे बेट ब्रिटिश साम्राज्याने पोर्तुगीजांकडून विकत घ्यावं' अशी आपल्या श्रेष्ठींना गळ घातली. १६६१ साली दुसऱ्या चार्ल्स राजाला मुंबई हुंड्यात मिळाली. मग १६६८मध्ये त्याने ती ईस्ट इंडिया कंपनीला लीजवर दिली. मुंबई बंदराचा विस्तार तेव्हापासून वाढताच होता. बंदर म्हटल्यावर त्याच्या आजूबाजूला इतर अनेक पूरक व्यवसायधंदे उभे राहतात. जहाजातून आलेला किंवा जहाजावर पाठवायचा माल तात्पुरता सुरक्षित ठेवायची व्यवस्था बंदराच्या नजीकच असायला लागते. पेरूगल्ली असाच एक भाग होता. पूर्वी तिथे पेरूच्या बागा असाव्यात. आता १८९५ साली पेरू गल्लीत दुतर्फा दुमजली चाळी होत्या. पण त्यात माणसे राहत नसत. खालचे मजले उंच छताचे असत आणि त्यात माल ठेवला जाई. वरचे मजले - मजले कसले, पोटमाळेच ते - पूर्वी कारकुनांच्या, कोठावळ्यांच्या, आणि क्वार्टरमास्टर्सच्या9 वापरासाठी होते. तिथे बसून मालाचा हिशोबठिशोब ठेवला जाई. प्रसंगी मालाचे सौदे होत. गेल्या दहा वर्षांत रस्ते सुधारले आणि बंदरापासून मुख्य मुंबई शहरात जायला वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध झाली. मग आता हे कारकून आणि कोठावळे आपापल्या मालकांच्या पेढीवरच बसत. जहाजांचे क्वार्टरमास्टर्स घोड्यांचे एक्के10 करून पेढीवर जात. या निमित्ताने त्यांना शहरातही फिरता येई. त्यामुळे वरचे मजले / पोटमाळे रिकामे पडले होते. वस्तीबाहेर, आणि बंदरासारख्या कुख्यात जागेच्या जवळ असल्याने त्यात कमी भाड्यानेही कोणी कुटुंब राहायला तयार नसे. मग हे पोटमाळे मालकांचे मुनीम लोक अगदी नाममात्र भाड्याने बोटींवरून आलेल्या खलाशांना तात्पुरते राहण्यासाठी उपलब्ध करून देत. शहरातले इतर भणंग आणि गणंगही आपापले अर्धकायदेशीर किंवा प्रसंगी बेकायदेशीर उद्योग चालवायला या खोल्या भाड्याने घेत. ब्रुईनच्या खात्याला याची कल्पना नव्हती असं नाही पण अजूनपर्यंत विशेष लक्ष द्यावं असंही काही तिथे घडलं नव्हतं.

अजूनपर्यंत. कालपर्यंत. आज सकाळपर्यंत. आत्ता पंधरा मिनिटांपूर्वीपर्यंत.

आज पहाटे माल वाहणारा एक हातगाडीवाला हमाल आपली गाडी घेऊन पेरूगल्लीतल्या लखमशेटच्या गोदामाखाली उभा होता. अचानक त्याच्या हातावर काही थेंब पडले. त्याने दुर्लक्ष करत हात आपल्या धोतराला पुसले. आणखी शिंतोडे पडले. शिंतोड्यांना काही वेगळा वास आला. हमाल सावध झाला. उंच इमारतींमुळे पेरूगल्लीत दिवसाही काळोख असे. पहाटे गल्ली आणखी अंधारी भासे. हमाल आपली गाडी घेऊन बाहेर मोठ्या रस्त्यावर आला. गॅसदिव्याच्या उजेडात जे दिसलं त्याने त्याची बोबडीच वळली. त्याच्या अंगावर, कपड्यांवर, हातगाडीवर रक्ताचे मोठेमोठे ठिपके दिसत होते.

हमाल घाबरून ओरडायला लागला. सकाळच्या सुनसान वेळेला त्याचा आवाज महादबाच्या कानांवर पडला. ब्रुईनला पहाटे चार वाजता क्रॉफर्ड मार्केट चौकीत सोडून महादबा बंदरभागाची बीट11 करत असे. हमालाच्या आरड्याओरड्याने सावध होऊन महादबाने पेरूगल्लीत मुसंडी मारली. आणि त्याला ते दृश्य दिसलं! लखमशेटच्या गोदामाच्या वरच्या मजल्यावर दोन पोटमाळे होते. त्यातल्या एका पोटमाळ्याच्या खिडकीतून रक्ताचे रक्ताचे ओघळ लागले होते. त्यातलंच थोडं रक्त हमालाच्या अंगावर उडालं होतं.

महादबा एकटाच काही करू शकत नव्हता. हमाल तर भीतीने मुटकुळं होऊन कडेला बसला होता. भराभर विचार करत महादबाने त्याला तिथेच बसवून क्रॉफर्ड मार्केट चौकीत धाव घेतली होती. कोणाकडे अशा प्रसंगी जायचं त्याला माहीत होतं.

अधिक वेळ न दवडता ब्रुईनने क्रॉफर्ड मार्केट चौकीतला सगळा फौजफाटा एकत्र केला आणि पेरूगल्लीत धाव घेतली. तोपर्यंत चांगलं उजाडलं होतं. दिवसाच्या प्रकाशात तो देखावा अधिकच भेसूर दिसत होता. नुकतीच लखमशेटने गोदामाच्या बाहेरच्या बाजूला चुनकळी मारली होती. पांढऱ्याशुभ्र भिंतीवर रक्ताचे ओघळ भयानक दिसत होते. तळाशी निरुंद झालेले ओघळ वर वर बघत गेलं, की रुंद होत गेले होते. त्यांचा उगम उंचावर असलेल्या पोटमाळ्याच्या बंद खिडकीत होता.

पोटमाळ्याना बाहेरून डुगडुगता लाकडी जिना होता. त्यावरून ब्रुईन वर गेला. ओघळ येणारी खिडकी कोणत्या दरवाजामागची आहे याचा विचार करायची वेळ आली नाही, कारण दरवाजा सताड उघडा होता. बाहेरचं रक्त कमी वाटावं इतकं रक्त या लहानशा, बुटक्या खोलीत होतं. भिंतीवर शिंतोडे होते. जमिनीवर एक मोठं थारोळं होतं. खिडकीच्या कट्ट्यावर एक लहान थारोळं होतं. त्यातलाच काही भाग बाहेर भिंतीवर गळला होता आणि हमालाच्या अंगावर पडला होता. काही भाग कट्ट्यावरून ओघळत जमिनीवरच्या मोठ्या थारोळ्याला आणखी मोठं करत होता.

रक्त सोडलं तर खोलीत काहीही नव्हतं.

पण आणखी शोधल्यावर ब्रुईनला दारामागे एक वस्तू मिळाली. एक चकचकीत पितळी बिल्ला. बिल्ल्याचा आकार लंबवर्तुळाचा होता. तो थोडा वाकवलेला होता, आणि दोन्ही कडांना दोन भोकं होती. लास्कर खलाशी असा बिल्ला आपल्या दंडावर बांधतात हे ब्रुईनला माहीत होतं. त्याने उजेडात तो बिल्ला आणखी निरखून पाहिला. त्याच्या बहिर्वक्र बाजूवर दोन मनोऱ्यांच्या मध्ये असलेलं एक दार कोरलं होतं. खाली कोरलेली अक्षरं होती 'Sé'. बिल्ल्याच्या मागच्या, अंतर्वक्र बाजूवर काही अरबी अक्षरं होती. फात्याची12 पहिली काही वळणं ब्रुईनला लक्षात आली. दोन्ही बाजूंच्या कोरीवकामात बराच फरक होता. बाहेरचं / बहिर्वक्र बाजूचं कोरीवकाम सफाईदार होतं. महाग हत्यारांनी केल्याचं जाणवत होतं. आतल्या बाजूचं ओबडधोबड होतं; टोकदार खिळ्याने कोणा हौशी माणसाने केल्यासारखं.

ब्रुईनने बिल्ला खिशात टाकला.

"महादबा, ती पुर्तुगाळी काल आली ना? त्यावरचा एक खलाशी बेपत्ता आहे का चौकशी करा," तो म्हणाला. "मी तोपर्यंत या शेजारच्या खोलीत काय आहे बघतो."

शेजारच्या खोलीचं दार बंद होतं. आत कोणी असावं. ठोठावून बघायच्या भानगडीत न पडता ब्रुईनने सरळ खांद्याच्या एकाच धडकेत दाराचा बीमोड केला, आणि आत घुसला. याही खोलीत फारसं काही सामान नव्हतं. खोलीच्या मध्यभागी अंगाचं मुटकुळं करून एक माणूस घोरत होता. त्याच्या कमरेला मळकी लुंगी होती, आणि अंगावर धुतलेला, पण मळकट भासणारा सदरा. त्याच्या कातडीच्या रापलेल्या गोऱ्या वर्णनावरून तो युरोपीय, किंवा अँग्लो इंडियन13 वाटत होता. शेजारी इतकी गडबड चालू असूनही त्याच्या झोपेवर ढिम्म परिणाम झाला नव्हता.

"अबे उठ!" ब्रुईनबरोबरचा एक शिपाई ओरडला, आणि झोपलेल्या माणसाला बुटाचा तडाखा देणार इतक्यात ब्रुईनने त्याला थांबवलं. त्याच्या उशाशी असलेल्या ट्रंकेकडे त्याचं लक्ष वेधलं गेलं होतं.

दर्यावर्दी लोकांची असते तशी भलीभक्कम सागवानी लाकडाची ती ट्रंक होती. लोखंडी रिबोटांनी14 लाकडी फळ्या पक्क्या जोडल्या होत्या. बाहेरून लाखेचा हात दिल्याने ट्रंक चकाकत होती. ट्रंकेला वळणदार कडी होती, आणि ब्रिटिश बनावटीचं 'बेलफ्राय' कुलूप शेजारी किल्लीसह पडलं होतं.

"चोर दिसतोय साहेब.." मघाचा शिपाई म्हणाला आणि त्याने हातातला दंडुका उगारला.

"शिगवण, थांबा. असं येता जाता मारू नका लोकांना काही कारण नसताना." ब्रुईन तीक्ष्णपणे म्हणाला. "ती ट्रंक उचला आधी आणि चौकीत घेऊन चला. यालाही झोळी करून न्या."

ब्रुईन परत रक्ताळलेल्या खोलीत आला. त्याच्या कपाळावर आठ्या होत्या. समोरच्या रक्ताच्या आकारांमध्ये ब्रुईनला काही ओळखीचं, कशाची तरी आठवण करून देणारं काहीतरी जाणवत होतं. हे किंवा यासारखे आकार त्याने कुठेतरी पाहिले होते. ब्रुईनची स्मृती फार तीक्ष्ण होती. एकदा पाहिलेली गोष्ट त्याच्या डोक्यात कायमची प्रतिमेच्या स्वरूपात जाऊन बसे. पण नंतर डोक्यातल्या असंख्य प्रतिमांतून आपल्याला हवी ती प्रतिमा शोधायला त्याच्या मेंदूला वेळ लागत असे. अशी कोणतीही आठवण आली की ब्रुईन ती आठवण त्याच्या व्यक्तिमत्त्वातल्या कोणत्या भागाशी संबंधित आहे हा प्रश्न स्वतःला सर्वप्रथम विचारत असे. त्यावरून अशा आठवणींचा माग काढणं सोपं जाई. ही आठवण नक्की 'हरिभाऊ'ची होती. या दृश्याचा एक फोटोग्राफ काढून ठेवावा असं त्याच्या मनात आलं. काळा घोडा भागातल्या सुप्रसिद्ध 'बोर्न अँड शेफर्ड' फोटोग्राफी स्टुडियोच्या15 मुंबई शाखेचा मॅनेजर त्याच्या परिचयाचा होता. पण फोटोग्राफीचं ते अवजड सामान घेऊन इथे येणे आणि फोटो काढणे यात भरपूर वेळ गेला असता. शिवाय या फोटोचा नक्की उपयोग काय याबद्दल वरिष्ठांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली असती ती वेगळीच. ब्रुईनने विचार सोडून दिला.

रक्ताळलेल्या खोलीकडे एक शेवटचा दृष्टिक्षेप टाकून ब्रुईन तशाच विचारमग्न अवस्थेत क्रॉफर्ड मार्केट चौकीत परतला. सूर्य माथ्यावर आला होता. पंचनामा, कॉरोनर वगैरे उपचार पार पाडायला महादबा आणि मंडळी समर्थ होती. ब्रुईनला त्या झोपलेल्या माणसाची ट्रंक बोलवत होती. पण नेहमीची इतर कामंही खोळंबली होती, आणि वरिष्ठांना या केससंबंधी माहितीही द्यायला हवी होती. आजचा दिवस यातच जाणार अशी खूणगाठ बांधत ब्रुईनने दुसऱ्या दिवशी पहाटेच्या शांततेत ट्रंक नीट पाहायची असं ठरवलं.

***

.चार

परत एकदा पहाट. परत फाटकावरून सराईत उडी. गल्लीच्या टोकावरून परत खंड्या डोकावला. पण यावेळेला भुंकण्याआधीच कोणीतरी त्याच्या गळ्याला धरून त्याला मागे ओढलं.

"शूश्: ए खंडू! आपणा हरिभाई छे ए. भसवानुं नहीं!"

ब्रुईन पोचेपर्यंत त्या म्हाताऱ्याशा व्यक्तीने खंड्याला गळ्यात पट्टा बांधून एका झाडाला बांधून ठेवलं होतं. तिथेच पाण्याच्या दोन घागरी ठेवलेल्या होत्या.

"केम छे मासी?" ब्रुईनने विचारलं. "आखुं अठवाडियुं क्यां हती?"

"खोडियार माए बोलावी हती बेटा." ती वृद्धा म्हणाली. "भावनगर जवुं पड्युं, ने त्यांथी बळदगाडामां पहोंची. वरसमां एकवार जती होउं छुं."

"ठीक, ठीक." ब्रुईन म्हणाला. "जय खोडियार मा ! पण मासी, अहिंया झाड नीचे पसारीने बेसवानुं न राखती, पोलीस काढी मुकशे तने."

"ना रे बच्चा. मने तो थोडी अमथी जग्याय बहु थई गई." असं म्हणत ती वृद्धा जवळच्या घागरीतून पाणी शिंपत सडा घालू लागली. आदल्या दिवशीच्या उन्हाने वाळलेली जमीन पाण्याच्या वर्षावाखाली तृप्त होऊ लागली. ओल्या मातीचा सुगंध ब्रुईनच्या नाकात शिरला आणि तो सावध झाला. दोन पावलांत तो त्या वृद्धेच्या मागे जाऊन उभा राहिला. एक नजर त्याच्याकडे टाकून ती सडा शिंपत राहिली, आणि पडणाऱ्या तुषारांकडे बघत ब्रुईन गुंगला. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमललं.

चौकीत पोचल्यावर महादबा आणि ब्रुईन कच्च्या कैद्यांच्या कोठडीत गेले. काल पकडलेला कैदी अरुंद खाटेवर झोपला होता. ढेकूण त्याला त्रास देत होते पण त्याची झोप त्याने भंग पावत नव्हती.

"काल दिवसभर शिगवण याला बोलतं करायचा प्रयत्न करत होता, साहेब. पण हा काहीच बोलत नाही. चेहरा कोराच्या कोरा. शून्यात बघत बसतो. तुम्हाला आवडत नाही म्हणून अजून काही मारहाण केली नाही, पण बहुधा…"

"करायला लागेल, असंच ना?" ब्रुईन हसत म्हणाला. "काहीच चाललं नाही तर तेही करू. महादबा, हा उठला, की त्याला नागडं करून आंघोळ घालायला सांगा. आणि त्याचे सगळे कपडे माझ्याकडे घेऊन या."

"साहेब, अजून पेरू गल्लीतली बॉडी सापडली नाही." महादबा परेशान मुद्रेने म्हणाले.

"सापडणार पण नाही." ब्रुईन डोळे मिचकावत म्हणाला.

"म्हणजे?" महादबा कोड्यात पडले.

"नंतर सांगतो. आधी सांगा - पुर्तुगाळीवर तपास केलात?"

"होय साहेब. मी दस्तुरखुद्द गेलो होतो. एक का साहेब, दोन खलाशी बेपत्ता आहेत."

"दोन! This is even better!" ब्रुईन खुश होऊन म्हणाला. "काय नावं त्यांची?"

महादबांनी काही न बोलता खिशातून एक कागद काढून ब्रुईनला दिला. त्यावर सुंदर कॉपरप्लेट हस्ताक्षरात लिहिलं होतं :

पेद्रो सोरिया मुनोझ, थर्ड मेट

अफसरुद्दीन मकसूद, लास्कर

"ते कापितानोसाहेब तुम्हाला भेटायला येणार आहेत आज." महादबा म्हणाले.

"असं? काही विशेष? माणसं हरवल्याची तक्रार घेऊन खुद्द कॅप्टन?" ब्रुईनला आश्चर्य वाटलं.

"तुम्हांलाच काय ते सांगणार म्हणाले. मी जास्त विचारलं नाही. दहा वाजेपर्यंत येतील."

"हं.. So be it." ब्रुईन वळत म्हणाला. "त्या पकडलेल्या माणसाजवळ एक ट्रंक होती ना? चला त्यात काय आहे बघू या."

'माणसाचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं असेल तर आपली प्रवासी ट्रंक तो कशी भरतो ते बघावं' असं ब्रुईनची आई म्हणत असे. ही सागवानी लाकडाची ट्रंक पाहून ब्रुईनचं त्याच्या मालकाविषयी मत अनुकूल झालं. लोखंडी कड्यांना व्यवस्थित तेलपाणी केलं होतं. हलक्या लाकडाची फळी घालून ट्रंकेचे दोन भाग केले होते. एकात कपडे होते. दुसऱ्यात लिखाणाचं सामान होतं - शाईच्या दौती, टाक आणि बोरू, लिफाफे, लहानशा होडीसारखा दिसणारा शाई टिपायचा 'ब्लॉटिंग स्टॅम्प', लाख, मेणबत्त्या, आणि पातळ कापडात गुंडाळलेली कागदाची थप्पी. ब्रुईनने एक कागद काढून पाहिला. चांगल्या प्रतीचा कागद होता तो. नेहमी खरखरीत सरकारी कागदांवर लिहिण्याची सवय असलेल्या ब्रुईनला त्या कागदाचा गुळगुळीत स्पर्श सुखावून गेला.

कुबट वास येऊ नये म्हणून वाळ्याचे लहान पुंजके दोरीने बांधून ट्रंकेत ठिकठिकाणी ठेवले होते. ब्रुईनने एक पुंजका काढून त्याचा वास घेतला. मग काहीतरी सुचून त्याने ट्रंकेतल्या प्रत्येक वस्तूचा वास घ्यायला सुरुवात केली.

त्याच्या डोक्यात आणखी एक कोडं सुटलं होतं !

पकडलेल्या कैद्याला बोलतं करायला आता वेळ लागणार नव्हता. पण त्याआधी त्याला त्या पुर्तुगाळीच्या कप्तानाशी बोलायचं होतं. जमल्यास मिस ग्रीनस्मिथ यांनाही निरोप पाठवायचा होता.

***

.पाच

"These things are fairly common among seafarers, Senhor." कप्तानसाहेब ब्रुईनला सांगत होते. "But to think one of my compatriots would indulge into it with such a lowly creature as a lascar is beyond my imagination."

सांगितल्याप्रमाणे दहाच्या ठोक्याला कप्तानसाहेब हजर झाले. मूळचा तपकिरी छटा असलेला त्यांचा पोर्तुगीज गोरा वर्ण सततच्या समुद्रप्रवासामुळे आणखी रापला होता. कप्तानसाहेब उत्तम इंग्रजी बोलत असले तरी ती त्यांची मातृभाषा नाही हे जाणवत होतं. त्यांनी ब्रुईनशी एकांतात बोलायची इच्छा व्यक्त केली. काहीशा अनिच्छेनेच महादबा तिथून उठून गेला. पण जाताना ब्रुईनने त्याच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. महादबा काय ते समजला.

कप्तानसाहेबांनी स्वतःची ओळख करून दिली. आणि मग ते मुद्द्यावर आले. त्यांच्या जहाजावर एक तरुण, पेद्रो सोरिया मुनोझ, नुकताच थर्ड मेट म्हणून कामाला लागला होता. त्याला भूमध्य समुद्राच्या भागात खलाशीकाम केल्याचा अनुभव असला, तरी हिंदुस्तानाची त्याची ही पहिलीच सफर होती.

या पेद्रोचे जहाजावरच्या एका लास्कर खलाशाशी प्रेमसंबंध होते. लिस्बनहून निघाल्यापासून ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली नव्हती. पण सुवेझ कालवा आणि लाल समुद्र पार करून जहाज एडन बंदरात आलं, आणि जहाजावरचे बहुतेक सगळे खलाशी आणि अधिकारी जमिनीवर गेले. अशा वेळी जहाजावरची ड्युटी कोणी स्वतःहून मागत नाही. पण पेद्रो आपणहून मागे राहिला. काही कारणाने जहाजाचा स्टुवर्ड लवकर परत आला, तर ऑफिसर पेद्रो कुठेच दिसेना. म्हणून त्याने पेद्रोच्या केबिनमध्ये जाऊन पाहिलं, तर तिथे त्याला पेद्रो आणि लास्कर खलाशी अफसरुद्दीन सापडले. स्टुवर्डने ही गोष्ट कप्तानसाहेबांच्या कानावर घातली. त्यांनी हुकूम देऊन लास्कर खलाशाला त्याच्या सारंगाच्या हवाली केलं. सारंगाने अफसरुद्दीनला ताबडतोब बंदीवान करून जहाजाच्या तळाच्या कोठडीत टाकलं. दुसरीकडे कप्तानसाहेबांनी ऑफिसर पेद्रोची स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली आणि 'असले चाळे' त्यांच्या जहाजावर चालणार नाहीत असं बजावून सांगितलं.16 जहाज मुंबई बंदरात आलं आणि रात्रीच्या अंधारात पेद्रोमहाशय आपल्या अफसरुद्दीनला कोठडीतून सोडवून जहाजावरून पळून गेले!

ब्रुईनने नि:श्वास सोडला.

"So you are more concerned that your officer had homosexual17 relations with a person not his social equal?"

कप्तानसाहेबांनी खांदे उडवले.

"So what do you want me to do?", ब्रुईनने विचारलं.

"Will you arrest them, Mister Inspector? Homosexuality is a crime in British India, is it not?", कप्तानसाहेबांनी विचारलं.

"Indeed it is, yes.18 But the crime itself was not committed while your ship was in India.19 I cannot do anything about this matter." ब्रुईन म्हणाला. "But I might want to talk to them in connection to some other matter. But before that…"

ब्रुईनने पेरू गल्लीतल्या खोलीत मिळालेला तो चकचकीत पितळी बिल्ला काढून कप्तानसाहेबांसमोर ठेवला.

"Recognise this, Captain?"

"Why yes! This belongs to our ship! See this word: 'Sé'? That is short for the Lisbon Cathedral, or Sé de Lisboa in Portuguese. We give it as a mark of identification to every able seaman20 on our ship. Where did you find it?" कप्तानसाहेबांनी आश्चर्याने विचारलं.

"Never mind. That's what I thought. Thank you." ब्रुईन त्यांना निरोप देत म्हणाला.

"What happens next, Mister Inspector?" कप्तानसाहेबांनी घुटमळत विचारलं.

"Regarding your two love birds? Nothing. They haven't committed a crime in British India. But if they do, rest assured we will bring them to justice."

"Do you consider homosexuality a crime?"

"Me personally? No. We are who we are, and Our Lord has made some of us different from the rest. That doesn't necessarily make one a criminal." ब्रुईन आढ्याकडे नजर लावत म्हणाला. "But the law of this land does treat it as a crime. I will have to enforce the law if they get caught."

तरीही कप्तानसाहेब घुटमळले. त्यांना आणखी काही विचारायचं होतं असं त्यांच्या चर्येवरून दिसलं. पण ब्रुईनने ताकास तूर लागून दिला नाही. शेवटी बरीच अळंटळं करून, "Are you sure there is nothing else?" असं दोनतीनदा विचारून ते गेले.

फारसा आवाज न चढवता ब्रुईनने हाक मारली, "महादबा !"

ब्रुईनच्या खोलीला असलेल्या चोरदरवाजातून महादबा प्रकटले. वास्तविक तो चोरदरवाजा नव्हता : पंखेवाल्याला बसायला केलेली ती लहानशी खाच होती.

"ऐकलंत ना सगळं?" ब्रुईनने विचारलं. "झाला सगळा उलगडा?"

"अं… नाही साहेब. म्हणजे त्या कप्तानसाहेबाची कहाणी सगळी कळली. पण त्याचा पेरू गल्लीशी काय संबंध?"

"सगळाच तर संबंध आहे! असं काय करता! थांबा.. सांगतो सगळं बयाजवार." ब्रुईन खुर्चीवर बसत सांगू लागला.

"लिस्बनमध्ये पेद्रो सोरिया मुनोझ पुर्तुगाळीवर 'थर्ड मेट' म्हणून नोकरीला लागला. थर्ड मेट म्हणजे सर्वात कनिष्ठ दर्जाचा अधिकारी. पण तरीही खलाशांपेक्षा वरच्या दर्जाचा. त्याच्यात आणि अफसरुद्दीन मकसूद नावाच्या एका खलाशात प्रेमसंबंध होते. हे अगोदरपासूनच होते की पुर्तुगाळीवर निर्माण झाले आपल्याला माहीत नाही. आणि ते तितकं महत्त्वाचंही नाही."

"समलैंगिक संबंध म्हणजे काहीतरी भयानक असं तुम्हाला वाटेल, महादबा. इंग्लंडमध्ये आणि इथे हिंदुस्तानातही, कायद्याप्रमाणे तो गुन्हा आहे. याचा अर्थ तशा गोष्टी घडतच नाहीत असा नाही. लपूनछपून घडतात. पण समुद्रावरच्या खलाशांमध्ये हा प्रकार बराच चालतो."

"पण साहेब, हा गुन्हा आहे." महादबा अस्वस्थ होऊन म्हणाले.

"आजच्या कायद्याप्रमाणे, हो. पण विचार केलात तर तुमचं मत बदलेल. आपण सगळी देवाची लेकरं. देवानेच एखाद्या लेकराला वेगळं बनवलं असेल, तर त्याबद्दल त्याला शिक्षा का द्यावी? सांगा?" ब्रुईन म्हणाला.

"आता असं म्हटल्यावर, साहेब…"

"असो. पुढची गोष्ट ऐका." ब्रुईन त्यांना अडवत म्हणाला. या तात्त्विक चर्चेचा फारसा फायदा होणार नाही त्याला माहीत होतं. "हा खलाशी अफसरुद्दीन 'लास्कर' होता. लास्कर म्हणजे हिंदुस्थान, मलाया, बर्मा वगैरे भागांतून भरती केलेले खलाशी. याच्या नावावरून हा पूर्व बंगाल प्रांतातला वाटतो. लास्करांच्या टोळ्या असतात आणि प्रत्येक टोळीचा एक नेता असतो. त्याला कधी मुखिया म्हणतात, कधी मेस्त्री, कधी सारंग. आपल्या टोळीचा तो राजा असतो जणू. तर आपल्या टोळीतल्या एकाने गोऱ्या ऑफिसरबरोबर शय्यासोबत केलेली बहुधा त्या सारंगाला पचली नसावी. त्यामुळे त्याने अफसरुद्दीन लास्कराला जहाजाच्या कोठडीत फेकलं. बहुधा हिंदुस्थानात पोचून, काय जातपंचायत वगैरे भरवून त्याला शिक्षा द्यायचा त्याचा बेत असावा. कदाचित जीवही घेतला असता. म्हणजे पुढल्या घटनांवरून असं म्हणावं लागतं."

"तुलनेत आपल्या पेद्रोला काहीच त्रास झाला नाही. पण अफसरुद्दीनने आपल्या जिवाला असलेला धोका कसातरी पेद्रोला सांगितला असावा. कारण मुंबई बंदरात आल्यावर आपल्या पेद्रोने कसंतरी अफसरुद्दीनला सोडवलं आणि दोघांनी मुंबईत पळ काढला."

"पण नुसतं पळून जाणं पुरेसं नव्हतं. सारंगाची माणसं त्याच्यापर्यंत कशीही पोचली असती. त्यासाठी अफसरुद्दीनने 'मरणं' आवश्यक होतं. म्हणून पेद्रोने हा सगळा बनाव रचला. आडबाजूच्या निर्मनुष्य पेरूगल्लीत एक खोली भाड्याने घेतली. कोणातरी खाटकाकडून बैलाचं नाहीतर रेड्याचं रक्त आणून ते खोलीभर शिंपडलं. अफसरुद्दीनचा बिल्ला त्या खोलीत फेकून दिला. पाहणाऱ्याला असं वाटावं की जणू इथे खूनच झालाय, आणि बॉडी कुठेतरी दुसरीकडे नेऊन टाकलीय."

"पण खून झालाच नाही हे तुम्हाला कसं कळलं?" महादबाने विचारलं.

"हां! मला सुरुवातीला जरा शंका आली होती. कारण माणसाच्या अंगात साधारण दहा पाईंट21 रक्त असतं. आणि त्या खोलीतलं रक्त त्यापेक्षा नक्कीच जास्त होतं. शिवाय, खून झाल्यावर फक्त रक्तच कसं निघेल? शरीराचा एखादा भाग सापडायला पाहिजे ना? पण रक्त सोडून खोली एकदम स्वच्छ होती. आणि शेवटी आपल्या दयामासीने तर माझी खात्रीच पटवली की हा खूनबीन काही नाही."

"दयामासी? तुमच्या घराजवळची? खोडियार माँला जाऊन आलेली म्हातारी? तिचा काय संबंध?"

"अहो ती काल सकाळी सडा घालत होती. आणि ते बघताना माझ्या लक्षात आलं, की आपण समजा तपेलीने पाण्यासारखा काही पदार्थ जमिनीवर शिंपडला तर जशी आकृती जमिनीवर दिसते, तसेच ते रक्ताचे डाग आहेत. म्हणजे कोणीतरी चक्क रक्ताचा सडा घातला होता! जिवंत माणसाला भोसकल्यावर येणारं रक्त जमिनीवर सांडलं तर असं शिंपडल्यासारखं दिसणार नाही!"

"पण साहेब, मला अजूनही हे पटत नाही." महादबांनी शंका काढली. "तुम्ही म्हणता तसं झालं असं धरू या. ते दोघे गेले पळून. जगाच्या लेखी तो अफसर की कोण तो खलाशी मेला आहे, आणि त्याचे दोस्त लोक त्याला शोधणार नाहीत. ठीक. पण त्या पेद्रोचं काय? त्याच्या कपाळी खुन्याचा शिक्का फुकटंफाकट बसला ना ! असं कोण स्वतःच्या माथी घेईल?"

"प्रेमासाठी माणसं काहीही करतात, महादबा!" ब्रुईन मिश्कीलपणे हसत म्हणाला. "आणि खरं तर तेवढंही करायची गरज नाही. आपले कप्तानसाहेब कशासाठी आहेत?"

"म्हणजे?"

"म्हणजे - पेद्रोचं नाव पेद्रो आहे हे आपल्याला कोणी सांगितलं? कप्तानसाहेबानेच ना? त्याने हे खरं नाव दिलं असेल कशावरून? आपल्या नायकाचं खरं नाव काहीतरी वेगळंच असणार याची मला खात्री आहे. कप्तान या सगळ्या कटात सामील असणार. मला तर वाटतं ही सगळी कल्पनाच कप्तानाची असणार. जहाजाच्या कोठडीच्या चाव्या कप्तानाकडे नाही तर कोणाकडे असणार? शिवाय, पेरू गल्ली आणि तिथे भाड्याने मिळणाऱ्या खोल्या याची माहिती नवख्या माणसाला कशी असेल? याला मुंबईत वारंवार आलेला कोणी जाणकार पाहिजे. आणि ही घटना पोलिसांना सांगण्याची जबाबदारीही त्याचीच. त्यामुळे खोटं नाव देणं त्याला सहज शक्य आहे. मला तर वाटतं कप्तान हुशार असेल तर त्याने जहाजाच्या नोंदींमध्येही फेरफार केले असतील. रेकॉर्डवरचा गुन्हेगार असेल पेद्रो सोरिया मुनोझ. सगळीकडचे पोलीस त्याला शोधतील. पण पळून गेलेला खरा माणूस कोणीतरी वेगळाच असेल !"22

"वा! म्हणून तुम्हीही त्याला मदत केलीत?" महादबा गालात हसत म्हणाला.

"बरोब्बर! मी गुन्हाच नोंदवून घेतला नाही! अर्थात मी काही बेकायदेशीर करतोय असं नव्हे - खून झालेलाच नाही याची मला खात्री आहे."

"मग केस बंद करायची का, साहेब?"

"केस उघडीच नाहीये बंद करायला !" ब्रुईन हसला.

"आं … सर त्या पकडलेल्या माणसाचं काय? त्याचा यात काय संबंध आहे?"

"अरे हो! ते मी विसरलोच होतो. बोलावून घ्या त्याला." ब्रुईन म्हणाला.

"बोलता नाही तो, साहेब. शिगवण म्हणतो दोन रट्टे…"

"आणा तर खरं."

***

.सहा

हळूहळू चालत तो माणूस ब्रुईनच्या खोलीत आला. ब्रुईनने त्याला खुर्चीत बसायचा इशारा केला. पाठोपाठ त्याला आणायला गेलेले महादबा आले, आणि दुसऱ्या खुर्चीत बसले. मागून एक शिपाई त्या माणसाची लाकडी ट्रंक घेऊन आला.

ब्रुईनने ट्रंकेतून कागदांचा गठ्ठा काढला.

"महादबा, डोळे मिटा. घट्ट." महादबांनी त्याप्रमाणे केलं. "आता वास घ्या आणि सांगा कसला वास आहे हा?"

ब्रुईनने प्रथम ट्रंकेतल्या गठ्ठ्यातून काढलेला कागद महादबांच्या नाकाशी धरला.

"हा तर वाळ्याचा वास आहे." महादबा म्हणाले. "उन्हाळ्यात याचे पडदे…"

"मला माहीत आहे ! Vetiver म्हणतात याला इंग्लिशमध्ये. अत्तर म्हणून वापरतात." ब्रुईन म्हणाला. "आता याचा वास घ्या."

त्याने मिस ग्रीनस्मिथकडून घेतलेलं पत्र टेबलाच्या खणातून काढून महादबांच्या नाकाशी लावलं.

"तोच वास आहे की ! जरा हलका आहे पण, कारण यात शाईचा थोडासा वास आहे." महादबा मिटल्या डोळ्यांनी म्हणाले.

"शाबास, महादबा." ब्रुईन म्हणाला, आणि हा प्रकार थंड डोळ्यांनी पाहात बसलेल्या त्या माणसाकडे वळून म्हणाला, "Listen, Mister. I know you wrote this letter. You are the infamous 'Bombay Beggar'. You may wish to remain silent, but I will find your name out soon enough. I am going to Miss Greensmith's place this evening. You know her in person, don't you? That's how you chose her as your target. She can come here and identify you in person. Or I could go to my alma mater, the Christ Church School of Byculla23. Probably your alma mater, too?"

"जॉन ओवेन मॅन्सल." तो एकाएकी मराठीत म्हणाला. "माझं नाव जॉन ओवेन मॅन्सल. तुमच्या मागे सहा वर्षं होतो शाळेत. तुम्हांला ओळखतो मी ब्रुईनसाहेब."

"ओह! शाळेत आपण कधी बोललो होतो का?" ब्रुईनने विचारलं.

"नाही. पण त्यानंतर तुमचं आयुष्य बघतो आहे मी दुरून." मॅन्सल म्हणाला. "हेवा वाटतो तुमच्यासारख्या लोकांचा. तुम्ही दोन्हीकडचे असता. युरोपियनांबरोबर प्रॉपह क्वीन्स इंग्लिश बोलता, आणि या हवालदारसाहेबांसमोर सहज मराठी बोलता."

"तुला जमत नाही का हे, जॉन?"

"नाही. इथेच जन्मलो, इथेच वाढलो. बहुतेक इथेच मरणार. मला येत पण नाही प्रॉपह क्वीन्स इंग्लिश. अन् का बोलायचं मी तसं इंग्लिश? ती गोरी माकडं माझी माणसं नाहीत." मॅन्सल कळवळून म्हणाला.

"नको बोलूस की मग. मराठी झक्क बोलतोस." ब्रुईन म्हणाला.

"नानु स्वल्प कन्नड मातनाडबल्ले. पण काय उपयोग? हिंदुस्तानी लोकांसाठी मी इंग्रज आहे आणि इंग्रजांसाठी मी पुरेसा इंग्रज नाही. तरी माझे आईवडील स्कॉटिश आहेत हां साहेब! आक्करमाशी वाणाचा नाय मी. पण तरी इथल्या ब्रिटिशांसारखा बोलत नाही, तसे कपडे घालत नाही. मला कोणी नोकरी देत नाही. दिली तरी टिकत नाही."

"म्हणून अशी फसवाफसवीची कामं करतोस?" ब्रुईन म्हणाला.

"कोणाला भेटायला नको वाटतं. कोणाशी बोलायला नको वाटतं. सगळे माझ्याकडे बघून मला हसताहेत की काय, माझी थट्टा करताहेत की काय असं सारखं वाटत राहतं. इतकं, की कधीकधी वाटतं संपवावं हे सगळं." मॅन्सल कडवटपणे म्हणाला. "पण हिंमत होत नाही. मग पोटासाठी काहीतरी करायला लागतं ना साहेब. हे आपलं घरबसल्या करता येतं. आणि घरही बदलत राहतो अधूनमधून. पेटीत संसार आहे आपला."

"मिस ग्रीनस्मिथ तुलाही शिकवायला होत्या ना? त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला नसतास, तर मी कदाचित दया दाखवली असती." ब्रुईन म्हणाला.

"वाईट वाटतं, ब्रुईनसाहेब, पण काय करणार! पोट आहे माझं. तरी मी मिस ग्रीनस्मिथना काही मोठी रक्कम मागितली नाही. उलट त्यांच्यावर सोडलं, की जितकं शक्य आहे तितकं द्या." मॅन्सल हसला. "खैर. शेजारच्या खोलीतली ती गाढवं नसती, तर मी कधीच सापडलो नसतो तुम्हांला. आता काय करणार आहात माझं?"

ब्रुईनने नि:श्वास सोडला.

"तुझ्यावर खटला चालणार, गुन्हा शाबीत होणार, आणि तू तुरुंगात जाणार, हे तर नक्की आहे. तू लोकांकडून घेतलेले पैसे परत करू शकलास, तर शिक्षा कमी होईल. पण सहा महिने तरी तू डोंगरीला जाणार हे नक्की आहे."

मॅन्सलने "देवाची इच्छा" अशा अर्थाने खांदे उडवले.

"पण, जॉन ओवेन मॅन्सल, तुरुंगातून सुटलास, की इथे मला भेटायला ये. माझ्याकडे तुझ्यासाठी एक नोकरी आहे. वेळच्या वेळेला पगार आणि इतरही काही तजवीज करेन." ब्रुईन म्हणाला.

"माझ्यासाठी? कसली नोकरी?" मॅन्सल चकित झाला.

"ते वेळ आली, की सांगेनच." ब्रुईन हसत म्हणाला. "पण जॉन, एक लक्षात ठेव. या देशात लोक तुझं-माझं फार करतात. पण आपल्यासारखे लोक विशेष आहेत, कारण आपण दोन्हीकडचे असू शकतो. असतोच. हे तुला जितकं लौकर कळेल तितकं चांगलं!

मॅन्सलने हळूहळू मान हलवली.

"बरं - आपली भेट परत होणार नाही आता. तुझ्या खटल्यात महादबाच जबानी देतील." ब्रुईन खुर्चीतून उठत, हात जोडत म्हणाला. "काळजी घे, डोंगरीत. भाकरी फार जाड असतात तिथल्या !24"

(समाप्त)


  1. 'व्हिक्टोरिया' हे एका ब्रिटिशकालीन चारचाकी घोडागाडीच्या प्रकाराचं नाव होतं. तत्कालीन राणीचं नाव कोणा राजनिष्ठ व्यापाऱ्याने या गाडीला दिलं असणार हे उघड आहे. साधारण १८७०पासून या गाड्या लंडनच्या रस्त्यांवर दिसायला लागल्या, आणि हळूहळू ब्रिटिश साम्राज्यभर पसरल्या. शंभर वर्षांनंतर, सुमारे १९७० सालाच्या आसपास बस, ट्रॅम, आणि मोटारगाड्या यांनी त्यांची जागा घेईपर्यंत या 'व्हिक्टोरिया' त्या मरहूम राणीची आठवण जागवत रस्त्यांवरून फिरत असत.  
  2. 'अद्धा' एक जुगाराचा प्रकार आहे.  

  3. 'कोपरी' म्हणजे कोपरापर्यंत बाह्या असलेला सदरा, किंवा धोतरावर घालायचा टीशर्ट.  

  4. पु. ल. देशपांडे म्हणतात तसं मराठी लोक परकीय शब्दांचे 'कोपरे घासून घेतात'. 'बिलंदर' हा 'bilander'चा अपभ्रंश आहे. हा एक दोन डोलकाठ्या असणाऱ्या जहाजाचा प्रकार आहे. 'वलंदेज' म्हणजे नेदरलँड्स (किंवा हॉलंड). हॉलंडच्या लोकांना hollandaise म्हणायचे, आणि त्याचा मराठी अपभ्रंश 'वलंदेज'.  

  5. 'सलुप', अर्थात sloop, म्हणजे एक शिडाची नौका.  

  6. 'पुर्तुगाळी' म्हणजे पोर्तुगाल देशातून आलेली नौका.  

  7. ब्रिटिश सत्तेची भारतात तीन मुख्य केंद्र होती: बंगाल प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी, आणि मद्रास प्रेसिडेन्सी. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये आजचा गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, पाकिस्तानातला सिंध हे भौगोलिक प्रांत होते. गमतीचा भाग असा, की १९३२पर्यंत आजच्या येमेन देशामध्ये असलेलं एडन बंदरही बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्येच समाविष्ट होतं.  

  8. 'dacoity' हा शब्द हिंदी / खडीबोलीतल्या 'डकैती'वरून इंग्रजी भाषेत घुसला आहे. म्हणजे मराठीतला दरोडा.  

  9. 'कोठावळे' म्हणजे कोठीच्या खोलीचा किंवा गोदामाचा ताबा असणारा अधिकारी. मालाची आवकजावक टिपून ठेवणे, वेळेवर गरज भागेल इतक्या वस्तू मिळवणे, त्यांवर देखरेख ठेवणे, अशी त्यांची कामं असत. 'क्वार्टरमास्टर' हा जहाजाच्या किंवा सैन्याच्या तुकडीच्या कोठीवरचा अधिकारी.  

  10. 'एक्का' म्हणजे एका घोड्याने ओढायचा टांगा.  

  11. 'बीट' म्हणजे पोलिसांचा गस्त घालायचा मार्ग.  

  12. 'अल-फतीहा' ही कुराणाची पहिली सुरा (म्हणजे पहिलं प्रकरण.) 'बिस्मिल्ला-इ-र्रहमान-इ-र्रहीम..' अशी सुरुवात असलेल्या ओळी मुस्लीम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जातात.  

  13. मूळचे युरोपीय लोक 'कॉकेशन' वंशाचे असतात. आपल्या बोलीभाषेत 'गोरे'! हे लोक सोळाव्या शतकापासून भारतात राहत आहेत. साहजिकच वसाहती वाढल्या तसा भारतात येणाऱ्या 'गोऱ्या' लोकांचा ओघही वाढला. कित्येकांनी भारतातच घर केलं, स्थानिक स्त्रियांपासून त्यांना मुलंही झाली. यामुळे आपण ज्यांना सरसकट 'गोरे' म्हणायचो त्यांतही फरक होते. त्या काळच्या 'गोऱ्या' लोकांना तर ते विशेष जाणवत असत आणि त्यांनी वेगळेवेगळी नावं त्यांना दिली होती. 'इंग्लिश' म्हणजे जिचे आईवडील इंग्रज आहेत अशी व्यक्ती. 'युरोपियन' म्हणजे जिचे आईवडील इतर युरोपीय देशांतून येतात अशी व्यक्ती. पण 'अँग्लो इंडियन' किंवा 'युरेशियन' म्हणजे मिश्रवंशीय. त्यातही शक्यतो जिचे वडील इंग्लिश किंवा युरोपीय आहेत आणि आई भारतीय आहे अशी व्यक्ती. (पण उलटं असेल तर? जिचे वडील भारतीय आहेत आणि आई इंग्लिश / युरोपीय आहे त्या व्यक्तींबाबत कदाचित वेगळी कथा लिहायला लागेल !) 

  14. दोन फळ्या जोडणाऱ्या लोखंडी पिनेला किंवा बोल्टला 'rivet' म्हणतात. त्याचा मराठी अपभ्रंश 'रिबोट'.  

  15. 'बॉर्न अँड शेफर्ड' हा व्यावसायिक तत्वावर चालवला गेलेला जगातला पहिला फोटोग्राफी स्टुडियो. या स्टुडियोतल्या फोटोग्राफरांनी काढलेली तत्कालीन भारताची अनेक छायाचित्रं जगभरातल्या संग्रहालयांत विखुरली आहेत.  

  16. ज्या 'गुन्ह्यासाठी' लास्कर खलाशाला अंधारकोठडीत टाकलं, त्याच्यासाठी 'गोऱ्या' ऑफिसरला फक्त सौम्य कानपिचक्या मिळाल्या! त्या काळचा न्यायही वांशिक भेदाप्रमाणे बदलत असे.  

  17. विकिपीडियाने दिलेल्या माहितीनुसार १८८६ मध्ये homosexual आणि heterosexual हे शब्द रिचर्ड फॉन क्राफ्ट-एबिंग या मानसोपचारतज्ज्ञाने आपल्या Psychopathia Sexualis या पुस्तकात वापरले. क्राफ्ट-एबिंगचं पुस्तक लोकप्रिय झालं, आणि हे शब्द लैंगिकता दाखवण्यासाठी इंग्रजीच्या मुख्यप्रवाहात आले. त्यामुळे, १८९५ साली घडणाऱ्या आपल्या गोष्टीत एका पोलीस अधिकाऱ्याने हे शब्द वापरणं तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे.

    पण .. इथे एक लक्षात घ्यायला हवं, की हॅरी ब्रुईन जन्मापासून भारतातच राहिलेला होता. त्याचं शिक्षण युरोपीय शाळांत झालेलं असलं तरी त्याच्या परिसरभाषा भारतीय होत्या. तो कधीच इंग्लंडला गेला नाही. अठराव्या वर्षी तो शाळा सोडून पोलिसांत भरती झाला, म्हणजे (आजच्या हिशोबात) उच्चमाध्यमिक शिक्षणापेक्षा अधिक शिक्षण त्याचं झालं नव्हतं. यामुळे ब्रुईनला नऊच वर्षांपूर्वी भाषेत शिरलेला हा शब्द सध्या 'फॅशनेबल' आहे हे त्याला माहीत नसणं याकडे 'शक्याशक्यतेचं पारडं' (balance of probabilities) झुकतं.

    मग, homosexual म्हणायच्या आधी काय म्हणत असत? तर त्याकाळी sodomy, buggery हे शब्द बोलीभाषेत, आणि 'an act of gross indecency' हे शब्द कायदेशीर भाषेत वापरले जात. 'सोडोमी' हा शब्द बायबलच्या 'जुन्या करारा'मधून येतो. सोडोम शहरातले लोक समलैंगिक संबंध ठेवायचे म्हणून देवाने त्यांचा विनाश केल्याची कथा 'बुक ऑफ जेनेसिस'मध्ये येते. सोडोम शहरातल्या लोकांनी केलेलं पाप म्हणजे सोडोमी. 'बगरी' हा शब्द आठव्या हेन्रीने आणलेल्या Buggery Act 1533 मधला आहे. लग्नाच्या सहा बायका आणि गावभर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या या राजाने इतरांच्या लैंगिकतेविषयी कायदेबियदे करणं म्हणजे सत्तांधपणाची हद्द आहे! 'An act of gross indecency' ही व्हिक्टोरियन सभ्यपणाशी सुसंगत असणारी संज्ञा १८८५ च्या Labouchere Amendment मधून आली. याचा कायद्याखाली ऑस्कर वाईल्ड आणि अॅलन ट्युरिंग यांना समलैंगिकतेच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देण्यात आल्या.

    या तिन्ही संज्ञा - जरी कालसुसंगत असल्या, तरी - तटस्थ नाहीत. समलैंगिकता अनैसर्गिक आहे, पाप आहे, गुन्हा आहे, असभ्यतेचं लक्षण आहे असा भाव यातून प्रतीत होतो. हे टाळण्यासाठी कालविपर्यासाचा दोष पत्करूनही आधुनिक शब्द कथानायकाच्या तोंडी घातला आहे.  

  18. समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे असं भारतीय दंडविधानातल्या (इंडियन पीनल कोड) सेक्शन ३७७मध्ये लिहिलं होतं. हा सेक्शन दंडविधानाच्या जन्मापासून, म्हणजे १८६०पासून समाविष्ट होता. समलैंगिकतेकडे बघायचा दृष्टीकोन गेल्या वीसपंचवीस वर्षांत बदलला आहे. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता हा गुन्हा नाही असा निर्णय दिला.  

  19. इथे ब्रुईन जाणीवपूर्वक टाळाटाळ करतो आहे का? आधीच्या एका टिपेत सांगितल्याप्रमाणे एडन हा ब्रिटिश भारताचाच नव्हे, तर खुद्द बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. म्हणजे 'गुन्हा' खरं तर ब्रुईनच्या हद्दीतच झाला आहे. मग तो ही केस रफादफा करायच्या मागे का आहे? 

  20. 'able seaman' म्हणजे खलाशी.  

  21. एक पाईंट (pint) म्हणजे ५६८ मिलिलिटर. म्हणजे, १० पाईंट म्हणजे सुमारे ५.७ लिटर. या तुलनेत बैलाच्या अंगात सुमारे १० लिटर रक्त असतं.  

  22. अर्थात, माणसाची ओळख पटवायची एक अचूक पद्धत आज वापरली जाते - बोटांचे ठसे. आपली कथा घडते १८९५मध्ये, आणि ही पद्धत सुरु झाली १८९७मध्ये, तीही कलकत्त्यात.  

  23. ही शाळा १८१५ साली भायखळ्यात सुरू झाली, आणि आजही सुरू आहे. 'मेहबूबा मेहबूबा' गाण्यावर भन्नाट नाचणारे चित्रपट अभिनेते जलाल आगा आणि मराठी चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी. आणि हो - अर्थात हॅरी ब्रुईन! 

  24. याच सुमारास डोंगरीच्या तुरुंगात शंभर दिवसांची शिक्षा भोगून आलेल्या गोपाळ गणेश आगरकरांनीही भाकरीबद्दल हीच तक्रार केली आहे ! 

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

भारी जमली आहे. Unputdownable!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आदुबाळ हे फार थोर लेखक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाणी ओले असते. सूर्य पूर्वेस उगवतो. वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास आबासाहेब !!!

( और एक..... न बा would be proud of you )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'शिष्यादिच्छेत् पराजयम्', तशातली गत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरूची विद्या गुरूस फळली?
असो..चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. भूतकाळातल्या घटनांशी सुसंगत आणि जो "विचार" आजच्या पिढीतल्या वाचकांना द्यायचा आहे त्याच्याशीही सुसंगत.
इंग्रजी संवादाचा वापरही मला आवडला पण त्यामुळे कदाचित फारसं इंग्रजी न वाचणारा/न समजणारा वाचक यामुळे वंचित राहू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त गोष्ट आहे. त्यासाठी केलेलं संशोधनही भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह!!!!
जबरदस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छान जमलीये. आता सिरीज किंवा कादंबरी करुन टाका. जॉन ओवेन मॅन्सलची नोकरी. त्याची कानडी किंवा दक्षिण भारतीय पार्श्वभूमी. म्हादबा आणि जॉनची ब्रुईनची मर्जी मिळवायची चढाओढ. पेद्रोच्या प्रेमप्रकरणातले किंवा नवीन गुन्हे. बरंच पोटेन्शिअल आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विक्रम पाटील

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

‘छान जमलीये’ एवढ्या एका(च) भागाशी सहमत. किंबहुना, मी तर म्हणेन, की हे अंडरस्टेटमेंट आहे, अव्याप्तीचा दोष घेऊन येते. ‘अप्रतिम’, ‘निरुपम’, ‘अतुल्य’, ‘अद्वितीय’ वगैरे विशेषणांचे मराठी भाषेतून(सुद्धा) अद्याप (तरी) उच्चाटन झालेले नाही, तथा सांप्रतकाली त्यांचा वापर नियमबाह्य नाही.

असे असताना, सीक्वेले, फॅनफिके वगैरे काढून या अद्वितीयत्वास का बरे बाधा पोहोचवायची? मूळ कलाकृतीइतका दमदारपणा सीक्वेलांत वगैरे क्वचितच (आणि फॅनफिकांत वगैरे अभावानेच) आढळतो, असे एक सामान्य निरीक्षण आहे. (सीक्वेले म्हणजे सामान्यतः मालिकेला आता एक्स्टेन्शन मिळालेलेच आहे, तर वाटेल तितके आणि वाटेल त्या प्रतीचे पाणी घालून वाढवा, तशातला प्रकार कितीही म्हटले तरी होतोच. आणि, फॅनफिके म्हणजे तर काय, बोलूनचालून नक्कलच! कितीही ‘खुशामतीचा सर्वोच्च प्रकार’ वगैरे म्हटले, तरी, मुळातल्याची सर त्याला कशी येणार?) आणि, अशा ‘पाणीदार’ आवृत्त्या काढून मूळ जी सकस आवृत्ती आहे, जिने आपला असा एक ठसा निर्माण केलेला आहे, तिच्यावर पाणी काय म्हणून फिरवायचे?

त्यापेक्षा, ‘देवाने (अमकीतमकीला) बनविले, आणि मग तो साचा मोडून टाकला’ असे जे आत्यंतिक सुंदर स्त्रियांच्या संदर्भात प्रसंगी म्हटले जाते, त्यातील देवाचा कित्ता या प्रसंगी गिरविला का जाऊ नये? श्री. आदूबाळ यांजजवळ प्रतिभा आहे, तथा अत्युच्च कोटीची कल्पनाशक्ती आहे, झालेच तर कथानकावर कष्ट घेण्याची तयारी आहे; अशा अनेक एकाहून एक सशक्त अशा कलाकृती ते कालवशात् निर्माण करू शकतील. मग अशा प्रसंगी या ताकदवान कलाकृतीचे अद्वितीयत्व अबाधित का राखले जाऊ नये?

असो. आमचा आक्षेप इतकाच आहे. बाकी चालू द्यावे.

—————

फाशीची शिक्षा लिहून झाल्यावर न्यायाधीश पेनाचे निब मोडून टाकतात, तोही दाखला या निमित्ताने स्मरणात येतो; परंतु, तो दाखला या प्रसंगी लागू नाही, याची कृपया नोंद व्हावी.

अशाच दुसऱ्या एका ताकदवान कलाकृतीचे अद्वितीयत्व अबाधित राहावे, म्हणून शाहजहान बादशहाने म्हणे संबंधित कलाकारांची बोटे कलम करून टाकली होती.२अ सुदैवाने, सांप्रतकाली मोगलाई लागून गेलेली नाही. आणि, तसेही, भविष्यकाळात याच साच्याच्या जरी नाही, तरी अशाच दर्जेदार कलाकृती श्री. आदूबाळ दीर्घ कालाकरिता निर्माण करीत राहातील, अशी आम्हांस त्यांजकडून अपेक्षा तथा आशा आहे.

२अ तरी पुढे औरंगाबादेस त्या कलाकृतीचे फॅनफिक व्हायचे ते झालेच, म्हणतात. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळ उत्तम उभा केला आहे वगैरे पुस्तकी वाक्यं लिहून कथेचं कौतुक केलं तर ते अगदीच 'हे' होईल.
मला शेवट फार आवडला.
(पण कथेच्या आकाराच्या मानाने तपशील फार वाटले तिथे दमछाक झाली माझी तरी - अजून विस्ताराने आली तर ही दीर्घ कथा म्हणून A1 व्हावी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आहे गोष्ट. पण आगावपणे सांगतो. पत्रलेखक आणि खुनाचा देखावा दोन्ही एकाच ठिकाणी असतात हे जास्तच योगायोग टाईप वाटले. म्हणजे एका गोष्टीत दोन केस करायला ओढून ताणून केल्यागत. पण गोष्ट आवडलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार छान झालीय कथा.
मुंबुड्या आता अजिबातच तशी राहिलेली नसली तरी पुन्हा य' व्यांदा तिची माया दाटून आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0