मोकळ्या जगात हरवलेला चष्मा

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

मोकळ्या जगात हरवलेला चष्मा

- गायत्री लेले

प्रख्यात ब्रिटिश विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल यांचे एक गाजलेले वाक्य आहे- "It is better to be a human being dissatisfied than a pig satisfied" (असमाधानी माणूस होणे हे समाधानी डुक्कर होण्यापेक्षा कधीही सरस असते.) तो पुढे असेही म्हणतो, की कधीही असमाधानी सॉक्रेटिस होणे हे समाधानी मूर्ख होण्यापेक्षा बरे असते.

हे वाक्यच असे आहे की कोणीही "हो, खरंच आहे" असे म्हणेल. मलाही हे वाक्य अतिशय आवडत असे. पण हल्लीच माझ्या वाचनात Steve Sapontzis या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाचा लेख आला. त्याचे शीर्षक आहे- 'इन डिफेन्स ऑफ द पिग!' (डुकराच्या समर्थनार्थ!) त्यात ते म्हणतात, खरे तर उपयुक्ततावादी विचारानुसार ज्या गोष्टीत जास्त समाधान ती गोष्ट अधिक सरस असायला हवी. पण डुक्कर आनंदात, समाधानात असणे आपल्याला सहन होत नाही कारण आपण डुक्कर खातो. आणि त्यामुळेच निर्बुद्ध समाधानी डुक्कर होण्यापेक्षा वैचारिकदृष्ट्या समृद्ध पण असमाधानी मनुष्य कधीही चांगला, या विधानावर आपण होकारार्थी मान डोलवतो. ते पुढे आणखीही काही प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ, समजा एका बाजूला एखादी शेतावर काम करणारी, आपल्या प्रपंचात सुखी असणारी एक स्त्री जीवनात अत्यंत समाधानी आहे; आणि दुसऱ्या बाजूला उच्चविद्याविभूषित, दररोज नवनव्या माणसांना भेटणारा, कला-साहित्यात रमलेला, कायद्याच्या क्षेत्रात उत्तम करियर असणारा पुरुष आपल्या आयुष्याबाबत असमाधानी आहे; तर यांपैकी नक्की कोणाचे आयुष्य दर्जेदार आहे आणि कोणाचे वाया गेलेले आहे, हे आपण कसे ठरवणार? म्हणजेच या उदाहरणात त्यातल्या पुरुषाचे आयुष्य हे त्या स्त्रीपेक्षा कितीतरी पटीने समृद्ध आहे हे मान्य केले, तरी अनुभवांची समृद्धता जीवनात शांतता, आनंद आणि सौख्य आणेलच असे नाही. तस्मात अशी तुलना करणे हे अनेकदा वरवरचे असते आणि मर्यादित ठरते.

मग या तर्कानुसार काही थोडकी कौशल्ये बाळगणारे डुक्कर आणि बुद्धीच्या जोरावर जग जिंकणारा माणूस यांची खरेच तुलना होऊ शकते का? माणसाकडे बुद्धीच्या जोरावर जे अधिकचे ज्ञान आहे, त्याचा वापर करून तो सहज आणि सरळ आयुष्य जगणाऱ्या डुकराला निकृष्ट ठरवत कमी लेखत आहे का? आणि जी माणसे या 'समृद्धते'च्या व्याख्येत आणि चौकटीत बसत नाहीत त्यांचे अस्तित्व कुचकामी ठरते का? अशा अनेकविध प्रश्नांची जंत्री उभी राहते. पूर्वी मी या सगळ्याची उत्तरे धडाधड 'हो' किंवा 'नाही' अशी देऊन स्वतःपुरता प्रश्न संपवला असता. पण तेवढे पुरेसे नसते हे आता कळते आहे.

त्यामुळे दर्जेदार काय आणि कुचकामी म्हणजे काय, समृद्ध काय आणि उथळ काय, श्रीमंती कशाला म्हणायची आणि दारिद्र्य कशाला म्हणायचं याबाबत गोंधळ उभे राहतात. वेगवेगळ्या गोष्टींवर, व्यक्तींवर, जाणिवांवर आणि अनुभवांवर असा सरळ ठप्पा लावून टाकता येईल; पण ‘लेबलीकरण’ करणे हा सोपा मार्ग आहे. त्यापेक्षा दर्जेदार आणि कुचकामी म्हणजे काय हे 'कोणी' ठरवले; समृद्ध आणि उथळ म्हणजे काय याची व्याख्या 'कोणी' केली; आणि वैचारिक श्रीमंती आणि दारिद्र्य याबाबत 'कोण' विश्लेषण करतात; हे कठीण प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे अविरत शोधायची असतात. आणि ती शोधताना आपण 'कोण' आहोत आणि कोणत्या परिप्रेक्ष्यातून जगाकडे पाहात आहोत हेही तपासत राहणे आवश्यक असते. या विचारचक्रात एकदा अडकलो की पटकन एखाद्या गोष्टीला सत्त्वहीन किंवा दर्जाहीन अशी दूषणे देता येत नाहीत; किंवा 'सकस', 'अव्वल' अशी विशेषणेही वापरता येत नाहीत. त्यामागच्या सत्तासंबंधांचा आणि राजकारणाचा मागोवा घेणे आवश्यक असते.

आपल्यापेक्षा वेगळे कोणी किंवा आपल्याहून वेगळी परिस्थिती, वेगळ्या व्यक्ती यांच्यासोबत सतत तुलना करत राहणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. प्रत्येकात तो कदाचित वेगवेगळ्या पातळ्यांवर असेल, पण ते टाळता येत नाही. आपल्यातील श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची भावनाही त्यातूनच रुजत जाते. अर्थात त्याला इतरही घटक कारणीभूत ठरतातच. उदाहरणार्थ, आपले सामाजिकीकरण; आपल्या आजूबाजूचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण; आपली जात- पोटजात, धर्म, वर्ण इत्यादी. 'आपण श्रेष्ठ' ही भावना 'दुसरे कनिष्ठ' या भावनेला आपोआप खतपाणी घालत असते. मग आपलीच भाषा श्रेष्ठ, आपलाच धर्म श्रेष्ठ, आपलीच जात श्रेष्ठ, अशा प्रकारे या 'च'ची यादी लांबतच जाते. आधी म्हटल्याप्रमाणे हेही वेगवेगळ्या प्रमाणात असू शकते. जितकी माझ्यातील श्रेष्ठत्वाची भावना अधिक, तेवढी दुसऱ्याला कमी लेखण्याची पातळी जास्त. जेवढी ती कमी करत जाऊ, तेवढा समानतेकडे प्रवास जलदगतीने होऊ शकतो.

दुसऱ्याची संस्कृती नाकारण्याला, हिणवण्याला, प्रसंगी धोकादायक मानण्याला निरनिराळी नावे आहेत. इस्लामोफोबिया - इस्लामबद्दल अनेकांच्या मनात असलेला सरसकट आकस- यांपैकीच एक. त्यामागची दहशतवादाची पार्श्वभूमी विसरून चालणार नाही. पण ९/११नंतर जनमानसात मुस्लिमांबाबत जी सार्वत्रिक भीती, अनास्था, संशय इ. पसरला तो अमेरिकेपर्यंत मर्यादित निश्चितच राहिला नाही. अगदी वैयक्तिक पातळीवरसुद्धा माणसांच्या अनेक धारणा कळत नकळत बदलल्या. त्यांची मुळे कदाचित आधीच खोलवर रुजली होती. पण अशा काही प्रसंगांमुळे त्याला अधिकच खतपाणी मिळाले.

या भावना किती सुप्तपणे आपल्यांत आहेत, हे लोकलमध्ये प्रवास करताना जाणवते. मुंबईतील लोकल ट्रेनमधल्या प्रथम श्रेणीच्या बायकांच्या डब्यात अनेक विचार करायला लावणाऱ्या गमतीजमती घडत असतात. एकदा एक पूर्ण बुरखा घातलेली बाई मानखुर्द स्टेशनला चढली आणि खिडकीत बसली. त्यानंतरच्या स्टेशनवर चढलेल्या एका बाईला बहुतेक तिची खिडकीजवळची जागा हवी होती. तिने तिला थेट, "तुम्हारे पास तिकीट है क्या?" असेच विचारले. ती बाईही कदाचित अवाक झाली, पण नंतर जोरात भांडण सुरू झाले. वादविवाद होऊन थोड्या वेळाने ती बुरखाधारी बाई तिचे स्टेशन आल्यावर बडबडत निघून गेली. अखेर त्या दुसऱ्या बाईला हवी असलेली जागा मिळाली. मला म्हणाली, "आपल्याला अलर्ट राहावं लागतं जरा. 'हे' लोक कधीपण कुठेही घुसतात." माझ्या मनात विचार तरळून गेला, "तिच्या जागी मी असते तर?" मला माहीत आहे, की तिने निश्चितच माझ्याकडे तिकीटाची विचारणा केली नसती. कारण कदाचित मी 'फर्स्ट क्लास'च्या डब्याला साजेशी दिसते, बोलते, वागते. संपूर्ण बुरखा घातलेली स्त्री तशी दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची पहिली बळी ती असते, मी नाही. ती बाई फर्स्टक्लासला साजेशी नाही, हे सगळेचजण मान्य करतात.

असे मोडीत काढायचे प्रकार फक्त मुस्लिमांबाबतच घडतात असे नाही. अशा इतर फर्स्टक्लासला 'साजेशा' नसलेल्या बायकांवरही तोंडसुख घेतले जाते. आता त्यावरून असे म्हणता येईल का, की हे असे प्रसंग रोज घडतात? तर नाही. पण विशेषतः बुरखाधारी स्त्रियांचा डब्यातला गलबला वाढला, तर थोडी वेगळी नजरानजर होते. "या कशाला आल्यात पोरांना घेऊन इथे", असे शब्द न उच्चारताही घुमत राहतात हे नक्की.

स्वतःकडे मोठेपणा घेऊन दुसऱ्याला कमी लेखणे हे दोन धर्मांतच होते असे नाही. ते वेगवेगळ्या गटांत सतत होत असते. अगदी जातींमधल्या पोटजातींमध्येही अशा प्रकारची उच्च-कनिष्ठ भावना असते. पुन्हा, ती प्रत्येक वेळेस जोरकसपणे शब्दांत मांडली जातेच असं नाही. ती अनेकदा सुप्त असते, आणि एखाद्या प्रसंगी चटकन बाहेर येते. एकदा माझी मैत्रीण म्हणाली, "ते उकडीच्या मोदकांत ड्रायफ्रूट कशाला घालतात? ऑथेंटिक मोदकात फक्त सारण असतं." त्यावर मीही "हो, बरोबर" अशी उद्गारले. नंतर आम्हांला दोघींनाही याची गंमत वाटली, पण मग जरा गंभीर झाले. वरवरच्या वाटणाऱ्या संवादात किती पटकन आमच्या दोघींवरचे जातीचे संस्कार प्रतिबिंबित झाले होते. आता आम्ही "हॅ, इतरांना कुठे येतं काही" असं थेट म्हणालो तर नव्हतो. पण आम्हाला न ओळखणाऱ्या इतर कोणी आम्हाला बोलताना ऐकले असते, तर त्यांना आम्ही आमच्या मते 'ऑथेंटिक' नसणाऱ्या इतरांच्या पदार्थांना कमी लेखतो असे वाटले असते का? - कदाचित हो.

मध्यंतरी फेसबुकवरील अन्नविषयक गटात कोणीतरी रक्तीची पाककृती टाकली होती. त्यावर मोठ्या प्रमाणात टीकात्मक, नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या गेल्या. अगदी "बापरे, वाचून उलटी येईल असे काही पोस्ट करू नका; हे ग्रुपच्या नियमांमध्ये बसते का" इथवर चर्चा गेली. खरे तर एरवी या गटावर शाकाहारी-मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे लोक असायचे; ते नियमित आपल्या पाककृतींचे फोटो, लेख वगैरे टाकत असत. पण रक्तीची पाककृती यांपैकी अनेकांच्या सोवळ्या धारणांना धक्का देऊन गेली. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना आपण कोणाच्यातरी अन्नाची उघड अवहेलना करत आहोत आणि यामुळे कदाचित त्यांच्या भावना दुखावून त्यांचे असणेच मोडीत काढत आहोत याचे भान उरले नाही.

कोणी म्हणेल, हे सगळे इतक्या सिरीयसली का घ्यायचे? इतका कीस का पाडायचा? पण हेही लक्षात घ्यायला हवे, की एखादी गोष्ट कचरापेटीत टाकण्याच्या, कमी लेखण्याच्या, हसण्याच्या प्रक्रियेची सुरुवात अशा छोट्या गोष्टींनी होत असते. अनेक लोक एकाच प्रकारे व्यक्त होतात, आणि या पुनरावृत्तीतूनच धारणांची निर्मिती होते. त्या मोठ्या पातळीवरच्या धारणांच्या निर्मितीत त्यात भाग घेणाऱ्या सगळ्यांचेच छोटे छोटे वाटे असतात. त्यामुळे, अगदी वैयक्तिक परिघातसुद्धा, विचारपूर्वक शब्द निवडून - वापरून संवाद साधणे आवश्यक ठरते.

ही मोडीत काढण्याची परंपरा अगदी समविचारी म्हणवणाऱ्या गटांमध्येही दिसते. कोण खरे हिंदुत्ववादी, कोण खरे मार्क्सवादी, कोण खरे आंबेडकरवादी, कोण खऱ्या अर्थाने स्त्रीवादी याच्या काही व्याख्या रूढ होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना हादरे बसू लागले. नव्या कल्पना समोर येऊ लागल्या. वाढत्या समाजमाध्यमांमुळे, जग जवळ आल्यामुळे याही आवाजांना धार चढू लागली. त्यामुळे सद्यस्थितीत जसे या सगळ्याबाबतचे वेगवेगळ्या तऱ्हेने केलेले विश्लेषण उपलब्ध आहे, तसाच खूप मोठा गोंधळ आणि कोलाहलही आहे. वरवर पाहता असेच दिसते, की प्रत्येक गट 'माझे खरे' हे म्हणण्याच्या मागे आहे. या धावपळीत सगळ्याचा गर्भितार्थ कुठेतरी निसटतोय की काय याची भीती वाटते.

एका आंबेडकरवादी कार्यकर्तीने मध्यंतरी एक मीम1 सोशल मीडियावर टाकलेले पाहिले. हे गांधीजयंतीच्या आसपास केलेले होते. गांधींना महात्मा न म्हणता केवळ जोतिबांना महात्मा म्हणावे असा त्याचा एकूण आशय होता. हे मीम बऱ्यापैकी शेअर झालेलेही मी पाहिले. मला व्यक्तिशः एका व्यक्तीवर पूर्ण काट मारल्यावरच दुसरीचे विश्लेषण करता येते असे वाटत नाही. तसेच, इतिहासाचे समग्र आकलन होण्यासाठी जसे जोतिबा फुले वाचणे आवश्यक आहे, तसेच गांधी समजून घेणेही अत्यावश्यक आहे असे वाटते. आणि यांचे वाचन कुठल्याशा आधीच ठरवलेल्या उद्देशाने आणि हेतूने प्रेरित नसावे, तर समंजस चष्म्यातून व्हायला हवे असेही वाटते. कदाचित हे मीम बनवणारीचे तसे वाचन असेलही, किंबहुना हीसुद्धा शक्यता आहे की तिने तिचे मत याद्वारे नोंदवले असावे. ते करण्याचे अर्थात तिला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. पण ते ज्या पद्धतीने शेअर केले जात होते, त्यामुळे या व्यक्तिमत्वांची उथळ पद्धतीने तुलना होण्याचीच शक्यता मला अधिक वाटली. आणि त्यामुळे त्याची भीतीही वाटली.

एकदा माझा एक केरळमधील मित्र मला तावातावाने म्हणाला, "मी आज लोकांना चक्क भगवे झेंडे घेऊन, लेझिम खेळत, रस्त्यातून मोठ्याने गात जाताना पाहिलं. सगळे किती टोकाचे हिंदुत्ववादी होत चालले आहे." अशीच एक मैत्रीण म्हणाली, "बसमध्ये सगळेजण 'गणपती बाप्पा मोरया' असं ओरडत होते. सगळे लोक इतके धर्मांध का आहेत?" आता यांच्या म्हणण्यात अंशतः तथ्य जरी असले, तरी ते कथन करत असलेल्या प्रसंगांचे कंगोरे आणि सांस्कृतिक परीघ समजावून घेणे अत्यावश्यक आहे. काही गोष्टी आपल्या सामाजिक, राजकीय आणि अगदी वैयक्तिक संस्कृतीतल्या अविभाज्य भाग आहेत. लेझिम खेळत शोभायात्रा काढणे किंवा गणपती बाप्पा मोरया म्हणणे हे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर सुरू झालेले नाही. हे चालत आलेले आहे, आणि लोकांच्या सामूहिक कल्पनांचा आणि आठवणींचा एक भाग झाले आहे. त्यामुळे यात भाग घेणाऱ्या व्यक्तींना पूर्णतः मोडीत काढून त्यांच्यावर शिक्के मारणे फारसे योग्य नाही. पण त्याच वेळी वाढत्या समुदायवादाचा सामना कसा करायचा याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी वरवरच्या प्रतीकांच्या पलीकडे जायला हवे.

कोणीतरी 'ऑफेंड' होईल म्हणजेच, कोणाचेतरी मन दुखावेल आणि आपल्यावर काट मारली जाईल, ही उघड अथवा सुप्त भीती सगळीकडे आहे. या भीतीमुळे सगळेच सतत सावध राहून, शब्द चोरून आणि मन मारून बोलत असतील, तर ते अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. आश्चर्य म्हणजे, हे भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. ताळतंत्र ठेवून अभ्यासपूर्ण, समावेशक बोलणे पण तरीही स्वतःची भूमिका स्पष्ट असणे हे साधणे आजच्या काळात अत्यंत अवघड झाले आहे. तुम्ही एकतर एक बाजू लावून धरायला हवी, कुठलीतरी एकच विचारसरणी - एकच व्यक्ती पकडून ठेवायला हवी, याचे दडपण वाढत चालले आहे. हे आधी म्हटल्याप्रमाणे विरोधी गटांमध्ये तर आहेच, पण समविचारी म्हणवणाऱ्या गटांमध्येही आहे.

अशी काटमारू संस्कृती (कॅन्सल कल्चर) या लोकाभिमुख माध्यमांच्या जगात वेगाने पसरत चालली आहे. त्यांचे निकष अगदी वरवरचे, पण लोकांना आकर्षित करणारे असतात. कुठलातरी कलाकार कधीकाळी हिंदुविरोधी बोलला म्हणून त्याच्या आत्ताच्या सिनेमावर बहिष्कार टाकणे, जाहिरातींत सणांच्या दरम्यान जर त्यातील मॉडेल्सनी टिकली लावली नसेल तर त्यांच्याकडून कुठलीही खरेदी न करण्याचा ऐलान करणे, शिवाजी महाराजांना छत्रपती हे बिरुद न लावण्याने राळ उडवणे इत्यादी घटना वरचेवर घडताना दिसतात. कोणीतरी एक व्यक्ती, संस्था किंवा यंत्रणा काय 'असायला हवे' हे ठरवते, आणि त्याहून वेगळ्या असलेल्या सगळ्या गोष्टी मोडीत काढायला बघते. मग त्यातूनच कलाकारांना माफी मागायला लागते, कार्यक्रम रद्द होतात, नाटके बंद पाडली जातात. अगदी सलमान रश्दींसारख्या लेखकावरही एक तरुण मुलगा निर्घृण चाकूहल्ला करतो.

या सगळ्याचे मूळ काय, तर आम्ही ठरवू ते खरे, आम्हांला जागा हवी. इतर जण जे कदाचित काही वेगळे बोलत आहेत, त्यांना ती जागा नाकारायची. त्यासाठी जमतील तसे जोरदार प्रयत्न करायचे.

काटमारू संस्कृतीमध्ये अनेकांची कुचंबणा व्हायचीच शक्यता अधिक. मग विरोधी गट तर सोडूनच द्या, अगदी आपल्यासारखाच विचार करणाऱ्यांमध्येही आपल्याला स्थान मिळण्याची शक्यता मावळू शकते. आधी म्हटल्याप्रमाणे, कोणावरतरी पूर्णतः फुली मारल्याशिवाय विश्लेषणाला धार येऊ शकत नाही. आणि तसे न करणारे लोक चक्क वैचारिकदृष्ट्या दोलायमान अथवा कमकुवतही मानले जाऊ शकतात.

लेखाच्या सुरुवातीला मी जॉन स्टुअर्ट मिल यांचा उल्लेख केला आहे. काळ असा आहे, की मिलच्या एका वाक्यावरून त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाची परीक्षा केली जाईल. पण हे वाक्य ज्या काळाच्या परिघातून, ज्या राजकारणातून, ज्या परिप्रेक्ष्यातून येत आहे ते मात्र बघितले जाणार नाही. एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे किंवा एकदमच मोडीत काढणे या दोन्हींसाठी आपण पूर्वीहून अधिक आतुर झालेलो आहोत. त्यामुळेच अधिकाधिक मोकळ्या होत चाललेल्या या जगात डोळ्यांवर समंजसपणाचा चष्मा चढवणे अत्यंत निकडीचे झाले आहे. नाहीतर मोकळे जग ही केवळ एक भ्रामक कल्पना उरेल.

***

गौरी देशपांडे यांची 'पाऊस आला मोठा' ही कथा माझ्या अत्यंत आवडीची आहे. त्यातील आधुनिक विचारांची मुलगी आपल्या वयाने लहान आणि गावंढळ असलेल्या सावत्र आईपासून अंतर राखते. तिच्या अस्तित्वाला फारसे महत्त्व देत नाही. कथेच्या शेवटी तिला उमगते, की जिला आपण जन्मभर मोडीत काढले, ज्या वडिलांशी फटकून वागले त्यांनी बरेच काही सोसले होते. किती अनुभव घेतले होते. पण वेळ गेलेली असते. आई तर आता मरणासन्न अवस्थेत पोचलेली असते. शेवटी ती मुलीची समजूत काढताना म्हणते, "चुकतात आडाखे माणसाचे." हे ऐकून त्या अत्यंत वस्तुनिष्ठ आणि विवेकी विचार करणाऱ्या मुलीवर भावनिक आघात होतो.

…आपल्याला दिसते त्याहून सत्य निराळे असते याची जाणीव तिला अखेरीस होते. आपल्याला आज नेमके हेच समजून घ्यायची गरज आहे.

***

1 मीम म्हणजे चित्र आणि विनोद यांची सांगड घालून विविध घटनांवर केलेली टीकाटिपण्णी. मीम्स बनवण्यासाठी इंटरनेटवर तयार टेम्प्लेट मिळतात. एखाद्या राजकीय, सामाजिक अथवा सांस्कृतिक घटनेवर व्यक्त होण्यासाठी मीमचा उपयोग सर्रास केला जातो, आणि ते सोशल मीडियावरून ' व्हायरल ' केले जातात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

असहमत व्हावं असं लेखात जवळपास काहीच नाही. स्वत:च्या मनातल्या उच्चतेच्या आणि कनिष्ठतेच्या भावना तपासून पाहायला हव्यात हे पूर्ण मान्य आहे. पण विचारांती त्या समर्थनीय वाटल्या तर सांभाळून ठेवायलाही हरकत नाही. ‘ऐसी’वरचा एकही लेख किंवा एकही प्रतिसाद(क) कनिष्ठ समजायचा नाही असं ठरवलं तर जगणं अशक्य होईल.

‘In defense of the pig’ मध्ये तथ्य आहे. पण बेंथॅमचा, थोरल्या मिलचा आणि धाकट्या मिलचा उपयुक्ततावाद यांत कसे आणि कुठे पोटभेद आहेत हा फार दमणूक करणारा विषय असल्यामुळे त्यात शिरत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अधिकाधिक मोकळ्या होत चाललेल्या या जगात डोळ्यांवर समंजसपणाचा चष्मा चढवणे अत्यंत निकडीचे झाले आहे. नाहीतर मोकळे जग ही केवळ एक भ्रामक कल्पना उरेल.

अगदी खरे आहे.

प्रत्येकाचा दृष्टीकोन सापेक्षच असतो. अनुभव, कुवत, बुद्धीमत्ता, परिस्थिती यावर तो अधारलेला असतो, याची जाणीव प्रत्येकाने बाळ्गली पाहिजे.
स्वत:चे मत आग्रहाने मांडताना, इतरांचे देखिल सहानुभूतीने आणि लक्षपूर्वक ऐकण्याची तयारी असायला पाहिजे. न जाणो माझे मत तयार होण्यास जे घटक कारणीभूत झाले आहेत, त्यातील काही असत्य किंवा अपुरे असू शकतात हे लक्षात घ्यायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?