आत्याचा सल्ला
"आत्याचा सल्ला
नमस्कार. मी आत्या. आपली कोणती समस्या आहे जी मी सोडवू शकते?
माझा फोन माझं बोलणं ऐकतो, अशी शंका मला हल्ली यायला लागली आहे? मी काय करू?
'काय करू' म्हणजे? तुला फोन फोडायचा आहे का? त्यासाठी माझी परवानगी घ्यायची गरज नाही. पण मग तुला नवीन फोन लागेल. काल तू ओप्पोच्या नव्या फोनची जाहिरात बघितलीस. कशी वाटली?
तसं नाही, पण फोन माझं का ऐकतो?
हे पाहा, उद्या तुझं कुण्णी कुण्णी ऐकलं नाही तर तू काऊन्सिलरच्या डोक्यावर पैसे ओतणार. त्यापेक्षा माझ्यासमोर सव्वाअकरा रुपये आणि सुपारी ठेव बघू.
सुपारी कशासाठी?
तुझ्या फोनला सुपारी आणि सव्वाअकरा रुपयांचं महत्त्व समजतं का, ते तपासून बघता येईल.
आत्या, माझ्यावर विश्वास नाही का?
आत्या, तुझा भाच्यावर विश्वास नाय का?
(भाचा खूप वेळ काही तरी टायपून, खोडत बसतो.)
….
बरं, तुला असं का वाटतंय की फोन तुझं बोलणं ऐकतोय?
काल मला डायबिटीसच्या औषधाची जाहिरात दिसली. मी त्याच औषधाच्या मार्केटिंगच्या डेटावर काम करत होतो.
तू डेटावाला असूनही तुझा फोन तुझं बोलणं ऐकतो! तुझी मॉडेलं तरी ऐकतात का तुझं म्हणणं? तुझे बॉट तुझ्या आज्ञेत असतात का? का काय वाट्टेल ती उत्तरं देतात? बात करता हय! औषधाच्या मार्केटिंगचं मॉडेल बनवलंस तर करोनाच्या लशीचे आकडे दाखवतात?? अं, खरं सांग!
आत्या, फोनची हेरगिरी बंद करवलीस तर तुला सुपारीच काय, नारळ देईन. गरीबाची अशी टिंगल नको करूस!
डेटावाला गरीब होय तू! बरं, आता ऐक माझं.
तू फेसबुकवर असतोस. तू गूगल वापरतोस.
त्याचा याच्याशी कसा काय संबंध लागणार? मी कामाच्या लॅपटॉपवरून फेसबुक वापरत नाही. तिथे माझं इमेलही निराळं आहे.
बरं मग?
मी त्या औषधाबद्दल बोलत असताना माझा फोन तिथेच असतो. त्यामुळेच मला डायबिटीसच्या औषधाची जाहिरात दिसली.
साखर सोडून दे. इंटरमिटंट फास्टिंग कर. रोज अर्धा तास धाप लागेस्तोवर व्यायाम कर. म्हणजे डायबिटीस जाईल.
आत्या, मला डायबिटीस नाहीये. तुलाही माहित्ये.
हे पाहा, फेसबुक म्हणतं ते खरंच असतं. फेसबुकनी तुला जाहिरात दाखवली ना, डायबिटीसच्या औषधाची. खोटं का बोलतील ते!
आत्या सव्वाअकरा रुपयांचा नाही तर किमान सुपारीचा तरी मान राख!
आता माझ्या प्रश्नांची हो का नाही, अशीच उत्तरं दे. जर उत्तर हो का नाही, यांत देता येत नसेल तर 'माहीत नाही' असं उत्तर द्यायचं. आणखी जास्त काही म्हणालास तर माझं मॉडेल मोडेल. सुपारी कोपेल. ठीक?
हो.
आता कसा!
माहीत नाही.
भाचा हुशार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हो.
तू घरून काम करतोस?
हो, पण टँप्लीस.
आता काय?
बहुतेकदा घरून काम करतो. कधी कधी कॅफे किंवा ऑफिसातही जाऊन काम करतो.
सुटली म्हणू नकोस. घरून तू फेसबुक वापरतोस?
हो.
घरून तू गूगल वापरतोस?
हो.
घरून काम करताना ऑफिसचा इमेल अड्रेस वापरतोस?
हो
घरून काम करताना, ऑफिसच्या लॅपटॉपवर फेसबुक वापरलं होतंस?
नाही.
खोटं बोलतोस का आत्याशी?
नाही. टँप्लीस. घरून काम करताना घरच्या फोनवर फेसबुक वापरता येतं की!
शहाणा बाळ आहे हो माझा भाचा. स्टेट आणि चर्चची विभागणी जशी युरोपेन लोकांनी रेनेसान्सच्या वेळेस केली तशी घरच्या आणि ऑफिसच्या अकाऊंटांचीही कर हो श्याम!
हो.
आता टेक्निकली मी प्रश्न विचारला नाही, पण तू बरोबर उत्तर दिलंस की नाही!
हो.
आता कठीण प्रश्नांना सुरुवात होणार आहे. तुझा घरचा इमेल अड्रेस आणि कामाचा इमेल अड्रेस कुणी माणसानं वाचले तर दोन्ही एकाच माणसाचे असू शकतात, असं त्यांना वाटू शकतं का?
हो.
शिवाय घरच्या आणि ऑफिसच्या इमेलांशी जोडलेला आयपी अड्रेस बरेचदा एकच असतो की नाही?
हो, टँप्लीस. आत्या, तुला आयपी अड्रेस म्हणजे काय हे बरं माहीत?
सव्वाअकरा रुपयांत तुझ्या घराचा इंटरनेटवरचा पत्ता शोधणं अगदी सोपं आहे. तुझ्या घराचा पोस्टाचा पत्ताही मला शोधता येईल. बस खाली!
माहीत नाही.
लायनीवर आला हो, बाळ! आता सांग, तू मार्केटिंगची मॉडेलं बनवतोस त्यात कोणाला कधी फोन केला होता, आणि त्यातून त्यांनी औषध विकत घेतलं का, असली माहिती वापरतोस ना?
हो.
तू हे काम सुरू करण्याआधी या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बागडला होतास की नाही?
हो.
ह्या कंपनीची किती औषधं सध्या तुमच्या भागात विकत आहेत? तू मार्केटिंगवाला ना, तुला माहीत असायला पाहिजे हे एवढं!
हो, आत्या! एक. डायबिटीसचं.
मेल्या, जादा बोलू नकोस. तुझा आयपी अड्रेस, तुझे इमेल अड्रेस, त्याच्याशी संबंधित फेसबुक अकाऊंट, तू गूगलवर जाऊन काय काय शोधतोस, हे सगळं एकत्र करून तुला डायबिटीसच्या औषधाची जाहिरात न दाखवणाऱ्या डेटा सायंटिस्टांना तू काय म्हणशील?
मूर्ख.
आणि हे सगळं एकत्र करू शकणाऱ्यांना काय म्हणशील?
आत्या!
थोबाड फोडीन तुझं. आत्या असल्या गोष्टी फक्त जाणून असते; करत नाही. आत्या सभ्य आहे; मनात आलेल्या सगळ्या विचारांवर कृती करत नाही.
हो आत्या, थ्यँक्यू आत्या.
नमस्कार. मी आत्या. आपली कोणती समस्या आहे जी मी सोडवू शकते?
आत्या, माझा नवरा तुझ्याकडे सल्ला मागायला येतो.
कोण? तो डेटा सायंटिस्ट?
आत्या, तुला कसं समजलं?
तुमचा दोघांचा आयपी अड्रेस एकच दिसतो.
पण मी त्याची आई-बहीण नाही हे कसं समजलं?
'माझा नवरा' असं त्याची आई-बहीण म्हणतील का?
आत्या, तू खरंच चतुर आहेस गं.
माझी तारीफ केल्यामुळे तुझे प्रश्न सुटणार नाहीयेत.
आत्या, माझा नवरा माझ्यापासून गोष्टी लपवतो, असं मला वाटायला लागलं आहे.
'विवाहसंस्थेचा इतिहास' वाचायला घेतलं आहेस, का नवीन पद्धतीनं लिहिणार आहेस? विशाल भारद्वाजच्या शेक्सपियरी ओंकारा-मकबूल-हैदरसारखा?
आत्या, तसं नाही गं. मला फेसबुकवर आत्तापर्यंत फक्त वजन कमी करायच्या जाहिराती दिसायच्या. दिसली बाई की डकवली जाहिरात, असं फेसबुकनंच मला सांगितलं. मी विचारलं होतं, मला ही जाहिरात का दाखवता! पण हल्ली मला डायबिटीसच्या गोळ्या, डायबिटीसच्या डाएटांच्या खूप जाहिराती दिसत आहेत. म्हणून मी पुन्हा फेसबुकला विचारलं, मला ही जाहिरात का दाखवता. तर म्हणतात कसे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना डायबिटीस असेल तर तुम्हालाही असण्याची शक्यता वाढते. जणू काही अश्विनीकुमार जनआरोग्य योजनाच राबवत आहेत!
छूने से प्यार फैलता है! तू लहानपणी शबाना आझमीच्या जाहिराती नाही का बघितलेल्या?
आत्याऽऽऽ, मदत कर ना!
बरं, बरं. तू तुझ्या नवऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष देतेस?!
कामाचं बोलतो तेव्हा ऐकते. तो कोव्हिडपासून घरूनच काम करतो. त्यामुळे आणखी जास्त ऐकते. एक-दोनदा डायबिटिसबद्दल बोलत होता; मी तिथे ऐकायला गेले तर काही तरी वेगळेच शब्द वापरायला लागला आणि नंतर जाहिराती यायला लागल्या.
तुला तुझा प्रॉब्लेम काय माहित्ये का?
लवकरच समजणार अशी चिन्हं दिसत आहेत!
फाजीलपणा करू नकोस. तू जाहिराती खूप बघतेस. त्यापेक्षा तुझा व्यवसाय सांभाळ की!
आत्या, माझं लक्ष लागत नाही गं कशात!
डायबिटीसमुळे? हल्ली सगळ्यासाठी औषधं मिळतात, वर पुन्हा दीक्षित-दिवेकर वगैरे द-डायेटही असतात.
छ्या! काही झालं त्याला तर गोळ्यांची उसळ वाढेन मी त्याला चिनी मातीच्या सुबक कपात. पण तो लपवतोय का माझ्यापासून?
तुझ्या नवऱ्याकडे लपवण्यासारखं काही आहे, असं तुला वाटतंय. तू नवतरुणी आहेस का?
असं पाहा आत्या… फेसबुकनं जाहिरात दाखवली, म्हणजे आम्हां दोघांपैकी कुणाला तरी डायबिटीस असणार. उगाच का जाहिरात दाखवेल फेसबुक! आत्या, देवाला, तुला आणि फेसबुकला सगळ्यांचं सगळं माहीत असतं.
म्हणजे त्याला डायबिटीस नाहीये का?
तो काल काजू कतलीचा खोका घेऊन बसला होता. गोळ्या खाताना दिसत नाही. आणि चक्कर येऊन पडतही नाही. शक्य आहे का हे डायबिटीस असेल तर?
मुलगी हुशार आहे हो! तरीही जाहिराती का बघतेस तू?
कामाचा भाग म्हणून! जाहिरातींशिवाय माझा व्यवसाय कसा चालणार?
तू काऊन्सेलर आहेस; उगाच लाईफ कोच बनायला का जात्येस! त्यासाठी जिममधले ट्रेनर लोक आहेत ना!
विचार करेन.
तू एक काम कर. तू फायरफॉक्स वापर आणि त्यात ॲडब्लॉक वापर. यूट्यूबवरच्या जाहिरातीसुद्धा बंद होतील. ॲडब्लॉकवाल्यांना नेमानं थोडी दक्षिणा देत जा. माझे सव्वाअकरा रुपये आणि सुपारी विसरू नकोस.
आत्या, आम्ही दोघांनीही सल्ला घेतला, काही डिस्काऊंट नाही का मिळणार?
ॲमेझॉनवर म्हणतेस का असं, का फ्लिपकार्टवर? अं?
नाही आत्या.
(सुपारी आणि सव्वाअकरा रुपयांचं चित्र)
आता सुखानं चॅट बंद कर आणि जाहिरातींवर विश्वास ठेवणंही.
हो आत्या, थ्यँक्यू आत्या.
नमस्कार. मी आत्या. आपली कोणती समस्या आहे जी मी सोडवू शकते?
हॅलो?
बोला. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला?
हॅलो.
ते झालं. पुढे बोला.
तुम्ही आत्या ना? माझ्या मुलानं मला तुमच्याबद्दल सांगितलं.
तो डेटा सायंटिस्ट तुमचा मुलगा का?
हो, हो, तो माझा मुलगा.
बोला, तुमचा प्रॉब्लेम काय आहे?
मी तुम्हाला आत्या म्हणू का?
हा तुमचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही माझ्याशी चॅट केलं नाहीत तर हा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही मला काय म्हणायचं हा प्रॉब्लेम घेऊन तुम्ही माझ्याकडे आला नसतात तर हा प्रॉब्लेमच आला नसता!
हं?
तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे?
प्रॉब्लेम वेगळा आहे, पण मी तुम्हाला आत्या म्हणू का?
मला मिशा आल्या की कळवेन. तोवर मला आत्याच म्हणा!
हं?
तुम्ही नाटकं बघायला जाता का?
हो.
तुम्ही चेतक चालवल्येत का कधी?
हो, तरुणपणी चालवली की चेतक.
ती सुरू झाली नाही तर तिरकी करायचात का?
हो.
मग एक काम करा. तिकिटं काढण्याआधी फोन बंद कसा करायचा हे शिकून घ्या. आणि नाटक बघण्यासाठी सीटवर बसलात की आधी फोन बंद करा.
आत्या, तुम्हाला माझा प्रॉब्लेम कसा समजला?
मला मिशा आलेल्या नाहीत. मी आत्या आहे. मला सगळं माहीत असतं.
हो आत्या, थ्यँक्यू आत्या.
नमस्कार. मी आत्या. आपली कोणती समस्या आहे जी मी सोडवू शकते?
आत्या, नमस्कार. मला तुमची खूप अर्जेंट गरज आहे.
तुमच्या मनात नक्की काय आहे?
बोला, त्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे ना! यदा यदा हि प्रश्नस्य …
आत्या, माझा जन्मसुद्धा लोकांसाठीच झाला आहे.
आता समजला तुमचा प्रॉब्लेम! पण मला तो सोडवता येणार नाही.
आत्या, तुम्ही फेसबुकवरच्या ट्रोल आहात का? माझं ऐकून घ्या! मी फेसबुकवर गेली काही वर्षं रेगुलरली लोकांना हेल्प करत असतो. आमच्या घराण्यात लोकांना मदत करण्याची पद्धतच आहे तशी. लोकांचे प्रोब्लेम्स असतात, कधी लोकांना ते समजतात, कधी मीच समजावून सांगतो. फॉर एक्सांपले, लोकांना समजत नाही की समाजवाद म्हणजे नक्की काय. मी ते नेहमी एक्सप्लैन करत असतो. समाजवाद आपल्या घटनेतच लिहिलेला आहे. लोकांना तो समजला नाही तर घटना समजला नाही. आणि घटना समजली नाही तर आपली लोकशाहीच बुडली. सगळी डेमौक्रसीच बुडून कसं चालेल?
हा प्रॉब्लेम आहे तुमचा?
नाही, नाही. मी गेली दहा वर्षं फेसबुकवरून लोकांना समाजवाद आणि डेमौक्रसी यांचं महत्त्व लोकांना सांगत आलो आहे. सुरुवातीला लोकांनी माझ्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण आता तसं नाही. आता निखिल वागळेंपासून अनिल थत्तेंपर्यंत बरेच लोक माझी wall बघतात. त्यावर भल्याबुऱ्या चर्चा करतात. माझी फ्रेंडलिस्टही भरली. म्हणून मी लोकांना सांगितलं मला फौलो करायला. तर माझे फौलोअर्सही लाखांत आहे.
हं …
काल मी बघितलं तर माझ्या फौलोअर्सचा नंबर एकदम कमी झाला होता, दीड लाखांच्या जागी फक्त दहाहजार दिसत होते. मला शंका आहे की molotov जीं नी काही ऑर्डर दिली असेल का?
मोलोटॉव्ह? स्फोट केल्यामुळे फॉलोअर्स कमी झाले असणार.
मालवीय ji. ऑटोकरेक्ट च्यायच्चं! मी समाजवादी आहे. मी हिंसा करत नाही, आत्या.
हाच प्रॉब्लेम असणार तुमचा!
(संतापलेला इमोजी) आत्या! नाही!! हा प्रॉब्लेम नाही!!! माझे फौलोअर्स कमी झाले. आता डेमौक्रसी बुडणार, असा प्रौब्लेम आहे.
तुमच्या डेमौक्रसी-इडियोसिंक्रसीचं मला काही माहीत नाही. पण तुमचे फॉलोअर्स कसे वाढवायचे, किंवा कमी का झाले हे मी सांगू शकते. दोन्हींसाठी तुम्हाला सव्वादोनशे रुपये आणि नारळ द्यावा लागेल. शिवाय 'आत्याचा विजय असो' असं लिहावं लागेल. आमच्या जाहिरातींत हे मटेरियल वापरण्याची परवानगी दिलीत तर सव्वाशे रुपये आणि नारळ.
हो मान्य आहे. आत्याचा विजय असो.
तुमचे एकट्याचे फॉलोअर्स कमी झालेत का?
माहीत नाही. मी लोकांचे फौलोअर्स कोण, किती हे कशाला बघायला जाऊ!
मी हंसा वाडकर नसले तरीही सांगत्ये ऐका! बाकीच्या लोकांचेही फॉलोअर्स कमी झालेत. म्हणजे सगळ्यांचेच फॉलोअर्स कमी झालेत. याचा अर्थ … नको राहू देत. फेसबुककडे कायतरी झोल झालेला असेल किंवा त्यांनीच काही अकाऊंट्स बॉट्स आहेत असं समजून ब्लॉक केली असतील. ब्लॉक म्हणजे ब्लौक, तुमच्या भाषेत.
आणि हे लोकशाही वगैरे जे काही म्हणताय ना, ते फेसबुकवर फार लिहू नका, किंवा लिहा. त्यांना तुमच्या लोकशाहीचं काही पडलेलं नाही. आणि समाजवादाचं तर नाहीच नाही.
आत्या, मग मी आता थेट मार्कलाच समाजवाद शिकवायला पाहिजे. मला माझ्या आयुष्याचं ध्येय समजलं आत्या.
समजलं ना? मग या आता.
हो आत्या, थ्यँक्यू आत्या.
नमस्कार. मी आत्या. आपली कोणती समस्या आहे जी मी सोडवू शकते?
आत्या, तो रिकामा घडा डेटा सायंटिस्ट… त्यानं तुझं नाव सुचवलं.
तो तुझा भाऊ असणार!
हं?
हे असं आणखी कोण बोलणार?
तेही खरंच. आत्या माझा प्रॉब्लेम सांगते. गूगल आपल्या सगळ्यांचा डेटा जमा करतं. मला हे बरेच दिवस माहीत होतं, पण तरीही मी तेच वापरत होते. मग एक दिवस सणक आली, आणि मी डकडकगो वापरायला सुरुवात केली. फायरफॉक्समध्ये मी डिफॉल्ट सर्चसाठी डकडकगो वापरायला लागले. फोनवर डकडकगोचा ब्राऊजर इनस्टॉल केला.
मी जीमेल वापरते, गूगल डॉक्स वापरते. आणि बिंग किंवा ॲपल मॅप्सला तर शहाण्या माणसानं हातही लावू नये! गूगल माझ्यावर पाळत ठेवून असतं. माझा पुरेसा डेटा गूगलकडे आहे. माझा डेटा वापरून गूगल आणखी पैसे मिळवत असणार. तरीही मी ब्राऊजर बदलला. का, ते नाही सांगता येणार. इतक्यात तरी त्यामागे काही रॅशनल विचार आहे, असं म्हणता येणार नाही.
रॅशनल विचार असायची काही गरज नाही. 'आली लहर केला कहर' म्हणूनही ब्राऊजर आणि सर्च इंजिन बदलता येतंच की. पण यात कदाचित फ्रॉयडियन विचारही असू शकतो. माझ्या एका सिनीयर कलीगनं कुठलंसं पुस्तक वाचलं. मग तो 'सर्व्हेलन्स कॅपिटलिझम' आणि 'बिहेवियरल सरप्लस' वगैरे काय काय सांगायला लागला. मी त्या सगळ्या लेक्चरकडे लक्ष नाही दिलं फार. पण तो छान आहे. म्हणूनही मी ब्राऊजर बदलला असेल हे शक्य आहे ना, आत्या!
मग मी डेंटिस्टकडे गेले होते. तिथे टीव्ही सुरू होता. टीव्हीवर डकडकगोची जाहिरात दिसली - गूगल सतत तुमच्यावर पाळत ठेवून असतं. असं कुणी सतत तुमचा पाठलाग केला तर चालेल का - असा काहीसा जाहिरातीतला मेसेज होता.
आत्या, मी डकडकगो वापरायला लागले आणि लगेच ही जाहिरात दिसली. डकडकगो माझा पाठलाग करत असेल का?
प्रतिक्रिया
आत्याबाई
आत्याबाई फत्याबाई कणक्केचा गोळा
हिरवा पापड, तिरवा डोळा |
उत्तर द्या की!
पण बंद का पडला आत्याचा नंबर? मलाही या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. दिवाळीआधी मी फॅब इंडियाच्या वेबसाईटवर एक कुडता शॉपिंग कार्टमध्ये टाकून नंतर घेतलाच नाही. तेव्हापासून मला फेसबुक आणि गुगलवर सतत फॅब दिसू लागलं. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. मी थोडे दिवस शोशल मीडिया ब्रेक घेणार आहे असं एका मैत्रिणीला फोनवरून सांगितलं तेव्हापासून मला रस्त्यातही फॅबचे होर्डिंग्ज दिसू लागले.
ताई
नवरात्र आणि दिवाळीच्या मधल्या काळात फॅबिंडियाचे होर्डिंग्ज, त्यांच्या जाहिराती दिसणार नाहीत तर कुणाच्या दिसणार, मोदीजींच्या? मोदीजींना मार्केटिंगची गरज आहे का! फॅब स्वयंदीप्त नाही म्हणून त्यांना जाहिरात करावी लागते!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आत्या...
तुला मिशा असतील तर काका म्हणू का?
त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काकांना मिशा नसतील तर त्यांना आत्या म्हणायचं का?
हा फॉर्मॅट आवडला, संस्थळावर असल्या गोष्टी अजून करायला पहिजेलेत.
(पण फोनवर वाचताना त्रास होतोय)
--------------------------------------
==================
भूतकाळातील आस्वल्य.
There you go!
बघते. आज दुकान बंद केलं की हे आधी बघते, मग आजचे लेख!
हा फॉरमॅट वापरणं ही आदूबाळ यांची सूचना आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आवडेश!!!
आवडेश!!!
लय च जगावेगळे आहे
काका, काकी,आत्या मावश्या तुम्हाला नीट जगून देत नाही त .
सारखे सल्ले देतात.
अजून मामा,मामी,नातू,भावजय,नणंद,दिर समोर चे शेजारी डाव्या हाताचे शेजारी, उजव्या हाताचे शेजार.
,खूप सल्लागार बाकी आहेत .
पण स्वतचं मत हेच जगातील अंतिम सत्य असते.
कोणाचे च सल्ले मनावर घेवू नका.
पाच वर्षाची शिदोरी अजून तुमच्या कडे शिल्लक आहे सल्लागार लोकांची .
पण ती वापरायची की नाही हा तुमचा निर्णय
अय्या..
लोकांची चॅटींग कशाला ऐकायची... वाचायची?
मी नाही बाई...
पण सगळेच वाचतायत म्हणून वाचले.
आत्याबाई .. जगात भारी !
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
.
> दिवाळीआधी मी फॅब इंडियाच्या वेबसाईटवर एक कुडता शॉपिंग कार्टमध्ये टाकून नंतर घेतलाच नाही. तेव्हापासून मला फेसबुक आणि गुगलवर सतत फॅब दिसू लागलं.
ह्या क्षणी मी विमानतळावर आहे. इथल्या सगळ्या सार्वजनिक टीव्ही स्क्रीन्सवर सप्तशैया पॅटिसची जाहिरात दिसते आहे. प्रत्यक्षात ते अजून कुठे मिळत नसल्यामुळे ‘फार खमंग लागतं’ हा लोकांचा भाबडा गैरसमज टिकून आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
आत्या…
…हा बायेनीचान्स बॉट आहे काय?
—————
असो. प्रकार तितकासा झेपला नाही. बोले तो, जॉन्रमधला सुमार नमुना वाटला – काही नेत्राकर्षक असे वाटले नाही. वरवर चाळल्यावर, यातून आपली खास काही करमणूक होईल – की ज्याकरिता आपण तपशिलात वाचण्याचे कष्ट घ्यावेत – अशी धारणा झाली नाही.
हं, एका सुमार जॉन्रचा सुमार नमुना (ट्रॅश द ला ट्रॅश) म्हणून (विशेषांकाचा थीमला धरून) सादर केला असेलही१, परंतु तरीही, जमला नाही. (जॉन्र सुमार असण्यास आक्षेप नाही. परंतु, सुमार जॉन्रचे विडंबन म्हणून जरी वाचले, तरी ती चमक जाणवत नाही. कंटाळवाणे, रटाळ वाटते.)
—————
१ त्याच दृष्टीने पाहायचे झाले, तर – तेवढा आदूबाळाच्या लेखाचा एकच अपवाद१अ, १ब वगळता – मला आख्खा दिवाळी अंकच रटाळ वाटला, डोळ्यांत भरण्यासारखा वाटला नाही. (त्या अर्थाने, आख्खा अंकच ट्रॅश म्हणता येईल. हे अंकाचे यश म्हणावे, की अपयश?)
१अ आदूबाळाची कथा आवडली, ती केवळ वाचकाला कथेतून तळटीपेकडे आणि तळटीपेतून पुन्हा कथेकडे वारंवार उचल-की-आपट करण्याच्या त्यातील मजेमुळे नव्हे. बोले तो, ती मजा आहेच, आणि I am very proud of the author for having implemented it successfully, but… after all, it is a mere sideshow. कथा मुळातच दमदार आहे, लेखकाच्या शैलीत नि एकंदरीत लेखनातच वाखाणण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, आणि त्यातून या मजेमुळे कथेची लज्जत दुणावली आहे. (‘जशी की दुधावरली सायच!’ वगैरे केवळ मला दूध नि साय दोन्हीं आवडत नसल्याकारणाने म्हणणार नाही.)
१ब हो, यात मी अस्वलाच्या लेखाचासुद्धा अपवाद करणार नाही. लेख तुलनेने (एक प्रयत्न म्हणून) तसा बरा असला (आणि अस्वलाचा एरवी मी जबरदस्त फॅन असलो), तरीही. तितकाही भावला नाही. (नाही म्हणायला, कथेशेवटी अस्वलाने, मोठ्या आकाराच्या टायपात, कोणाचीतरी ‘बदनामी थांबवा!!!!!!’ म्हणून प्रतिपादिले आहे खरे, आणि, I do stand flattered by the imitation, but not flattered enough to dole him out an A+. Rather, I would grant him a C – a passing grade, but nothing more.) असो. (माझीच आवड अशी, त्याला काय करणार?)
.
लग्नकार्यात हिरीरीनं लगबग करणारी, सगळीकडे उपस्थित असणारी पण त्याचवेळी सगळ्यांना (विशेषतः वधूला) यथेच्छ नावं ठेवणारी एखादी आत्या असतेच.