ॲन ॲस्ट्रॉलॉजिकल गाइड टू ब्रोकन हार्ट्स

राशीभविष्य हा एक सॉलिड प्रकार आहे. बहुतेक लोक ते वाचतात आणि विसरुन जातात. पण रोजच्या रोज वाचायला मात्र विसरत नाहीत. मटामध्ये असताना किंवा लोकसत्तामध्येसुद्धा भविष्य आणि शब्दकोडं दिलं नाही की, वाचकांचे हमखास फोन यायचे. एखादा रोजचा स्तंभ दिला नाही तर जेवढे फोन यायचे त्यापेक्षा जास्त भविष्यासाठी यायचे. अर्थात हा झाला भूतकाळ. पण एकूणच राशीभविष्य हा विषय खरोखरच रंजक आहे. मला त्यात फार रस नाही, हा भाग अलहिदा.

0212-love-stories-valentines-day-chioma

 असो नमनाला घडाभर तेल ओतून झालं आहे... त्यामुळे आता विषयाकडे वळते.

तर मी नुकतीच नेटफ्लिक्सवर अॅस्ट्रॉलॉजिकल गाइड टू ब्रोकन हार्टस ही वेबसीरिज पाहिली आणि प्रेमातच पडले. या वेबमालिकेच्या आणि त्यातल्या अतीव देखण्या पुरुषांच्या...

हो हो बहिणींनो आणि ज्यांना रस आहे, अशा भावांनो, ही वेबमालिका नक्की बघा. अतिशय देखणे पुरुष आहेत. उंचेपुरे, देखणे गंमत म्हणजे समंजस वगैरे असणारे...इटालियन वेबसीरिज आहे, त्यामुळे देखणेपणा ओसंडून वाहतोय.. असो....

या मुद्द्यावर मी वाहवत गेले तर पुढे जाताच येणार नाही. तेव्हा तूर्तास हा मुद्दा गुंडाळू आणि पुढे जाऊ...

तर राशीभविष्यावर माझा बिलकुल विश्वास नाही, अगदी वाचून हसावं इतकाही नाही. कुणी म्हणालं, तुझं भविष्य सांगतो किंवा सांगते की मला धडकीच भरते खरंतर. माझ्या भविष्यात काय आहे ते, गुलदस्त्यातच असलेलं बरं असं मला वाटायचं, खरंतर अजूनही वाटतं. तरीही मी ही वेबमालिका पाहिली कारण असंच. रॉमकॉम मला आवडतात. आपल्या रोजच्या जगण्यात एवढे सारे ताण आहेत, मग कधीकधी हलकंफुलकं, अगदी दवणीयसुद्धा मला चालतं.
पण ही वेबमालिका दवणीय नाही.....please Note

तर ‘अॅन अॅस्ट्रॉलॉजिकल गाइड टू ब्रोकन हार्टस’ ही गोष्ट आहे, अॅलिसची. अॅलिस बासी. तिचं नाव अगदी सार्थ आहे. कारण ही बाई खरोखरच अॅलिस इन वंडरलँडसारख्या अॅलिसासारखी आपल्या एका वेगळ्याच विश्वात असते. फरक इतकाच की ही अॅलिस ब्लंडरलँडमध्ये राहत असते.
हिचं ताजंताजं ब्रेकअप झालंय. वरती त्या बॉयफ्रेंडने हिला अंगठी दाखवून दुसरीला प्रपोज केलंय... आता देवदास बनण्यावाचून अॅलिसला पर्याय नाही.
आपली हिरवी खटारा गाडी हाकत ती घरी आलीय... जो कुछ इसकी लाइफ का भरता बनके होना था वो हो गया है. आणि.............

तिला ते दोघे भेटतात. एक आहे, अति हॉट्ट असा डाविडे सार्डी आणि दुसरा आहे, गोग्गोड टिओ...या टिओला ग्रह-तारे वश आहेत... हा मुलगा ग्रहताऱ्यांचा अभ्यास करतो. त्याला त्यातली जाण आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हेसुद्धा त्याला सांगता येतं, ते अतिशय झक्कास स्टाइलमध्ये. आपल्याकडे असा कोणी देखणा भविष्यकार का नाही याचा विचार माझ्या मनात चमकून गेला. पण राहूदे एवढ्या अपेक्षा नकोत.
तर परत येऊ त्या अति हॉट्ट डाविडेकडे. डेविड असं मी सबटायटलमध्ये वाचलं पण मालिकेतली सगळी पात्रं डाविडे खरंतर दाविडे सार्डी म्हणत होते मग मीही तसंच लिहीलंय.

तर अॅलिसच्या आयुष्यात जेवढा गोंधळ आहे तेवढाच ऑफिसात. ती काम करते त्या डोरा टीव्हीमध्ये सगळा आनंदी आनंद सुरू आहे. शोज धड चालत नाहीत. माणसं आपल्या मनाप्रमाणे वागतायत. कल्ला आहे एकूण. पण आता गुंतवणूकदारांनी या सगळ्याकडे गांभीर्याने पाहायचं ठरवलंय त्यामुळे डोरा टीव्हीमधल्या सगळ्यांचे डोर जोरात खेचले गेलेत. (वाईट होता ना! पण शब्दश्लेषाच्या या मोहाबद्दल... सॉरी)
तर दाविडे सार्डी तिचा नवा बॉस म्हणून आलाय आणि गोंडस टिओशी तिची दोस्ती जमलीय.

दाविडेबरोबर काही फारसं बरं नाही अॅलिसचं खरंतर वाईटच मत झालं आहे, कारण एन्रिको जो तिचा आधीचा बॉस आणि मेंटॉर काइंड होता त्याला दाविडेमुळे जावं लागतंय. मात्र अॅलिसच्या आयुष्यातील ज्योतिष सांगता सांगता टिओ तिचा फार जवळचा सखा बनलाय. आता या दोन देखण्या पुरुषांच्या सहवासात अॅलिसचा एक समांतर प्रवास कसा होतो. त्याची धम्माल गोष्ट म्हणजे ही सगळी वेबसीरिज.

गोष्ट फार वेगळी आहे का? तर नाही!

कथा नेहमीसारखीच आहे, सरतेशेवटी नायिकेला प्रेम मिळणार आहे. ते कोण असेल याचा अंदाजही येतो आहेच. मात्र तिथपर्यंतचा तिचा प्रवास कोणकोणत्या राशींच्या नागमोडी वळणांतून जातोय, ते पाहणं मजेचं आहे.

व्हॉट्स युअर राशी? म्हणत टिपीकल एकेका राशीचे मुलगे तिच्यापर्यंत येत नाहीत.

तिच्या प्रेमापर्यंत पोहोचताना तिचा एक छान प्रवास होतो. त्यात तिचं धडपडणं आहे, माती खाणं आहे. सगळ्यांसाठी धावत राहणं आहे, नको त्यांची नको इतकी काळजी करणं आहे, अक्षरश: ‘नेकी कर दर्यामे डाल टाइप’च्या अनेक गोष्टी आहेत पण तरीही अॅलिस खास आहे.
तिच्या कामाचं मला आणखी कौतुक वाटतं. ती क्रिएटिव्ह आहे. आपल्याकडे साधारण ई पी किंवा क्रिएटिव्ह टीममधली माणसं ज्या पद्धतीने कार्यक्रम सांभाळतात, तसंच अॅलिसचं काम आहे. आणि हे काम मालिकेत खरंखुरं दिसतं. हे नुसतंच फायली फिरवणं नसतं किंवा ‘हमने आज फलाणा डील की’ टाइपच्या हवेतल्या, कुठल्याही व्यवसायाला जुळतील असल्या ढोबळ गप्पा नाहीत. ती जे काम करते त्याचाही फार छान विस्तार कथानकात केलाय. त्यातून तिची गोष्ट उलगडत जाते.

तिच्या प्रेमात असलेला पुरुष तिच्या व्यावसायिक यशाचा आणि त्यात तिने पुढे जाण्याचा विचार प्रामुख्याने करतो, हे आणखी छान आणि सुखावह आहे.
एकेठिकाणी अॅलिस तिच्या एककाळच्या प्रियकराला म्हणते, ‘’खरं सांग माझ्यासाठी आनंदी होणं, माझ्या यशामुळे तू खुश होणं एवढं कठीण आहे का?’’
हा प्रश्न ऐकून आपणसुद्धा दोन मिनिटं स्तब्ध होतं.

आपल्या सगळ्यांच्याच शाळेत, कॉलेजमध्ये, ऑफिसात एखादी व्यक्ती वेंधळी किंवा फारशी यशस्वी नसलेली, सगळ्यात घोळ घालणारी धांदरट व्यक्ती असते. पण जेव्हा ते आपल्या त्या कवचातून बाहेर येतात, काहीतरी चांगलं करून दाखवतात तेव्हा आपण बरेचदा असेच विचित्र रिअॅक्ट होतो. त्यांचं यश सहन करता येत नाहीच अनेकांना पण ती व्यक्ती एखादी गोष्ट एकदम भारी करू शकते, हेसुद्धा झेपत नाही अनेकांना... वाईट म्हणजे त्या धांदरट व्यक्तीला याची जाणीव असतेच. ती जाणीवच तिला त्रास देत राहते. तिच्या मनात नकळत एक विचित्र सल तयार करत राहते.
अॅलिसचं असंच आहे. हुशार तरीही कार्यालयातली धांदरट म्हणून प्रसिद्ध असलेली ही मुलगी प्रत्यक्षात किती शहाणी असते, क्रिएटिव्ह असते ते तिचं तिलाच उमगत जातं.

बॉयफ्रेंड म्हणून चांगला आहे, पण लैंगिक संबंधांत तो सुखी करू शकत नाही, किंबहुना त्याला स्वत:ला सुधारण्याची गरजच वाटत नाही... असं असल्यावर मग अशा बॉयफ्रेंडपासून दूर होणारी, शरीराने चांगला मोठा दिसत असलेला मुलगा प्रत्यक्षात १९ वर्षांचा कोवळा तरुण आहे हे कळल्यावर त्याला ‘आधी अभ्यास कर’ असा सल्ला देऊन तिकडून निघणारी अॅलिस. पूर्वप्रियकराच्या आणि त्याच्या सध्याच्या प्रेयसीच्या आयुष्यात सगळं काही नीट व्हावं म्हणून धडपडणारी, त्यांना सांभाळणारी अॅलिस, आपल्या मेंटॉरच्या एन्रिकोच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्ससुद्धा आपले मानत राहते. आपल्या बेस्ट फ्रेंड असलेल्या मैत्रिणीकडे जाऊन सगळ्या गोष्टी घडाघडा बोलते, नवरा, मुलगा असलेल्या आपल्या मैत्रिणीचे काही चॉइसेस गृहीतही धरते. आपलं चुकलं हे कळल्यावर मनापासून सॉरी म्हणते.

प्रियकराच्या आयुष्यातल्या 'ती'ला समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि कधीकधी आपल्या मनाला आणि त्यातल्या हजारो ख्वाहिशोंना सपशेल शरण जाते.
मालिकेत शेवटी तिला तिचं प्रेम मिळतंच पण आपल्या माणसांना जपताना नेमकं काय करायला हवं त्याचे धडेही मिळतात. आपल्या माणसांना जपताना आपल्याला स्वत:ला जपण्यासाठी काय करावं, हेसुद्धा तिला सापडतं.

अॅलिसचा सगळा धांदरटपणा तसाच राहूनही तिची तिला ती निजखूण सापडते, ते जास्त भारी वाटलं.

यातला दाविडे सार्डी michele rosiello मिशेल रोझिएलो हे एक खास प्रकरण आहे. अति अति खास... काय देखणा दिसतो हा मनुष्य..
उंचापुरा, लांबरुंद खांदे असलेला, केसांच्या सेक्सी बटा असलेला, खिशात हात घातल्यानंतर आय हाय दिसणारा....संपूर्ण सीरिजभर ज्याला आपण फॉर्मल्समध्येच पाहतो, अगदीच मोजक्या प्रसंगात तो नैसर्गिक रुपांत दिसतो...

लेकीन आय हाय,
 'कवारियोंका दिल मचले’ वाला माहौल करून जाणारा नट आहे. याचा आवाज किंवा याला ज्या कुणी आवाज दिला आहे तोही सेक्सी आहे..  मी इंग्लिश ऐकलं. इटालियन ऐकणं काही जमण्यासारखं नव्हतं...

चक्क अभिनयसुद्धा करतो आणि....नुसत्या डोळ्यांतून किंवा चेहऱ्यावरच्या हावभावांतून, ओठांतून, बोलतो.

खरंतर टिप्पीकल आहे यांचं कपल. ती प्रचंड धांदरट, उत्फुल्ल, उत्साही, बोलकी आणि तो शांत काहीसा अबोल, ठहराव जपणारा. पण तरीही मिशेल रोझिएलोने ही टिपीकल व्यक्तिरेखा फार देखणी केली आहे. तसा तर कायमच पॉइझ्ड वाटणारा स्वत:चा आब राखून राहणारा दाविडे अॅलिससमोर मात्र सगळी शस्त्रं टाकून देतो.

पॅरिसमध्ये अख्खा दिवस स्वत:ला सावरल्यानंतर दिवसाअखेरीस ज्या रोमाँटिक हतबलतेने, आपल्या भावनांवर काबू ठेवणं न जमल्याने त्यांना शरण येतो तेव्हा धापा टाकणारा तो इतका सुरेख दिसतो की आपलाही श्वास रोखला जातो.....

तर असो. इथेच थांबते मी ज्यांना तो आवडलाय त्यांनी सीरिज बघा.

मालिकेची कथा, व्यक्तिरेखा हे सगळं छान आहेच, काहीवेळा बऱ्यापैकी अंदाज बांधता येईल अशीही आहे पण अॅस्ट्रॉलॉजी अर्था फलज्योतिषाबद्दल ज्या सहज ही मालिका बोलते ते मला जास्त आवडलं. आपल्याकडे बघा ना, राशीभविष्य, फलज्योतिष म्हटल्यावर कुठले चेहरे समोर येतात...
हे ज्योतिष, भविष्य वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर थेट अध्यात्म वगैरे विषयांकडेच जातात लोक. तीच यातली सर्वोच्च पायरी. नाहीतर मग ‘मुंग्यांना साखर खाऊ घाला’ टाइप कुडमुडे सल्ले.

पण ही सीरिज तशी नाही. ती धमाल करते. फलज्योतिषाविषयी आपल्या मनात कुतुहल जागृत करते. मी मुद्दाम कुतुहल म्हटलं आहे. मत तयार करते असं नव्हे.  

पण हा विषय रंजक आहे याची खात्री देते. मराठीत असा प्रयत्न ‘राशीचक्र’ने केला होता पण अनेक पूर्वग्रह बाळगून केलेले विनोद आणि पुन्हा तेच अध्यात्माची फोडणी त्यामुळे नंतर मला तो रुचला नाही.

त.टी. सीरिज बघता बघता माझी आणि माझ्या आयुष्यातल्या जिवलगांच रास बघून मीही काही गमतीजमती शोधल्या आणि धम्माल म्हणजे त्यातले काही पॉइंट्स जुळल्यावर आम्ही एकमेकांना टाळ्याही दिल्या. 

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

बाकी मुलींचीं कंटाळवाणी बडबड ऐकणे, त्यांच्या विचारात रस घेऊन वेळ घालवणे असे पुरुष कोणत्या राशिंचे असतात?
(आचरट प्रतिसाद पहिलाच आला म्हणून वाईट वाटून घेऊ नका,चांगले गंभीर सुद्धा येतील.)

शैलीवरनं "भुस्कुटणीची" आठवण झाली.

'निजखूण' = ? काही आठवड्यांपूर्वी वाचनात आला होता हा शब्द. स्वत्व? 'Who am I?' चं उत्तर?

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

प्रतिसादातले लेखन तारांकीत कसे करायचे?

मेघना भुस्कुटे म्हणताय का? असू शकतं हे. मला तिचं लिखाण आवडतं खूप

'निजखूण' बोले तो काय ते नाही सांगितलंस.

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

स्वत:मधली खासियत,. आपल्यालाच आपली ओळख पटणं या अर्थी. तुम्हाला वाटतंय तसंच.

धन्यवाद. प्रत्येक एपिसोड बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करते पण मग ते सगळं संगीतल्यासारखं होईल. शिवाय असं लिहिण्यासाठी सगळे परत पाहावे लागतील. जमलं तर नक्की लिहीन.

म्हणजे असा एक प्रश्न असतो कुठे प्रदर्शनाला गेलो की तिथल्या प्रवेशिकाचा फॉर्ममध्ये. पेपरात/जाहिरातीत/टीवी चानेलवरच्या मुलाखती/तोंडी/इमेल वगैरे. उगीच उत्सुकता.
(बोलभिडू,अक्षरनामा,मनोगत वगैरे मराठी मंच आहेत पण त्यांच्याकडे स्वप्रकाशन नसतं. )

हो हो बहिणींनो आणि ज्यांना रस आहे, अशा भावांनो, ही वेबमालिका नक्की बघा. अतिशय देखणे पुरुष आहेत. उंचेपुरे, देखणे गंमत म्हणजे समंजस वगैरे असणारे...इटालियन वेबसीरिज आहे, त्यामुळे देखणेपणा ओसंडून वाहतोय.. असो....

हायऽऽऽ! एवढं वाचल्यानंतर आधी पुढचा लेख वाचू का मालिका बघायला सुरुवात करू, असा प्रश्न पडला. (हा प्रश्न To be or not to be या चालीवर वाचावा.) घाईघाईत प्रतिसाद पूर्ण करून टीव्हीच सुरू करत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा फलज्योतिषाच्या बुजगावण्यावर विश्वास नाही असं म्हणणं म्हणजे ज्युरासिक पार्कमध्ये जरा जाडगेल्या पाली आहेत, म्हणण्यासारखं होईल. मी तो सगळा प्रकार काही वायझेडपणा हवा म्हणून घातला आहे, असा बघत आहे. म्हणजे आपण म्हणावं की आहे आपलाच माणूस म्हणून घ्या जरा सांभाळून, तसं! मीही नाही का, नोकरी करायची म्हणून नवभांडवलशाही-धार्जिण्या कंपनीची धन करते, तसलाच तो प्रकार.

तिचा तो ज्योतिषी मित्र गे वाटतो. गे तरुणालाच अशा खालच्या, गिमिकी पातळीवर उतरवणं, आणि इटलीत आता भडक उजव्या पक्षाची सत्ता असणं, आणि नेटफ्लिक्स युरोपीय मालिकांमधूनही अमेरिकीपण सोडत नाही अशी काही विचारांची मालिका सुरू झाली. एकदा अमेरिकीपणा घातला की फार अपेक्षा ठेवण्यात हशील नसतो. मग उरतात फक्त सुंदर पुरुष. तेवढे बघण्यासाठी बघेन मालिका.

तसंही दिवसभर नवभांडवलवाद चोंबाळण्यासाठी पैसे देणारं काम दिवसभर केलं की आपल्याला फार बुद्धी आहे असा संशय संध्याकाळी येत नाही. मग एकीकडे भाज्या वगैरे चिरताना टीव्हीवर काही आवाज लावून द्यायचा, त्याबरोबर सुंदर पुरुष का बघू नयेत!

सुंदर पुरुष बघितलेच पाहिजेत!

पाहा 'एमिली इन पॅरीस'. त्यात ती एमिली आता काही महिने पॅरीसमध्ये राहूनही très (खूप) या शब्दाचा त्रे असा (काहीसा) फ्रेंच उच्चार सोडून ट्रे असा अमेरिकी उच्चार करते, तेव्हापासून लिली कॉलिन्स बोलायला लागली की मी टीव्हीचा आवाज बंद करून फक्त सबटायटल्स वाचायला सुरुवात केली.
एवढं करून समोर चहापोहे नसतातच. मग ट्रे कशाला हवाय!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप मजा येईल.
बुध,रवि आणि चंद्राचा प्रभाव असलेल्या राशी. यांचं सर्व 'आता' असतं. त्यामुळे संभाषण,कृती वर्तमानात असते.