दाकाराई सुमन ओकोये

#लायबेरिया #संकल्पनाविषयक #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

दाकाराई सुमन ओकोये

- शिरीन.म्हाडेश्वर

जगभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रस्थापित झालेल्या दाकाराई सुमन ओकोये या आफ्रिकन-मराठी रेस्टॉरंटचा सर्वेसर्वा आणि मागील वर्षी एका नामांकित फाॅर्टी अंडर फाॅर्टीच्या यादीत झळकलेला दाकाराई याच्याशी हल्लीच न्यूयॉर्कला एका फूड फेस्टिवलमध्ये भेट झाली. त्यानंतर वेळात वेळ काढून त्यानं माझ्याशी गप्पा मारण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि स्वतःचे दक्षिण आफ्रिकी वडील, महाराष्ट्रीय आई, आफ्रिकेत रुजलेली पाळंमुळं, नव्वदीच्या दशकात मध्यवर्ती पुण्यामध्ये लहानाचं मोठं होतानाची जडणघडण, आफ्रिकेतील अपार्थाइडचे दिवस, पूर्वीची खडतर परिस्थिती ते आताची समृद्धी, त्याचं रेस्टॉरंट, त्याचं कुटुंब अशा वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास संवाद साधला. त्या मोकळ्याढाकळ्या गप्पांचा हा संक्षिप्त अहवाल.

दाकाराई! तुझ्याबद्दल आणि तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. बऱ्याच अंशी तू एखाद्या मराठी माणसासारखा दिसतोस. इतकं मस्त मराठी बोलतोस. यामागची मेख काय? आणि तुझ्या नावाबद्दलही सांग ना! कोणत्याही अँगलने तू 'दाकाराई ओकोये' वाटत नाहीस.

:- (मिस्कील हसून) 'चिन्मय पाठारे' वाटतो का? हो, म्हणजे लहानपणी पुण्यात शेजारीपाजारी किंवा कुणी नवीन भेटलं की प्रत्येकाला हा प्रश्न पडायचा. शाळेतसुद्धा बऱ्याच जणांना वाटायचं. हा पठ्ठ्या बऱ्यापैकी आपल्यासारखा दिसतो. 'आपल्यासारखा' म्हणजे काय तर कान, नाक, डोळे, कपाळाची ठेवण सगळं साधारणतः आपल्यासारखं आहे. रंग बहुतांशी लोकांप्रमाणे सावळा आहे. केस आहेत थोडे कुरळे, पण ते काय बऱ्याच जणांचे असतात! हा बोलतोही आपल्यासारखा. संस्कृत श्लोकपठण करतो. मग याचं नाव असं काय? प्रचंड कुतूहल असायचं.

तर माझा जन्म जोहान्सबर्गमधला. ऐंशीच्या दशकात पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरातून जोहान्सबर्गला गेलेली पंचवीसेक वर्षांची एक पत्रकार मुलगी तिथल्या एका स्थानिक मित्राच्या एवढी प्रेमात पडते की आपलं सगळं जग मागे सोडून त्याच्याबरोबरच राहायचं ठरवते, दोन्ही कुटुंबांचा विरोध पत्करून विटेवर वीट ठेवून ते दोघे तिथे आफ्रिकेतच अपार्थाइडमध्ये स्वतःचं विश्व साकारतात आणि मनापासून एकमेकांना साथ देत राहतात, ही थोडक्यात माझ्या आईबाबांची प्रेमकथा. पहिल्या वेळी ऐकली तेव्हा मला तर आपण एखाद्या सिनेमाची गोष्ट ऐकतोय की काय असंच वाटलं होतं. जग त्या वेळी सध्याइतकं पुढारलेलं आणि कनेक्टेड नव्हतं. माझ्या आईबाबांना त्या वेळी कोणत्या दिव्यातून जायला लागलं असेल याची कल्पनाही करणं खूप कठीण आहे. आईबाबांनाच काय, नानांना - नाना म्हणजे माझे आजोबा - आणि आजीलासुद्धा. सगळ्यांसाठीच तो प्रवास आव्हानात्मक वाटला असणार आहे. आई त्यांची एकुलती एक लाडाची मुलगी. पण आई-बाबांनी लग्न करायचं ठरवलं आणि आईने तसं तिच्या घरी सांगितलं तेव्हा नाना आईला म्हणाले की तू आता काही पुण्यात परत येऊ नकोस. भेटायलाही नको. कूळ, गोत्र कशाकशाचा पत्ता नसलेल्या, दुसऱ्या खंडातल्या एका माणसाला जावई म्हणून कोणत्या तोंडानं घरात घेऊ? आईनं न डगमगता मग तिथेच राहायचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नानंतर दोन वर्षांनी मी आलो. शोना म्हणून साऊथ आफ्रिकेतली एक भाषा आहे. शोना भाषेत 'दाकाराई' म्हणजे आनंद. माझा जन्म आई बाबांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला म्हणून मी दाकाराई. (त्यानंतर माझ्या खोड्यांमुळे किती वेळ तो आनंद टिकला ती गोष्ट निराळी!) बाबाचं आडनाव ओकोये. आणि सुमन माझी आई.

दिसण्याबद्दल विचारलंस म्हणून सांगतो, माझा बाबा मला गमतीनं नेहमी म्हणायचा, तुझ्या आईचा मराठी जीन तिथल्या लढवय्या मावळ्यासारखा एकदमच डॉमिनंट निघाला. तुझा ना रंग माझ्यासारखा ना रूप. आणि आईचं ठरलेलं उत्तर असायचं, ज्या साच्यामध्ये ही मोट बांधलीये ती आहे ना तुझ्यासारखी? हाडांचा सापळा आहे ना तुझ्यासारखा? तेवढ्यावर समाधान मान आता. गंमतीचा भाग सोडला तर मी अगदी मातृमुखी आहे. माझे वडील आफ्रिकन आहेत यावर विश्वास ठेवणं अशक्य वाटेल एवढा मी माझ्या आईसारखा दिसतो.

जन्मापासून आई माझ्याशी मराठीतूनच बोलायची. भाषा टिकवण्याचा अट्टाहास म्हणून असं नाही. आपल्या स्वतःच्या भाषेत बोलणारं, आपलं कुणीतरी आईला आफ्रिकेत हवं होतं म्हणून असेल. आणि आफ्रिकेत राहून स्थानिक भाषा - स्वाहिली - येत नाही असं कसं होईल! लहानपणीचे तिथले चट्टेबट्टे दोस्त स्वाहिली बोलणारेच होते. त्यामुळे आजही मला दोन्ही भाषांमध्ये अस्खलित बोलता येतं.

जोहान्सबर्ग ते पुणे हे स्थलांतर कसं घडलं?

मी आठ वर्षांचा होतो तेव्हा अचानक एक दिवस बाबा आम्हाला सोडून गेला. त्याच्या बाईकचा ऍक्सिडंट झाला आणि आमच्या जगाची उलथापालथ झाली. A part of me died that day. Truth be told it is still healing. Perhaps it might never heal.

बाबा गेल्यावर जोहान्सबर्गमध्ये आम्ही – मी आणि आई – सहा-सात महिने राहिलो असू फार तर. माझ्यासाठी आणि आईसाठी तो प्रचंड अवघड काळ होता. मला एकटीनं वाढवणं, तेसुद्धा अपार्थाइडमध्ये, आईला जड जायला लागलं होतं. बाबाचे एक-दोन मित्र सोडले तर कुणाचाच विशेष आधार नव्हता. बाबाशिवाय तिचं मनही तिथे रमत नव्हतं. आईने मग भारतात परत जायचा निर्णय घेतला. आफ्रिका सोडून जायचं हे कळल्यावर काय वाटलं ते नेमकं मला आठवत नाही. पण आपल्यासोबत जे होतंय त्याचा अर्थच उलगडत नव्हता. वयाची आठ साडेआठ वर्षं माझं सगळं जग म्हणजे जोहान्सबर्ग एके जोहान्सबर्ग होतं. दक्षिण आफ्रिका सोडून जग काय असतं तेच मुळात माहीत नव्हतं. भारतात आपल्या आईचे आईवडील राहतात पण त्यांना बाबा आवडत नाही म्हणून आपण तिकडे जात नाही, हे जन्मापासून माहीत असलेलं एक सत्य. पण त्यानंतर आता आपण त्या पूर्ण परक्या देशात जाऊन तिथेच राहायचं हे दुसरं सत्य, आणि ते पचवणं सोपं नव्हतं. कशी असेल तिथली माती? आकाशाचा रंग इथे आहे त्याहून फिक्कट असेल की गडद? पाण्याची चव कशी असेल? तिथे कोणती फळं असतात? कोणती फुलं फुलतात? तिथली आजी कशी वागेल? आई तिथेही पेरी पेरी पोहे बनवेल का? एखादी जादू झाली आणि बाबा परत आला तर आपला भारतातला पत्ता त्याला कसा कळेल? तो कधीतरी आपल्याला पुन्हा भेटेल का? असे वाट्टेल ते प्रश्न पडायचे. ते प्रश्न मनात घेऊन, सगळं पसारा गुंडाळून, जोहान्सबर्ग मागे ठेवून आम्ही पुण्यात आलो. आईने पुण्यात नोकरी करायची आणि आम्ही दोघांनी आजी-आजोबांबरोबर त्यांच्या वाड्यात राहायचं असं ठरलं.

पुण्यात नानांच्या वाड्याशेजारच्या शाळेत माझं नाव दाखल करण्यात आलं. शाळेत नाव घालण्याआधी नानांनी प्रस्ताव मांडला, आता हे नाव कशासाठी? सगळं मागे ठेवून नव्याने श्रीगणेशा करताय तर हे नाव तरी कशासाठी! नशिबानं हा थोडासा आमच्यासारखा दिसतो. रंगानं सावळा असला तरी आमच्यातला म्हणून खपून जाईल असा आहे. बोलतोही अस्खलित मराठी. झालं गेलं गंगेला मिळालं. मुलाला आपलं घरचं आडनाव लावू. पाठारे. चिन्मय पाठारे म्हणून नाव नोंदवू.

आईने तेव्हा आजोबांना स्पष्ट शब्दांत सांगितलं. तो जेलानीसारखा – बाबाचं नाव जेलानी – फारसा दिसत नसला तरी त्याचाच मुलगा आहे. याचा तुम्हाला किंवा जगाला सोयीस्करपणे विसर पडावा म्हणून मी त्याचं नाव बदलणार नाही. नानांनी खूप आकांडतांड केलं. नातवाची ॲडमिशन घ्यायला जाऊ तेव्हा हे असलं अजब काहीतरी दाकाराई ओकोये फोकोये नाव नोंदवू? आणि काय सांगायचं रोजच्या रोज पन्नास लोकांना? किती प्रश्नाची उत्तरं द्यायची? आधीच आयुष्यात बरेच प्रश्न आहेत. त्यात अजून प्रश्नांची भर कशासाठी म्हणून? पण आई काही जुमानली नाही.

मी आजूबाजूला बरीच तुटलेली नाती बघत आलोय. संसार चालू असतात, नातं कधीचं मेलेलं असतं. जेवढं मला आठवतं तेवढं माझ्या आईबाबांचं नातं रसरशीत जिवंत होतं. म्हणून ते टिकलंही. बाबाच्या पश्चातसुद्धा. आईने पुण्याच्या त्या मराठी शाळेत माझं नाव जन्म प्रमाणपत्रावर होतं तेच कायम ठेवलं. दाकाराई सुमन ओकोये.

किती अद्भुत प्रवास आहे आहे हा! हे घडत असतानाही तसाच अद्भुत वाटला का? आपण वेगळे आहोत असं वाटायचं का?

मी 'वेगळा' आहे हे माझ्यापेक्षा जास्त इतरांनाच वाटायचं. नव्वदच्या दशकात ग्लोबलायझेशन आता आहे त्या प्रमाणात झालं नव्हतं. आता जागतिक सिनेमा घराघरात पोहोचलाय. शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं माणसं जगाच्या पाठीवर सगळीकडे प्रवास करतायेत. वेगवेगळ्या लोकांना भेटताहेत. विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण वाढलीये. मी लहान होतो तेव्हा सगळ्यांचंच जग सीमित होतं. नाना संस्कृत शिकवायचे. निवृत्तीनंतर वाड्यातच सकाळ संध्याकाळ वर्ग असायचे. लोकांची सतत वर्दळ असायची. हा गोऱ्यागोमट्या पाठारे गुरुजींचा नातू पण रंगाने काळ्याकडे झुकलेला. नाव दाकाराई. काय मामला आहे! पण हळूहळू झाली सगळ्यांना सवय.

नानांनी जेव्हा माझं नाव बदलायचा विषय काढला तेव्हा खरं सांगतो, मला खूप भीती वाटली होती. एखाद्याची ओळख अशी कशी पुसून टाकायची ना? शेवटी मी म्हणजे कोण? जगाला दिसतो तो? की मी आतमधून खरा आहे तो? आफ्रिकेत माणसांचा विक्रय चालायचा त्यात माझे पणजोबा विकले गेले होते. ते उसाच्या मळ्यात काम करायचे, कधी परतले नाहीत. फाळणीचा इतिहास वाचताना जसे माझे डोळे पाणवतात तसा आफ्रिकेतल्या गुलामगिरीचा इतिहासही माझ्या अंगावर काटे आणतो. आपोआप. अपार्थाइडच्या काळात आईबाबांना मिळालेली वागणूक ऐकली की जिवाची तडफड होते. माझ्यात एका आफ्रिकन माणसाचा DNA आहे हे सत्य जगाला वरकरणी दिसू दे किंवा न दिसू दे, मी तोच आहे. माझं दिसणं, नाव, बोलणं यात कितीही विसंगती असली तरीही मी तोच आहे.

यावरून एक आठवलं म्हणून सांगतो. केमिकल इंजिनिअरिंगला असताना आम्हाला एक माशेलकर सर म्हणून होते. लॅबमध्ये प्रयोग करताना ते म्हणायचे की तुमचे सगळे रीडींग्ज अपेक्षेप्रमाणे समीकरणात बसणारच नाहीत. थोडे बाहेर जाणार. काहीकाही outliers असणार. Outliers आले म्हणजे प्रयोग अयशस्वी झाला असं मुळीच समजू नका. तुमच्या प्रयोगामध्ये ते रीडींग घेताना असं काय वेगळं होतं म्हणून ते समीकरणात बसलं नाही याची फक्त नोंद घ्या. त्यातून बरंच शिकायला मिळेल. आपल्याला समाजात कुठेच outliers नको असतात. अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं दिसलं, ऐकलं, हाताला लागलं की लगेच घाबरायला होतं. Outliers need to be normalized.

आफ्रो-मराठी पदार्थांची सुरुवात कशी झाली?

सुरुवात कधी झाली हे आता आठवतही नाही. माझ्या जन्माच्या आधीपासूनच झाली होती खरं तर, पण बाबा गेल्यानंतर ती प्रकर्षानं जाणवायला लागली. जोहान्सबर्गमध्ये राहताना जसं आईने स्वतःमधलं पुणं निगुतीने जपलं होतं तसं आम्ही पुण्याला गेल्यावर तिने माझ्यातली आफ्रिका जपली. तेव्हा इंटरनेटकरवी एका क्लिकमधून, युट्यूब, गूगल मॅपमधून कुठेही फेरफटका मारून येता यायचं नाही. हवं ते मागवण्यासाठी अमेझॉन नव्हतं. पुरेसे पैसेही नव्हतेच म्हणा. असं असतानाही तिने खाण्यातून आमच्या आयुष्यातले आफ्रिकेतले दिवस जपले. फक्त आम्हाला दोघांनाच माहीत असलेल्या बाबाला जिवंत ठेवलं. आम्ही आफ्रिकेत असताना ती जे पदार्थ बनवायची ते ती पुण्यातही करत राहिली. मला बाबाशी आणि माझ्या लहानपणाशी जोडणारा तो एक शेवटचा धागा होता आणि तो तिने अबाधित ठेवला. त्यासाठी पुढचे किमान दहा जन्म तरी मी तिचा ऋणी राहीन.

कधी आफ्रिकन पदार्थ मराठी चवीचे, तर कधी मराठी पदार्थ आफ्रिकन पद्धतीनं अशी सरमिसळ करत तिचे नवनवीन प्रयोग चालू राहिले. 'चाकालाका' हा आफ्रिकेतल्या घराघरात केला जाणारा एक पदार्थ. कांदा, टोमॅटो, मिरची, कडधान्य आणि इतर जिन्नस त्यात जातात. जोहान्सबर्गमध्ये असताना मी ते शाळेच्या डब्यात बऱ्याच वेळा न्यायचो. पुण्यात कुणाच्या घरी मिसळ बघितली की मला नेहमी चाकालाकाची आठवण यायची. आईने मग मिसळ मसाला वापरून चाकालाका करायला सुरुवात केली. 'चाकालाका पाव' आमच्या वाड्यात त्यानंतर सर्रास व्हायला लागलं. नानांना तर मी स्वतः एकदा बोटं चाखून मिटक्या मारत 'चाकालाका पाव' खाताना बघितलंय.

'मालपुवा मांडझी' हा अजून एक पदार्थ, जो आई अगदी जाता जाता बनवायची. 'मालपुवा मांडझी' हे आता आमच्या रेस्टॉरंटच्या मेनूमधलं नाव. मी त्याला लहान असताना 'वाड्यातली मांडझी' म्हणायचो. मालपुव्याचे जिन्नस म्हणजे गव्हाचं नाहीतर तांदळाचं पीठ, गूळ, खोबरं वापरुन त्यात अधिकचं मांडझीला लागणारं अंडं, तेल मिसळून एकत्र मळायचं आणि शंकरपाळ्यांसारखं तळून घ्यायचं. तळणीचे पदार्थ जास्त नकोत म्हणून मग आईने ते नंतरनंतर तव्यावर हलकं भाजून घ्यायला सुरुवात केली. दुपारची भूक लागली की फडताळातल्या डब्यात मी आधी मांडझी शोधायचो. असे अजून अनेक पदार्थ आहेत. जोलोफ भेळ, बटाटावडा आकारा, पेरीपेरी पोहे. आफ्रिकन इंजेरा म्हणजे आपली आंबोळी. पण उडदाऐवजी नाचणीपासून बनवलेली. आई त्याच्याबरोबर आजीच्या माहेरी कोकणात करतात तशी काळ्या वाटाण्याची उसळ करायची. इंजेरा उसळ मात्र मला विशेष कधी आवडली नाही. त्याचं नाव सुद्धा मी 'इउ' ठेवलं होतं पण आईला ते आवडायचं म्हणून मला जराही eww (पन इंटेंडेड!!) न करता ते खावं लागायचं. याचा अर्थ मी फक्त हेच पदार्थ खायचो असं नाही. वाड्यात आजी पुरणपोळ्या, वरणभात करायची, गणेशचतुर्थीला उकडीचे मोदक करायची तेसुद्धा आवडायचे. पण जसजसा मोठा होत गेलो, इंजिनिअरिंगसाठी घराबाहेर पडलो तशी नॉस्टॅल्जियामधून आणि इतर कुठेच न मिळाल्यामुळे आमच्या घरातल्या “आफ्रो-मराठी” खाण्याशी जवळीक वाढतच गेली.

हल्ली सगळीकडेच फ्युजन फूडची हवा आहे. आफ्रो-मराठी इंडो चायनीजसारखं प्रसिद्ध होईल असं वाटतं का? इथे न्यू यॉर्कमध्ये 'डोसा विथ अमेरिकन ट्विस्ट' बऱ्याच ठिकाणी मिळतो. अशा प्रकारच्या फ्युजनबद्दल काय वाटतं?

कसं आहे ना, हे ऑथेंटिक, हे फ्युजन, हे पारंपरिक, हे आधुनिक असे पदार्थांचे गट माणसं आपापल्या सोयीनुसार करायला लागली आहेत. मी तर म्हणेन फ्युजन फूड हा माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक परंपरेचा, इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात ज्वारी आफ्रिकेहून आली. मग तांदळाच्या भाकरीसारखी आपण ज्वारीची भाकरी करायला लागलो. मग ज्वारीच्या भाकरीला फ्युजन फूड म्हणायचं का? खानदेशातली मुलगी लग्नानंतर कोकणात गेली आणि जेवणाच्या ताटात थोडासा वऱ्हाडी ठेचा वाढू लागली तर ते फ्युजन फूड म्हणायचं का? आता मुंबई-पुण्यात नाक्यानाक्यावर सँडविच मिळतं त्या सँडविचमध्ये परदेशात पूर्वी फक्त मांसाचे तुकडे, चीझ असंच कायकाय असायचं. त्यात आपण आता पनीर बुर्जीपासून, पुदिना चटणीपर्यंत काहीही लावायला लागलो. त्याला फ्युजन फूड म्हणायचं का? अमेरिकेत शिकायला गेलेला एखादा विद्यार्थी घरची आठवण आली म्हणून इंडियन दुकानातून फ्रोझन थालीपीठ आणतो आणि गरम केल्यावर त्यावर सोयीचं म्हणून लोण्याऐवजी आव्होकाडोची पेस्ट पसरवतो ते फ्युजन आहे का?

शतकानुशतकं माणसं स्थलांतर करत आली आहेत. आणि स्वतःबरोबर त्यांची जिव्हाळ्याची गोष्ट, त्यांचं खाद्य बरोबर घेऊन जात आली आहेत. कधी प्रत्यक्ष खाद्य तर कधी ते तयार करायच्या पद्धती. त्यातून वेगवेगळे प्रयोग करत आली आहेत. माणसं स्थलांतर करत राहणार तोवर फ्युजन चालूच राहणार. हे सगळे पदार्थ म्हणजे आपण आहोत. आपली ओळख आहे. आपली अभिव्यक्ती आहे. स्वतःपासून वेगळी अशी या पदार्थांची कदाचित ओळखच नाही. पदार्थ बनवणारी व्यक्ती सोडली तर उरलं काय? अग्नी, जिन्नस आणि त्यांना एकत्र आणणारं माध्यम?

माझ्या आईला लसणीची फोडणी दिलेली, हलकेसे कोंब आलेली मसूरची आमटी खूप आवडायची. बाबाला येता-जाता उगाली खायचं असायचं. उगाली म्हणजे मक्याच्या पीठाचा उपम्यासारख्या एक आफ्रिकन पदार्थ आहे. मग त्यांना दोघानांही जाणवलं की उगाली आणि मसूरची आमटी एकत्र खाल्लं की अजूनच रुचकर लागतंय. मग आठवड्यातून एक-दोनदा तरी ते हमखास व्हायला लागलं. दोन गोष्टी एकमेकांना पूरक असल्या की त्याला एक बहार येते. एकमेकांना झाकोळून टाकणं आलं, लादणं आलं की त्यातली सगळी गंमत निघून जाते.

जे त्यांच्यासाठी अशा एका समजुतीतून निर्मिलं गेलं ते माझ्यासाठी मात्र माझं मूळ जेवण होतं. फ्युजन जाऊ दे, माझ्यासाठी यापेक्षा ओरिजिनल काही असू शकत नाही. आपण ज्याला 'आईच्या हातचं जेवण' ही जी एक संज्ञा वापरतो, तुमच्या आतड्याशी, नाळेशी तुम्हाला जोडणारं, कोणताही अभिनिवेश नसलेलं, ते हे आहे माझ्यासाठी. आमच्या रेस्टॉरंटमधली सिग्नेचर डिश आहे 'मसूर आमटी विथ उगाली'. त्यात कोणताही आक्रस्ताळेपणा नाही. फ्युजनचं अवडंबर नाही. काही सिद्ध करणं नाही. एक शांत सहजता आहे. माझ्या आईबाबांच्या नात्यातली.

दोन संस्कृती एकमेकांत बेमालूमपणे मिसळतात आणि नव्याला जन्म देतात त्याइतकी दुसरी सुंदर गोष्ट नसावी. जुन्यात नवं आणि नव्यात जुनं मिसळत राहायला हवं. तरच आपली खाद्यसंस्कृती प्रवाही राहील. नाहीतर डबक्यातल्या पाण्यासारखी आपली संस्कृतीसुद्धा चौकटीत अडकून पडेल.

स्वतःची आफ्रो-मराठी ओळख कधी लपवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहेस का?

:- (दीर्घ श्वास घेऊन) हो केलाय ना! कॉलेजमध्ये असताना एकदा माथेरानला मित्रांबरोबर दोन दिवस फिरायला गेलो होतो. तिथे एक मुलगी भन्नाट आवडली. तीसुद्धा फिरायलाच आली होती. मुख्य म्हणजे एकटीच आली होती. माझ्या आईसारखी सोलो ट्रॅव्हलर. काहीतरी कारण काढून तिच्याशी बोललो आणि सलग पाच तास आम्ही बोलतच राहिलो. तिला मी तेव्हा माझं नाव 'चिन्मय पाठारे' म्हणून सांगितलं. म्हटलं आपलं असं वेगळं नाव आणि अशी हटके पार्श्वभूमी ऐकून या सालस दिसणाऱ्या मुलीने आपल्याशी मैत्रीच केली नाही तर?

माथेरानहून परतल्यावर आमची मैत्री पत्रांमधून चालूच राहिली. एखाददुसरं नाही, दर पंधरा दिवसांनी मोठीमोठी लांबलचक पत्रं लिहायचो एकमेकांना. त्यांनतर इमेल सुरू झालं. मग इ-मेल करायला लागलो. तिच्यासाठी खास चिन्मयपाठारे१२@याहूडॉटकॉम असा इमेल बनवला. एक दोनदा तिने इ-मेलमध्ये म्हटलंसुद्धा, Something doesn't add up. मुलींचा सिक्स्थ सेन्स जबरदस्त असतो म्हणतात. मग हे माझं मलाच सतवायला लागलं. शेवटी एक दिवस धाडस करून सांगितलं. मी चिन्मय पाठारे नाही दाकाराई ओकोये आहे. ६ महिने उत्तर आलं नाही. बाबा गेल्यानंतर आयुष्यात पुन्हा एकदा आपण काहीतरी मौल्यवान गमावलं आणि तेसुद्धा निव्वळ स्वतःच्या मूर्खपणामुळे म्हणून धाय मोकलून रडलो. तिच्या घरचा, सांगलीचा पत्ता माहीत होता. एक दिवस धडक ट्रेनमध्ये बसलो आणि तिच्या घराशेजारी वाट पाहात उभा राहिलो. ती दिसली तेव्हा तिला म्हणालो, माझ्याकडून भयंकर चूक झाली पण विश्वास ठेव, चिन्मयऐवजी दाकाराई सोडलं तर अजून तसूभरही काही खोटं बोललेलो नाहीये. माफ कर. आयुष्यात यापुढे पुन्हा माफ करायची संधी द्यायचो नाही. लगेच ऐकली नाही, पण एका आठवड्यात इमेल आलं 'डिअर दाकाराई'च्या नावानं. बाकी सगळ्या गप्पा जुन्याच. गंमत म्हणजे आधीची इमेल्स जपून ठेवायची म्हणून तो चिन्मयपाठारे नावाचा इमेल मी कधी बदललाच नाही आणि आमच्या पुढच्या गप्पाही तिथेच चालू राहिल्या. चित्रा पोतनीस तिचं नाव. चित्रा पोतनीस-ओकोये. माझी पत्नी. आता आम्हाला सात वर्षांची एक गोड मुलगीसुद्दा आहे. झुरी.

नवल असं की माझ्यात डॉमिनंट नसलेला बाबाचा जीन आमच्या मुलीमध्ये रसरसून उतरलाय. काळेभोर कुरळे कुरळे केस. बाबासारखा देखणा काळा रंग. विलक्षण तकाकी आहे तिच्या रंगाला. निसर्गसुद्धा लहरी आहे अगदी. कुठेही काहीही मनाप्रमाणे पेरतो आणि उगवत राहतो. आपण प्रेक्षक आहोत फक्त. आम्हाला बऱ्याच वेळा विचारतात, मुद्दाम आफ्रिकेच्या पीडित प्रदेशातून मुलगी दत्तक घेतली का? पण मला राग येत नाही. I let them be. कुठेतरी आशा आहे की माणसांच्या मनाच्या कक्षा रुंदावल्या आणि निसर्गासाठी आदर बळावला की आपोआप असे प्रश्न विचारणं किंवा पडणंच बंद होईल.

एक इंजिनियर ते रेस्टॉरंट entrepreneur हा प्रवास कसा झाला?

इंजिनिअरिंग झाल्यावर मी एका माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये आठ वर्षं सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होतो. चित्राचीही फायनान्स क्षेत्रातली नोकरी चालू होती. नाना आणि आजीनंतर आईही आमच्यासोबत राहायला आली. आयुष्य तसं बघायला गेलं तर स्थिरस्थावर झालं होतं. मला आणि चित्राला माणसांची खूप आवड. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा मित्रमैत्रिणींना जेवायला घरी बोलवायचो. तेव्हा मी मगाशी म्हटलं ते जोलोफ भेळ, चाकालाका पाव वगैरे पदार्थ खाण्यात सगळ्यांना एकदम रस असायचा.

केशर मालवा पुडिंग ही आईने आफ्रिकन मालवा पुडिंगमध्ये बदल करून जरदाळूऐवजी केशर-पिस्ता टाकून नव्याने निर्माण केलेली स्वीट डिश. झुरीच्या पहिल्या वाढदिवसाला मी, चित्रा आणि आई आम्ही तिघांनी मिळून पंचवीस-तीस जणांसाठी चाकालाका पाव आणि केशर मालवा पुडिंगचा बेत केला. स्वतः घरी सगळं बनवलं. सगळ्यांना तो बेत एवढा आवडला की त्याच रात्री चित्रा मला म्हणाली, की हे जे जे काही अफलातून तुझ्या आईबाबांनी केलं आहे ना, त्याची नोंद करून ठेवायला हवी. नुसती डायरीमध्ये किंवा ब्लॉगवर नोंद करणं पुरेसं नाही. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर असं काहीतरी करायला हवं जे मूर्त स्वरूपात राहील, आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल. ती म्हणतेय त्यात मला तथ्य वाटलं. कुठेतरी माझ्या मनातल्या सुप्त इच्छेला शब्द मिळाले असं वाटलं.

मग घरच्या घरी एक छोटा पार्टी केटरिंगचा व्यवसाय सुरु केला. मी आणि चित्रा आमच्या नोकऱ्या सांभाळून ते करायचो एक पॅशन म्हणून. आईही तिच्या परीने जमेल तशी मदत करायची. पण ती साधीशी कल्पना नंतर झपाट्यानं एवढी विस्तारत गेली की आम्हांला एका वर्षातच जाणवलं की दोघांपैकी एकानं तरी हे आता पूर्ण वेळ करायला हरकत नाही. मग चित्रानं आयुष्यात स्थैर्य असावं म्हणून तिची नोकरी चालू ठेवली आणि मी पूर्ण वेळ रेस्टॉरंटच्या कामामध्ये जुंपलो. आता जगभरात सात ठिकाणी लोकांना माझ्या जिव्हाळ्याचे हे पदार्थ खिलवतोय. कधीकधी सगळं स्वप्नवत वाटतं. आई आणि झुरी तर आहेतच पण सच्चे दोस्त आणि माझ्याकडून मी बदलण्याची अपेक्षा न करणारं, माझ्यातून माझी उत्तम आवृत्ती बाहेर काढणारं चित्राचं प्रेम मिळालं म्हणून इथपर्यंत पोहोचलोय, अजून काय!

आफ्रिकेबद्दल काय वाटतं? कधी परत जावंसं वाटतं?

आफ्रिकेबद्दल काय वाटतं हे सांगायला गेलो तर सलग एक आठवडाही कमी पडेल. माझा जन्म आफ्रिकेमधल्या अपार्थाइडच्या काळातला. भारतात दीड-दोनशे वर्षांपूर्वी दलितांची जी परिस्थिती होती त्यापेक्षाही नामुष्कीची परिस्थिती आफ्रिकेतल्या लोकांनी अपार्थाइडमध्ये अनुभवली. बाबा तिथे ब्लॅक कॅटेगरीमध्ये होता. आई कलर्ड. मी दिसायला 'ब्लॅक' नव्हतो म्हणून मीसुद्धा कलर्ड. तुम्ही काळे किंवा कलर्ड असाल आणि रात्रीच्या वेळी एखाद्या उच्चभ्रू भागांमध्ये नुसते आढळलात तरी बेछूट गोळीबार करायची त्यावेळी पोलिसांना मुभा होती. बाबाच्या खूप जवळच्या एका मित्राला फक्त गोऱ्या लोकांच्या वस्तीतून कामावरून निघताना उशीर झाला म्हणून गोळी झाडली होती आणि त्यावर कुणीही काही बोलू शकलं नाही. अपार्थाइड म्हणजे एक सततचा लढा होता. आई सांगते की १९९४मध्ये ते संपल्यावर बऱ्याच जणांना स्वतःला आठवण करुन द्यायला लागायची की जगण्यासाठी रोजचं युद्ध संपलंय, आता आयुष्य जगायला सुरुवात करायला हवी. मला हे काही विशेष आठवत नाही आणि आम्ही त्यानंतर वर्षभरातच भारतात आलो त्यामुळे त्यापुढचं तर ठाऊकच नाही.

अपार्थाइडमध्ये असूनही माझ्या आयुष्यातली आफ्रिकेमधली पहिली आठ वर्षं फार फार सुंदर होती. खडतरही होती खरं तर पण आई आणि बाबाने मला फक्त प्रेम दिलं म्हणून त्या कठीण दिवसांसाठी मनात तेढ नाही. उलट आफ्रिकेसारख्या देशाशी माझी नाळ जोडली गेली म्हणून मला स्वतःचा हेवा वाटतो. ती माझी जन्मभूमी आहे. तिची ओढ वाटते. लळा वाटतो. पूर्ण आफ्रिका खंडाचाच विकास व्हायला हवा असं वाटतं. त्या प्रदेशाची ओळख नुसती कलाहारी, सहारा वाळवंट, मसाई लोक, जंगल सफारी एवढ्यापुरती राहू नये असं वाटतं. मोठा विस्तीर्ण प्रदेश आहे. सोन्यासारखा. त्याला निव्वळ लुबाडून न नेता तिथल्या प्रत्येक कुटुंबाची प्रगती व्हावी असं वाटतं. फिलांथ्रोपीच्या नावाखाली लशींची चाचणी करण्यापुरता लोकांचा उपयोग होऊ नये असं वाटतं.

आफ्रिकेत आता माझं आपलं म्हणावं असं कुणीच नाही. माझं जग – आई, झुरी आणि चित्रा – माझ्याबरोबर आहेत. तिथून भारतात येताना मुळासकट उपटून आलो आणि नंतर भारतातच रुजलो, तिथूनच बहरलो. अर्थात त्या मूळाचा उरलासुरला अंश शोधायला झुरीला तिथे जायचं असेल तर मात्र मी तिला कधीच थांबवणार नाही.

दाकाराई, खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कुतूहल म्हणून विचारतेय, तुझं रेस्टॉरंट सोशल मीडियावर कुठेच नाही. वेबसाईट नाही. जाण्याआधी वाचकांना एखाद्या तरी ठिकाणचा पत्ता द्यायला आवडेल?

पण मग तुझे वाचक म्हणतील की ही माझी किंवा रेस्टॉरंटची केलेली जाहिरात आहे. त्यापेक्षा स्वतः शोधा म्हणजे नक्की सापडेल. मी तर म्हणेन, प्रेम आणि एकमेकांच्या संस्कृतींचा, विचारधारांचा आदर जपलेल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 'दाकाराई सुमन ओकोये'चा पत्ता मिळेल.

क्वाहेरी! भेटूच.

---

हे लेखन पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

जन्मापासून आई माझ्याशी मराठीतूनच बोलायची. भाषा टिकवण्याचा अट्टाहास म्हणून असं नाही. आपल्या स्वतःच्या भाषेत बोलणारं, आपलं कुणीतरी आईला आफ्रिकेत हवं होतं म्हणून असेल. आणि आफ्रिकेत राहून स्थानिक भाषा - स्वाहिली - येत नाही असं कसं होईल! लहानपणीचे तिथले चट्टेबट्टे दोस्त स्वाहिली बोलणारेच होते. त्यामुळे आजही मला दोन्ही भाषांमध्ये अस्खलित बोलता येतं.

जोहानिसबर्गमध्ये स्वाहिली??? स्थानिक भाषा??????

Something doesn’t add up.

या हिशेबाने, गुवाहाटीतली स्थानिक भाषा गुजराती म्हणून सांगाल! ऐकणारे ऐकून घेतात, म्हणून काय वाटेल ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटी क्वाहेरी लिहिलेलं वाचल्यावर माझ्या मनात हेच आलं.
पण म्हंटलं जाऊ दे. हे साऊथ आफ्रिकेतील ईस्ट आफ्रिकन भागात रहात असतील.
चायना टाऊन नसतं तुमच्या हमीरिकेतल्या अनेक गावांत ?
तसंच असू शकेल काहीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय, जोलोफ, इंजेरा वगैरे मंडळींचे दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सप्लांटेशन मनोहर आहे.

(बादवे, आमच्या अमेरिकेत हे दोन्हीं खाद्यप्रकार मिळतात. परंतु, इथियोपियन खाणावळीत जोलोफ किंवा नायजेरियन खाणावळीत इंजेरा चुकूनसुद्धा मिळणार नाही. अगदी पांढऱ्या गिऱ्हाइकांना केटर करणाऱ्या खाणावळींतसुद्धा!)

बरे, हे असले काहीतरी वाचल्यावर वरती लेखाच्या कर्त्याचे(/कर्त्रीचे) नाव काय, म्हणून पाहायला गेलो, तर तेथे ‘देवदत्त’ असे लिहिलेले काही आढळले नाही! (किंबहुना, त्याच अपेक्षेने तपासायला गेलो होतो, हे प्रांजळपणे कबूल करणे येथे प्राप्त आहे.) तसे असते, तर ‘टंग-इन-चीक’ म्हणून हसता आले असते. परंतु, इथे तसला प्रकार वाटत नाही.

पूर्वीच्या काळी, अडाणचोट पांढऱ्या वाचकवर्गाकरिता असले काहीतरी लिहून (नि त्याकरिता ‘नेटिवां’बद्दलचा आपल्या तथाकथित ‘ज्ञाना’स वेठीस धरून) तितकेच अडाणचोट पांढरे लेखक भाव खाऊन जात, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.) हा काहीसा तशातलाच प्रकार वाटला मला. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I suppose I could take that as a compliment (left-handed or otherwise)!

दाकाराईची गोष्ट आवडली. त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील असला तरी रेस्तराँ पॅन-आफ्रिकन/मराठी असं असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

It was, indeed, meant to be a compliment, possibly a bit gauche, but certainly not left-handed.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दाकाराईचे आयुष्य भन्नाट दिसते.. विशेषतः त्याच्या आईचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी खरी मुलाखत म्हणून वाचली.
नंतर कळलं भरपूर गुंडाळलेली छान कथा आहे.
मी सर्चही करून पाहिलं हो रेस्टॅारंटचं नाव.
मग नवी बाजू वाचली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत शिकायला गेलेला एखादा विद्यार्थी घरची आठवण आली म्हणून इंडियन दुकानातून फ्रोझन थालीपीठ आणतो आणि गरम केल्यावर त्यावर सोयीचं म्हणून लोण्याऐवजी आव्होकाडोची पेस्ट पसरवतो ते फ्युजन आहे का?

कोठल्या गाढवाने सांगितले तुम्हाला हे?

१. आजकाल अनेक मोठ्या अमेरिकन शहरांतल्या एखाद्या तरी मोठ्या भारतीय किराणामालाच्या दुकानांतून अनेकदा थेट थालीपिठाची भाजणी मिळते. अगदी 'केप्र'ची वगैरे. सगळ्याच भारतीय दुकानांतून मिळते, असे नव्हे; परंतु, गावात कोठेही मिळत नसल्यास, सामान्यत: पुढल्या भारतवारीत स्वत: बॅगेत भरून घेऊन येणे (किंवा कोणी ओळखीचा चालला असेल, तर त्याला आणायला सांगणे) याला दुसरा पर्याय नसतो. (हल्ली नुकतीच कूरियरने पाठविण्यावर बंदी आलेली आहे, म्हणे. पूर्वी तेही चालायचे. प्रवासी सामानातून अद्यापही चालते.) 'फ्रोझन थालीपीठ' असला प्रकार – गूगलून पाहिल्यावर सापडला खरा, परंतु, आजवरच्या एकतीस वर्षांच्या वास्तव्यात अमेरिकेत माझ्या वाटेला आलेल्या एकाही भारतीय दुकानात आजवर मला तो आढळलेला नाही, याचा अर्थ तो फारसा उपलब्ध नसावा.

२. पाश्चराइज़्ड बटर हा प्रकार कोठल्याही अमेरिकन ग्रोसरी स्टोअरमध्ये सहजगत्या मिळतो. (झालेच तर आजकाल अनेक मोठ्या अमेरिकन शहरांतल्या एखाद्या तरी मोठ्या भारतीय किराणामालाच्या दुकानांतून अनेकदा 'अमूल बटर'सुद्धा मिळते.) झालेच तर अमेरिकास्थित भारतीय कंपन्यांनी बनविलेले दर्जेदार तूपसुद्धा मिळते. (हे शक्यतो एखाद्या बारक्यातल्या बारक्या गावातसुद्धा जर भारतीय किराणामालाचे एखादे छोटेसेसुद्धा दुकान जर असेल, तर तेथेही सहज मिळते. भारतीय ब्रँडची तुपेसुद्धा मिळतात, परंतु, त्यांच्या ताजेपणाबद्दल फारशी शाश्वती नसते.) अशा परिस्थितीत, थालीपिठावर अव्होकाडोची पेस्ट लावण्याचा आचरटपणा (तशीच आवड असल्याखेरीज, केवळ 'सोयीचे' म्हणून) कोण कशाला झक मारायला करेल?

सांगायचा मतलब, नक्की कोणाला उल्लू बनविण्याचा प्रयत्न करता आहात? पौडावरून आलो आहोत काय आम्ही?

(जाता जाता, अवांतर: माझ्या घरी, बृहदटलांटात, अनेकदा चितळेची बाकरवडी हा साप्ताहिक/द्विसाप्ताहिक ग्रोसरी आयटेम असतो. सांगून ठेवतोय. उगाच तलफ आली, म्हणून मजबूरी के नाम भलतेसलते खात नाही आम्ही.

बाकी चालू द्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा जन्म आफ्रिकेमधल्या अपार्थाइडच्या काळातला. भारतात दीड-दोनशे वर्षांपूर्वी दलितांची जी परिस्थिती होती त्यापेक्षाही नामुष्कीची परिस्थिती आफ्रिकेतल्या लोकांनी अपार्थाइडमध्ये अनुभवली. बाबा तिथे ब्लॅक कॅटेगरीमध्ये होता. आई कलर्ड. मी दिसायला 'ब्लॅक' नव्हतो म्हणून मीसुद्धा कलर्ड.

Somebody please correct me if I am wrong, परंतु, दक्षिण आफ्रिकेतील चातुर्वर्ण्यात माझ्या कल्पनेप्रमाणे 'ब्लॅक', 'व्हाइट', 'कलर्ड' याबरोबरच (भारतीय वंशाच्या लोकांकरिता) 'इंडियन' अशीही एक श्रेणी नव्हती काय? मग आई 'कलर्ड' कशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला "लेख्कथा" आवडली.
मी ही रेस्टॉरन्ट नेट वर शोधत होतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0