'कानविंदे हरवले' - हृषीकेश गुप्ते

#अंकाविषयी #ललित #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

कानविंदे हरवले

- हृषीकेश गुप्ते

(हृषीकेश गुप्ते यांच्या 'कानविंदे हरवले' या ताज्या कादंबरीतील अंश.)

मुखपृष्ठ

फ्रेंच तत्त्वज्ञ फ्रेडरीक नीत्शेचं एक वाक्य आहे,

And when you look long into an abyss, the abyss also looks into you.

सिनेमाचंही तसंच असतं!

सिनेमाही एक अज्ञात भूगर्भच असतो.

तुम्ही दीर्घकाळ सिनेमा पाहिलात, की मग एका अवचित क्षणी सिनेमाही तुमच्या आत डोकावतो. डॉ. दिवाडकर मला म्हणतात- तू इतका सिनेमामय आहेस, की कधीकधी मला वाटतं तू स्वतःच एक सिनेमा आहेस.

"कानविंदे हरवलेत."

मिसेस कानविंद्यांच्या या वाक्यावर मी क्षणभर काहीच न कळल्यागत त्यांच्याकडे पाहात बसलो.

"आठ दिवस झाले कानविंद्यांचा काही पत्ता नाही." मिसेस कानविंदे पुढे म्हणाल्या आणि मी हातातला चहाचा कप समोरच्या टीपॉयवर ठेवला. मिसेस कानविंद्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ लागल्यावर माझ्या मनात अनेक विचार फास्ट फॉरवर्ड केलेल्या चित्रमालिकेप्रमाणे भरभर सरकून गेले.

कानविंदे हरवले म्हणजे नेमकं काय झालं?

ते कसे आणि कुठे हरवले?

आणि मुख्य म्हणजे कानविंदे हरवले याच्याशी माझा काय संबंध?

मग क्षणार्धात वासुदेव कानविंदे या माणसाशी काही दिवसांपूर्वीच झालेल्या माझ्या पहिल्यावहिल्या संवादाचा क्षण मनात चमकून गेला.

काही वेळा एखादी गोष्ट घडताक्षणी आपल्या मनात पाल चुकचुकते. कानविंद्यांचा फोन आला तेव्हा माझ्याही मनात चुकचुकली होती. पण त्या पूर्वसूचिताच्या चुकचुकण्यावर माझ्या मनातल्या उत्सुकतेने मात केली.

खरं तर ती एक देजा व्यू मोमेंट होती.

एखादा क्षण आपल्या आयुष्यात या पूर्वीही कधीतरी घडलाय असं मेंदूतील स्मृतिग्रंथींना वाटायला लावणारी एक प्रबळ जैवरासायनिक प्रक्रिया!

पण क्षण दोन क्षण गेले आणि ती भावनाही हळूहळू विरून गेली.

कानविंद्यांचा फोन!

केवींचा फोन!

चक्क वासुदेव कानविंद्यांचा फोन आपल्याला आलाय म्हटल्यावर कोण उत्तेजित होणार नाही? माझ्यासारखा सिनेक्षेत्रातल्या कलादिग्दर्शनासारख्या दुय्यम मानल्या गेलेल्या प्रांतातील कलावंत तर नक्कीच झाला.

माझ्या मोबाइलमध्ये काही कानविंद्यांचा नंबर सेव्हड नव्हता. पण आजकाल ट्रू-कॉलरसारखी अनेक मोबाइल अ‍ॅप्स आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे याची माहिती देतात. त्यामुळे वासुदेव कानविंदे हे नाव ट्रू-कॉलरने डिटेक्ट करताच क्षणभर मी थबकलोच.

"हॅलो." मी फोन घेत मोबाइल कानाला लावत म्हटलं.

"हॅलो. हा मिहीर इनामदारांचा नंबर आहे का?" पलीकडचा आवाज बायकी म्हणता येणार नाही; पण काहीसा नाजूक आणि स्वरात निष्कारणची मृदू छटा असणारा होता.

आवाज ऐकल्यावर माझी थोडी निराशाच झाली. मला वाटलं होतं कानविंदे तथा केव्ही म्हणजे जाड्याभरड्या खर्जातला आवाज असणार.

"हो. आपण कोण?"

ट्रू-कॉलरने समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती दिलेली असतानाही; आणि ती व्यक्ती ख्यातनाम आहे हे कळलेलं असूनही, अनोळखीपणाचं पांघरूण घेऊन बोलत राहण्यासारखी दुसरी मौज नाही.

"नमस्कार, मी वासुदेव कानविंदे."

"वासुदेव कानविंदे? यू मिन दी वासुदेव कानविंदे?" मी अनोळखीपणाच्या अभिनयाचा रबर फारसा न ताणता थेट मुद्द्यावर आलो.

"हो. मीच तो."

माझा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला.

खरंतर मी स्वतः बोलण्यावागण्यात विनयशील आहे आणि समोरच्याकडूनही मी तीच अपेक्षा ठेवतो, पण कानविंद्यांनी तशी कोणतीही विनम्रता न दाखवता माझ्या 'दी वासुदेव कानविंदे का?' या विचारणेवर 'हो मीच तो' असं म्हणत आपण एक महत्त्वाची व्यक्ती आहोत यावर विनासंकोच शिक्कामोर्तब केलं.

कानविंदे त्यानंतर थोडा वेळ बोलले, पण त्या बोलण्यातूनही माझी निराशाच झाली. यामागचं मुख्य कारण म्हणजे बोलण्यातून एकदाही ते मला ओळखत असल्याची वा माझं नाव त्यांना ठाऊक असल्याची नोंद त्यांनी घेतल्याचं मला जाणवलं नाही. आज कलादिग्दर्शक म्हणून मीही चार मराठी सिनेमे बनवलेले आहेत. भले ते कानविंद्यांच्या रुचिस्तरापासून अगदी दूरचे असले तरीही. शिवाय पुण्यासारख्या एकाच शहरात राहत असतानाही कानविंद्यांनी मला अजिबातच न ओळखणं किंवा माझं नाव त्यांच्या कानावर पडलेलंच नसणं हे माझा काहीसा भ्रमनिरासच करून गेलं. माणसाची खरी इभ्रत त्याचं नाव, त्याची ओळख असते. कानविंद्यांनी माझी ती ओळख बिलकूल जपली नाही. अगदी तोंडदेखलीदेखील! याउलट माझ्या बोलण्यातून मात्र मी 'दी वासुदेव कानविंद्यां'शी बोलत असल्याचाच स्वर सातत्याने ठिबकत राहिला. अखेरीस कानविंद्यांनी फोन ठेवला.

मध्ये दोन-चार आठवडे गेले. पुन्हा एकदा सकाळीच मोबाइल वाजला. यावेळीही नंबर अनोळखी होता; पण ट्रू-कॉलरला त्या नंबरची ओळख करता आली नाही.

मी कॉल अटेंड करत "हॅलो" म्हटलं.

"अं.. मिस्टर मिहीर इनामदार का?" पलीकडून किंचितसा अनुनासिक बायकी आवाज कानावर पडला. मी हो म्हटलं. मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा बोलणार्‍या व्यक्तीने मला तिची ओळख सांगितली. पलीकडून मिसेस वासुदेव कानविंदे बोलत होत्या आणि त्यांनी मला काही काळ त्यांच्या घरी येऊन जाण्याची विनंती केली होती. मला त्यांच्या घरी जाणं शक्य नसेल तर त्या स्वतः मला भेटायला माझ्या घरी येऊ शकत होत्या. अर्थात तेवढं स्त्रीदाक्षिण्य माझ्यात होतं. मी स्वतःच कानविंद्यांच्या घरी जाण्याचं कबूल केलं. मिसेस कानविंदे का कोण जाणे; पण मला भेटण्याबाबत काहीशा घाईतच वाटत होत्या. अधीर म्हणा ना! मी कानविंद्यांची चौकशी केली; पण त्यांनी 'तुम्ही घरी या, मग बोलू.' असं जुजबी म्हणत फोन ठेवला.

फोन ठेवल्याठेवल्या माझ्या मनात दोन विचार प्रकर्षाने डोकावून गेले.

मिसेस कानविंद्यांचं माझ्याकडे काय काम असणार होतं?

आणि मिस्टर कानविंद्यांविषयी त्या चकार शब्दाने फोनवर का बोलल्या नसतील बरं?

मुळात वासुदेव कानविंद्यांनी मला फोन केला होता, तो एका सिनेमाची चौकशी करण्यासाठी. अमुक एक सिनेमा मी पाहिलेला आहे का? किंवा अशीच काहीबाही चौकशी त्यांनी केली होती. मी मुळात कानविंद्यांच्या त्या फोननेच एवढा भारावून गेलो होतो, की त्या वेळी त्यांनी मला नेमकं काय विचारलं? हेच मला आता आठवत नव्हतं. कानविंद्यांच्या मला आलेल्या फोनची माझ्या मेंदूतील स्मृतीच काहीशी धूसर बनून गेली. मला कानविंद्यांशी झालेलं बोलण धडसं आठवेनासंच झालं. म्हणजे कानविंद्यांचा फोन मला आला होता, पण तो का आणि कोणत्या कारणासाठी आला होता हे मला नीटसं ज्ञात नाही. मुळात वासुदेव कानविंद्यांसारख्या सिनेपंडिताने माझ्यासारख्या नवख्या माणसाकडे एका सिनेमाची चौकशी करणं ही घटना खरंच आश्चर्याची होती, पण कानविंद्यांना हवा असणारा तो सिनेमा मी पाहिलेला नव्हता. मला त्या सिनेमाचं नावही ठाऊक नव्हतं. मला त्यांना हव्या असलेल्या सिनेमाबद्दल काहीएक माहिती नाही हे कळल्यावर त्यांच्या बाजूने फोनवर फारसा संवाद घडलाच नाही. मुळात कानविंद्यांनी फोन ठेवल्यावर माझ्या मेंदूनं त्या सिनेमाचं नावही स्मृतीतून पार पुसूनच टाकलं. नंतर मला त्या सिनेमाचं नावही आठवेना. एवढंच काय पुढे पुढे तर मला कानविंद्यांनी नक्की फोन केला होता ना? याविषयीच माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

आणि आता अचानक काही दिवसांनी मिसेस कानविंदे मला घरी बोलावत होत्या!

पुण्यातल्या माझ्यासारख्या सिनेभक्तांसाठी कानविंद्यांचा बंगला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखाच आहे. त्यामुळे पत्ता ठाऊक नसण्याचा प्रश्नच नव्हता. जूनअखेरीचे दिवस असल्याने बाहेर पाऊस भुरभुरत होता. मी नारायण पेठेतून लक्ष्मी रोडवर आलो. मग अलकाच्या चौकातून डावीकडे वळून सिग्नलवरून पुन्हा उजवीकडे वळत पूना हॉस्पिटलच्या दुचाकी पुलाला लागलो. गेली अनेक वर्षं दुचाकी वाहनांसाठी बंद असलेला लकडी पूल आता रहदारीसाठी खुला झाला आहे. पण एवढ्या वर्षांची वाहनाच्या चाकांना लागलेली सवय अशी सहजासहजी जात नाही. मी उजवीकडे वळत कर्वे रोडच्या टोकाला आलो आणि गरवारे शाळेच्या मागच्या बाजूने पुन्हा डावीकडे वळत प्रभात रोडला लागलो. वर वर जात राहिलो.

प्रभात रोड मला फारसा आवडत नाही. त्या रस्त्यावर सतत कुठल्या न कुठल्या सावल्या कोरलेल्या असतात. आता वृक्षतोड झालेली असली तरी एक विचित्र सावळासा अंधार मला प्रभात रोडवर सातत्याने भेडसावत राहतो. पेठेत उजेड मुबलक. सर्वत्र बिनदिक्कत पसरलेला. शहराच्या या बाजूला मात्र उजेड थोडा अंगचोरटेपणा करतो. लिज्जत पापड मागे पडलं. मग स्वरूप हॉटेलची गल्लीही मागे पडली. मी भांडारकर रस्त्याला जाणार्‍या चौकातून उजवीकडे वळलो आणि मग तत्काळ डावीकडे टर्न घेतला. मधल्या छोटेखानी गल्लीत उजव्या हाताला कानविंद्यांचा बंगला होता.

ध्वनी!

कानविंद्यांनी एफटीआयआयमधून साउंड डिझाइनिंगची पदवी घेतली होती म्हणून त्यांनी बंगल्याचं नाव ध्वनी ठेवलं होतं का? मला नेहमीच प्रश्न पडायचा, पण बंगला तसा बर्‍यापैकी जुनाट होता. पुश्तैनी म्हणावा असा. दगडी बांधकामाचा. नावाची पाटीही जुनाट पांढर्‍या संगमरवरात काळ्या कलाकुसरीसह कोरलेली. कोणत्याही ठिकाणी गेलं की एक कलादिग्दर्शक म्हणून माझी नजर ही अशी वास्तुवैशिष्ट्यं टिपत राहते. माझ्या व्यवसायाने माझ्यात बाणवलेली ही एक सवय आहे. मी लाकडी फाटकाची कडी उघडत आत गेलो. कुत्र्याचा अदमास घेतला खरा; पण बाहेर कुत्र्यापासून बचावाची पाटीही नव्हती; आणि आत कुत्राही.

लाकडी फाटकाला आधार देणार्‍या दगडी खांबांच्या सरळ रेषेत, मेंदी; वा न जाणो अजून कुठल्या झुडपाची दुहेरी रांग आतवर गेली होती. त्या रांगेमधून शहाबादी फरशांची एक छोटी वाट बंगल्याच्या मुखापर्यंत पोहोचली होती. शहाबादी फरशांची वाट जिथे संपत होती तिथे काही स्क्वेअर फुटांचा जमिनीचा लांबट आयताकृती तुकडा पसरलेला होता. त्या तुकड्यापलीकडे लगेचच बंगल्याच्या पायर्‍या. मी आत शिरताच लाकडी फाटक लावून घेतलं. खास पुणेरी कॉलर घालणार्‍या लोकांच्या बंगल्यांची फाटकं आत शिरताना लावून घ्यायची असतात हे एवढा काळ पुण्यात राहून मला उमगलं होतं.

मी शहाबादी फरशीची ती वाट चालत सरळ आत गेलो. बंगल्याच्या पायर्‍या चढून वरच्या गॅलरीत आलो आणि थेट बंगल्याच्या दाराशी जाऊन थांबलो. बेल वाजवण्यासाठी मी हातही वर केला; पण बेल कुठे दिसेना. दारावरच भली मोठी पितळी घंटा मात्र टांगलेली होती. एखाद्या प्रसिद्ध देवस्थानाच्या सभामंडपात असावी तशी! दाराच्या आसपास बेल नव्हती. याचाच अर्थ कानविंद्यांना भेटायला येणार्‍या प्रत्येकाने दारावरची ती पितळी घंटा वाजवणे अपेक्षित होते. माझ्या मनात एकाएकी कडवटपणा पसरला. कानविंद्यांना स्वतःचे व्यक्तिस्तोम माजवण्याची हौस होती. त्याबद्दलचे किस्सेही मी ऐकले होते; पण दारावरची ती पितळी घंटा मला काहीसा त्रस्त आणि अस्वस्थ करून गेली. आपण कुणी देवतुल्य आणि पूजनीय व्यक्ती आहोत याचा आभास निर्माण करण्याचा कानविंद्यांचा अट्टाहास मला स्पष्ट कळला. का कुणास ठाऊक, पण ती पितळी घंटा वाजवण्यापासून मीच स्वतःला रोखले. दाराची कडी वाजवावी का सरळ मिसेस कानविंद्यांना फोन करून दार उघडायला सांगावे, या द्विधावस्थेत असतानाच नेमकी आतून कुणाची तरी चाहूल लागली. क्षणभर कुणीतरी आतल्या लाकडी दाराच्या पीपहोलमधून आपल्याला न्याहाळतंय याची जाणीव झाली. मी थोडासा सावरूनच उभा राहिलो. कानविंद्यांच्या दारात उभं राहण्याचं एक अनामिक दडपण मला जाणवू लागलं. एवढ्यात आतल्या लाकडी दाराची लॅच उघडल्याचा आवाज कानावर पडला. दार उघडलं. सेफ्टी डोरच्या गजांमधून दिसणार्‍या आतल्या चेहर्‍याचा नीटसा अदमास घेण्याआधीच मधलं लोखंडी दारही उघडलं गेलं आणि समोर उभ्या मिसेस कानविंदे मला पाहून म्हणाल्या, "मिस्टर इनामदार? मिहीर इनामदार?" मी मुकाट मान हलवली. "प्लीज कमिन." मिसेस कानविंद्यांनी हास्याची एकही रेघ न उमटवता कोर्‍या चेहर्‍याने माझं अधीर स्वागत केलं.

भारतीय सिनेसृष्टीच्या दिगंतात वासुदेव कानविंद्यांचं नाव गेली अनेक वर्षं दुमदुमतं आहे. कानविंदे पुण्याच्या एफटीआयआयच्या ऐंशीच्या दशकातील कोण्या बॅचचे पासआउट होते. त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा साउंड डिझाइनमधला असला, तरी पुढे हॉलिवुडच्या काही प्रसिद्ध सिनेदिर्ग्शकांसाठी केलेल्या कामाचा अपवाद वगळता त्यांनी फार काळ आपले कसब ध्वनिआरेखनात पाजळले नाही. अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली त्यांनी त्यांचा पहिला सिनेमा लिहून दिग्दर्शित केला. पण तो काही कारणांनी पूर्ण होऊ शकला नाही. सिनेमा पूर्ण न झाल्याचा आघात कानविंद्यांवर गंभीर परिणाम करून गेला. त्यांना काही काळ मनोरुग्णालयातही ठेवण्यात आले. असं म्हणतात की मिसेस कािविंदे त्यांना तिथेच भेटल्या. त्याकाळात मिसेस कानविंदे त्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. कानविंद्यांना पहिला सिनेमा पूर्ण न होण्याच्या मानसिक आघातून त्यांच्या भावी पत्नीने म्हणजेच आताच्या मिसेस कानविंद्यांनीच बाहेर काढलं. यथावकाश कानविंदे मेंटल असायलममधून बाहेर आले. त्यांनी लग्नही केलं आणि त्यानंतर ते काही काळ अज्ञातवासात गेले. कानविंदे अज्ञातवासातून परतले ते पूर्णतः एक वेगळे कानविंदे म्हणूनच. त्यानंतर मात्र कानविंद्यांनी सिनेदिग्दर्शनापासून फारकत घेतली, पण त्यांच्या पुढच्या प्रवासाने कानविंद्यांचे नाव भारतीय सिनेसृष्टीत एखाद्या शिलालेखाप्रमाणे अजरामर करून टाकले. काळाची पावले ओळखून त्यांनी अ‍ॅक्टिव्ह फिल्ममेकिंगमधून निवृत्ती पत्करली खरी, पण पुढे त्यांनी जागतिक सिनेनिर्मितीची तत्त्वज्ञानाच्या अंगाने उकल करणारी दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या 'द श्लोकाज् ऑफ साउंड डिझाइनिंग' या पुस्तकाला जगभरातील मान्यवर सिनेविद्यापीठांत पाठ्यपुस्तकाचा दर्जा मिळाला. 'फॅब्रिक्स ऑफ मूव्हिमेकिंग'ला अनेक जागतिक पुरस्कारही मिळाले. त्यानंतर भारत सरकारने सुरू केलेल्या 'इंडियन सिने टॅलेंट हंट कॉर्पोरेशन' तथा आयसीटीएचसी या संस्थेचे कानविंदे अध्यक्ष बनले. या संस्थेद्वारे भारतीय सिनेक्षेत्रातील नवनवीन प्रतिभांचा शोध घेऊन त्या प्रतिभांना उत्तेजन देण्याचे काम त्यांनी जोमाने सुरू केले. कानविंद्यांनी या संस्थेद्वारे त्या काळातील अनेक भारतीय दिग्दर्शकांना संधी देऊन अक्षरशः घडवले. कानविंद्यांची नाळ मुळात कलात्मक सिनेमाशी जुळलेली असतानाही त्यांनी व्यावसायिक दृष्टी असणार्‍या दिग्दर्शकांशी दुजाभाव केला नाही. कानविंद्यांनी प्रत्येकाला संधी दिली. हिंदीसह कित्येको भारतीय भाषांतील मोठमोठाले दिग्दर्शक पुण्यात आल्यावर आवर्जून कानविंद्यांची भेट घेत. त्यांना केव्ही असे लाडके टोपणनावही मिळाले होते. कानविंदे धोरणी होते. कानविंदे जिवंतपणीच एक दंतकथा होऊन गेले!

मी काहीच न कळल्यागत कानविंद्यांच्या बंगल्याच्या दिवाणखान्यात मठ्ठासारखा बसून होतो. चहा एव्हाना गार झाला होता. मुळात चहा गार होण्याची दोन कारणे होती. एकतर मातकट रंग वगळता चहाला कसलीही चव नव्हती. ना चहाची, ना गूळसाखरेची, ना अजून कसली. चहाचा कप तेवढा लक्षवेधी होता!

दुसरं कारण म्हणजे चहा हातात दिल्यादिल्या मिसेस कानविंद्यांनी मला त्यांचा नवरा हरवल्याची बातमी दिली होती. आणि अशी बातमी कानावर पडल्यावर मी त्यांच्याच घरात बसून चहा वगैरे पिणं थोडंसं अप्रस्तुतच दिसलं असतं.

चहा गार होणारच होता.

काय, कसं अशा प्रश्नार्थक शब्दांचा वापर करत मी कानविंद्यांच्या हरवण्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला; पण त्याची काही गरज भासली नाही. मिसेस कानविंदे आधीच बोलू लागल्या.

"आठ दिवसांपासून म्हणजे अगदी नेमकं सांगायचं झालं तर मागल्या रविवारपासून केव्हीचा काही पत्ता नाही. संध्याकाळी तो जो बाहेर पडला तो परत आलाच नाही."

मला थोडं अवघडल्यासारखं झालं. मला सांत्वन वगैरे गोष्टी जमत नाहीत. मी मिसेस कानविंद्यांकडे पाहिलं आणि तत्क्षणी मला मिस्टर कानविंद्यांपेक्षा त्या वयाने बर्‍याच लहान असल्याची जाणीव झाली. कानविंद्यांनी त्यांच्यापेक्षा तब्बल वीस वर्षे लहान असलेल्या एका मुलीशी लग्न केलं होतं हे आम्हा सिनेक्षेत्रातील मंडळींना माहीत होतं, नाही असं नाही; पण हे डोक्यात ठेवून काही मी कानविंद्यांच्या घरी आलो नव्हतो. शिवाय माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांपोटी मला मिसेस कानविंद्यांकडे पाहायला नीटसा वेळच मिळाला नव्हता. मिसेस कानविंदे पंचेचाळिशीच्या वाटत होत्या. कानांवरले एखाददोन केस तुरळक चंदेरी झालेले. त्यांच्या चश्म्याच्या आधुनिक कडांमुळे त्या वयापेक्षा थोड्या अधिक तरुण वाटत होत्या.

"पोलिसांना..."

"कळवलं ना. रात्री तो घरी परतला नाही, तेव्हा काही परिचितांना, त्याच्या मित्रमंडळींना फोन फिरवले. कुणालाही तो कुठे आहे याविषयी काहीही कल्पना नव्हती. सकाळपर्यंत मी कशीबशी वाट पाहिली आणि नंतर पोलिसांना कळवलं." माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच मिसेस कानविंदे म्हणाल्या.

"मग...?"

"अजून तरी त्याचा काही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून माग काढला. तो घरातून जो निघाला तो प्रभात रस्त्यावरून चालत गरवारे पुतळ्याशी पोहोचला. तिथून पांचाळेश्वरच्या पायर्‍या उतरून भिडेपुलालगतच्या नदीपात्राच्या रस्त्यावर गेला. नंतर त्याचा कोणताही माग लागला नाही."

"भिडे पूल? नदीपात्र?" मी तो परिसर नजरेसमोर आणायचा प्रयत्न करत असतानाच आपोआप बोलून गेलो.

"हो. पोलिसांनी नदीपात्रालगतच्या रस्त्यावरील काही फेरीवाल्यांकडे चौकशी केली. त्यातून त्यांना माहिती मिळाली की, गेले काही दिवस केव्ही संध्याकाळच्या वेळी सातत्याने त्या रस्त्यावर दिसायचा."

"इव्हनिंग वॉक?"

"छे! केव्ही सकाळी जवळपास तीन तास वेताळटेकडीवर चालायला जातो. संध्याकाळी तो बरेचदा एफटीआयआयच्या त्यांच्या काही जुन्या मित्रमंडळींशी गप्पा मारण्यासाठी वाडेश्वरला जाऊन बसतो. त्यामुळे संध्याकाळी त्याने नदीपात्राच्या रस्त्यावर जाणं त्याच्या एकूण रुटीनला स्यूट होणारं नाहीये."

"पण या सगळ्याचा माझ्याशी काय सबंध?"

"सांगते. या सगळ्याचा तुमच्याशी संबंध काय तेही सांगते." असं म्हणत मिसेस कानविंदे उठून आत गेल्या आणि हातात एक नारिंगी रंगाचा लिफाफा घेऊन परत आल्या. मोठ्या आकाराच्या लग्नपत्रिकेसाठी वापरतात तसा तो एक काहीसा विचित्र चौकोनी लिफाफा होता. त्यांनी तो लिफाफा माझ्यासमोर ठेवला. मी हातात घेऊन तो न्याहाळू लागलो. वरच्या बाजूलाच 'फॉर मिस्टर मिहीर इनामदार' असं ठळक अक्षरांत लिहिलं होतं. मी लिफाफा वरखाली करून पाहिला. लिफाफा चिकटवलेला नव्हता. वरची लांबट कडा फक्त आतल्या बाजूला खोचून तो बंद केला होता.

"मे आय?" मी मिसेस कानविंद्यांकडे पाहात लिफाफा उघडण्याची परवानगी मागितली.

"ऑफकोर्स. ऑफकोर्स. गो अहेड. तुमचं नाव लिहिलंय त्यावर. म्हणजे ते तुमच्यासाठीच असणार."

मी लिफाफा उघडला. आत एक पातळ पुठ्ठ्याचं आता जीर्णशीर्ण झालेलं निळसर रंगाचं कार्ड होतं. मी ते सरळ केलं. वरच्या बाजूला प्रथमदर्शनीच 'व्हिडियो प्लाझा' अशी अक्षरं मोठ्या आणि ठळक टाईपात छापली होती. त्याखाली सेंटर अलाईन करून फोर्ट, मुंबई - 1 असा पत्ता होता.

ते एक लायब्ररी कार्ड होतं.

व्हिडियो प्लाझा या नावावरून ते बहुधा आता अस्तित्वात नसणार्‍या जुन्या व्हिडियो कॅसेट्स लायब्ररीचं कार्ड असावं असा कयास मी बांधला. पत्त्याच्या खालच्या बाजूला काहीएक जागा सोडून 'कॅसेट नंबर' असं छापून पुढे मोकळी जागा सोडली होती. त्या जागेत 1702 असे आकडे हस्ताक्षरात लिहिले होते. तो अर्थात कॅसेटचा नंबर असावा. कॅसेट नंबरखाली मूव्ही नेम असं छापलं होतं. त्यासमोरच्या मोकळ्या जागेत सिनेमाचं नाव म्हणून काहीएक मजकूर लिहिलेला होता; पण त्या सिनेमाची अक्षरं बहुधा पाण्याचा डाग पडून शाई फुटल्याने नाहीशी झाली होती. मी प्रयत्न केला, पण काही केल्या सिनेमाचं नाव मला वाचता आलं नाही. सिनेमाचं अद्याक्षर 'एम'वरून सुरू होत असावं एवढाच अंदाज बांधता येत होता.

"सिनेमाचं नाव वाचता येत नाहीये. मीही खूप प्रयत्न केला." मिसेस कानविंदे मध्येच म्हणाल्या. मी क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा ते लायब्ररी कार्ड न्याहाळू लागलो. कार्डवर एकूण तीनच एंट्रीज होत्या. तीनही वेगवेगळ्या तारखांच्या.

पहिल्या एंट्रीसमोर सुटसुटीत इंग्रजी अक्षरांत वासुदेव कानविंदे असं नाव होतं. समोर 12 डिसेंबर 1990 अशी तारीख होती. मग पुढे वासुदेव कानविंद्यांची वळणदार सही होती. कानविंद्यांच्या सहीसमोर 'इश्यूड बाय'च्या रकान्यात ज्याने संबंधित कॅसेट इश्यू केलीय त्याची सही होती. सही म्हणून टपोर्‍या इंग्रजी अक्षरांत नूर असं नाव लिहिलं होतं.

त्यानंतरची नोंद थेट सव्वा वर्षानंतरची होती. म्हणजे 14 फेब्रुवारी 1992 ची. त्या नोंदीसमोर कुणा सेंथिल नारायणस्वामीचं नाव होतं. पुढे नारायणस्वामींची सही होती आणि इश्यू करणारा सव्वा वर्षानंतरही नूरच होता.

तिसर्‍या आणि शेवटच्या नोंदीने माझं लक्ष जास्त वेधून घेतलं. नोंद करणार्‍याचं अक्षर आधीच्या दोन नोंदी करणार्‍यापेक्षा वेगळं होतं. ते निव्वळ अक्षरओळख असलेल्या आणि फार न शिकलेल्या माणसाचं अक्षर वाटत होतं. नोंद 22 मार्च 1994 या तारखेची होती. 'इश्यूड टू'च्या रकान्यात देवनागरी अक्षरांतच वीर इनामदार असं नाव लिहिलं होतं. पुढे त्या व्यक्तीची सही होती. सहीचं वळण विद्यार्थिदशेतलं वाटावं असं नवखंसं होतं. 'इश्यूड बाय'च्या रकान्यात सही म्हणून त्याच जेमतेम अक्षरओळख असणार्‍या माणसाच्या अक्षरात 'मुश्ताक भाय' अशी मोडकीतोडकी देवनागरी सही होती. माझ्या अंगावरून क्षणार्धात एक थंडगार शिरशिरी दौडत गेली.

मी मान वर करत मिसेस कानविंद्यांकडे पाहिलं.

"यू गॉट इट?"

मी होकारार्थी मान डोलावली.

मधल्या काळात कानविंद्यांचा काही पत्ताच लागला नाही. ते जणू पृथ्वीतलावरून गायब झाल्यासारखेच परागंदा झाले होते. पोलिसांचा तपास सुरुवातीचा काही काळ जोमाने चालू होता, त्यानंतर त्यांची चक्रंही थंडावत गेली. मुळात कानविंद्यांच्या हरवण्याचा आणि माझा काहीही संबंध नव्हता. जर काही बादरायण संबंध जोडायचा झालाच, तर तो या निनावी लायब्ररी कार्डद्वारेच जोडता आला असता. जी व्हिडियो कॅसेट कधी काळी कानविंद्यांनी भाड्याने घेऊन पाहिली होती, तीच नंतर साधारण सव्वातीन वर्षांनी मी भाड्याने घेतली होती, पण ती कॅसेट कोणत्या सिनेमाची होती हे कळायला मार्ग नव्हता. कार्डवर लिहिलेल्या कॅसेटच्या नावाची शाई पूर्णतः पुसली गेली होती. त्या सिनेमाचं नाव काही दिवसांपूर्वीच कानविंद्यांनी माझ्याशी फोनवर बोलताना उच्चारलं होतं; पण ते मला बिलकूल आठवत नव्हतं. जणू कानविंद्यांनी त्या सिनेमाचं नाव उच्चारताक्षणीच ते माझ्या विस्मृतीत गेलं होतं. मिसेस कानविंद्यांशी बोलताना एक कळलं, की मिस्टर कानविंदे गेले काही दिवस झपाटल्यासारखे एक सिनेमा शोधत होते. किंबहुना अगदीच अचूक शब्दात सांगायचं झाल्यास - कानविंदे एका सिनेमाचं नाव शोधत होते. आणि अगदी जंग जंग पछाडूनही त्यांना तो सिनेमा कुठेही सापडत नव्हता; किंवा आता असं म्हणता येईल की, सापडला नव्हता.

"त्यांनी मला काही दिवसांपूर्वी फोन केला होता, तोही अमुक एक सिनेमा मी पाहिला आहे का? हेच विचारायला." मी मिसेस कानविंद्यांना म्हणालो. त्यावर त्यांनी नुसती मान हलवली. बहुधा कानविंद्यांनी मला फोन केला होता हे त्यांना ठाऊक असावं. " पण मला आत्ता त्या सिनेमाचं नाव अजिबात आठवत नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्यांचा फोन मला येऊन गेला, हे सुद्धा आता मला नीटसं आठवत नाहीये."

"म्हणजे?" मिसेस कानविंद्यांनी चेहेर्‍यावर सावध भाव आणत विचारलं. मी त्यावर काहीही उत्तर न देता त्यांनाच प्रतिप्रश्न केला, "पण तुमच्याशी कधी ते त्या सिनेमाविषयी बोलले नाहीत?"

"बोलला ना! म्हणजे बोललाच असेल. पण खरं सांगू का? मलाही ते नाव बिलकुल आठवत नाही. जे तुमचं झालंय तेच माझंही झालंय. आणि मीच असं नाही, त्याच्या मित्रमंडळींतल्या कुणालाही त्या सिनेमाचं नाव आठवत नाहीये. म्हणजे प्रत्येकाला हे आठवतंय, की केव्ही एक सिनेमा शोधत होता; पण त्या सिनेमाचं नाव? छे! कुणालाही आठवत नाही. आणि कसं आहे, केव्हीही त्या सिनेमाचा उल्लेख करताना बरेचदा - तो सिनेमा, तो सिनेमा- असाच करायचा. म्हणून असेल कदाचित. डोन्ट नो."

माझ्या डोक्यातून काही केल्या त्या लायब्ररी कार्डवरचं माझं नाव पुसलं जाईना. मी उभ्या आयुष्यात कधीही मुंबईतल्या फोर्ट भागातल्या कोणत्याही व्हिडियो कॅसेट लायब्ररीतून कोणतीही कॅसेट भाड्यावर आणलेली मला आठवत नव्हती. तरीही कार्डवर माझं नाव होतं. आता इथे एक मेख होती; नाही असं नाही. माझं नाव मिहीर इनामदार असलं तरी कार्डवरची नोंद वीर इनामदार अशी होती, पण नावासमोरच्याच पुढल्या रकान्यात माझी त्या काळातली सही होती. जी मी लगेचच ओळखली. आणि त्या सहीतून मिहीर इनामदार ही आद्याक्षरं स्पष्ट ओळखता येत होती. शिवाय कॅसेट इश्यू करणारा तो जो कुणी मुश्ताक भाय होता, त्याचं नावही - ओळखीचं, ओळखीचं- म्हणून दातात अडकल्या मांसाच्या धाग्यासारखं डोक्यात वळवळत होतं, पण आठवणीतून मात्र बाहेर येत नव्हतं.

लायब्ररी कार्डवरील नोंद पाहता मी कॅसेट एकोणीसशे चौर्‍याण्णव सालच्या मार्च महिन्यात घेतली होती. बावीस मार्चला. म्हणजे साधारणतः मी सोळा वर्षांचा असताना. साधारणतः नव्हे, तेव्हा मला अगदी मोजून सोळा वर्षं पूर्ण झाली असतील. माझा जन्म मार्चमधलाच. चौर्‍याण्णव सालचा मार्च म्हणजे मी नुकतीच बारावीची परीक्षाही दिली असेन. त्या काळात आमच्या घरी व्हीसीआर होता. त्यावर मी भरपूर सिनेमेही पाहायचो. माझं गाव काही फार मोठं नव्हतं. तालुक्याचंही नव्हतं, पण कोकण रेल्वेमुळे मुंबईच्या उपनगरांना अगदी सहजीच जोडलेलं. गावात दोनचार छोट्यामोठ्या व्हिडियो कॅसेट लायब्रर्‍या होत्या, नाही असं नाही; पण त्या लायब्ररी कार्ड वगैरेंचा वापर करण्याइतपत अद्ययावत आणि व्यवस्थित नव्हत्या.

कानविंद्यांनी ठेवलेल्या लिफाफ्यातील ते कार्ड मी कानविंद्यांच्या टीपॉयवर ठेवून उठणारच होतो; पण एवढ्यात मिसेस कानविंद्यांनी मला अडवलं आणि म्हणाल्या, "केव्हीने हे कार्ड तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हीच घेऊन जा."

मला थोडं अवघडल्यासारखं झालं. एकूण प्रकरणाशी माझा संबंध काय, याचा मला तसूभरही थांगपत्ता लागला नव्हता. शिवाय कानविंद्यांच्या गायब होण्याच्या पार्श्वभूमीवर त्या लायब्ररी कार्डची नोंद पोलिसांतही होण्याची शक्यता हाती.

माझ्या मनातला विचार ओळखूनच जणू मिसेस कानविंदे पुढे म्हणाल्या, "पोलिसांना दाखवलं आहे ते कार्ड मी. कदाचित तुमच्याकडे ते चौकशीही करतील."

त्यांच्या या वाक्याने माझ्या मनावर मणाचं ओझं चढलं. माझ्यासारखी नाकासमोर चालणारी माणसं आयुष्यात कधीही पोलीस स्टेशनची पायरी न चढणंच पसंत करतात. त्यामुळे पोलिसांची चौकशी वगैरे शब्द ऐकले आणि माझं काळीज क्षणभर धडधडायचं थांबलंच, पण मिसेस कानविंद्यांसमोर काहीही न बोलता, तो लिफाफा घेऊन मी मुकाट्याने उठलो. कानविंद्यांच्या बंगल्याबाहेर पडलो आणि परतीच्या मार्गाला लागलो. पूना हॉस्पिटलच्या दुचाकी पुलावरून जाताना क्षणभर थांबून तो लिफाफा मुठेच्या पात्रात टाकून द्यावा असा विचार मनात आला खरा; पण मी तसं केलं नाही. मिसेस कानविंद्यांचे 'पोलिसांची चौकशी' हे शब्द माझ्या कानात घोळत होतेच. उद्या पोलिसांनी पुरावा म्हणून त्यातल्या कार्डची मागणी केली असती तर मी काय करणार होतो? खरंतर मी हट्टाने ते कार्ड तिथेच ठेवून उठून येऊ शकलो असतो, पण माझा भिडस्तपणा आड आला. माझी चिडचिड झाली. मुळात मी मिसेस कानविंद्यांचा फोन आल्यावर त्यांच्या घरी गेलोच का? गेलो तर गेलो, हे कार्डरूपी विकतचं दुखणं मी माझ्यासोबत घेऊन आलोच का? आणि आता या विकतच्या दुखण्याचं मी काय करणार होतो? आयुष्य कधीकधी आपली वाट निष्कारणच गुंतागुंतीची करून टाकतं. आणि अर्थाअर्थी काहीही सबंध नसताना तो गुंता सोडवत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.

त्या रात्री गुंत्याचं एक टोक मला सापडलंच.

बेडवर पडल्यापडल्या टेबललँपच्या पिवळट प्रकाशात ते निळसर रंगाचं लायब्ररी कार्ड न्याहाळताना मला त्या कॅसेटवर लिहिलेल्या वीर इनामदार या शब्दांचं गूढ उकललं.

मी आता पुण्यात स्थायिक झालेलो असलो तरी माझी मुळं कोकणातली. वयाची जवळपास वीसबावीस वर्षं मी वरकोकणातल्या माझ्या गावी वाढलो. माझ्या आहाराविहाराच्या, चालीबोलीच्या पद्धतींना आता शहरी संस्कारांचा पोत चढला असेलही; पण माझ्या विचारसरणीचा, संस्कारांचा मूळ बाज हा गावाकडलाच. गावरहाटीला माझं मिहीर हे नाव तसं पाहता उच्चारायला सोपं असूनही काहीसं अंगवळणी न पडलेलंच. त्यामुळे बरेचदा माझ्या नावाचा अपभ्रंश गावाकडले लोक मीर असा करत. गावाकडल्या माझ्या घराला लागूनच मुस्लीम मोहल्ला सुरू होतो. माझ्या बालपणीच्या जवळपास पहिल्या पंधरा वर्षांवर या मोहल्ल्यातील वातावरणाची सावली धरलेली. मुळात माझ्या मिहीर या नावाच्या मीर या अपभ्रंशाची सुरुवातच इथून झालेली. गावात मुस्लीम मोहल्ला नावापुरता एक असला तरी मुस्लीम वस्ती पुंजक्यापुंजक्याने दोन-चार ठिकाणी विखुरलेली आहे. बाजारपेठेचा जो मूळ रस्ता आहे त्या रस्त्याला काटकोनात जाणारी एक निमुळती गल्लीवजा वाट नदीपात्राकडे जाते. या वाटेला गावात इलामी गल्ली म्हणून ओळखतात. या गल्लीच्या दोहो बाजूंनी गर्दी करून बारापंधरा मुस्लीम घरं आहेत. इलामी गल्लीत राहाणारा इनायत इलामी माझ्या वर्गातला. त्याच्या जिभेला तर माझ्या नावाचा मीर हा अपभ्रंशही झेपला नाही म्हणून त्याने मला वीर हाक मारायला सुरुवात केली. आणि मग माझ्या मिहीर या नावाचा मीर हा अपभ्रंश काही काळ गावात वीर या नावाने स्थिरावला. इनायत मला वीर हाक मारे म्हणून त्याच्या घरातल्या माणसांनीही मला वीर या नावानेच हाक मारायला सुरुवात केली. इनायतच्या वडिलांचं नाव मुश्ताक होतं, हेही मग मला लागलीच आठवलं. शाळेत तशीही रोजची हजेरी संपूर्ण नावं उच्चारूनच घेतली जायची. हजेरीपटावर माझ्या मागोमागच इनायतचं पूर्ण नाव- म्हणजेच इनायत मुश्ताक इलामी उच्चारलं जायचं. मला जेवढं आठवतं त्यानुसार मुश्ताकभाई हे काही माझ्या जन्मगावचे मूळ रहिवासी नव्हते. माझ्या शाळकरी वयात ते कधीतरी मुंबईहून आमच्या गावी स्थलांतरित झाले. त्या काळात भारतीय सिनेसृष्टीत व्हीसीआर आणि व्हिडियो कॅसेट्सनी चंचुप्रवेश केला होता. मुश्ताकभाईंनी गावात आल्याआल्या व्हिडियो सेंटर सुरू केले होते. ते बर्‍यापैकी गर्दीही खेचू लागले होते. पुढे मुश्ताकभाईंच्या थोरल्या मुलाने म्हणजेच इनायतच्या मोठ्या भावाने इम्तियाजने गावात व्हिडियो कॅसेट्सची लायब्ररी सुरू केली. त्याचा हा छोटेखानी उद्योग चांगलाच भरभराटीलाही आला; पण दुर्दैव असं की पुढल्या काही वर्षांतच मासे पकडायला गेला असता नदीला आलेल्या पुरात इम्तियाज वाहून गेला. त्याच्या पश्चात इनायतच्या वडिलांनी काही काळ तो व्यवसाय पुढे सरकवला, पण पुढे व्हीसीआरचं युग ओसरलं आणि त्यांचा व्यवसायही काळाच्या उदरात गडप झाला.

इनायतच्या प्रगतिपुस्तकावरची मुश्ताकभाय अशा अक्षरांची त्याच्या वडिलांची देवनागरी सही मला अगदी स्पष्ट आठवत होती. याचा अर्थ कानविंद्यांनी जी व्हिडियो कॅसेट फोर्टच्या व्हिडियो प्लाझामधून भाड्याने घेतली होती, तीच काही वर्षांनी मी माझ्या गावातल्या मुश्ताकभाईंच्या लायब्ररीतून भाड्याने घेतली होती तर!

पण हे कसं शक्य होतं? फोर्टच्या व्हिडियो लायब्ररीतली कॅसेट कोकणातल्या माझ्या गावी कशी पोहोचली?

आणि या सगळ्याचा कानविंद्यांशी काय संबंध?

निरर्थक गोष्टींच्या गुंत्याचं एक वैशिष्ट्य असतं.

गुंता सुटत जातो तेव्हा आपण त्यात अधिकाधिक गुंतत गेलेले असतो.

माझंही तसंच झालं.

मधल्या काळात इनायतने पडत-धडपडत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मग एसी मेकॅनिकचा खाजगी कोर्स करून तो गेली वीस वर्षं आखातात नोकरीला होता. एका कॉमन मित्राकडून मी त्याचा अबुधाबीतला मोबाइल नंबर मिळवला आणि काळवेळेची तमा न बाळगता रात्री साडेअकराला त्याला फोन लावला.

फोनवर माझा आवाज ऐकताच इनायत अक्षरशः गहिवरलाच. मग बराच वेळ मित्रप्रेमाचं भरतं येऊन बोलू लागला.

अशा वेळा अवघड असतात.

म्हणजे खूप काळाच्या खंडानंतर आपण जुन्या परिचितांना संपर्क करतो तेव्हाच्या संपर्काचा संधिकाळ. मला अशा वेळी काही बोलायलाच सुचत नाही. समोरची व्यक्ती थोडी अघळपघळ असेल तर ती काहीही बोलत सुटते, बोलतच राहाते. अशा वेळी मग बोलण्याचा ओघ तोडून समोरच्याला आपल्या मुद्द्यावर आणावं लागतं.

"तुमच्या व्हिडियो कॅसेट्सचं पुढे काय झालं?" इनायतचा ओघ तोडत मी त्याला अचानक मुद्द्यावर आणलं.

"काय झाला म्हंज्ये?" त्याला क्षणभर माझा मुद्दा समजलाच नाही.

मग मी थोडं सविस्तर बोललो. मूळ मुद्दा समोर न आणता, वेगळंच कारण देऊन त्यांच्या व्हिडियो कॅसेट लायब्ररीची चौकशी केली. एव्हाना मी सिनेक्षेत्रात काम करतो हे सगळ्यांना ठाऊक झालं होतं. त्यामुळे गावात माझ्याबाबत एक प्रकारचं कौतुकही होतं. असं असलं तरी मी नेमकं काय काम करतो हे कुणालाही ठाऊक नव्हतं. त्यातून गावाकडल्या लोकांना सिनेक्षेत्रातील प्रॉडक्शन डिझाइन वगैरे उपप्रांत ठाऊक असण्याचा काही संबंधच नव्हता, पण मला एका सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी खूपसार्‍या जुन्या व्हिडियो कॅसेट्स हव्या आहेत हे ऐकल्यावर इनायत मदत करण्यासाठी तत्परतेने उत्सुक दिसला.

"कॅशेटी हान, पन आब्बांनी त्या आता मोर्ब्यान हालवल्यान."

"मोर्ब्यात?" मुश्ताकभाईंनी व्हिडियो कॅसेट्स मोर्ब्यात का हलवल्या असतील हे न कळून मी विचारलं.

"हां, म्हंज्ये आब्बा आत्ता मोर्ब्यान जौनबकरे शिफ्ट झालेन. मी जवा इंडीयान येतो तवाच त्याना गावाला जुन्या घरी घेऊन जातो."

जौनब म्हणजे इनायतची मोठी बहीण. तिचं खरं नाव झैनब. पण तिच्या नावाचा अपभ्रंश पुढे जौनब असा झाला. मग सगळेच तिला जौनब हाक मारू लागले.

आधी जौनब, मग दोन वर्षांनी इम्तियाज आणि मग लगेचच एका वर्षाच्या अंतराने इनायत अशी मुश्ताकभाय इलाम्यांची वंशावळ होती. जौनबला माणगावजवळच्या मोर्ब्यात दिलेली. तिचा नवराही आखातात कामाला होता. त्यानेच पुढे इनायतलाही आखाताचा मार्ग दाखवला.

"तू जौनबला फोन लाव. ती करेल मॅनेज चाबी. मी सांगतो तिला फोन करून." असं म्हणत इनायतने फोन ठेवला. फोन ठेवताच काही मिनिटांतच त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर मला जौनबचा नंबरही पाठवला.

जौनब माझ्या मोठ्या बहिणीच्या वर्गात होती. आमच्या घरी तिचं येणंजाणंही होतं. तिच्या लग्नालाही मी आवर्जून गेलो होतो. आता जरी दीडदोन दशकं काही संपर्क नसला तरी तिच्याशी फोनवर बोलणं ही माझ्यासाठी काही फार अवघड गोष्ट नव्हती, पण इनायतचा फोन झाल्यावर माझा एकूण प्रकरणातला उत्साहच संपला. शिवाय इनायतचा फोन संपेस्तोवर रात्रीचे साडेबारा झाले होते. जौनबला संपर्क करण्याच्या दृष्टीने ही अवेळच होती. मी टेबललँप विझवून बेडवर आडवा पडलो. झोप अशी लागली नाहीच. लागली तेव्हा कधी लागली हेच कळलं नाही. त्या बेडवर आडवं पडण्याच्या आणि झोप लागण्याच्या संधिकाळात मनात खूपसे विचार आणि आठवणी रेंगाळून गेल्या. बहुतांश विचार आणि आठवणी ह्या गावाकडे अनुभवलेल्या व्हिडियो कॅसेट्स आणि व्हिडियो सेंटरच्या काळाभोवतालच्याच होत्या. मग मध्येच केव्हातरी झोप लागली आणि त्या आठवणी, विचार स्वप्नात स्थलांतरित झाले.

स्वप्नात मला गावाकडे भरलेला उरूस दिसला.

उरुसात एक तंबूतलं व्हिडियो सेंटर दिसलं.

इनायतचे वडील मुश्ताकभाई ते व्हिडियो सेंटर चालवत होते.

उरूस भरला होता. सगळीकडे गर्दीच गर्दी. माणसांची आणि रोषणाईचीही. आवाजांची गर्दीही होती. आवाज तरी कसले कसले! मुलांचे, बायांचे, बाप्यांचे. पिपाण्या-लाऊडस्पीकर- आकाशचक्रांचे. वासांच्या गर्दीची तर गुदमर झालेली सगळीकडे. माणसांच्या अंगाला येणारा लोहमिश्रित-आंबूस वास, त्या वासात मिसळलेला वेगवेगळ्या अत्तरांचा नाकात हुळहुळणारा दर्प आणि या सर्वांवर कडी करणारा जागोजागी पेटलेल्या भट्ट्यांवरचा तापलेल्या तेलाचा वास.

दर्ग्याबाहेर लावलेल्या लाऊडस्पीकरवर आशिकीतली गाणी चालू होती.

गाणी नव्हे गाणं.

एकच गाणं.

अब तेरे बिन जी लेंगे हम!

दुतर्फा दाटीवाटीने उभ्या दुकानांतूनही टेपरेकॉर्डवर आशिकीतली गाणीच चालू होती. कुठे कुठलं, तर कुठे कुठलं.

जणू सभोवताली उरूस नव्हे तर आशिकीचा महोत्सवच भरला होता.

झोपेच्या अर्धग्लानीतही आपण स्वप्न पाहतोय ही जाणीव माझ्या मनात जागृत होतीच. तरीही मी स्वप्न खंडीत न करता पुढेपुढे पाहातच राहिलो.

उरुसाच्या चौकात जिथे वाट डाव्या बाजूला पीरबाबाच्या दर्ग्याकडे जायला वळते तिथे कोपर्‍यावर एक भलामोठा कापडी बोर्ड लागला होता. त्यावर 'आजचे खास आकर्षण' आशिकी! - अशी रंगीबेरंगी अक्षरं काढली होती. खाली एक बाण काढून आतल्या वाटेकडे निर्देश केला होता. मी बाणाची वाट पकडत पुढे झालो. पुढे माणसं, दुकानं, आवाज आणि वास सगळंच विरळ होत गेलं. उरूस जिथे संपत होता त्या टोकालाच एक तंबू टाकला होता. तंबूच्या दारातही आशिकीचंच पोस्टर! पण हा आशिकी मला ठाऊक असलेल्या आशिकीपेक्षा वेगळा होता. दोन बाय अडीचच्या त्या पोस्टरवर त्या काळातल्या साचेबद्ध नायकनायिकांचं चित्र रंगवलं होतं. पोस्टरवर उजव्या बाजूला जवळपास अर्धी जागा व्यापलेला नायक. त्याच्या कपाळावर जखम. जखमेवर पट्टी. नायकाची घायाळावस्था स्पष्ट करणारी प्रतिकृती. डाव्या बाजूला डोळ्यातून वेदना ओघळणारी नायिका. त्या वेदनेला अधिकच अधोरेखीत करणारे नायिकेचे विलग झालेले ओठ. पोस्टरच्या तळाशी मोठाल्या अक्षरांत सिनेमाचं नाव आशिकी; आणि त्या नावावरून उगवलेला विकट हास्य हसणारा खलनायकाचा चेहरा.

तंबूच्या पांढर्‍या कापडातून आतल्या उजेडाची उघडझाप डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. आत सिनेमा चालू होता. लोकांचे नानाविध उद्गार बाहेरही ऐकू येत होते. तंबूचं प्रवेशद्वार म्हणून पांढर्‍या कनातीतून मोकळी जागा सोडलेला उभट आयताकृती चौकोन होता. त्या चौकानावर लाल रंगाचा पडदा टाकलेला. पडद्यावर तंबूच्या मूळ पांढर्‍या रंगास साजेशी एक अधिकची कापडी पातळ पट्टी चिकटवली होती. पट्टीवर नाव होते. आशिकी व्हिडीयो पार्लर. पडद्याच्या लाल रंगाबाहेर इनायतचे वडील मुश्ताकभाय उभे राहून एकेका प्रेक्षकाला आत सोडत होते. मी सरळ त्या लाल पडद्याच्या प्रवेशद्वाराकडे वळलो. मला पाहताच मुश्ताकभाईंनी हसून माझ्या पाठीवर थाप मारली आणि मला जवळपास आतच ढकललं.

आत सिनेमाचं उधाण आलं होतं. तंबूच्या एका टोकाला ठेवलेल्या चोवीस इंची टीव्हीचा नृत्यमग्न उजेड समोरच्या बाजूला पत्र्याच्या खुर्च्यांवर बसलेल्या लोकांवर पडला होता. त्या उजेडात लोकांच्या चेहेर्‍यावर हर्षखेदविस्मयादी विविध भाव गोठले होते. आतमध्ये मोठमोठ्याने वाजणारी गाणी बहुधा आशिकीचीच होती; पण टीव्हीवर दिसणार्‍या सिनेमाची चित्रं मात्र मूळ आशिकीपेक्षा अत्यंत वेगळी अशी होती. नायक, नायिका, खलनायक सगळेच अपरिचित! मी पुढे होत सरळ टीव्हीच्या दिशेने गेलो. टिव्हीवर एक मोठाला व्हिसिआर ठेवला होता. व्हिसिआरच्या वरच्या झाकणाच्या पारदर्शी भागातून आत रिळं उलगडणारी व्हिडीयो कॅसेट स्पष्ट दिसत होती. मला ती कॅसेट थांबवायची होती. बाहेर काढायची होती. मला त्या कॅसेटवरचं नाव पाहायचं होतं. तोच सिनेमा, तिच कॅसेट कानविंदे शोधत होते. मी व्हिसिआरचा 'स्टॉप'चा खटका दाबत कॅसेट थांबवली. मग 'इजेक्ट' दाबलं. 'झुईईम झुपक' असा आवाज करत व्हिसिआरच्या दर्शनी भागावरल्या छोट्या पट्टीतून आतली कॅसेट बाहेर आली. मी कॅसेट व्हिसिआरच्या मुखातून बाहेर काढत डोळ्यासमोर धरली. अधिरतेने मी कॅसेटवरचं नाव वाचणार, एवढ्यात माझ्या पाठीवर थाप पडली. मी मागे वळून पाहिलं. मागे मुश्ताकभाई उभे होते. "वीर. लोका पिच्चर देखतान. देखू दे त्यांना."

माझ्या कानावर मुश्ताकभाईंचे शब्द पडले आणि मी जागा झालो.

– – –

मुखपृष्ठ आणि मांडणी : गिरीश सहस्रबुद्धे
कादंबरीचा अंश अंकात प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल मॅजेस्टिक प्रकाशनाचे आभार.

मलपृष्ठ

field_vote: 
0
No votes yet