"आय लव्ह यू जोबुर्ग"
"आय लव्ह यू जोबुर्ग"
- - विजुभाऊ
दक्षिण अफ्रिकेला जाईन असे कधी काळी वाटलेही नव्हते. ऑफिसने जेव्हा दक्षिण अफ्रिकेला जायचे, असे सांगितले तेव्हा सर्वप्रथम घरातल्यांची प्रतिक्रिया होती की, तुला दुसरा कोणता देश नाही मिळाला का?
दक्षिण अफ्रिकेबद्दलचे माझे ज्ञान नेल्सन मंडेला, क्लाईव्ह राईस, जाँटी ऱ्होड्स आणि डरबनला महात्मा गांधींना रेल्वेतून उतरवले इतकेच होते. आणि अज्ञान मात्र अफाट होते. तेथे सगळी काळी माणसे आहेत इथपासून तेथे कायम दुष्काळ असतो, लुटालूट होते वगैरे वगैरेपर्यंत.
इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा तिथे यापेक्षाही बरेच काही आहे हे समजले. पण तरीही ते प्रत्यक्ष अनुभवायचे बाकी होते.
विमानात बसल्यापासून मनात एक धाकधूक तेथल्या लूटमारीबद्दल होतीच. ऐकीव कथांवर किती विश्वास ठेवायचा या प्रश्न असतोच. पण अविश्वास किती दाखवायचा हाही असतो.
एक ऐकीव कथा म्हणजे कोणी एक सॉफ्टवेअर इंजिनीयर जोहानसबर्गमध्ये आठवड्यासाठी आला होता. त्याला त्याच्या कंपनीने कॅब ड्रायव्हर देऊ केला. ड्रायवर सतत त्याच्या सोबत असायचा. इतका की तो त्याच्या विश्वासू बनला. हा माणूस त्याच्या समोर एटीएम मधून पैसे काढायचा, पाकिटात ठेवायचा. जाण्याच्या एक दिवस अगोदर या सॉफ्टवेअरवाल्याने कॅब ड्रायव्हरला कुठेतरी न्यायला सांगितले. त्याने तसे नेलेही. येताना मात्र कॅब ड्रायव्हर एकटाच आला त्या ड्रायव्हरने म्हणे त्या सॉफ्टवेअरवाल्याला लुटला त्याचे पैसे, क्रेडीट कार्ड काढून घेतले आणि त्याला मारून टाकले.
जायच्या अगोदर कंपनीच्या एचआरचे एक इमेल आले, त्यात काय करा / काय टाळा याच्या सूचना. त्यात प्रामुख्याने एकटे फिरू नका, संध्याकाळी सातनंतर बाहेर फिरू नका, एटीएममधून पैसे काढताना सोबत कोणालाही ठेवू नका, सर्वांसमोर पैसे मोजू नका, इत्यादी, इत्यादी.
त्यामुळे भीती कमी व्हायच्या ऐवजी त्यात भरच पडली.
जोहानसबर्गच्या विमानतळावर पाऊल ठेवले. बाहेर आल्यावर रिसेप्शनवर माझ्या नावाचा बोर्ड पाहिल्यावर जिवात जीव आला. पण या गडबडीत येताना एअरपोर्टवर एटीएममधून दक्षिण अफ्रिकन रँड काढायचे विसरलो. (दक्षिण आफ्रिकेतले चलन रँड हेसुद्धा अगोदर माहीत नव्हते.) त्यामुळे एटीएम शोधायचे की कसे हा विचार करत बसलो. आपल्याला घ्यायला आलेला कॅब ड्रायव्हर कसा असेल याची चिंता लागली होती. शेवटी धीर करून त्याला एटीएम शोधायला सांगितले. पैसे काढताना तो माझ्या मागेच उभा होता. गडबडीत एटीम कार्ड उलटे घातले. ते त्यानेच मला सांगितले. त्यामुळे अगोदरच्या भीतीत भरच पडली. भित्यापाठी ब्रम्हराक्षस ही म्हण खरी आहे हे अनुभवत होतो.
कंपनीने दिलेल्या गेस्ट हाऊसमधे उतरलो, कॅब ड्रायव्हरला ठरलेले पैसे दिले. आणि रूमचे दार घट्ट लावून घेतले.
मे महिना असूनही भरपूर थंडी होती. दक्षिण अफ्रिका हे दक्षिण गोलार्धात असल्यामुळे तिथे आपल्यापेक्षा ऋतू उलटे असतात. म्हणजे आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा तिकडे हिवाळा असतो. मुंबईतून मे महिन्याच्या उकाड्यातून गेलो होतो. तिथली मे महिन्याची थंडी अनुभवत होतो.
जोहानसबर्ग एक सुंदर शहर आहे. हे जगातले सर्वांत मोठे मानवनिर्मित जंगल आहे हे अनुभवत होतो.
गेस्ट हाऊसमधे रिसेप्शनला महिन्याचे भाडे भरताना पैसे रोख रकमेत दिले. तेथल्या मॅनेजरने, ब्युआलाने ते माझ्यासमोर मोजून घेतले. ऑफिसला गेल्यावर पाकिटात उरलेल्या रकमेचा आणि दिलेल्या रकमेचा मेळ बसेना. आपण देताना जास्त पैसे दिले इतकेच काय ते लक्षात आले. गेस्ट हाऊसला फोन केल्यावर मॅनेजर मला म्हणाली की तुझ्या समोरच मोजले की मी. मी तरीही विनंती केली की पुन्हा मोजून पाहा. त्यावर ती म्हणाली की, मी कॅश घेऊन माणसाला बँकेत भरायला पाठवले आहे. तो सांगेल मला आल्यानंतर. इथे आल्या-आल्या आपल्याच धांदरटपणामुळे हजार रँडचा फटका पडला असे मनोमन कबूल करून टाकले.
संध्याकाळी आलो तेव्हा ब्युआला तेथे नव्हती. त्यामुळे काही विचारता आले नाही. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर कॉफी पीत होतो, ब्युआलाने मला पाहिले, ती माझ्या समोर आली आणि शंभरशंभर रँडच्या दहा नोटा समोर करत म्हणाली, "हे घे तुझे हजार रँड्स. आणि पुढच्या वेळेस मोजताना नीट मोजून देत जा. बँकेत गेल्यावर हजार रँड्स जास्त रक्कम होती, ती माझ्या माणसाने परत केली. तू फोन केला होतास ते बरे झाले, नाही तर मला काल ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्या सगळ्यांना विचारावे लागले असते."
आपण हे सांगतो आहोत यात काही वेगळे आहे हे तिच्या गावीही नव्हते.
दक्षिण आफ्रिकेत फिरताना अगोदर मी एकट्याने मॅकडोनल्ड्समधेही, न जाणो आपल्याला कोणी लुबाडले तर काय घ्या, या विचाराने भीत भीत जायचो. पण नंतर नंतर तेथे जाऊन लोकांशी बोलल्यावर ही भीती नाहीशी झाली. आपण उगाचच घाबरतो हे जाणवले.
जोहानसबर्ग शहर स्थानिकांसाठी 'जोबुर्ग' आहे. त्यांच्या मते हे शहर सगल्या आफ्रिका खंडातले सर्वांत सुंदर शहर आहे. इतरांसाठी न्यूयॉर्कच्या तोडीचे आहे त्यामुळे इथे शेजारपाजारच्या बऱ्याच देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांची संख्याही पुष्कळ आहे.
वर्णद्वेषी जुलमी राजवट राजकीयदृष्ट्या जरी संपलेली असली तरी ती अजूनही तितकीशी लोकांच्या मनातून पूर्ण पुसली गेलेली नाही.
इथे एका मित्राला पबमधे जायचे होते. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. अफ्रिकन ब्लॅक लोकांच्या पबमधे एकही गोरा आढळणार नाही. गोऱ्या लोकांचे पब वेगळे आहेत आणि आशियाई लोकांचे पब वेगळे असतात. अर्थात कोणत्याही ठिकाणी जायला कायद्याने बंदी नाही, पण लोकांच्या मनात या भिंती आहेत.
इथल्या वर्णद्वेषी राजवटीचे जुलमी रंग माहीत करून घ्यायचे असतील तर थोडे आणखी फिरावे लागते. इथे भारतीय भाषांमध्ये चालवले जाणारे एक रेडिओ स्टेशन आहे. यावर पंजाबी, हिंदी आणि गुजराथी भाषेत चालवले जाते. एकदा दिवाळीमधे रेडिओवर जहिरात आली की दिवाळीच्या दिवशी वसूबारसेच्या निमित्ताने अन्नकोट करणार आहेत. (अन्नकोट म्हणजे देवाला अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवतात.) दर्शनासाठी या. त्या निमित्ताने भारतीय लोक भेटतील म्हणून मी लिनेशियाला जायचे ठरवले.
लिनेशिया हा भाग फक्त भारतीय तेही फक्त गुजराथी लोकांची वस्ती असलेला भाग. (हे नाव लान्झ आणि अशिया यांचे मिश्रण होऊन झालेले आहे) त्या वेळच्या आफ्रिकन सरकारने १९५८च्या सुमारास गौरेतर आणि खासकरून भारतीय लोकांना इतर भागातून हुसकावून इकडे वसवले आणि त्यांची वेगळी कॉलनी केली. इथल्या रस्त्यांना नावेदेखील बाँबे स्ट्रीट, कोलकता स्ट्रीट अशी आहेत.
दिवाळीच्या दिवशी इथे बरेच गुजराथी लोक सणासाठी एकत्र आले होते. बहुतेक सगळे खास सणासुदीच्या गुजराथी पोषाखात होते. बायकामुली साड्या, चणियाचोळी इत्यादी ड्रेस वगैरेंमधे, पुरूष धोतर, कुर्ता, केडिया (घेर असलेले जाकीट), कच्छी भरतकाम केलेले जाकीट, रंगीत पागोटे अशा वेशांत होते. थोडे वयस्कर लोक गुजराथी भाषेत संभाषण करत होते पण नवी पिढी मात्र "केम छो", "मजामा" इतकेच गुजराथी बोलू शकत होती.
तेथे एकाला सहज विचारले की तुम्ही कुठून आला आहात. त्याचे उत्तर आले इंडियामधून. इंडियामधून कोणत्या भागातून विचारले असता म्हणाले की कराचीहून.
कराची तर पाकिस्तानात आहे, या प्रश्नावर आलेले उत्तर मात्र मजेशीर होते. "आम्ही आलो तेव्हा कराची इंडियामध्येच होते."
सोवेटो हादेखील असाच भाग पण तो फक्त काळ्या लोकांसाठी राखीव होता. ही संपूर्ण वस्ती गोऱ्या लोकांना काळ्या लोकांपासून वेगळे ठेवण्यासाठी बनवली. इथले नियमही वेगळेच होते. दुपारी चारनंतर रस्त्यावर काळा माणूस दिसला तर गोऱ्याला त्याच्यावर गोळी झाडण्याची पूर्ण परवानगी होती.
अपारथाईड आणि त्याचे परिणाम या सगळ्याबद्दल तीन-चार स्वतंत्र लेख लिहावे लागतील.
वर्णभेदाची जाणीव मनातून अजून पुसली गेलेली नाही याची चुणूक आपल्याला बरेचदा येते.
ख्रिसमससाठी संध्याकाळी मला आमच्या घरमालकाने पार्टीसाठी बोलावले आहे, असे मी ऑफिसमधे एका सहकाऱ्याला सांगत होतो. त्याने मला एकदम विचारले की तुझा घरमालक गोरा आहे की काळा? तोपर्यंत घरमालक गोरा आहे की काळा ही गोष्ट माझ्या डोक्यातही आली नव्हती.
सरकारच्या ब्लॅक एम्पॉवरमेंट प्रोग्राममुळे बऱ्याच संस्थामध्ये, नावाला का होईना, काळे लोक बॉस म्हणून आले आहेत. गोऱ्या लोकांना ते आवडत नाही हे ते उघडउघड बोलत नाहीत, पण एकमेकांत बोलून दाखवतात.
नेल्सन मंडेलांची दूरदृष्टी या बाबतीत मानायलाच हवी. गोऱ्या लोकांची सत्ता होती तेव्हा संस्था चालवण्याचा अनुभव त्यांच्याशिवाय इतर कोणालाच नव्हता. युगांडाच्या अर्थव्यवस्थेची वाताहत सत्ता आणि संस्था अशिक्षित, अननुभवी लोकांच्या हाती गेल्यामुळे झाली. दक्षिण अफ्रिकेत नेल्सन मंडेलांनी गोऱ्या लोकांसोबत सत्तेत सहभागी होण्याला काही लोकांचा विरोध होता पण त्यांचा निर्णय किती योग्य होता हे आता लोकांना पटते.
सन सिटी हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठे गेमिंगचे ठिकाण. जोहानसबर्गपासून जवळजवळ पावणेदोनशे किलोमीटरवर. जाताना रस्ता मोकळ्या मैदानातून जातो. रस्त्यात आपल्या इथे दिसते तशी शेते वगैरे कुठेच दिसत नाहीत. वाटेत एखादे खेडे दिसले तरीही त्याच्या आसपासही कुठेच शेती दिसत नाही. याचे नवल वाटले. जरा विचारल्यानंतर कळाले की या जमिनीत प्लॅटिनम आहे. बहुतेक सगळ्या जमिनी कोणत्या ना कोणत्या मोठ्या कंपन्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यांवर स्थानिक शेतकऱ्याला शेती करायचा हक्कच नाहीये. मनात विचार आला की स्थानिक युवकाला त्याच्या जागेत शेती करता येत नाही, त्याचे शिक्षण झालेले नाही, त्याच्याकडे दुकान, शाळा किंवा तसल्या कोणत्याही संस्था चालवण्याचे ज्ञान नाहीये. त्यामुळे नोकरीही नाही. मग अशा युवकाने जगण्यासाठी करायचे तरी काय.
तरीही ब्लॅक एम्पॉवरमेंटमुळे काळ्या लोकांना थोड्याफार नोकऱ्या तरी मिळतात.
इथल्या समाजात काही मजेदार चालीरीती आहेत. माझी मेड तिच्या मुलीच्या लग्नासाठी सुट्टी मागत होती. मी तिला सुट्टी दिली आणि मुलीला लग्नात आहेर म्हणून थोडे पैसेही दिले. दोन महिन्यांनी तिने मुलीच्या बाळंतपणाची बातमी दिली. माझ्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहून ती हसली म्हणाली की तिच्या समाजात मुलगामुलगी लग्न ठरवतात. एकत्र राहतात. त्यांना मुलेही होतात. पण जोवर त्यांची आर्थिक स्थिती योग्य होत नाही तोवर ते लग्न करत नाहीत. नवरा मुलगा नवरीच्या वडिलांना हुंडा देतो. लग्न करतेवेळेस जर नवरी गरोदर असेल तर नवरा मुलगा नवरीच्या आई-वडिलांना काही जास्तीची रक्कम देतो; त्याला ते डॅमेज चारजेस असे म्हणतात.
माझ्या टीममधे एक मुलगी नामिबीयामधून स्थलांतरित होऊन आली होती. ती जरा कमी सावळी होती. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याने जास्त हुंडा दिला होता. नवरीला लग्नाअगोदर मुले असणे यात इथे काहीच वावगे वाटत नाही. जर नवरीला गोरे मूल झालेले असेल तर तिला लग्नात जास्त हुंडा मिळतो. (भारतीय , चिनी वगैरेही गोऱ्यांमधेच मोडतात.) कोणी, किती लग्ने करावी याला ही काही मर्यादा नाही, पण ते अपवादात्मकच. (त्या वेळेस झुलू जमातीतील जेकब झुमा हे अध्यक्ष होते. त्यांना सहा बायका अणि वीस मुले होती.)
जोहानसबर्गमधे असताना नवा अनुभव आला नाही असा एकही आठवडा गेला नाही. आणि प्रत्येक अनुभव पहिल्यापेक्षा सुंदर आणि वेगळा. डिसेंबरमधे इकडे उन्हाळा असतो. त्याच सुमारास पाऊसही पडतो. अक्षरशः टेनिसबॉलच्या आकाराच्या गारांमुळे घराची कौले फुटणे, गाडीच्या काचा फुटणे, छपराला पोचे येणे, हे नवे नाही.
पण मला आलेला अनुभव खूप वेगळा. एकदा सकाळी खिडकीबाहेर पाहिले तर आसपासची सगळी झाडे पांढरीशूभ्र झालेली. अधूनमधून कुठेतरी दिसणारे हिरवे पान. बाहेर थंडी वगैरे अजिबात नसताना हे बर्फ कसले म्हणून बाहेर आलो आणि पाहिले. सगळी झाडे ही पांढऱ्याशुभ्र फुलपाखरांनी भरून गेली होती. पाहावे तिकडे फुलपाखरे. ही स्थलांतर करणारी फुलपाखरे असतात. काही हजार किलोमीटरचा प्रवास करतात. त्या दिवशी संपूर्ण गावात झाडेच काय, पण रस्ते आणि इमारतीही पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या.
हे दृश्य दोन-तीन दिवस दिसले. पण मनावर कायमचे कोरले गेलेय.
जोहानसबर्गमध्ये फोर्ड्सबर्गसारख्या भागात काळे लोकही गुजराती शब्द बोलतात. "दनिया दनिया", असे म्हणत कोथिंबिरीच्या पेंड्या घेण्याचा आग्रह करतात.
तेथे गेल्यावर तर आपण भारतात नाही हे खरेच वाटत नाही.
आपण भारतीय असे सांगितले की इथले लोक खुलतात. त्यांना शाहरुख खान माहीत असतो. इतकेच काय तर "खुच खुच होता है" हे गाणे माहीत असते. त्यांना अमिता बाच्चान माहीत असतो. त्यांच्यासाठी भारत हा खूप मोठा देश आहे. प्रगत देश आहे.
एकाने तर मला "आवारा हुं" हे गाणे संपूर्ण म्हणून दाखवले. अर्थ समजत नाही पण गाणे पूर्ण पाठ होते.
लाकडी खेळणी मिळणाऱ्या मॉलमध्ये गेल्यावर मित्रांसोबत हिंदी बोलताना ऐकल्यावर विक्रेते आपल्याला "हे शशिन (सचिन) कम हियर"; "हे अमिता बाच्चा कम हियर"; म्हणून हाक मारतात. कधीतरी भारतात जाऊन यायचे हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचा बकेट लिस्ट आयटम असतो. मी मुंबईहून आलोय हे ऐकल्यावर एकजण तर अगदी प्रेमात आला. म्हणाला, "आय लव मुम्बाय. आय वांत तु गो तु मुम्बाय," कारण विचारले तर म्हणाला, "आय वांत तू मीत लीना छांदावारकार." हे ऐकल्यावर मी चाट पडलो. लीना चंदावरकरलाही आपला कोणी फॅन दक्षिण अफ्रिकेत असेल असे स्वप्नातसुद्धा वाटत नसेल.
तो बोलणारा फॅन इतक्या तळमळीने बोलत होता की ते ऐकून म्हणावेसे वाटले, "आय लव्ह यू जोबुर्ग".
प्रतिक्रिया
रोचक
रोचक
रोचक
छान लेख आहे. मी दक्षिण आफ्रिकेत जाउन आलो आहे म्हणून खूप जवळचे भाष्य वाटले.
स्थानिक लोकांस शेती करण्याची परवानगी नाही
कारण प्लॅटिनम साठी धन दांडग्या लोकांनी ती जमीन ताब्यात घेतली आहे..हे धन दांडगे नक्की च पाश्चिमात्य राष्ट्रातील भांडवलदार असतील.
आफ्रिकन देशांच्या सरकार वर दबाव टाकून त्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला लावले असतील
…
Durbanला नव्हे; Pietermaritzburgला.