साहेलच्या सुरस कथा
साहेलच्या सुरस कथा
- - चिंतातुर जंतू
पश्चिम आफ्रिकेत निजेर नावाचा एक देश आहे. २६ जुलै २०२३ रोजी तिथल्या सेनेनं उठाव केला. विद्यमान राष्ट्राध्यक्षांना (मोहम्मद बाझूम) ताब्यात घेऊन जनरल अब्दुररहमान चिआनीने स्वतःला राष्ट्रप्रमुख घोषित केलं. त्यानंतर तिथे काही सुरस घटना घडू लागल्या. पाश्चात्त्य देशांनी नव्या सरकारला मान्यता देण्याचं नाकारलं. संधी मिळताच आपले नागरिक देशातून बाहेर काढले. एके काळी तिथे राज्यकर्ते असणाऱ्या फ्रेंचांनीही आपल्या नागरिकांना बाहेर काढलं, मात्र एक अपवाद केला – फ्रेंच दूतावासाचा. फ्रेंच राजदूत काही घरी जायचं नाव घेईना. म्हणजे 'आम्ही तुमच्या नव्या राष्ट्राध्यक्षाला मान्यता तर देत नाहीच, वर तुमच्या देशात ठाण मांडून मात्र बसणार!' तिकडे पॅरिसमध्ये बसून राष्ट्राध्यक्ष माक्रों यांनीदेखील राजदूताला पाठिंबा जाहीर केला. अखेर २९ ऑगस्टला नव्या सरकारनं फ्रेंच राजदूताचा व्हिसा रद्द केला, त्याची डिप्लोमॅटिक इम्युनिटी काढून घेतली आणि त्याला ताबडतोब (४८ तासांत) देश सोडण्याचा आदेश दिला. तरीही तो जाईना. त्याला जायला भाग पाडण्यासाठी दूतावासाची रसद निजेर सरकारने तोडली असा दावा माक्रों यांनी केला. निजेरची राजधानी निआमेमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर येऊन फ्रेंच राजदूतांनी परत जावं अशी मागणी करत होते. सुमारे १५०० फ्रेंच सैनिक निजेरमध्ये आहेत त्यांनीही परत जावं अशी लोकांची मागणी होती.
२६-२७ सप्टेंबरपर्यंत हे नाट्य चाललं. अखेर राजदूत फ्रान्सला परतला. राजदूत परतल्यानंतर निजेरच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला –
अजूनही बाझूम बंदिवान आहेत. फ्रेंच सैनिकही निजेरमध्ये आहेतच, पण ते वर्षअखेरपर्यंत बाहेर पडतील असं माक्रों यांनी कबूल केलं आहे.
आता जरा विचार करून पाहा. भारताच्या एके काळच्या राज्यकर्त्या यूकेला आजच्या भारतात असं काही करायचं धारिष्ट्य दाखवता येईल का? समजा त्यांनी तसा प्रयत्न केला तर आपली प्रतिक्रिया काय होईल? आफ्रिकेत मात्र पूर्वीचे वसाहतकर्ते अगदी आजही असा उद्दामपणा करू शकतात.
अशा अनेक सुरस गोष्टी ह्या भागात घडत राहतात. साहेल ह्या नावानं हा भाग ओळखला जातो. मुख्यतः बुर्किना फासो, चाड, माली, मॉरिटानिया, निजेर, सेनेगल हे देश (नायजेरिया आणि सुदानचाही काही भाग) ह्यात धरले जातात. सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागापाशी पूर्व-पश्चिम पट्ट्यासारखा हा प्रदेश पसरलेला आहे. ह्यातले बरेचसे देश पूर्वी फ्रेंच वसाहती होते. उत्तरेला वाळवंट आणि दक्षिणेला गवताळ सॅव्हाना प्रदेश यामध्ये असलेला हा कोरड्या हवामानाचा पट्टा आहे. हा लेख काही साहेल भागाचा व्यापक आढावा नाही, तर तिथल्या एके काळी फ्रेंच वसाहती असलेल्या देशांच्या सद्यस्थितीचा अंदाज येण्यासाठी काही वेचक घटनांचा उल्लेख लेखात आहे. (लेखातली बरीचशी माहिती साधी गूगलवर शोधून मिळेल अशी आहे त्यामुळे संदर्भ दिलेले नाहीत. तरीही तपशीलात काही चूक असल्यास क्षमस्व.)
वर दिलेल्या निजेरमधल्या घटनांच्या आधी नऊ-दहा वर्षांपासून फ्रेंच सैन्य मालीमध्ये होतं. फ्रान्सनं त्यावर प्रचंड खर्च केला (काही बिलिअन युरो). त्यांचं आगमन तिथे झालं तेव्हा लोकांनी त्यांचं स्वागत केलं होतं ते इस्लामी दहशतवादापासून फ्रेंच मालीला मुक्त करतील ह्या आशेनं. मात्र, इस्लामी दहशतवाद तिथे आजही जोमात आहे. गेल्या काही वर्षांत तिथे हजारो लोक मेले आणि लाखो विस्थापित झाले. पण प्रसारमाध्यमांत त्याला फारशी जागा मिळत नाही. 'तिंबक्तू' या ऑस्कर नामांकन मिळालेल्या चित्रपटात तिथली तेव्हाची परिस्थिती दाखवली आहे. चित्रपटाचा ट्रेलर –
दहशतवादाला आणि विद्यमान सरकारला कंटाळून २०२०मध्ये मालीमध्येही सैनिकी उठाव झाला होता, सरकार पडलं होतं, आणि फ्रेंचांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. तिथून फ्रेंचांना हटवण्यासाठी तिथल्या लोकांनीही आंदोलन केलं होतं. जेव्हा तिथून फ्रेंच सैन्य बाहेर पडलं (ऑगस्ट २०२२) तेव्हा हातात झाडू घेऊन मालीतल्या लोकांनी जल्लोष केला होता –
तिथल्याही फ्रेंच राजदूताला हाकललं गेलं (जानेवारी २०२३) आणि नवा राजदूत अद्याप नेमला गेलेला नाही.
मालीमध्ये फ्रेंचविरोधी निदर्शन
या सगळ्यातून काही वेळा विचित्र परिस्थिती उद्भवते. २ नोव्हेंबर २०१३ रोजी, म्हणजे दहा वर्षांपूर्वी, मालीमध्ये दोन फ्रेंच वार्ताहरांची हत्या झाली होती – गिसलेन द्यूपों (Ghislaine Dupont) आणि क्लोद वेर्लों (Claude Verlon). (त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ संयुक्त राष्ट्रांनी २ नोव्हेंबर हा दिवस वार्ताहरांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या विरोधातला दिवस म्हणून जाहीर केला आहे.) त्यांच्या मृत्यूमागचं कारण किंवा परिस्थिती काय होती ते आजही नक्की सांगता येत नाही. साधारणतः परदेशी (पाश्चात्त्य) लोकांचं अपहरण केलं जातं आणि मग खंडणी उकळून त्यांना सोडलं जातं. मात्र, या दोघांना पकडताच त्यांची हत्या झाली होती. अपहरणानंतर त्यांना घेऊन जाणारी गाडी बंद पडल्यामुळे त्यांना मारण्यात आलं असावं असा एक अंदाज आहे. फ्रान्सद्वारे ह्या प्रकरणाचा तपास अजून चालू आहे. मात्र मालीशी संबंध बिघडल्यामुळे त्यात फ्रेंच सरकारला विशेष यश मिळत नाही असं म्हणतात. (जाता जाता : डीआरसी उर्फ डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये 'गिसलेनमुळे लोकशाही आली' असं तिला आदरांजली वाहताना तिथल्या एका माजी मंत्र्यांनी म्हटलं होतं. आयव्हरी कोस्ट आणि बुर्किना फासोतही तिनं खूप काम केलं होतं.)
ओलिविए द्यूब्वा ह्या मालीस्थित फ्रेंच वार्ताहराचं प्रकरण वेगळं आहे. एप्रिल २०२१मध्ये त्याचं अपहरण झालं होतं आणि मार्च २०२३मध्ये त्याला सोडून देण्यात आलं. असं मानलं जातं की मालीतलं फ्रेंच सैन्य एका दहशतवाद्यापर्यंत पोचण्यासाठी द्यूब्वाला आमिष म्हणून वापरून घेण्याचा प्रयत्न करत होतं, पण आयत्या वेळी, म्हणजे त्या दहशतवाद्याशी भेटीची वेळ जवळ आली असताना त्यांनी हाय खाल्ली. त्या गोंधळात द्यूब्वाचं अपहरण झालं. त्याला सोडून दिलं त्याअगोदरच फ्रान्स आणि मालीमधले संबंध बिघडले होते. त्या वेळी निजेरच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी (बाझूम) मध्यस्थी केली म्हणून तो सुटू शकला असं म्हणतात. आजमितीला कुणी फ्रेंच वार्ताहर आफ्रिकेत तरी अपहृत नसावेत (इराणमध्ये आहेत), पण अशी प्रकरणं यापूर्वीही झाली आहेत. उदाहरणार्थ, सोफी पेत्रोनँ (अपहरण – २०१६; सुटका – २०२०). आता बाझूम पदच्युत आहे आणि फ्रान्सचे निजेरशीही संबंध बिघडले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांत पुढे काही तरी भलतंच होऊ शकतं.
थोड्याच काळापूर्वी बुर्किना फासोमध्येही फ्रेंच सैनिक होते. बुर्किना फासोमध्येही हेच झालं – सैन्याचा उठाव, मग जानेवारी २०२३मध्ये फ्रेंच सैनिकांना निघून जाण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली गेली, दरम्यान जनतेची फ्रान्सविरोधी निदर्शनं आणि अखेर फेब्रुवारीमध्ये फ्रेंच सैन्य माघारी गेलं.
असं म्हणतात की फ्रेंच सैन्याला मालीत, किंवा एकंदरीत पश्चिम आफ्रिकेत अपयश मिळण्याचं कारण म्हणजे फ्रेंचांचा उद्दामपणा आणि सगळं शहाणपण आपल्याकडेच आहे ह्या समजुतीतून त्यांचं स्थानिक लोकांना सतत कमी लेखणं. 'फ्रेंचांचा साम्राज्यवाद आता आम्हांला नको' असं विविध देशांतले लोक त्यामुळे सध्या सातत्यानं म्हणताना दिसतात.
अमेरिकी सैन्याला अफगाणिस्तानमधून बाहेर पडताना मिळाली तेव्हासारखी प्रसिद्धी फ्रेंच सैन्य जेव्हा असा एखादा आफ्रिकन देश सोडून जातं तेव्हा त्याला अर्थातच मिळत नाही. आजही आफ्रिकेतल्या विविध देशांत काही हजार फ्रेंच सैनिक तैनात असावेत. सध्या ते प्रामुख्यानं चाड, गाबों, सेनेगल आणि आयव्हरी कोस्टमध्ये आहेत. (https://www.reuters.com/world/africa/which-western-countries-have-foreig...)
फ्रेंच फॉरेन लीजन (Légion étrangère) हा एक वेगळाच विषय आहे. मुख्यतः आफ्रिकेत लढणारा हा फ्रेंच सेनेचा विभाग आहे. त्यात कोणत्याही देशाचे नागरिक दाखल होऊ शकतात. थोडी फ्रेंच यायला हवी आणि शारीरिक-मानसिक चाचण्यांत पास व्हायला हवं. अर्थात, त्यानंतर खडतर प्रशिक्षण असतं तेही पूर्ण करावं लागतं. तीन वर्षं फॉरेन लीजनमध्ये काम केल्यानंतर फ्रेंच नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. मात्र, युद्धात लढताना तुमचं रक्त सांडलं तर तीन वर्षं वाट पाहायला लागत नाही. ह्याला 'रक्त सांडून फ्रेंच होणं' (Français par le sang versé) म्हणतात.
'डिस्को बॉय' या चित्रपटात बेलारूसमधून आलेल्या आणि फ्रेंच फॉरेन लीजनद्वारे निजेरमध्ये तैनात झालेल्या अशा एका तरुणाची गोष्ट आहे.
आफ्रिकेच्या ह्या भागातला दहशतवाद आला कुठून? तर तो लिब्यामधल्या यादवी युद्धातून आला. म्हणजे गडाफीच्या मृत्यूची पार्श्वभूमी त्याला आहे. म्हणजेच २०११ पासून सुरू झालेल्या अरब स्प्रिंगच्या चौकटीत हे सगळं चालू झालं. जाता जाता हे सांगण्याचा उद्देश म्हणजे इथलं सगळं किती एकात एक गुंतलेलं आहे ह्याचा अंदाज येईल.
पुढचा प्रश्न म्हणजे जर इस्लामी दहशतवाद कायम आहे तर मग आता त्याच्याशी कोण लढतं? ह्याचं उत्तर आणखीच सुरस आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पुतिनविरोधात बंड केलं म्हणून (आणि नंतर संशयास्पद रीतीने मेल्यामुळे) येव्हगेनी प्रिगोझिन काही दिवसांपूर्वी बातम्यांचा विषय झाला होता. तो वाग्नर नावाच्या भाडोत्री सेनेचा प्रमुख होता. तर या वाग्नरसेनेचे सुमारे हजार सैनिक आता मालीमध्ये तैनात असावेत असा अंदाज आहे. मालीचं सरकार ते अधिकृतरीत्या सांगत नाही, पण 'ह्यूमन राईट्स वॉच' संस्थेनुसार तिथे मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे. (पक्षी : निष्पाप नागरिकांची हत्या; पुन्हा एकदा, प्रमाण छोटं असल्यामुळे अशा बातम्या प्रसारमाध्यमांत फारशा गाजवल्या जात नाहीत.) अर्थात, जेव्हा फ्रेंच सैन्य मालीत होतं तेव्हा त्यांनीही हे केलेलं आहेच. एका लग्नसोहळ्याला ते दहशतवाद्यांचा मेळावा समजले होते आणि १९ वऱ्हाडी त्यांनी ठार मारले होते. वाग्नरचे लोक सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, सुदान, लिब्या आणि बुर्किना फासोमध्येही आहेत.
आफ्रिकेचे 'तारणहार' असलेल्या रशियन सैनिकांचं हे स्मारक सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकची राजधानी बांगीमध्ये आहे. तिथल्या लोकांच्या मते (सध्या तरी) फ्रेंच किंवा यूएनच्या सैन्यापेक्षा रशियन जास्त कामाचे आहेत!
इथपर्यंत वाचल्यावर तुमच्या मनात जर असा विचार आला असेल की एक मुरलेला खेळाडू ह्या सगळ्यातून अद्याप गायब कसा काय आहे, तर तुमचा विचार अगदी अचूक आहे. चीनचा डोळा आफ्रिकेवर आहेच. निजेरमध्ये तेल आणि वायू प्रकल्पांत चीनने सुमारे साडेचार बिलियन डॉलर घातलेले आहेत. इतर आफ्रिकी देशांतही तेल, खाणी, शेतीव्यवसाय यांत चीनची मोठी गुंतवणूक आहे. चीनची राष्ट्रीय पेट्रोलियम कंपनी (CNPC) साहेल विभागात तेल आणि वायू क्षेत्रातली मोठी (कदाचित सर्वात मोठी) गुंतवणूकदार आहे. शिवाय, चीन इथल्या खाणींतून बाहेर पडणाऱ्या मालाचं (उदा. युरेनियम, सोनं, लोहखनिज, तांबं) मोठं गिऱ्हाईक आहे. ह्या भागांतल्या विविध देशांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांमध्ये चीन सहभागी आहे. बेल्ट अँड रोड उपक्रमाअंतर्गत चीन इथे अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांत सहभागी आहे. शेतीविषयक प्रकल्पांतही चीन पैसे घालत आहे. याशिवाय इथल्या देशांना चीनकडून शस्त्रं आणि इतर सैनिकी मदत मिळते. याविषयी गूगलवर शोधलं तर खूप तपशील सापडतील. उदाहरणादाखल हे पाहा.
थोडक्यात, आपल्या पूर्वाश्रमीच्या राज्यकर्त्यांनी सातत्यानं केलेले राडे पाहून इथली जनता त्यांना नाकारते आहे, आणि रशिया किंवा चीनवर भिस्त ठेवते आहे. याची परिणती लोकशाही मार्गानं निवडून आलेली सरकारं पडून मिलिटरीची सत्ता येण्यात होताना दिसतं. एकीकडे इस्लामी दहशतवाद आणि एकीकडे चीन-रशिया यांत सापडलेल्या ह्या भागाच्या भविष्यात काय लिहून ठेवलेलं आहे हे आता सांगणं कठीण आहे. आणखी काही तरी भयंंकर होणार आणि जग त्याकडे विशेष लक्ष देणार नाही अशी चिन्हं मात्र दिसत आहेत, कारण इतिहास तेच सांगतो.