शोध एकोणिसाव्या शतकातील एका महाराष्ट्रकन्येचा…
शोध एकोणिसाव्या शतकातील एका महाराष्ट्रकन्येचा
दिनांक २ जुलै २०२३ रोजी स्कॉटलंडच्या एडिंबरा शहराच्या मॉर्निंगसाइड ख्रिस्ती दफनभूमीत स्मृतिफलक अनावरणाचा एक लहानसा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे निमित्त होते ॲना लिट्लडेल नावाच्या एका स्त्रीच्या १३३व्या पुण्यस्मरणाचे. अर्थातच भारतात बंगाली वृत्तपत्र अमृतबझार पत्रिका आणि काही आंतरजालीय प्रकाशने वगळता या घटनेची कोणी फारशी नोंद घेतलेली दिसत नाही. 'दि स्कॉटिश सेंटर फॉर टागोर स्टडीज' या संस्थेने आयोजित कार्यक्रमासही उपस्थिती जेमतेम होती, यांमध्येही प्रामुख्याने भारतीय वंशाच्या (Indian diaspora) टागोरप्रेमी उपस्थितांची संख्या अधिक होती. या अनावरण झालेल्या स्मृतिफलकावरील मजकूर असा होता:
स्मृतिफलकात उल्लेख असलेल्या अन्नपूर्णा (ॲना) तर्खड-लिट्लडेल या महाराष्ट्र-कन्येचा नव्या पिढीला आणि विशेषतः तिच्या जन्मभू महाराष्ट्राला विसर पडला असला तरी वंग साहित्यरसिकांना ही व्यक्ती रविंद्रनाथ टागोर यांची तरुण मैत्रीण आणि त्यांच्या 'नलिनी' या काव्यरचनेमागील प्रेरणा म्हणून अजूनही परिचित आहे. या व्यक्तीविषयी मराठीत श्री. बा. जोशी, श्रीपाद जोशी, अरविंद गोखले, ह. वि. मोटे, सरोजिनी वैद्य, अरुण टीकेकर, कामिल पारखे यांसारखे काही अपवाद वगळता फारसे लिखाण उपलब्ध नाही. या महाराष्ट्र कन्येविषयी कुतूहल जागे झाल्याने काही शोधाशोध केली असता अनेक बाबी पुढे आल्या, त्या या लेखात मांडण्याचा एक लहानसा प्रयत्न येथे करतो आहे.
१९व्या शतकात मुंबई हे व्यापारउदिमाचे मोठे केंद्र असल्याने या शहराने अनेक मराठी कुटुंबांना उत्कर्षाच्या संधी दिल्या. यामध्ये वसईजवळील तरखड गावातून आलेल्या पांडुरंग यशवंत यांच्या कुटुंबाचाही समावेश होतो. स्मृतिफलकात उल्लेख आलेले ॲना लिट्लडेल उर्फ अन्नपूर्णा तर्खड यांचे वडील आत्माराम पांडुरंग तर्खड (१८२३- १८९८) उपाख्य डॉ. आत्माराम पांडुरंग हे आद्य मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे धाकटे भाऊ. १८४५ ह्या वर्षी मुंबई येथे नव्याने स्थापन झालेल्या ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी एक. याशिवाय ते परमहंस सभेच्या संस्थापकांपैकी एक होते. दादोबा पांडुरंग, राम बाळकृष्ण, रा. गो. भांडारकर इ. सहकाऱ्यांसह परमहंस सभा स्थापन करण्यात आत्माराम पांडुरंग ह्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तसेच प्रार्थना समाजाची स्थापना १८६७ ह्या वर्षी झाली तेव्हा आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य आणि पहिले अध्यक्ष होते. आत्माराम पांडुरंग हे मुंबई विद्यापीठाचे फेलो होते. त्यांनी मुंबईचे नगरपाल (शेरिफ) हे पदही भूषवले. महानगरपालिकेचे ते अनेक वर्षे सदस्य आणि मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्षही होते.
डॉ. आत्माराम पांडुरंग यांचे वडील बंधू भास्करराव आणि दादोबा पांडुरंग हेसुद्धा सुधारक विचारांचे होते. वडिलांनंतर भास्करराव कुटुंबप्रमुख झाले. त्या वेळी त्यांनी घरातील गणपती उत्सवास कायमचा फाटा दिला. आपल्या मातुश्रीचे वर्षश्राद्धही जुन्या पद्धतीप्रमाणे त्यांनी केले नाही. भाऊ महाजन, बाळकृष्ण नवरंगे व रावबहादूर रामचंद्र बाळकृष्ण या समविचारी सुधारकांशी डॉ. आत्माराम यांचा अकृत्रिम स्नेह होता. डॉ. आत्माराम हे सुधारक विचारांचे, विशेषतः स्त्री-शिक्षणाविषयी आग्रही व अग्रणी होते असे त्यांच्या वैयक्तिक व्यवहारातून दिसते. प्रार्थना समाजाची स्थापना होण्यापूर्वी १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम यांच्या घरी एक सभा झाली. जातिभेद निवारणाच्या भूमिकेमुळे काहीसे गुप्तपणे काम करणारी घेणारी परमहंस सभा काहीशी अडचणीत आली होती. डॉ. आत्माराम यांची घरी झालेल्या सभेत असे ठरले की, या पुढे जातिभेद, बालविवाह, विधवाविवाह, अशासारख्या सामाजिक गोष्टीवर भर न देता परमार्थ साधनेकडे लक्ष पुरवावे.
डॉ. आत्माराम यांचा स्वतःचा विवाह वयाच्या १४व्या वर्षी झाला, त्या वेळी त्यांच्या पत्नीचे वय अवघे सहा वर्षांचे होते, स्वतः एक डॉक्टर असल्याने त्यांचे बालविवाहविषयक विचार अधिक स्पष्ट आणि विज्ञानाधारित होते, ते एके ठिकाणी म्हणतात : "Puberty is not the best criterion of proper marriageable age, for it is not the period at which development of the parts concerned in gestation and delivery is completed, nor is then the mind well adapted for the requirements of the mother in taking proper care of her delicate and tender off-spring." बालविवाह या देशहितविघातक रूढीचा प्रवेश त्यांनी आपल्या कुटुंबात मुळीच होऊ दिला नाही असे त्यांच्या स्वतःच्या व्यवहारात तरी दिसते. आपल्या तिन्ही मुलींना त्यांनी बरेच दिवसपर्यंत शिक्षणासाठी मिसेस मिचेल नावाच्या बाईकडे ठेवले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध त्यांच्या ज्ञातीत बराच गवगवा झाला, लोक त्यांना नाही नाही ती दूषणे देऊ लागले. घरातूनही त्रास होत असे. पण आपले कर्तव्य करीत असता होणारा त्रास शांतपणे सहन करणे हेसुद्धा आपले कर्तव्य आहे असे त्यांस वाटत असल्यामुळे त्यांनी लोकांच्या टीकेकडे बिलकुल लक्ष न देता आपला निश्चय ढळू दिला नाही. त्या काळी पारशी मुलींप्रमाणे हिंदू मुलींना चांगले इंग्रजी शिक्षण मिळावे असे त्यांना वाटे. त्यांनी स्वतःच्या तिन्ही मुलींचे (दुर्गाबाई, ॲनाबाई व माणकबाई) तसेच त्यांचे मित्र रावबहादूर रामचंद्र बाळकृष्ण जयकर (१८२६-१८६६) यांच्या मुलींचे (चंपूबाई व सोनाबाई) नव्याने सुरू झालेल्या माणेकजी कर्सेटजी यांच्या अलेक्झांड्रा शाळेत नाव घातले.
श्री जोशी यांनी १९६१ साली कु. बेहेरोज कर्सेटजी यांची भेट घेऊन यांच्या शाळेसंबंधीच्या जुन्या कागदपत्रांचा व छायाचित्रांचा संग्रहातून तसेच मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात उपलब्ध शाळेच्या अहवालावरून, प्रथम वर्षीच्या सर्व मुलींची माहिती तपासली. त्यात त्यांना वरील पाच मुलींशिवाय मनुबाई हरिचंद व नथूबाई सदाशिव हरिचंद या इतर दोन हिंदू मुलीही त्या वर्षी (१८६३) हजेरीपटावर असल्याचे आढळले. या कागदपत्रांतील नोंदीनुसार ॲनाबाईचे वय ८ वर्षे आहे यावरून तिचे जन्म वर्ष १८५५ असावे असा कयास जोशींनी केला आहे. या अहवालांत ॲनाला मिळालेल्या बक्षिसांचाही उल्लेख आहे. शाळेतील तिची हजेरी सविस्तर दिलेली असून त्यावरून ती इतर मुलींच्या मानाने अतिशय दक्षतेने उपस्थित राहत असल्याचे जोशी यांना आढळले. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी मेरी कार्पेंटर या शिक्षणक्षेत्रातील विदुषींची परळ येथील गव्हर्नर बंगल्यात सहकुटुंब भेट घेऊन आपल्या कुटुंबाशी त्यांचा परिचय करून दिला. या भेटीचा वृत्तांत मेरी कार्पेंटर यांनी त्यांच्या रोजनिशीत दिला आहे:
"A pleasant surprise awaited us on our return. Dr. A. P. (Atamaram Pandurang), the Hindoo gentleman who had conducted his wife to call on me the preceding day, now brought his three young daughters, and those of his deceased friend, Ramchunder Balchrishna, to the Government bungalow to see me. They had been educated in the Alexandra School for young Parsee ladies, which had been founded chiefly through the exertions of Mr. Manockjee Cursetjee, and in which it is attempted to give a good English education to the pupils. These young ladies did great credit to the institution. They were dressed simply and nearly in the English style, and their manners were unaffected and easy. Though they had received only two years' instruction, they were able to speak English fluently, and to enjoy seeing strangers and hearing of distant England".
डॉ. आत्माराम पांडुरंग हे आपल्या मुलांना आधुनिक पाश्चात्त्य शिक्षण देऊन थांबले नाही त्यांनी आपल्या मुलांना परदेशी उच्च शिक्षणासाठीही पाठवले. त्यांच्या कमाईचा बराचसा भाग मुलांच्या शिक्षणासाठींच खर्च झाला. त्यांचा ज्येष्ठ पुत्र मोरेश्वर याला त्यांनी कर्सनदास मुळजी यांच्यासोबत मार्च १८६३ मध्ये इंग्लंडला पाठवल्याची नोंद कर्सनदास यांच्या 'इंग्लंडचा प्रवास' या १८६७ साली प्रसिद्ध झालेल्या प्रवासवर्णनात येतो. त्यांचे दुसरे चिरंजीव डॉ आनंदराव विलायतेतून एम्. बी. ची पदवी घेऊन आले. धाकटे चिरंजीव डॉ. ज्ञानेश्वर एडिंबरा विद्यापीठातून १८९२ साली उत्तीर्ण झाल्याची बातमी लान्सेट या वैद्यकीय नियतकालिकाच्या १८९२ वर्षीच्या अंकात येते. या तिघांखेरीज ॲनाही इंग्लंड येथे शिक्षणासाठी गेली होती याचा उल्लेख अनेक ठिकाणी मिळतो, मात्र त्या कुठे, कधी आणि काय शिकण्यासाठी गेल्या होत्या याविषयी अजून उलगडा झाला नाही. कै. ताराबाई तर्खड या आत्माराम पांडुरंग यांच्या स्नुषा आणि धाकटे पुत्र सुरेंद्रनाथ यांच्या पत्नी (या दोहोंची कन्या म्हणजे प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कै. नलिनी तर्खड). १९६१ मध्ये श्री. बा. जोशी यांनी ताराबाई यांना त्या पंढरपूर येथील वृद्धाश्रमात वृद्धापकाळ कंठत असताना पत्र लिहून ॲनाविषयीची हकीकत विचारली. यावर ताराबाई यांच्या आठवणीप्रमाणे त्यांनी ॲनाबाई कर्सनदास मुळजी यांच्यासोबत इंग्लंड येथे गेली होती असे कळवले. मात्र कर्सनदास यांनी त्यांच्या वृत्तांतात १८६३मध्ये सोबत मोरेश्वर आत्माराम (ॲनाचे बंधु), रावबहादूर रामचंद्र बाळकृष्ण, वासुदेव बाबाजी नवरंगे (दोघेही डॉ. आत्माराम पांडुरंग यांचे स्नेही आणि प्रार्थना समाजाशी निगडित व्यक्ती) व इतर काही नावे दिली आहेत. त्यात ॲनाचे नाव मात्र यात दिसत नाही यावरून ताराबाई यांच्या विधानाची पुष्टी होत नाही.
रविंद्रनाथ टागोर यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आपल्या कविता आणि निबंधांद्वारे वंग साहित्य जगतात मोठे नाव कमावले होते. यापूर्वीच त्यांच्या बंधूंनी 'भारती' नावाच्या नियतकालिकाची सुरुवात केली होती आणि रविंद्रनाथांचा या नियतकालिकाच्या संपादक मंडळात सक्रिय सहभाग होता. याच वर्षी सत्येंद्रनाथ यांनी रविंद्रनाथांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यापूर्वी त्यांचे परिचित डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या कांदेवाडी (गिरगाव) येथील घरी वास्तव्यास पाठवले (ऑगस्ट-सप्टेंबर १८७८). सत्येंद्रनाथ यांच्या मुंबई येथील वास्तव्यात त्यांचा तर्खड यांच्याशी परिचय झाला असावा. सत्येंद्रनाथ यांचा यामागील उद्देश रविंद्रनाथांना इंग्रजीचा सराव व्हावा जो त्यांना परदेशात व्यवहारासाठी आणि पुढील शिक्षणात उपयुक्त ठरेल हा होता. तरुण रविंद्रनाथांचे इंग्रजी सुधारण्याची जवाबदारी साहजिकच ॲना यांच्याकडे देण्यात आली. तत्कालीन बंगालमधील श्रीमंत घराण्यातील स्त्रियांना पुरुषांविषयी संकोच असे, याविरुद्ध तर्खडांच्या घरातील मोकळ्या वातावरणाने आणि विशेषतः डॉ. तर्खड यांची कन्या अन्नपूर्णा (ॲना) हिच्या सहवासाने रविंद्रनाथांचा बुजरेपणा गेला. ॲना रविंद्रनाथ यांच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी वडील, पाश्चात्त्य रीतिरिवाज / शिष्टाचार (customs, manners and etiquettes) यांच्याशी शालेय काळापासून परिचित आणि काही काळ इंग्लंड येथे शिक्षणासाठी व्यतीत केलेली होती. ॲनाला मराठी, इंग्रजी खेरीज फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज या युरोपियन भाषाही अवगत होत्या. कदाचित, साहित्य, काव्य आणि संगीतातील रुची हा समान धागा ॲनाची रविंद्रनाथांशी घट्ट मैत्री होण्यास कारणीभूत असावा. रविंद्रनाथांनी आपल्या या बुद्धिमान, चतुर, धीट, कलासंपन्न मैत्रिणीला 'नलिनी' हे नाव दिले. त्यांच्या कित्येक कवितांमध्ये नलिनी उमलत राहिली, आयुष्याच्या अखेरपर्यंत टागोर नलिनीला म्हणजेच ॲनाला आपली कविताप्रेरणा म्हणून आठवत राहिले. रविंद्रनाथांच्या तर्खड कुटुंबातील वास्तव्यादरम्यानच्या ॲनासोबतच्या त्यांच्या अविस्मरणीय आठवणी यांचा संबंध साहित्य अभ्यासक 'फुलेर ध्यान', 'अप्सराप्रेम', 'प्रभाती', 'दामिनीर आँखि' यांसारख्या कवितांमध्ये, 'छेलेबेला' या आत्मवृत्तात व 'नलिनी' (१८८४) या नाटकाशी जोडतात. रविंद्रनाथ यांच्या प्रभावाने ॲना बंगाली शिकल्या, असा वंग साहित्य अभ्यासकांचा दावा आहे. वास्तविक पाहता रविंद्रनाथ यांनी ॲनावर लिहिलेल्या कविता त्यांनी तिला आधीच अनुवादित करून दिल्या. याशिवाय 'भारती'चे काही अंकही भेट दिले. रविंद्रनाथांचा 'कबिकाहिनी' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यावर त्याची एक प्रत रविंद्रनाथांनी ज्योतिरिन्द्रनाथांमार्फत ॲना यांना पाठवली. या पुस्तकाची पोच म्हणून ॲनाने पाठवलेले पत्र 'शनीबारेर चिठी'च्या एका अंकात छापले आहे या प्रसिद्ध पत्राचा मूळ इंग्रजी मजकूर असा आहे :
वास्तविक पाहता आजवर ॲनावर केलेले लेखन हे रविंद्रनाथांना केंद्रस्थानी आणि मुख्यतः उपलब्ध वंग साहित्य, लेख यांवर आधारित असेच दिसते. रविंद्रनाथ आणि ॲना यांच्याविषयी भरपूर लेखन झाले आहे, मराठीत अरविंद गोखले यांनी मराठीत 'ॲना' (१९८३) ही लहानशी नाट्यछटा लिहिली आहे. याच कथेवर आजवर एखादा सिनेमा का निघाला नाही याचे नवल वाटते. किंबहुना या विषयावर 'नलिनी' नावाच्या मराठी-इंग्रजी-बंगाली अशा त्रैभाषिक सिनेमाचे चित्रीकरण निर्माती प्रियांका चोप्राने कोव्हीडपूर्वीच सुरू केले होते, यात मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीला ॲनाची भूमिका देण्यात आली होती. विश्वभारती या संस्थेने ऐन वेळेला काही परवानग्या नाकारल्यावर सिनेमाचे चित्रीकरण थांबले आणि हा सिनेमा अद्यापही प्रदर्शित झाला नाही.
रविंद्रनाथ ॲनाकडे आकर्षित झाले यात शंका नाही, मात्र 'रविंद्रनाथांचा ॲनावर तितका प्रभाव पडला का?' याचे निर्णायक उत्तर मिळत नाही, पण रविंद्रनाथ-केंद्रीय लिखाणामुळे, रविंद्रनाथांच्या जगड्व्याळ प्रभावामुळे आणि ॲनाच्या उत्तर आयुष्याविषयी (विशेषतः तिच्या विवाहानंतर) रंजकता न आढळल्याने या विषयाचा शोध घेण्याबद्दल संशोधकांत फारशी उत्सुकता दिसत नाही.
डॉ. आत्माराम यांचे वास्तव्य १८७९च्या मार्च महिन्यात (कन्या सौ. दुर्गा तर्खड-वासलेकर आणि ॲना यांसोबत) कलकत्त्याच्या श्री मनमोहन घोष यांच्या घरी होते. तेथे ते अनेक मेजवान्यांना, व्याख्यानांना आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित होते. याच दरम्यान आल्बर्ट हॉल येथील एका कार्यक्रमात (९ मार्च) त्यांचा परिचय डॉ. महेंद्रलाल सरकार यांच्याशी झाला. डॉ. सरकार हे व्यवसायाने एक प्रतिष्ठित डॉक्टर, कलकत्ता विद्यापीठाचे फेलो, ऑनररी मॅजिस्ट्रेट, कलकत्त्याचे नगरपाल (Sheriff) होते. नंतर आणखी काही भेटीगाठींनी तर्खड आणि सरकार कुटुंबात स्नेहाचे संबंध निर्माण झाले. डॉ. सरकार आणि त्यांच्या पत्नीने ॲना आणि दुर्गा यांना आपली मानस-कन्या मानले.
डॉ. सरकार यांच्या खाजगी रोजनिशीचा काही भाग कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीने प्रसिद्ध केला आहे. यातील काही नोंदींत ॲनाच्या पत्रांतील मजकूर सारांशरूपाने उपलब्ध आहे. ॲनाची पत्रे सुंदर, आशयपूर्ण असत असे मत डॉ. सरकार नोंदवतात. एका पत्रात (दि. १ जून १८७९) ॲना मुंबई येथील एका बाल-जरठ विवाहाविषयी लिहिते "एका ९ वर्षांच्या बालिकेचा एका ५० वर्षाच्या म्हाताऱ्याशी विवाह म्हणजे त्या बालिकेचा बळी देण्याइतकेच निर्घृण आहे." एका पत्रात ॲना डॉ. सरकार यांना प्रार्थना सभेत झालेले शिवनाथशास्त्री यांचे व्याख्यान, त्यांची इंग्रजी आणि त्यांचे विचार तिला आवडले नाहीत अशी कबुली देते (दि. ११ सप्टेंबर १८७९). ॲना डॉ. सरकार यांच्या पत्नीला (म्हणजे स्वतःच्या मानलेल्या आईला) लिहिलेल्या घरगुती पत्रात "तुम्ही पाठवलेले मासे, हे पत्र लिहीत असेपर्यंतही पोहोचले नाही" अशी लाडीक तक्रार करते (दि. २१ जुलै १८७९). ॲना ही स्वतःविषयी इतरांचे मत सकारात्मक असावे, ते कायम राहावे याबाबत अभिज्ञ आणि दक्ष असे, यासाठी ती सतत धडपड करत असे तिच्या पत्रांतून अनेकदा प्रतीत होते.
२६ ऑक्टोबर १८७९च्या पत्रात ॲनाने डॉ. सरकार यांना एक आश्चर्यकारक बातमी दिली : इंग्लंड येथे असताना तिचे हॅरोल्ड लिट्लडेल (Harold Littledale, जन्म ०३ ऑक्टोबर १८५३) या डब्लिन येथील एका सॉलिसिटरच्या घरी जन्मलेल्या तरूणावर प्रेम होते. आता बडोदा येथे नव्याने स्थापन झालेल्या नव्या कॉलेजात त्याला उप-प्राचार्यापदी (Vice-Principal) नियुक्ती मिळाली आहे आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. ॲनाने पुढील पत्रात (६ नोव्हेंबर) लग्नाची तारीख ११ नोव्हेंबर ठरल्याचे कळवले. विवाहाच्या दिवशी डॉ. सरकार यांनी वधू-वरास अभिनंदनाची तार केली यावर ॲना आणि हॅरोल्ड यांनी त्यांना आभारदर्शक पत्र पाठवले. यात हॅरोल्ड म्हणतो, "मला ॲनाने तुमच्याबद्दल अनेकदा सांगितले आणि पूर्वी लिहिले आहे, त्यामुळे मीसुद्धा तुम्हाला माझ्या प्रेमळ वडिलांच्या स्थानी बघतो आहे". इंग्लंड येथून परत आल्यावर ॲना पत्रव्यवहाराद्वारे हॅरोल्डसोबत संपर्कात असावी, तिने डॉ. सरकार यांचे आभार मानताना 'तुम्ही पाठवलेले डेव्हिड हेअर यांच्या ३७व्या पुण्यतिथीचे माहितीपत्रक मी माझ्या इंग्लंडमधील साहित्यिक मित्राला पाठवले आहे" असे कळते. अर्थात हा मित्र हॅरोल्डच असावा. इंग्लंडमधील वास्तव्याबद्दल काही पुसटश्या खुणा सापडतात. ॲनाच्या मृत्युलेखात (obituary) तिचा आणि हॅरोल्डचा परिचय आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे झाला असा उल्लेख येतो. याच काळात ॲना डब्लिन येथे असावी, कारण तिचे वडील बंधू मोरेश्वर हेसुद्धा डब्लिन येथे होते आणि १८८६मध्ये ब्रिस्टल येथील 'अर्नोस वेल सेमिटरी' (The Arnos Vale cemetery) येथील नोंदीप्रमाणे (guest-book) ॲनाने आपल्या वडील बंधूंसह या सेमिटरीला भेट दिली होती, कदाचित येथील राजा राम मोहन रॉय यांच्या समाधीला भेट देण्यास ही भावंडे आली असावीत. मोरेश्वर यांचा विवाह २८ मार्च १८७८ रोजी ॲलिस (Alice Mylene Ackroyd) या आयरिश तरुणीशी झाला. याच काळात (१८७६) हॅरोल्ड लिट्लडेल हा तरुण तेथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये कलेचा पदवी अभ्यासक्रम संपवून सिनियर मॉडरेटर म्हणून शेक्सपियरच्या साहित्यकृतींचा अभ्यास करत होता. तेथेच त्याची आणि ॲनाची गाठ पडली असावी.
डॉ. आत्माराम यांच्या सुधारक विचारांमुळे मुंबईतील कर्मठ मंडळीत त्यांच्याविषयी कमालीची असूया आणि अज्ञान होते. याचा प्रत्यय डॉ. सरकार यांना भेटायला आलेल्या मुंबईकडील दोन ब्राह्मणांशी झालेल्या भेटीत दिसतो, या ब्राह्मणांशी बोलत असताना डॉ. आत्माराम यांचा विषय निघाला असता त्या ब्राह्मणांनी विधान केले की: "डॉ. आत्माराम यांची स्वतःची अशी जात नाही, ते निराळ्या आई-वडिलांच्या पोटी जन्मले, मात्र आता ते मुंबईतील एक सर्वात प्रतिष्ठित म्हणून उदयास आले आहेत." डॉ. आत्माराम यांना आपल्या कन्येचा एका परदेशी व्यक्तीशी जातिबाह्य विवाह करवून देताना आप्तेष्टांसह अनेकांची रुष्टता ओढवून घ्यावी लागली याची कल्पना येते.
या अभूतपूर्व विवाहाची नोंद मॉर्निंग पोस्ट (लंडन, ०९.०२.१८७९), द सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट (लाहोर, १७.११.१८७९ व १७.११.१८७९), द होमवर्ड मेल (लंडन, ०६.१२.१८७९), इंग्लिश मेन्स ओव्हरलँड मेल (बंगाल, २१.११.१८७९) यांसारख्या व इतरही अनेक नियतकालिकांच्या वृत्तांतात आली आहे. प्रार्थना समाजाच्या १६ नोव्हेंबर १८७९च्या सुबोधपत्रिकेत ॲनाच्या मि. हॅरोल्ड लिट्लडेल यांच्याशी विवाहाची नोंद आढळते: "डॉ. आत्माराम पांडुरंग यांची द्वितीय कन्या ॲनाबाई यांचा विवाह मागील मंगळवारी मि. हारल्ड लिटलडेल याजबरोबर झाला. वधूवरांनी केवळ कायद्याप्रमाणे रजिस्ट्राराकडे जाऊन आपला विवाह रजिष्टर करविला, धर्मसंबंधी कांही विधि केला नाही. याप्रमाणे विवाह झाल्यावर वधूवरांस भेटण्यासाठी म्हणून आत्मारामजी याणीं आपल्या स्नेही मंडळींस पाचारण केलें होतें. त्याप्रमाणे हिंदु आणि पार्शी गृहस्थ व कुल स्त्रिया त्यांच्या घरीं जमल्या होत्या. त्यांचें यथायोग्य आगतस्वागत होऊन जातांना सर्वांस तुरे वाटले. ॲनाबाई वयाने सुमारे तेवीस वर्षांच्या असून इंग्रजीत मोठ्या हुषार व चाणाक्ष आहेत. त्या येथील अलेक्झांड्रा शाळेंत शिकलेल्या असून दोनतीन वर्षांपूर्वी विलायतेस गेल्या होत्या. मि. लिटलडेल यांचें वय सुमारे पंचवीस-तीस वर्षांचें असावें. यांणी नुकतेच विलायतेहून येथून बडोदें येथील कॉलेजाचे वैस-प्रिन्सिपालच्या (Vice-Principal) जागेचा चार्ज घेतला. हे जन्मतः ख्रिस्ती आहेत. तथापि यांचीं मतें व विचार बहुत अंशी विशाल आहेत आणि यापुढे हाच आपला देश असें मानून वर्तन करण्याचा यांचा मानस आहे असें समजतें. आमच्या इकडे हिंदु संभावित स्त्रीचा आणि इंग्रज गृहस्थाचा विवाहसंबंध झाल्याचें हेंच प्रथम उदाहरण होय. याच बाईच्या वडील बंधूने युरोपियन स्त्रीबरोबर लग्न केलें हें पुष्कळांस माहीत असेलच. असले संबंध हिंदु आणि युरोपियन ह्या दोन लोकांमध्ये स्नेहभाव वृद्धिंगत करण्यास यत्किंचित् साधनभूत होतील तर आम्हांस आनंद होईल".
या अपूर्व विवाहसोहळ्यास उपस्थित मुंबईतील प्रतिष्ठित मंडळींची यादीही आपल्याला या वृत्तपत्रांत पुढीलप्रमाणे आढळते: श्री व कु. माणेकजी कर्सेटजी, (सर्वश्री व सपत्नीक) फेरोझशाह मेहता, बोमनजी कर्सेटजी, भांडुपवाला, जहांगीर माणेकजी कर्सेटजी, बी. एम. वागळे, एस. पी. पंडित, मोरोबा विनोबा, भागवत, कीर्तिकर, चित्तर, भांडारे (सर्वश्री) विनायक वासुदेव, गणपत भास्कर, मुहम्मद अली रोगे, रघुनाथ एन. खोटे, काशिनाथ टी तेलंग, कृष्णाजी लक्ष्मण, हरिचंद सदाशिव, बाळाजी पांडुरंग, एस. एस. बंगाली, कैखुसरू काबराजी, दादोबा पांडुरंग, ठाकूरदास आत्माराम, लक्ष्मीदास खिमजी आणि स्थानिक समाजातील इतर प्रतिष्ठित मंडळी. आधीच नमूद केल्याप्रमाणे सोहळा कोणत्याही धार्मिक विधींशिवाय झाला, कुलाबा येथील सिव्हिल रजिस्ट्रारच्या बंगल्यात, वधू-वरांनी आपापल्या नावांपुढे सह्या केल्या आणि यानंतर इतर कायदेशीर सोपस्कार पार पाडले. वधू-वर आणि उपस्थित मंडळी डॉ. आत्माराम यांच्या घरी परतली, येथे अनेक मित्रमंडळी आली होती, अल्पोपहारानंतर आलेली पाहुणेमंडळी पांगली आणि वधू-वर रात्रीच्या मेलने खंडाळा येथे मधुचंद्रासाठी रवाना झाले.
तिथे आठवडा घालवल्यावर ते पुन्हा बडोदा येथे परतले. तेथे एका व्याख्यानात बडोद्याचे दिवाण सर टी. माधवराव यांनी लिट्लडेल यांची भरभरून स्तुती केल्याचेही दिसते. पुढे अनेक वर्षे लिट्लडेल दंपतीचा मुक्काम बडोदा येथे होता. २८ नोव्हेंबर १८८२ रोजी मिशन चर्च गिरगाव येथे ॲनाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. या दाम्पत्याला ॲना नेलीन लिट्लडेल (Ana Nelline Littledale, १८८०-१९०८), ॲना ओल्गा लिट्लडेल (Ana Olga Littledale, १८८४-१९८२) या दोन मुली आणि हॅरोल्ड आयल्मर लिट्लडेल (Harold Aylmar Littledale, १८८५-१९५७) हा मुलगा झाला, यांच्या जन्माच्या नोंदी वर्तमानपत्रात आलेल्या दिसतात. बडोदा येथे ॲनाची काही काळ महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या चिमणाबाई साहेब (पहिल्या) या तरुण राणीच्या गव्हर्नेसपदी नेमणूक होती त्यादरम्यान तिने राणीसोबत नवसारी येथे सहा आठवडे घालवले होते.
राणी चिमणाबाई यांच्या निधनानंतर (१८८५) ॲनाने काही काळाने बडोदे सोडले असावे. मुलाच्या जन्मानंतर काही काळानंतर ॲनाचे हॅरोल्डसोबत वैवाहिक आयुष्य फारसे बरे राहिले नसावे. नॅशनल इंडियन असोसिएशनच्या हैद्राबाद शाखेने नवाब इमादुल-मुल्क यांच्या प्रेरणेने मुस्लिम मुलींसाठी स्थापन केलेल्या जनाना स्कूलच्या मुख्याधापकपदी ॲनाची नेमणूक केली. या दरम्यान ॲनाचा निवास सिकंदराबादजवळच्या चिल्कलगुडा येथील एका बंगलीत असे. ॲनाने स्वतः:ला शाळेच्या कामात गुंतवून घेतले, तिने आपल्या चातुर्याने आणि कार्यकुशलतेने विद्यार्थीनींमध्ये प्रिय शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळवला. येथे काम करत असताना ॲनाने पंडिता रमाबाईंसोबत देशातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. या वास्तव्यात ॲनाने भारतीय जीवनावर आधारित एका कादंबरीचे लिखाण सुरू केले; मात्र तिचा हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नसावा. साधारणतः मृत्यूच्या आधी दोन वर्षांपूर्वी (१८८८-८९?) ॲनाच्या बग्गीला (carriage) भयंकर अपघात झाला, या अपघातात तिला गंभीर दुखापती झाल्या, यानंतर आजारपणामुळे तिने मुख्याधापकपदाचा राजीनामा दिला आणि मुंबईला परत आली. पुढे मुंबईहून ती एडिंबरा येथे गेली असताना अपघाताच्या जुन्या दुखण्याने उचल खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला असे तिच्या शोक-लेखात (obituary) छापून आले होते.
याच शोक-लेखातील ॲनाविषयीच्या अनेक आठवणी दिसतात : ती उत्तम पियानोवादन करीत असे, तिचा आवाजही सुमधुर आणि कमावलेला होता. तिचा देखणेपणा, चातुर्य, आकर्षकता हे गुण तिच्या हैद्राबाद येथील सामाजिक वर्तुळांत उठून दिसत. तिने स्वतःला इंग्रजी रितीरिवाजात आणि जीवनशैलीत ढाळले होते. भाषेवरील प्रभुत्व, शब्दचित्र रेखाटण्याची अपूर्व कला आणि संभाषणचातुर्य यामुळे ती मित्रमंडळीत प्रिय होती. ॲनाने १३-१४व्या वर्षी आपल्या परदेशी शिकणाऱ्या वडील बंधूस लिहिलेली पत्रे फारच बोलकी आहेत. तिने केलेल्या जर्मन कवींच्या रचनांची भाषांतरे स्थानिक वृत्तपत्रांत कायम प्रसिद्ध होत, ही तिच्या जर्मन भाषेवरील प्रभुत्वाची साक्ष आहे.
भारतीय समाजावरील तिचा एक लेख 'स्पेक्टेटर' या लंडन येथून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकात आला होता. हा लेख वाचकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिला. याची पार्श्वभूमी अशी, 'स्पेक्टेटर'च्या २२ ऑक्टोबर १८८१च्या अंकात 'The mental seclusion of India' हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात "आता प्लासीच्या लढाईला १२४ वर्षे आणि असई येथील निर्णायक विजयास ७८ वर्षे झाली, आज १ लाख इंग्रज (यात सैनिक आणि अँग्लो-इंडियन मंडळीही आहेत) २५ कोटी (जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश) भारतीयांवर शासन करत आहेत, तरीही युरोपियनांना भारतीयांच्या मनाचा ठाव घेता येत नाही. अँग्लो-इंडियन मंडळी भारतीयांमध्ये लीलया वावरतात, त्यांची बोली भाषा बोलतात, त्यांच्याशी अनेक प्रकारचे व्यवहार करतात, त्यांना सल्ला आणि हुकूम देतात, अँग्लो-इंडियनांची घरे भारतीयांनी भरली आहेत. इतके सगळे असूनही या मंडळींना भारतीयांबद्दल काहीही माहिती नाही. कोणीही अँग्लो-इंडियन अधिकारी किंवा साहसी व्यक्तीने यांच्याविषयी काहीही लिहिलेले नाही. एकूणच या लेखाचा रोख अँग्लो-इंडियन मंडळी भारतीयांच्या आणि युरोपियन मंडळींमधील दुवा असली तरी त्यांनी कोणत्याही एका भागाच्या, वर्गातील भारतीयांच्या आंतरिक स्वभावाचा, त्यांच्या इच्छा, त्यांची उद्दिष्ट्ये याबाबत कोणतीही अनभिज्ञता दूर केलेली नाही" अशी खंत व्यक्त केली होती.
ॲना ही या अँग्लो-इंडियन मंडळींची एका अर्थाने प्रतिनिधी, तिने या लेखाला सडेतोड उत्तर दिले आहे. हे पत्र त्या नियतकालिकाच्या १७ डिसेंबर १८८१च्या अंकात प्रसिद्ध झाले. पुढे, 'जर्नल ऑफ् इण्डियन असोसिएशन' ह्या मासिकाच्या जानेवारी १८८२च्या अंकांत (अंक १३३) मेरी कॅथरीन होबर्ट ह्या बाईचा 'फिमेल एज्युकेशन इन मद्रास' हा लेख प्रकाशित झाला. त्या लेखाचा समारोप करताना होबर्टबाईनें प्रस्तुत पत्रव्यवहाराचा उल्लेख व उहापोह केला आहे. वाचकांच्या माहितीसाठी संपादकाने ॲनाचे हे समग्र पत्रच मासिकाच्या फेब्रुवारी १८८२च्या अंकांत (अंक १३४, पृ. १०५-०९) उद्धृत केले आहे. पत्र सादर करताना 'आमचे कांहीं वाचक पत्रलेखिकेस ओळखतीलच,' असे अर्थगर्भ उद्गार त्याने काढले आहेत. या लेखात ॲनाने 'Lotus Flower' (रविंद्रनाथांनी बहाल 'नलिनी' या नावाचे इंग्रजी भाषांतरित रूप) हे टोपणनाव (nom de plume) वापरले होते. देशाविषयीच्या गैरसमजांनी भरलेल्या, इंग्रजांच्या दुटप्पी धोरणांवर टीका करणाऱ्या पत्रातून ॲनाची बुद्धिमत्ता आणि निरीक्षण यांचे दर्शन घडते. 'स्पेक्टेटर'मधील ॲनाचा लेख आता प्रताधिकारमुक्त आहे, तो येथे उद्धृत करण्याचा मोह टाळता येत नाही.
LETTERS TO THE EDITOR
THE MENTAL SECULSION OF INDIA
(TO THE EDITOR OF THE "SPECTATOR")
Sir, - Will you kindly allow me, though quite ignorant of the art of writing to the papers, to make a few remarks upon your interesting article on the above subject which appeared in the Spectator of October 22nd?
I am only a Hindu girl (though my husband may, I think, be classed among your "few cultivated Europeans who ever lived happily with a native wife"), and I fear that you will think that my "mental seclusion" has not allowed me to give you a very clear view of my opinions on the subject; but such as they are, I offer them for your consideration.
The question is, -Why do Europeans fail to see through the Indian mind, why cannot they solve its "elements of the unknown or the capricious?" In the first place, I think that there are Europeans who, in their limited circles of Indian friends, have penetrated this veil of reserve; but India is too big a place for such men to generalise about "the natives" as though they were homogenous from Peshawar to Cape Comorin, and men do not often care to write books about their immediate circles of friends merely. Leaving such Europeans out of the question, you must make allowance for the abysmal ignorance of India and things Indian in the English mind "at home". Most Europeans are full-grown before they think of coming to India at all; there is little practical recognition (there is plenty of talk) of the moral responsibility of England to attain to some serious knowledge of her great dependency.
Next, looking at the mass of Europeans in this country, and their social relations to the native, what do we see? Speaking as a native, I can say generally that natives regard Europeans with a sort of respectful awe. They can be and are free-spoken among them- selves in fact, they pride themselves upon not being "burdened with social conventionalities like the Europeans but they never dream of being as free in their intercourse with those people as among themselves.Our friend Vishnupant, for instance, may hold as high a position (financially) as Mr. Brown, but Vishnupant would never think of taking any liberties with the latter, or of laughing and talking as freely with him as he would unhesitatingly do with his subordinate clerk, Govindrao. Europeans, he would say, if asked, "are not of us-how do you expect them to understand us?" Even the children know that a Saheb is a different sort of being than a native. If a Saheb comes to see their father, the children are told to be "chup" ("shut up"). "A Saheb has come, take care!" they are told, and so a fear of such people is instilled from infancy, which fear gradually develops into a sort of respectful awe as the child grows into the man.
You say, truly, that the natives are shy of speaking of their thoughts or feelings; but what encouragement have they had from Europeans for them to be otherwise? As an illustration, let me speak of a considerable class, the so-called "reformers", or adaptive natives, men and women, who are ready enough to accept such crumbs as they are offered of Western habits and Western thought. Brown Saheb may call on Vishnupant, but is Brown Madam Saheb with him when he calls? Of course, Mrs. Brown will say that Vishnupant's wife cannot speak English, and she cannot speak Marathi; granted, but even if Vishnupant, like many another Hindu gentleman of modern days, has had his wife taught English, would Mrs. Brown care to make her acquaintance? Except, perhaps, in very few cases she would not; "for", she would say, "what is the use of calling on a native lady?" Mrs. Vishnupant and she could not have much in common; they could not converse upon any practical topic, they could not invite each other to tennis or dinner. Mrs. Vishnupant's cocoa-nut-oily baby would make Mrs. Brown shudder; there would be no necessity for calling. And poor little Mrs. Vishnupant, on her part, would not see the necessity of knowing English, and would wonder why her husband had made her learn the language; and Mrs. Brown's formality (if she did call) would strike a worse chill into the poor little impulsive heart, and make her more shy and reticent, make her hide herself more within herself than ever. One must be educated to a certain degree to have any opinions on any subject.How can Indian women, child-wives as they often are, talk about politics or science, or fashion, or domestic economy, or "going home", or even "men" or the price of beef as English-women do? Very few of them read newspapers, still fewer understand them. Poor souls! Their conversation is but simple and homely, - of Yamuna's coming marriage, of the expenditure of the house, of children and the round of common duties; and even then no opinions are given, such as "I think it right" that such and such a thing should be done, but all facts are given simply and plainly without the Ego being once visible. And their hands are full of work, not elegant trifling with crewel or crochet, but hard domestic drudgery. They have no idle time to "kill" with light amusements.
Very few Europeans care enough for Indians to be anxious to know anything about their inner lives. They "live on the spot with them and work with them," because they have to do so, but as for genuine affection. and uncondescending friendship, I doubt whether there much of either. A few European ladies may, perhaps, take a sort of patronising interest in women like Vishnupant's wife, but would they ever unlock their hearts to such? Is it, then surprising that towards Europeans our minds are "kept in a casket", as you say? If the Anglo-Indians could like and mix with the Indians more, if they could shake off a little of that I am the salt of the earth air which is so infinitely amusing to the "quiet humerousness" which you have recognised in the Hindu, there would be some chance of opening the casket and revealing its contents; as things stand, it is unlikely that such an event should occur when there is so much of constraint on both sides. There is much in the Indian character which but few Europeans know; one main feature of it is its sensitiveness, intensely acute sensitiveness (a faculty closely allied to the humerousness you speak of), which makes us oftentimes fancy slight or redicule where neither slight nor ridicule is meant. Perhaps Vishnupant, being a "reformer", may wish his wife to go out with him, and will insist on her covering her pretty little bare feet with brand-new English boots; the poor wife, with true Indian-wifely obedience, would go out with him thus compositely attired; presently they come across Mrs. Brown with some English companions. Mrs. Brown, perhaps, thinks or even whispers, "what a guy!" and though Mrs. Vishnupant has not heard the whisper, she has read the look, and (we are all sensitive about our appearance when we've got new clothes on) will at once feel that she is being laughed at. Mrs. Brown had been fairly friendly to her Indian acquaintance when alone together; she may be a kind-hearted woman in her way, but, before other Europeans, the fear of ridicule over- powers her good intentions, and that feeling which in private betrayed her into an approach to cordiality, is in public chilled into the stiffest formality, if not shamed into actual rudeness. I have said that Europeans talk of "natives" as if they were of a single nation and a single type. The absurdity is so obvious, that one would hardly think it worth recurring to, if it were not so often committed. I am a Maratha, and can speak of my own people only; distinct as they are to me, to the English eye they come under the same broad classification which groups all Indian races and creed, more numerous and diverse than all the nationalities of Europe put together, under the one term "natives". And what natives does the average European see? His low-caste servants, or his official dependents? The former he loathes for their savageness and uncleanliness; the latter he despises for their obsequiousness and their indolence. Of true Indian life of the "homely joys and destiny obscure" of the million of non-official natives, he knows, as you say, next to nothing. And so long as he thinks or lets the natives fancy that he thinks-that he is condescending in his attempt to pluck out the heart of their mystery, he will fail; the mild Hindu will not wear his heart upon his sleeve, for even Sahebs to pluck at.
I have spoken somewhat of myself already, and I will be so egotistic as to say a word more. I have lived as a native, with native ways, and I live among Europeans and in their ways. I do not feel now that my being a native makes the least difference in the way in which I am treated; I have many dearly-loved English friends, even in India, but this has not been my experience from the first. Some years ago, long before I married, I used to feel myself an alien from everyone. English ways were less known then than now among my countrywomen, and they neither understood me nor sympathised with me. Still more was I alien to English- men, because there was no feeling of equality to be got from them, and I did not want patronage. I used to long and long for a friend in those days!
You will consider this very one-sided, but you will, I think, welcome even an ex-parte statement on the native side, though only from a woman's pen. I am quite aware that the natives are at fault, being so sensitive (the conquered are ever so, and magnanimity is not an Anglo-Indian virtue); the caste system imposes many restrictions justly repugnant to English notions of social intercourse; and the subjection of women, the result of child-marriages, retards progress towards a better state of things. But still I say if England wishes to understand India, England must begin. "Peace has her victories", and these have yet to be won. - I am, Sir,&c.,
India, November 22nd, 1881.
LOTUS-FLOWER
एडिंबरा येथील भारतीय समुदायाचा Indians in Edinburgh या प्रकल्पाद्वारे अभ्यास करणारे एडिंबरा विद्यापीठातील संशोधकद्वयी – हॉक विईब (Hauke Wiebe) आणि रॉजर जेफ्री (Roger Jeffery) यांनी त्यांच्या नव्या संशोधनाद्वारे ॲनाच्या मृत्यूपूर्वीच्या काही काळापूर्वीच्या आयुष्यातील घटनांचा परामर्श घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम येथील दोन भिन्न संस्कृती जेव्हा एकमेकांना छेदतात त्यावेळी अशा विस्मयकारक घटना घडतात. डॉ ज्ञानेश्वर या ॲनाच्या धाकट्या भावाने वैद्यकीय शिक्षणासाठी एडिंबरा विद्यापीठात प्रवेश घेतला (१३ सप्टेंबर १८९०) आणि त्याचे वास्तव्य पुढील काही वर्षे याच शहरात होते. ॲना एडिंबरा येथे असता, तिचा परिचय हेन्री फेन-डालरिम्पल सेव्हेल (१८६२-१९४४, Henry Fane-Dalrymple Sewell) या कवीशी झाला, ६ जून १८९१ रोजी डेन्झिल (Denzil) या हेन्रीच्या मुलाला जन्म दिल्यावर ६ दिवसांनी ॲनाचा अतिथकव्याने आणि सेप्टीसिमियाने (बॅक्टेरीयामुळे रक्त विषबाधित होण्याचा विकार) मृत्यू झाला. ॲनाच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाला एका दाईकडे सांभाळण्यास देण्यात आले, मात्र या बाळाचा ०२ नोव्हेंबर १८९१ रोजी मृत्यू झाला आणि त्याला ॲनाच्या शवपेटिकेजवळ मॉर्निंगसाईड ख्रिस्ती दफन-भूमीत (प्लॉट क्र. एम ३१६) पुरण्यात आले. काही काळानंतर याच जागेतील काही नव्या दफनांमुळे ॲना आणि तिच्या बाळाच्या कबरीवरील नावांचे स्मृतिलेखाचे दगड (Epitaph) काढून नवे दगड बसवण्यात आले, या सर्व बदलांमुळे आज ॲनाच्या कबरीचा पत्ताही लागत नाही.
ॲनाच्या मृत्यूनंतर हॅरोल्ड याने सिबील फ्रान्सिस हॅनबरी (Sybil Frances Hanbury) हिच्याशी विवाह केला आणि त्यांना पाच अपत्ये झाली. हॅरोल्ड १८८९मध्ये बडोदा येथून सेवानिवृत्ती घेऊन इंग्लंड येथे परत आला, त्याने कार्डिफ विद्यापीठात इंग्रजी भाषा आणि साहित्य या विषयाच्या प्राध्यापकपदी काम केले. पुढे त्याला डब्लिन विद्यापीठाने 'डी लिट' ही सन्माननीय पदवी बहाल केली, ११ मे १९३० साली वयाच्या ७६व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. ॲनाच्या मुलींचे विवाह इंग्रज तरुणांशी झाले, यापैकी ओल्गा १९६१पर्यंत ताराबाई तर्खड यांच्या संपर्कात होती, ती कॅनडा येथे स्थायिक झाली. नेलीनचा विवाह कार्डिफ येथे झाला, ती पुढे अमेरिकेत स्थाईक झाली. ॲनाचा मुलगा हॅरोल्ड आयल्मर लिट्लडेलने अमेरिकेला प्रयाण केले व पत्रकारितेच्या व्यवसायात नाव कमावले. अमेरिकन तुरुंगातील दुरावस्था आणि व्यथा यांना त्याने वाचा फोडली. त्याने स्वतः गुप्तपणे (under cover) न्यू जर्सी येथील तुरुंगात प्रवेश मिळवला आणि तेथील तत्कालीन परिस्थिती मध्ययुगीन तुरुंगाइतकीच भयानक आहे हे आपल्या लेखमालेद्वारे जगापुढे आणले. या कार्यासाठी त्याला १९१८साली सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठी पुलित्झर पारितोषिक मिळाले. या लेखांनी मोठा गहजब उडाला आणि अमेरिकन सरकारला तुरुंगविषयक धोरणात बदल व अनेक सुधारणा कराव्या लागल्या. त्याने पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात सैनिकी सेवा देत असताना, बेल्जियम आणि फ्रान्स येथे युद्धात सक्रिय भाग घेतला. त्याचे न्यूयॉर्क इव्हिनिंग मेल आणि न्यूयॉर्क टाइम्समधील अनेक वृत्तपत्रीय लेख उपलब्ध आहेत. याची मुले आणि नातवंडे अमेरिकेत स्थायिक झाली, आयल्मरचा पणतू विल्यम इयान (William Ian) याची पत्नी सिंथियाकडे वंशपरंपरेने आलेली ॲनाच्या वापरातील सोन्याची साखळी आणि सोन्याचे पदक आजही आहे.
अन्नपूर्णा तर्खड उपाख्य ॲना लिट्लडेल ही काही विशिष्ट नैसर्गिक गुणांनी संपन्न अशी होती. बुद्धी आणि रूप ह्यांच्या सौंदर्याबरोबरच तिला अप्रतिम भावसौंदर्याची देणगीही लाभलेली होती. साहित्य, संगीत व वादनकला ह्यांत तिने आश्चर्यकारक नैपुण्य मिळविलेले होते. तिचे वागणे व बोलणे इतके मोहक असे की, तिच्या सहवासात एखादी व्यक्ती अल्पक्षण का आलेली असेना, ती आल्हादून जाई, वेधली जाई. ॲनाने 'नलिनी'रूपाने रवींद्रनाथांच्या भावविश्वात एक गौरवपूर्ण विशिष्ट स्थान मिळविले होते. "चारुता आणि आल्हादकता ह्यांचें सुंदर संमिश्रण तिच्या स्वभावांत झालेले आढळे. तिचें वर्णन जर एकाच शब्दांत करायचे झाले तर तें 'आल्हादिका' ह्या शब्दांत सार्थ करता येईल"असे सार्थ उद्गार रवींद्रनाथांनी तिच्याबाबत काढले होते. या महाराष्ट्रकन्येच्या आयुष्याविषयी पुढील काळात नवी साधने, तिचे विस्मृतीत गेलेले लेखन समोर यावे आणि 'रविंद्रनाथांची मराठी मैत्रीण,' 'परदेशात शिकण्यासाठी गेलेली पहिली मराठी स्त्री' या तिच्या लोकप्रिय ओळखीच्या पलीकडे आपल्याला तिची नव्याने ओळख होवो. ॲनाच्या मृत्युलेखात प्रसिद्ध झालेली तिच्यावरील 'Nymph of Chilkalguda' ही कविता फार समर्पक आहे:
"How sweetly sounds the voice of a good woman;
It is so seldom heard, that when it speaks
It ravishes all senses."
"By foreign hands her dying eyes were clos'd,
By foreign hands her decent limbs compos'd,
By foreign hands her humble grave adorn'd,
By strangers honour'd and by strangers mourned."
आभार: लेखास उपयुक्त संदर्भ मिळवून देण्यासाठी माझे मित्र (सर्वश्री) आदित्य पानसे (आदुबाळ), चिन्मय दामले आणि अजिंक्य पवार यांचे आभार. मनोहर मासिकात प्रसिद्ध ॲना व हॅरोल्ड यांचे छायाचित्र किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांच्या सौजन्याने (द्वारा श्री चिन्मय दामले).
लेखात वापरलेली मराठी / इंग्रजी/ बंगाली साधने:
वैद्य, द्वारकानाथ गोविंद (१९२७) 'प्रार्थना समाजाचा इतिहास', मुंबई: प्रार्थना समाज. पृ. ३-२१.
जोशी, श्री. बा. (१९६१) 'तरुण टागोरांची महाराष्ट्रीय मैत्रीण', मनोहर, मे-१९६१.
जोशी, श्री. बा. (१९६१) 'टागोरांची मैत्रीण', मनोहर, ऑगस्ट-१९६१. पृ. ३१-३५.
मोटे, ह. वि (१९७२) 'विश्रब्ध शारदा', भाग १, मुंबई: ह. वि मोटे प्रकाशन. पृ. १२५-१३७.
जोशी, श्रीपाद (१९६१) 'रविंद्रनाथ आणि महाराष्ट्र' पुणे: जोशी आणि लोखंडे प्रकाशन. पृ. ९.
गोखले, अरविंद (१९८३) 'समांतर', पुणे: पुणे साहित्य वितरण. पृ. १३९.
टिकेकर, अरुण (२००१) 'कलामीमांसा – प्रबोधन पर्वातील सामाजिक बदलांची दशा आणि दिशा', पुणे: श्रीविद्या प्रकाशन, पृ. २५ व ५४.
पारखे, कामिल (२०००) 'महाराष्ट्र चरित्रकोश, इस १८०० ते २०००', पुणे: सुनिती पब्लिकेशन्स, पृ.७.
वैद्य, सरोजिनी (१९८५) 'संक्रमण', पुणे: श्रीविद्या प्रकाशन. पृ.१४.
शनिबारेर चिठी (बंगाली), भाग ३०, अंक १-६ (१९५७), कोलकाता: मनोरंजन प्रेस, पृ. ५६६-५७०.
Carpenter, Mary (1868) 'Six months in India,' Vol. 1, London: Longmans Green and Co. p. 22.
Pal, Pratapaditya (2011) 'Something old, something new: Rabindranath Tagore, 150th birth anniversary volume,' Mumbai: Marg Publication. pp. 16-17,82,88-95.
लेखात वापरलेली समकालीन वृत्तपत्रीय साधने:
Civil & Military Gazette, Wednesday 17 November 1879, Lahore edition, p.4.
Civil & Military Gazette, Wednesday 19 November 1879, Lahore edition, p.6.
Englishman's Overland Mail, Friday 21 November 1879, West Bengal edition, p.9.
Homeward Mail from India, China and the East, Saturday 06 December 1879, London edition, p. 12.
Homeward Mail from India, China and the East, Wednesday 19 May 1880, London edition, p. 2.
Indian Daily News, Wednesday 05 May 1880, West Bengal edition, p.28.
Madras Weekly Mail, Thursday 30 July 1891, Madras (Chennai) edition, p. 13.
The Pioneer, Friday 7 May 1880, Calcutta edition, p. 5.
उपयुक्त दृक-श्राव्य स्वरूपातील साधने:
'दि स्कॉटिश सेंटर फॉर टागोर स्टडीज' या संस्थेने दिनांक २ जुलै २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमाची चित्रफीत – https://www.youtube.com/watch?v=-ra3VsvAAHE
रविंद्रनाथ टागोर यांची 'नलिनी, खोलो गो आखि' कविता, स्वर: चिन्मय चट्टोपाध्याय (१९७०) – https://www.youtube.com/watch?v=A1RtW2YNbuo
अन्नपूर्णा/ॲना यांचे वडील डॉ. आत्माराम पांडुरंग (१८२३-१८९८).
ॲनाची शाळा – अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन, मुंबई (१८९०)
डॉ. महेंद्रलाल सरकार (०२.११.१८३३ - २३/०२/१९०४)
डॉ. महेंद्रलाल सरकार यांच्या डायरीतील कु. ॲना तर्खड या मानसकन्येचा उल्लेख.
ॲना तर्खड आणि हॅरोल्ड लिट्लडेल यांच्या (दि. ११ नोव्हेंबर १८७९) विवाहाची Journal of the National Indian Associationच्या जानेवारी १८८०च्या अंकात आलेली बातमी.
ॲनाचे एक छायाचित्र, यात आणि मनोहर मासिकात प्रसिद्ध छायाचित्रात कमालीचे साम्य आहे.
प्रसिद्ध संशोधक प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी तर्खड कुटुंबांकडून मिळवलेले ॲना व हॅरोल्ड यांचे छायाचित्र (किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांच्या सौजन्याने).
एडिंबरा शहरातील अन्नपूर्णा तर्खड / ॲना लिट्लडेलचे (१८९१) शेवटचे निवासस्थान (साभार: Google Maps).
अन्नपूर्णा तर्खड/ ॲना लिट्लडेलची वंशवेल (genealogy)
प्रतिक्रिया
अप्रतिम लेख
तुमच्या रिसर्च ला सलाम
जिग सॉ पझलचे तुकडे, आणि तेही
जिग सॉ पझलचे तुकडे, आणि तेही गावोगाव रानोमाळ विखुरलेले. ते एकत्र आणून एक चित्र जुळवण्याचा प्रयत्न रोचक आणि उत्तम.
ॲनाच्या मृत्यूनंतर हॅरोल्डने अन्य कोणाशी लग्न केले आणि अनेक अपत्ये झाली, आणि ते निवृत्त होऊन ज्या वर्षी बडोद्याहून इंग्लंडला स्थायिक झाले त्या वर्षाच्या नंतर ॲनाचा मृत्यू नोंदवलेला दिसतो. एका ठिकाणी बग्गी अपघातातून झालेल्या दुखपतीशी संबंधित कारण दोन वर्षानंतर पुन्हा उद्भवले असे उल्लेखिले आहे आणि अन्यत्र कोणाच्या तरी मुलास जन्म दिल्यावर सेप्टिसेमिया किंवा तत्सम कारणाने मृत्यू नोंदविला आहे.
पण त्यांच्या आयुष्याचा त्या काळातला एकूण प्रवास रोचक आहे.
सुंदर लेख
खूप आवडला. इतका सहज लिहिलाय की त्यामागे किती संशोधन करावं लागलं असेल याची लगेच कल्पना येत नाही.
"नेलीन" हे मुलीचं नावही "नलिनी"वरून दिलं असावं, नाही?
धन्यवाद !
या लेखाचे स्वरूप अकादमीक लेखापेक्षा वेगळे ठेवावे असे ठरवून त्यात तळटीपा देण्याचा मोह टाळला, त्यामुळे त्याचा रटाळपणा वाढला असता. माझ्याकडील मूळ प्रतीत मात्र मी तळटिपा, संदर्भ ठेवले आहेत.
नलिनी या नावाचं नेलिन या नावाशी कमालीचं साम्य आहे, नेलिन असं प्रचलित आंग्ल नाव आहे का मला अंदाज नाही, मात्र वंग संशोधक नेलिन आणि नलिनी या नावाचा संबंध जोडतात. आत्माराम पांडुरंग यांच्या धाकट्या मुलाच्या (सुरेंद्रनाथ) मुलीचे नाव मात्र त्यांनी 'नलिनी' (प्रसिध्द सिनेअभिनेत्री) ठेवलं होतं. हा केवळ योगायोग नसावा.
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ज्ञानेश्वरी, १-६४॥
[लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो].