पीळ
anant_yaatree
कवितेच्या काही ओळी
काल सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या
यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग
मात्रा, वृत्तांची बंधने
पाळताना दमछाक-
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक
मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली
खळखळा तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
लघु, गुरू, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती
वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण का
पीळ जळता जळेना ? :)
.
मस्त जमली आहे. पण ‘दमछाक’ ऐवजी ‘दमणूक’ टाकली तर ‘झुळूक’शी यमक जास्त चांगलं जुळेल.
---