"पीनट बटरच्या वड्या" - थंडीतल्या दिवसातलं पौष्टीक माकडखाणं !
वाटीभर खोबऱ्याचे तुकडे (जमतील तितके एकसारख्या आकाराचे केलेले) मंद आचेवर असे भाजून घ्या.
--------------
त्याच खोलगट तव्यात, जरा अजून मंद आचेवर वाटीभर तीळ भाजून घ्या.
----------------
खोबरं /तीळ बाजूला ठेउन, आच परत थोडी वाढवून, दिड-दोन वाट्या गूळ वितळवून घ्या. (या वेळचा गूळ अगदीच पंडूरोगी होता त्याकडे लक्ष नका देउ!)
--------------------
गूळ सगळा वितळला की त्यात चिमटीभर मीठ आणि दोन चमचे तूप घालून सारखं करून घ्या. आच परत कमी करा.
-----------------------------
मग लगेच त्यात दोन वाट्या क्रंची पीनट बटर घालून सगळं असं एकजीव करून घ्या.
---------------------------------------
त्यावर भाजलेलं खोबरं आणि तीळ घालून पटकन ढवळून घ्या आणि ........
--------------------------------------------
........ लगेच चौकोनी / गोल भांड्यात (तुपाचा हात लावलेल्या) काढून घ्या.
----------------------------------------------------
जरा गार झालं की वड्या पाडा. आता खरी कसोटी - तासभर थांबायला हवंय मटकवण्याआधी
-------------------------------------------------------------
एकच वडी खाऊन थांबता आलं तर तुम्ही जिव्हेवर ताबा मिळवलेली विभूती आहा - तुम्ही वड्या कराल तेव्हा प्लीज मला जरूर बोलवा
------------------------------------------------------------------------
प्रमाण थोडं पुढे-मागे झालं तरी चलता है. हवं तर मिश्रण काढण्याआधी अर्धा चमचा / आवडीनुसार वेलचीची पूड घाला. पण वेलचीशिवायसुद्धा एकदा करून पहा - भाजलेल्या पदार्थांचा अंगभूत स्वाद सुरेख असतो.
प्रतिक्रिया
पाककृती छान!
मला ऐसीवर असे फटाफट फोटो टाकता येत नाहीत. पण फोटो टाकल्याने पाककृती वाचायला फारच सोपी होते. तीळ, खोबरं शेंगदाणे एकत्र आल्यावर काहीच वाईट लागणार नाही. मुलाच्या शाळेत केक चालत नाही पण लाडू चालतात! दोन्हींचे जिन्नस (पीठ, तूप, साखर) साधारण सारखेच आहेत. उलट केकमध्ये अंडी असतात त्यामुळे केक जरा जास्त पौष्टिक आहे. ही पाककृती, एखाद्या जागरूक मातेला प्रोटीन, कोकोनट बाईट्स अशी खपवता येईल.
Alternatively, इथे गूळ वेगळा वितळवून घेतला आहे त्याऐवजी गूळपावडर आणि शेंगदाण्याचे पिनट बटर घरीच करता येईल. भाजलेले शेंगदाणे कुटाच्या पुढे नेऊन मिक्सरमध्ये फिरवले की त्यांचं बटर होतं. त्यातच गूळ घातला तर एकजीव व्हायला मदत होईल. मी असं करून बघते वेळ मिळाला की.
.
...
सध्या मला गोड पदार्थ वर्ज्य
सध्या मला गोड पदार्थ वर्ज्य आहेत त्यामूळे ही पाककृती करून बघता येणार नाही.
ता.क. -- पीनट बटर ऐवजी दाण्याचा कूट आणि किसलेले खोबरे घालून छानसा तीळगूळच केला तर? गूळ मात्र चांगला पिवळाधमक आणि जरा मऊसर पाहिजे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
शेंगदाण्या ची चिक्की म्हणा ना राव
मराठी भाषे च वापर करण्यात कसली लाज वाटत आहे.
.अभिमान ठेवा .
आपल्या भाषेचा.
आपल्या देशाचा.
आपल्या संस्कृतीचा.
उगाचच शेंगदाणा ल्या peanut म्हणायची गरज नाही
...
ठीक. मग पीनट बटरला काय म्हणावे? शेंगदाण्याचे लोणी?
आणि, मुळात शेंगदाणाच जेथे आपल्याकडचा नव्हे, तेथे तो वापरताना लाज वाटावयास हवी काय?
शेंगदाण्याच्या चिक्कीत नि यात फरक असावा
शेंगदाण्याच्या चिक्कीत नि यात थोडा फरक असावा. (कन्सिस्टन्सी?)
(दुसरे म्हणजे, आमच्या येथेही (अमेरिकेत, आणि विशेषेकरून जॉर्जिया राज्यात) पीनट ब्रिटल नावाचा तत्त्वत: चिक्कीसारखाच परंतु काहीसा ओबडधोबड असा एक पारंपरिक पदार्थ मिळतो.)
(घाबरू नका. पीनट ब्रिटलवर पेटंट/जीआय वगैरे आणून मगनलालवाल्यांच्या पोटावर पाय देण्याचा अमेरिकेचा काही इरादा असल्याचे तूर्तास तरी ऐकलेले नाही.)
ठीक. मग पीनट बटरला काय
ठीक. मग पीनट बटरला काय म्हणावे? शेंगदाण्याचे लोणी?
मला वाटतं, शेंगदाण्याचा गूळ म्हणावं.
आणि इथवर आलोच आहोत तर 'जेली'/जॅम ला काय म्हणायचं तेही ठरवू.
म्हणजे पीबीजे सँडविचला शेंगदाण्याच्या गुळाचे आणि मुरंब्याचे सँडविच म्हणता येईल. सँडविचलाही मराठी प्रतिशब्द लागेल. फारच त्रासदायक आहे हे! त्यापेक्षा मराठीतून सांगता येईल असं अन्न ग्रहण करणं सोपं आहे.
कुटाणा
कुटाणा
(यावरून आठवले…)
यावरून आठवले. मी आठवीत की नववीत असताना आमच्या एका मास्तरांनी वर्गात एक काहीसा अश्लील विनोद सांगितला होता. (वैधानिक इशारा: ४११०३०मधल्या फक्त मुलांच्या मराठी माध्यमाच्या शाळेतले मास्तर वर्गात आठवीनववीच्या पोरांपुढे ज्या दर्जाचा विनोद सांगू शकतात, त्याच दर्जाचा विनोद आहे.)
तर होते असे, की एकदा एक गावाकडून आलेला फौजी भाई, आयुष्यात पहिल्यांदा सँडविच खातो. त्याला ते प्रचंड आवडते. पुढील खेपेस रेष्टॉरंटात एकटाच गेलेला असताना त्याला ते पुन्हा खाण्याची प्रबळ इच्छा होते, परंतु, ऑर्डर करतेवेळी, या पदार्थाला काय म्हणतात, ते नाव त्याला काही केल्या आठवत नाही.
मग, अशा परिस्थितीत, तो पुढीलप्रमाणे ऑर्डर देतो:
“अरे भाई, वो जो दो पाव के बीच में होता है ना, वो लेके आओ.”
(स्पष्टीकरण तथा विवेचन: येथे पाव/पाँववर श्लेष आहे. आता, वस्तुतः, पाँव म्हणजे पावले; पाय नव्हेत. परंतु, सांगणारे मास्तर आणि ऐकणारी पोरे हे दोन्ही पक्ष ४११०३०मधली मराठमोळी मंडळी असल्याकारणाने (आणि, दोघांचीही हिंदीची तथा अकलेची पातळी तेवढीच असल्याकारणाने), चालून जाते.)
——————————
(Well, you didn’t exactly ask for it, nor did you exactly have it coming, but, I gave it, anyways. So, thank me!)
.
LOL!
विनोद पुणे ३० मध्ये जमणाऱ्या कोणत्याही "सॉसेजफेस्ट"ला साजेसा आहे. पण कदाचित त्याला खरंच सॉसेज हवं असेल. कदाचित तो लो कार्ब डाएट करत असेल!
आमच्या कोएड शाळेत मात्र पाव या शब्दावरून मुलं (कदाचित फक्त मुलींनाच) फारच निरागस विनोद सांगत असत.
१
एक मुलगा रोज बेकरीत फाटकी पिशवी घेऊन जात असतो. एक दिवस त्याची आजी त्याला पिशवी शिवून देते. मग तो परत येताना कोणतं गाणं म्हणेल?
उत्तर: आज कल पाव जमीं पर नहीं पड़ते मेरे.
२
एका मुलाच्या मास्तरांचं नाव 'इश्क की छांव' असतं (this is terribly contrived, I know). तो एकदा वडापाव मागवतो तर त्याच्या पावात त्याला स्वर्ग दिसतो? असं का?
उत्तर: जिन के सर हो इश्क की छांव पाव के नीचे जन्नत होगी!
(छैया छैया या गाण्यात अशी ओळ आहे)
तुम्ही आधी तुमचा आयडी
तुम्ही आधी तुमचा आयडी देवनागरीत लिहायला घ्या बघू!
-अनामिक
न वी बाजु
जास्त मागे गेलात तर धूमकेतू पर्यंत जावं लागेल ज्यांनी सजीव सृष्टी चे बीज ब्रह्मांड मध्ये वितरित केले.
शेंगदाणा हजार किंवा दहा हजार वर्षापूर्वी कुठे होता हे कोणाला माहित नाही.
त्या भागाचे नव त्या वेळेस काय होते हे पण माहीत नाही..
आज भारतात peanut ल शेंगदाणा , भुईमूग किंवा मुंगफली च म्हणतात .
.. peanut नाही
.
शेंगदाणा अमेरिका खंडातला. कोलंबसानंतर, बहुधा स्पॅनिश लोकांबरोबर युरोपात पोहोचला, आणि तेथून युरोपियनांबरोबर (बहुधा पोर्तुगीजांबरोबर) हिंदुस्थानात पोहोचला.
(अवांतर: शेंगदाणा आमच्या जॉर्जिया राज्याच्या मुख्य पिकांपैकी एक. आजदेखील ग्रामीण जॉर्जियात गेलात, तर घराच्या अंगणात किंवा रस्त्याच्या कडेला लोक टेबले टाकून मिठाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगा विकायला बसलेले आढळतात. परंतु ते असो.)
शेंगदाण्यांना मराठीत शेंगदाणा किंवा भुईमूग असेच म्हणावे, पीनट म्हणू नये, हे अगदी मान्य.
मात्र, या पाककृतीत शेंगदाण्यांचा उल्लेख नसून, पीनट बटर या (शेंगदाण्यांपासून बनलेल्या) पदार्थाचा आहे, ज्याला (तूर्तास तरी) मराठी प्रतिशब्द उपलब्ध नाही.
तर मग पीनट बटरला मराठीत काय म्हणावे? शेंगदाण्याचे लोणी?
शेंगदाण्याची पेस्ट आहे
बटर आणि लोणी ह्या शब्दांचा काही संबंध नाही.
मार्केटिंग कंपन्यांना त्रिवार सलाम आहे.
शिक्षित,अशिक्षित, बुध्दीमान,अडाणी लोकांना ह्या कंपन्या सहज मूर्ख बनवतात.
नॉन alcoholic beer ,whisky निर्माण करून ते लोकांना मूर्ख बनवून विकण्याची कर्तबगारी करतात.
दारू निर्माण करणारे हेच महाभाग असतात
न वी बाजु
ह्या गोष्टी तुम्ही खूप हल्क्यात घेत आहात.आपल्याला विषयाचे गांभीर्य नाही.
हळदी चे औषधी उपयोग हे भारतात हजारो वर्ष पासून केले जात होते त्याच्या वर पण विदेशी देशांनी हक्क सांगितला भांडून भारतातला त्याचे पेटंट घ्यावे लागले.
बटाटा भारतीय नाही.
शेंगदाणा भारतीय नाही.
द्राक्ष भारतीय नाहीत.
कोणत्याच भाज्या ,फळ भारतीय नाहीत .
मग भारतीय उपखंड काय वाळवंट होता का?
आजच्या व्यापारी हक्काच्या काळात नको ते दावे केले जातात त्याला काही आधार नसतो.
शेंगदाणा भारतीय नाही हे एकदा मान्य केले की शेंगदाणा वर आधारित सर्व व्यापारी उपयोगा चे अधिकार चे पेटंट भारताला मिळत नाही.
तुम्ही का हो मग पेटंट हा शब्द
तुम्ही का हो मग पेटंट हा शब्द वापरता ? का फक्त पिनट बटर म्हणायला परवानगी नाही ?
क्षमस्व!
पदार्थ दिसायला चांगला दिसतोय, चवीलाही चांगला असायला हरकत नाही, परंतु, मला स्वत:ला पीनट बटर हा प्रकार आवडत (वा फारसा झेपत) नसल्याकारणाने, यावर अधिक भाष्य करण्यास असमर्थ आहे.
वेलचीच्या रम्य आठवणी आणि 'न'बांची कॉपी करण्याचा क्षीण प्रयत्न.
साखरेत मुंग्या झाल्यावर आई त्यात 'वेलची आहे', म्हणून खपवायची! थोडी अक्कल आल्यावर मी तिच्यासमोरच, स्वतःला मांसाहारी म्हणवून घ्यायचे. "आई मुंग्या खायला घालते", असंही पाहुण्यांना सांगून झालेलं होतं. सुदैवानं आईला विनोदबुद्धी होती. मग कधीमधी जगातला प्रथिनं आणि पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी किडे खाण्याची गरज आहे, अशा छापाची बातमी वाचून पुन्हा एकदा साखरेचा डबा उघडून बघितला. मुंग्या एकदाच लागल्या होत्या. पण माझी कायमची सोय झाली होती. कुणी सिनेमात 'किडे पडें तेरे' छापाची डायलॉकबाजी केली तरीही मला त्या साखरेतल्या मुंग्याच आठवायच्या.
अमेरिकेत घर विकत घेतल्यावर एकदा आधीच्या घरमालकांकडून वेलचीचा मोठ्ठा पुडा मिळाला. त्यांच्या मुलीनं तो विकत घेतला होता, पण दोन वेलच्यांपुढे त्यांचं काय करायचं हे न समजल्यामुळे तो यांच्या घरी आला होता. मग व्हॅलरीनं मला कधी तरी 'वेलचीचं काय करतेस तू' असं विचारलं. तिला पुरण म्हणजे काय हे सांगणं माझ्याच्यानं शक्य नव्हतं. मग "डाळीची गोड पाककृती" एवढं वर्णन केलं. मग तो मोठ्ठा पुडा घरी आला. ह्या थंडीत श्रीखंड केलं तेव्हा तो संपला. नेमकं श्रीखंड केलं तो दिवस होता, २१ जानेवारी. रविवार होता, मला वेळ होता. २२ जानेवारीनं आता २६ जानेवारीची जागा घेतलेली आहेच!
वेलचीची सालं माझ्याच्यानं टाकवेना. मग कधी भारतीय कॉफी केली की तीत वेलचीची सालं दडपून देते. बऱ्या अर्ध्यालाही सध्या ते चालतंय. अगदीच ते नको झालं तर सकाळी भिजवलेले ओट्स खाते, त्यात भुगा करून दडपून संपवेन. पण काही केल्या अन्न टाकायचं नाही, हे तत्त्व सुटत नाही. ह्यामुळे काल मी कडक टोफू आणि आव्होकाडो जेवले.
मलाही, 'न'बांसारखंच पीनट बटर आवडत नाही. त्यामुळे पाककृती फार तर बऱ्या अर्ध्याला सांगेन. तो माझ्याकडून हे काही बनवण्याची अपेक्षा धरेल, आणि ती त्याच्या तोंडाला पाणी पुसेन. तसंही सध्या घरात श्रीखंड आहे. तेव्हा बरंच बनवलं आणि एक डबा फ्रीजरमध्ये डकवला. शिवाय सध्या फार्मर्स मार्कटात गाजरं छान येत आहेत. त्यामुळे येत्या विकेण्डला बऱ्या अर्ध्याला हाताचा व्यायाम करायला लावून, गाजरं किसून घेईन. आणि मग गाजरहलवा. थोडा लगेच खायला; थोडा फ्रिजमध्ये आणि डबाभर गाजर हलवा फ्रीज करून ठेवेन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(अवांतर)
(‘मुक्तपीठा’तली) ‘चालणारी आमसुले’ आठवली. (दुवा देणे शक्य नाही; सबब, वाचली नसल्यास सोडून द्या.)
आमच्या (शुद्ध शाकाहारी) मातुःश्रींनी, “मुंग्या खाल्ल्या, तर पुढच्या जन्मी राजा व्हायला होते” अशी कायशीशी थियरी आम्हांस लहानपणी पढविली होती. त्यामुळे, मुंग्या खाणे हे शाकाहाराच्या दृष्टीने कोशर असावे, अशी अटकळ आहे.
असो चालायचेच.
लाईलाज को क्या इलाज
मुंग्या लागलेलं अन्न टाकण्याची पद्धत मराठी घरांमध्ये कुठून येणार? दूध, चहा वगैरे पेयं ढवळल्यावर चमचासुद्धा चाटल्याशिवाय घासायला न टाकणारे लोक आपण.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.