रावणाच्या लंकेत सोन्याच्या विटांचा निष्फळ शोध!

गतजन्मी श्रीलंकेत वकील म्हणून जन्माला आली होती, असं एका ज्योतिषाने सांगितल्यामुळे, माझ्या मैत्रिणीला तिथे जायचं होतं. सोन्याच्या विटा असलेली रावणाची लंका फार निसर्गरम्य आहे म्हणून मलाही जायचं होतच. आम्ही दोघींनी एका ग्रुपसोबत जायचं नक्की केलं. मदुराई, धनुष्कोडी, रामेश्वर, आणि नंतर फेरी बोटीनं जाफना इथे पोहोचून श्रीलंका टूर सुरू होणार होता. परंतु फेरी बोट रद्द झाल्याने मदुराई-चेन्नई उलट प्रवास करून तिथून विमानाने जाफना येथे जायचे ठरले. आम्ही काही सदस्य मदुराई-धनुषकोडी-रामेश्वर पाहून रात्री ट्रेनने चेन्नईला निघणार होतो. बाकी सदस्य पुण्या-मुंबईहून थेट चेन्नई विमानतळावर श्रीलंकेला जाण्याकरता भेटणार होते.

आमच्या ग्रुपचा वयोगट ८० ते ५८ असा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले तरुण सदस्य, 'रम्य ही स्वर्गाहूनी लंका' ग्रुपची प्रेरणा आहेत.

मी मदुराईला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर फुरसतीत भटकत होते. मैत्रीण वगळता मी एकाही सदस्याला ओळखत नव्हते. सकाळपासून बडोद्याहून मुंबईला आलेल्या ८० वर्षीय गुज्जू सदस्याला, विमानात जायच्या आधी भेटेन म्हणून मी संपर्कही केला नव्हता. ते अदानी लाउंजमध्ये माझी वाट बघत होते. वयोमानसुलभटेक्नोमंदत्वामुळे त्यांनी अख्ख्या ग्रुपला व्हिडिओ कॉल केला. व्हिडीओ कॉलची ॲलर्जी असल्यानं मी तो घेतला नाही. ग्रुपातले ४ मासे त्यांच्या गळाला लागले. त्यांनी मेसेज केला की, ही माझा फोन उचलत नाहीये. यथावकाश त्यांना फोन करून लाउंजमध्ये भेटले. ओसंडून वाहत असलेल्या लौंजात लोकं २ रुपयांत पोट फुटेस्तो खादडत बसले होते. मी गर्दीत वाट काढून कॉफी प्राशन केली. त्यांनी तिथे असलेल्या गुज्जू बांधवांशी माझी ओळख कलीग अशी करून दिली; त्यामुळं ते माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत होते. मग आम्ही मदुराई फ्लाईटच्या गेटकडे निघालो. गुज्जू भाईंनी व्हीलचेअर केली होती. तमे पण चालो ने व्हील चेअरमा, असा अजब आग्रह ते करू लागले. मी हसू कष्टानं आवरून सोबत पायी गेले. आम्ही गेटजवळ गप्पा मारत बसलो. मी स्वतंत्र तिकीट काढल्यानं विमानात या प्रशस्त देहाजवळ बसायची शक्यता नसेल म्हणून सुशेगाद होते. पण चमत्कारिक योगायोगानं विमानात नेमकी माझ्याजवळचीच सीट त्यांना मिळाली होती. संध्याकाळी मदुराई विमानतळावर उतरताना मी त्यांना म्हणाले, "इथे फार चालावं लागणार नाही, लहान विमानतळ आहे. व्हीलचेअर केली नाही तर चालेल का?" ते तयार झाले. आम्ही सामान घेऊन बाहेर आलो. आम्हांला घ्यायला संयोजक आले होते. ते दोघे जूने मित्र असल्याने गुज्जूभाई उत्तेजित होऊन चालतचालत गप्पा मारू लागले आणि बुदकन पडले. त्यांच्या चरबीच्या बरीच आत हाडं असल्याने मुकामार बसून थोडक्यात निभावलं. अन्यथा त्यांच्या ट्रिपचा तिथेच कपाळमोक्ष होण्याची दाट शक्यता होती. मदुराईला सकाळपासून पोहोचलेल्या सदस्यांना, मीनाक्षी मंदिरात प्रचंड गर्दीमुळे, तिथल्या टीव्हीवरच देवदर्शन घ्यावं लागलं होतं. आमचं विमान संध्याकाळी बरंच उशिरा पोचल्यानं आम्ही निमूटपणे हॉटेलकडे निघालो. मला धनुष्कोडीमध्ये जास्त रस असल्यानं फारसा फरक पडला नाही.

दुसऱ्या दिवशी धनुष्कोडी, रामेश्वर बघून रात्री १०:२०च्या ट्रेननं आम्ही चेन्नईला जाणार होतो. आमच्या बस ड्रायव्हरचं नाव सद्दाम हुसेन होतं. प्रवासात चहासाठी उतरलेल्या एका स्टॉपला, ५०% सेल असलेल्या दुकानातून महिलांनी खरेदी केली. तिथे बरणीत टी-शर्ट विकायला ठेवले होते. या आधी एका सहलीत कुठेतरी बरणीत चड्ड्या विकायला ठेवलेल्या पाहून भोवळ आली होती. प्रवासात चिंचोळ्या रस्त्यामुळे ट्रॅफिक जॅम झाल्यानं उशीर होऊ लागला. धनुष्कोडीला तुफान गर्दी होती. तिथं रामेश्वरमधल्या बेटाला जोडणारा समुद्रातला २.२ किमी लांबीचा पुल आणि रेल्वेलाईन अगदी प्रेक्षणीय आहेत. तिथे यथेच्छ लपाछपी खेळून अमृत महोत्सवी सदस्यांनी अनंतकाळ बहार उडवून दिली. एका निवृत्त सेनाधिकाऱ्याची पत्नी एकटीच आली होती. हरवलेले सदस्य सापडेपर्यंत उशीर होऊन रामेश्वरला दर्शन होणार नाही या शंकेनं, तिनं तुफान बडबड करून सगळ्यांच्या डोक्याची मंडई केली. रामसेतू असलेल्या ठिकाणी पवित्र स्नान करण्याचा सदस्यांचा उत्साह गर्दीनं मावळला आणि जेमतेम पाय ओले करून गुज्जू भाईसाठी मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटलीत पवित्र(!!) जल भरून आणलं. नंतर एकीनं ते चुकून पाणी समजून प्यायलं. नंतर रात्री तिच्या पोटात गडबड होऊ लागली.

आम्ही तिथून रामेश्वरला गेलो. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं घर बघितलं. चिंचोळा जिना, घरातली गर्दी आणि तिथल्याच दोन खोल्यांत दुकान पाहून तात्काळ बाहेर पडून मोकळा श्वास घेतला. देवळातली भयंकर गर्दी पाहून मी फक्त कळसाचं दर्शन घेतलं. गुज्जूभाई आणि एक गुज्जूबेनपण बाहेर थांबले होते. देवळाच्या बाहेर, नारळाच्या कोवळ्या बुंध्याच्या पातळ चकत्या, मसाला भुरभुरून विकत मिळाल्या. प्रथमच खाल्ल्या. छान चव होती. मंदिर परिसरात रिक्षाला बंदी असल्याने माझा सर्व वेळ या दोघांसाठी रिक्षा शोधून बसजवळ पोहोचवण्यात गेला. साडेचार वाजता आम्ही एकदाचे तिथून निघालो आणि साडेआठला सुखरूप मदुराईला पोहोचलो.

हॉटेलातून आमचं सामान घेऊन, आरामात जेवण करून निघेपर्यंत 'काळ आणि काम' सदस्यांच्या संथ वेगाशी कसे जुळतील याचं गणित मला सुटत नव्हतं. सव्वानऊ वाजता आम्ही जेवून निघालो आणि एका ट्राफिक जॅममध्ये फसलो. आता सर्वजण देवाला आळवू लागले. संयोजक शांतपणे प्लॅन बी ऐकवू लागले. सगळ्यांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले. काहीजण गुगलून ट्रेन उशिरा येते का तपासू लागले. नऊ मिनिटं उशीरा येणारी ट्रेन आशेचा हिरवा कंदील दाखवत होती. १०:१०ला स्टेशनवर पोहोचलो. त्यानंतर हमाल शोधून बसवर चढवलेलं सामान उतरवून घ्यायचा गोंधळ सुरू झाला. सेनापत्नी हमालाशी थेट मराठीत बोलू लागली, तिला दुसरीने खेचून बाजूला केले तेव्हा काळ फिदीफिदी हसत होता. भाई आणि बेनला विनोबा ट्रॅव्हल्सशिवाय (पायी चालणं) गत्यंतर नव्हतं. नशिबानं गाडी पहिल्याच प्लॅटफॉर्मवर होती. एसी टू टायरचे डबे एका टोकाला असल्यानं धावतपळत कसंबसं १०:२५ला तिथे पोचलो. आधीची गाडी उशिरा आल्यानं आम्हांला सहज गाडी मिळाली, साखळी ओढून गाडी थांबवायची संधी मात्र हुकली. सगळ्यांचं रुधिराभिसरण सामान्य होताच, गाडी लेट झाली तर विमानतळावर वेळेवर कसे पोहोचणार, याची चिंता फेर धरून नाचू लागली. सकाळी ठीक ७ वाजता चेन्नईला पोहोचलो. आता १०:२५ची जाफना फ्लाईट गाठायची होती. गुगलतज्ज्ञ सदस्यांनी एअरपोर्टपर्यंत मेट्रो शोधून निदान संभाव्य ट्रॅफिक जॅममधून सुटकेचा आशादायक मार्ग दाखवला. काळ अनंत आहे आणि आशा अमर!!

सात वाजता चेन्नईला उतरताच गुगलतज्ज्ञ सदस्यांनी त्वरित मेट्रो स्टेशनला जाऊन तिकिटं काढली. लिफ्ट आणि व्हीलचेअरचा शोध अजून चेन्नईला पोहोचला नव्हता. त्यामुळे गुज्जूभाईला सगळीकडे पायपीट आणि चढणं-उतरणं करावं लागलं. आमचे संयोजक आणि दोन कोटी रुपये टॅक्स भरणारे गुज्जूभाई, मेट्रोपर्यंत जाण्यासाठी हमालाशी २०० रुपयांकरता घासाघीस करत असताना, काळ आणि वेळ दोघेही गडबडा हसून लोळत होते. मेट्रो एकदा बदलून आम्ही अखेर पावणे नऊला टर्मिनलला पोहोचलो. छोटं विमान आणि कमी प्रवासी असल्यानं सगळं सुरळीत पार पडलं.

जाफना विमानतळ अगदी लहानसा आणि कामचलाऊ आहे. गडबडीत बोर्डिंग पास हरवल्याने माझ्या पासपोर्टचा फोटो काढल्यावर बॅग मला मिळाली. बाहेर येताच चकचकीत हिरवा निसर्ग, कडक ऊन आणि लहानशी गाडी आमची वाट बघत होते. त्यात बारा लोक सामानासकट मावणं अशक्य होते. तिथे पहिली ठिणगी पडली. संयोजकासोबत बरेच टूर केलेल्या ज्येष्ठ सदस्यानं हॉटेलपर्यंत कसेतरी येऊ, पण सबंध टूरसाठी दुसरी मोठी बस करा असं निक्षून सांगितलं. संयोजक आणि आमचा तामिळ गाईड जागेअभावी टॅक्सीने हॉटेलात पोचले.

बुद्ध

दुसऱ्या दिवशी मोठ्या काचांच्या प्रशस्त एसी बसमधून आमचा लंका टूर सुरू झाला. सबंध टूरमध्ये कुठेही व्हीलचेअरचा मागमूस नव्हता. सदस्य आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार शक्य तितके पर्यटन करत होते. बस प्रवासात सगळ्यांनी आणलेल्या विविध पदार्थांचं मनसोक्त सेवन सुरू होतं. सोबत आस्तिक-नास्तिक, इस्रायल-पॅलेस्टाईन, जर्मन-ज्यू, श्रीलंकन अर्थव्यवस्था, पुराणकथा इत्यादी विषयांवर चर्चा झडत होत्या. कोणाला रावणाचं मंदिर बघायचं होतं. त्यासाठी पिच्छा पुरवल्यावर कंटाळून गाईड म्हणाला, तो राजा होता, देव नाही. साऊथ इंडियन हिरोसारखं त्याचं मंदिर बांधलं नाही. आता मीच त्याचं देऊळ बांधतो, मग तुम्ही या. सेनापत्नीला सगळी मंदिरं बघायची होती. तिच्या सततच्या राम-सीता-हनुमानाच्या जयजयकारांनी सगळे वैतागून गेले होते. ती कुठेही जोरात टाळ्या वाजवून शांततेला सुरुंग लावत होती. त्याबद्दल २-३ सदस्यांनी हटकल्यानं त्याची वारंवारिता कमी झाली. लक्षवेधनासाठी मोठ्याने बालिश बोलणं, मूर्ख प्रश्न विचारणं, रांग मोडून मध्येच घुसणं, कुठेही भारतीय रुपये काढून देणं, असल्या चाळ्यांनी तिच्या बऱ्याच लोकांशी चकमकी झडू लागल्या. नंतर संतपदाला पोहोचलेले २ सदस्य वगळता सगळेजण तिला टाळू लागले. संयोजकाने २-३ वेळा तिची कानउघाडणी केली. आमचा गाईड आणि स्थानिक सोबती सिंहली भाषेत साईटसिईंगबद्दल अव्याहत बोलत होते. त्यातून बरेचदा काहीच निष्पन्न झालं नाही. या रस्त्यावर एक स्लीपिंग बुद्ध आहे असं तो सांगे. आम्ही उत्सुकतेनं उतरण्याच्या तयारीत असताना बुद्धाची झोपमोड न करता आम्ही कधीच पुढे गेलेले असायचो. हे अंटार्क्टिकामध्ये बर्फ आहे सांगण्याइतकंच निरर्थक माहिती देणं असायचं. कधी कधी आम्ही बंद पडलेल्या घड्याळाच्या अडीच तासांत हॉटेलात पोहोचणार असायचो. आमच्या हिलस्टेशनवर पोहोचण्यासाठी बसनं अंतहीन टेकड्यांची चढउतर केली असं आता अंधुक आठवत आहे. रात्री कुठे जेवायचं, या विषयावर एक घमासान युद्ध झालं. दुसऱ्या दिवशी मॅनेजर उर्मट होता आणि जेवण बेकार होतं यावर एकमत होऊन हॉटेलचा वाईट रिव्ह्यू लिहून आनंदात प्रवास सुरू झाला होता. मेरी मुर्गी की एकही टांग असलेली सेनापत्नी वगळता मैत्रीपूर्ण चकमकींनी प्रवासाची मजा वृद्धिंगत झाली होती. अधूनमधून संयोजक आणि गाईडला टोमणे दिले की सगळ्यांना बरं वाटायचं. गुज्जूभाई तर बिअर आणि नॉनव्हेजची मौज लुटायलाच आलेले होते. त्यांना घरच्यांनी एकटं इतक्या दूर कसं पाठवलं याचं नवल वाटलं. तब्बल ७०० रुपये प्रतिदिन रोमिंग असल्यानं आणि हॉटेलात वायफाय उपलब्ध असल्यानं, फोनवर आंतरराष्ट्रीय रोमिंगची सोय फक्त गुज्जूभाईंनी आणि सेनापत्नीनं घेतली होती. हॉटेलात पोहोचताच सगळ्यांना त्वरा सुरवरा वायफाय पासवर्डची व्हायची. गुज्जूभाई प्रवासात खुशाल स्पीकरवर बिझनेस आणि कौटुंबिक चर्चा करत होते. ते जेवताना भरपूर मीठ, साखर आणि औषधं खात होते. त्यांनी द्रौपदीच्या अक्षय थाळीतून आणलेल्या फरसाण, गाठीया, बुंदी, चिक्की वगैरे अतोनात पदार्थांचा पुरवठा बसमध्ये आणि डिनरला दारूसोबत चखणा म्हणून केला. एकदा मंदिरात पुरुषांना शर्ट काढून जावे लागले तेंव्हा त्यांच्या प्रचंड पोटाकडे बघून संयोजक म्हणे, "अरे! हे तर जॅक पॉट!!"

श्रीलंकेत अशोकवनात सीतेचं देऊळ, शिवमंदिर, रावणाची स्नानाची गरम पाण्याची सात कुंडं, हिल स्टेशन, चहाचा मळा, डोंगरातून निसर्गरम्य ट्रेन प्रवास, बुद्ध मंदिर आणि बीच अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं बघितली. इथे चौकापासून अगदी डोंगरावर सुद्धा सर्वत्र लहान-थोर, देखण्या बुद्धमूर्ती दिसतात.

बुद्धमूर्ती

आमची हॉटेल सोबतच, बीच हाऊस आणि सुंदर बंगल्यामध्ये राहण्याची छान सोय केली होती. आमच्यासारख्या काही शाकाहारींसाठी लाल भात, भाज्या, डाळ, कोशिंबीर आणि पापडसदृष्य पदार्थ असलेली श्रीलंकन थाळी छान चवदार होती. ५०० भारतीय रुपयांचे १९०० श्रीलंकन रुपये करून क्षणिक आनंद झाला होता. पण थाळी ६०० श्रीलंकन रुपयांची होती. एक तास किल्ल्याच्या आत ऑटोरिक्षाने फिरण्याचे २००० स्थानिक रुपये झाले.

श्रीलंकन थाळी

इथे सगळ्या गोष्टी अतिशय महाग आहेत असं आवडीनं खरेदी करणाऱ्या सदस्यांना आमचा गाईड वारंवार बजावत होता. दुकानात पंखे लावलेले असूनही ते सुरू ठेवणं आम्हांला परवडत नाही, असं एक दुकानदार म्हणाला. गृहयुद्ध आणि कोविडमुळे मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था, भ्रष्ट राजकारणी आणि भरपूर कर असल्यानं महागाई आहे. विविध देशांतून आलेले बरेच पर्यटक आम्हांला दिसले. कोलंबो शहरात बऱ्याच गगनचुंबी इमारती आहेत. एक लोटस टॉवर आहे. ते एका राजकीय पक्षाचे चिन्ह आहे. अरेच्च्या! इथेही भाजपची सत्ता आहे वाटतं म्हणून आम्ही हसलो.

लोटस टॉवर

गावात टुमदार कौलारू घरं, सुरेख फुलझाडं, नारळ आणि भातशेती आहे. गावात काही ठिकाणी अर्ध्या रस्त्यावर धान वाळत घातलेले पाहून नवल वाटलं. सुरेख समुद्रकिनारा लाभल्याने खवय्यांना उत्तम सीफूड उपलब्ध आहे. आम्ही कुक असलेल्या बंगल्यात राहात असताना दोन दिवसांची ग्रोसरी आणली होती. मराठ्यांनी लुटून आणलेली अमाप ग्रोसरी पाहून स्थानिक स्वयंपाकी हबकून गेला. दोन दिवसांत हे कसं संपवणार याची चिंता त्याला लागली होती. पाककुशल सदस्यांनी तिथे पोहे, उपमा वगैरे घरगुती पदार्थ करवून घेतले. नीरफणसाची भजी करायला लावून एकीने कुकला कोमात पाठवले होते. त्यानं रावण भात आणि रावण पिठलं बघितलं असत तर कुकिंगचा त्याग करून निघून गेला असता.

श्रीलंका

श्रीलंकन पद्धतीनं साडी नेसलेल्या विहंगा, माशा या नावांच्या स्मार्ट मुली ग्रोसरी दुकानात नोकरीला होत्या. श्रीलंकन लोक बडबडे आहेत. एका टेकडीवर सोबत नेलेला आमचा स्थानिक गाईड आम्हांला पैसे घेऊनही चढण्यापासून परावृत्त करत होता. आम्हांला हजार पायऱ्या चढून जायचं आहे असं निक्षून सांगितल्यावर त्याला यावं लागलं. तो सिंहली भाषेत अव्याहत बोलत होता. प्रतिसाद मिळत नसताना तू कोणाशी बोलतोयस की आम्हाला शिव्या घालतोयस असे त्याला विचारलं तर त्याने वेळ मारून नेली. आम्हाला लक्षण नावाचा अतिशय कुशल आणि अबोल ड्रायव्हर मिळाला होता. त्याने कठीण चढाईच्या रस्त्यावर ज्या सफाईनं मोठी बस वळवली त्यामुळं सगळे थक्क झाले आणि टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. लंकेत सोन्याच्या विटा मात्र शोधूनही सापडल्या नाहीत. रामापेक्षा रावण आवडणाऱ्या लोकांचा श्रीलंका हा देश, उत्तम रस्ते, स्वच्छ प्रसाधनगृहं, खाण्यापिण्याची उत्कृष्ट व्यवस्था, हिरवागार निसर्ग आणि मनमोहक समुद्रकिनारा यामुळे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.

श्रीलंका

एक संस्मरणीय सहल करून बुद्धाच्या देशातून निर्बुद्ध लौट आये.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा बरेच दिवसानी.......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरोना काळात आर्थिक घडी विसकटल्यानंतरचा श्रीलंका सहल वृतांत म्हणून विशेष आवडला. खूप हसलो.मदुराई रामेश्वर धनुष्कोडी मदुराई चेन्नई जाफना असा प्रवास करवणारा सहल आयोजक असू शकतो हे कळले. भंपक आयोजन तसेच गटातील विविध व्यक्ती स्वभाव गमती जमती आवडल्या.
छान मनोरंजक लेखाबद्दल धन्यवाद.
( श्रीनाथ पेरूर याचं पुस्तक आठवलं. If it is Monday It must be Madurai. मराठी भाषांतरही आहे मदुराई ते उझबेकिस्तान.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेरीबोट रद्द झाली म्हणून मदुराई-चेन्नई-जाफना हा अस्सल द्राविडी प्राणायाम झाला. कयामत तक फुरसत असल्याने व्हाया काश्मीर पण जाऊ शकलो असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टुअर आयोजकांची खेळी?

फेरीबोट रद्द झाली म्हणून धनुष्कोडी ते श्री लंका बोटीने जाता येत नाही ( तांत्रिकदृष्ट्या नव्हे, कायदेशीरपणे)
हे बरेच वर्षांपासून आहे. आता श्रीलंकेची आर्थिक घडी ढासळल्यावर ( कोरोना पर्यटनच बंद) थोडीफार लोक तिकडे या मार्गे पोहोचली असावीत. मग दंगली वगैरे संपून, मुख्यमंत्री/अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर हा प्रवेश बंद करायला अधिकाऱ्यांना सवड मिळाली असेल. थोडे लोक गेलेही असतील आणि भारतीय पर्यटक येत आहेत पैसे घेऊन तर कशाला अडवा म्हणूनही बोटी येऊ दिल्या असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या नात्याची/मैत्रीची परीक्षा घ्यायची असेल तर एकत्र प्रवास करून बघावा असं म्हणतात. पण ग्रूप टूर्समध्ये सहप्रवाशांचा रशियन रूलेट खेळणं मोठंच धाडस आहे! सेनापत्नी आणि गुज्जूभाई हिट आहेत.
"जाफना" हा शब्द मात्र एकदम लहानपणात घेऊन गेला. राजीव गांधीच्या कारकीर्दीत टिव्हीवर येणारी (दोन्ही खांद्यावरून पदर, कानावर फूल, चश्मा) वृत्तनिवेदिका सतत जाफनाबद्दल काही सांगत असायची. त्यानंतर अनेक वर्षं कुठेच तो शब्द ऐकला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जाफना" हा शब्द मात्र एकदम लहानपणात घेऊन गेला. राजीव गांधीच्या कारकीर्दीत टिव्हीवर येणारी (दोन्ही खांद्यावरून पदर, कानावर फूल, चश्मा) वृत्तनिवेदिका सतत जाफनाबद्दल काही सांगत असायची. त्यानंतर अनेक वर्षं कुठेच तो शब्द ऐकला नाही.

कंकेसन्तुरै, वलवेट्टितुरै, बत्तीकलोआ, असली पूर्वी बापजन्मी कधी न ऐकलेली आणि पुढील आयुष्यात पुन्हा कधीही ऐकावी न लागलेली गावनावेसुद्धा याच जमान्यात ऐकली. भरपूर वेळा ऐकली. मात्र, मी लहानबिहान नव्हतो तेव्हा, चांगला कॉलेजात होतो.

(आयुष्यात कधी जर श्रीलंका जाऊन बघण्याचा योग आलाच, तर मी एक वेळ कोलंबो, कँडी, अनुराधापुरा, झालेच तर तुमचे ते मौंट लॅव्हिनियाबिव्हिनिया वगैरे असली नेहमीचीच यशस्वी "बीटन ट्रॅक" स्थळे स्किप मारीन, परंतु कंकेसन्तुरै, वलवेट्टितुरै, बत्तीकलोआ यांपैकी एका तरी स्थळाला पाय टेकवून एकदा पाहून येईन म्हणतो. (विशेष करून वलवेट्टितुरै.) शिंची नक्की काय भानगड आहे, ते तपासण्यासाठी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुजरात सहलीत होस्ट पण नमुना भेटली होती. तिच्याशी चकमक झाली होती. पण नंतर इग्नोरास्त्रा मुळे तिने नमते घेतले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

आपल्या नात्याची/मैत्रीची परीक्षा घ्यायची असेल तर एकत्र प्रवास करून बघावा होय. मी कधीच तयार नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या विचित्र आणि घोळ घालणाऱ्या ग्रुपमध्ये जर मी गेलो असतो तर ट्रीप सोडून निघुन आलो असतो, आणि माझं ' माणुसघाणे' हे आडनांव् सार्थ केलं असतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण वास्तवात ज्या वल्ली अत्यंत त्रासदायक असतात, लेखनात त्यांचीच "पात्रं" सगळ्यात विनोदी ठरतात. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है! कुणीतरी म्हणलं आहे की चांगल्या विनोदाचा उगम बऱ्याचदा दुःखातच असतो. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वयोगट बघता सामान्य वर्तनाची व्याख्या लागू होईल का काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात तुम्ही ग्रूप टूरमध्ये सामील व्हाल, हे शंकास्पद वाटते.

बाकी, ग्रूप म्हटला, की हे व्हायचेच. (विशेषेकरून, ग्रूप इंडियन लोकांचा असल्यास.)

(राजेश१८८जी काहीही म्हणोत, परंतु इंडियन लोकांइतकी व्यक्तिवादी (परंतु त्याचबरोबर एकसमयावच्छेदेकरून झुंडवादी) जमात त्रिभुवनात शोधून सापडणार नाही. झुंडीत राहून निजव्यक्तित्वास जपणेच नव्हे, तर अट्टाहासाने जपणे, ही कला या जमातीस पुरेपूर साधली आहे. किंबहुना, झुंडीतच यांच्या व्यक्तित्वास ऊत येतो, ते फुलते. चालायचेच.)

– (सहमाणूसघाणा) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदू न च्या धार्मिक भावना ज्या मध्ये आहेत त्याच विषयावर लीहाजारे हे सर्व काही उघड आणि काही आडोसा घेतलेले च लेखक असतात.
आणि ह्या दोन्ही दर्जा चे लेखक bjp समर्थक च असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोन्याच्या विटांवरून एक कहाणी आठवली.

वास्तविक, मरताना इहलोकातून कोठलीही चीजवस्तू स्वर्गात (बोले तो, स्वर्ग हे तुमचे अंतिम गंतव्यस्थान असले, तर; सोयीखातर ‘परलोकात’ म्हणू या, पाहिजे तर.) बरोबर घेऊन जाता येत नाही. परंतु, एका सद्गृहस्थाने तशी खास परवानगी मागितली, आणि पुरेसे पुण्य (आणि/किंवा वशिला) पदरी असल्यामुळे, त्यास ती मिळालीसुद्धा.

झाले. जाण्याचा दिवस उजाडला, नि या सद्गृहस्थाने भरपूर सोन्याच्या विटा एका पोत्यात भरून बरोबर घेतल्यानीत्.

‘पलीकडे’ चित्रगुप्त कष्टम्स तपासणीकरिता सज्ज होताच. त्याला रीतसर (वशिल्याने मिळवलेले) इंपोर्ट लायसन् दाखवलेनीत्.

आता, इंपोर्ट लायसन् आहे, म्हटल्यावर वास्तविक अडवण्याचे चित्रगुप्तास काहीच कारण नव्हते. परंतु निव्वळ कुतूहल (अधिक पद्धत) म्हणून त्याने त्या सद्गृहस्थास पोते उघडून दाखवण्यास फर्मावले.

सद्गृहस्थाने इमानेइतबारे पोते उघडून दाखवले, नि आतील ऐवज पाहून चित्रगुप्त भंजाळला. “रस्ता??? च्यामारी, आणूनआणून रस्त्याचे तुकडे कोण कशाला घेऊन येईल? नि तेही पोते भरभरून?”

——————————

सांगण्याचा मतलब, लंकेत कधीकाळी जर सोन्याच्या विटा असल्याच, तर त्याचा अर्थ तेव्हा लंकेत सोने मातीमोल असले पाहिजे. तीच गोष्ट, भारतवर्षात जेव्हा सोन्याचा धूर निघत असे, त्या दिवसांबद्दल.

(जर्मनीमधल्या हायपरइन्फ्लेशनच्या काळात लोक म्हणे दहा लाख मार्क्सच्या नोटा त्यांत तंबाखू गुंडाळून सिगरेटी बनवून फुंकण्यासाठी वापरत. (नि अशा नोटांच्या थप्प्या शेकोटीसाठी.) कारण, तेवढ्या किमतीत म्हणे तेव्हा तिथे काहीही मिळत नसे – सिगरेटी, तंबाखू, किंवा अगदी काड्यापेटीसुद्धा! (साधा रोजचा पाव आणायचा झाला, तरी पोतेभर नोटा घेऊन दुकानात जावे लागे. एकदा म्हणे एक मनुष्य पाव आणण्यासाठी म्हणून नोटांचे पोते हातगाडीवर घेऊन निघाला. वाटेत त्याला चोराने गाठले, नि नोटांचे पोते सोडून देऊन फक्त हातगाडी चोरलीनीत्.))

नि आपले थोर नेते म्हणे भारतवर्षात जेव्हा सोन्याचा धूर निघत असे, ते ‘अच्छे दिन’ पुन्हा आणू पाहताहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0