प्रेमाची गोष्ट - मांडू, मध्य प्रदेश (डिसेंम्बर २०२३)

मांडू ला गेलास की न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांग. असं भाच्याने सांगितल्याने आणि मी एक चांगला मामा असल्याने मध्य प्रदेश ची ट्रिप मांडू शिवाय करणार नव्हतोच. त्यातच आमच्या दोस्ताने एक दिवस राहण्यासाठी मांडू निवडलं होतं त्यामुळे मोकळ्यात वेळ होता.
तर मांडू किंवा मांडव पण त्याच्याबद्दल बोलण्या आधी आपण बोलूयात माळव्याबद्दल.
माळवा, हिंदीत म्हणतात मालवा. हा असा उभा आडवा भारत असेल तर त्याच्या थेट मध्यात पसरलेला , जवळजवळ 68 लाख वर्षांपूर्वी तयार झालेला, काळ्या बेसाल्टचा हा जवळजवळ 80 हजार किलोमीटरचा पठाराचा टापू. विंध्य पर्वताच्या उत्तरेला कुठल्याश्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा आणि मग तो लाव्हा हजारो किलोमीटर पसरत जाऊन हळू हळू थंड झाला असावा. दक्खनच्या पठाराचंच एक्स्टेंशन खरं तर पण नर्मदा नदी वेगळं करते दोघांना.
तर हा असा माळवा. महाकालच्या आशीर्वादाने पवित्र झालेला, "इंदौर के मिष्टान" खाऊन "चटोरा" झालेला, होळकर , पवार आणि सिंदिया सरदारांच्या पराक्रमाने गाजलेला, नर्मदेच्याआणि क्षीप्रेच्या पाण्याने हिरवागार फुललेला आणि राणी रुपमतीच्या प्रेमाने रोमँटिक झालेला माळवा.
एकेकाळी या माळव्यात राजा भोज आणि कविकुलगुरु कालिदास होता.
"आषाढस्य प्रथम दिवसे" अशी सुरुवात करत त्याने साक्षात आकाशातल्या काळ्या ढगाला आपल्या प्रेमाचा संदेश घेऊन प्रेयसीकडे पाठवलं आणि त्यातून उभं राहिलं अजरामर काव्य "मेघदूत". तुम्हाला सांगतो प्रेमात पडलेल्या माणसाने एक शब्द लिहिला तरी त्याचं काव्य होतं मग इथे तर साक्षात कालिदास होता म्हटल्यावर महाकाव्य होणारच ना. पण कालिदासबद्दल, मेघदूताबद्दल पुन्हा केव्हातरी. आजचा विषय आहे मांडू किंवा मांडव कारण तिथेही प्रेमाची दास्तान आहे आणि शिवाय आमच्या रोड ट्रिप मधलं ते एक महत्वाचं ठिकाण आहे.
मला अनेकदा प्रश्न पडतो, आदर्श प्रेम कोणतं. ते कसं असतं . प्रेमात एकमेकांकडून अपेक्षाच ठेवू नयेत असं सांगणारं प्रेम आदर्श की प्रेमात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पार चन्द्र , सूर्य , तारे आणून देणारं प्रेम आदर्श!!
म्हणजे आता बघा, दस्तुरखुद्द माळव्याचा सुलतान, शिकारीला जाताना एक मंजुळ आवाज ऐकतो काय, त्या आवाजाचा शोध घेताना त्याला त्या गाणाऱ्या तरुणीचं सौंदर्य भुरळ काय पाडतं आणि तो तिला विचारतो, मी असं काय करावं ज्याने तू माझी होशील, माझ्यासोबत माझ्या महालात येशील.
साक्षात सुलतानाने असं विचारल्यावर कुणीही लगेच हो म्हणेल पण ती तरुणी म्हणते, "तुझं प्रेम असेल माझ्यावर पण माझं प्रेम आहे नर्मदेवर आणि रोज नर्मदेला बघून माझी सकाळ होते आणि तिच्या दर्शनाने संध्याकाळ. नर्मदा वाहते का तुझ्या मांडू मधून? बस्स तेवढं जर झालं तर मी लगेच येईन मांडू ला. "
याला म्हणायचा स्त्री हट्ट . प्रेमात हट्ट करावा तर असा. नाहीतर आमच्या बायकोने सांगितलेलं , "वाटतंय ना लग्न करावं मग स्विच कर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोध". अर्थात हे करतानाही माझ्या नाकी नऊ आलेले पण ते एक असो.
तर रुपमतीने अट घातली सुलतान बाझ बहादूरला आणि तो कामाला लागला. तिच्यासाठी स्वतःच्या महालासमोरच्या टेकडीवर भला मोठा महाल बांधला. त्या महालाच्या मनोऱ्यामधून तरी नर्मदेचं दर्शन तिला होईल म्हणून. पण मांडू पासून जवळ जवळ 50 किलोमीटर दुरून वाहणाऱ्या नर्मदेला वळवायचं तरी कसं ?? त्याने नर्मदामय्येपुढे हात जोडले. तिला म्हणाला, "प्रेमाबद्दल मी तुला काय सांगू. पण ह्या रुपमतीच्या प्रेमात मी आकंठ बुडालोय आणि ती आहे तुझ्या प्रेमात. तिला पाहिल्याशिवाय माझा दिवस सरत नाही आणि तुला पाहिल्याशिवाय तिचा दिवस सार्थ होत नाही. तू एकवेळ माझ्यासाठी येऊ नकोस पण रुपमतीसाठी ये."
नर्मदेचं ह्रदय द्रवलं. ती म्हणाली, "मी येते. तुझ्या महालापासून थोडी दूर एक टेकडी आहे तिथं एक गोरख चिंचेचं (baobab tree) झाड आहे तिथं खणलास की जे लागेल तीच मी. रेवा. "
आणि मग बाझ बहादूर ने त्या झाडाखाली रेवा कुंड बांधलं. आणि त्या कुंडा समोरच्या टेकडीवर बांधला एक मोठ्ठासा महाल. तोच रुपमती महाल.
त्या रुपमती महालाच्या खालच्या अंगाला सुलतान बाझ बहादूर चा महाल आहे. आधी त्याचा महाल बघायचा, मग रुपमती महाल आणि मग रेवा कुंड.
असं म्हणतात , रुपमती रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या महालाच्या सगळ्यात वरच्या चौथऱ्यावर जाऊन उभी राहायची. तिथून तिला नर्मदा दिसायची आणि त्याच वेळी बाझ बहादूर आपल्या महालाच्या चौथऱ्यावर उभा राहून नर्मदेकडे एकटक पाहणाऱ्या रुपमतीकडे मोहित होऊन पाहायचा. न चुकता रोज.

रुपमतीच्या महालात आता तसं काही नाही. जिथं उभं राहून रुपमती डोळ्यांत प्राण आणून नर्मदा दिसतेय का म्हणून बघायची तिथं जाण्याच्या जिन्याला सरकारने कुलूप घातलंय. कधी कधी वाटतं आपण तिथे गेलो तरी आपल्याला थोडीच दिसणारे नर्मदा तिथून . त्यासाठी प्रेम हवं, नजरेत, मनात आणि आस असावी नर्मदेला पाहण्याची जशी रुपमती ला असायची रोज, उन्हा पावसात,थंडी वाऱ्यात न चुकता. कुलूप तोडून वर पोहोचलो तरी ना आपल्याला नर्मदा दिसणार ना आपल्याला पाहण्यासाठी कुणी बाझ बहादूर दूर खाली डोळ्यांत जीव आणून आपल्या येण्याची वाट पाहणार.
पण खैर म्हणून प्रेम करूच नये असं काही नाही. प्रेम करावं , निभवावं आपल्या आपल्या पद्धतीने. जसं पुढे जाऊन रुपमतीने निभावलं. अकबराच्या सरदाराने बाझ बहादूर ला मारलं आणि रुपमतीचं चारित्र्य भ्रष्ट होतंय की काय अशी परिस्थिती आली तेव्हा त्या पवित्र नर्मदेच्या रेवा कुंडात रुपमती ने जल समाधी घेतली. प्रेमात केलेला जौहार... नर्मदेच्या पाण्याने पवित्र झालेलं हे कुंड रुपमतीच्या प्रेमतल्या बलिदानाने अजून झळाळून निघालं. प्रेमाची महती ही अशी. आजही नर्मदेची परिक्रमा या रेवा कुंडाचं दर्शन घेतल्या शिवाय आणि रुपमती आणि बाझ बहादूर च्या प्रेमाची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होत नाही.

मला मांडू मध्ये सरलेली आमची रात्र आठवते. डोंगराच्या टोकावरचं हॉटेल, बारीकशी थंडी आणि सोबतीला निवांतपणा. आदल्या रात्रीच पौर्णिमा झाली होती. समोरच्या दरीतल्या झाडांच्या शेंड्यावर चांदण प्रकाश पडलेला, हलकासा वारा वाहत होता, जगजीत ची गझल लागलेली, "कल चौदहवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा",
गझल उलगडत होती आणि मित्र सांगत होता त्याच्या प्रेमाची गोष्ट.
एकच स्वप्न दोघांनी एकत्र पाहणं, मग कित्येक वर्षं, किती उतार चढाव, खाच खळगे, केवढी जवळीक केवढा दुरावा, आणि मग शेवटी ते स्वप्नं सत्यात येणं. खरंच प्रेमात पडणं प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही..

मित्राची गोष्ट ऐकता ऐकता पुन्हा रुपमती आठवली.
असं म्हणतात अजूनही रुपमती दर पौर्णिमेला तिच्या महालात येते, जिन्याला घातलेल्या कुलुपाचं तिला बंधन नाही. ती वर चढते, तिच्या आवडीच्या जागी उभं राहून डोळे भरून नर्मदेला पाहते , डोळ्यांच्या एक कोनातून तिला दिसतं की बाझ बहादूर पण आपल्याकडे बघतोय. एकमेकांवरच्या प्रेमाची खात्री झाली की दोघेही निघून जातात पुन्हा पुढच्या पौर्णिमेला परत येण्यासाठी....

एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जीवांच्या गोष्टी अशाच असतात. म्हटलं तर खऱ्या म्हटलं तर दंतकथा. त्या ऐकायच्या असतात, ऐकवायच्या असतात, त्यांची गाणी करून गायची असतात आणि प्रेमाच्या गोष्टी चिरंतन टिकवायच्या असतात.

म्हणून तुम्ही सुद्धा न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांगा.

- अभिषेक राऊत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मांडू ऊर्फ मांडवगड आहे सुरेखच. पण रूपवती महाल मांडूचा तीस टक्के भाग झाला. स्थानिक लोक मात्र श्रावणात जातात. आता पुन्हा जावं लागेल रुपमतीला तुमचा हाय सांगायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0