भास्करबुवा बखले: भरभरून देणारे संगीतज्ञ

p2 शैला दातार यांनी लिहिलेल्या भास्करबुवा बखले यांच्यावरील ‘देवगंधर्व’ हे ‘राजहंस’ने प्रकाशित केलेले चरित्र वाचताना संगीत व नाट्यक्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबरोबरच एका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा वाचकांना प्रत्यय येतो. ह्या दोन्ही क्षेत्रांतील बेभरवशांच्या जीवनपद्धतीची माहिती असूनसुद्धा आपल्यातील माणुसकीला धक्का न लावता एक निकोप जीवन जगलेल्या भास्करबुवांचे यथार्थ चित्रण लेखिकेने फार सुंदरपणे उभे केले आहे.

गायनाच्या क्षेत्रात त्या काळीही मातब्बर मंडळी भरपूर होती. पण केवळ काही निवडक रसिकांपुढे गाऊन मोठी बिदागी घेत स्वतःच्या जीवनात रमण्यामध्ये धन्यता न मानता, जनसामान्यांमध्ये या अभिजात कलेची गोडी निर्माण व्हावी, ह्यासाठी नाटकाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी बुवांनी जन्मभर घेतलेल्या परिश्रमाची कल्पना ‘देवगंधर्व’ पुस्तक वाचताना आपल्याला येते.

लेखिकेने लिहिल्याप्रमाणे भास्करबुवा हे साधे, सरळ, निष्कपट, दिलदार, मोकळ्या मनाचे, कुटुंबवत्सल गृहस्थ होते. घरातील स्वत:ची जबाबदारी ओळखणारे होते. गाण्याच्या नादात पत्नी आणि मुली यांच्याकडे लक्षच दिले नाही किंवा चिडचिड केली, असं कधीच घडलं नाही. वेगवेगळे व्यक्तिमत्त्व असलेल्या कित्येक गुरूंचे यांच्यावर संस्कार होते. पण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची घडण त्यांनी फार छानपणे केली होती. हिंदुस्थानी गायकी पूर्णपणे आत्मसात केल्यानंतरसुद्धा आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहणे त्यांनी पसंत केले. नत्थ्यनखाँसाहेबांकडून संगीतविद्या मिळवण्यासाठी गुरुच्या घरची पडेल ती कामे करण्यासाठी त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. विद्या संपादन करणे ह्या एका ध्यासापायी त्या काळातील कर्मठ समाजाचीसुद्धा त्यांनी पर्वा केली नाही. खाँसाहेबांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वत:वर घेतली. धारवाडसारख्या ठिकाणी त्यांचे घर सजवून दिले.

गायन, वादन ही उदरनिर्वाहाची कला म्हणून त्या काळी शक्य नव्हते. कलेच्या भणंग आयुष्य जगणारे कित्येक कलावंत आपल्या आयुष्याची होळी करत . पण बुवांनी आपल्या आयुष्याला शिस्त लावून घेतल्यामुळे तो भणंगपणा त्यांच्या आयुष्याला कधीच शिवला नाही. त्याचबरोबर अशा परिस्थितीत आपोआप येणारा पैशासाठीचा हपापलेपणासुद्धा त्यांच्या आयुष्यात कधी आला नाही. बाजारी वृत्तीने न वागता रसिकांची मने जिंकण्यासाठी भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मैफली गाजवणारे भास्करबुवा मानधनासाठी कधीच अडवणूक करत नव्हते. मिळालेली रक्कम ते मोजूनही घेत नसत. गायन वा वादनाच्या मैफलीच्या संयोजकांची त्रेधा- तिरपट करणाऱ्या आजकालच्या ‘गुणी’ कलाकारांनी बुवांचे एवढे गुण उचलले, तरीही भारतीय संगीत अधिक समृद्ध होईल.

इतर कलावंतांसाठीही बुवांच्या घरचे दरवाजे सदैव उघडे ठेवलेले असत. स्वतः एवढे मोठे कलावंत असूनसुद्धा मैफलीत कोणत्याही गवयाचं गाणे ऐकायला श्रोते म्हणून बसले, तर बुवा दिलखुलासपणे दाद देऊन प्रोत्साहन देत. साथीदारांशी आपुलकीने वागत असत. त्यांना सांभाळून उत्तेजन देत असत. अहंमदजान थिरकवांच्या साथीवर खूष होऊन त्यांना मुंबईला बोलावून घेतले व त्यांचा संसार उभा करण्यासाठी भरपूर मदत केली. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांना सर्व क्षेत्रांतील जाणकार मंडळी अत्यंत अगत्याने वागवत असत. समजदार श्रोत्यांचे वैभव बुवांच्या वाट्याला भरपूर आले.

कित्येक गायकांचे गायन ऐकताना त्यांच्या चेहऱ्याकडे, हावभावाकडे पाहवत नाही. त्यांचे हातवारे माकडचेष्टा वाटतात. त्यामुळे रसभंग होऊन मैफलीचा पूर्ण आनंद कधीच मिळत नाही. बुवा मात्र पूर्ण मैफल प्रसन्न करून टाकत. केशवराव भोळ्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘बुवांच्या हसऱ्या चेहऱ्याने, भारदस्त वागणुकीमुळे माझ्या मनावर फारच चांगला परिणाम झाला आणि मैफल संपेपर्यंत तो कायम राहिला. स्वरांची केवढीही मोठी खेच असो, कितीही आवर्तनांची फिरत असो, बुवांची ही हसरी मुद्रा वेडीवाकडी झाली नाही, डोळ्यांवरील रुमालाचा काठ कधी ढळला नाही किंवा खांद्यावरील पांढरे स्वच्छ, जरीकाठी उपरणे खाली उतरले नाही...’ श्रोत्यांच्या दृष्टीने या भारदस्तपणाला, या डौलाला, या सुहास्यवदनाला फार महत्व आहे. सुंदर गायनाला सुंदर आणि प्रसन्न व्यक्तिदर्शनाची जोड गायकाने दिली, तर प्रथमदर्शनीच मैफल आपलीशी करता येते. गायक श्रोत्यांमध्ये हा आपलेपणा निर्माण करणे, ही गायन परिणामकारक करण्याची पहिली पायरी आहे आणि बुवासारखे कलावंत ही पायरी कधीच विसरत नाहीत. त्यामुळे प्रत्येक श्रोत्याला वाटते की गवई खास आपल्याकरताच गातो आहे. हे कधी शिकवून येत नाही, हे ज्याचे त्यालाच जमते!

संगीत शिक्षणाला शिस्त लावून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे या उद्देशाने त्यांनी ‘भारत गायन समाज’ ही संस्था उभी केली. शिक्षक म्हणून तेथे काम केले. विद्यार्थ्यांसाठी थोर गायकांच्या मैफलींचे आयोजन केले. अडचणीच्या वेळी पदरचे पैसे खर्च करून संस्था जिवंत ठेवली. स्वत:च्या विद्यार्थिदशेतील कटू अनुभव पुढच्या पिढीने भोगू नये म्हणून ही संस्था उभी केली. केवळ गुरूंच्या लहरीवर विसंबून न राहता सोप्या रीतीने संगीताची जाण करून घेणे ह्यावर त्यांनी भर दिला. संगीताला फक्त मनोरंजनाचे साधन न मानता, एक ‘विद्याशाखा’ असे स्वरूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याच तळमळीने तळमळीने एक मोठी शिष्यपरंपरा त्यांनी उभी केली. प्रत्येक शिष्य बुवांचे ऋण आयुष्यभर मानत होता.

शैला दातार ह्यांचे बुवांचे चरित्र वाचताना न कळत आपण आजच्या कलेच्या बाजारीकरणाचा विचार करू लागतो. कमीत कमी परिश्रम करून थोड्याच कालावधीत जास्तीत जास्त पैसे कमविणारे हे कलावंत धड कलावंत पण नसतात व माणूस पण नसतात. आपल्याच कोषामध्ये राहून, स्वतःलाच मध्यबिंदू समजून आयुष्य व्यतीत करणाऱ्या अशा कलावंताबद्दल कीव वाटू लागते. बुवासारखे आयुष्याला विद्येसाठी अर्पण करणारे कलावंत आपल्यातील अंगभूत माणुसकीमुळे कित्येक लोकांच्या कोरड्या व कष्टमय आयुष्यात ओलाव्याचे काही क्षण तरी निर्माण करतात. अशा एका थोर व्यक्तीचे चरित्र स्वत:च्या अभ्यासपूर्ण लेखनातून आपल्यासमोर ठेवल्यामुळे शैला दातार अभिनंदनास पात्र आहेत.

देवगंधर्व

शैला दातार
राजहंस प्रकाशन
मूः 180 रु, पृ.सं 158

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण बुवांनी आपल्या आयुष्याला शिस्त लावून घेतल्यामुळे तो भणंगपणा त्यांच्या आयुष्याला कधीच शिवला नाही. त्याचबरोबर अशा परिस्थितीत आपोआप येणारा पैशासाठीचा हपापलेपणासुद्धा त्यांच्या आयुष्यात कधी आला नाही. बाजारी वृत्तीने न वागता रसिकांची मने जिंकण्यासाठी भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मैफली गाजवणारे भास्करबुवा मानधनासाठी कधीच अडवणूक करत नव्हते. मिळालेली रक्कम ते मोजूनही घेत नसत.

काहीतरी विरोधाभास जाणवतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0