ॲन एनाराय् यॅंकी इन् ज्युलियस सीझर्स् कोर्ट्
अस्मादिकांचं पर्यटन म्हणजे अतिपरिचित मळक्या वाटांनी, तद्दन टुरिस्टी पद्धतीने काही अतिसुप्रसिद्ध ठिकाणं पाहून येणं.
आमच्या पर्यटनाने "Two roads diverged in a wood/ I took the one less traveled by/ And that has made all the difference." लिहिणारा रॉबर्ट फ्रॉस्ट 'आपण फुक्कट कायतरी लिहिलं' म्हणून त्याच्या कबरीत दोन अश्रू ढाळेल. आमच्या ह्या भ्रमणापेक्षा पुलंच्या बटाट्याच्या चाळीतलं भ्रमणमंडळ जरा कमी प्रेडिक्टेबल असेल.
तर प्रस्तुत संदर्भ : अलिकडे घडलेला आमच्या इटालियन टुरिझमचा तुकडा.
बालपणीं "द डिक्लाईन अँड फॉल ऑफ द रोमन एंपायर" ह्या, एडवर्ड गिबन लिखित ग्रंथराजाबद्दल ऐकलं होतं. कॉलेजमधे असताना हा जाडजूड - अनेक खंडांचा - प्रकार पहायला मिळेल म्हणून प्रयत्न केले. त्यावेळी असं काही- निदान पुस्तकांद्वारे - आजमावण्याची उमेद होती.
गिबनचं हे सणसणीत प्रकरण तेव्हा काही हाती लागलं नाही. आता असा माहोल आहे की कधीही कुठलंही पुस्तक मागवता येईल. पण आता अटेन्शन स्पॅनचा ऱ्हास, एकंदरच वैचारिक मांद्य आणि शतखंडित वैचारिकता ह्यांचा वेढा इतका आहे की गिबनच्या बालेकिल्ल्याला आता आपली घोरपड लागणं कठीण आहे हे मी केव्हाच मान्य केलं आहे.
... तर ठीक आहे, ते पॉम्पी शहर, तो व्हेसुवियस, फीडल वाजवणारा तो नीरो , "फ्रेंड्स, रोमन्स, कंट्रीमेन, आय कम टू बेरी सीझर, नॉट टू प्रेझ हिम" हे सुप्रसिद्ध शब्द शेक्सपीयरने ज्याच्याबद्दल नाटकामधे मार्क अँटनीच्या तोंडून वदवले तो ज्यूलियस सीझर, १५ मार्चचं ते "सीझरीयन" खुनशी प्रकरण...... पुढे कॅथलिक् ख्रिश्चनिटीचा तो समस्त रंगीबेरंगी इतिहास, व्हॅटिकन आणि रोम ह्यांच्यातला, धर्मसत्ता नि राजसत्ता ह्यां संबंधामधला शतकानुशतकांचा पॉवरचा खेळ ...आणि मग पुढे उलागडत गेलेलं ते रेनेसां नावाचं प्रकरण, माणूस आहे की ब्रह्मराक्षस आहे असं वाटावं असं काम करून गेलेला तो मिकेलांजेलो, तो राफाएल, तो बोतिचेली, सत्याकरता ज्याला मरावं लागलं तो गॅलिलिओ.....इटालियनांचा तो पिझ्झा नि तो पास्ता, त्या वाईन्स्, ह्या देशाचं, त्या फॅशिझम नावाच्या भयावह प्रकारात पन्नासेक वर्षं होऊन गेलेलं भजं, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले ते इटालियन न्यू वेव्हचे सिनेमे... हॉलीवूडमुळे ज्याचा परिचय झाला तो इटलियन माफिया, जगात भाव खाउन राहिलेले कॉस्मेटिक्स् आणि फ्याशनबजीतले ते इटालियन डिझायनर ब्रॅंडस्, त्या लॅंबोर्गिन्या आणि फेरार्या... इत्यादि इत्यादि संकीर्ण गोष्टींबद्दल कणमात्र आणि जुजबी ओळख असलेल्या ह्या भूमीवर किमान आमचे पाय लागले. हुश्श.
भारतात वाढलेल्या माणसाला इटलीमधे आल्यावर काहीकाही बाबतींत भारताचा भास होणं अपरिहार्य आहे. लंडनच्या मुक्कामी लाललाल रंगाच्या डबलडेकर बसमधे बसून आणि लॉर्डसला जाऊन मी मुंबईच्या स्मृतीना उजाळा दिला खरा; पण साहेबाचा देश इस्त्रीचा. नवी इंग्लिश पीढी भले अगदी क्रिकेटच्या कमी आणि सॉकरच्या प्रेमातली असेल, भले त्यांचा फॅशन सेन्स् बेन स्टोक्ससारखा असेल पण लंडन मला अजिबात केऑटिक वाटलं नाही. इंग्रज मनुष्य आपला आब राखून असलेला वाटला. इटलीच्या सार्वजनिक व्यवस्थेच्या अपुरेपणामधे आणि त्यामधे ढवळल्या जाणाऱ्या सामान्य इटालियन्समधे मला भारतीय मानसिकतेचा भास झाला. आता आमच्या अन्य मतांप्रमाणे हेही मत उथळच. ते डिस्क्लेमर परतपरत येणारच.
इट्लीमधली मला दिसलेली सार्वजनिक नागरी व्यवस्था, तिच्यातला मला, एका ढोबळ दृष्टीने दिसलेला अपुरेपणा, लोकांची जुगाड करण्याची प्रवृत्ती हे सगळं पक्कं देशी वासाचं वाटलं. भारताचं वर्णन हीट ॲंड डस्ट असं कुणीतरी केलं आहे त्यातली हीट इथे ह्या युरोपीय उन्हाळ्यामधे खूपच आहे. धुळीचं साम्राज्य मात्र दिसलं नाही. धूळ नसण्यामधे कदाचित इथला भूगोल कारणीभूत असेलही. मात्र प्रदूषणावद्दलचे नियम पाळलेले दिसत असल्याने प्रदूषणातनं जन्माला आलेला कळकटपणा रोम नि फ्लॉरेन्समधे नाही दिसला . थोडक्यात ह्या संदर्भात पब्लिक गव्हर्नन्स काम करतोय.
किंचित अधिक विचार केला तर EU मधल्या प्रत्येक अन्य घटक देशाप्रमाणे इटली हासुद्धा दुहेरी व्यक्तिमत्वाचाच आहे - थोडा प्रगत नि थोडा जुगाडु. थोडा वेल बीहेव्ड आणि थोडा आपल्या मर्जीचा मालिक. EU बनत गेल्यानंतरच्या १५-२० वर्षांचा इतिहास तसा सर्वज्ञात आहे. आणि हे असं दुहेरी व्यक्तीमत्त्व EU मधल्या प्रत्येक देशाचं असलं पाहिजे असा माझा अंदाज.
अमेरिकेत मिळणारे इटालियन पदार्थ आणि खुद्द इटलीत खाल्लेले इटालियन खाद्यपदार्थांमधला चवीचा फरक, त्यातला अस्सलपणा माझ्या सारख्या गावठी माणसालापण अगदी वरवरच्या वावरातही जाणवला. पण माझे डझनावारी "फूडी" मित्रमैत्रीणी ज्या बद्दल आसुसून बोलतात आणि पर्यायाने सर्व लहानथोर अमेरिकन इटालियन रेस्टॉर्ंट्सना *इतक्या मोठ्या प्रमाणात* शिव्या देतात ते नक्की कशामुळे ? ते मला समजण्यात अपयश आलेलं आहे हे पुनरेकवार मान्य करतो.
अस्सल जातिवंत खाणंपिणं ही, काहीही झालं तरी शेवटी ॲक्वायर्ड् टेस्ट आहे आणि मी अगदीच बथ्थड टोनडेफ गांवढळ आहे हे मान्यच करतो. तसं बघायला गेलं तर एका शॉर्ट ट्रीपमधे मला हा अस्सलपणा काय कपाळ कळणारए म्हणा.
अम्रिकेतल्या चांगल्या ठिकाणी मिळणारा इटालियन पदार्थ आणि इटलीत ऑन् ॲन ॲव्हरेज मिळणारे पदार्थ ह्यांच्या दर्ज्यातला फरक प्रचंड मोठा नाही - स्वत:चा मोरू करणारं - विधान करतो नि गप बसतो. (Don't get me wrong. दर्ज्यातला फरक हा आहेच. पण सामान्य इटालियन ठिकाणी जे सहज मिळतं तितकं बरं मिळायला अमेरिकेतली सुप्रतिष्ठित रेस्टोरंट्स् शोधणं आलं. इतकंच. )
... बाकी एक दोन शहरांमधली मिळून आठ दहा ठिकाणं पाहून आख्ख्या देशाबद्दल नि संस्कृतीबद्दल काय नवं नि खोलवरचं सांगणार. आपल्याला *कळत* फार असेल नसेल, पण मनात म्हण्टलं, जे *वाटतं* ते तर आपलं आहे. ते खरंखरं आहे. ते तर कुणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मग तेच लिहावं.
फ्लोरेन्स शहरामधे डेव्हिडचा पुतळा पाहताना, व्हॅटिकनमधल्या सिस्टीन् चॅपलखाली असताना आणि त्याच्या अगदी शेजारीच, व्हॅटिकनमधल्याच सेंट पीटर बॅसिलिकामधे वावरताना (बॅसिलिका म्हणजे काय तर चर्च) काळजात लक्कन हललंच. - आपण हे सर्व बघणारे १००-२०० कोटीव्वे कुणीतरी आहोत हे माहिती असूनही.
लहानपणीं नॅशनल जिओग्राफिकचे अंक अनिमिष नजरेने पाहिले होते. त्यातला एक अंक व्हॅटिकनबद्दलचा होता. तो इयत्ता ८वी ९वी मधला मुलगा आठवतो. साधारण तेव्हाच कधी बेन हर सिनेमा थेटरात पाहिला होता. त्यातले संवाद १० टक्के समजले नसतील. पण शेवटची कलोजियममधली रेस आठवते.
पन्नाशी उलटलेल्या माझ्यासारख्याने मिकालेंजेलोचं काम पहाणे ह्यात भावनांचा बडिवार मांडावा असं काहीही नाही. पण ८वी मधल्या मुलाची एक छोटी इच्छा पूर्ण झाली ह्यात काहीतरी कणभर मजा आहे. आणि त्यातही ऐन् उमेदीच्या आपल्याच मुलाबरोबर ती पूर्ण होण्ं हे जरा अधिक इंटरेस्टिंग आहे.
सिस्टीन चॅपल आणि ते सेंट पीटरचं भव्य दिव्य चर्च पाहाताना जो एक अनुभव आला त्यालाच आध्यात्मिक म्हणत असावेत. पौगंडावस्थेपासूनच देव नि धार्मिकता ह्या गोष्टींशी संबंध सुटला. त्यानंतर पोथ्या पुराणं, देवदेवस्की, धर्मस्थळं हे जे काही पाहिलं अनुभवलं, भेटी दिल्या त्यात परातत्वाचा काहीएक संबध येणं शक्य नव्हतं नि कधी येणार नाही. (परातत्त्वाच संबंध नाही; पुरातत्त्वाचाच आहे असा एक क्षीण विनोद सुचतो.)
... पण अशा प्रकारच्या ठिकाणी काही क्षण असे येतात. ते प्रश्न विचारतात नि आपल्याकडे उत्तर नसतं. किंवा ते प्रश्नच मुळात त्या ठिकाणी विरून जातात.
अजिंठ्याची लेणी दाखवताना नेमक्या शेवटच्या लेण्यात अनंतशयन बुद्ध येतो. तो पहुडलेला असतो. त्याच्या वर यक्ष गंधर्व चितारलेले आहेत. ते खूप आनंदात आहेत कारण बुद्ध त्यांच्याकडे येतोय. बुद्धाच्या लेव्हलच्या खाली आपले जमिनीवरचे लोक दाखवलेत. ते रडताएत. बुद्धाचे डोळे मिटलेत. ना त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत ना त्याची जिवणी हलली आहे.
तो क्षण आठवतो.
... आणि कालपरवाचा सिस्टीन चॅपलमधला एक क्षण. त्या शेकडो फ्रेस्कोंपैकी ते क्रिएशन ऑफ मॅनचं पेंटिंग माझ्या डोक्यावर आहे. चित्रामधे तो दाढीवाला म्हातारा नि ॲडमची बोटं जवळजवळ् येताना आपण पाहतोय नि नेमकं आपल्या मुलाचं बोट आपण पकडलं आहे.
अरुण कोलटकरांच्या एका कवितेचं विडंबन करायचं तर -
जीजसची न् आपली
डायरेक्ट् ओळख नाही,
मिकालेंजेलो न् आपली आहे.
अन् मिकालेंजेलो जीजसला ओळखत होता !
प्रतिक्रिया
.
फॉर व्हॉट इट इज वर्थ, माझं मत असं की एव्हाना मास टूरिझम हा प्रकार रोमन साम्राज्याइतकाच मानवी संस्कृतीचा स्थायी भाग झालेला आहे. तो होता, आहे आणि राहणार. त्यावर इलाज नाही. पण डेव्हिड काय किंवा रोझेटा स्टोन काय, ह्या जादुई चीजा आहेत. इतर कोट्यवधींनी त्या आधी पाहिल्या असल्या म्हणून त्यांच्या नजरांची पुटं त्यांवर चिकटलेली असतात असं काही नाही. आपण नव्याने बघाव्यात. ते तुम्ही यथाशक्ती केलंच आहे याबद्दल (आणि एकही फोटो न टाकल्याबद्दल) अभिनंदन.
बाकी रोमचे टूरिष्ट ब्रोशर म्हणून गिबनचा काहीही उपयोग होण्यासारखा नाही, तेव्हा यू हॅवन्ट मिस्ड मच (अॅट लीस्ट इन धिस रिस्पेक्ट).
------
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
फेसबुकावर
तुम्ही फेसबुकावर नाहीत ते बरंय एका अर्थानं, अन्यथा सुटका नसती.
बाकी, ऐसीवर फोटो टाकणे अवघड करून ठेवले आहे ते त्यासाठीच की काय.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
राजन बापटसर, आपण ऐसीवर
राजन बापटसर, आपण ऐसीवर विस्तृत पर्यटन अनुभव लिहिल्याबद्दल आभार.
आमच्यासारख्या देशी मंडळींना कधी चुकून त्या भागात जाण्याचा योग समजा आलाच तर हा अहवाल उपयोगी ठरेल.
चिपलकट्टी व चिंतातुर जंतू यांच्यासारख्या इंटरनॅशनल लोकांच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा .
फेसबुकप्रमाणे बदाम देण्याची सोय ऐसीवर नाही. तरीही मी बदाम दिलाय असे गृहीत धरा .
सर्वांचे आभार.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.