अस्थिर आशिया कोणाच्या पथ्यावर पडणार?

आशिया खंडातील ४८ देश आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार देश म्हणजे भारत चीन रशिया आणि जापान. त्यापैकी जापान देशाबद्दल नंतर चर्चा होईल. पण भारत, रशिया आणि चीन या देशांमधील घडामोडी आशिया खंडातील स्थैर्यासाठी फार महत्वाच्या आहेत. त्यातही मागच्या शतकातील अखेरच्या चार पाच दशकांत रशियाचे विभाजन होणं आशिया खंडातील अस्थिर राजकारणाची फार महत्त्वाची घटना होती. त्यापूर्वी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देताना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान देणं हेही तेवढेच महत्त्वाचे. आशिया खंडातील चार डझन देशाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास भूगोल बघितला तर कल्पना येईल की गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळात आशिया अस्थिर होणं हे क्रमाक्रमाने वाढत आहे. भारतीय उपखंडातील अस्थिरता अभ्यासाची असेल तर बंगालची फाळणी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली ते आज एकविसाव्या शतकातील दोन दशकं उलटून गेल्यानंतरही बांग्लादेशात जे होतं ते जगाच्या इतिहासातील फार महत्वाचे पर्व आहे. कारण संपूर्ण जगाचा विचार केला तर पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आशिया खंडातील आहे. तर तीस टक्क्यांच्या आसपास पृथ्वीवरचा भूभाग आशिया खंडाने व्यापलेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आशिया खंडातील स्थैर्याचे आणि अस्थिरततेचे पडसाद खूप मोठे आहेत. बरेचदा बाह्य हस्तक्षेपामुळे तर कधीतरी अंतर्गत कुरबुरी वाढल्यामुळे आशिया खंडात अस्थिरता निर्माण होते. कित्येक अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी यावर चर्चा केल्या आहेत. शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. बरीचशी उत्कृष्ट दर्जाची पुस्तके उपलब्ध आहेत. (ऐसी अक्षरे वर हा धागा सुरु करण्यासाठी सध्याच्या बांग्लादेशात होत असलेल्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे.) अस्थिर आशिया नेमकं कोणासाठी वरदान आहे किंवा कोणासाठी शाप यावर चर्चा व्हावी हा शुद्ध हेतू या धाग्यामागे आहे.

भारताच्या बाजूला असणारे छोट्या देशातील अस्थिरता ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. कारण आजूबाजूच्या देशातील अस्थिरता ही नेहमीच आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यवहार, व्यापार व गुंतवणूक यावर प्रभाव टाकत असते. यावर सोशोइकोपॉलिटिकल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची निरिक्षणं फार महत्त्वाची. यात कॉन्स्पीरेसी थिअरीज् पुष्कळ आहेत. त्यात काही बाष्कळ व उथळ असतात. ‌भारताच्या एकूण परिस्थितीत या घडामोडींमुळे काय बदल होतील हे बघणं गरजेचं आहे. आग्नेय आशियातील दरवाजे इशान्य भारतातून जातात. तिकडेच भारताची जवळपास चार हजार किलोमीटरची सीमारेषा लागून असलेल्या बांग्लादेशात धुसफूस सुरू आहे. त्यातही आशिया खंडातील सर्वात जास्त प्रभावशाली रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट लोकांचा खूप मोठा गट अशांतता निर्माण करत आहे. त्यांच्या मागे जे कटकारस्थान करणारे देश संघटना असतील त्यांना काय हवं नको त्यावर या अनुषंगाने चर्चा करता येईल.
भले त्यामागे छुपा चीन किंवा अमेरिकेचा पाठींबा असेल! कॉन्स्पीरेसी थिअरी आहेत बऱ्याच. पण संशोधन करून मांडणी केली असेल तर त्यात तथ्य आहे. आशिया खंडात हिंदू, बौद्ध पण सर्वात जास्त आहेत त्यांनी कधी एवढी भयानक कट्टरता दाखवली नाही की आशिया खंडातील स्थैर्य डगमगेल. ती योग्यता इस्लाम मधील कट्टर पंथीय लोकांची. कारण धर्माच्या नावाखाली जिहादी प्रवृत्ती तयार होणं आणि त्यांना आपापल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरणं ह्याचे प्रयोग आशिया खंडात बरेचदा झाले. मुख्य अशा वेळी त्यांना खतपाणी घालण्यासाठी देशांतर्गत संधी वा निमित्ते मिळतात. हे सूचक आहे. सोप्या पद्धतीने मांडायचे झाले तर दुसऱ्याच्या भांडणात तिसरा छुपा लाभार्थी दडलेला असतो. तसा आशिया खंडातील अस्थिरता कोणाच्या तरी नक्कीच पथ्यावर पडत असणार!

खूप महत्त्वाची गोष्ट घडत आहे शेजारच्या देशात सत्तांतर झाल्यानंतर. ती म्हणजे फ्रंट वर येऊन जमात-ए-इस्लामी संघटनेचचा सक्रीय सहभाग. या संघटनेला पाकीस्तातून रसद मिळते हे सर्वश्रुत आहे. चीन सुद्धा कट्टर पंथीय रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट आपल्या देशात तयार होणार नाही याची दक्षता घेतो. तर दुसरीकडे आजूबाजूच्या देशात शिरकाव करण्यासाठी अशा संघटनांचा वापर करता येईल का किंवा कर्जबाजारी करून छोट्या देशांना आपल्या इशाऱ्यावर कसे नाचवता येईल याचा पुरेपूर दक्षता घेतो. चीनधार्जिणी एक गट भारतात नेहमीच सक्रिय असतो. याबाबतीत चीन भारत संबंध यावर संशोधन करणारे प्रकाश टाकू शकतील. बारकाईने विचार केला तर भारतात कट्टरपंथी इस्लामी संघटना कैक आहेत. जमात-ए-इस्लामी संघटनेचे छुपे पाठीराखे बंगाल, आसाम मध्ये असल्याचे गुप्तचरांनी सांगितले आहे. थोडक्यात माहिती जमात-ए-इस्लामी बद्दल. १९४०-४१ च्या दरम्यान अबुल अल मौदुदी यांनी ह्या संघटनेची स्थापना भारतात केली. या संघटनेची उद्दिष्टे म्हणजे इस्लामिक तत्त्वांनुसार समाज उभा करणे. ह्याच संघटनेचे सेक्युलॅरिझम आणि लोकशाही बद्दल काय विचार आहेत हे जाणकारांकडून समजून घ्यावेत. म्हणजे अशी कट्टर संघटना बांग्लादेशात फ्रंट वर येऊन कार्यभाग साधणे आहे. भविष्यात बांग्लादेशातले येणारे सरकार यावर बंदी आणू शकते दिखाव्यासाठी. पण भारतीय मुस्लिम समाजात अशा कट्टर पंथीय लोकांचे विशेष इंटरेस्ट दडलेले असतात. उदाहरणार्थ शंभर टक्के साक्षर असलेल्या केरळमध्ये पी.एफ.आय नावाची संघटना आहे. तिने काय काय कारनामे केले आहेत हे जगजाहीर आहे. आयसीसचे धागेदोरे तर केरळमध्ये मिळालेले आहेतच. बंगाल आणि आसाम मध्ये अनधिकृत निर्वासित मुस्लिमांचे प्रश्न कैक वर्षे अस्तित्वात आहेत. म्हणजे मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य झाली की कट्टर पंथीय लोकांचा उपद्रव वाढू लागतो. इस्लाम मधील कट्टरता वाढली की हिंसक रुप घेते हे जगाला समजलं आहे. जिहादी प्रवृत्ती कशी भयानक अमानवी कृत्य करते हे जगाला दाखवलं आहे वेळोवेळी. संख्यात्मक वाढ झाली की कट्टरता वाढण्याची कारणं काय आहेत यावर चर्चा व्हावी. विचारवंतांनी जनजागृती करावी. जगभरात पन्नास पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत. त्यापैकी किती स्वतःला लोकशाही वादी सेक्युलर देश म्हणून प्रोजेक्ट करतात? काही अपवाद सोडले तर कोणते मुस्लिम देश इस्लामिक न म्हणता सेक्युलर म्हणवून घेतात? अर्थातच हा कळीचा प्रश्न आहे. गेल्या काही दशकांत कट्टरता वाढू लागली. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरीकडे उजव्या लोकांची कट्टरता वाढली. उदाहरणार्थ म्यानमार मध्ये राखाईन प्रांतातून रोहिंग्यांना हाकलून दिले. तसंही मुस्लिम समाजातील शिया, सुन्नी आणि अहमदिया वगैरे पंथांचे अंतर्गत कलह चालूच आहेत. मूळ प्रश्न इस्लाम कट्टरता वाढण्याबद्दल आहे. बहुसंख्य झाले की अल्पसंख्याक लोकांना छळ सहन करावा लागतो. हे बांगलादेशातील घटनेने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. आधी भारतात काश्मीर मध्ये दिसलं. पाकिस्तान मध्ये काय होतंय ते जगात प्रसिद्ध आहेच. याकडे नेहमीच हिंदू मुस्लिम, गुड मुस्लिम बॅड मुस्लिम, सहिष्णू हिंदू कट्टर हिंदू वगैरेंच्या दृष्टीने चर्चा, वादविवाद, मंथन होत राहणार. भारतात तरी हिंदू मुस्लिम हा चघळला जाणारा प्रश्न सृष्टीच्या अंतापर्यंत टिकणार आहे.

भारतात भविष्यात व्होट बँक जपण्यासाठी अशा कट्टर इस्लामी संघटनेला राजकीय पाठींबा देणारे पक्ष पण पुढे येतील. काही सुविद्य पुरोगामी भाजपा संघ यांना उल्लेख करून काउंटर प्रतिक्रिया देत राहतील. २००२ मध्ये झालेली गुजरात दंगल असो वा १९८९-९० घ्या काळात काश्मीरमध्ये पंडितांना जे सहन करावे लागले त्या घटना. हे सर्वाधिक सेलेबल इव्हेंट आहेत. ज्याने त्याने वाटून घेतलेले. शंभरपेक्षा जास्त सेलिब्रिटी लोकांचे निषेधाचे टुलकिट म्हणजे 'ऑल आईज ऑन राफा' किंवा 'सेव्ह गाझा' याविषयी बोलणारे निषेध नोंदवणारे बांग्लादेशात हिंदूंना जे सहन करावे लागले त्यावर का बोलत नाही यावर सध्या हिंदुत्ववाद्यांनी आघाडी घेतली आहे. इस्राएल ला शिव्या देणाऱ्या संघटना, विचारवंत वगैरे बांग्लादेशात जे घडतेय त्यावर का बरं बोलत नाहीत वगैरेंचा महापूर सोशल मीडियावर आला आहे. गंमतीचा भाग म्हणजे कधीकाळी रोहिंग्यांना आश्रय द्या म्हणणारी त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारी मंडळी, बांगलादेशातील हिंदू निर्वासित लोकांना भारतात आश्रय दिला तर समस्या निर्माण होतील म्हणून फेसबुकवर पोस्टी खुरडत आहेत. मुस्लिम समाजाचे कितीतरी विचारवंत इस्लाम धर्म शांततेचा पुरस्कार करतो, प्रचार प्रसार करतो म्हणून व्याख्यानं देतात. लिहितात. मुस्लिम सत्यशोधक चळवळीत कित्येक हुशार विचारशील मंडळी आहेत. ते नेमकं सध्या कशाची वाट बघत आहेत?
असो. त्यांचे जे काही तर्क असतील त्यांच्यापाशी. 'गंगा जमुना तहजीब' मातीमोल होण्यास दोन्हीकडील मंडळी जबाबदार आहेत. त्यामुळे ही न संपणारी चर्चा आहे. तूर्तास इतकेच.

जसा इस्लामी कट्टर पंथीय संघटनेचा/लोकांचा वापर आशिया खंड कसा अस्थिर राहील यासाठी होतो. तसाच आशियाई देशांमध्ये एकाधिकारशाही वाढल्याने अंतर्गत कलह कुरबुरी वाढू लागतात यांचाही परिणाम होत असावा. बांग्लादेशात जे घडलं त्यांचे आर्थिक कारणं जशी आहेत तसेच राजकीय कारण पण आहे. लोकशाहीचा बुरखा घालून एकाधिकारशाही हुकुमशाही सत्ता टिकवणं महागात गेले. हॅपीनेस इंडेक्स, वाढललेला जीडीपी, टेक्सटाइल उद्योगवाढ वगैरे जमेच्या गोष्टी धुळीस मिळाल्या. म्हणजे भारताच्या आजूबाजूला ज्या देशात राजकीय उलथापालथ होते, उदाहरणार्थ पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका वगैरे त्यांचे परिणाम येनकेनप्रकारेन भारतावर होणार हे निश्चित. विशेषतः इशान्य भारताचा इतिहास भूगोल बघितला तर आग्नेय आशियातील किमान डझनभर देश भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्यापार, रस्ते, समुद्री मार्ग यावर लक्ष केंद्रित केले तर खूप मोठी बाजारपेठ भारताच्या प्रभावाखाली येईल. या छोट्या देशांना चीनपेक्षा भारताबद्दल जास्त विश्वास असेल. चीनची विस्तारवादी भुमिका जगजाहीर आहे. आशिया खंडातील सगळ्यात जास्त हॅपनिंग जे जे घडतं ते ते भारताच्या आजूबाजूला घडतं हे विशेष. या आधी अखंड रशियाचे तुकडे केले. आता पुतिनबाबा वडिलोपार्जित संपत्ती भावकीने लाटली म्हणून भावकीवर हल्ले करू लागलाय. ते एक तर्कट फार गुंतागुंतीचे आहे. युक्रेनच का? या प्रश्नाचे उत्तर शोधणं रंजक आहे. तसंच पानीपत का? या प्रश्नाचे उत्तर शोधणं रंजक असेल कारण तत्कालीन उत्तर भारतात ज्या महत्वाच्या लढाया झाल्या त्यात पानीपत महत्त्वाचे ठिकाण होते. (१५२६, १५५६ आणि १७६१ च्या लढाया) असो विषयांतर नको. पण आधी रशिया डळमळीत झाला आणि त्याचे फायदे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरांना भरपूर झाले. तसे भारताच्या आजूबाजूला देशातील अशांतता कोणाच्या पथ्यावर पडत असावी?

पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेश हे एकाच भूभागाचे केलेले तीन तुकडे. यातील व्यापार, उद्योग व्यवसाय गुंतवणूक, राजकीय स्थैर्य आशिया खंडातील सर्वात महत्त्वाचे व्यवहार आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य वेगळं होतात, स्वायत्तता हवी असते म्हणून पण प्रत्यक्षात वेगळं होऊन प्रगती केली तर ठिक. अधोगती झाली तर वेगळं होण्यासाठी आटापिटा कशासाठी केला हा यक्षप्रश्न आहे. आज पाकिस्तान आणि बांगलादेश महत्वाचे शेजारी जर गटांगळ्या खात असतील तर त्यांच्या मागे नेमकं कोण आहे आणि त्यांच्या सुप्त इच्छा काय आहेत? हे शोधणं महत्वाचे. त्यांच्या अस्थिरतेचा आपल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टींवर काय परिणाम होणार हे बघणं पण तेवढंच जिकिरीचे.

(एकूणच आशिया खंडातील देश आणि त्यांच्या सर्वसमावेशक व्यवहारांवर रूटलेज(टेलर ऍन्ड फ्रान्सिस ग्रुप) पुस्तकांची सिरिज अभ्यासली जाते. शिवाय ए.आर.आय एशिया रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्प्रिंजर सिरिज पण महत्वाचे दस्तऐवज आहे आशिया खंडातील घडामोडींची माहिती घेण्यासाठी. मॅकमिलन एशियन हिस्ट्री वर पण महत्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या बद्दल मराठी मध्ये लिखाण तुरळकच. जे काही असेल ते पाठ्यपुस्तकी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमानुसार. जाणकारांनी मराठी मधील साहित्य, पुस्तके असतील तर नक्कीच सांगावीत.)

© भूषण वर्धेकर
९ ऑगस्ट २०२४
पुणे

field_vote: 
0
No votes yet

आशिया कधी स्थिर होता हा खंड नेहमीच आर्थिक,सामाजिक बाबतीत अस्थिर असतो.

एक चीन सोडला तर आशिया खंडातील सर्व च देश .
गरिबी, सामाजिक असमानता, अस्थिर सरकार, कायदा सुव्यवस्था च बोजवारा , आर्थिक असमानता ह्याने ग्रासलेला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0