दिवाळी अंक २०२४ - आवाहन
नमस्कार,
सालाबादप्रमाणे यंदाही ऐसीचा दिवाळी अंक काढण्याचं घाटतं आहे. त्यासाठी ऐसीच्या सर्वच सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.
'ऐसी अक्षरे'वर दर्जेदार लेखन यावं अशी आमची कायमच इच्छा राहिलेली आहे. ऐसीचा दिवाळी अंक म्हणजे तर ऐसीच्या लेखकांच्या कौशल्याचं छोटेखानी प्रदर्शनच. त्यामुळे ते विशेष दर्जेदार व्हावं, दिवाळी अंक म्हणजे ऐसीच्या वाचकांसाठी मेजवानी वाटावी यासाठी आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न केलेले आहेत. गेल्या सर्वच अंकांत एकाहून एक सरस लिखाण आलं तसंच किंबहुना त्याहूनही सरस लिखाण यावं अशी आमची इच्छा आहे. पण उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे या दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मोबदला देण्याची इच्छा आहे. त्यायोगे ऐसीवरच्या चांगल्या लेखकांना प्रोत्साहन तर मिळेलच, पण इतर मान्यवर लेखकांकडूनही मानधन देऊन चांगलं लेखन मिळवता येईल.
एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जाबरोबरच त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेलं लेखन, एकंदरीत बजेट यानुसारही ठरेल. तसंच लिखाण कधी आमच्या हाती येतं हेही यावेळी महत्त्वाचं ठरेल. कोणी जर लिखाण पाठवलं तर ते आम्हाला नाकारायचं असल्यास त्यांना इतरत्र (जिथे मानधन मिळू शकेल अशा ठिकाणी) पाठवण्याइतका वेळ शिल्लक हवा. याचा अर्थ आमच्या हातात ते लेखन लवकर यायला हवं. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर ठेवलेली आहे. या तारखेच्या जितकं आधी तुमचं लिखाण आमच्या हाती येईल तितकाच आम्हाला त्यावर संस्करण करायला व स्वीकारायला वेळ मिळेल. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही विनंती.
दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा एक विचार आहे. इथे उल्लेख केलेल्या संकल्पनेवरच तुम्ही लिहायला हवं असं बंधन नाही. अंकाचा काही भाग ज्या संकल्पनेवर आधारित असेल ती ह्या धाग्यात दिलेली आहे. मात्र हा अंक केवळ त्याच विषयाला वाहिलेला असणार नाही. अंकाचा काही भाग ह्या विषयाला जरूर दिला जाईल असा अंदाज आहे. बाकीचा अंक विविध साहित्यानं नटलेला असेल. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं समजू नये. ललित/वैचारिक लेख, कथा, कविता, व्यक्तिचित्रं, फोटो, चुटके, व्यंगचित्रं, चित्रं आणि अन्य संकीर्ण प्रकार ह्या साऱ्यांचं स्वागत आहे. 'ऐसी अक्षरे'वर वेळोवेळी सादर केली गेलेली चित्रं आणि छायाचित्रं (फोटोग्राफ्स) वगैरेंद्वारे विविध प्रकारच्या दृक-श्राव्य कलांना आणि त्यांच्या समीक्षेलाही व्यासपीठ मिळावं असा आमचा प्रयत्न असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. ह्या प्रकारचं काही साहित्य असेल तर तेसुद्धा पाठवा.
आणखी एक नोंदवण्यासारखी गोष्ट - आम्हाला हा अंक म्हणजे कागदी दिवाळी अंकांची डिजिटल आवृत्ती अशा मर्यादित स्वरूपात सादर करायचा नाही. इंटरनेटच्या माध्यमात लिखित शब्दापलीकडे कितीतरी अधिक सामावता येतं. ह्या बलस्थानाचा शक्य तितका वापर करण्याचा मानस आहे. तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन, चलतचित्र, अॅनिमेशन, संगीत अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं. त्या दृष्टीनं तुम्हाला विनंती आहे की तुमचं योगदान देताना निव्वळ लिखित शब्दांचाच विचार करण्याची गरज नाही. ह्या अनुषंगानं तुमच्या आणखी काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचंही स्वागत आहे.
ललित किंवा अन्य प्रकारच्या लेखनातही काही फोटो, चित्रं, स्केचेस टाकण्याची इच्छा आहे, पण आपण चित्रकार/फोटोग्राफर नाही अशी अडचण असेल तर कृपया संपर्क साधावा. लिखाण पूर्ण झालेलं नसलं तरीही थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर काय प्रकारची स्केचेस/चित्रं टाकता येतील ह्याचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. ज्यांना लेख व कथांसाठी चित्रं काढून देण्याची इच्छा असेल अशांना विशेष आवाहन आहे.
कालमर्यादा - ३० सप्टेंबर २०२४
लिखाण ऐसी अक्षरेला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे. aisiakshare@gmail.com लेखन पाठवताना पीडीएफ पाठवू नयेत; इमेलचा मजकूर म्हणून अथवा वर्ड फाईल, अथवा गूगल डॉक म्हणून पाठवावे.
लिखाण युनिकोडमध्ये असणे आवश्यक आहे. वेगळ्या फाँटमधले किंवा हस्तलिखित स्वीकारले जाणार नाही.
आता थोडं यंदाच्या दिवाळी अंकाच्या विषयाबद्दल.
ढोबळ मानाने बोलायचं तर यंदाचा ढोबळ विषय "सोशल मीडिया" असा आहे. विषय इतका ढोबळ आहे की त्याला the elephant in the room असं म्हणणं हे हत्तीच्या आकाराचं ढोबळ आहे. ७००-८०० कोटींची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या ह्या ग्रहावर काही कोटी लोकांचा सन्माननीय अपवाद वगळतां प्रत्येकाचं ऑनलाईन अस्तित्व आहे. आणि कमी अधिक फरकाने सोशल मीडियावर अकाउंट देखील. स्मार्ट फोन्स, फास्ट इंटरनेट आणि सोशल मीडिया वेबसाईटस ह्या गोष्टी आता अंगवळणी पडल्या आहेत. काही लोकांच्या लेखी सोशल मीडिया ही गोष्ट कालबाह्य, कंटाळवाणी झालेली आहे. काहींना त्याचं व्यसन आहे. सोशल मीडिया नसताना जग कसं होतं त्याच्या आठवणींनी काही लोक नॉस्टॅल्जिक होतायत. पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची सोशल मीडियाची नव्हाळी संपली आहे. हिरीरीने काही करावंसं, तिथे "असावंसं" वाटणं हे कमी झालेलं आहे. ह्या वर्षांमधे सोशल मीडियावरच्या बऱ्या वाईट गोष्टींचा ऊहापोहही होताना आपल्याला दिसतो. पण बरंच चर्वितचर्वण करून झाल्यावर अजूनही हा विषय चालू आहेच. सोशल मीडियामुळे अनेकांच्या आयुष्यात बदल घडला; सोशल मीडियाचं स्वरूप बदलत गेलं; त्याबद्दलच्या आपल्या अपेक्षाही बदलत गेल्या; सोशल मीडियाच्या वयाची मुलं आता मतदार व्हायला लागली आहेत. तर अशा सर्वाला व्यापून परत दशांगुळे उरलेल्या गोष्टीबद्दलच्या आजच्या स्थितीबद्दल काही मांडता यावं असा आमचा प्रयत्न आहे. तुम्हां सर्वांचं ह्यात स्वागत आहे.
अंकाच्या विषयावरचं - अथवा इतर कुठच्याही विषयावरचंही - लिखाण केलं तरी ते शक्य तितक्या लवकर पाठवावं ही विनंती.
धन्यवाद,
संपादन मंडळ, 'ऐसी अक्षरे'.