अमेरिकन मराठी म्हणी - अडाजेस
काल प्रवासात मनोरंजन म्हणून काही जुळवाजुळव्या केल्या, इथे डकवतो आहे, आवडल्यास पुढे वाढवा!
--
दिसता कॉप कारची झालर
मुकाट्याने वेग आवर
+
ज्याच्या हाती डॉलर
त्याची ताठ कॉलर
+
वाचेल पैसा बक्कळ
डेंटल इंप्लांटसाठी भारतात पळ
+
वाट कॉस्टकोची धरा
माल कुदडून वापस करा
+
मिलर लाईट
वातावरण टाइट
+
अनुदानाचे होतील लाड
मायनॉरिटीचे कार्ड काढ
+
टोयोटा होंडा येती घरा
तोचि दिवाळी दसरा
+
नजरेने टाकू नका डाका
बनू नका पर्व्हर्ट काका
प्रतिक्रिया
ठीक
म्हणी/अडाजेस बॉर्डरलाइन मनोरंजक आहेत.
ही ठीक आहे.
छे हो, कसचे काय!
बोले तो, ही म्हण एके काळी खरी असेलही; नव्हे, अगदी कोविडपूर्व काळापर्यंत खरी म्हणता येण्यासारखी होती. परंतु... हल्ली बाजारभाव (दाल-चावलपासून मोटारींपर्यंत सगळ्याचेच) काय झालेत, बघितलेत? पूर्वीचा अमेरिकन डॉलर राहिला नाही आता. इन्फ्लेशनने म्हणा, की आणखी कशाने म्हणा, पूर्ण वाट लागलेली आहे.
पूर्वी म्हणजे कसे असायचे, की साध्या मध्यमवर्गीय डॉलरधारक कुटुंबाने, पुढचामागचा फारसा विचार न करता महिन्यातून बऱ्याचदा रेष्टॉरंटांतून खाल्ले-प्याले-चंगळ केली, एकंदरीत मजा मारली, तरी महिनाअखेरीस पैसे उरायचे. आता अगदी दरिद्री अवस्था जरी अद्याप आलेली नसली, तरी कोठलीही फ़िज़ूलखर्ची करण्यापूर्वी त्याच साध्या मध्यमवर्गीय डॉलरधारक कुटुंबाला दहादा विचार करावा लागतो, अगदी नवराबायको दोघेही छानपैकी मिळवते नि अतिरिक्त जबाबदाऱ्या/खर्च (घरभाडी/मॉर्टगेज/मुलांची शिक्षणे वगैरे) डोक्यावर नसली, तरीही. नाहीतर महिनाअखेरीस जमाखर्चाचा ताळमेळ जमविताना नाकी नऊ तरी येतात, नाहीतर बँकखात्याचा जाऊ द्या, परंतु क्रेडिटकार्डाचा बॅलन्स मात्र वाढत जातो. (पूर्वी असे नव्हते. कोठे नेऊन ठेवला आहे डॉलर माझा!) परंतु, येथे कोणाला पडलेली आहे?
(तरी बरे, ती तुमची काय ती 'ब्रिक्स करन्सी' की काय ती पुढेमागे येऊ घातलेली आहे म्हणतात ना, डॉलरची मारून ठेवण्यासाठी, तिचा विचार येथे केलेला नाही. अर्थात, तिचेही येथे कोणाला काहीच पडलेले नाही, म्हणा!)
थोडक्यात: कसला डॉलर? पूर्वपुण्याईवर अद्याप जिवंत आहे, इतकेच. परंतु, त्याच्या भरवश्यावर कॉलर ताठ ठेवण्याइतका दम त्याच्या पार्श्वभागात आता राहिलेला आहेसे वाटत नाही. असो.
यात नेमके काय वावगे आहे?
सफरचंदांची सफरचंदांशीच तुलना करायची जर म्हटली, तर, सगळेच्या सगळे दात जर बदलून घ्यायचे झाले, तर, ती तुमची ऑल-ऑन-फोर की काय ती प्रोसीजर म्हणतात ना, तिचा खर्च वरचेखालचे दात मिळून चाळीस हजार डॉलरच्या घरात जातो. (दंतविमा ही प्रोसीजर माझ्या माहितीप्रमाणे कव्हर करीत नाही.) भारतात तीच प्रोसीजर माझ्या माहितीप्रमाणे तीनचार हजार डॉलरच्या समतुल्य रुपयांच्या घरात जावी. (चूभूद्याघ्या.) ठीक आहे, त्याकरिता सुट्टी घेऊन भारतात दोन खेपा माराव्या लागतात, तो वेळ नि जाण्यायेण्याचा खर्च जरी एकूण खर्चात गृहीत धरलात, तरीसुद्धा मामला तुलनेने खूपच फायद्यात पडतो. कोणी का करू नये?
(च्यामारी, चाळीस हजार डॉलर एकहाती उडवायला जर माझ्याजवळ असते, तर आतापावेतो मर्सिडीज नसती घेतली?)
कॉस्टकोतून (तुलनेने स्वस्तात पडतो, म्हणून) माल विकत घ्यायचा, तो काही दिवस वापरायचा, वाटले तर त्यानंतर एखादी इंडिया ट्रिप मारून भारतात तो चारचौघांत मिरवायचासुद्धा, नि मग त्यानंतर (कॉस्टकोच्या (मर्यादित निर्बंध वगळता) विकलेला माल कोठलेही प्रश्न न विचारता कधीही परत घेण्याच्या धोरणाचा (गैर)फायदा घेऊन) तो निर्लज्जपणे परत करायचा, अशी अनेक भारतीयांची (विशेषेकरून गुजराती लोकांची) वृत्ती असल्याबद्दल एक जुनीच (तथा लोकप्रिय) वदंता आहे खरी. (कदाचित काही अंशी तीत तथ्यही असावे. नि हे केवळ गुजरात्यांपुरते आणि/किंवा भारतीयांपुरते मर्यादितही नसावे.)
मात्र, एकंदरीत, यामागील हिशेब मला कळत नाही. बोले तो, कॉस्टको हा एक मेंबरशिप वेअरहाउस क्लब आहे. तेथे वस्तू तुलनेने स्वस्त मिळतात, हे जरी खरे असले, तरी तेथे खरेदी करण्याकरिता तेथील सदस्य असावे लागते, नि त्याकरिता वार्षिक सदस्यत्वाची फी भरावी लागते, नि ती फी थोडीथोडकी नसते. (सदस्यत्व घ्यायचे नसेल, तर मग प्रत्येक वेळेस तेथे जाताना एखाद्या सदस्याला पकडून त्याला बरोबर घेऊन (त्याचा 'गेस्ट' म्हणून) जायचे, नि हवा तो माल निवडून झाल्यावर सरतेशेवटी तो माल खरेदी करताना त्या सदस्याने तो खरेदी करायचा नि मग आपण त्याला पैसे द्यायचे, असले उद्योग करावे लागतात. तो भाग सोडून देऊ.)
आता, तेथे मिळणाऱ्या मालापैकी, कपडे, पलंग, मोठी/महागातली इलेक्ट्रॉनिक्स (कॅमेरे, टीव्ही, वगैरे), (जेथे उपलब्ध असेल तेथे) दारू, असे काही तुरळक अपवाद वगळले, तर बहुतांश गोष्टी या घाऊक भावात/मोठ्या प्रमाणात विकत घ्यावा लागतात. (दोघाजणांच्या घरात तीन महिने पुरतील एवढे टॉयलेट पेपर, महिनाभर पुरेल एवढी कोंबडी, किंवा साधे हर्शीजचे चॉकलेट घ्यायचे झाले, तरी छत्तीस बारचा एक खोका, वगैरे.) किरकोळीत फारसे काही मिळत नाही. आता, समजा, माझे कुटुंब छोटे आहे, नि त्यात पुन्हा माझे घरही छोटे आहे. तीन महिन्यांचा टॉयलेट पेपरचा सप्लाय एका वेळेस विकत घेतल्यास प्रतिरोल तो कोपऱ्यावरच्या सुपरमार्केटाच्या तुलनेत बराच स्वस्त पडतो, हे जरी खरे असले, तरीसुद्धा, त्याकरिता कोपऱ्यावरच्या सुपरमार्केटाऐवजी सातआठ मैलांवरच्या कॉस्टकोत मी काय म्हणून जाऊ? आणि, तीन महिन्यांचे टॉयलेट पेपर एकदम आणून माझ्या घरात मी कोठे ठेऊ? बाकी, माझ्या घरातले अर्धे सदस्य जर शाकाहारी असतील, नि उरलेले अर्धेसुद्धा जी काही कोंबडी-गाय-डुक्कर खायचे ते अर्ध्याहून अधिक वेळेस घराबाहेर खात असतील, नि प्रत्यक्षात घरात कोंबडी (कधी बनलीच तर) सठीसहामाशी एखादवेळेसच जर बनत असेल, तर एकदम महिन्याभराची कोंबडी आणून तिचे मी करू काय? मग ती कोंबडी (एखादवेळेस एखादा तुकडा वापरून झाल्यावर उरून, पुढच्या वेळची वाट पाहात) माझ्या फ्रीझरमध्ये महिनोन् महिने जागा अडवून ('फ्रीझ इट, फरगेट इट' तत्त्वावर) नुसती पडून राहणार, एखादे दिवशी खराब होणार, नि पुढच्या वेळेस आठवण झाली की मी ती फेकून देणार. मग ती मला नक्की स्वस्त पडली का? की त्यापेक्षा कोपऱ्यावरच्या सुपरमार्केटातून एखाद्याच वेळेस पुरेल इतकी आणलेली अधिक स्वस्त पडली? (कॉस्टकोपर्यंत जाण्याचे सातआठ मैलांचे अंतर नि त्याकरिता खर्च झालेले पेट्रोल येथे हिशेबात धरलेले नाही.) तीच गोष्ट इतर अन्नपदार्थांचीसुद्धा. मोठ्या प्रमाणावर विकत आणून ते खराब होण्याच्या आत संपविण्याची जर माझी कुवत नसेल, तर त्याचा मला उपयोग काय?
चॉकलेट खायची हुक्की मला क्वचित कधीतरी येणार. त्याकरिता मी ३६ चॉकलेटांचा खोका (तोही हर्शीजचा!) घरात काय म्हणून ठेवू?
हं, क्वचित कधी घरात काही कार्यक्रम असेल, बरेच लोक बोलवायचे असतील, नि त्याकरिता मोठ्या प्रमाणावर जर काही गोष्टी आणायच्या असतील, तर ते स्वस्तात पडते खरे. पण असे प्रसंग किती वारंवार येतात?
ज्यांची मोठी कुटुंबे आहेत, आणि त्यामुळे रोजच्या ग्रोसऱ्यासुद्धा ज्यांना मोठ्या प्रमाणावर विकत घ्याव्या लागतात, त्यांच्याकरिता हा उत्तम पर्याय आहे, हे मी नाकारीत नाही. परंतु, मला काय त्याचे?
असा जर हिशेब करीत गेले, तर माझ्या उपयोगाच्या ज्या वस्तू मी कॉस्टकोत (किंवा सॅम्सक्लबात, किंवा बीजेत) विकत घेतल्याने मला फायद्यात पडू शकते, त्यांची यादी फारच छोटी भरते. आणि त्याकरिता (१) ती वार्षिक वर्गणी देणे, आणि (२) दर वेळेस सातआठ मैल जाणे, हे माझ्या हिशेबात फायद्याचे बसत नाही.
(हे कॉस्टको, सॅम्सक्लब वगैरे प्रकार, केवळ इतर लोक करतात म्हणून पूर्वी अनेकदा करून झालेले आहेत. नंतर अनुभवाने थोडीथोडी अक्कल येऊ लागली. हे अगदी टाकाऊ पर्याय आहेत, असे मी अजिबात म्हणणार नाही. अनेकांना ते प्रचंड फायद्याचेही ठरू शकतात. परंतु, आपल्याला त्याचा प्रत्यक्ष उपयोग कितपत होतो, त्याचा हिशेब प्रत्येकाने आपापल्या परीने करायचा असतो. तर ते एक असो.)
तर सांगण्याचा मतलब, केवळ लिबरल रिटर्न पॉलिसी आहे, म्हणून, दर दोनतीन महिन्यांना (पूर्वीचा परत करून) नवीन शर्ट किंवा नवीन फर्निचर, किंवा (पूर्वीचा परत करून) नवीन कॅमेरा/टीव्ही वगैरे, या 'चैनी'करिता ती वार्षिक फी भरणे हे खरोखर कितपत फायद्याचे आहे? आणि, हे वारंवार करू लागल्यास, ते लक्षात येऊन, तुमचे सदस्यत्व रद्द करण्याचा पर्याय मला वाटते ही कॉस्टको, सॅम्सक्लब वगैरे मंडळी तसाही राखून ठेवत असणारच. (इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तशीही परत करण्याकरिता मला वाटते काही मुदत आहे, नि फर्निचरवर ते परत करताना कोठल्या किमान अवस्थेत परत करता येईल, यावर निर्बंध आहेत.) म्हणजे, वस्तू परत घेण्याच्या धोरणाचा गैरफायदा घेणे कितीही शक्य आहे जरी म्हटले, तरीही, पकडले जाऊन नि हाकलले जाऊन ही 'सुविधा' बंद होण्याची शक्यता लक्षात घेता, हे अतिवारंवार करणे कितपत शक्य असावे? नि, क्वचितच करायचे झाले, तर होणाऱ्या फायद्यातून ती वार्षिक फी तरी निघेल काय?
असो.
मिलर लाइटनेसुद्धा तुमचे वातावरण जर टाइट होत असेल, तर मग कठीण आहे तुमचे! (या हिशेबाने, 'बड लाइट पिऊन बळवंतराव रस्त्याने झोकांड्या खात चालले होते' असली वर्णनेही पुढेमागे वाचण्याची मानसिक तयारी आतापासूनच करून ठेवीत आहे.)
(च्यामारी, मिलर लाइटने वातावरण (किंवा आणखी काही) टाइट व्हायला मुळात किती मिलर लाइट ढोसावी लागेल? घाला बोटे! मोजा पाहू! आणि, तितकी ती ढोसल्यावर, वातावरण (किंवा आणखी काही) टाइट होण्याअगोदर, ती ढोसणाऱ्याला जोरदार (नि घाईची) मुतायला लागणार नाही काय?
की, 'वातावरण टाइट'मधून तशी ती जोरदार (नि घाईची) मुतायला लागण्याकडेच (आणि, कदाचित, मुतायची सोय नेमकी ऐन वेळी उपलब्ध नसण्याकडे) रोख आहे?)
याच्या स्पष्टीकरणाची मला वाटते गरज आहे.
अमेरिकन देशी लोकांत हे दोन ब्राण्ड सर्वात अधिक पॉप्युलरांपैकी आहेत, हे खरेच. परंतु... हल्लीचे भाव पाहिलेत?
याचा रोख नक्की कोणाकडे आहे, ते कळले नाही. त्यामुळे, प्रतिक्रिया राखून ठेवीत आहे.
बाकी चालू द्या.
ढिसाळ
गावातल्या / एरियातल्या मरतुकड्या डॉनसाठी “एकच फाइट / वातावरण ताईट” सारख्या मजेशीर घोषणा दिल्या जातात - हा संदर्भ लक्षात घेतला तर मिलर लाईट म्हण्डाज कदाचित लक्षात येईल. अर्थात ही म्हण मांडून पट्टीच्या ठर्रेबहादुरांची मनं दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता हेही :).
अंकल पर्व्ह / मायनॉरिटी स्मॉल बिझनेस ग्रान्टस /लोन्स इ. संदर्भ माहिती नसतील तर ठीक आहे. गोष्टी माहीत नसणे हा काही गुन्हा नाही.
एखाद्या प्रचलनात वावगं काही आहेच असं दाखवणं हा म्हणीचा दरवेळी उद्देश नसतो. म्हणी कधी निव्वळ निरीक्षणे असतात, क्वचित टीकात्मक असतात, कधी त्या उपहास करतात तर कधी हितोपदेश. कुठल्याही गोष्टीतून काय घ्यायचं हे आपल्यावर आहे.
हा धागा मुख्यतः मनोरंजनपर आहे, हे भान अपेक्षित ! आणि हो, नव्या माहितीबद्दल यु आर वेलकम.