Skip to main content

तुझ्यासारखी

तुझ्यासारखी दिसली एखादी की मी वेडा होतो
तुझ्यासारखी हसली एखादी की मी वेडा होतो.

गर्दीविषयी बाकी माझी काहीच तक्रार नाही
तुझ्यासारखी नसली एखादी की मी वेडा होतो.

तीळ तीळ काळीज तुटणे काय असते कळते
तुझ्यासारखी फसली एखादी की मी वेडा होतो.

हलाहल सारे पचवून मी समाधीस्थ आहे पण
तुझ्यासारखी डसली एखादी की मी वेडा होतो.

शहाणपणाची झूल जगाने मजवर बळेच टाकली
तुझ्यासारखी असली एखादी की मी वेडा होतो.