अमेरिकन निवडणुकांमधली मर्दानगी
अमेरिकन निवडणुकांमधली मर्दानगी
- भ्रमर
हा लेख लिहायला सुरुवात करताना, म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम चरणाच्या सुरुवातीपर्यंत, म्हणजे beginning of the end म्हणता येईल अशा टप्प्यापर्यंत पोचली आहे. ट्रंप यांच्या खुनाचा प्रयत्न, जो बायडेननी आपल्या पक्षातून आलेल्या दबावाला बळी पडून निवडणुकीतून घेतलेली माघार, आणि कमला हॅरिस यांचा अचानक निवडणुकीच्या रिंगणात झालेला प्रवेश या मागच्या सात आठवड्यांत बसलेल्या धक्क्यांनंतर या निवडणुकीची बोट अंमळ स्थिरावून पुढच्या दोन महिन्यांत निकालाच्या किनाऱ्याकडं वेगानं मार्गक्रमण करायला सज्ज झाली आहे. अगदी या क्षणाचं बोलायचं झालं तर रिपब्लिकन उमेदवार ट्रंप आणि डेमोक्रॅटिक उमेदवार हॅरिस यांच्या विजयाच्या शक्यता ५०-५० आहेत. 'ऐसी'चा दिवाळी अंक प्रकाशित होईल तेव्हा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असेल आणि कदाचित तेव्हाचं चित्र वेगळंच असेल. पण निवडणुकीचा निकाल काय लागू शकेल किंवा त्यामुळं अमेरिकेवर आणि जगावर कोणते दूरगामी परिणाम होतील यावर पांडित्यप्रचुर भाष्य करणं हा या लेखाचा उद्देश नाही, तर या निवडणुकीच्या प्रचारात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन बाजूंकडून एक विशिष्ट पैलू किती भिन्न प्रकारे समोर येतोय याबद्दलची काही निरीक्षणं या लेखात नोंदवायची आहेत. तो पैलू आहे पुरुषत्व, मर्दानगी, masculinity.
अमेरिकेच्या राजकारणात पारंपरिक दृष्ट्या रिपब्लिकन पार्टीला 'डॅडी पार्टी' आणि डेमोक्रॅटिक पार्टीला 'मॉमी पार्टी' समजलं जातं. ही नावं अर्थातच त्यांना त्यांच्या धोरणांमुळं मिळाली आहेत. डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे मऊ, प्रेमळ, कनवाळू – सगळ्यांच्या शिक्षणाची, तब्येतीची काळजी घेणारी, त्यांची मनं जपणारी, हक्क जपणारी, तर रिपब्लिकन पार्टी कठोर, रुक्ष – बाहेर जाऊन काम करणारी, पैसे कमावणारी, सगळ्यांना सुरक्षित ठेवणारी. त्यामुळं मर्दानगीवर मक्ता म्हणायचा झाला तर रिपब्लिकन्सचा राहिला आहे. याआधीचे रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, रोनाल्ड रेगन यांची रफ अँड टफ काऊबॉय इमेज काही वाचकांना आठवत असेल. डोनाल्ड ट्रंप यांनीही त्यांची मर्दानी प्रतिमा जाणीवपूर्वक लोकांच्या समोर झळकवली आहे. रुंद छातीचा, बळकट खांद्यांचा कणखर नेता, तो सत्तेवर असताना अमेरिकनांना काहीही कमी पडणार नाही, त्याच्याइतकं अमेरिकनांना सुरक्षित कुणीच ठेवू शकणार नाही, अमेरिकेकडं डोळा वर करून बघायची कुणाचीही हिंमत होणार नाही, सगळं जग त्याच्या धाकात राहील… मग त्यानं सभ्यतेची आणि सुसंस्कृतपणाची बंधनं पाळली नाहीत; प्रतिस्पर्ध्यांवर टोकाचे शाब्दिक आणि व्यक्तिगत छापाचे हल्ले केले; लोकांना धमक्या दिल्या; दुबळ्या लोकांची खिल्ली उडवली; स्त्रियांची हेटाळणी केली; त्यांच्याबद्दल अगदी शिवराळ लैंगिक शेरेबाजी केली; अगदी एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून काय बिघडलं! (एलिझाबेथ जीन कॅरल नावाच्या स्त्रीवर ट्रंप यांनी १९९५/९६ साली बलात्कार केल्याचं न्यूयॉर्कच्या दिवाणी न्यायालयानं २०२३मध्ये मान्य केलं आणि कॅरलला त्याची नुकसानभरपाईही मिळाली.) या खेपेस ट्रंप तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत आणि या वेळीही त्यांची तीच प्रतिमा मध्यवर्ती आहे. मागच्या दोन रिपब्लिकन मेळाव्यांमध्ये ट्रंप यांची ओळख त्यांच्या मुलीनं करून दिली होती, तर या वेळी ती दिली डेना व्हाईट या 'अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप' नावाच्या मार्शल आर्टशी संबंधित संस्थेच्या सीईओनं. याच कन्व्हेन्शनमध्ये हल्क होगन या निवृत्त डब्ल्यूडब्ल्यूएफ चॅम्पियननं ट्रंपना पाठिंबा दर्शवताना स्टेजवर आवेशात आपला शर्ट फाडून मोठ्यानं आरोळी ठोकली. व्हाईट आणि हल्क होगन ही दोघंही एका विशिष्ट वर्गाला आवडणाऱ्या, बटबटीत, 'in your face' मर्दानगीची प्रतीकं.
याउलट डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांनी या मुद्द्याबाबत वेगळा, सावध पवित्रा घेतल्याचं दिसतं. २०१६मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी जेव्हा हिलरी क्लिंटन पहिल्या स्त्री उमेदवार म्हणून उभ्या होत्या तेव्हा त्यांच्या प्रचारमोहिमेत त्या स्त्री असण्याला प्रचंड प्राधान्य देण्यात आलं होतं. त्यांच्या उमेदवारीमुळं किंवा त्यांच्या संभाव्य विजयामुळं कसं 'ग्लास सीलिंग' फोडलं गेलेलं आहे किंवा जाणार आहे हे वारंवार बोललं गेलं होतं. 'I am with her' असं त्यांच्या प्रचारमोहिमेचं एक घोषवाक्यही होतं. पण त्यामुळं एकीकडं अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला कणखरपणा, खंबीरपणा दाखवताना आपण 'पुरुषी' किंवा afeminine वाटणार नाही याचं भान त्यांना ठेवावं लागलं होतं. हॅरिस यांच्या उमेदवारीला त्या स्त्री असण्याबरोबरच भारतीय आणि कृष्णवर्णीय वंशाच्या पहिल्याच उमेदवार असण्याचंही ऐतिहासिक परिमाण आहे. तरीही त्या प्रचार करताना आपल्या अशा जन्मदत्त ओळखीवर फारसा भर देत नाहीत, किंवा त्याच्या जोरावर मतं मागत नाहीत. 'लिंग आणि वर्ण यांच्या पलीकडं जाऊन आत्ता अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष व्हायला मीच सर्वांत योग्य उमेदवार आहे' असं त्या ठामपणे सांगतात. आपण आपल्या 'भारतीय आणि कृष्णवर्णीय वंशाची स्त्री' अशा ओळखीवर जास्त भर देत बसलो तर गोरे लोक आणि पुरुष आपल्याला मत द्यायला कचरतील आणि ट्रंप यांच्याकडं वळतील हे त्यांचं यामागचं गणित आहे. म्हणूनच डेमोक्रॅटिक पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्या गडद निळ्या रंगाचा पॉवर सूट घालून आल्या आणि तेव्हा केलेल्या भाषणात त्यांनी 'मी निवडून आले तर अमेरिकेचं सैन्य जगात सगळ्यांत शक्तिशाली असेल आणि अमेरिकेच्या आतल्या आणि बाहेरच्या शत्रूंना कठोर शासन करायला मी मागंपुढं बघणार नाही' अशी ठासून खात्री दिली. अर्थात आपण स्त्री असण्यावर त्या जास्त जोर देत नसल्या तरी एका मुद्द्यावर मात्र त्या स्त्रियांमध्ये जोरदार प्रचार करतायत तो म्हणजे स्त्रीचा गर्भपाताचा हक्क किंवा एकूणच प्रजननाचं स्वातंत्र्य. यामागची पार्श्वभूमी अशी की १९७३ साली 'रो विरुद्ध वेड' या ऐतिहासिक खटल्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला होता की अमेरिकन घटनेनं देशाच्या नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्या गर्भाचं काय करायचं हे ठरवायच्या हक्काचाही समावेश होतो. त्यानंतर बरीच वर्षं हा निर्णय प्रसूतीहक्कांच्या संदर्भात मापदंड मानला गेला आणि सर्वोच्च न्यायालयानंही त्याचा पुनर्विचार केला नाही. पण ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांना सर्वोच्च न्यायालयावर तब्बल तीन नवे सनातनी (कॉन्सर्व्हेटिव्ह) न्यायाधीश नेमायची संधी मिळाली. त्यामुळं ९ न्यायाधीश असलेल्या या न्यायालयाचा तराजू ६ सनातनी तर ३ उदारमतवादी (लिबरल) असा एका बाजूला झुकला. आणि या बदललेल्या चेहऱ्याच्या न्यायालयानं २०२२ साली 'रो विरुद्ध वेड' हा निर्णय उलटवला – म्हणजे असा निर्णय दिला की घटनेनुसार गर्भाचं काय करायचं, गर्भपात करायचा की नाही हे ठरवायचा देशव्यापी अधिकार स्त्रियांना मिळत नाही. यासंदर्भात आपल्या रहिवाशांसाठी कायदे करण्याचा हक्क अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला आहे. जीवनवादी (प्रो-लाईफ) गटासाठी हा प्रचंड मोठा विजय होता तर पर्यायवादी (प्रो-चॉईस) गटासाठी पराभव. यानंतर १४ अमेरिकन राज्यांनी गर्भपात जवळजवळ सगळ्याच परिस्थितींमध्ये बेकायदा ठरवणारे कायदे मंजूर केले. यातल्या बऱ्याच कायद्यांमध्ये गर्भपाताशी संबंधित वैद्यकीय सेवा पुरवणं हाही गुन्हा ठरवण्यात आला. ट्रंप यांनी अर्थातच याचं श्रेय स्वतःकडं घेतलंय आणि राज्यांना आपल्या रहिवाशांसाठी हे ठरवायचा हक्क मिळणं हेच कसं योग्य आहे हे ठासून सांगितलंय. पण प्रत्यक्षात मात्र या निर्णयाचा स्त्रियांना आणि पर्यायानं त्यांच्या कुटुंबांना प्रचंड त्रास झालाय; होत आहे. गर्भपातासाठी त्यांना मैलोन्मैल प्रवास करून दुसऱ्या राज्यांत जावं लागलंय, वैद्यकीय सेवा मिळण्यावर निर्बंध आलेयत. नुकतंच जॉर्जिया राज्यात यामुळे दोन स्त्रियांनी प्राण गमावल्याचंही समोर आलंय. हॅरिस यांनी 'रो विरुद्ध वेड' उलटवल्यानंतर स्त्रीला पुन्हा गर्भपाताचा हक्क मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेचं नेतृत्व स्वीकारलंय, 'स्वतःच्या शरीराबद्दल काय करायचं हे ठरवायचा हक्क स्त्रीला आणि तिच्या डॉक्टरांना हवा, तिच्या राज्य सरकारला नाही' असा ठोस पवित्रा घेतलाय, आणि आपण निवडून आलो तर पुन्हा हा हक्क देशातल्या सगळ्या स्त्रियांना मिळेल असं ठाम आश्वासन दिलंय. या मुद्द्यावरून त्यांना 'प्रो-चॉईस' जनतेचा भरपूर पाठिंबा मिळतोय.
पण एकीकडं हॅरिस निवडणुकीत स्वतःच्या स्त्रीत्वाचा पत्ता न खेळायची भूमिका घेतायत तर त्यांच्या आजूबाजूचे पुरुष मात्र पुरुषत्वाची, नवरेपणाची एक वेगळी बाजू आवर्जून दाखवतायत – जोडीदाराचा आदर करणारा एक सहृदयी, सौम्य नवरा; घरातल्या गोष्टींमध्ये पत्नीइतकाच सहभाग घेणारा पती; एक जोडपं म्हणून आपण केलेल्या वाटचालीबद्दल भावुक होणारा जोडीदार; मुलं होण्यासाठी कराव्या लागलेल्या प्रयत्नांबद्दल मोकळेपणानं आणि संवेदनशीलपणे बोलणारा पुरुष. याबाबत हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांचं उदाहरण लक्षणीय आहे. एकीकडं हॅरिस यांच्या प्रगतीबद्दल, त्यांच्या महत्त्वाकांक्षेबद्दल त्यांना असलेला अभिमान दाखवताना 'आपण बायकोच्या ताटाखालचं मांजर नाही' हेही ते आवर्जून ध्वनित करतात. डेमोक्रॅटिक मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी 'मी फँटसी फुटबाॅलचा फॅन आहे, मी पूर्वी Nirvana या रॉक बँडचा फॅन होतो (थोडक्यात मी एक क्लासिकल 'पुरुष' – a man's man आहे) हे जसं त्यांनी आवर्जून सांगितलं, तसंच 'हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष झाल्यावर आपण स्वतःची भरभराटीला आलेला वकिलीचा व्यवसाय बंद करून प्राध्यापकी पत्करली' हेही अगदी सहजपणे सांगितलं. हॅरिस यांच्या गुणांचं भरभरून कौतुक करताना, आपण 'wife guy' आहोत हे हसत-हसत स्वीकारताना आपण कुठंही दुबळे किंवा नेभळे वाटत नाही आहोत हा तोल त्यांनी सांभाळला. पौरुषाचा हा 'ब्रँड' अनेक स्त्रियांना (आणि पुरुषांनाही) आवडलाय.
पण रिपब्लिकन पक्षाकडून दाखवल्या जाणाऱ्या पौरुषाच्या बटबटीत आवृत्तीला सगळ्यात जास्त चकवा कुणी दिला असेल तर ते हॅरिस यांनी आपल्याबरोबर उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवायला ज्यांना निवडलंय ते, मिनेसोटा राज्याचे गव्हर्नर टिम वॉल्स (Tim Walz) यांनी. वॉल्स गोरे आहेत, स्ट्रेट आहेत, त्यांचा जन्म मिडवेस्टमधल्या नेब्रास्का या कृषिप्रधान राज्यात झालाय. लहानपणी त्यांनी शेतात काम केलंय. बावीस वर्षं आर्मीत काम केलंय. नंतर शाळेत शिक्षकाची नोकरी करताना फुटबॉल संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करून त्या टीमला जिंकवून दिलंय; वॉल्स यांच्याकडं स्वतःची बंदूक आहे आणि ते उत्तम शिकारी आहेत (रिपब्लिकन पार्टीला आवडतील अशी) पुरुषत्वाची ठळठळीत वैशिष्ट्यं – dude things – त्यांच्यात अगदी ठासून भरलीयेत. पण तरीही वॉल्स यांच्या पुरुषत्वाचा ब्रँड वेगळा आहे. लोकांना बंदुका बाळगायचं स्वातंत्र्य असावं हे मान्य करताना त्यांनी आपल्या राज्यात बंदूक-नियमनाचेही कायदे केलेत, फ़ुटबॉल संघाचा प्रशिक्षक असतानाच ते शाळेतल्या विद्यार्थ्याच्या 'गे-स्ट्रेट अलायन्स'चेही (म्हणजे शाळेतल्या LGBTQ विद्यार्थ्यांना एक सुरक्षित वातावरण पुरवणारा समूह) शिक्षक सल्लागार होते; गर्भपाताच्या हक्कांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे; त्यांना आणि त्यांच्या पत्नीला नैसर्गिकरीत्या संतती होण्यामध्ये त्रास झाला आणि IVFची मदत घ्यावी लागली – तो काळ किती कठीण होता; आणि खूप प्रतीक्षेनंतर झालेल्या आपल्या मुलीचं नाव 'होप' का ठेवलं हे ते स्टेजवर मोकळेपणानं सांगतात आणि हे सांगताना त्यांना हुंदका येतो. गव्हर्नर (मुख्यमंत्रीपदाला समकक्ष) असताना त्यांनी सर्व शाळांमधल्या बाथरूमांमध्ये सॅनिटरी प्रोडक्ट्स ठेवण्यात यावेत (जेणेकरून मासिक पाळी चालू असलेल्या मुलींची गैरसोय होणार नाही) असा कायदा मंजूर करवून घेतला (ज्यावरून रिपब्लिकनांनी त्यांना 'टॅम्पॉन टिम' असं दूषण दिलं; ते त्यांनी भूषण म्हणून वापरलं!). वॉल्स यांचं एकूण व्यक्तिमत्त्व असं आहे की त्यांच्याकडं बघून वाटतं की ते आपल्याला आपली गाडी दुरुस्त करायला मदत करतील; आपल्या घरासमोर साठलेला बर्फ साफ करून देतील; पार्टीत उशीर झाला तर घरी सोडायला येतील; कुठंही भेटले तर मस्त गप्पा मारतील; आपण दुःखात असू तर आपलं सांत्वन करतील… सगळ्यांना आवडेल अशी एक 'डॅड एनर्जी' त्यांच्याकडं आहे. आणि पुरुषत्वाची ही आवृत्ती प्रचारात आत्तापर्यंत तरी लोकांना आवडलीय. आपल्या वडिलांपासून दुरावलेल्या किंवा 'डॅडी इशूज' असलेल्या काही लोकांनी वॉल्सना बघून 'असेच आमुचे बाबा असते' अशा छापाच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्यायत.
वॉल्स यांची ही प्रतिमा रिपब्लिकन बाजूचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांच्या प्रतिमेच्या तुलनेत तर अजूनच प्रकर्षानं उठून दिसते. फक्त ४० वर्षाचे व्हॅन्स ओहायो राज्यातल्या डोंगराळ भागात, 'हिलबिली' समाजात जन्मले. दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांनी गांजलेल्या या समाजातून बाहेर पडून त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं, सिलिकॉन व्हॅलीत नोकरी केली, आपल्या लहानपणच्या अनुभवांवर 'Hillbilly Elegy' नावाचं बेस्टसेलिंग पुस्तक लिहिलं (ज्याच्यावर त्याच नावाचा चित्रपटही निघाला), ट्रंप पहिल्यांदा निवडून यायच्या आधी त्यांना कडाडून विरोध करणारे व्हॅन्स नंतर ट्रंपभक्त झाले, त्यांच्या पाठिंब्यामुळं २०२२मध्ये ओहायो राज्यातून सिनेटवर निवडून आले आणि आता ट्रंप यांच्या बरोबर निवडणूक लढवत आहेत. व्हॅन्स वास्तविक ट्रंप यांच्यासारखी 'मॅचो' प्रतिमा प्रक्षेपित करत नाहीत, त्यांच्या एकूण आयुष्यावर असलेल्या त्यांच्या आजीच्या प्रभावाबद्दल ते मनापासून बोलतात, आपल्या प्रचारसभांना ते आपल्या पत्नीला आणि आईला घेऊन येतात, पण मुलं नसलेल्या जोडप्यांबद्दल, विशेषतः स्त्रियांबद्दल, व्हॅन्स यांनी वेळोवेळी अनेक कडवट उद्गार काढले आहेत – मुलं नसलेल्या स्त्रियांचं आयुष्य कसं दुःखी असतं आणि त्या कसं आपली तथाकथित उदारमतवादी मूल्यं दुसऱ्यांवर लादून दुसऱ्यांचं आयुष्य खराब करतात; मुलं नसलेल्या स्त्रियांच्या मताला कमी किंमत असली पाहिजे कारण भविष्य कसं घडणार आहे याचा त्यांना फारसा फरक पडणार नसतो; मुलं नसलेल्या स्त्रियांनी शाळांत आमच्या मुलांना शिकवू नये, त्यापेक्षा घरी बसावं – अशी त्यांची अनेक मुक्ताफळं समोर आलेली आहेत आणि त्यामुळं एक स्त्रीद्वेष्टा अशी काहीशी त्यांची प्रतिमा झालेली आहे. (इथं एका गोष्टीचीही नोंद करायला हवी की कमला हॅरिस यांनी मुलांना जन्म दिलेेला नाही; त्यांच्या नवऱ्याला पहिल्या लग्नातून झालेल्या दोन मुलांना त्या स्वतःची मुलं मानतात आणि ती मुलंही त्यांना 'मॉमला' असं संबोधतात)
जरी ट्रंप-व्हॅन्स यांच्या तुलनेत हॅरिस-वॉल्स यांच्या पुरुषत्वाचा ब्रँड समंजस वाटत असला तरी त्याचा सगळा फायदा डेमोक्रॅटांनाच होणार आहे असं अजिबात नाही. सध्या ज्या निवडणूकपूर्व जनमत चाचण्या घेतल्या जातायत त्यात मोठ्या फरकानं पुरुषवर्ग ट्रंपना तर स्त्रीवर्ग हॅरिसना पाठिंबा देतोय असंच दिसतंय. ही निवडणूक 'बॉईज व्हर्सेस गर्ल्स' अशीच होणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे ३५ वर्षांखालचे मिलेनियल आणि जेन झी पुरुषसुद्धा ट्रंप यांच्याकडं झुकतायत असं चित्र दिसतंय. पण याचा अर्थ असा नाहीये की हे पुरुष स्त्रीद्वेष्टे आहेत किंवा लैंगिक समानतेचे पुरस्कर्ते नाहीयेत. तर याचं कारण आहे की डेमोक्रॅट्स फक्त स्त्रियांच्या प्रश्नांचाच उदोउदो करतात, तरुण पुरुषांच्या समस्यांबद्दल फारसं बोलत नाहीत, पारंपरिक पुरुषत्वाच्या ज्या चांगल्या बाजू आहेत – उदाहरणार्थ, घर चालवण्यासाठी कमाई करणं, कुटुंबाला सुरक्षित ठेवणं, नि:स्वार्थीपणे एखाद्याला मदत करणं – त्यांची या नवीन 'मॉडेल'मध्ये पुरेशी दखल घेतली जात नाही असं या पुरुषांना वाटतं. आणि ट्रंप-व्हॅन्ससुद्धा ३५ वर्षांखालच्या पुरुषवर्गाला आपल्या बाजूनं वळवण्यासाठी, मतदानाला प्रवृत्त करण्यासाठी खास प्रयत्न करतायत. त्यासाठी ते अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपसारख्या 'मॅचो' खेळांच्या सामन्यांना जातायत, तसंच त्यांनी 'मॅनोव्हर्स' मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या Nelk Boys, लोगन पॉल यांसारख्या युट्युब इन्फ्लुएन्सर्स, पॉडकास्टर्सना हाताशी धरलंय. या लोकांच्या श्रोतृवर्गात/प्रेक्षकवर्गात मुख्यतः ३०-३५च्या खालच्या पुरुषांचा भरणा आहे. त्यांच्या कार्यक्रमांचं, तिथल्या गप्पांचं स्वरूपही या वर्गाला आवडेल असंच असतं. आता त्यात उजव्या बाजूच्या राजकारणालाही समावेश होऊ लागलाय. मग ट्रंप, व्हॅन्स अशा पॉडकास्टवर जाऊन गप्पा मारतात. अर्थात या गप्पा अतिशय अनौपचारिक असतात. तिथं राजकारणावर सखोल चर्चा, धोरणांची चिकित्सा वगैरे होत नाही. बोलण्याची सत्यासत्यता तपासून बघितली जात नाही, कचाट्यात पकडणारे प्रतिप्रश्न केले जात नाहीत. त्यामुळं ट्रंप, व्हॅन्स यांच्यासाठी तरुण पुरुष वर्गापर्यंत पोचायचा हा सोपा मार्ग आहे. या श्रोतृवर्गातले बरेच लोक ट्रंप २०१६मध्ये निवडून आले तेव्हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये होते. त्यांच्यासमोर ट्रंप यांची प्रतिमा खलनायकाची नसून प्रस्थापितांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या अँटी-हिरोची आहे. साहजिकच त्यांच्यासाठी 'मॅनोव्हर्स' मधल्या इन्फ्लुएन्सर्सबरोबर ट्रंप यांची उठबस आहे ही गोष्ट त्यांचं 'अपील' वाढवणारीच ठरते. पण यामुळं ते पुरुष रिपब्लिकनांना जवळ करायला गेले तर तिथलं 'टॉक्सिक' पुरुषत्वाचं प्रदर्शन आणि तरुण पुरुषांसाठीच्या ठोस धोरणांचा अभाव त्यांपैकी काहींना नाराज करतो आणि त्यांची द्विधा मनःस्थिती होते. त्यामुळं पस्तिशीच्या खालच्या काही पुरुषांनी 'आम्ही सध्या अमेरिकेत राजकीयदृष्ट्या बेघर आहोत' असं मत व्यक्त केलंय.
अर्थात अर्थव्यवस्था, इमिग्रेशन, गुन्हेगारी, परराष्ट्रधोरण वगैरे नेहमीचे यशस्वी मुद्दे ऐरणीवर असताना निवडणुकीत दोन्ही पक्ष मर्दानगीच्या मुद्द्याला कसं हाताळतात यामुळं निवडणुकीत किती फरक पडेल हे सांगता येत नाही. पण मागच्या दोन निवडणुका महत्त्वाच्या 'स्विंग स्टेट्स'मध्ये (उदाहरणार्थ पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन ही 'रस्ट बेल्ट' मधली राज्यं आणि ॲरिझोना, नेवाडा, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना ही 'सन बेल्ट'मधली राज्यं ) काही हजार मतांच्या फरकानं निकाली ठरल्या असल्यानं प्रत्येक मत आणि प्रत्येक मतदार महत्त्वाचा ठरतात.
हा झाला या वेळच्या निवडणुकीतला पुरुषत्वाचा प्रदर्शनाचा लेखाजोखा. खरं तर सध्याचा जमाना 'जेंडर फ्लुईडिटी' चा आहे. मुळात व्यक्तीची 'जेंडर आयडेंटिटी'च स्थिर नसते. ती आणि तिचं बाह्यरूप काळानुसार बदलू शकतं ही संकल्पना आता परिचयाची झाली आहे. त्यानुसार ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी, क्विअर अशा वेगवेगळ्या ओळखीही प्रचलित झाल्या आहेत. एकीकडं हा बदल झाला असताना पौरुष आणि स्त्रीत्वाच्या पारंपरिक कल्पनाही आपल्या मनात मूळ धरून असतातच. एखादा किती 'मॅनली' आहे किंवा एखादीच्या हालचालीतून स्त्रीची नजाकत किती छान झळकते याचे उल्लेख सहजपणे आपल्या बोलण्यातून येतात. या कल्पनांना संलग्न अशा काही अपेक्षाही कळत-नकळत आपल्या मनात तयार झालेल्या असतात. पण 'पुरुषत्व' आणि 'स्त्रीत्व' म्हणजे तरी नक्की काय? या संकल्पनांचे स्तंभ जेंडर आयडेंटिटीच्या नवीन प्रवाहांमध्ये स्थिर राहतील की वाहून जातील? की या प्रवाहांमध्ये आपणच भरकटायला लागलो तर निदान आपण कुठं आहोत याचं 'कॅलिब्रेशन' करायला या स्थिर कल्पना मदत करतील? बाकी काही नाही तरी या वर्षीच्या निवडणुकांच्या निमित्तानं या विषयावर विचारमंथन होतंय ही स्वागतार्ह गोष्ट आहे, नाही का?