डिजिटल जंगलात वावरण्यासाठी – जपून राहण्याचं गाईड

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

डिजिटल जंगलात वावरण्यासाठी – जपून राहण्याचं गाईड
ऑनलाईन संवाद आणि समाजमाध्यमांच्या जगात काय काळजी घ्यावी?

- गिरिजा नारळीकर
- भाषांतर - ३_१४ विक्षिप्त अदिती

कधी काळी असणारे शाळेतले मित्रमैत्रिणी शोधणं, कुटुंबीयांची ख्यालीखुशाली समजणं, दुर्मीळ वैद्यकीय विकारांबद्दल जगाच्या कानाकोपऱ्यांत चाललेल्या चर्चेत सहभागी होणं, किंवा समानशील स्थानिक लोकांचा गट बनवणं या गोष्टी आता जितक्या सोप्या आहेत तितक्या त्या मानवी इतिहासात कधीही सहजशक्य नव्हत्या. मैत्रपरिवार, कुटुंबीय, आपल्या परिसरातले लोक किंवा आपल्या आवडीच्या विषयात रुची बाळगणारे लोक यांच्या संपर्कात राहणं समाजमाध्यमं आणि इंटरनेटमुळे सहजशक्य केलं आहे. उदाहरणार्थ, फेसबुकचं मिशनच 'लोकांना समाजगट बनवण्याची सोय करून द्यायची आणि जग जवळ आणायचं' असं आहे. यूट्यूबचं मिशन 'सगळ्यांना व्यासपीठ देणं आणि त्यांना जग दाखवणं' हे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी, सुरक्षित असणारी जीमेलची सेवा अब्जावधी लोक वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरतात. गूगलमध्ये माझ्या नोकरीचं स्वरूप आहे ते जीमेल आणि ड्राईव्ह, चॅट, कॅलेंडर, मीट या गूगलच्या तज्जन्य सेवा वापरणाऱ्या लोकांना सुरक्षित ठेवणं.

खुल्या संवादाची माध्यमं वापरणं सोपं आहे आणि त्यांचा खूप उपयोगही होतो. असं असूनही, ही माध्यमं वापरताना आपल्याला कुठले धोके असू शकतात याची जाणीव असणं आवश्यक आहे. समाजमाध्यमांचा आपल्यावर, विशेषतः वाढत्या वयाच्या, तरुण पिढीवर, मानसिक दुष्परिणाम होऊ शकतो; पण ते या लेखाच्या कक्षेबाहेरचं आहे. या विषयावर खूप लेखन उपलब्धही आहे. त्याऐवजी, मी समाजमाध्यमांवर होणाऱ्या फसवणूक आणि इतर गुन्ह्यांपासून आपण सुरक्षित कसं राहावं याबद्दल लिहिणार आहे.

वर ज्या माध्यमांचा मी उल्लेख केला आहे, त्यांवर अब्जावधी वापरकर्ते आहेत; त्यातून गुन्हेगारांना सावजं शोधणंही तसं सोपं आहे. घाऊक प्रमाणात ऑनलाईन निरोप पाठवणं, किंवा गुन्ह्यांसाठी मजकूर ऑनलाईन तयार करणं दुर्दैवानं फार कठीणही नाही. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात अश्या 'हल्ल्यां'ना कुणी बळी पडले तरी त्यातून मोठं नुकसान होऊ शकतं. शिवाय, जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता (जनरेटिव्ह एआय) गुन्हेगारांनाही अगदी सहज उपलब्ध आहे; त्यामुळे खरा आणि व्यक्तिगत स्वरूपाचा वाटणारा मजकूर आणि चांगला मजकूर यांतला फरक ओळखणंही सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर, ऑनलाईन वावरताना काळजी घेणं, सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

ऑनलाईन गुन्हेगारी आणि गुन्हे म्हणजे मला काय अभिप्रेत आहे? हे गुन्हे निरनिराळ्या प्रकारे होतात; आणि आम्ही त्यांचे नवनवीन प्रकार दररोज बघतो. तुम्हाला कदाचित बँकेचा पासवर्ड रिसेट करण्याचा आव आणणारा निरोप आला असेल; किंवा तुमचं पॅकेज आलंय म्हणून आम्हांला फोन करा; बड्या टेक-कंपनीनं कुठलासा अँटी-व्हायरस डाऊनलोड करायला सांगितला आहे; किंवा कसलीशी वर्गणी भरायची बाकी आहे, असा काही निरोप कुणी पाठवला असेल. किंवा वरवर निरागस दिसणारा निरोप ज्यात तुमचं नाव चुकवलं आहे, पण 'काय, कसं काय' असं काही विचारणं. नैसर्गिकरीत्या आपल्याला अशा निरोपांना उत्तर देण्याची किंवा त्यावर काही कृती करण्याची ऊर्मी असते – उदाहरणार्थ, ज्याची वर्गणी भरायची राहिली आहे ते नियतकालिक मला नकोच आहे असं कळवणं; किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करणं; किंवा 'माझं नाव अदिती आहे, गिरिजा नाही' असं कळवणं. ऑनलाईन ठग आपण त्यांना उत्तर देणार याच अपेक्षेत असतात. मग ते आपल्याला बनावट वेबसाईटकडे पाठवतील किंवा फोन नंबर देतील आणि त्यातून आपली व्यक्तिगत माहिती काढतील, आणि पुढे पैशांनाही गंडा घालतील.

पिग बुचरिंग

गेल्या काही वर्षांत ठकवण्याचा नवा प्रकार सुरू झाला; त्याला “pig butchering” म्हणतात. खाण्यासाठी डुकरांची कत्तल करण्याआधी त्यांना भरपूर खायला घालून चांगलं जाडजूड करतात. तसंच या फसवणुकीच्या प्रकारात करतात. हे ठग लोक निरागस सावजांना प्रेम, आपुलकी, किंवा माया दाखवून त्यांचा विश्वास संपादन करतात; त्यांना कुठल्याश्या स्कीममध्ये पैसे गुंतवायला सांगतात. ती स्कीम खरी नसतेच; हळूहळू करत ते लोकांकडून चिकार पैसे लुबाडतात.

बहुतेकशा मोठ्या तंत्रज्ञान, दळणवळण वा समाजमाध्यमंवाल्या कंपन्यांनी abusive लेखन लोकांपर्यंत पोहोचून काही हानी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारचं लेखन प्रसारित करणारी खाती गोठवली जातात. उदाहरणार्थ, गूगल कंपनीमध्ये जीमेल वापरून ठकवण्याचे प्रकार शोधण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते. दुसऱ्या बाजूनं ह्या ठकवण्याच्या धंद्याला चांगल्यापैकी आर्थिक पाठबळ आहे; ते नवनवीन प्रकारांनी लोकांना फसवण्याच्या तऱ्हा शोधून काढत राहतात.

मग वापरकर्ते म्हणून आपण आपल्या सुरक्षिततेसाठी काय करू शकतो? अश्या बऱ्याच गोष्टी आहेत.

सगळ्यांत आधी, आपले पासवर्ड साठवून ठेवण्यासाठी चांगला पासवर्ड मॅनेजर वापरा. यासाठी अनेक फुकट पर्यायही हल्ली उपलब्ध आहेत. हे पासवर्ड मॅनेजर आपले पासवर्ड encrypt करून विदागारात (डेटाबेस) साठवून ठेवतात. 'क्लिक करण्याआधी विचार करा', हे तत्त्वही उपयुक्त आहे. सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याचा किंवा लिंक पाठवणारा स्रोत भरवश्याचा आहे याची खातरजमा करून घ्या. ही खातरजमा करण्यासाठी पाठवणाऱ्यांचा फोन नंबर किंवा इमेल, किंवा पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रस्थापित कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बघा. शेवटी, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा असा मजकूर दिसला तर तो त्या-त्या प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा. यातून त्या प्लॅटफॉर्मला ठगवण्याच्या प्रकारांचा पॅटर्न समजायला मदत होते; आणि त्यातून आपण आणि सगळेच वापरकर्ते सुरक्षित राहायला मदत होते. असे फसवाफसवीचे निरोप पाठवणाऱ्या आयडीला ब्लॉक करण्याचाही पर्याय असतो. हीच बाब समाजमाध्यमांवरच्या अयोग्य लेखनाबद्दल, किंवा जाहिरातींबद्दलही; उदाहरणार्थ, असभ्यपणा, राजकीय छापाची बनावट माहिती, आणि इतरही प्रकारची फसवाफसवी करणारा मजकूर. असा मजकूर रिपोर्ट करून, ब्लॉक करून आपण त्या-त्या प्लॅटफॉर्मच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला फसवाफसवी शोधण्याच्या कामात आणखी तरबेज करतो. यात वापरली जाणारी मशीन लर्निंग अल्गोरिदम अशा निरोपांमधला मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ वाचून फसवाफसवी ओळखायला शिकतात. पॅटर्न शिकण्यासाठी चांगली विदा (डेटा) नसेल तर अल्गोरिदम चांगलं असूनही त्याच्या उपयुक्ततेवर मर्यादा येतात. यात आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

लहान मुलांना समाजमाध्यमांवर सुरक्षित ठेवणं ही पालकांवरची मोठी जबाबदारी आहे. आपल्या मुलांच्या भौतिक आयुष्याबद्दल आपण अधिकाधिक जागरूक होत आहोत; कधी कधी नको तेवढे! पण मुलांच्या ऑनलाईन आयुष्यावर लक्ष ठेवणं तेवढं सोपं नाही. आपण जे काही ऑनलाईन प्रकाशित करतो; मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ काहीही, ते सगळं बहुतेक आयुष्यभर तिथे राहणार आहे; आणि इतरांना उपलब्ध होणार आहे. मुलांना काय आणि कुठल्या माध्यमांवर पोस्ट करता येईल, हे शिकवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जवळच्या मित्रमैत्रिणींच्या चॅटमध्ये लिहिणं निराळं आणि बाहेर पब्लिक पोस्ट टाकणं निराळं. मात्र मुलांना हेही समजलं पाहिजे की खाजगी संवादांत काही लिहिलेलं असेल तरीही त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ते आपल्या परवानगीशिवाय बाहेर पाठवता येतात. चारचौघांत लाज येईल असं काही, किंवा कुणाला हानिकारक ठरेल असं काहीही न लिहिणंच इष्ट. समाजमाध्यमांवरची प्रायव्हसीची सेटिंग लहान मुलांसाठी अगदी मर्यादित करून ठेवणंही – म्हणजे त्यांनी लिहिलेलं कोण बघू शकतात – महत्त्वाचं आहे. पालक जेव्हा लहान मुलांसाठी खाती काढून देतात तेव्हा ते खातं सज्ञान व्यक्तीचं नाही हे प्लॅटफॉर्मवर नोंदवलं पाहिजे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर लहान मुलांना दिसू नयेत अशा गोष्टी त्यांना दिसणार नाहीत. सरतेशेवटी, लहान मुलं मर्यादित वेळासाठीच ऑनलाईन असावीत, त्यांच्याशी समाजमाध्यमांचे फायदे-तोटे याबद्दल सतत बोलत राहावं म्हणजे त्यांनाही पालकांशी मोकळेपणानं आपल्या ऑनलाईन अनुभवांबद्दल बोलावंसं वाटेल.

संपादकीय नोंदी – याच विषयावर अंकात शेखर मोघे यांचा लेखही – सपेरा, लुटेरा आणि मंडळी – आहे. वाचकांनी तोही वाचावा अशी विनंती.

पिग बुचरिंग या विषयाबद्दल अधिक माहितीसाठी काही दुवे –

field_vote: 
0
No votes yet