वसुधैव कुटुंबकम् – नव्हे, नवी वसाहत!
वसुधैव कुटुंबकम् – नव्हे, नवी वसाहत!
- उज्ज्वला
आपणा सर्वांना आंतरजालीय डिजिटल जाळ्याने घेरलेले आहे. साधा मोबाइल फोन हे त्याचे सर्वात बिचारे आणि म्हणून त्यातल्या त्यात सुरक्षित स्वरूप. फोनधारकाचा ठावठिकाणा ती सेवा देणाऱ्या कंपनीला कळतोच. तोच जर तो स्मार्टफोन असेल तर तो कितीतरी प्रकारे वापरकर्त्याची माहिती गोळा करत राहतो. अशा स्मार्टफोन्समुळे छापील माध्यमांच्या इ-आवृत्त्या, ऑनलाइन गेम, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी समाजमाध्यमे, साऱ्यांचाच प्रसार कित्येक पटींनी वाढला. प्रत्येकाच्या आंतरजालीय वावरातून त्याच्या वर्तनाचे ठसे नामक भरमसाठ विदा आपोआप निर्माण होऊ लागली. त्याचे "व्यवस्थापन" आहे या सर्व अतिविशाल डिजिटल कंपन्याकडे. ही चिंतेची बाब अधोरेखित करणाऱ्या दोन पुस्तकांची ओळख करून देत आहे. [ट्विटरचे आताचे नाव एक्स, पण ही पुस्तके आली तेव्हा मूळ नाव बदलले नव्हते, येथेही उल्लेख आधीच्या नावानेच करणार आहे]
एक आहे २०२१साली प्रसिद्ध झालेले चार्ल्स आर्थर यांचे Social Warming: How Social Media Polarises Us All हे, तर दुसरे २०२२सालचे जेमी ससकाईंड यांचे The Digital Republic: On Freedom and Democracy in the 21st Century हे.
फेसबुक नव्याने अवतरले तेव्हा कित्येक वर्षे, दशके संपर्कात नसलेली शाळा-महाविद्यालयातील मित्रमंडळी, जुने शेजारी, लांबचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधता आला याचा आनंद, अप्रूप सर्वांनाच वाटले. पण People You May Know असे आपण होऊन दाखवणारे फेसबुक त्याच्या बिंदु-जोड पाहणीतून पूर्वपरिचितांनाच नव्हे, तर समान आवडीनिवडी असणाऱ्यांना एकमेकांशी जोडू लागले. त्यातून समविचारी लोक – त्यात अतिरेकीही आले – एकमेकांच्या सहज संपर्कात आले. कारण अल्गोरिदमांना नैतिकता नसते. समाजविघातक प्रवृत्ती एकत्र आल्यास त्यातून विध्वंसाला चालना मिळते हे त्यांना समजत नाही. ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंग हळूहळू होत जाते व वेळीच दक्षता न घेतल्यास व उपाय न केल्यास त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होतो; त्याचप्रमाणे सामाजिक दुभंगलेपणातून मोठी हानी पोहोचू शकते. सोशल वॉर्मिंग असा शब्दप्रयोग करण्यामागे चार्ल्स आर्थर यांचा दृष्टिकोन आहे. आणि हे दुभंगलेपण समाजमाध्यम नियंत्रक कंपन्याच्या अल्गोरिदम्समुळे तयार होत आहे, हे देखील ते विस्ताराने दाखवून देतात.
मात्र, या नवीन डिजिटल कंपन्यावर अंकुश ठेवण्यासाठी सुरुवातीला कायदेच नव्हते ही एक बाब. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या युरोप, अमेरिकेतील देशांत ही डिजिटल क्रांती प्रथम झाली, तेथे कित्येक शतके बाजाराधिष्ठित व्यक्तिकेंद्रित व्यवस्था प्रस्थापित झाली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील धुरीणांनी, राजकारण्यांनीही जणू तेच एकमेव व योग्य प्रारूप असावे अशा समजुतीने ही व्यवस्था अंगीकारली आहे. 'द डिजिटल रिपब्लिक' हे पुस्तक दुसरे प्रारूप शक्य आहे असे प्रतिपादन करते.
समाजमाध्यमांनी वाईट वर्तणुकीला – अगदी झुंडशाहीलाही – खतपाणी घातले आहे. रीट्वीट करण्याची सुविधा तयार करणाऱ्या ख्रिस वेदरेलला आता त्याचा पश्चात्ताप होतो. आणि कोट-ट्वीटिंग – दुसरा काय म्हणाला ते उद्धृत करण्याबद्दल चार्ल्स आर्थर विनोदाने म्हणतात : "हे म्हणजे एखाद्याने आपल्या बाल्कनीत जाऊन खालच्या लोकांना ओरडून सांगावं, "तुम्हाला माहिती नाही हा वेडा आत्ता फोनवर काय म्हणाला ते, थांबा वाचून दाखवतो", अशातली गत आहे. फेसबुकने विकसनशील देशांत आपली सेवा फोनवर फुकटात उपलब्ध करून दिली. त्यामुळे नवख्यांना फेसबुक म्हणजेच इंटरनेट असे वाटते. हा समज फेसबुक आपल्या खातेधारकांना दाखवत असलेल्या गोष्टींना 'न्यूज फीड' असे म्हणून आणखी पसरवतो. म्यानमारवर एक प्रकरण लिहून चार्ल्स आर्थर दाखवून देतात, की युनायटेड नेशन्स संस्थेच्या सत्यशोधन समितीला २०१८ साली असे आढळले की लोकांमध्ये कडवटपणा, दुफळी आणि संघर्ष निर्माण करण्यात फेसबुकचा सक्रिय सहभाग होता.
फेसबुक, ट्विटर किंवा गुगलही जोवर कायद्याच्या कक्षेत राहून खोट्या गरजा, चित्रे निर्माण करणे यांवर बेतलेल्या जाहिरात विश्वावर अवलंबून आहेत, तोवर ते चुकीच्या वा अविश्वासार्ह संदेशांवर सातत्याने कारवाई करू शकत नाहीत. जर फेसबुक तेथे दाखवण्यात येणाऱ्या फसव्या जाहिरातींनाही आळा घालत नसेल – कित्येक अक्सीर इलाज छाप गोष्टींचा भडिमार आपल्यावर होताना दिसतोच – तर त्याच्याकडून असत्य, अर्धसत्य, फसव्या राजकीय प्रचारांना आळा घालण्याची अपेक्षा फोल आहे. फेसबुकला पैसे देऊन आपल्या गळाला लागू शकणाऱ्या नेमक्या ग्राहकांपर्यंत पोहोचणेही शक्य आहे. शिवाय तुम्ही एखादे काही सहज किंवा चुकून पाहिलेत तर तुम्हाला तशाच प्रकारचे संदेश, जाहिराती, येत राहण्याची यंत्रणा कार्यान्वित होतेच.
अँडी मॅकक्लुअर यांचा आर्थर यांनी सविस्तर सांगितलेला अनुभव ट्विटरच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकतो. त्या २०११पासून ट्विटर वापरतात. एक दिवस त्यांच्या पाहण्यात एक ट्वीट आले. "SOCIAL EXPERIMENT, don't read the replies before commenting" पुढे एक साधासा सामाजिक सभ्यतेच्या संकेतांबाबत प्रश्न होता. सहज गंमत म्हणून त्यांनी असे लिहिले : "Social experiment: Do NOT read the replies to this tweet before you reply to it" आणि पुढे कसलाच प्रश्न विचारला नाही. त्यानंतर घडले ते असे : तासाभरात त्यांच्या २१,२०० पैकी सुमारे १०० फॉलोअर्सनी साधीशीच उत्तरे दिली. एका रात्रीत आणखी शंभरेक फॉलोअर्सनी तशीच उत्तरे दिली. मात्र नंतरही उत्तरे येतच राहिली, तीदेखील मॅकक्लुअर ज्यांना ओळखत नव्हत्या, जे त्यांना ओळखत नव्हते अशा तिऱ्हाइतांकडून. विशेष म्हणजे, त्या तिऱ्हाइतांना स्वतःचे फॉलोअर्स फारच कमी होते, जेमतेम २००. मग त्यांना ते ट्वीट दिसलेच कसे? मॅकक्लुअर बाईंनी शोध घेतला, पण त्यांना या तिऱ्हाइतांशी त्यांचा कोणताच परात्पर संबंधही आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते मूळ ट्वीट कोणामार्फत रीट्वीट होऊन जाणे शक्य नव्हते. शिवाय त्यांच्या मूळ ट्वीटला फारच कमी रीट्वीट होते. मग ते त्यांच्यापर्यंत पोचले कसे ? तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की हे काम खुद्द ट्विटरच करत होते. ज्यांच्या टाइमलाइनवर कमी हालचाल होती (त्यांना कमी फॉलोअर्स, ते थोड्यांचेच फॉलोअर्स) अशा लोकांना "things you're likely to reply to too" म्हणून ते ट्वीट दाखवत होते. सभासदांची 'engagement' ऊर्फ ट्विटरवरचा वावर वाढावा यासाठी अल्गोरिदम्स काम करत होते. जर लोकांनी आपले माध्यम पुरेसे वापरले नाही, ते दुसरीकडे गेले किंवा परत आलेच नाहीत तर जाहिराती मिळणार नाहीत. जाहिराती नाहीत तर त्यांचे सर्व्हर, इमारतींची देखभाल, कर्मचारी, खाणेपिणे, विमान प्रवास यासाठी सतत पैसे कसे मिळतील! त्यामुळे लोकांच्या टाइमलाइनवर हालचाल पाहिजे, म्हणजे मग त्यांना जाहिराती दाखवता येतात. 'while you were away' अशी पुस्ती जोडून दाखवत राहायचे काही ना काही. त्यांच्या असेही लक्षात आले की एकदा पुरेशा संख्येने एखादे ट्वीट रीट्वीट झाले, की दुसरा एक अल्गोरिदम कार्यान्वित होतो आणि ते ट्वीट आणखी जास्त लोकांपर्यंत पोचते. ना तुम्ही कधी त्यांचे नाव ऐकलेले असते, ना त्यांनी तुमचे. मॅकक्लुअर यांचे ट्वीट निरुपद्रवी होते. पण तेच जर काही राजकीय भाष्य, किंवा एखाद्या छोट्या गायकवृंदाबाबत काहीबाही असते, तर ट्विटरने ते वाटेल त्याला पाठवणे हे दुर्वर्तन झाले असते. असल्या कोट-ट्वीटिंग, रीट्विटिंगने विद्वेषच झपाट्याने पसरतो. ट्विटरच्या अल्गोरिदम्सनी आपोआप आणि झपाट्याने असा काही संदेश पसरतो की लोक लाक्ष्यार्थाने कधी न पाहिलेल्या, न ऐकलेल्या कोणावर तरी गरळ ओकत असतात. याबाबत चार्ल्स आर्थर यांनी ट्विटरशी संपर्क साधला असता अल्गोरिदमबाबत बोलण्यास त्यांना नकार मिळाला.
सोशल वॉर्मिंगसाठी तीन घटक जबाबदार आहेत. एक, स्मार्टफोन्सची सहज उपलब्धता आणि त्याद्वारे अधिकाधिक जणांचा समाजमाध्यमांवर वावर; दुसरे त्या प्रत्येक माध्यमाला अवगत असलेली आपला तेथील वावर जोखून आपण अधिकाधिक कसे तिथे वावरू यासाठी करायची तजवीज; आणि तिसरे म्हणजे हा प्रसार अमर्याद व अनिर्बंध असणे.
अशा सर्वदूर, मोठ्या प्रमाणात आणि बेपर्वा वापरामुळे सोशल वॉर्मिंग होऊ लागते. ही माध्यमं नसतील, तर ते घडणार नाही, घडलेले मोठ्या प्रमाणात पसरवले नाही तर समजणार नाही आणि त्याच्या परिणामांबाबत बेपर्वाई असल्याखेरीज आपण त्याला बळी पडणार नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे की फेसबुक नसेल तर कित्येक कोठे काय ही माहिती मिळणारच नाही, कारण तोच आता माहितीचा मुख्य स्रोत बनला आहे. निवडीला फारसा वाव नसणे हे दुखणे होऊन बसले आहे.
ज्याप्रमाणे मोटारगाडीच्या जनकांना यामुळे शंभर वर्षांत पर्यावरणाची हानी होणार आहे हे सांगून पटले नसते, तसे या समाजमाध्यमकर्त्यांना ते कसली सामाजिक हानी पोहोचवत आहेत हे मान्य करायचे नसते, बदल डोळ्यांदेखत होत असले तरी. फेसबुकचे ध्येय सर्वांना एकमेकांशी जोडणे हे होते, यूट्युब म्हणते, तुम्हीच (तुमच्या सृजनाचे) प्रसारक व्हा आणि ट्विटरला प्रत्येका व्यक्तीला कल्पनांची निर्मिती व प्रसार करण्याची शक्ती द्यायची होती. पण या सर्व घोषणांच्या मागे लोकांना भुलवणे, भडकावणे आणि एकमेकांविरुद्ध ठाकण्याची यंत्रणा हातपाय पसरत होती.
हा तिसरा परिणाम महत्त्वाचा आहे. सोशल वॉर्मिंगमुळे राजकीय व सामाजिक ध्रुवीकरण होताना दिसते. त्यातून सामाजिक तपमानवाढ होते व ओळखीच्या तसेच अनोळखी व्यक्तींशीही खटके उडण्याची शक्यता निर्माण होते. अनेकांनी आपल्याच एखाद्या मित्र वा नातेवाईकाला सांप्रदायिक, वंशवर्चस्ववादी भूमिका घेताना, अफवा पसरवताना पाहिले असेल. अशा वेळी पाठ फिरवणे वा वाद घालणे अपरिहार्य होते. असे ध्रुवीकरण समाजासाठी चांगले नाही कारण त्यातून सामूहिक हिताच्या उपक्रमांना बाधा पोहोचते. २०२० साली अमेरिकेतील समाज करोनाची लस घेण्यावरून राजकीय पक्षांच्या पातळीवर दुभंगला आणि कित्येकजण हकनाक प्राणास मुकले. एकाच मताविचाराच्या पोस्ट अधिकाधिक दिसण्यातून हे घडले. नैसर्गिक आपत्ती किंवा लढाया कितीही विध्वंसक असल्या तरी अशा वेळी समाज आपले सगळे मतभेद दूर सारून एक होतो. मात्र समाजमाध्यमांचे जाळे मतभेद दृढ करण्यास हातभार लावते. प्रत्येक छोट्याछोट्या मत-मतांतरांतून ती दरी रुंदावते कारण तेच – प्रत्येका व्यक्तीला काय दिसणार हे काय पाहिले, कशावर रेंगाळले यानुसार बदलणार व एककल्लीपणाकडे वाटचाल सुरू होणार. समविचारी आणि एकारलेले यांतले अंतर कधी पुसले कळतही नाही. मग त्यांच्याबद्दल आपण बोलायला मोकळे. प्रतिवाद नसतोच. समाजमाध्यमांच्या आभासी जगातील प्रतिक्रियांचे पडसाद खऱ्या आयुष्यातही उमटू लागतात. ते ज्याचे ट्रोलिंग होते त्याच्या मनस्वास्थ्याशी खेळ होतो; अनेक हिंसक घटना घडतात; मतदारांवर एकाच प्रकारच्या बातम्या दाखवून त्यांचा बुद्धिभेद करून निवडणुकांच्या निकालांवर परिणाम घडवून आणणे हे २०१६च्या सुरुवातीला फिलिपाइन्समध्ये, तसेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत आणि ब्रेक्झिटबाबत दिसून आले.
या कंपन्या आपल्यामुळे झालेल्या दुष्परिणामांची जबाबदारी घेण्यासाठी कधीच तयार नसतात. फक्त, एखाद्या पूरग्रस्त भागातील एखाद्याने फेसबुकवरून आपण सुरक्षित आहोत हे कळवले, अशासारख्या गोष्टींचे श्रेय ते आवर्जून घेतात. या शेअरहोल्डिंग कंपन्यांची रचना लोकशाहीवादी नसून ज्याच्याकडे जितके शेअर्स त्याचेच मत निर्णायक. मार्क झुकरबर्गला त्याच्या स्वतःखेरीज कोणीही पायउतार होण्यास भाग पाडू शकत नाही.
या साऱ्याची सुरुवात कशी झाली हे चार्ल्स आर्थर यांनी उलगडून सांगितले आहे. कंपन्यांचे बिलबोर्ड ऊर्फ नोटीस बोर्ड असत तसे संदेशप्रसारक जाळे डेस्कटॉप कम्प्युटर्स ऑनलाइन जोडून तयार करण्यात येऊ लागले. या आभासी वावरात लोक एरवीपेक्षा अधिक उद्धट किंवा असत्य लिहीत, त्यांना कसली शिक्षा होण्याची भीती नसे. Whole Earth 'Lectronic Link, WELL नावाच्या अशा एका जालीय माध्यमात काहीही लिहा, पण नावानिशी लिहा अशी रचना होती. ते फुकट नव्हते, महिन्याला ८ डॉलर किंवा तासाला २ डॉलर असा आकार पडे. लिहिलेले काहीही पुसले जात नसे. कोणीही तिथे दिसू शकणाऱ्या संदेशावर प्रतिक्रिया देऊ शके, काहीही पुसणे अवघड होते, व पुसलेच तर लिहिले होते, आता पुसले अशी खूण मागे ठेवत असे. सुरुवातीला तेथे टायपिंग जमणाऱ्या – संगणक क्षेत्रातील लोक आणि पत्रकार यांचाच वावर अधिक होता. तेथेही एका स्त्रीने मार्क इथन स्मिथ हे पुरुषी नाव धारण करून स्रीवादीचळवळीबद्दल अवास्तव विधाने केली. जे प्रतिवाद करीत त्यांच्याबद्दल अद्वातद्वा लिहिले. तरी ते खाते लगेच बंद करण्याचे पाऊल उचलले गेले नाही. कारण तेथील प्रशासकांना वाटले की ही व्यक्ती लोकांना कशाने राग येईल हे पाहून तसे शेरे मारत असे व त्याचा प्रतिवाद करण्यासाठी लोक अधिकाधिक वेळ पैसे मोजून तेथे घालवत. मात्र अखेर येणाऱ्या पैशापेक्षाही इतर वापरकर्त्यांचा प्रक्षोभ बळावल्याने शेवटी ते खाते चालकांकडून बंद करण्यात आले. त्यावर माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली अशी ओरड त्या व्यक्तीने इतरत्र केलीच.
स्मिथचे वर्तन आणि 'द वेल' हे माध्यम पुढील सर्वच समाजमाध्यमांना पथदर्शी ठरले. मात्र आता सभासदत्व विकून पैसे मिळवत नाहीत, ते जाहिरातींतून मिळतात, आणि ते उत्पन्न भरभरून मिळत राहण्यासाठी लोकांनी व्यक्त होत राहावे लागते.
नव्वदच्या दशकात याबाबत झालेल्या न्यायालयीन व कायदेविषयक घडामोडी महत्त्वाच्या आहेत. CompuServe नावाच्या कंपनीने अनेक समाजमाध्यमे उपलब्ध करून दिली होती. त्या कंपनीवर १९९१ साली एक दावा दाखल झाला. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या एका 'मंचा'वर एक संभाव्य बदनामीकारक मजकूर असल्याने त्यांना प्रतिवादी केले होते. (पत्रकारितेबाबतच्या एका दैनिकात प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख new start up scam असा केलेला होता.) CompuServeने यशस्वी युक्तिवाद केला की, एखादे पुस्तकाचे दुकान, किंवा एखादी टेलिफोन कंपनी असते तसे ते केवळ 'वितरक' होते, स्वतः प्रकाशक नव्हते, आणि म्हणून त्यांना कायद्याचे संरक्षण आहे. हा खटला इंटरनेटसाठी पथदर्शी ठरला.
त्यानंतर लवकरच Prodigy या अशाच एका अमेरिकन कंपनीवर एका गुंतवणूकदार कंपनीने दावा दाखल केला. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या मंचावर कोणीतरी फसवणुकीचा निनावी दावा केल्याने Prodigyला जबाबदार मानले होते. त्यांनी CompuServeप्रमाणेच युक्तिवाद करू पाहिला. पण तो मान्य झाला नाही, कारण त्या मंचावरच्या मजकुरात मानव व आज्ञाप्रणाली (software) दोहोंचाही सहभाग होता. म्हणजेच, ते केवळ पुस्तकाचे दुकान नव्हते, तर वृत्तपत्र होते. खटला हरल्याने द्यावा लागलेला मोबदला लाखो डॉलर्सचा होता. त्यातून संदेश गेला – जालीय मंचावर काहीही हस्तक्षेप करू नका. अन्यथा तुम्हाला दंड होईल. मात्र दंड होईल या भीतीने कोणताही मजकूर काढून टाकता न येणे यातून कितीतरी बेकायदा गोष्टी साचत जाण्याचा धोका होता : कचरा (स्पॅम), बदनामीकारक मजकूर, चोरलेल्या आज्ञाप्रणाली इत्यादींमुळे सामान्य वापरकर्ते यापासून दूर जाण्याचा धोका अजून बाल्यावस्थेत असलेल्या जालीय व्यापारक्षेत्राला भेडसावत होता. १९९६ साली क्लिंटन प्रशासनाने Communications Decency Actचा प्रस्ताव मांडला होता. त्यामागे पोर्नोग्राफीसारख्या असामाजिक तत्त्वांना इंटरनेटसारख्या नवीन मंचाचा आधार मिळू नये ही भूमिका होती. मूळ मसुद्यात कायद्याने अज्ञान मुलांना जाणूनबुजून अप्रशस्त वा बीभत्स मजकूर, चित्रे इत्यादी पाठवणे हा गुन्हा होता. त्यामुळे Internet Service Providers, ISPने छाननी करणे आवश्यक होणार होते, मात्र त्याचवेळी Prodigy खटल्याच्या निकालानुसार ढवळाढवळ केल्यास दंड ही टांगती तलवारही होती. म्हणून ISPच्या संघटनेने अमेरिकन सिनेटर्सवर दबाव आणून त्यात एक कलम घालून घेतले. त्यानुसार, कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेल्या मंचांवर आलेल्या मजकुराची सत्वर जबाबदारी त्यांच्यावर नसेल आणि त्याचबरोबर त्यांना वाटेल तेव्हा एखादा मजकुर (post – यात लिखाण, फोटो, व्हिडिओ सर्व आले) थोडा वा सर्व काढून टाकण्याची मुभा असेल, संविधानाने संरक्षित असले तरीही! उदाहरणार्थ भाषणस्वातंत्र्य हे अमेरिकेच्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार संवैधानिक, पण या कंपन्यांना त्यात काही आक्षेपार्ह वाटल्यास त्या ते काढू शकतात, मात्र ते त्यासाठी बांधील नाहीत!! म्हणजेच, कोणालाही – ना "तुमच्या मंचावर आक्षेपार्ह मजकूर आहे म्हणून", ना "माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते आहे म्हणून" - कोणत्याही मुद्द्यावर या कंपन्यांविरुद्ध कोर्टात जाता येणार नाही!!!
समाजमाध्यमांचे स्वरूपही बरेच बदलत गेले. सुरुवातीला अनेकांना आपल्या मेलिंग लिस्टच्या माध्यमातून संदेश पाठवले जात; मग वेबपेजवरही त्यांची तारीखवार क्रमाने सर्वांत जुने ते सर्वांत नवे अशीच मांडणी असे, आणि अनुक्रमणिका मात्र ताजे ते सर्वांत जुने अशी. त्यानंतर वेबलॉग उर्फ ब्लॉग या तंत्रज्ञानामुळे अक्षरशः कोणालाही आंतरजालावर काहीही प्रकाशित करता येऊ लागले. १९९९ ते २००६च्या मध्यापर्यंत त्यांची संख्या वीसवरून पाच कोटींपर्यंत गेली. चर्चेसाठी तयार झालेले गट (फोरम) लोकशाहीवादी होते, समूहाचा आवाज होते. तर ब्लॉग हे वैयक्तिक असल्याने ब्लॉगकर्त्याने आपलाच हेका चालू ठेवण्याचा कल आढळतो.
ब्लॉगांची संख्या प्रचंड वाढली, म्हणून प्रत्येकालाच भरपूर वाचक मिळाले, किंवा वाचकांसमोर प्रचंड वैविध्य सहज उपलब्ध झाले असे घडले नाही. यात मग आधीपासून उपलब्ध, अनेकांना ठाऊक झालेले आणि मानवाच्या अनुकरणाच्या स्वभावामुळे काहीच ब्लॉगांना बहुसंख्य वाचक मिळत गेले आणि तिथेही ब्लॉग-सत्तेचे असंतुलन घडले. त्यामुळे या प्रकारच्या अभिव्यक्तीला लोकाश्रयाअभावी उतरती कळा लागली. त्याचवेळी Friendster आणि पाठोपाठ Ringo, Bebo, Path, Orkut, Foursquare, Pownce, Jaiku, Qaiku, Tribe अशी अनेक सदस्यत्व घेऊन कोणालाही व्यक्त होण्याची मुभा देणारी माध्यमे अधिक लोकप्रिय होऊ लागली. फेसबुक, ट्विटर व यूट्युब यांचे वेगळेपण असे, की त्यांनी केवळ अमेरिकेतच नाही, तर जगभर आपले माध्यम प्रभावीपणे उपलब्ध करून दिले. जसे पूर्वीच्या काळी टेलिफोनचा उपयोग अधिकाधिक लोकांनी ते यंत्र घरात बसवल्याने खऱ्या अर्थाने होऊ लागला, तसे फेसबुक खातेधारकांची संख्या प्रचंड वाढल्याने ते सशक्त माध्यम बनले. आणि स्मार्टफोन्स आल्यावर लोकांचा संपर्क आभासी जगाशी सततच राहू लागला. कोणत्याही नवीन वा जुन्या उद्योगाला लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी मोबाइल ॲप असणे गरजेचे वाटू लागले.
अल्गोरिदम ही एक नियमावलीच असते, आधी काय, नंतर काय, अमुक झाले तर काय पर्याय, त्यातला एखादा घेतला की पुढे काय इत्यादी. संगणक तंत्रज्ञानच अशा नियमांवर आधारित असते. गोष्ट सोपी आणि म्हणूनच जटिल तेव्हा होते, जेव्हा यंत्रालाच ठोकताळे बांधण्याचे नियम कळू लागतात : machine learning (ML). १९९७ साली IBMच्या संगणकाने जगज्जेत्या बुद्धिबळपटू कास्पारॉव्हला हरवले ही एक मोठी घटना होती. इंटरनेटच्यामागील तत्त्वही अधिकाधिक बाबींची काळजी अल्गोरिदमच घेतील हेच आहे. त्याशिवाय एवढा डोलारा पेलणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक वापरकर्त्याचा वावर बारकाईने पाहून त्यानुसार त्याला काय आवडेल तेच त्याला दाखवणे व तो पाहण्यात गुंतला की जाहिरातदारांना तो संभाव्य ग्राहक म्हणून उपलब्ध करून देणे हे तंत्रज्ञान विकसित होत गेले.
फेसबुकच्या एका तंत्रज्ञाने कॉर्नेल विद्यापीठातील दोघा तज्ज्ञांच्या मदतीने सुमारे ७० लाख लोकांवर एक प्रयोग केला. आनंदी पोस्टस् दाखवल्या तर लोक आनंदी होतात आणि दुःखी दाखवल्या तर दुःखी, तसेच त्यांच्या स्वतःच्या पोस्टसदेखील मग तशाच प्रकारच्या होऊ लागतात हा त्याचा निष्कर्ष. यावर भरपूर टीका झाली, कारण वापरकर्त्यांना या प्रयोगाची कल्पना नव्हती, त्यांची संमती घेतलेली नव्हती. फेसबुकने मात्र आपल्या बारीक टाइपातील नियम व अटींमध्ये वापरकर्त्यांनी मान्य केलेल्या कलमांत 'संशोधन' हाही मुद्दा आहे असा बचाव केला. हे केवळ उपलब्ध विदेवरून केलेले संशोधन नव्हते, तर लोकांच्या भावनांशी त्यांना न सांगता केलेला खेळ होता. याबद्दल खूप आरडाओरडा झाल्यावर फेसबुक त्यावर बोलेनासे झाले, पण या साऱ्यावरून ही समाजमाध्यमे चालवणाऱ्यांच्या हाती लोकांना कसेही वाकवण्याची ताकद आहे हे सिद्ध झाले आहे, आणि ते धोकादायक आहे.
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए। या उक्तीतील झुकानेवाला आता हे अल्गोरिदमच अधिकाधिक प्रमाणात बनताना दिसत असले तरी मुळात लोकांचे लिखाण व प्रतिक्रियांच्या मागे मानवी स्वभावात असलेली वाह्यात वागण्याची ऊर्मी - छोट्या वा मोठ्या प्रमाणात नीतिबाह्य वागून केलेले बंड – हेही आहे. खऱ्या आयुष्यापेक्षा आभासी जगात या वाह्यात वागण्याला कितीतरी अधिक प्रमाणात उधळायला समाजमाध्यमांनी चालना दिली. वापरकर्त्यांची संख्या गणिती, एकरेषीय प्रमाणात वाढत असली, तरी कोणत्याही छोट्या मोठ्या बाबीचा प्रचार, प्रसार हा घातांक (exponential) पद्धतीने होतो. त्यातून गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात.
वरवर कशाची चलती आहे याचे अद्ययावत ज्ञान असले तरी आपण किती प्रकारे वापरले जात आहोत आणि आपल्याभोवती कसलेकसले कोश बेमालूमपणे विणले जात आहेत याबाबत अनभिज्ञ, बेपर्वा असा समाज सजग होण्याची गरज हे पुस्तक तळमळीने मांडते. भारतात whatsapp द्वारे पसरलेल्या अफवा, कुठलेतरी दुसरीकडचे जुने व्हिडिओ स्थानिक हिंसेबाबत असल्याचे भासवून झालेले वा घडवलेले दंगे याबाबतही बरेच लिहिले आहे. जेव्हा forwarded असा उल्लेख कंपनी करते, तेव्हा त्यांना खरे तर unverified असे म्हणायचे असते. पण लोक मात्र ते खुशाल पुढे पाठवतात. २०१८साली मग forward करण्याची मुभा २५५वरून भारतात ५ वर आणि इतरत्र २० वर आणली तेव्हा जगभरातील forwardsची संख्या २५ टक्क्यांनी घटली असे कंपनीने नंतर नमूद केले. whatsappसारख्या संदेशप्रणाली ही तर वैयक्तिक जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. एक तर ते साधकबाधक चर्चा करण्याचे माध्यम नाहीच, मग तिथे जेव्हा बेजबाबदारपणे दुफळी माजवणारे संदेश फिरत राहतात – “Brexit हेच U.K.साठी योग्य आहे” पासून ते “बायकांची जागा चुलीपाशी” इथपर्यंत काहीही – तेव्हा त्याचा प्रतिवाद करण्यात कितीसे लोक आपली ऊर्जा घालवतात, ज्यांना ते खरे वाटते किंवा वास्तव तसे असावे अशी इच्छा असते, असे लोक त्याचा प्रसार करत राहतात. आणि समाजमन अनेकानेक कारणांनी भंगत राहते.
'द डिजिटल रिपब्लिक' लिहिणारा जेमी ससकाईंड हा ब्रिटनचा रहिवासी आहे व त्याच्या डोळ्यांसमोर युरोप या बदलांना कसे सामोरा गेला हे अधिक आहे. ससकाईंडही आपल्या पुस्तकाच्या पहिल्या भागात तंत्रज्ञानाने केवळ आपल्याला विळखा घातलेला नाही, तर समाजाचे बरे-वाईट नैतिक चारित्र्य घडवण्यात त्याला भूमिका आहे, याबद्दल लिहितो. थोडक्यात, आंतरजालीय तंत्रज्ञानाने नियंत्रक सत्ता तयार होते, ती अधिकाधिक व्यापक बनते आणि रूढार्थाने नसले आणि विशिष्ट संस्था वा व्यक्तीमध्ये एकवटलेले नसले तरी त्यातून राजकारण-सत्ताकारण निर्माण होते. आंतरजालीय तंत्रज्ञान राबवणाऱ्या कंपन्या सद्हेतूने, निरपेक्षपणे आपली भूमिका बजावतील अशा आशा, अपेक्षांवर अवलंबून राहायचे, की त्यांना अशी निवड करण्याचा अधिकारच का असावा असा पेच आहे. त्या कंपन्या त्यांच्यावर विश्वास ठेवायला सांगत आहेत, पण ज्याप्रमाणे इतर व्यावसायिकांचे नियमन होते, त्याप्रमाणे त्यांच्या बाबतीत कोणतेच – स्व-नियमनाचेही – निकष नाहीत. संगणकीय तंत्रज्ञानाबाबत कायदेच नाहीत अशी स्थिती नाही. मात्र व्यक्तिगत पातळीवर त्यांचे सर्वांना संरक्षण मिळण्यात अडथळे आहेत. तंत्रज्ञानातून आलेली सत्ता जशी आणि जितकी वाढत आहे त्या मानाने कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्याचा वेग मंद आहे. केवळ जालीय तंत्रज्ञान आहे म्हणून व्यापारी कंपन्यांनी आपल्यावर नियंत्रण ठेवावे हे सयुक्तिक नाही. दोन हजार वर्षांपूर्वी सिसेरो या तत्त्ववेत्त्याने म्हणून ठेवले आहे की स्वातंत्र्य म्हणजे एक न्याय्य शासक असणे नव्हे, तर शासकच नसणे हे खरे स्वातंत्र्य. जालीय तंत्रज्ञानाच्या कंपन्या आता आपला शासक होऊ पाहत आहेत. त्याचे किती आणि कोणते आयाम आहेत हे या पुस्तकात विशद केले आहे. एवढेच नव्हे, तर मुळात आपण शासनव्यवस्था का निर्माण करतो, डिजिटल तंत्रज्ञानाचे शासन कसे असले पाहिजे आणि त्याद्वारे आपण काय साध्य करायचे आहे याचा विस्तृत ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे. या उद्दिष्टाला लेखकाने डिजिटल रिपब्लिक – डिजिटल गणतंत्र – असे संबोधले आहे. गणतंत्र या शब्दातून लेखकाला अभिप्रेत असलेला अर्थ : कोणत्याही सामाजिक गटाला इतरांवर वर्चस्व गाजवण्याला विरोध. कोणाच्याही कसल्याही – आर्थिक, राजकीय, धार्मिक इत्यादी "साम्राज्या"ला विरोध.
या आदर्श व्यवस्थेसमोरचा प्रस्थापित अडथळा म्हणजे बाजाराधिष्ठित व्यक्तिकेंद्रित व्यवस्था. सामाजिक प्रगती ही व्यक्तींच्या वैयक्तिक प्रगतीतून होते हा पाश्चिमात्य देशांतील राजकीय विचार अनेक शतके लोकशाही असलेल्या देशांत स्थिरावला आहे. त्यात वैयक्तिक उन्नती म्हणजेच सामाजिक उन्नती अशी धारणा आहे. त्यापलीकडे काही सार्वजनिक हित असण्याबाबतचा विचार नसतो. बाजाराधिष्ठित व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेच्या दृष्टिकोणातून कायदे हे स्वातंत्र्याला मारक असतात; जेवढे जास्त कायदे, तेवढा स्वातंत्र्याचा संकोच. आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित उद्योगांचा दृष्टिकोणही बाजाराधिष्ठित व्यक्तिकेंद्रित व्यवस्थाच आहे. या जालीय तंत्रज्ञानाला उत्तेजन देताना त्यांच्या सत्तेवर अंकुश न ठेवता त्यांना अधिकाधिक संरक्षण देणारे कायदे आपण केले. शासनाच्या त्यांच्या बाबतीतील सत्तेला लगाम घालताना या कंपन्यांची सत्ता अधिकाधिक प्रबळ होत आहे याकडे आपण दुर्लक्ष केले. नवउद्यमशीलतेला चालना देण्याच्या नादात आपण तंत्रज्ञानाला आर्थिक क्षेत्राशी जोडले आहे; वास्तविक, ते आता राजकीयदृष्ट्याही प्रबळ झाले आहे. व्यक्तींना या बलाढ्य कंपन्यांचे नियम व अटी स्वीकारण्यावाचून पर्याय नाही.
या नवतंत्रज्ञानाच्या युगात 'मी माझे संरक्षण कसे करू' या प्रश्नाचे नव्हे, तर आपण आपले व एकमेकांचे संरक्षण कसे करायचे हा प्रश्न डिजिटल गणतंत्रवाद विचारू व सोडवू पाहतो. त्यात येणारे अडथळे उघड आहेत. आर्थिक दबावगट, अधिक स्वारस्यगट हे नियमन व्यवस्था बळकावून आपला फायदा करू पाहतील; प्रशासक, कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक, न्याययंत्रणा हेच सारे, ज्यांचे नियमन करायचे त्यांच्या अधिक जवळ जातील; व्यवस्थेतील पळवाटा जाणणाऱ्या निवृत्त उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नंतर बलाढ्य कंपन्यांत महत्त्वाची पदे स्वीकारल्याची उदाहरणे आहेतच. आणखी एक काळजीचे कारण म्हणजे नवीन कायदे हे सोयीच्या राजकारणासाठी फुटबॉल म्हणून वापरले जातील, विशेषतः समाजमाध्यमांचे नियमन कसे, किती असावे, नसावे याबाबत सत्ताधारी व विरोधकांत रस्सीखेच असते ती तात्कालिक फायद्यासाठी; सार्वजनिक हिताचे, दीर्घ पल्ल्याचे धोरण म्हणून त्याचा गांभीर्याने विचार होत नाही. आणखी एक धोका म्हणजे नियमनांचा प्रस्थापितांना होणारा फायदा व नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना येणारे अनेक अडथळे. मोठ्या कंपन्या कायदे-निर्माण प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात आणि त्यांच्याकडे नवीन प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी कायदेतज्ज्ञांची फौजही असते.
ही सर्व आव्हाने मोठी आहेत, पण नवीन नाहीत. त्यांच्याकडे सुधारणांना विरोध करण्यासाठी नव्हे, तर सुशासनाचे नवीन व अधिक चांगले प्रारूप शोधण्याचे कारण म्हणून पाहायला पाहिजे. अधिक चांगली संसाधने, पळवाटांना, भ्रष्टाचाराला आळा, अधिक लवचीकता आणि छोट्या व्यवसायिकांना दिलासा देणारे प्रारूप शोधण्याची निकड या पुस्तकात मांडली आहे.
ससकाईंड यांनी केलेल्या 'रोगनिदाना'चे पाच महत्त्वाचे मुद्दे असे –
एक, डिजिटल तंत्रज्ञान खरीखुरी सत्ता गाजवू शकते. त्यांतील नियम आपल्या सगळ्यांवर बंधनकारक ठरतात. ते आपल्याही नकळत आपल्या वागण्यावर नियंत्रण आणते. आपले जगाचे आकलन कसे असावे हे ते ठरवते, कारण कोणती माहिती आपल्यापर्यंत कशा स्वरूपात पोहोचेल याचे नियंत्रण त्या तंत्रज्ञानानेच होते. जवळजवळ सततच आपल्यावर नजर राहते. सार्वजनिक चर्चांचे नियम, ते कधी लागू होणार किंवा होणार नाहीत, हे सर्व डिजिटल तंत्रज्ञानच ठरवते. आत्ता जरी त्याची क्षमता प्राथमिक अवस्थेत असली तरी ती अधिकाधिक सामर्थ्यवान होत आहे.
दुसरा मुद्दा असा की, तंत्र कधीही तटस्थ, अराजकीय असत नाही. सर्व डिजिटल व्यवस्था या पक्षपाती व पूर्वग्रहदूषित असतात.
तिसरे म्हणजे सध्याच्या व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञान हे बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेच्या तर्कावर आधारलेले आहे. त्यामुळे आर्थिक कार्यक्षमता लाभते ही जमेची बाजू. पण त्यामुळेच नुकसानही होते. बलाढ्य कंपन्यांना वेसण घालण्याऐवजी डिजिटल तंत्रज्ञान त्यांना प्रबळ करते. त्या उद्योगांतील आत्यंतिक स्वार्थी, क्रूर अशा मानसिकतेला कह्यात ठेवण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देते. नागरिकांना पाठबळ देण्याऐवजी बाजाराधिष्ठित व्यवस्था त्यांचे व्यक्तिगत व सामूहिक बळ काढून घेते.
चौथी बाब म्हणजे सद्य व्यवस्था नैसर्गिक किंवा अपरिहार्य आहे असे मुळीच नाही. ही व्यवस्था सार्वजनिक सुरक्षेऐवजी खाजगी व्यवहारांना प्राधान्य देणाऱ्या पक्षपाती कायद्यांमुळे निर्माण झाली आहे, ती बदलता येऊ शकते.
पाचवा व शेवटचा मुद्दा तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचे नियमन यांवर बाजाराधिष्ठित व्यक्तिकेंद्रित विचारधारेचा अतिरिक्त पगडा आहे.
जेमी ससकाईंडने सुचवलेले बदल ४ तत्त्वांवर आधारित आहेत.
लोकशाहीचा मूळ ढाचा शाबूत राहिला पाहिजे हे पहिले तत्त्व (the preservation principle). स्वतंत्र व स्थिर राजकीय अवकाशात लोकांना शांततेने समूह म्हणून वावरता आले पाहिजे. लोकशाही यंत्रणेत लोकांचे हक्क, कर्तव्ये यांचे पालन सुविहित असावे. कोणत्याही विषयावर खुली चर्चा करणे, आक्षेप घेणे, टीका करणे, एखाद्या कारणासाठी एकत्र येणे, निदर्शने करणे आणि आपल्यावर शासन करण्यास योग्य ते लोक, तत्त्वे व धोरणे निवडणे हे जनतेला करता येत राहायला हवे.
दुसरे, वर्चस्वाचे तत्त्व (the domination principle, खरे तर वर्चस्वनकार तत्त्व) हे डिजिटल तंत्रज्ञानाची अमर्याद व जबाबदारी नसलेली सत्ता नाकारून ती सत्ता कमीत कमी असावी या मताचा पुरस्कार करते. तंत्रज्ञानाची सत्ता राहणारच असली, तरीही तिचे बेबंद रूप उघड करणे, तिला उत्तरदायी बनवणे, त्या सत्तेचे विभाजन करणे आणि तिला वेसण घालणे अशा धोरणांनी कोणा एका गटाला इतरांवर वर्चस्व गाजवता येणार नाही हे उद्दिष्ट आहे.
तिसरे, लोकशाही तत्त्व (the democracy principle) हे नैतिक व नागरिक मूल्यांचे प्रतिबिंब प्रबळ तंत्रज्ञानांच्या ध्येय धोरणांत असले पाहिजे याबाबत आहे. जालीय मंचांवर लोकशाहीतील चर्चा, विचारमंथन याला तंत्रज्ञानाने वाव दिला पाहिजे, अल्गोरिदमे अन्याय कमी करणारे असली पाहिजेत, वाढवणारी नव्हे.
चौथ्या, संयततेच्या तत्त्वानुसार (the parsimony principle), कोणतेही सरकार या तंत्रज्ञानाची कमीत कमी, संयत, आवश्यक तेवढीच मदत घेईल. जालीय तंत्रज्ञानाला हाताशी धरून सुडाचे, दमनाचे राजकारण करता कामा नये. रशियन सरकारने व्लादिमीर पुतीनच्या राजवटीचा लोकप्रिय विरोधक अलेक्सी नव्हालनीच्या बाबतीत आधी या कंपन्यांची मदत घेतली आणि शिवाय नंतर त्याला मारूनही टाकले हे वास्तव आहे. USA, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या पाच देशांचा Five Eyes हा प्रकल्प या जालीय कंपन्यांकडून माहिती गोळा करतो व ती इतर देशांतून फिरवून आपापल्या देशांतील आपल्याच नागरिकांवर पाळत ठेवण्याविरोधातील कायद्यांना बगल देत राहतो. जालीय तंत्रज्ञान कंपन्यांची विदा वापरून सरकारांनी प्रबळ होणे तेवढेच धोकादायक आहे.
अब्जावधी लोक समाजमाध्यमे वापरत असताना फेसबुक, ट्विटर व गुगल (आता युट्यूबही गुगलच्याच पंखाखाली आहे) यांसह इतर छोट्या कंपन्यांची एकूण कर्मचारीसंख्या तीन, फारतर सव्वातीन लाख आहे. यातून त्यांची नकारात्मक, विध्वंसक अभिव्यक्तीला वेसण घालण्याची – कायद्याने सक्ती नाहीच – मर्यादा स्पष्ट होते. फेसबुक मात्र त्यांच्या मंचावरील बहुसंख्य लोक सकारात्मक गोष्टीच मांडतात असा बचाव करते. त्यावर गार्डिअनसाठी काम करणाऱ्या ज्युलिया कॅरी वांग यांनी प्रश्न विचारला आहे – एखाद्या गोंडस नातवंडाच्या फोटोला मिळालेल्या किती लाइक्समुळे फेसबुकच्या माध्यमातून एकत्र येऊन एखाद्या सुरक्षारक्षकाच्या हत्येचा कट करून तो तडीस नेणाऱ्या गटाच्या विध्वंसकतेचे परिमार्जन होते? हे म्हणजे चेर्नोबिलच्या ४पैकी ३ अणुभट्ट्यांचा स्फोट झाला नाही असे विधान करण्यासारखे आहे. खरे असले तरी महत्त्वाचे काय याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. या कंपन्या मात्र आता त्यांनी जन्माला घातलेल्या बाळाचा भस्मासुर झाला आहे हे मान्य करणार नाहीत.
मात्र, ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या क्लोरोफ्लुरोकार्बन उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून पुरेसे उपाय अमलात आणवून कमी करण्यात यश आले, त्याचप्रमाणे या समाजमाध्यम कंपन्यांना त्यांच्यामुळे तयार होणारी मानवी संस्कृतीची पीछेहाट त्यांनीच थांबवावी यासाठी बाध्य केले पाहिजे असे आर्थर म्हणतात.
तंत्रज्ञानाने आता आणखी पुढची पायरी गाठली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक हुशार बनत आहे. मानव नसलेले बॉटस् मानवी भावभावना व्यक्त करणारे लेख लिहू शकतात. डीपफेक तंत्रज्ञान एखादी व्यक्ती कशात गुंतलेली नसतानाही तसे असल्याचे भासवू शकते. हे धोके मोठी सामाजिक व व्यक्तिगत उलथापालथ घडवून आणू शकतात. यावर आपण जागरूकतेने, तात्कालिक फायदे न पाहता सकल जगताचे हित लक्षात घेऊन पावले उचलली पाहिजेत असे ससकाईंड परोपरीने सांगतात.
ससकाईंड आणि आर्थर दोघेही प्रश्नाचे गांभीर्य छान समजावतात, पण त्यांनी सुचवलेले सारे उपाय मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण आणि कशी या प्रकारचे आहेत. ते आदर्शवादी, पण तितकेच वेळखाऊ आणि आणि पक्षपात न होण्याची खात्री नसलेले आहेत. जुन्या काळच्या, लोकांच्या थेट सहभागाच्या लोकशाहीचे प्रारूप राबवण्यासाठी छोटे छोटे दबाव गट कार्यरत करणे, त्यांनी काय धोकादायक आहे हे दाखवून देणे व त्यानुसार कंपन्यांनी समाजाला हानिकारक मजकूर आपल्या मंचावरून हटवणे अशासारखे ढोबळ उपायच ससकाईंड सुचवतात. चार्ल्स आर्थरांनी सुचवलेला उपाय – मोठ्या मक्तेदारी कंपन्यांना वेसण घालण्यासाठी जसे त्यांच्या बाजारातील वाट्यावर मर्यादा घालणारे कायदे केले गेले त्याप्रमाणे – या जालीय कंपन्यांवर मर्यादा आणणे, तसेच शेअर, फॉरवर्ड अशा प्रकारच्या प्रसार प्रचार सहजी करता येऊ नये अशी व्यवस्था अमलात आणवणे हे आहेत. व्यक्तिगत वापरकर्त्यांचा सजग वावर हे जरुरीचे तरीही अपुरे पाऊल असल्याचे या दोन्ही पुस्तकांतून प्रकर्षाने जाणवते.
प्रतिक्रिया
पुस्तक परिचय आवडला.
उज्ज्वला, लेख आवडला. या दोन पुस्तकांपैकी 'द डिजिटल रिपब्लिक' मी मागे वाचलं होतं; पण 'सोशल वॉर्मिंग ...' वाचलेलं नाहीये. तेही यादीत वाढवत आहे. ही, अशी पुस्तकं वाचून खिन्न वाटतं खरं; पण त्यावर उपाय म्हणून मी फेसबुकवर मीम बघण्यात थोडा वेळ घालवते!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेखातील मत 1000000000% खरी आहेत
पण हे सत्य स्विकरण्या इतकी स्व बुध्दी ची लोक जगात अत्यल्प आहेत.
माणूस मेंढर न पेक्षा पण बेआकल प्राणी आहे.
नेता सांगेल तेच सत्य, विज्ञान च नावावर जे खोटे समज पसरवले जातात तेच सत्य आहे,सोशल मीडिया सांगते तेच सत्य आहे.आपल्या जातीचा च आपले भले करेल,आपल्या धर्माचा च आपले भले करेल ,आपले सरकार च आपले हित जपेल
खूप मोठी लिस्ट आहे
अशी गुलाम मानसिकता
थँक्स
थँक्स दोनही पुस्तके यादीत घातली. नेक्सस मध्ये सांगितलेले काही मुद्दे या लेखातल्या काही मुद्यांच्या जवळचे वाटले.
तुम्ही सोशल मिडिया वर अकाऊंट
तुम्ही सोशल मिडिया वर अकाऊंट बनवताना त्यांच्या अटींना मान्यता देतो.
मग विषय संपला. ते अमुक करतात तमुक करतात ही ओरड कशाला? अकाऊंट बनवून नका. कोणी नाही तुमच्या वाटेला येणार.